जफर पनाही : लव्ह लेटर टू द सिनेमा (उत्तरार्ध )

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
17 Jul 2018 - 11:38 am

२०१० मध्ये अचानक जफर पनाहीच्या अटकेची बातमी जगासमोर आली. जगातल्या जवळपास सगळ्या देशांमधून या अटकेच्या निषेधात सूर उमटला. पण इराणीयन सरकार ठाम होतं. जफरवर सरकारविरोधात जनमत भडकवण्याचा ठपका ठेवला गेला होता. एका अर्थाने तो देशद्रोहच होता. त्यांना ६ वर्षांची कैद झाली. कैदेवर भागलं नाहीच तर पुढची किमान वीस वर्ष त्यांच्यावर चित्रपट बनवण्यापासून, लिखाण करण्यापासून , आपली मतं-विचार सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यापासून आणि देश सोडण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं. जफरनी असं काय केलं होतं कि त्यांच्याच मातृभूमीतलं सरकार त्यांना अशी सजा देत होतं ? जफरची चित्रपट कारकीर्द नीटपणे पहिली तर याच उत्तर सापडतं.
पनाहीच्या पोतडीतले चित्रपट बघता एक गोष्ट प्रामुख्यानं समोर येते ती म्हणजे इराणच्या मातीतले प्रश्न किंवा सामाजिक विरोधाभासाचं केलेलं नैसर्गिक चित्रण. जफरच्या शेवटच्या तीन फिल्म्स सोडल्या तर बाकी फिल्म्स या अधिकृत आहेत असं मानण्यास हरकत नाही जरी त्या प्रदर्शित झाल्या, बहुतांशी होऊ दिल्या नसल्या तरीही. २०१० नंतर अर्थात अटकेनंतरच्या फिल्म्स या पूर्णपणे अनधिकृत आहेत. त्यांची कोणतीही फिल्म जरी घेतली तरीही त्यात इराणच्या सामाजिक आणि राजकीय गोष्टींचा प्रभाव दिसतो. पहिला चित्रपट ‘ द व्हाईट बलून ‘ मध्ये पैसे हरवलेल्या मुलीची कथा दाखवताना तिच्या सभोवतालचं इराण आपल्याला लक्षात येतं. ‘द सर्कल’ मधून तिथल्या स्त्रियांचं दुर्लक्षिलं जाणारं अस्तित्व समोर येतं. ‘ ऑफसाईड’ मधून तिथल्या स्त्रियांवरची बंधन लक्षात येतात. मुळात ‘ऑफसाईड’, ‘द सर्कल’ या चित्रपटांचं केंद्र हे वास्तव हेच आहे. कथेतल्या पात्रांची मानसिकता आणि सत्यता, परिसराची -सभोवतालची परिस्थिती आणि त्याचा प्रभाव हा वास्तवातला आहे. पण अगदी ‘द व्हाईट बलून ‘, ‘द मिरर’,’क्रीम्सन गोल्ड’ या काल्पनिक कथानकांवर आधारलेल्या चित्रपटांमध्येही दिसणारं इराण हे वास्तववादी आहे. ते कृत्रिमरित्या उभं केलेलं नाही . त्यांच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये सामाजिक किंवा राजकीय तत्त्वांमुळे होणाऱ्या व झालेल्या बदललांचा प्रत्यय आणि त्याचा व्यत्यास सुद्धा कधी केंद्रस्थानी तर कधी आजूबाजूच्या दुय्यम पात्रातून समोर येत राहतो. इराणमधली वास्तविकता, त्यावर असलेला धर्माचा प्रभाव आणि त्यातून दाबलं गेलेलं स्वातंत्र्य हे सगळं पुन्हा पुन्हा समोर येत राहतं
jafar
