मुंबईचे धडे - ३

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
3 Jan 2019 - 7:52 am

मी ठाण्याला राहत होते. माझी आत्या पार्ल्याला राहायची. तिच्याकडे तिची जाऊ दीर एकत्र राहायचे.त्यामुळे आत्याची दोन शिवाय जावेची दोन अशी ४ साधारण माझ्याच वयाची मुलं तिच्याकडे होती. त्यात माझा कोकणातला चुलत भाऊ नोकरीसाठी तिच्याकडे येऊन राहिलेला. त्यामुळे तिकडे मजा यायची. वेळ मजेत जायचा. म्ह्णून मला तिकडे राहायला जायला खूप आवडायचं. पण लोकलने फक्त विद्याविहारला जायची सवय होती. दुसरीकडे कधी गेले नव्हते. अशीच एकदा शनिवार रविवार क्लासला सुट्टी मिळाली म्हणून आत्याकडे जायची जाम इच्छा झाली. पण जाणार कसं? आत्याला फोन केला कि यायचंय पण कशी येऊ? तिने सोप्पा उपाय सांगितला. विद्याविहारला ये, तिथून ३२२ पकड कि डायरेक्ट पार्ले. पार्ले टिळकच्या स्टॉपला उतर कि झालं. मनात म्हटलं अरे वा एव्हढ सोप्पं आहे. चला तर मग.

काकांची परवानगी घेऊन बाहेर पडले. नेहमीप्रमाणे विद्याविहारला पोहोचले आणि ब्रिज चढल्यावर ईस्टला जायचं कि वेस्टला तेच माहित नव्हतं. बरं ते स्टेशन म्हणजे फार काही वर्दळीचं स्टेशन नाही. विचारायला पण ब्रिज वर फार कोणी नाही. आम्ही क्लास साठी ईस्टला जात असू. तिकडे मला ३२२ कधी दिसली नाही. म्हणून मग वेस्टला जिना उतरून बाहेर आले. आणि बाहेर पडल्या पडल्याचं बस स्टॉप दिसला. पण तिथे २- ३ स्टॉप होते. यातल्या कुठल्या स्टॉपला ३२२ येईल हे कळत नव्हते. तिथेच एक बेस्टचे कर्मचारी होते. जरा घाबरतच त्यांना विचारलं. आता हळू हळू हिंदीत बोलायची सवय झाल्याने डायरेक्ट हिंदीतच विचारलं,"३२२ नंबर कि बस किधरआती है?" माझं अडखळत हिंदी ऐकून त्या काकांना काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी स्पष्ट मराठीत कुठे जायचंय म्हणून विचारलं. मराठी ऐकून जरा बरं वाटलं. मी पार्ल्याला जायचंय म्हणून सांगितलं. मग एका खांबाकडे बोट दाखवून म्हणजे इथेच येईल गाडी. मी तिथे जाऊन पोचले नि बस आलीच. फारशी गर्दी नसल्याने आरामात खिडकीतली जागा मिळाली. मग ती बस छान पैकी कलिना, सांताक्रूज, एअरपोर्ट असं सगळं फिरवून पार्ल्यात शिरली. मी कंडक्टरला स्टॉप आला कि सांगायला सांगितलं होत. त्याने ओरडून पार्ले टिळक म्हणून सांगितल्यावर मी उतरले. आता पुढे काय? मी उतरले तो हनुमान रोड होता आणि आते महंत रोडला राहायची. मग चुलत भावाला फोन केला कि जेणेकरून तो मला न्यायला येईल. पण फोन बहिणीने उचललंन. मी म्हटलं मला माहित नाही कस यायच ते? ती म्हणाली कोणीही आणायला येणार नाही. मी सांगते ते लक्षात ठेव किंवा कुणालाही विचार. बस ज्या बाजूला गेली त्या दिशेला सरळ चालत ये नि लगेच उजवीकडे वळ. गल्ली संपली कि परत उजवीकडे वळ. म्हणजे पत्ता सापडेल. त्यातून विसरलीस तर कुणालाही विचार महंत रोडला कसं जायचं कोणीही सांगेल. मी घाबरतच निघाले सांगितलेले तशी तशी वळले. दुसऱ्यांदा उजवीकडे वळले चार पावलं चालले पण काही समजेना. शेजारून जाणाऱ्या बाईला विचारलं. तिने गुजराती साडी नेसली होती म्हणून हिंदीत विचारलं तर तिने चक्क मराठीत उत्तर दिलं. मी बघतच राहिले. मी समोरच उभी होते आत्याच्या घराच्या. आणि बाल्कनी मध्ये उभं राहून बहीण भाऊ हसत होते माझ्याकडे बघून. घरी पोचल्यावर बहिणीने बजावून सांगितलं कि नाही कळलं तर विचारायचं. नाही माहित एखादी गोष्ट तर नाही माहित. विचारायला घाबरायचं कशाला ? नंतर नंतर मात्र मी या प्रवासाला सरावले नि बिनधास्त एकटी येऊ जाऊ लागले.

