यूं ही चला चल राही - भाग 2

Primary tabs

मालविका's picture
मालविका in भटकंती
30 Nov 2018 - 1:56 pm

10th November, 2018

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आम्ही ४.३० ला उठून तयार होऊन ठरल्याप्रमाणे ५. ३० ला सुमंताचं घर सोडलं.

थंडी नसली तरी हवेत थोडा गारवा होता. चिपळूणहून बाजारपेठेतून रस्ता जातो तो डायरेक्ट मुंबई – गोवा हायवेला परशुराम घाटाच्या पायथ्याशी पोचतो. सुमंता आम्हाला तिथपर्यंत सोडायला आला. त्याला बाय करून आम्ही घाट चढायला सुरवात केली. अजूनही सगळीकडे काळोख होता. डोक्यावर हेडलाईट्स होते. सायकलला ब्लिंकर लावलेले होते. तरीही प्रचंड धुके त्या हेडलाईटच्या मध्ये येत होते. हेडलाईट वापरायची सवय नसल्याने रस्त्यातले खड्डे चुकवायला जमत नव्हतं. पण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे काम भागत होत. पाठून गाडी आली कि बरं वाटे पण समोरून गाडी आली कि अप्पर लाईट डोळ्यात जाई आणि चिडचिड होई. अर्धा घाट चढल्यावर मागून ट्रॅक्टरआला. सामान भरलेला ट्रॅक्टर हळूहळू घाट चढत  होता. मला बर वाटलं म्हटलं याच्या लाईटच्या प्रकाशात थोडा वेळ जाता येईल. पण बराच वेळ झाला मागून लाईट येईना. बरं आवाज तर जवळ जवळ येत चाललेला. हा काय प्रकार म्हणून वळून बघितलं तर त्या ट्रॅक्टरला हेडलाईटच नव्हते. मी कपाळावर हात मारला. तो मात्र इतर गाड्यांच्या लाईटमध्ये आरामात चालला होता.  मध्ये मध्ये थांबत पाणी पीत घाट संपलाआणि उरला सुरला चढ संपवूनआम्ही परशुराम क्रॉस केलं. आता जरा दिसायला सुरवात झाली होती.

६.३० वाजून गेल्याने लोट्याला जाणाऱ्या कंपन्यांच्या गाड्या दिसायला लागल्या. आम्ही मध्ये थांबून हेडलाईट काढून ठेवले. एनरझाल तयार करून घेतले. आणि परत पॅडल मारायला सुरवात केली. नाश्ता करायला खेडला जायचे ठरले होते. मध्ये मध्ये चढ उतार पार करत दमायला होत होतं. पण पाणी पित सेल्फी घेत रस्ता पार करत होतो. पीर लोटे, पटवर्धन लोटे पाठी टाकून लवेलला पोहोचलो. आता २० मिनिटात खेड येईल असे श्रीनिवास म्हणाला. मला उत्साह आला,कि आता भोस्ते घाट सुरु होईल आणि या बाजूने तो उतरायचा आहे तेव्हा मस्त वेगात उतरता येईल. पण अर्धा तास होऊन गेला तरी काही भोस्ते घाट यायचा पत्ता नाही. मी आपली,आता उतार सुरु होईल मग होईल म्हणून पॅडल मारतेय पण घाटाचा पत्ताच नाही. शेवटी ४० मिनिटं झालयावर घाट सुरु झाला. आधीच्या रस्त्याला असलेलं कोवळं ऊन इथे नावालादेखील नव्हतं. प्रचंड धुकं होत. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्ही ज्या स्पीडने परशुराम घाट चढलो त्याच स्पीडने भोस्ते घाट उतरलो. कारण रस्त्यावर असलेले प्रचंड खड्डे. त्यामुळे स्पीड अजिबात नाही उलट ब्रेक दाबत सावकाश सायकल जपतआम्ही घाट उतरलो. भोस्ते घाट म्हणजे खेडची एन्ट्री. घाट उतरल्यावर स्टेशनच्या कडेने खेड शहरात जायला रस्ता आहे त्याने आम्ही आत शिरलो. कडेने रेल्वे ट्रॅक जातो. त्यावेळी तिथून जाणारी रत्नागिरी – दादर पसेंजर ट्रेन दिसली. रस्त्यावरून जाताना अजूनही मला अचानक ट्रेन दिसली तर आनंद होतो. आजही तोच आनंद अनुभवाला. खेड शहरात पोचून एस टी स्टॅन्ड जवळच्या पेठ्यांच्या हॉटेल मध्ये मस्त नाश्ता केला. डोसा, मिसळ, इडली भरपेट खाऊन, बाटल्या भरून घेऊन आम्ही दापोलीच्या रस्त्याला लागलो.

