यूं ही चला चल राही….भाग - ४

Primary tabs

मालविका's picture
मालविका in भटकंती
4 Dec 2018 - 5:28 pm

14th Novermber, 2018

सकाळी ०६.०० लाच उठलो. आवरून सायकली घेऊन खाली आलो. मस्त गरम गरम चहा प्यायला. तरी निघे निघे पर्यंत ०८.०० वाजलेच. आज चिपळूण (खडपोली)गाठायचं होत. ६२ किमी अंतर मॅप दाखवत होता. काल उतरलेला रस्ता आज चढायचा होता.अगदी सुरवातीपासूनच चढाची सुरवात झाली. आज काय झालं काय माहित पण सकाळपासून दम लागत होता. प्रत्येक चढांत पाणी पिण्यासाठी थांबत होते. खरं तर ते किती बारीक सारीक चढ होते पण मी मात्र मानसिक रित्या दामले होते कदाचित त्यामुळे मागे पडत होते. श्रीनिवास पुढे जाऊन थांबत होता.आज आम्ही कालच्या पालशेत मार्गे न जाता पिंपर,जामसुत, सुरळ मार्गे जाणार होतो. इथून १० किमी अंतर कमी होतं. मार्गताम्हाने गावात हा रस्ता बाहेर पडतो.वेळणेश्वर पासून साधारण २५ किमी अंतर आहे मार्गताम्हानेला. पण चढ उतार नि बऱ्यापैकी खराब रस्ता यामुळे सायकल चालवणं जिकिरीचं वाटत होतं. त्यात हेडविंड्स त्यामुळे आणखी अडथळा येत होता. हळूहळू एक एक गाव मागे टाकत निघत होतो. श्रीनिवास चिअर अप करत होता. पण मला खूपच दमल्यासारखं वाटत होत. एका क्षणी वाटलं कि एखादी गाडी बघावी नि सायकल टाकून सरळ चिपळूण गाठावं. पण मन राजी होत नव्हतं. बघू करूया जमेल तेव्हढं म्हणत होते. तेव्हढ्यात गावातल्या गोपाळ दादांची गाडी पास झाली. श्रीनिवासने गाडीने जाण्याच्या प्रस्तावाला नकार देऊन सायकल रेटत राहिले. आणि मजल दरमजल करीत एकदाचं मार्गताम्हाने गाठलं. इथला फेमस स्नेहांकित वडापाव पार्सल घेतला आणि मग एक बरीशी पिकअप शेड बघून खायला थांबलो. जरा विश्रांती झाली. बर वाटलं.

या रस्त्याला लागल्यावर मात्र मला एकदम फ्रेश वाटलं. जरी चढ उतार असले तरी मगाचच्या रस्त्याला जी दमणूक झाली ती नाही वाटली. कदाचित चांगला रस्ता हे कारण असू शकेल. खाऊन झाल्यावर परत सुरवात केली सायकल चालवायला. इथे आता रामपूरची घाटी उतरायची होती. चांगल्या रस्त्यावरून स्पीड मध्ये घाटी उतरायला मजा आली. क्वचितच रस्त्यात खड्डा त्यामुळे सगळा उतार एकदम स्पीड मध्ये उतरायला मिळाला. पुढे गणेशखिंडीचा चढ होता. पण हा चढ फार तीव्र नसल्याने चढवता आला. चढ चढून आल्यावर एका टपरीवर कोकम सरबत प्यायलं. मस्त माठातलं थंडगार पाणी पिऊ शांत झाले. बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं. आता चिपळूण अगदी हाकेच्या अंतरावर होत. तिथून खडपोली १० किमी वर. साधारण १५ किमी अंतर अजून शिल्लक होत. पण आता दम न लागता घरी पोचायचं म्हणून उत्साह आला. इथे परत थोडा उतार सुरु झाला. रस्त्याला असणारे बारीक सारीक खड्डे जाणवत होते पण दुर्लक्ष करीत होतो. आता ०२.३० वाजत आले होते. आमची रोजची जेवायची वेळ टळून गेली होती पण काहीतरी खाणं मस्ट होतं. मग बाजारात एन्ट्री केल्यावर परत आतल्या रस्त्याने मुंबई गोवा हायवेला लागलो नि डॉमिनोज गाठलं. मस्त पिझ्झा खाल्ला आणि शेवटचे १० किमी पूर्ण करायला सज्ज झालो.

आता अगदी रोजचाच रस्ता. इथले अगदीच छोटे छोटे चढ उतार ओळखीचे असल्याने अंतर पटापट कापत होतो. थोड्याच वेळात घरी पोहचलो. बाबा वाट बघत होतेच. खरं तर सकाळी ०८.०० ला निघालेलो आम्ही घरी दुपारचे ०४.०० वाजता पोहोचलो. इतर ग्रुप वरचे लोकांचे रेकॉर्ड बघता आम्ही या ६२ किमी साठी घेतलेला वेळ हा काहीतरीच जास्त होता. पण काही इलाज नव्हता. रोजचे सायकलिंग करून स्पीड वाढवणे हाच एक उपाय आहे त्यावर.

