औरंगाबाद येथील वेरुळ लेणी

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
2 Mar 2019 - 1:07 pm

औरंगाबाद येथील वेरुळ लेणी

औरंगाबाद जवळील अजंता आणि वेरुळ लेणी पाहावीत हे स्वप्न मनात गेली अनेक वर्ष जपलं होतं. कोणाची तरी सोबत असली की गप्पा खूप होतात आणि मग आपलं मन इच्छा असूनही आपल्याशी बोलत नाही; असं मला नेहेमी वाटतं. म्हणूनच मला ही लेणी एकटीने पहायची होती. बहुतेक माझी ही दुर्दम्य इच्छा ईश्वर चरणी रुजू झाली; आणि अगदी अचानक औरंगाबादला जाण्याचा योग आला. त्यात देखिल एकटीने लेणी बघू शकणार होते. हे म्हणजे "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!'' अस झालं. पण एकच दिवस मिळणार होता. वेरुळ लेणी औरंगाबादपासून साधारण तीस किलोमीटरवर आहेत; मात्र अजंता खूपच लांब आहेत. म्हणून मग केवळ वेरुळ लेणी बघायचं असं ठरवलं.

वेरुळ लेणी पाहाताना मनात अनेक विचार येत होते. कसं असेल त्या काळातलं समाज जीवन? अनेक ठिकाणी असा उल्लेख सापडतो की प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी व मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. म्हणजे या वेरुळ लेण्यांना बांधणाऱ्या लोकांना/कलाकारांना राजाश्रय, धर्माश्रय आणि लोकाश्रय नक्कीच असेल. म्हणून तर कदाचित वर्षानु वर्ष आणि पिढ्यांनपिढ्या या लेण्यांमधील अप्रतिम कोरीव काम करणे शक्य झाले असेल. वेरुळ लेणी साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेली लेणी आहेत. इतकी वर्षे या लेण्यांमधील काम चालू होते; म्हणजे इथे कायम स्वरूपी राहाणारे कलाकार असतीलच न. त्यांचे रोजचे व्यवहार कसे असतील?

 मी उजवीकडून म्हणजे पहिल्या लेण्यांपासून सुरवात केली. साधारण एक ते नऊ लेणी सारखीच आहेत आतून. साधारण एक मोठा सभा मंडप आणि दोन्ही बाजूनी लहान खोल्या अशी यांची रचना आहे. मात्र आतलं दगडातील कोरीव काम अप्रतिम सुंदर आहे. या गुंफा बघताना माझ्या मनात सारखं येत होतं की कोणत्याही हवामानात सहज राहाता येईल अशी या खोल्यांची रचना वाटते आहे. सभागृहात आणि त्याला लागून असणाऱ्या त्या खोल्यांमध्ये आतवर सूर्यप्रकाश पोहोचणे शक्यच नाही. पण आत जाऊन बघितले तर छानसे कोनाडे आहेत. कदाचित त्याकाळात या कोनाड्यांमध्ये मोठे तेल दिवे ठेवत असतील. या खोल्यांच्या भिंती इतक्या जाड आहेत की उन्हाचा किंवा थंडीचा तडाखा आत जाणवू नये. मनात आलं कोण वापरत असेल या खोल्या त्या काळात? या सुरवातीच्या काही गुंफा या वयोवृद्धांसाठी असाव्यात का? सुखी सांसारिक आयुष्य जगून झाल्यानंतर आणि आपल्या सर्व जवाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर विधात्याच्या प्रार्थनेत उरलेले आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी तर या सुरवातीच्या गुंफा नसतील ना? पुढच्या काही लेण्यांमध्ये एक-दोन-तीन मजली लेणी आहेत. तिथे पाण्याचे जवळच आणि उत्तम साठे आहेत. अनेक खण असलेल्या एक किंवा दोन गुंफा आहेत. खण असलेल्या गुंफा म्हणजे स्वायंपाक घर असेल का? धान्य साठवण्यासाठी बांधलेल्या खणाचे स्वयंपाकघर! सामोरच मोठे सभागृह! त्याचा उपयोग भोजनालय म्हणून होत असेल का? मधील काही मजली गुंफा या राहण्यासाठी असाव्यात कदाचित. अशा प्रकारच्या स्थापत्या मधून एकत्रित कुटुंबाची कल्पना मनात येते. महिला कदाचित एकत्रितपणे सर्वच कुटुंबांचा स्वयंपाक करत असतील. पुरुष मंडळी गुंफांमधून खोदकाम करून सुंदर कोरीव शिल्प तयार करत असतील. लाहान मुले शिल्प कला आणि त्या अनुषंगाने धर्म ज्ञान शिकत असतील; आणि मोठे होऊन पुढील गुंफांमधील शिल्प लेणी करत असतील. 