हा प्रवास एकदा अंगवळणी पडल्यावर त्यातली मजा गेली नि आता लोकलन पार्ल्याला यायचं ठरवलं. मुख्य मुद्दा होता दादर स्टेशनवर ब्रिज क्रॉस करायचा. माझा चुलत भाऊ पहिल्यांदा माझ्याबरोबर आला. सेंट्रल वरून वेस्टर्नला कसे जायचं, किती नंबरचा प्लॅटफॉर्म कसा कळणार नि वेस्टर्नचे इंडिकेटर कसे वाचायचे त्याने दाखवलन. त्यावेळी सोप्पं वाटलं. बऱ्यापैकी लोकलची सवयसुद्धा झाली होती त्यामुळे सहज जमेल असं वाटलं मला. त्यावेळी त्याने पार्ल्याहून दादरपर्यंत येऊन ठाणे लोकलमध्ये बसवून दिलन. पुढच्या वेळी माझी मी एकटी गेले. दादरला उतरल्यावर ब्रिज वर गेले नि गर्दी बघून गोंधळले. पण या वेळी घाबरायला मात्र झालं नाही. एका फार घाईत नसलेल्या बाईला विचारलं वेस्टर्न साईडला कुठे जायचं? तिने एकदम टोकापर्यंत जाऊन मग शेवटी दिसणाऱ्या प्लँटफॉर्मला उतरायला सांगितलं. मी त्याप्रमाणे गेले नि एक नंबर प्लॅटफॉर्मला पोहोचले. समोरच बोरिवली लोकल होती. पण भावाने सांगितले होते कि शक्यतो अंधेरी लोकल पकडायची म्हणजे गर्दी कमी असते. त्यानुसार त्या गर्दीने भरलेल्या बोरिवली गाडीला जाऊ दिली. पाठोपाठ अंधेरी लोकल आलीच. या ट्रेनमध्ये आरामात बसायला जागा मिळाली. सांताक्रूझ स्टेशन नंतर पार्ला येत हे घोकून ठेवलं होत. सांताक्रूझ गेल्यावर दरवाज्यात येऊन उभी राहिले. परत शेजारच्या बाईला प्लॅटफॉर्म कुठल्या बाजूला येणार विचारून तयारीत राहिले. उतरल्यावर ब्रिज चढून वर आले. सुदैवाने ईस्ट वेस्टचे बोर्ड लावलेले होते त्यामुळे चुकायचा फारसा प्रश्न नव्हता.
ईस्ट बाजूला खाली उतरले नि समोर बाजार बघून विंडो शॉपिंगचा ओह आवरेना. एका पेक्षा एक छान छान साड्यांची नि ड्रेस ची दुकान बघून भटकत राहिले नि रस्ता विसरले. परत एकदा दादाला फोन केला. त्याने दोन तीन वळणं घ्यायला सांगितली. त्याप्रमाणे वळल्यावर बरोबर महंत रोडला लागले. नेहमीच्या खुणा दिसल्यावर खूप बरं वाटलं. असच दोन तीन वेळा झाल्यावर मात्र नंतर सगळे रस्ते नि गल्ल्या पाठ झाल्या.

या सगळ्या गोष्टीमुळे माझा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली . चुकलेच तर न घाबरता विचारायची सवय झाली. हळूहळू मी नि माझी मैत्रीण केतकी एक एक नवीन ठिकाण पालथे घालायला लागलो. फार रिस्क न घेता ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने परत यायचे पण नवीन ठिकाण बघायचे असे सुट्टिच्या दिवशी करायला लागलो. आणि मग त्यातली मजा जाणवायला लागली. कधीतरी आई फोनवर ओरडायची भलत साहस करू नका. पण आता मुंबईची भीती मनातून खूपच कमी झाली होती. मी मुंबईला हळूहळू सरावत होते. आणि अर्थात मुंबई आवडू लागली होती.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