कोणत्या राजसत्तेला आपल्या देशातला कारभार असा उणिवांना अधोरेखित करून जगासमोर आलेला पसंद पडेल? एकवेळ लोकशाही मानणाऱ्या सत्तेचं गणित वेगळं असू शकेलाही पण धार्मिक कट्टरतेवर आधारलेल्या सत्तेला हे नक्कीच पसंद पडणार नाही आणि ते दाबून किंवा संपवून टाकण्याचे प्रयत्न होणं स्वाभाविकता होईल. जफरच्या अटकेच्या, प्रतिबंधाचा मागचं हे एक महत्वाचं कारण आहे. कट्टरतावादाच्या तत्वावरून देश चालवणारी सत्ता आणि त्याच्या वैचारिक तत्वांचे सामान्य जनतेवर होणारे परिणाम आणि त्यातून सामाजिकरीत्या होणारी हानी आपल्या चित्रपटांद्वारे जगाला दाखवणं जफर पनाहीना खूप भारी पडलं असं म्हणण्यास जागा राहते.
चित्रपटकार हा फक्त आपल्या चित्रपद्वारे आपले विचार व्यक्त करत असेल आणि त्यामुळे सत्तेला धोका असेल तर चित्रपटकारावर चित्रपट बनवण्याविषयीची बंदी येणं समजण्यासारखं आहे पण जाहिररित्या आपली मतं- विचार व्यक्त करण्यावर असलेली बंदी हि पूर्णतः: अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असतेच. जफरवरच्या चित्रपट संबंधातल्या बंदीबाबत आपल्याला त्यांच्या चित्रपटांच्या आशयावरुन लक्षत येत मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होण्यावरची बंदी मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अवलंबून राहते. जफरवरचा सरकारचा रोष पाहायला गेला तर तो २००९ पासून ठळकपणे दिसतो. २००९च्या आधी तो नव्हता असं म्हणण्यास फार वाव नाही कारण एकंदरीत जाफरच्या चित्रपटांचे विषय आणि त्यावर प्रदर्शनाबाबत टाकल्या जाणा-या अटी या सुरुवातीपासूनच होत्या परंतु त्याला ठळकपणे रोष म्हणता येणार नाही. चित्रपटकार आणि चित्रपट प्रदर्शनाचे अधिकार असेलेली अधिकारीक समिती यांच्यातला वाद हा सगळ्याच देशात सामान्य आहे. ३० जुलै २००९ ला मोजताब सामीनेजाब या एका तरुण इराणी ब्लॉगरनं तेहरानच्या कब्रस्थानातून जफरना अटक झाल्याचं जाहीर केलं. निमित्त झालं २० जून ला तत्कालीन राष्ट्रपती मेहमूद अहमदीनेजाद यांच्या विरोधात तेहरान चौकात प्रदर्शन करणाऱ्यांवर झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ‘नेदा आगा सुलतान’ या तरुणीच्या कबरीवर शोकासाठी एकत्र आलेल्यांना संबोधित करणं इतकंच. आपल्या विरोधात सामील झालेल्यांना संबोधित करणारा सुद्धा आपल्या विरोधकच आहे या तत्वामुळे ३० जुलैला जफरना पहिल्यांदा अटक झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी सुटकाही झाली. हि अटक चुकून झाल्याचं इराणी सरकारनं कबुल केलं. पुढे सप्टेंबर मध्ये मोनेत्राल फिल्म फेस्टिवल मध्ये ज्युरी म्हणून गेलेल्या जफरनी तिथल्या सगळ्या ज्युरींना महोत्सवाची सुरुवात आणि सांगता गळ्यात हिरवा स्कार्फ घालून करण्याची विनंती केली आणि तसं करवूनही घेतलं.या कृतीचा अर्थ होता आमचा ‘ईराणी ग्रीन मुव्हमेंट’ अर्थात ‘पर्शिअन स्प्रिंग’ ला पाठिंबा आहे. हि कृती उघडउघड अहमदीनेजाद सरकारच्या विरोधात होती. मुळात पर्शिअन स्प्रिंग हि चळवळच २००९च्या राष्ट्रपती पदावर मेहमूद अहमदीनेजाद आल्यावरच सुरु झाली होती. या चळवळीचा हेतू होता कि मेहमूदना सत्ता सोडयाला लावणे अन त्यांचे विरोधी मीर हुसेन मोसवी यांना सत्तेवर आणणे. हिरवा हा रंग मोसावींच्या प्रचाराचा भाग होता. म्हणूनच या चळवळीला हरित चळवळ म्हटलं गेलं. इथून खऱ्या अर्थानं जफरच्या अडचणीत वाढ झाली आणि त्याच रूपांतर १ मार्च २०१० झालेल्या अटकेत झालं.