वानप्रस्थाश्रम स्वीकारलेली वृद्ध मंडळी पहिल्या काही गुंफांमधून राहात असतील आणि दिवसातील अधिक वेळ प्रार्थना करणयात घालवत असतील. मधल्या दोन-तीन मजली गुंफांमधून सर्वसाधरण लोक; म्हणजे कलाकार/शिल्पकार आपल्या कुटुंबा सोबत राहात असतील. तेच या वृद्धांना रोजचा आहार देत असतील आणि त्याबदल्यात ही मंडळी त्यांच्या मुलांना शिक्षण देत असतील. मुळात वानप्रस्थाश्रम स्वीकारलेली ही मंडळी कलाकार/शिल्पाकर असल्याने ती मंडळी धर्माच्या ज्ञाना बरोबरच पुढील पिढीला शिल्प कला शिकवत असतील. तरुण वयात शिल्प कोरताना आपण काय निर्माण करतो आहोत याचा देखील ते अभ्यास करत असावेत. परिणामी ते धर्म ज्ञान शिकत गेले असतील; जे ते पुढच्या पिढीला शिकवत असतील. प्राप्त झालेल्या राजाश्रयामुळे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरू-व्यापाऱ्यांमुळे देखील त्यांचे रोजचे जीवनमान सुकर होत असेल. मुळात आयुष्याकडून फार मोठ्या अपेक्षा नसल्याने देखील तिथे राहणारी कुटुंब शेकडो वर्षे सुखाने राहिली असतील.

अशाप्रकारे कदाचित अनेक पिढ्या तिथेच कायमस्वरूपी राहिल्या; संसार थाटले; लेणी कोरत असताना त्याच लेण्यांचा वापर केला; म्हणूनच शेकडो वर्षे या गुंफांमधील लेण्यांची निर्मिती होऊ शकली असेल. नाहीतर यासर्व लेण्यांमधील काम करण्यासाठी आज-कालच्या माथाडी कामगारांप्रमाणे रोज त्याठिकाणी ये-जा करणे तसे अवघडच. त्याकाळी त्यापरिसरतील मानवी जीवन कदाचित असे असेल; असा एक विचार मनात येत होता ही लेणी पाहताना. तसाच अजून एक विचार मनात सतत येत होता.

या लेण्यांची रचना १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) अशी आहे; आणि जरी या सर्व लेण्यांना तीन धर्मात विभागले असले आणि यांचे खोदकाम विविध काळात झाले असले तरी सर्व लेण्यांमध्ये एक समान सूत्र आहे; असे वाटते. एक ते चौतीस लेण्यांमधील काही शिल्पाकृती सारख्याच आहेत. साहाव्या गुंफेत दगडात कोरलेली सरस्वतीची मूर्ती आहे. तशीच काहीशी मूर्ती जैन लेण्यांमध्ये देखील दिसते. त्याचबरोबर अजूनही काही देवींच्या मूर्ती आहेत सहाव्या गुंफेत. कदाचित त्या मूर्ती नद्यांच्या असाव्यात. कारण त्या मूर्तीच्या रचनेत वाहत्या पाण्याची कल्पना केली आहे. हिंदू आणि जैन धर्मात देखील जल हे जीवन आहे आणि नद्यांना देवत्व दिलेले आहे. नवव्या लेण्यांमध्ये तारा देवीची मूर्ती आहे. जिला बौद्ध धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जैन धर्मात देखील तिला पुजले जाते; असे म्हणतात. अर्थात त्या धर्मात तिचे नाव वेगळे असावे. त्यासोबत अनेक प्राण्यांची शिल्प देखील सर्वच गुंफांमधून दिसतात. अकरावे लेणे दोन मजली असून या लेण्यांमध्ये अनेक हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. गणपती, महिषासुर मर्दिनी, यक्ष या मूर्ती सहज ओळखता येतात. इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे सौंदर्य डोळे दिपवते. बारावी लेणी तीन मजली आहे. मला हे लेणं खूपच विशेष वाटलं; कारण या गुंफेतील मूर्तींमध्ये खुप विविधता आहे. इथे सुखी कुटुंबाची प्रतिमा आहे; आई-वडील-मुलगा-मुलगी असे एकत्र दिसतात. तसेच दोन स्त्रिया एकक पुरुष आणि 4 मुले असे 'कुटुंब' देखील मला दिसले. म्हणजे त्याकाळात देखील साधारण कुटुंब; द्विभार्या पद्धती होती का? अशी कुटुंब या लेण्यांमध्ये शिल्प कोरत राहात होती का?

