फोटोग्राफीतले तीन काळ

फुटूवाला's picture
फुटूवाला in जनातलं, मनातलं
27 Dec 2018 - 3:37 pm

२००० साला आधी फोटोग्राफरची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यानंतर २०१२ पर्यंतची वेगळी आणि आता तर खूपच वेगळी. येत्या काही वर्षात काय होणारय देव जाणे.

मी फोटोग्राफीला सुरवात केली नव्हती तेव्हा म्हणजे २००० पुर्वी फोटोग्राफरला लग्न लागायच्या वेळी बोलवायला/घ्यायला यायचे म्हणे. आणि लग्न झाल्यावर सोडायलाही.

नंतर आले डिजीटल कॅमेरे. रोल संपणार नाही आणि फोटो लगेच दिसणार. म्हणून फोटोग्राफर लोक कितीही फोटो काढायचे आणि चांगले ठेऊन बाकीचे उडवायचे. त्यांच्या याच वृत्तीचा गैरफायदा ग्राहकवर्गाने घेतला. तो असा, सकाळीच मांडवपुजेपासून बिदाई, गृहप्रेवेशापर्यंत फोटोग्राफर लग्नघराच्या दावणीचा बैलच झाला. काढायला हजार फोटो काढायचा अन निवडले जायचे शेदोनशे.

तेव्हा मी नव्यानेच व्यवसायात उतरलेलो. जोडप्यांचे फोटो घेण्यासाठी खूपच आग्रही असायचो. पण वडीलधारे मंडळी लग्न लागण्याआधी उपाशी, ताटकळलेल्या वऱ्हाडाची काळजी करुन आम्हाला म्हणायचे फुटूवाले तुम्ही फोटो नंतर काढा आधी नवरदेवाला मांडवात आणा. लग्न लागल्यानंतर विधी आटोपून वऱ्हाडाला परत पाठवायची गरबड. अशा परिस्थितीही समाधानकारक फोटो मिळत असल्याने व्यवसाय आवडायला लागला. तेव्हा लोकं लग्नानिमीत्ताने एकत्र आले की एकमेकांचे सुख-दुख: सांगायचे, ऐकायचे. एकूणच कार्यक्रमाचा आनंद लुटायचे.

२०१२ नंतर आले स्मार्टफोन. सगळी रुपरेषाच बदलून गेली तेव्हापासून. आम्ही कष्टाने काढलेले फोटो व्हाट्सॲपवर मागवायला लागले. त्याहून प्रिंट करतील अन उर्वरीत रक्कम देण्यासाठी आणि अल्बम घेण्यासाठी परत येईल का नाही भितीपोटी आम्ही मग वाटरमार्कचा पर्याय काढला. तोंडावर भलं मोठ नाव टाकून व्हाट्सॲप करायला लागलो. तरीही बरेच जणांच मन भरत असल्याने प्रिंटींगचे प्रमाण कमी झाले काही प्रमाणात.

