लेफ्टनंट गौरवच्या मनातले

Primary tabs

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in काथ्याकूट
21 Jul 2018 - 12:44 pm
गाभा: 

लेफ्टनंट गौरवच्या मनातले...

" आपण स्वतःला ओळखले पाहिजे करण आपल्याला वाटते त्यापेक्षा आपल्यामध्ये बरीच जास्त क्षमता असते. अभ्यास नेहमी मन लावूनच करायला पाहिजे आणि प्रत्येक काम हे नेहमी जीव ओतून करायला पाहिजे,असे उत्तम संस्कार मला या शाळेने दिले "

---- गौरव आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल मध्ये दहावीच्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम; आणि या विद्यार्थ्यांचे कौतुक करायला उपस्थित होता लेफ्टनंट गौरव म्हेत्रे. गौरव या शाळेचा माजी विद्यार्थी; पूर्वप्राथमिक ते पाचवीपर्यंत शिक्षण येथे झाते. म्हणूनच आज गौरवची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्यावर समस्त सरस्वतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे औचित्य साधून गौरव चा गौरव करण्यासाठी शाळेने त्याला प्रेमाने आणि मानाने बोलवले. त्याचा लेफ्टनंट पदापर्यंतचा प्रवास जाणून घेण्याची आणि त्याच्याशी संवाद साधण्याची पर्वणी याप्रसंगी उपस्थित सर्वांनीच साधली. लहानांनीच नाही तर मोठ्यांनीही ग्रहण करावे आणि प्रेरणा घ्यावी असे गौरव चे अनेक गुण आहेत. गौरव कडून स्फूर्ती घेऊन अधिकाधिक मुलांनी सैनिक बनवून राष्ट्र सेवा करावी यासाठी गौरवशी हा खास संवाद.

गौरव, सहावीपासून साताऱ्याच्या सैनिक शाळेत दाखल झालास. तिथे प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते का? त्यासाठी काय तयारी केली होतीस? इथे मुलींना प्रवेश मिळतो का?
-- हो, प्रवेश परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी ही होते पाचवीत असताना मी ती परीक्षा दिली या स्पर्धात्मक परीक्षेसाठी मुख्यतः चौथी , पाचवी आणि सहावी च्या गणिताची तयारी करावी लागते या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सहा ते सात ते हजार विद्यार्थ्यांमधून फक्त शंभर ते दीडशे विद्यार्थी निवडले जातात.

सातार्‍यासारख्या सैनिक शाळा अजून कुठे आहेत?
-- साता-याची सैनिक शाळा महाराष्ट्रात एकमेव आहे; इतर शाळा खाजगी आहेत.१९६१ साली पं. जवाहरलाल नेहरुंच्या पुढाकारानी ही शाळा स्थापन झाली. ती अंडर. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स असून देशातील सर्व जुनी सैनिक शाळा आहे. इथे मुलींना प्रवेश नाही परंतु पुण्याच्या राणी लक्ष्मीबाई सैनिक शाळेत मुलींना दहावी नंतर प्रवेश घेता येतो.

एवढ्या लहान वयात घरापासून लांब राहण्याचे मनावर काही दडपण आले का? तिथल्या दिनक्रमाशी कसे जुळवून घेतलेस?
-- मोठा भाऊ तिथेच शिकत असल्यामुळे एवढे दडपण नव्हते. पण पहाटे लवकर उठणे, पी. टी. करणे, धावणे या गोष्टींची सवय नव्हती. पण मानसिक तयारी पक्की असल्यामुळे दिनक्रम सहज अंगवळणी पडला.

दिवसाच्या कार्यक्रमात वेळेची विभागणी साधारण कशी होती?
-- पहाटे सव्वा पाचला उठून पी. टी. , धावणे इ.; नंतर शाळेचे चार तास वर्ग. संध्याकाळी पुन्हा खेळ आणि विविध क्रीडास्पर्धा. झोपण्यापूर्वी थोडा वेळ अभ्यासासाठी आणि रात्री दहाला दिवे बंद.

सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेत तू दहावा आलास आणि आठवीमध्ये तू आर आय एम सी मध्ये दाखल झालास, आर आय एम सी म्हणजे काय?
-- आर् आय एम् सी म्हणजे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काॕलेज. १९२२ साली डेहराडून येथे स्थापन झालेले हे भारतातील सर्वात जुने ऑफिसर्स ट्रेनिंग कॉलेज आहे. छोट्या राज्यांमधून एक आणि मोठ्या राज्यांमधून दोन विद्यार्थी निवडले जातात. म्हणजे दर सहा महिन्यांनी पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

या परीक्षेत तू महाराष्ट्रात पहिला आलास, काय विशेष तयारी केली होतीस?
-- ही परीक्षा देण्यासाठी सहावीच्या वर्षी एक आणि सातवीच्या वर्षी दोन संधी मिळतात. मी माझा शाळेचा अभ्यास संपवून रोज रात्री एक तास नियमित या परीक्षेची तयारी केली. म्हणूनच परीक्षा कठीण असूनही उत्तीर्ण झालो.

आर आय एम सी ची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
-- वयोमर्यादा आहे साडे अकरा ते तेरा वर्षं.

आर आय एम् सी मध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये सैनिक शाळेतील विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी यांचे प्रमाण कसे असते?
-- ही प्रवेश परीक्षा सैनिक शाळेच्या परीक्षेपेक्षा थोडी कठीण जरी असली तरी नीट तयारी केली तर प्रवेश मिळू शकतो. माझ्याबरोबर सैनिक शाळेतील आम्ही तिघेच होतो. बाकी विद्यार्थी इतर शाळांमधून आलेले होते.

साताऱ्याहून थेट डेहराडून म्हणजे हवामानात, जेवणात खूप फरक असणार; इथे मोठा भाऊही नव्हता आणि देशभरातून आलेले विद्यार्थी होते, या सगळ्याशी जुळवून घेतलंस?
-- जसा मी दुरून आलो होतो तसे सगळेच दुरून आलेले होते. त्यामुळे आम्हाला कळलेही नाही की कालपर्यंत जे परके होते ते कधी एकमेकांचे जिवलग मित्र बनले. कोणत्याही शिक्षेला सामोरे जायचे असू दे किंवा कोणताही सामना खेळायचा असू दे आम्ही सगळे एकत्र असायचो. मी एकट्यानेच नाही तर सगळ्यांनी मिळून परिस्थितीशी जुळवून घेतले.

तुला या सगळ्या वर्षांमध्ये आलेले खूप चांगले किंवा खूप वाईट अनुभव कोणते? कठीण परिस्थिती मुळे कधी निराश झालास का?
-- चांगले अनुभव तर प्रत्येक दिवशी येत होते. कारण इथे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडत असतो. स्विमिंग, हॉर्स राइडिंग, रायफल शूटिंग यासाठी लागणाऱ्या सुविधा आणि मार्गदर्शन इथे सहज मिळते. मुलांना अनुभवांनी समृद्ध करून हि-यासारखे पैलू पाडले जातात. काही अनुभव हे त्यावेळी वाईट वाटले होते, पण आता विचार केला तर मला असं वाटतं की, त्यातूनही मी घडतच गेलो. माझ्या मर्यादांवर मात करून क्षमतांचा विकास साधत काहीतरी शिकत गेलो.

हा नक्कीच तुझ्या सकारात्मक विचारसरणीचा परिणाम आहे. तरीही कधी निराशेचे क्षण आले का? असे क्षण जर दुसऱ्या कोणा विद्यार्थ्यांच्या वाट्याला आले तर धीर कसा गोळा करावा हे जाणून घेण्यासाठी मुद्दाम विचारते आहे.
-- हो, असं झालं होतं; माझ्या राईट hip joint ला जबरदस्त दुखापत झाली होती. ट्रेनिंग न घेण्याचा आणि पुढचे तीन महिने बेडरेस्ट घेण्याचा वैद्यकीय सल्ला दिला गेला होता. शाळेने तर या परिस्थितीत मला घरीच पाठवले असते. त्यावेळी पूर्ण दिवस मी रडत होतो. कळलं नाही की डोळ्यातून दिवसभर एवढं पाणी कुठून आलं. पण मला हे ट्रेनिंग कधीच सोडायचं नव्हतं. मग मी तिथे परत गेलो. औषधांचा गुण आला. महिन्याभरात मी हळू -हळू चालू लागलो, जॉगिंग करू लागलो. यातून संपूर्ण बरे व्हायला आणि माझा खुबा चांगला आहे आणि मी काहीही करू शकतो हा आत्मविश्वास परत मिळवायला एक वर्षांचा काळ जावा लागला.