 हिंदू लेणी तेराव्या गुंफेपासून सुरू होतात. तेराव्या लेण्यामध्ये विशेष असे काही वाटले नाही. मात्र चौदाव्या लेण्यांमध्ये अतिचर्चित रावण कैलास पर्वत उचतलतानाचे आणि कैलासावर शंकर-पार्वती बसलेले असल्याचे शिल्प पाहायला मिळते. इथे गणेश मूर्ती देखील आहे. इतर अनेक देवतांच्या मूर्ती देखील आहेत पण ते नक्की कोणते देव आहेत ते ओळखता येत नाही. मात्र गम्मत म्हणजे ही न ओळखता येणाऱ्या देवांची शिल्प बौद्ध गुंफांमध्ये देखील होती. जैन लेण्यांमधून चौमुखी/त्रिमुखी देव-देवतांची शिल्प दिसतात. अशी दैवत तर हिंदू धर्मात अनादी-अनंत काळापासून आहेतच की. म्हणजे त्या काळात सर्वच धर्मांची आराध्य दैवतं दिसायला काही प्रमाणात सारखीच तर नव्हती?

माझ्या मनात येणारी एक संकल्पना म्हणून फक्त सांगते; की ही लेणी असंख्य वर्षे बनत होती; कदाचित शिल्पकार सहकुटुंब तिथेच राहून संसार करत या लेण्यांची निर्मिती करत होते. नवीन पिढीला धर्म आणि कला या दोन्हीचे ज्ञान देत होते. या धर्म ज्ञात स्वधर्माची माहिती असूनही त्यांच्यात एक समधर्मीय सुसूत्रता होती कदाचित. बौद्ध, हिंदू किंवा जैन कोणताही धर्म असो; या सर्व धर्मांमधून एकच विचार प्रेरणा होती का.... शांत संसार सुख घेऊन त्याच बरोबर परोपकार करत आणि इष्ट देवतांची आराधना करत शेवटी सर्व जवाबदाऱ्या संपवून परमात्म्याशी (निसर्गाशी) तादम्य पावणे हा मानव धर्म आहे.

वरती मांडलेले मुद्दे हे माझ्या मनात सतत घोळत होते वेरुळ लेणी पाहाताना. ते तुमच्या समोर मांडले आहेत. त्याव्यतिरिक्त आंतरजालावरून (interrnet) मिळवलेली माहिती देखील इथे देते आहे.

वेरुळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ही लेणी वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण झाली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते. इ.स. १९८३ साली वेरूळ लेणी 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली गेली. सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेली अशी ही एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) अशी रचना आहे.

पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) याच्या काळात झालेली आहे. या लेण्यापैकी १० व्या लेण्यात मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. 12 व्या कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते. कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा अतिउच्च नमुना आहे असे म्हणता येईल. ‘आधी कळस, मग पाया’ ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. हे लेणे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे. कैलासावर शिव-पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्याला "कैलास" लेणे असे म्हटले जाते. पुरातत्त्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक कै. म. के. ढवळीकर यांनी या लेण्याबद्दल नोंदविले आहे की या मंदिराचा महत्वाचा भाग कृष्ण (पहिला) या राजाच्या काळात पूर्ण झाला असावा. गोत्झ या अभ्यासकाने नोंदविल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे. दक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्य शैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे. पटडक्क्ल (कर्नाटक) येथील विरुपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. 11 वी लेणी म्हणजे तिमजली मठ आहे.

दहाव्या आणि बाराव्या लेण्यांमध्ये बुद्धा इतकीच महत्वाची अशी एक स्त्रिमूर्ति आहे. महायान तिबेटी बौद्ध धर्माच्या संदर्भातील आर्य तारा ही एक स्त्री बोधिसत्व आहे. वज्रयानबौद्ध धर्मात ही स्त्री बुद्धाच्या रूपात आहे. ती "मुक्तीची जननी" म्हणून मान्य आहे तसेच कार्य व उपलब्धीच्या क्षेत्रात यशाची द्योतक आहे. हिला जपानमध्ये 'तारा बोसत्सु' व चिनी बौद्ध धर्मात 'डुओलुओ पुसा' म्हटले जाते.