या सगळ्या प्रवासात काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या. आजूबाजूने जाणारी बरीच जणं “काय एकेक वेडे असतात” असा लुक देऊन जात होती. खूप कमी जण होती जी प्रोत्साहन देत होती. काही जण उगाच चौकशी करत होती तर काहींना खरंच उत्सुकता होती. एक गोष्ट खूप जाणवली ती म्हणजे आपल्याच लोकांचे गैरसमज. आमचा बराचसा प्रवास हा खेड्यातून झाला. त्यांच्या नजरेला असे सायकल चालवणारे क्वचित का होईना पण दिसतात. पण त्यांचा पक्का समज असा होता कि हे सगळे सायकल चालवणारे हे परदेशीच असतात. आपल्या इथली लोक काही असल करणार नाहीत. सहज रस्त्यावरून जाणाऱ्या मुलानी कितीतरी वेळा “ओ फॉरेनर!”अशी हाक मारली तर कधी “ए ते बघ फॉरेनर सायकलने चालले” करीत आणखी मुलाना गोळा केले. मला खूपच आश्चर्य वाटायचं असं का होतंय. आमच्या दोघांपैकी कोणीही परदेशी वाटेल असं दिसायला नाही. पण मग लक्षात आलं कि मी ट्रॅक पॅन्ट शर्ट, डोक्यावर हेल्मेट, डोळ्याला गॉगल त्यामुळे माझा रंग कुठेही दिसत नव्हता तसाच श्रीनिवासच. तसही कोणी निरखून बघण्याएवढं जवळ यायचं नाही लांबूनच हाक मारायचे. एकदा तर मी चढ चढताना दमून पाणी प्यायला उतरले तर दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या मुलांनी “ओ फ़ॉरेनर! हाऊ आर यु?” असं विचारलं. पहिली दुसरीची पोर होती. शाळेत शिकवलेलं एकमेव वाक्य त्यांनी उच्चारलं. मला जाम मजा वाटली त्यांची. मी त्यांना म्हटलं मला मराठी येत तर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं. गॉगल काढला नि म्हटलं अरे मी इथलीच चिपळूणचीच! आणि मग त्यांना स्वतःच्या गैरसमजाच हसू आवरेना. मला ऑल द बेस्ट करून निघून गेली. पण वाईट याच वाटलं कि हा अनुभव खूप ठिकाणी आला. काही जण तर अरे सायकलिस्ट आहेत म्हणून उत्साहाने जवळ येऊन चौकशी करत आणि “अरे हे तर इथलेच आहेत” हे समजल्यावर निराश होऊन चेहरा पाडून पुढे जात. या गोष्टीचा मला प्रचंड राग आला.

दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नातेवाईकांत निर्माण झालेलं आश्चर्य. श्रीनिवास आधीपासून सायकल चालवतो. मी देखील सायकल चालवायला सुरवात केली. श्रीनिवासच्या नादाने नव्याचे नऊ दिवस ते असणार असं बऱ्याच जणांनी गृहीत धरलं होत. पण मी एवढी मोठी ट्रिप करेनअसं खरं तर खुद्द मलाही वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात त्या त्या जागी पोचल्यावर मात्र सगळ्यानकडून कौतुक झालं. गृप वर रोजचे अपडेट टाकत होते तिथूनसुद्धा कौतुकाचे मेसेज येत होते. त्यामुळे मनातून सुखावत होते. ते देखील एक प्रकारचे प्रोत्साहन होते. बरं वाटत होत.

अनेक जण करत असतील पण माझ्यासाठी तरी मी इतक्या वर्षांमध्ये काहीतरी वेगळं करीत होते नि त्याच मला समाधान होतं. श्रीनिवास कायम मला धीर देत होता तुला जमणार म्हणत होता आणि मी ते जमवलं. भले मी त्यासाठी वेळ जास्त घेतला. पण मी कुठेही इतर मदत न घेता सगळा रस्ता सायकलने पार केला याच समाधान खूपच आहे. याच श्रेय नक्कीच श्रीनिवासला जातं. माझी क्षमता माझ्यापेक्षा तो जास्त जाणून आहे आणि याचं मला खूप आश्चर्य वाटत आणि कौतूक सुद्धा.

समाप्त.

प्रतिक्रिया

संपूर्ण मालिका वाचली. जबरदस्त सायकलसफर व मस्त ओघवती लेखनशैली. शेवटचा परिच्छेद खूपच महत्वाचा आहे. तो तर फारच आवडला. तुम्हाला पुढील सायकलप्रवासासाठी व लेखनप्रवासासाठीअनेक शुभेच्छा.

चार चार नव्वद's picture

5 Dec 2018 - 11:21 am | चार चार नव्वद

सायकलींगचं वेड आपल्याकडे (रत्नागिरी जिल्ह्यात) वाढतंय हे बघून आनंद झाला. तुमच्या कुटुंबामुळे अजून अनेकांना प्रेरणा मिळो. आता चिपळूण ला आलो कि भटके खेडवाले काका आणि तुमच्यासोबत राईड करायची इच्छा आहे. पुढील भटकंतीसाठी तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना अनेक शुभेच्छा.

मालविका's picture

7 Dec 2018 - 9:28 pm | मालविका

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

8 Dec 2018 - 8:48 am | सुधीर कांदळकर

आवडले. अशा परीक्षेच्या कठीण वेळी आपल्याला आपलीच नव्याने ओळख होते आणि स्वतःचेच नवे गुण कळतात. संकल्प सिद्धीस नेल्याबद्दल अभिनंदन आणि छान लेखमालेबद्दल धन्यवाद.

सायकलीगचा नाद/आवड सोडू नका.

मालविका's picture

15 Dec 2018 - 8:41 am | मालविका

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

यशोधरा's picture

10 Dec 2018 - 6:53 pm | यशोधरा

सगळे भाग वाचले. लेखमालिका आवडली.
लिहित रहा.

मालविका's picture

15 Dec 2018 - 8:42 am | मालविका

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Dec 2018 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

आता सायकल सोडू नका
पैजारबुवा,

संपूर्ण लेख मालिका वाचली. पुढच्या अशा अनेक सफरींसाठी शुभेच्छा

कंजूस's picture

17 Dec 2018 - 6:06 am | कंजूस

छान आहे सायकल मालिका.