खेड सोडले तेव्हा १०.०० वाजले होते. गारठा कमी होऊन ऊन चढायला सुरुवात झाली होती. खेड – दापोली मध्ये फक्त कुव्याची घाटी लागते. बाकी विशेष मोठे चढ नाहीत असं ऐकलं होतं. निघताना कोळथरे गावी असलेल्या बहिणीला फोन करून येत असल्याचे सांगितले. खेड शहर सोडून गाव भाग सुरू झाल्यावर हळूहळू चढ लागायला लागले. चढ आला कि मग उतार असतो हे गणित डोक्यात पक्क असलेल्या मला इथे धक्काच बसला. इथे चढ झाला कि सपाट रस्ता. परत चढ. ऊन वाढत असल्याने हे चढ चढायला कठीण वाटत होते.

“काय रे किती हे चढ. संपतच नाहीत. ” परत एकदा माझी श्रीनिवास कडे तक्रार ! पण ऐकून घेईल तो श्रीनिवास नाही . तो पण कोकणात आणि पु लं च्या पुस्तकांवर वाढलेला . लगेच मला अंतू बर्व्याच्या स्टाईल मध्ये रिप्लाय दिला ,”हे बघ गोठ्यात निजणाऱ्याने बैलाच्या मुताची घाण येते म्हणून चालत नाही तसंच कोकणातल्या प्रवासात घाट आहेत म्हणून तक्रार चालत नाही.” माझी बोलतीच बंद . आता मी काय आकाशातून नव्हते आले . माझा पण जन्म कोकणतलाच पण हे असे उत्तर श्रीनिवासच देऊ जाणे .

परशुराम घाट चढवता आल्याने इथे मला रस्ता पार करेन असा विश्वास होता. पण एका पुढे एक फक्त चढच लागायला लागले नि मी थकायला लागले. फुरूस गावाच्या अलीकडे मोठा चढ नि नंतर उतार लागला. श्रीनिवासला वाटलं कुव्याची घाटी गेली. पण मला त्या घाटीत असलेला एक दरगा माहित होता. तो न दिसल्याने गेलेला चढ उतार हा घाटी नसून ‘पिक्चर अभी बाकी है’ हे जाणवलं. मध्ये मध्ये पाणी पित पुढे जात होतो. श्रीनिवास कुठेही थांबून देत नव्हता. शेवटी एके ठिकाणी एस् टी ची शेड बघून मी थांबले. खूपच दम लागला होता. मी एवढा असहकार पुकारल्यावर नाईलाजाने श्रीनिवास थांबला. १० मिनिटे पूर्ण थांबलो. मस्त मांडी घालून बसल्यावर जरा बरं वाटलं. 2-2 खारका खाल्लया. वार्याची हलकी झुळूक येत होती. झोपायची इच्छा होत होती पण पुढचा पल्ला दिसत होता. अजून दापोली गाठायची होती.