जैन धर्मीयांची क्र. ३० ते ३४ अशी एकूण पाच गुहा-मंदिरे येथे आहेत. ३२ ची गुंफा जैनधर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. या लेण्यांतील छोटा कैलास शिल्पाकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृती असावी असे वाटते. ही लेणी एक मजलीच असून ती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पहायला मिळते. २३ वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.

.... आणि आता मी पाहिलेलं शिल्प सौंदर्य देखील सांगते.

दहाव्या लेण्यातील शिल्प काहीसे वेगळे आहेत. दहाव्या गुंफेच्या छताची रचना अजून वेगळी आहे. छतावर लाकडातील साप कोरलेले आहेत आणि जणूकाही ते खांबांना आधार देत आहेत असे वाटते. स्तूपाच्या मध्यभागी बसलेल्या अवस्थेतली बुद्धाची मूर्ती आहे. या स्तुपाला अर्ध वर्तुळाकार झरोके देखील आहेत. पण ते अत्यंत लहान आहेत; म्हणजे घोड्याच्या नालाच्या आकाराचे दिसतात. अकरावे लेणे दोन मजली तर बारावे लेणे तीन मजली आहे. लेण्याच्या दोन्ही बाजूने प्रचंड मोठा पाणी साठा करता येईल अशी सोय आहे. एक बाजूच्या गुंफेत मोठे कप्पे आढळतात. मात्र ते कप्पे राहाण्याइतके मोठे नाहीत. बारावे लेणे हे बौद्ध धर्मीय शेवटचे लेणे.