त्या दिवशी अगदी सकाळीच सध्या वेषातल्या १५ अधिकाऱ्यांनी जफर, त्यांची पत्नी तेहरीह सैदी , मुलगी सोलॅमाज आणि काही मित्रांना अटक केली आणि त्यांना एविन जेलात पाठवण्यात आलं. काही दिवसांनी जफरच्या पत्नीला आणि मुलीला सोडण्यात आलं पण जफर मे २५ पर्यंत अटकेतच होते. या काळात त्यांनी आपल्या अटकेविरुद्ध तक्रार करून कारागृहातच उपोषणाला सुरुवात केली. अखेर २ लाख डॉलर्स इतक्या मोठ्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका झाली. २० डिसेम्बरला इस्लामिक कोर्टानं त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपांना मान्य करून ६ वर्षांनीही कैद आणि २० वर्ष चित्रपट बनवण्यावर, देश सोडण्यावर आणि जाहीर वक्तव्य करण्यावर प्रतिबंध घातला. हि ६ वर्षांची कैद नंतर नजरकैदेत बदलण्यात आली. २०११-२०१४ या कालखंडात त्यांच्यावर पाळत ठेवणे , परिवाराला धमक्या देणे इत्यादी प्रकार चालू असल्याचे जफर पनाहींनी एका पत्राद्वारे स्प्ष्ट केले. २०१४ ला निवडणूक झाली आणि हसन रुहानी सत्तेत आले. रुहानी जरा मवाळ असल्याने जाफर यांची नजरकैदेतून सुटका झाली. मात्र २० वर्षांचे प्रतिबंध मात्र कायम ठेवले गेले.jafar
प्रतिबंध असला तरीही जफर शांत नव्हते. त्यांच्या कारकिर्दीतला आतापर्यंतच्या तीन अनधिकृत फिल्म्स या याच काळात तयार झाल्या. पहिली फिल्म जीचं नावचं मुळात ‘ धिस इज नॉट द फिल्म’ असं असून ती या नजरकैदेतल्या काळातलं जफरच्या आयुष्याचं स्थिर चित्रण आहे. हि फिल्म एका केकमधून स्मगल करून इराणच्या बाहेर आणली गेली . २०११ च्या कान्स मध्ये ती अतिशय अनपेक्षितरित्या दाखवली गेली. पुढे २०१२ मध्ये तत्कालीन सर्वोत्तम १५ लघुपटांमध्ये अकादमीने तिचा समावेश केला. २०१३ ला अब्बास किरोस्तामिनी जाहीर केलं कि जफरची पुढची फिल्म लवकरच समोर येईल. त्याचप्रमाणे बर्लिन फिल्म फेस्टिवलला ‘क्लोज्ड कर्टन्स’ हि फिल्म रिलीज झाली आणि त्यावर्षीचा सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार अर्थात सिल्वर बेअर या चित्रपटाला मिळाला. हा मुळात चित्रपट नाही. यात कथा नसून दिग्दर्शकाच्या मनातलं वैचारिक द्वंद्व आपल्यासमोर अतिशय प्रभावीपणे येतं. मनातली घालमेल आणि त्याच्या प्रभावाखालची कृती हा मूलभूत बदल हि फिल्म आपल्याला दाखवते. २०१५ साली जाफरची बहुचर्चित ‘ टॅक्सी’ हि फिल्म पुन्हा बर्लिन महोत्सवात प्रदर्शित झाली आणि तिला अपेक्षेप्रमाणे त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. यात मुख्य नायक स्वतः: जफर असून ते तेहरान मध्ये टॅक्सी चालवत, अनेक प्रवाशांना घेत प्रवास करतात.Panahi films
जफरच्या अटकेनंतर जगभरातून विविध स्थरातून निषेधाचे विरोधाचे सूर आले.अनेक प्रसिद्ध ना,नामवंत लोकांनी या विषयाला जाहीरपणे हात घातला. प्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी यांनी डिसेंबर २०१० मध्ये एका नोट प्रसिद्ध केली. त्यात ते म्हणतात,