शेवटी एकदा कुवे गावाची एसटीची पाटी दिसली नि समोर मोठा चढ दिसला. एकदाची ती घाटी आली. तीव्र चढ नि मोठ्ठा यू टर्न अशी ती घाटी. सुरुवातीला थोडा चढ चढल्यावर मागच्यावेळीसारखं मी सायकल हातात घेऊन चालायला लागले. श्रीनिवास सायकलवर बसून घाट चढत होता. पण अचानक यू टर्नवर त्याच्या सायकलची चेन निसटली.  तो चेन लावेपर्यंत मी चढ चढून थांबायच ठरलं. मी एकदाचा सगळा चढ चढून एका घरासमोर झाडाच्या सावलीत थांबले. १०-१५ मिनिटे झाली तरी श्रीनिवास आला नाही म्हणून फोन केला तर चेन जरा जास्तच अडकली होती म्हणाला. चेन मधल्या प्लास्टीकच्या डिस्क/पार्ट मध्ये अडकली होती. तिथल्या तिथे नीट करण्यासाठी तो प्लास्टीकचा पार्ट जाळल्यास चेन लागली असती. पण नेमका लायटर माझ्याकडच्या सामानात होता. श्रीनिवास प्रयत्न करतो म्हणाला. तेवढ्यात माझ्याइथून जाणार्या एका ट्रकवाल्याबरोबर मी लायटर पाठवून दिला. श्रीनिवासला सायकल ठीक करण्यासाठी वेळ गेला. साधारण तासाभराने तो घाटी चढून वर आला. मग मात्र आम्ही भराभर दापोली गाठायची ठरवले. वाटेत फक्त पाणी पिण्यापुरते थांबून लगेच पॅडल मारायला लागलो. माझी खरं तर तासभर विश्रांती झाली होती. पण वाटेतल्या चढ उतारांनी दमझाक होत होती. शेवटी एकदाची दापोली आली. आता निदान ५-१०मिनिटे तरी थांबू अशी श्रीनिवासला विनंती केली. एक शहाळवाला बघून श्रीनिवास थांबला. त्याच्याकडे पोटभर शहाळ्याचं पाणी पिऊन मस्त मलई खाल्ली. १०-१५ मिनिटं शांत बसले. मधूनच कोणीतरी शेजारून जाणारं चौकशी करून जात होत,कुठून आलात? कुठे जाणार? आणि  मग “बाप रे!” चे उद्गार. मग जवळच्याच हॉटेलमधून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.दुपारी साधारण ०१.३० ला आम्ही निघालो.

कोकण कृषी विद्यापीठाच्या बाजूने कोळथरेला जाण्यासाठी वळलो. परत एकदा चढ एके चढ लागायला सुरवात झाली. या सगळ्या प्रवासात वाईट गोष्ट काय झाली तर फार कमी वेळ मला उताराचा आनंद घेता आला. बरेच वेळा एक तर चढ झाल्यावर सपाट रस्ता, उतार नाहीच  किंवा उतार सुरु होऊन पुढे मोठा चढ असेल तर त्या उतारात हे मोठाले खड्डे, कि उतारात स्पीड मिळायचा नाही आणि मग चढ चढताना दमझाक व्हायची. त्यामुळे माझी चिडचिड वाढत होती. पण काहीच करू शकत नव्हते. श्रीनिवास काही ना काही बोलून माझं मनोधेर्य वाढवत होता नि मी अजून किती चढ आहेत याचा विचार करित समोरचा चढ चढवीत होते. हळू हळू एक एक गाव पाठी टाकतआम्ही पुढे जात होतो. एरवी फॉर्म मध्ये असणारा श्रीनिवासचा स्पीड माझ्याबरोबर अगदीच कमी झाला होता. मी शक्य तेव्हढे चढ चढवत होते. अगदीच नाही जमले तर उतरून चालत जात होते. शिवाय मध्ये मध्ये आजूबाजूची दृश्ये मोबाईलच्या कॅमेरात टिपणे चालू होते. लाडघरच्या इथले सागर सावली हॉटेलआले नि मस्त समुद्र दर्शन झाले. इथे तामस्तीर्थ आहे. समुद्राचे पाणी इथे लाल आहे म्हणतात. अर्थात एवढ्या भर दुपारी आम्हाला कोणत्याही अँगलने ते लाल दिसले नाही. तिथे एकदा एक छोटासा फोटोसेशन चा कार्यक्रम झाला. मग मात्र लाडघरचा उतार आला. इथे माझं समाधान झालं. चांगला मोठ्ठा उतार आणि तोही गुळगुळीत रस्तावरुन. दुपारचे ३ वाजून गेले होते. लाडघर गावाच्या एखाद किमी अलीकडे आम्ही एका पिक उप शेड मध्ये थांबलो. उन्हाने हालत झाली होती. या पिक उप शेड वर मस्त झाड असल्याने गारवा होता शिवाय स्वच्छ होती.आणि भर दुपार असल्याने रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची आम्हाला तशीही पर्वा नव्हती. मी बूट, ग्लोव्हज काढून तिथल्या कट्ट्यावरआडवी झाले. श्रीनिवास हसायला लागला. पण मी सकाळपासून रपेट करून दमले होते. त्याने तेव्हढयात मला चिडवायला एक सेल्फी काढून घेतलंन. नुसतं आडवं पडून देखील खूप बरं वाटलं. सकाळी ४.३० ला उठलो तेव्हापासून पाठ टेकली नव्हती. दुपारी झोपायची सवय वाईट यावर एक छोटेखानी परिसंवाद झाला.