हिंदू धर्माची ओळख वाटावीत अशी लेणी तेरा पासून सुरू होतात. यातील पंधराव्या लेण्यामध्ये पहिल्या मजल्यावर एक मोठे दालन आहे आणि दुसऱ्या मजल्यावर हिंदू देवी-देवतांची शिल्प आहेत. इथे शिव-पार्वतीच्या विवाह प्रसंगाचे अप्रतिम असे शिल्प आहे. इथे मात्र गणपती बरोबर कार्तिकेय आणि त्याचे वाहन मोर यांचे शिल्प पाहायला मिळते. यानंतर सर्वत जास्त चर्चित आणि माहिती असलेले सोळाव्या गुंफेतील लेणे म्हणजे आधी कळस आणि मग पाया अशा प्रकारे बांधले गेलेले शिवमंदीर. या मंदिराचे वास्तुशिल्प द्राविड वास्तुशिल्पां सारखे आहे. इथे सर्वच देवाचे शिल्प आणि सर्वच पुराण कथांचे चित्रण आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश, नरसिंव्ह, कालिया मर्दन कथा, विष्णूचे दशावतार, मारुतीच्या खांद्यावरील राम (रामायणातील काही प्रसंगांचे चित्रण), शेषशायी विष्णू आणि नाभीतून जन्मलेले बृहस्पती, महाभारतातील विराट कृष्णरुप (महाभारतातील काही प्रसंगांचे चित्रण), गणपतीच्या विविध कलाकृती. सर्व रस वर्णन करणारी शिल्प (शृंगार, हास्य, करून, रौद्र, वीर, भयानक, भिभत्स, अद्भुत आणि शांत) सर्व कला सांगणारी शिल्प, सूर-असुर कथा, यक्ष कथा..... हे लेणे पाहाणे ही एक पर्वणीच आहे. कमळ पुष्पच्या विविध रचनांमधील शिल्प देखील पाहण्यासारखी आहेत. या लेण्यातून बाहेर पडताना मनात आले की एकसंघ एकाच शिळेतून आधी कळस आणि मग पाया असे शिव मंदिर कसे काय बनवले गेले असेल. विचार करत या गुंफेच्या थोडे दार उभी होते आणि मनात आले; की कदाचित अगोदर बाजूच्या गुंफा/शिल्पाकृती कोरण्यात आल्या असतील. त्यामुळे सहाजीकच मध्ये एकच एक मोठी शिळा तयार झाली असेल; आणि मग या शिळेचे विचारपूर्वक मंदिरात रूपांतर झाले असेल. सतराव्या लेण्याच्या प्रवेशद्वारावर ब्रम्हा आणि विष्णूच्या शिल्पाकृति आहेत. खांबांवर गणपती, दुर्गा यांची शिल्प आहेत; आणि आत शिवलिंग आहे. अठरा, एकोणीस आणि वीस या लेण्यांमध्ये विविधे शिल्प आहेत. परंतु सोळाव्या लेण्यातील शिल्पाकृतीच परत एकदा इथे दिसतात. मात्र एकवविसावे लेणे पाहण्यासारखे आहे. अप्रतिम कोरिव काम आहे इथे. अनेक ठिकाणी पुरातन रंगात रंगवलेले छत दिसते. आता जरी रंग उडून गेले असले तरीही काही ठिकाणचा लाल रंग लक्षात येतोच. इथे एका शिल्पात एक स्त्री मगरीवर स्वार झालेली दिसते. नंतर चौकशी करता मला कळले की ते गंगा नदीचे शिल्प आहेत. हे शिल्प मुद्दाम पहाण्यासारखे आहे. कार्तिकेय, पार्वतीचा हात धरलेले शिव, आणि समोर नृत्य करताना शिवाचे अनुयायी अशी देखील शिल्पाकृती बघायला मिळते. बावीसाव्या लेण्यांतदेखील अनेक देव-देवतांची शिल्प आहेत. ज्यांना शिल्प पाहण्याची आवड आहे त्यांनी या लेण्याला जरूर भेट दिली पाहिजे. मात्र या सर्व शिल्पाकृती तस पाहिलं तर सोळा ते एकवीस या लेण्यातील शिल्पांसारख्याच आहेत. तेविसाव्या लेण्यात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची त्रिमूर्ती कोरलेली आहे. चोविसाव्या लेण्यात शिव मंदिर आहे. पंचविसावे लेणे म्हणजे एक विशाल गुंफा आहे. इथे कुबेराची वाटावी अशी मूर्ती आहे. छतावर सूर्य आणि त्याचे सात घोडे असा रथ चित्रित आहे. सव्वीसाव्या लेण्यातील द्वारपाल म्हणून स्त्रि प्रतिमा आहेत. हे एकच वैशिष्टय मला या लेण्यात जाणवले. सत्ताविसाव्या लेण्यात परत एकदा महिषासुर मर्दिनी, ब्रम्हा, विषु, महेश, श्रीकृष्ण आणि अशाच अनेक देवांच्या शिल्पाकृती आहेत. अठ्ठविसाव्याा लेण्यांमध्ये शिवलिंग आणि अष्टभुजा दुर्गेची शिल्पाकृती आहे. माहिती घेतली तेव्हा समजले की पावसाळ्यात या लेण्याच्या वरून मोठा धबधबा वाहातो. एकोणतीसावे लेणे खूपच मोठे आहे. इथे जवळ जवळ 26 खांब आहेत; ज्यावर अप्रतिम कोरीव काम आहे. इथे परत एकदा बुद्ध लेण्यासारखे काम दिसून येते. या लेण्याचे वैशिष्टय मला असे जाणवले की या लेण्यात आतवर सूर्य प्रकाश येत होता. इथे शिव एका असुराला मारत आहे आणि पार्वती हास्य मुद्रेने बाजूला उभी आहे अशी शिल्पाकृती दिसते. त्याशिवाय इथे शिवाची नटराज मूर्ती आणि पद्मासन घातलेली मूर्ती देखील पाहायला मिळते. या लेण्याच्या प्रवेशद्वारावर स्त्री आणि पुरुष असे दोघेही द्वारपाल दाखवले आहेत. इथे हिंदू लेणी संपतात.