एवढ्यावर थांबले नाहीत हे स्मार्टफोन. नंतर फोटोग्राफरच्या पुढे उभे राहू लागले अन फोटो काढायला सुरुवात केली यांनी. आयुष्यभर जपून ठेवता येईल असे अनमोल क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद करायच्या विचारात मरमर करत असतो तोच मध्येच एखादा स्मार्टफोन घेऊन येतो अन त्या क्षणाची वाट लावतो. असा राग येतो त्यावेळी की सांगूच शकत नाही. पण करणार काय? सुटाबुटातल्या माणसाला माझ्यासारख्या कमी शिकलेल्याने अक्कल शिकवणे योग्य वाटत नाही.
बरं हे झालं आमचं नुकसान. आता दुष्परिणाम ही पाहा. लग्नात वरमाला घालण्याच्यावेळी नवरानवरीला उचलायची पद्धत काही टुकारांनी चालू केली. ते आमच्या सांगण्यावरुन थांबत नसल्याने आम्ही सांगणेही टाळतो. पण ते उचलताना काही अपघात घडला तर? आम्ही जिम्मेदार असल्याने ती क्लिप उडवणार हे नक्की. पण या स्मार्टफोनवाल्यांनी पसरवली तर किती नाचक्की.
एकदा तर अक्षरश: एका स्मार्टफोनवाल्याच्या छाताडात बुक्का दिला होता मी. घडलं असे की नवरीला हळदीची आंघोळ घालताना व्हिडीओ शुटींग करायला बोलवले. मी शुटींग करताना लक्षात आलं की माझ्या बाजूला कोणीतरी मोबाईलमधेये शुटींग करतोय. काहीच विचार ना करता जोराचा धक्का दिला. त्यांना हुकच भरली. ते आला मला भांडायला. मी त्यांना समजवलं की “ अहो काका, आंघोळ घालतायत नवरीला. चुकून पदर सरकला तर ती क्लिप कशाला पाहिजे मोबाईलमध्ये? तुम्ही काका आहेत हे मला आत्ता कळतय. पण कोणी टुकाराच्या मोबाईल मध्ये अशी क्लिप गेली तर परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केलात का?”
का लोकं विचार करत नसतील या परिणामाचा?
अलीकडच्या दोन तीन वर्षात तर हे स्मार्टफोन भलतेच बावचळलेत. काळानुरूप आमच्या व्यवसायातही बदल झालेत खूप सारे. आता एका लग्नात पाच सहा जणांची टोळी असते. कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण एका मोठया एलएडी वाॅलवर दाखवायला सुरुवात झाली. मंडपाच्या/लाॅंस च्या प्रवेशद्वारापासून जेव्हा नवरा-नवरीचा प्रवेश होतो. तो प्रत्येकजण विशेष अन वेगळ्या देखाव्यासह करतो. काही जण बुलेट गाडी वापरतात त्यासाठी तर काही जण शोले मधली स्कूटर. ट्राॅली, जहाज, डोली अशा एकाहून चढ एक आकर्षक वाहनांतून प्रेवश करतात. पण हे पाहणारे लोक त्यांचे फोटो काढण्यात व्यस्त असतात. ते काढले तर काढले पण आमच्या कॅमेऱ्याच्या समोर आल्याने प्रक्षेपणात या स्मार्टफोन वाल्यांचा पिछवाडाच येतो.

काही दिवसांपुर्वी एका पंचतारांकीत हाॅटेल मधल्या लग्नात तर लैच भयानक अनुभव आले. दहा गुरुजींची फोज होती मंत्रोच्चारासाठी. मग आम्ही थांबा ना म्हणता जे जसं चाललय तसच कॅमेऱ्यात कैद करत होतो. नाहीतर ईतर वेळी इकडे बघा म्हणायची सवय असते आम्हाला. यावेळी ते आम्ही म्हटलं नाही. स्मार्टफोनवाला बोलला थांबा गुरुजी फोटो काढूद्या.(गुरुजी आणि आम्ही कपाळावर हात मारला)

समुह फोटो काढतानाही तेच करतात. मागे पाच पन्नास जण शुभेच्छा देण्यासाठी ताटकळत थांबलेले असुनही आम्ही फोटो काढला की सेल्फी घ्यायचा असतो स्मार्टफोनवाल्यांना. बरं एक जण सेल्फी घेऊन प्रकरण थांबत नाही. दुसरा म्हणतो माझ्याकडे ड्युअल कॅम आहे. मी काढतो थांबा.

कोणी तरी आशिर्वाद देत असते माईकवरुन पण ते ना ऐकता सगळे लोकं व्हाट्सॲप स्टेटस टाकण्यात व्यस्त असतात. कहर तर तेव्हा जेव्हा स्टार्टर मध्ये आलेला पनीरचा तुकडा दंतकाडीच्या सहाय्याने तोंडाजवळ धरतात अन वाकडे तिकडे तोंड करुन सेल्फी घेतात. लगेच स्टेटस “ Enjoying starter in taj hotel @wedding”!!
मला तर जाम हसायला येतं अशा लोकांच. कधी थांबतील की नाही? अजून पूढच्या काळात काय काय करतील?
देव जाणे!!

छायाचित्रण

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

27 Dec 2018 - 3:47 pm | उपयोजक

झकास जमलंय! लिहित रहा!! पुलेशु

स्टार्टर मध्ये आलेला पनीरचा तुकडा दंतकाडीच्या सहाय्याने तोंडाजवळ धरतात अन वाकडे तिकडे तोंड करुन सेल्फी घेतात. लगेच स्टेटस “ Enjoying starter in taj hotel @wedding”!!

=)))

दुर्गविहारी's picture

27 Dec 2018 - 5:01 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलयं. आणखी अनुभव येउ देत.:-)

मुक्त विहारि's picture

27 Dec 2018 - 5:09 pm | मुक्त विहारि

एकदम जबरदस्त...

