बघू नंतर..

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
28 Sep 2018 - 7:29 pm

मी ब्र वाचली नाही, भिन्न नाही. कुहू सुद्धा अनुभवलं नाही. का तर.. हे सगळं डोक्यात ठाण मांडून बसेल ही खात्री होती.
बघू नंतर, केव्हातरी काहीतरी साधं लिहितीलच तेव्हा वाचू कधीतरी, असं नकळत ठरवलं होतं..
असं काय.. याला काही लाॅजिक नाही...

कदाचित त्यांच्या भूतकाळाबद्दल दुसऱ्या बाजूकडूनची (फारच धुसर) कल्पना होती. म्हणून असेल... पण त्यांच्याबद्दल लेखिकेपेक्षाही बाई+माणूस म्हणून जिव्हाळा होता. जो त्यांच्या पोस्टस् वाचून त्या आता स्वतःच्या मनासारखं जगतायत हे अधूनमधून बघत राहून मी माझ्यापुरता जपला होता...

पण आता त्यांच्या जवळच्यांच्या लिहिण्यावरून समजतंय... बाहेरून धाकड दिसताना आतून थकत होत्या, झिजत तुटत होत्या. एकट्या माणसाला स्वतःच स्वतःला उभारी द्यावीच लागते. ती कुठवर पुरेल? वयाला, उपचारांना न जुमानता थकलेलं शरीर शेवटी निवांत झालं.

गोष्टी सांगणारा जीव काल संपून गेला.. सांगायचं काय काय उरलं तेही आता नाही कळणार.

असे अकाली पूर्णविराम अपूर्ण राहिलेल्या कितीतरी शक्यतांना पार अनाथ करून टाकतात.

-------
माणसं असतात तेव्हा ती असतीलच, बघू नंतर हे गृहित धरून बसू नका मायबापांनो.........
हे निघून जाणं क्षणात होऊन जातं. परत येणं हा पर्यायही नसतो.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अतिशय समयोचित. पण समयोचित म्हणण्यासाठी असा प्रसंग यायला नको होता. मिपा, ऐसी यावर सदस्य असलेल्या व्यक्तींपैकी भोचक, यकु, निपो, श्रामो यांच्यानंतर आणखी एका व्यक्तिमत्वाने घेतलेला आकस्मिक निरोप.

ताकदीचं होतं त्यांचं लिखाण. वाईट झालं.

"अकस्मात तोही पुढे जात आहे" याची तीव्र जाणीव होण्याचे हे क्षण, म्हणून त्रासदायक खरं तर...

>>निघून जाणं क्षणात होऊन जातं. परत येणं हा पर्यायही नसतो.>>

लिहून उरणं हा एकच.