 एकतीसव्याा लेण्यांपासून जैन धर्मीय शिल्प दिसायला लागतात. या लेण्यात माहावीर, पार्श्वनाथ आणि गोमटेश्वराच्या मूर्ती आहेत. बत्तीसावी लेणी तीन मजली आहे. पहिल्या मजल्यावर एक मंदिर आहे; ज्याला दोन बाजूने प्रवेशद्वार आहे. इथल्या महाविराच्या शिल्पाचे वैशिष्टय हे की ते चौमुखी आहे. दुसऱ्या मजल्यावर कलात्मक शिल्प आहेत. या गुंफेत गणपतीची शिल्पाकृती राजसिंव्हासनावर बसलेली दाखवली आहे. या लेण्याचे छत पाहण्यासारखे आहे. एक सुंदर कमळाच्या फुलांचे कोरीव काम संपूर्ण छतावर केलेले आहे. तेहेत्तीसावे लेणे दोन मजली आहे. इथे दुसऱ्या मजल्यावर एकच एक मोठे दालन आहे आणि त्याच्या भिंतीवर महाविराच्या शिल्पाकृती आहे. खालच्या मजल्यावर सुंदर कोरीव कामाचे खांब आहेत. चौतीसाव्या आणि शेवटच्या लेण्यामध्ये माहावीर, पार्श्वनाथ आणि गोमटेश्वच्या शिल्पाकृती आहेत. तीस ते चौतीस ही लेणी आतून एकमेकांना जोडलेली आहेत. त्यामुळे तिसाव्या लेण्यांतून आत जाऊन शेवटच्या लेण्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. ही खरच सुंदर कल्पना आहे; अस मला वाटतं. 

बौद्ध गुंफांप्रमाणेच हिंदू धर्मीय गुंफामध्ये देखील राहाण्याची सोय असावी अशी रचना नजरेस पडते. जैन धर्मीय गुंफांमध्ये सुरवातीला सुखी कुटुंबाच्या शिल्प कला पाहायला मिळतात. यातून त्याकाळातील कोणताही धर्म संसार सुखाच्या विरोधात होता असे वाटत नाही. अद्भुत स्थापत्य आणि शिल्पाकृती मधून शांत, सुखी सांसारिक आयुष्य जगण्याचा संदेश देत असतील का ही लेणी? परमात्मा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्या मनातील दैवत किंवा तोच तो अगाध निसर्ग असे तर सांगायचे नसेल या सर्व लेण्यांना? सांसारिक जवाबदऱ्या संपल्या नंतर परमार्थ मार्ग स्वीकारून मृत्यू प्राप्त होई पर्यंत धर्म संमत शांत जीवन जगावे; असं तर नसतील न सांगत ही शिल्प?

खरंच यातून आजच्या काळातील मनुष्य काहीच शिकणार नाही का? 

इतिहासअनुभव

प्रतिक्रिया

प्रचेतस नामक आणखी एक मिपामूर्ती या लेण्यांच्या एखाद्या गुहेत दिसली नाही का?

त्या गुंफांतच त्यांचा कायमस्वरूपी निवास असतो असं ऐकलं आहे.

चौथा कोनाडा's picture

2 Mar 2019 - 10:51 pm | चौथा कोनाडा

:-)))

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2019 - 2:15 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2019 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

गवि- =))))))

त्या काळातील जीवनमाना विषयीच्या कल्पना आवडल्या! लेखाला काही फोटोंची जोड द्यावी अशी विनंती.

ज्योति अळवणी's picture

2 Mar 2019 - 2:04 pm | ज्योति अळवणी

फोटो डगवायचा खूप प्रयत्न केला. पण ते जमलं नाही. मी माझा ब्लॉग सुरु केला आहे. तिथे फोटो डगवले आहेत. जमल्यास जरूर बघा

लिंक खाली देते आहे

https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/

कंजूस's picture

2 Mar 2019 - 2:28 pm | कंजूस

उत्तम लेख. अशा पुरातन शिल्पकलांत काही वाचन न करता किंवा माहिती करून न घेता पाहिल्यावर काय वाटले हे लिहिल्याने लेणी आताच पाहतो आहे आणि शिल्पे जिवंत होऊन बोलत आहेत असं वाटलं.
एकट्याने लेणी पाहता आल्याने भरपूर वेळ देऊन पाहता येतात.
आता अजिंठाही पाहून काय वाटलं ते लिहाच.
( अजिंठा सोमवारी बंद असते. जळगावहून 60 किमि."टी जंक्शन" स्टापवर जळगाव-औरंगाबाद बस थांबतात. शेअर ट्याक्सीही सतत असतात. तिथून चार किमी एसटीची लेणी सर्विसच घ्यावी लागते. उत्तम व्यवस्था. लेण्याजवळ ब्यागा ठेवियला क्लोकरूम, टाइलेट आहे. लेणी नऊ वाजता उघडतात.)

ब्लॉग च्या चित्रातील लिंक

<img src="इथेलिंकटाका" width="560"/>
इथे टाकून चित्र डागता येते.

लेखात जिथे हवे तिथे टाका.