लाडघर क्रॉस केल्यावर बुरोंडी गाव लागत. लांबूनच बुरोंडीमध्ये असलेला भगवान परशुरामांचा पुतळा दिसायला लागतो.अर्थात मी त्यावरून किती चढ चढायचाय याचा अंदाज केला. मानसिक तयारी केली नि सुरवात केली. इथला रस्ता मात्र प्रचंड खराब होता. येणारे जाणारे लोक कधी आश्चर्याने तर कधी “काय वेडे असतात एक एक ” असा चेहरा करून बघत होती. काही जण अंगठा दाखवून ऑल द बेस्ट म्हणत होती. छोटी मोठी वळणं घेत एक मोठ्ठा यु टर्न घेऊन परत सरळ चढ चढून गेल्यावर एकदाचा भगवान परशुरामांचा पुतळा आला. अर्थात इथे पण थांबून विश्रांती आणि फोटो काढले. कोकम सोडा पिऊन परत फ्रेश होऊन निघालो.

 

अजुन काही चढ संपायचं नाव नव्हतं. “आता फक्त ३ किमी अंतर उरलंय ” – इति श्रीनिवास. मला हे ऐकून जरा धीर आला. चला आता थोडेच अंतर पार करायचे आहे. आणि थोड्याच वेळात कोळथरेला उतरायला मोठा उतार येईल. पण हाय माझ्या कर्मा! समोरचे छोटे छोटे खड्ड्यानी भरलेले चढसुद्धा आता मला मैलभराचे वाटू लागले. चढताना पायात गोळे येतात कि काय वाटायला लागले. श्रीनिवास आपला संपलाच आता १किमी झाले आता २च किमी उरले असं म्हणून धीर देत होता. मध्येच “चढ इथले संपत नाहीत “असं म्हणून माझी चेष्टा करीत होता. परत एकदा मी सायकल उभी करून थांबले. श्रीनिवासने शेवटी विचारलं कि विजय भाऊजींना गाडी घेऊन बोलावून घेऊया का? तू गाडीतून पुढे जा. खरं तर हो म्हणावसं वाटत होत पण लक्ष्य एव्हढ हातातआलेलं असताना फक्त २किमी साठी सोडून द्यायचं जीवावर आलेलं. शिवाय ती चीटिंग झाली असती. आणि माझं मन काही तयार होईना यासाठी.

सुमारे १ किमी गेल्यावर कोळथरेला जायचा फाटा आला. तिथे कोळथरे २.६ किमी लिहिलेलं होत. ते बघितल्यावर माझी प्रचंड चिडचिड झाली आणि अर्थातच श्रीनिवासवर माझी चिडचिड निघाली. बुरोंडी पासून ३किमी आहे असं म्हणत होता हा मगाशी आणि २ किमी रस्ता पार करून परत आपलं इथे २. ६ किमी जायला दाखवतोय. परत एकदा सुरवात झाली. इथे मात्र खड्ड्यांमधून नि दगडांमधून रस्ता शोधावा लागत होता. काही ठिकाणी तर सायकल हातात धरूनच न्यावी लागली. इथे पण परत चढ एके चढ. या चढांनी मी पार कंटाळले होते. शेवटी एकदाचा उतार आला. पण काय ते दुर्दैव इथेही रस्त्याची अवस्था इतकी खराब होती कि सायकल स्लीप होण्याची किंवा रस्त्यावरच्या खडी मुळे पंक्चर होण्याची भीती होती. त्यामुळे तो जवळ जवळ १ किमीचा उतार आम्ही सायकल हातात धरूनच उतरलो. शेवटी एकदाचा तो उतार उतरून आम्ही गावात शिरलो.