शाब्बास आहे तुझी गौरव खरंच! तुझ्या मनाच्या खंबीरपणामुळेच तू परिस्थितीवर मात केलीस. तुला एन डी ए मध्ये प्रवेश मिळाला, आणि एनडीएच्या च्या परीक्षेत तू आठवा आलास; पण असंही होतं का की आर आय एम सी मधून एन डी ए मध्ये प्रवेश मिळत नाही आणि तसं झालं तर त्या मुलांसाठी काय संधी असतात?
-- 90 टक्के मुलांचा पहिल्या प्रयत्नात आणि उरलेल्यांचा दुसऱ्या किंवा क्वचित तिसऱ्या प्रयत्नात एनडीएमध्ये प्रवेश होतो. पण जर वैद्यकीय कारणांमुळे तो नाकारला गेला तर ते सिव्हिल सर्विस मध्ये जातात.

एन डी एच्या परीक्षेची तयारी कशी केलीस त्यासाठी वेगळे क्लास होते का?
-- वेगळे क्लास कधीच नव्हते. संपूर्ण तयारी आमच्या शिक्षकांनी करून घेतली. जून-जुलै मधल्या दीड महिन्याच्या सुट्टीभर आम्ही शाळेतच राहिलो आणि आमच्यासाठी तीन शिक्षकही शाळेत राहिले. आम्ही पंचवीस मुले एकाच परीक्षेसाठी शांत जागेत तयारी करत होतो. त्यामुळेच धवल यश मिळाले.

तुमचे मार्गदर्शक सैन्यदलातील होते की बाहेरचे?
-- शाळेमध्ये शिक्षक यूपीएससी क्वालिफाईड होते आणि तीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आर्मीतील होते. एन डी ए आणि आय एम ए मध्ये आर्मड फोर्सेस मधील ट्रेनर होते.

मुलींना सैन्यात जाण्यासाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
-- आर्मी मध्ये infantry सोडून इतर सर्व शाखांमध्ये तसेच नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये समान संधी आहेत. पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये अधिक संधी मुलींसाठी उपलब्ध होऊ शकतील.

दहावी व बारावीनंतर सैन्यदलात जाण्यासाठी कोणत्या संधी आहेत?
-- बारावीनंतर मुख्यतः एनडीए; न झाल्यास कॉमन डिफेन्स सर्विसेस एक्झाम (CDSC) एअरफोर्ससाठी (F-cad), याशिवाय बारावीनंतर technical entry scheme (TES) या परीक्षा आहेत. यासाठी बारावी सायन्स मध्ये पीसीएम ग्रुप ला पंच्याहत्तर टक्के मार्क आवश्यक आहेत. त्यासाठी एसएसबी मध्ये पाच दिवसांची मुलाखत असते, त्यात निवड झाल्यावर कॉलेज ऑफ मिलिटरी एज्युकेशन (CME) मध्ये प्रवेश मिळतो.

स्वतःसाठी या पाच वर्षांमध्ये किती वेळ मिळाला, तुझे छंद कोणकोणते आहेत?
-- स्वतःसाठी वेळ फक्त सुट्टीतच मिळत असे. तेव्हा मी माऊथ ऑर्गन, कॅलिग्राफी आणि वाचन आनंद यांचा घेऊ शकत असे.

घरापासून एवढे लांब देशविदेशातील लोकांबरोबर राहून अभ्यासक्रमापेक्षा वेगळे असे आयुष्याकडून काय शिकलास?
-- उच्च मनोधैर्य, अधिक पेशंस, सगळ्यांशी जुळवून घेणे या गोष्टी आपोआप येत गेल्या.