यशोधरा's picture

2 Mar 2019 - 2:47 pm | यशोधरा

लेख आवडला.
वर कंजूस काकांनी दाखवल्याप्रमाणे लेखासोबत फोटोही टाका.

प्रचेतस's picture

2 Mar 2019 - 2:58 pm | प्रचेतस

लेख अगदी ओझरता वाचला.
आता ह्या क्षणाला वेरूळ लेणीतच तारेच्या मूर्तीसमोर बसलो आहे. :)

हरवले ते सापडले, अर्थात चुकला फकीर मशिदीत अर्थात चुकला प्रचेतस कैलासलेण्यात.

हा मनुष्य जगात कोठेही बसून वेरूळच्या कोणत्याही गुंफेबाबत "आता डावीकडे वळून वीस पावले चालल्यावर समोर अमुक मूर्ती दिसेल.. तिचा अर्थ तमुक.. तिथून डावीकडे ४५ अंशात वर पाहिल्यास क्ष आणि य देवतेच्या मूर्ती छतावर दिसतील.. तिथून पूर्वेकडे शंभर पावले चालत गेल्यास हात जोडलेला यक्ष दिसेल इत्यादि अचूकतेने बसल्या जागेवरून सांगू शकतो.

या मनुष्यसोबत प्रत्यक्ष वेरुळ लेणी पाहण्याचा योग कधी नशिबात आहे कोण जाणे.

स्वलिखित's picture

3 Mar 2019 - 10:43 pm | स्वलिखित

मिपा कट्टे फक्त खादाडखाऊ साठीच होतात
ज्ञानार्जनासाठी फारच कमी होतात असा अनुभव

विजुभाऊ's picture

4 Mar 2019 - 11:42 am | विजुभाऊ

चला गवि.
काढा एखादा शनिवार रैवार. जाऊन येवूयात
प्रचेतस च्या सोबत ब्याटम्यान हा देखील चांगला अभ्यासक आहे.

मागणी तसो पुरवठो - मच्छिन्द्र कांबळी.
तुमचा हवा असलेला विषय सांगा, लेख येतोच पाहा.

चित्रगुप्त's picture

4 Mar 2019 - 1:11 pm | चित्रगुप्त

सुंदर लेख.
@कंजूसः "इथे टाकून चित्र डागता येते." चित्र 'डागणे' (तोफ डागण्यासारखे) हा शब्दप्रयोग प्रचंड आवडला.

साहाव्या गुंफेत दगडात कोरलेली सरस्वतीची मूर्ती आहे. तशीच काहीशी मूर्ती जैन लेण्यांमध्ये देखील दिसते. त्याचबरोबर अजूनही काही देवींच्या मूर्ती आहेत सहाव्या गुंफेत. कदाचित त्या मूर्ती नद्यांच्या असाव्यात.

सहाव्या क्रमांकाच्या लेणीत वज्रयान पंथीयांच्या मूर्ती आहेत. तारा- अवलोकितेश्वराची शक्ती, महामायुरी (हिच्यासोबत मोर आणि पुस्तक दिसते) -आपल्याकडच्या सरस्वतीसारखीच ही बौद्ध देवता.

अकरावे लेणे दोन मजली असून या लेण्यांमध्ये अनेक हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. गणपती, महिषासुर मर्दिनी, यक्ष या मूर्ती सहज ओळखता येतात.

ह्या मूर्ती नंतरच्या काळात (बौद्ध धर्माचा र्हास झाल्यानंतर) कोरल्या गेल्या आहेत.

दोन स्त्रिया एकक पुरुष आणि 4 मुले असे 'कुटुंब' देखील मला दिसले

ते म्हणजे अवलोकितेश्वर पद्मपाणी , तारा, भ्रुकूटी आणि त्यांची मुलं.

इथे शिव एका असुराला मारत आहे आणि पार्वती हास्य मुद्रेने बाजूला उभी आहे अशी शिल्पाकृती दिसते.

ती अंधकासुरवधमूर्ती

ज्योति अळवणी's picture

6 Mar 2019 - 5:06 pm | ज्योति अळवणी

माहिती बद्दल धन्यवाद

असंका's picture

9 Mar 2019 - 7:08 pm | असंका

चांगलं लिहिलंयत..
धन्यवाद!

रच्याकने, शिर्षक वाचून वाटलेलं की औरंगाबाद लेण्यांबद्दल असेल....