रसमलाई

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
3 Nov 2008 - 1:05 pm


साहित्य-
१० ते १२ तयार रसगुल्ले, १लिटर जास्त फॅट असलेले दूध.(जर्मनीत कोन्डेन्स्ड मिल्श म्हणून ४%, ७.५% व १०% फॅट असलेले दूध मिळते त्यातील ७.५% वाले दूध मी घेते.),साखर १/२ ते ३/४ वाटी, बदाम पिस्ते काप, वेलचीपूड.
कृती-
दूध साधारण पाउण लिटर होईल असे आटवावे. कोन्डेन्स्ड मिल्श घेतले असेल तर साय जमू लागली की ती लगेच मोडावी व गॅस बंद करावा. त्यात साखर घालून ढवळावे. बदाम पिस्ते काप,वेलचीपूड घालावी व ढवळावे.गार होऊ द्यावे. रसगुल्ले पाकातून काढून घ्यावेत हाताने किंचित दाबून पाक काढावा आणि दूधात घालावेत.थंडगार करून खावेत.
(ह्यातल्या उरलेल्या पाकात नंतर गुलाबजाम करता येतात हा सुगरणीचा सल्ला, :))

रसगुल्ले घरीही करता येतात(रेसिपी देईन हवी असल्यास) पण एकटे राहणार्‍यांसाठी ,वेळ वाचवण्यासाठी आणि नवस्वयंपाक्यांसाठी तयार रसगुल्ले बाजारातून आणणे हा सोपा पर्याय आहे.
भारतात तर प्रश्नच नाही पण भारताबाहेरही इंडियन शॉपमध्ये टिन्ड रसगुल्ले मिळतात तेव्हा रसमलाई करणं एकदम सोपे आहे, :)

प्रतिक्रिया

ललिता's picture

3 Nov 2008 - 1:52 pm | ललिता

मी हल्दीरामचे रसगुल्ल्याचे टीन वापरते. जरा वेगळ्या रीतीने रसमलाई बनवते. तुझी रेसिपीपण छान आहे, करून पाहीन.

रसगुल्ले पाकातून हाताने दाबून कोरडे करून घ्यावे.
कंडेंसड मिल्श घेत नाही पण साधे ५% वाले दूघ घेते.
एका टीनला १ लिटर दूघ अर्धा लिटर होईपर्यंत आटवायचे. आच प्रखर असली पाहिजे... नाहीतर दूध आटल्यावर पांढरे रहात नाही, कॅरॅमल रंग येतो. ढवळत रहावं लागतं पण १५ मिनिटांत दूध आटतं.
गरम दुधात अंदाजाने साखर घालून रसगुल्ले घालून भांडं १५ मिनिटे झाकून ठेवावं, रसगुल्ले दुधात मुरतात. गार झाल्यावर गुलाब इसेंस घालून वर पिस्त्याचे काप घालून रेफ्रिजरेटरमध्ये थंड करून सर्व करावे. (मी वेलची पूड घालत नाही, हवी असल्यास घालावी)

दूध आटवल्याने लच्छे तयार होतात, एकदम भारतातील ब्रिजवासीकडील रसमलाई बनते. :)

(मला नोकरीमुळे रसगुल्ले बनवायला वेळ नाही मिळत म्हणून हा शॉर्टकट वापरते)

प्राजु's picture

3 Nov 2008 - 11:50 pm | प्राजु

व्वा!
स्वातीताई,
तुला माहिती आहे का? स्वाद ची रसमलाई नावाने टिन मध्ये चपटे केलेले रस्गुल्ले मिळतात. एक टिन कायम घरी ठेवते मी.
दूध आटवून मसाला दूध करते आणि त्यात त्या रस्गुल्ल्याच्या इडल्या (रसमलाई च्या आकाराचे रसगुल्ले) सोडते. ए१ रमलाई तयार.

ललिता ताई,
आच प्रखर असली पाहिजे... नाहीतर दूध आटल्यावर पांढरे रहात नाही, कॅरॅमल रंग येतो. ढवळत रहावं लागतं पण १५ मिनिटांत दूध आटतं.
ही टीप मस्त. लक्षात ठेववी लागेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

5 Nov 2008 - 1:54 pm | स्वाती दिनेश

मायक्रोवेव मध्ये पण दूध चांगले आटते आणि रंग बदलत नाही. दर २ मिनिटांनी बाहेर काढून ढवळायचे, परत आत ठेवायचे असे ७/८ मिनिटात दूध आटते.
अग, रसगुल्ले हाताने किंचित दाबून पाक काढावा हे लिहायला विसरले होते.:)
रोझ इसेन्स पण मस्त वाटत असेल.
स्वाती

लिखाळ's picture

3 Nov 2008 - 5:29 pm | लिखाळ

लगेच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद !
आता लवकरच करुन पाहु ! :)

रसगुल्ल्याची कृती सुद्धा एकदा दे. घरी जमतात का ते पाहु.
--लिखाळ.

शितल's picture

3 Nov 2008 - 6:53 pm | शितल

स्वाती ताई, आणि ललिता दोघीनी ही सुदंर पाककृती दिल्या आहेत. :)
स्वाती ताई रसगुल्याची ही पाककृती दे लवकर.
:)

शाल्मली's picture

3 Nov 2008 - 7:15 pm | शाल्मली

पाकृ. सोपी आणि छान आहे.
नक्की करून बघू..
फोटो पण मस्त आलाय. :)

--शाल्मली.

रेवती's picture

3 Nov 2008 - 10:07 pm | रेवती

अगदी! दिवाळी झाल्यावरही दिवाळी असल्यासारखे वाटते आहे.
मीही अशीच रसमलई करते. वेळ वाचतो ही एक गोष्टं आणि
बंगाली मैत्रीणीकडे जे ए १ पदार्थ चाखलेत त्यानंतर आपण काही असे करू शकणार नाही म्हणून पळ काढलाय मी बंगाली पदार्थांच्या प्रांतातून.
दुसरोंके साथ बातां : स्वातीताईनं जरा दमानं घ्यावं असं वाटतयं ना मंडळी? अजून रव्याच्या वड्या, केक, सामोसे करून बघायचेत. (ह. घेणे)

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 10:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई, रसमलई आणि अंगूर रबडी हे माझे एकदम आवडते गोडाचे प्रकार. आता तोंडाला पाणी सुटतंय गं ... उद्याच्या उद्या तुझ्याकडे येता आलं असतं तर बरं! (माझी स्वयंपाकाची आवड किती हे तुला आतापर्यंत कळलंच असेल) ;-)

यशोधरा's picture

3 Nov 2008 - 11:34 pm | यशोधरा

किती गं छळशील स्वातीताई!!:)

मदनबाण's picture

25 Apr 2009 - 11:29 am | मदनबाण

च्यामारी हे कसं बघायचं राहिल माझं ???
व्वा...मस्तच...आत्ता लगेच हातात तो वाडगा उचलुन पटकन खाउन टाकावी असे वाटत आहे. :)

(खादाड)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.