आठ चौपन्न

Primary tabs

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 9:19 am

आठ चौपनचा सगळा ग्रुप दहा मिनिटं आधीच प्लॅटफॉर्मवर गोळा झाला आणि पेपरांची देवाणघेवाण सुरू झाली. फलाटावरल्या स्टॉलवरच्या पोऱ्यानं पाण्याच्या दोनतीन बाटल्या आणि कचोरीचं पुडकं एकीच्या हाती आणून दिलं तेवढ्यात गाडी फलाटावर येतच होती. हातातल्या पर्स, पिशव्या, छत्र्या सावरत सगळ्याजणींनी एकमेकींकडे पाहून डोळ्यांनीच इशारे केले, आणि झेपावायच्या तयारीत त्या उभ्या राहिल्या...

गाडी पुरती थांबायच्या आधीच सगळ्याजणी जागा पटकावून स्थिरावल्या होत्या...

पुढच्या दोनतीन मिनिटांत डबा खचाखच भरून गेला आणि पुन्हा इशारे झाले... एका प्लास्टिकच्या पिशवीतली एक छोटीशी डफली बाहेर आली, आणि नाजूकशी थाप पडताच नेहेमीच्या सवयीनं तो डबा सळसळला...
डोळे मिटून, हात जोडून सगळ्याजणी शांत सुरात प्रार्थना म्हणत होत्या... `इतनी शक्ती हमें देना दाता....' विंडोच्या बाजूला उमटलेल्या त्या सुरानी फलाटावरच्या गर्दीतही एक प्रसन्न झुळूक लहरून गेली...
चढत्या सुरांबरोबर गाडीनंही वेग घेतला आणि अवघ्या डब्यात सूर आणि तालाचा मस्त मेळ जमला... अवघ्या डब्याला सवयीचा झालेला नेहेमीचाच तो आगळा सोहळा सुरू झाला... एकामागून एक येणाऱ्या सुरेल गाण्यांबरोबर डब्यातल्या सगळ्या बायका गुणगुणू लागल्या, आणि खचाखच भरलेली सगळी गर्दीच जणू एक्जीव होऊन गेली... पुढच्या पाऊण तासाच्या प्रवासाला सूर गवसला, आणि त्या सुरांनी सकाळच्या ताजेपणालाही एक नवी टवटवी आणली... मधल्या स्टेशनावर चढणाऱ्या एका वयस्कर सोबतीणीसाठी अगोदरच कुणीतरी जागा मोकळी करून ठेवली होती...

मिनिटभरासाठी गाडी थांबली आणि डब्यातल्या सुरांची पट्टी थोडीशी खाली झाली. दररोज न चुकता त्यांच्याबरोबर असणारी ती सोबतीण आज फलाटावर नव्हतीच... गाडी सुटली तेव्हा त्या सुरांमधली अस्वस्थ छटा बाकीच्या नेहेमीच्या प्रवाशांना नेमकी जाणवली, आणि पुढचं स्टेशन येईपर्यंत डबा थोडासा शांत झाला...

आता गाडीनं मुंबई गाठली होती. पुन्हा पिशव्या, पर्स सावरायला सुरुवात झाली आणि डब्यातला नाद हळूहळू मंदावत गेला. पुन्हा डोळे मिटून एक प्रार्थना झाली आणि पुढच्या स्टेशनागणिक रितारिता होताना डब्यातला उदासपणा मात्र वाढत गेला. प्रवासाच्या सुरुवातीला सुरांमधून सांडणारं चैतन्य गाडी शेवटच्या स्टेशनावर थांबली, तेव्हा कोमेजून गेलं होतं. त्या स्टेशनवर नेहेमी चढणारी त्यांची नेहेमीची साथीदारीण का आली नसेल, ही चिंता प्रत्येकीच्या चेहेयावर दिसत होती.

संस्कृतीसमाजप्रकटन

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

4 Jun 2019 - 11:16 am | श्वेता२४

आवडलं.

अन्या बुद्धे's picture

4 Jun 2019 - 12:41 pm | अन्या बुद्धे

छान!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2019 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

रोज बरोबरीने रेल्वेप्रवास करणार्‍यांचे (त्या प्रवासापुरते का होईना पण) एक भावजीवन बनते. त्याची झलक आवडली.

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2019 - 2:11 pm | टवाळ कार्टा

ठाणा लोकल?

उगा काहितरीच's picture

4 Jun 2019 - 2:59 pm | उगा काहितरीच

छान.

ज्योति अळवणी's picture

4 Jun 2019 - 7:22 pm | ज्योति अळवणी

आवडलं.

खूप पूर्वी मी काही महिने दादरहून संध्याकाळी लोकल पकडायचे. त्यात काही माझ्याच वयाच्या मुली भेंड्या खेळत. त्यांच्याशी मस्त मैत्री झाली होती. आजही कधीतरी आठवतात ते दिवस आणि बरं वाटत.

जॉनविक्क's picture

5 Jun 2019 - 3:04 pm | जॉनविक्क

तरीही बरेच काही सांगून गेले. अजून लिहा.

समीरसूर's picture

6 Jun 2019 - 3:02 pm | समीरसूर

खूप छान!

हस्तर's picture

6 Jun 2019 - 6:23 pm | हस्तर

Wednesday ची आठवण झाली