फुटूवाला's picture

27 Dec 2018 - 5:21 pm | फुटूवाला

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार..

प्रसाद_१९८२'s picture

27 Dec 2018 - 5:32 pm | प्रसाद_१९८२

लेख खूप आवडला. लिहित राहा असे अनुभव.
--
अहो काका, आंघोळ घालतायत नवरीला. चुकून पदर सरकला तर ती क्लिप कशाला पाहिजे मोबाईलमध्ये? तुम्ही काका आहेत हे मला आत्ता कळतय. पण कोणी टुकाराच्या मोबाईल मध्ये अशी क्लिप गेली तर परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केलात का?”
--
यावर काय उत्तर दिले त्या काकांनी ?

फुटूवाला's picture

27 Dec 2018 - 5:55 pm | फुटूवाला

मी एकदम बरोबर आणि स्पष्ट शब्दांत फटकारलेलं त्यांनी मान्य केलं होत. त्यांनी मान हलवत “हॅ दुसरं कोण कशाला करेल, मीही सहज आत्ताच करत होतो”
मी - “तुम्हाला मी काय म्हणतोय ते कळलं असेलच, या आता बाजूला आम्हाला अडचण नका करु”

लग्नात असे बरेच विधीसंस्कार असतात जेथे असे अपघात होऊ शकतात.

Nitin Palkar's picture

27 Dec 2018 - 6:33 pm | Nitin Palkar

मस्त लिहिलंय. पुलेशु.

श्रीरंग_जोशी's picture

27 Dec 2018 - 7:48 pm | श्रीरंग_जोशी

लेखनशैली आवडली. व्यावसायिक इव्हेंट फोटोग्राफीमधल्या घडामोडी व बदलते कल खुमासदार शैलीत वर्णिले आहेत.

आजकाल सेल्फी अन व्हॉट्सअ‍ॅपचे अतिरेकी वेड काळजी वाटायला लावणारे आहे.

भविष्यात निमंत्रण पत्रिकांमध्ये तळटीप यावी की, 'सोहळ्याचे क्षण कॅमेर्‍याद्वारे टिपायला व्यावसायिक छायाचित्रकार असणार आहेत त्यामुळे कृपया फोटोज, सेल्फिज काढण्याची तसदी घेऊ नये.'

या क्षेत्रातले तुमचे इतर अनुभव वाचायला आवडतील.

विडिओ शुटिंग फार रटाळ असतय. बराचा वेळ धगधगत्या अथवा धुर येणाऱ्या आगीपुढे जोडपे बसलेले दाखवतात. पाहुण्यातल्या गमतीदार चेहऱ्यावर कॅम्रा रोखला तर पैसे मिळणार नाही म्हणून होम होम होम॥
नंतर मिक्सिंगच्या नावाखाली कोणतेतरी टाकलेले संगीत काढताही येत नाही.
नातेवाइकांतल्याच कुणाला मोबाइलने फोटो विडिओ काढायला सांगणे उत्तम. किंवा सेल्फी.
मोबाइल आले हे उत्तम.
शंभरेक लोक उभे करून मोबाइलने तीन फोटो काढून जोडल्यास उत्तम.

फुटूवाला's picture

28 Dec 2018 - 1:58 am | फुटूवाला

=)))

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2018 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

खुसखुशीत लेख !

योगी९००'s picture

27 Dec 2018 - 11:32 pm | योगी९००

फोटोग्राफरचे कसे विचार असतात ते आत्ता कळतंय...अजून किस्से येऊ द्यात.

लेख आवडला.

वरुण मोहिते's picture

28 Dec 2018 - 12:05 am | वरुण मोहिते

अजून अनुभव येऊ दे.

माझ्या भावाच्या लग्नात त्याचा एक मित्र नवरीच्या अतिशय सुंदर मावसबहिणीचे फोटो काढत होता. क्लोज अप काढता येतील इतका जवळ होता. मी मात्र माझ्या चुलत भावाला सांगुन त्याला थांबायला सांगितले जरी तो माझ्या भावाचा मित्र होता.

नाखु's picture

28 Dec 2018 - 12:05 pm | नाखु

हे सेल्फीवीर अनुभवतात शून्य आणि दाखवण्यासाठी जगतात ते महाशून्यच

जुइ's picture

29 Dec 2018 - 1:57 am | जुइ

आता बहुतेक नवरा नवरी स्वतःच म्हणत असतील "गुरुजी थांबा एक सेल्फी काढूद्यात" ;-) . प्रिंटेड फोटो पाहून आजही जे समाधान लाभते ते स्क्रीनवर पाहिलेल्या फोटोतून मिळत नाही. लेख आवडला.