NDA किंवा IMA मध्ये इतर कोणत्या देशातील विद्यार्थी येतात?
-- अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव, लिसोथो, नायजेरिया

यापुढचे तुझे ध्येय काय?
-- मी आयुष्याकडून रोज काहीतरी शिकत राहावे. आर्मी मॅनेजमेंट करताना माझ्या टीमला विश्वासात घेऊन सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या आणि अनुभवांनी समृद्ध होऊन अधिकाधिक चांगला माणूस बनत जावे असे मला वाटते.

तुला आवर्जून सांगावेसे वाटते असे काही?
-- ठाणे मुंबई मधून मी एकटाच मिलिटरी स्कूल मध्ये होतो. आपल्याकडच्या जास्त मुलांनी हा पर्याय निवडावा असं मला वाटतं.

तुझे पहिले पोस्टिंग कुठे झाले आहे?
-- गुवाहाटी पासून शंभर किलोमीटर दूर आसाम मधील मिसामारी येथे.

फुलपाखरासारखे बागडण्याचा वयात सैनिक बनवून देशासाठी लढण्याचा विचार पक्का करून त्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकणाऱ्या गौरवला लेफ्टनंट ते सैन्य दल प्रमुख असा पल्ला गाठण्यासाठी मनापासून शुभेच्छा!

संपर्क - नमिता दामले, भ्र.ध्व.९८६९५७५५६७,
ईमेल namitasd811@ gmail.com

प्रतिक्रिया

पैलवान's picture

21 Jul 2018 - 8:09 pm | पैलवान

'गौरवा'स्पद ओळख...

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2018 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

फुलपाखरासारखे बागडण्याचा वयात सैनिक बनवून देशासाठी लढण्याचा विचार पक्का करून त्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकणाऱ्या गौरवला लेफ्टनंट ते सैन्य दल प्रमुख असा पल्ला गाठण्यासाठी मनापासून शुभेच्छा!

+१०००

या अभिमानास्पद आणि अनुकरणिय व्यक्तिमत्वाची आम्हाला ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद !

अर्धवटराव's picture

22 Jul 2018 - 4:01 am | अर्धवटराव

खरं म्हणजे सर्व सरकारी शाळांमधे या सैनीकी शाळांचं लाईट व्हर्जन इंप्लिमेण्ट करता येईल. निवृत्त सैन्याधिकारी, नागरी प्रशासनातले अधिकारी, सेवाभावी संस्थांचे लोकं मिळुन अगदी आनंदाने हि जबाबदारी पार पाडतील. अशा एक-दोन पिढ्या जरी तयार झाल्या तरी सार्वजनीक स्वच्छता, वाहतुकीचे नियम, विज-पाणि वगैरेचा काटेकोर वापर, महिला सुरक्षा आदि प्रश्न आपोआप सुटतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2018 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2018 - 2:15 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११

अनिरुद्ध.वैद्य's picture

24 Jul 2018 - 10:24 am | अनिरुद्ध.वैद्य

सहमत!!

नाखु's picture

24 Jul 2018 - 10:46 am | नाखु

बात, पुस्तकी ज्ञान मिळते आहे,पण जीवन शिक्षण गायबच झाले आहे.

जिल्हा परिषद विद्यार्थी नाखु

पुर्वी जिल्हा परीषद शाळांची नावे "जीवन शिक्षण विद्या मंदीर" अशी असत...

सही रे सई's picture

29 Aug 2018 - 8:28 pm | सही रे सई

+१

खिलजि's picture

24 Jul 2018 - 7:47 pm | खिलजि

स्फूर्तिदायक लेख

सिरुसेरि's picture

25 Jul 2018 - 8:53 am | सिरुसेरि

छान माहितीपुर्ण लेख . +१००

सुधीर कांदळकर's picture

25 Jul 2018 - 1:14 pm | सुधीर कांदळकर

कडक सॅल्यूट.

लेफ्टनंट गौरवच्या मनातले इथे प्रकट केल्या बद्धल धन्यवाद !
हे वाचुन माझ्या टाळक्यात जो व्हिडियो आला तो इथे शेअर करत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Desert Hero :- RON GOODWIN