3 Jan 2019 - 11:46 am | दुर्गविहारी

मस्त लिहीता आहात. मी हि ठाणे हे ठिकाण धरून अशीच मुंबई फिरलो आहे. मुंबई समजून घ्यायची असेल तर बस प्रवासाला पर्याय नाही. लोकलने आपण पटकन पोहचतो. पण बसप्रवासाने मुंबई दर्शन घडते.
बाकी सर्वांनाच एक विनंती मुंबईत बोलायला सुरवात केली कि आधी मराठीत बोला. आपणच हिंदीत सुरु करतो, सहाजिकच समोरच हिंदीत संभाषण चालु ठेवतो. मुंबईत मराठीचा आग्रह ठेवायलाच हवा. जी काही हिंदी बोलायची आहे ती उत्तर भारतात जाउन बोलु.
आणखी अनुभव वाचायला आवडतील. पु.भा.प्र.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Jan 2019 - 4:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान अनुभव. ३२२ सारखीच ३३९. जुहु ते पंप हाउस जायची. ३२२/३३९/२/ ह्या पार्ल्यतुन जाणार्य जुन्या बसेस. त्यातली २ मर्यदित ही रमेश प्रभूंच्या खास प्रयत्नांनी चालु झालेली बस-१९८७च्या सुमारास.
लिहित रहा.

गामा पैलवान's picture

3 Jan 2019 - 7:19 pm | गामा पैलवान

अहो माई,

ती ३९ नंबरची बस होती ना पारल्यातनं जाणारी? सीप्झ ते मेहता मार्ग? खूप फिरून जायची. पण पारले ते सीप्झ बरीच सोयीस्कर पडायची.

३८४ घाटकोपर ते पारले होती/आहे ना?

आ.न.,
-गा.पै.

आलमगिर's picture

6 Jan 2019 - 11:53 am | आलमगिर

३४८ बंद झाली

आलमगिर's picture

6 Jan 2019 - 11:54 am | आलमगिर

३८४ बंद झाली आहे

कंजूस's picture

3 Jan 2019 - 5:43 pm | कंजूस

फार छान!!
मी पुण्यातल्या नातेवाइकांकडे / कुणाच्या लग्नालाही बसने जातो तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. शिवाय निघताना ते कुठे आहे स्टॅाप तो बघायला येतात तेव्हा स्टेशनला जाणारी बस समोरच येते तेव्हा दुसरा धक्का बसतो.
मुंबईत तर go4mumbai dot com या वेबसाइट ने आणि प्रत्येक स्टॅापवर बेस्टने स्टॅापचे नाव लिहिल्याने काम फारच सोपे केले आहे. पुण्याची एक अशीच चांगली साइट होती ती आता सापडत नाहीये. पीएमटीपीसी बसच्या कंडक्टरांचा फारच चांगला अनुभव येत आहे. कधीकधी बसमधूनच " तुमचा स्टाप पुढे आहे पण आता इथे सिग्नलला उतरून असे समोर गेलात तर सापडेल" असाही सल्ला मिळतो.

सुबोध खरे's picture

3 Jan 2019 - 7:27 pm | सुबोध खरे

कंजूस साहेब
मूळ प्रश्न काय आहे कि लोकांना वेळ नाही (असे त्यांचेच म्हणणे असते).
पाच मिनिटे थांबले तर बस येते पण ती पाच मिनिटे थांबण्याची लोकांची तयारी नाही. भले घरी जाऊन त्यांना व्हाटस अँपच पाहायचे असते. तरी आता डेटा स्वस्त झाल्यामुळे बस स्टॉप वर बसूनही हेच करता येते. पण एकंदर पैशाची किंमत कमी झाल्याने ओला उबरने जाणे (अगदी गेला बाजार रिक्षाने) हे तरुणवर्गाला कूल वाटू लागले आहे. आणि ऍब्स रिक्षा अपला मध्ये सुद्धा मोबाईलच पाहत राहिल्यामुळे आजूबाजूला काय आहे कोणते रस्ते आहेत हि माहिती मिळताच नाही.

आनन्दा's picture

4 Jan 2019 - 2:40 pm | आनन्दा

ही म्हणायला ठीक आहे.. मी पुण्यात सिंहगडरोड ला राहतो. मधल्या काळात विमाननगरला ऑफिस होते तेव्हा बस ने जायचा प्रयत्न करत होतो. पण बसेस चे टायमिंग, कनेक्टव्हिटी आणि वक्तशीरपणा यांचा हिशोब मांडल्यावर संध्याकाळी घरीयायय्ला २-२ तास लागायला लागले, ते पण उभ्याने.
एक दिवस तर ३ तास गेले, त्या दिवशी पी एम ती चा नाद सोडला.
बाइकने ४५ मिनिटे लागतात, अगदी आरामात गेले तरी.

आता बोला.

बस रिक्षा टॅक्सी मध्ये सुद्धा मोबाईलच पाहत राहिल्यामुळे

लेखिकेची मुंबईत नवीन असताना जी परिस्थिती झाली ती आमचीही दुसऱ्या शहरांत/ गावात पर्यटनात होतेच.
लेखमाला आवडली.