छान लिहिलंय, और आंदो :)
ज्याच्या हाती ससा तो पारधी
या धर्तीवर
ज्याच्या हाती मोबाईल तो फोटोग्राफर
अशी सध्याची अवस्था आहे, हे मात्र खरं.

टर्मीनेटर's picture

29 Dec 2018 - 10:55 am | टर्मीनेटर

मजा आली तुमचे अनभव वाचायला.
आता प्री वेडिंग फोटोग्राफिचे प्रस्थ जोरात वाढत असल्याने पुन्हा व्यावसायिक फोटोग्राफर्सना सुगीचे दिवस आल्याचे ऐकिवात आहे.

फुटूवाला's picture

31 Dec 2018 - 1:57 am | फुटूवाला

हो!
काळानुसार अपग्रेड झालेल्यांना सुगी आहेच. फोटोग्राफी एके फोटोग्राफी करणारे मागे पडताहेत. प्रिवेडींग, पोस्टवेडींग, बेबी शाॅवर असे बरेच काही चालू झाले आहे आता. शिवाय आधीच्या सारखे एक फोटोसाठी अन एक व्हिडीओ साठी राहीलं नाही. थेट प्रक्षेपण, एक वरपित्यासोबत मागे, एक वधूपित्यासोबत, एक मंडपाच्या प्रवेशद्वारावर, स्टेजवर दोन असे पाच पेक्षा जास्त एका लग्नात व्हिडीओग्राफर असतात आता.

महासंग्राम's picture

1 Jan 2019 - 4:06 pm | महासंग्राम

त्यातहि आता एकसुरीपणा यायला लागला आहे. गोष्ट कॅमेरे स्वस्त झाल्यामुळे जो उठतो तो वेडिंग फोटोग्राफर म्हणवून घेतो.
लग्नासारख्या समारंभात जेव्हा सगळे विधी कॅप्चर करणं महत्वाचं असत तेव्हा एखादा विधी सुटला आणि नंतर क्लायंट ला कळलं कि जी काही बिनपाण्याची होते तेव्हा अश्या फोटोग्राफर ची खरी मजा असते.

फुटूवाला's picture

2 Jan 2019 - 12:12 pm | फुटूवाला

काम देणाऱ्यांचीच चूकी म्हणावी लागेल अशा वेळी.

नूतन's picture

29 Dec 2018 - 1:22 pm | नूतन

मत जुळतंय.प्रत्यक्ष आनंद घ्यायचा सोडून नंतरच्या आठवणीची जास्त काळजी.

कुमार१'s picture

29 Dec 2018 - 1:43 pm | कुमार१

आवडले !

मस्त अनुभव. असेच लिहीत राहा, वेगळ्या फील्ड मधल्या लोकांचे प्रॉब्लेम्स कधीच समजत नाहीत एरवी.

अनिंद्य's picture

31 Dec 2018 - 1:21 pm | अनिंद्य

@ फुटूवाला,

कॅमेरामागचे मनोगत धमाल आहे.

सेल्फीचे अतिरेकी वेड - पर्यटनस्थळे, एअरपोर्ट, रेस्टोरेंट्स पाठोपाठ आता तर लग्नस्थळी खास 'सेल्फीपॉईंट' दिसायला लागला आहे :-)

खटपट्या's picture

31 Dec 2018 - 5:13 pm | खटपट्या

खूपच छान धागा. आज काल लग्न फक्त फोटो काढण्यासाठी करतात असं वाटू लागलं आहे. पुर्वी भटजींना मान असायचा. आता फोटो काढण्यासाठी भटजींना विधी थांबवायला सांगतात :)
आपले आत्मुगुरुजी याबद्द्ल बरच काही सांगतील.

निशाचर's picture

1 Jan 2019 - 7:59 pm | निशाचर

मस्त लिहिलंय.
काही दिवसांपूर्वी नात्यातली नवरी 'प्रीवेडिंग केलं' सांगत होती. मला काहीही कळेना. शेवटी 'प्रीवेडिंग काय केलं' असं डायरेक्ट विचारावं लागलं ;)
पर्यटनस्थळांचा प्रीवेडिंग टेक ओवर गेल्या काही दिवसांत बघायला मिळाला. काही ठिकाणी बंदी घातली आहे ते आवडलं.