ग्रामपंचायतीचा स्वागताचा बोर्ड लागला. त्या बाजूने ताईच घर अगदी लगेच आहे. आणि अशा तर्हेने मजल दरमजल करीत एकदाचे आम्ही कोळथरेला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते. चिपळूणला सुरवातीलाच लावलेले रनकीपर ऍप बंद केले. टोटल ७७ किमी सायकलिंग झाले. १०किमी तासाला ऍवरेज झालं. एकूण ८ तास लागले पोहोचायला (मधल्या ब्रेक मध्ये पॉझ करत असल्याने हा वेळ फक्त सायकलिंगचा आहे.) साधारण १० तास लागलेआम्हाला एवढंसं अंतर कापायला.आणि तरीही प्रचंड थकवा आला तो वेगळाच.

लोकं २००किमीच्या BRM  कशा पार करतअसतील काय माहित ? श्रीनिवास एकटा असता तर यापेक्षा निश्चितच खूप कमी वेळेत पोहोचला असता. पण माझ्या बरोबर थांबत थांबत आल्यामुळे त्याच्याही स्पीड वर परिणाम झाला अर्थात त्याचे त्याला काही वाटत नाही (आणि मला पण  ). सुट्टीतली leisure राईड म्हणूनच आम्ही प्लॅन केली होती. कारण माझ्यासारखील अजिबात सवय नसताना एवढे अंतर पार करायचे हे चॅलेंज होत. पण शेवटपर्यंत सायकल चालविल्याने मला स्वतःला एक समाधान मिळाले. ताईच्या घरी अर्थातच मस्त स्वागत झालं. ताईने एकदम मिठीच मारली. “बाई माझी पोचली ग एकदाची!” अस म्हणून तिने नि मी एकदम हुश्श केलं आणि खळखळून हसलो.

ताईच्या घरी पोचल्यावर लगेच श्रीनिवासने आधी थोडं स्ट्रेचिंग करून घेतलं आणि मग मला मोकळं सोडलन. घरी आल्यावर बूट, सॉक्स काढून मस्त मांडी घालून बसलो. ताईने निरश्या दुधाचा गरम गरम चहा आणलंन. चहा पिऊन होतोय तोवर भाऊजी वडापाव घेऊनआले. दडपे पोहे करूनच ठेवलेले होते. सगळ्यांनीच त्यावर ताव मारला . वर मस्त आईस्क्रीम.अहाहा! आमचं तर जवळ जवळ जेवणच झाल्यात जमा होतं. ताईने पाण्याखाली जाळ करूनच ठेवला होता. मस्तपैकी कढत पाण्याने अंघोळ करून घेतली. गप्पा गोष्टी होईपर्यन्त ताईच्या सासूबाईंनी चविष्ट अशी मुगा-तांदुळाची खिचडी बनवली. उडदाचा पापड, गरम गरम खिचडी, वर ओला नारळ, घराच्या तुपाची छान धार! जी भर गया! पोटभर जेवलो. गप्पा मारायचा मूड असला तरी अंगात त्राण नव्हते त्यामुळे ९ वाजताच झोपायला गेलो. शेजारच्या घरात आमची झोपायची स्वतंत्र व्यवस्था, हवेत आलेला सुखद असा गारवा मग काय दिली ताणून सकाळपर्यंत. कोळथरे हे गाव समुद्रकिनारी आहे. मला खूपच आवडते हे गाव. सकाळी उठून समुद्रावर चालायला जायला जाम आवडत आम्हाला दोघांना. पण कालच्या परिश्रमांनी सकाळी उठायची अजिबात इच्छा झाली नाही. शेवटी ७ वाजता उठून घरात आलो. परत एकदा निरश्या दुधाचा चहा झाला. नाश्ता आटपून अंघोळी उरकल्या. श्रीनिवास भाऊजींबरोबर कलमात चक्कर मारायला गेला तर मी ताईच्या धाकट्या मुलाचा अभ्यास घेत बसले . ११.३० च्या दरम्यान माझा चुलत भाऊ सुमंत वहिनीसह तिथे हजर झाला. आणि मग जेवताना ज्या काय गप्पा रंगल्यात काय सांगू? हात वाळायला लागले तरी ताई, वाहिनी नि मी उठायचं नाव घेत नव्हतो. भाऊजी नि श्रीनिवास चिडवायला लागले. संध्याकाळी मुलांना घेऊन समुद्रावर गेलो. आश्चर्य म्हणजे खुद्द गावातली माणसं फारच कमी वेळा समुद्रावर येतात. निमित्तच लागते त्यासाठी त्यांना. आणि आम्ही केव्हाही गेलो तरी समुद्रावर जायला तयार असतो. किनाऱ्यावर, वाळूत मज्जा केली. सुमंता खूप छान फोटो काढतो त्यामुळे सर्वानी त्याला भरपूर फोटोज काढायला लावले. आज समुद्रावर न भिजण्याचं ठरलं होत. संध्याकाळी मस्त मिसळ भाकरीचा बेत होता. ताईने भाकरी करण्यासाठी एका बाईंनाच बोलावलं होत त्यामुळे त्या एकतर्फी भाकऱ्या करत होत्या आणि आम्ही ताव मारत होतो. मग गप्पा आणि गाण्यांची मेहफिल जमली. भक्ती वाहिनी उत्तम गाते त्यामुळे तिला गाण्याची फर्माईश झाली. भाऊजी तबला वाजवत होते. मग हळूहळू सगळ्यांनीच गाणी म्हटली. सुमंत आणि भक्तीने तर सुंदर द्वंद्वगीत सादर केलं. मजा आली. आणि मग कॉफी पिऊन १ ते १.३० च्या दरम्यान झोपलो.