लई भारी's picture

4 Jan 2019 - 9:36 am | लई भारी

आपले अनुभव आवडले.
पाहुण्यांच्याकडे येण्याच्या निमित्ताने मुंबईला कधीमधी येणं व्हायच.
मी ६-७ वर्षाचा असताना माझ्या मावशीने बहुधा अंधेरीहून सायनला (दुसऱ्या मावशीकडे) जाण्यासाठी बस मध्ये बसवलं होत. आई-वडील, लहान बहीण आणि मी.
तिकडे मावशी येणार होती की जवळ घर होत त्यामुळे ती चिंता नव्हती.
स्टॉप येण्याच्या आधी कंडक्टर ने सांगितल्यामुळे सगळेजण उठून उभे राहिलो. पुढे दारापर्यंत लोक होतेच. नेमकी बस स्टॉप च्या आधी सिग्नल ला थांबली आणि पुढचे सगळे लोक नेहमीचे असल्यामुळे आणि कदाचित त्यांना सोयीचं असेल म्हणून सिग्नललाच उतरले. मी शूरवीरासारखा एकटाच पुढे होतो आणि आई-वडील मागे. आता मला सगळं कळतंय म्हणून मी पण बहुधा त्या लोकांसोबत उतरलो आणि आई-वडील उतरायच्या आत सिग्नल सुटल्यामुळे बस पुढे निघून गेली.
मला कळेना काय झालं आणि तिकडे आईवडील प्रचंड घाबरले. नीट आठवत नाही पण बहुधा मी एका ट्रॅफिक पोलिसाजवळ थांबलो होतो आणि रस्त्याच्या पलीकडे मला आई-वडील शोधताना दिसले. मग त्या काकांनी मला नेऊन सोडलं. माझे आईवडील अक्षरशः त्यांच्या पाया पडले!

नंतर कॉलेज ला गेल्यानंतर वर्षातून एखादी फेरी व्हायची आणि पाहुणे असे विखुरलेले असल्यामुळे मामाने एकदा नीट लोकल विषयी माहिती सांगितली आणि त्या नंतर हळू हळू एकटा बिनधास्त फिरू लागलो. पण 'प्लॅटफॉर्म कुठल्या बाजूला येणार' आणि 'दादरला उतरायचं आहे का' हे मात्र विचारतोच :)
बाकी सगळीकडे शक्यतो चांगले अनुभव आलेत, कोणी चुकीची माहिती दिली असं शक्यतो नाही झालं.

परवाच्या भेटीत मुलींना हौस म्हणून लोकल मध्ये बसलो. अंधेरी हुन चर्चगेट फास्ट घेतली. दादर च्या अलीकडे एका मुलीने गोंधळ सुरु केला कि 'झुक झुक गाडी नको' आणि खूप रडायला लागली. आम्हाला वाटलं नेहमीसारखं काहीतरी दुसरं हवं असेल म्हणून थोडे प्रयत्न केले लक्ष वळवण्याचे पण पहिल्यांदा एवढा त्रास दिला आणि करून घेतला. काहीच कळेना आणि ती काहीच ऐकेना. ते बघून दुसरी पण रडायला लागली. अक्खा डबा बघत होता आणि काही मदत करू शकेल का बघत होता(खिडकी ची जागा देणे, पाणी देणे इ.)
मग शेवटी मुंबई सेंट्रल ला उतरलो, आणि प्लॅटफॉर्म वर जाताच पुढच्या क्षणाला एकदम शांत आणि पॉपकॉर्न मागून खाल्ला दोघीनी!
आम्ही 'पोट दुखतंय का' म्हटल्यावर हो म्हणाली म्हणून आम्ही अशी समजूत करून घेतली की तिला 'motion sickness' सारखं काहीतरी झालं असेल. तसा डबा रिकामा होता त्यामुळे घुसमट वगैरे वाटत नाही. पण अगदी डेंजर अनुभव होता.

जितक्या वेळा मुंबईला गेलो असेल त्या प्रत्येक वेळी मला परदेशी गेल्याची अनुभूति होते .
पुण्यात लोकल नसल्या मुळे मुंबईतील लोकल पकड़ने खतरनाक वाटले .

प्रसाद_१९८२'s picture

5 Jan 2019 - 5:09 pm | प्रसाद_१९८२

पुण्यात लोकल नसल्या मुळे मुंबईतील लोकल पकड़ने खतरनाक वाटले .
--
लोणावळा-पुणे दरम्यान ज्या EMU धावतात त्यांना लोकलच म्हणतात बहुतेक पुण्यात.
फक्त मुंबई एवढी गर्दी तिथे असते की नाही ते माहित नाही.