” जफर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अटकेबाबत ऐकून धक्का बसला.. देशाचं नाव मोठं करणाऱ्या माणसाला त्यांचा देश अटक कशी काय करू शकतो? आपण सर्वानी या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. “
मे २०१० ला प्रसिद्ध चित्रपटकार आणि कलाकारांच्या एका समूहानं इराण सरकार ला एक विनंती वजा पत्र लिहिलं ज्यात जफर यांच्या सुटकेची मागणी केली गेली. त्या पत्राचा मजकूर होता,
‘We … stand in solidarity with a fellow filmmaker, condemn this detention, and strongly urge the Iranian government to release Mr. Panahi immediately. Like artists everywhere, Iran’s filmmakers should be celebrated, not censored, repressed and imprisoned,’
( आम्ही या प्रतिबंधित चित्रपटकाराबरोबर अतिशय ठामपणे उभे राहत असून इराण सरकाने जफर यांना तात्काळ मुक्त करावे. पनाहीसारख्या कलाकाराला अटक करणे किंवा सेन्सर करणे चुकीचे आहे .)
या पत्रावर रॉबर्ट डी निरो, स्टीवन स्पीलबर्ग आदी नामवंत कलाकारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. २०११ च्या बर्लिन महोत्सवात पनाही ज्युरी म्हणून आमंत्रित होते मात्र त्यांना इराण सरकारने जाण्यास मज्जाव केला. परिणामी संपूर्ण महोत्सवात त्यांच्या नावाची रिकामी खुर्ची ठेऊन सांकेतिक विरोध दर्शवला गेला.
पनाहीवरच्या प्रतिबंधाला आता जवळपास अर्धा दशधक उलटून गेलय. पण तरीही पनाहीच काम काही थांबलेलं नाही. आता पर्यंत त्यांचे ३ अनधिकृत चित्रपट येऊन गेले आहे. याच वर्षीच्या सिडनी चित्रपट महोत्सवात त्यांची चौथी अनधिकृत फिल्म ‘ थ्री फेसेस’ प्रदर्शित झाली. ` आतापर्यन्तचा त्यांचा प्रवास हा अतिशय खडतर तर आहेच पण प्रेरणादायी नक्कीच आहे. तुम्ही योग्य असला आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हला तुमच्या इप्सितापासून थांबवू शकत नाही हा संदेश त्यांच्या आजवरच्या प्रवासातून ठळकपणे लक्षात येतो.त्यांच्या कामाकडे बघता डॅरेन एरोनोस्की यांनी त्यांना दिलेलं बिरुद सार्थ आहे हे लक्षात येतं- लव्ह लेटर टू द सिनेमा.
आज आपण त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देताना निदान त्यांना लवकरच या प्रतिबंधातून मुक्तता मिळावी अशी अशा नक्कीच व्यक्त करू शकतो.
(समाप्त )

-अनिरुद्ध प्रभू

https://aniruddhprabhu.wordpress.com/

(पूर्वप्रकशित)

चित्रपट

प्रतिक्रिया

सोमनाथ खांदवे's picture

17 Jul 2018 - 10:28 pm | सोमनाथ खांदवे

इराण हा आखातातील भारताचा मित्र देश , भारतीय रुपया मध्ये क्रूड ऑइल आपल्याला देत असल्या मूळे परकीय गंगाजळ वाचते , भारतातील शिया धर्मीय शिक्षण घेऊन भारताच्या विकासात हातभार लावत आहेत , रामजन्मभूमी वरील हक्क सोडून रामाचे मंदिर बांधण्या साठी आग्रही आहेत .दंगली जाळपोळ मध्ये शिया धर्मीय कधीच नसतात .
इतक्या चांगल्या बाबी शिया धर्म आणि इराण बद्दल आपल्या जनमानसात असतांना तुमचा लेख विचार करायला लावतो .