दुसर्या दिवशी सकाळी चहा पिऊन समुद्रावर पोहायला गेलो. कितीतरी वेळ फोटो काढण्यात, डुंबण्यात गेला. परत जायला वळणार इतक्यात श्रीनिवासला डॉल्फिन दिसल्या सारखा वाटला. आणि थोड्याच वेळात 20-25 डॉल्फिनची झुंड दिसली. मी याआधी कितीतरी वेळा कोळथरेला येऊन गेले होते पण कधी डॉल्फिन बघण्याचा योग्य आला नव्हता. बऱ्याच जणांकडून ऐकले होते कि दिसतात असे मासे त्यात काय? मी पहिल्यांदाच असे समुद्रात डॉल्फिन्स बघत असल्याने मजा वाटली. ते बऱ्यापैकी जवळ होते. गावाकडचे लोक त्यांना ‘गाद्या’ मासे म्हणतात. त्यांना त्याचे काहीच अप्रूप नाही. थोडा वेळ त्यांना मनसोक्त बघून घरी परतलो. तोही दिवस एकदम मजेत गप्पा गोष्टीत गेला.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

1 Dec 2018 - 3:03 am | राघवेंद्र

मस्त लिहिता तुम्ही..
थोडे फोटो पण टाका स्पेशली भाकरी-मिसळीचे :)

रोमन रेन्स's picture

1 Dec 2018 - 9:40 am | रोमन रेन्स

छान लिहिता तुम्ही .....फोटो असते तर मजा आली असती ....

सिरुसेरि's picture

1 Dec 2018 - 10:22 am | सिरुसेरि

हसत खेळत केलेले छान प्रवास लेखन आवडले .

II श्रीमंत पेशवे II's picture

3 Dec 2018 - 1:04 pm | II श्रीमंत पेशवे II

छान प्रवास वर्णन .......

यशोधरा's picture

3 Dec 2018 - 1:09 pm | यशोधरा

मस्त झाला आहे हा भाग!

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2018 - 3:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

झकास चालली आहे सफर. खडपोलि ते गुहागर व्हाया दापोलि- दाभोळ म्हणजे बराच मोठा पल्ला झाला सायकलसाठी. पण तुम्ही टप्प्याटप्प्याने गेलात म्हणुन प्रवासाची मजा घेता आली. शिवाय नातेवाईकांना भेटता आले. ते मस्तच.

मालविका's picture

7 Dec 2018 - 9:26 pm | मालविका

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

रोज सर्व नसताना कसा जमतोय इतका प्रवास सायकल वरून ह्याबद्दल आश्चर्य वाटतंय खूप