अनवट किल्ले ३६ : दुंधा किल्ला ( Dundha )

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
13 Jul 2018 - 11:15 am

सटाणा गावाजवळच्या दुर्गचौकडीविषयी आपण माहिती घेत आहोत. बिष्टा, कर्‍हा, अजमेरा यापैकी दुंधा हा सर्वाधीक अवशेष असलेला आणि प्रेक्षणीय किल्ला आहे. एकतर दुंध्याच्या डोंगरावर वनीकरण केल्यामुळे दाट वृक्षसंपदा आहे आणि त्यातच भर घालायला पायथ्याशी आश्रम आहे. त्यामुळे मुक्कामाला योग्य जागा आणि रम्य परिसर यामुळे दुंधा हा आवर्जुन भेट द्यावा असा गड आहे.
Dundha 1
( दुंधा- अजमेरा परिसराचा नकाशा )

दुंधा गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) नाशिक जिल्ह्यातील सटाणा गावातून दुंध्याला जाता येते. सटाणा - मालेगाव रस्त्यावर, सटाण्यापासून ३ कि.मी अंतरावर सौंदाणे फाटा आहे. या फाट्यावरुन अजमेर सौंदाणे - तळवडे मार्गे दुंधा २० कि.मी वर आहे. दुंधा गावाच्या पुढे १ कि.मी वर दूंधेश्वर मंदीराला जाणारा कच्चा रस्ता आहे. तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जातो.
२) सटाणा - मालेगाव रस्त्यावर सटाण्यापासून १७ कि.मी व मालेगाव पासून २२ कि.मी वर लखमापूर गाव आहे. या गावापासून दुंधा किल्ला ७ कि मी अंतरावर आहे. दुंधा किल्ल्याच्या द्क्षीणेला "दुंधा-तळवडे" हे गाव आहे. लखमापुर ते दुंधातळवडे हे अंतर ७ कि.मी. आहे. तर दुंधातळवडेपासून २ कि.मी.वर दुंधा किल्ला आहे.
Dundha 2
सकाळच्या सत्रात बिष्टा आणि कर्‍हा पाहून आम्ही देवळाणे गावातील "जोगेश्वर मंदिर" पाहिले. अप्रतिम कोरीवकाम आणि बाह्यांग कामशिल्पाने नटवल्यामुळे मी या मंदिराला "महाराष्ट्राचे खजुराहो" म्हणेन. याच्याविषयी एक स्वतंत्र धागा पुढे लिहीनच. खुद्द देवळाणे गावातून पायी आपण दुंधा किल्ला गाठू शकतो. हे मंदिर बाराव्या शतकातील असावे असा अंदाज आहे. दुंधा किल्ल्याच्या आश्रयाने याची उभारणी झाली असेल तर दुंधा किल्लाही तितकाच प्राचीन असावा.
देवळाणेतून वायागाव, दुंधा मार्गे दुंधा गडाचा पायथा गाठला. दुंधा हे गावाचे नाव असले तरी ते या गडाचे पायथ्याचे गाव नाही किंवा गावातून गडावर थेट रस्ता नाही. नामपुर-लखमपुर रस्त्यावर दुंधा हे गाव आणि दुंधा गडावर जाणारा फाटा लागतो.
Dundha 3
फाट्यापासून अर्धा कि.मी. आत "आनंद आश्रम" हा आश्रम आहे.
Dundha 4
दुंधा गडाशेजारीच एक कमी उंचीची टेकडी आहे. गडाकडे येणारा रस्ता या टेकडीच्या कडेने येतो. या टेकडीला "नामसौंदाणे" असे नाव आहे. दुंधा किल्ला आणि हि टेकडी यांच्यामधील खिंडित देवळाणेकडून येणारी वाट मिळते.
Dundha 5
दुंधा किल्ल्याला स्थानिक लोक किल्ला म्हणून न ओळखता दुंधेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात. श्रावणी सोमवारी गडावर यात्रा भरते.
पुर्वी दुंधा किल्ल्यावर दुंधेश्वर महाराजांचे वास्तव्य होते. त्यांच्यावरुन या गडाला तसेच हे चारही किल्ले सामावणार्‍या रांगेला "दुंधेश्वर रांग" हे नाव पडले. बराच काळ महाराज गडावर रहायचे. नंतर मात्र महाराज पायथ्याशी रहायला आले. त्यांच्यासाठी गावकर्‍यांनी पायथ्याशी मंदिर बांधले. सध्या या मंदिरात "रामदास" नावाच्या महाराजांचे वास्तव्य असते.
Dundha 6
सध्या या मंदिरासमोरच मोठी पत्र्याची शेड बांधून येणार्‍या-जाणार्‍या भाविकांसाठी निवार्‍याची सोय करण्याचे काम चालू आहे. आम्ही अर्थातच ईथेच मुक्काम करण्याचे नक्की केले.
Dundha 7
दिवस जानेवारीचे असल्याने लवकरच अंधारून येणार होते. मात्र दुसर्‍या दिवशी अजमेरा बघून वाटेत जेवण करुन मुंबई-आग्रा या वर्दळीच्या महामार्गावरचा प्रवास आणि टोलनाक्यावरच्या कोंडीमुळे होणारा उशीर लक्षात घेउन आम्ही संध्याकाळीच गड पहाण्याचा निर्णय घेतला.
दुंधा किल्ल्याच्या पायथ्याच्या दुंधेश्वर महाराजांच्या देवळात दर्शन घेउन निघालो.
Dundha 8
या देवळांच्या बाजूला पाण्याची षटकोनी आकाराची विहीर असुन तिचे पाणी पिण्याकरता वापरतात.
Dundha 9
१९५१ मधे या विहीरीचे बांधकाम गावकर्‍यांनी श्रमदानातून केले.
Dundha 10

Dundha 11
मंदिराच्या समोरील भागात चार फुट उंचीचे चारही बाजूने कोरलेले दोन सुंदर विरगळ आहेत.
Dundha 27

बरोबर काही स्थानिक युवक आल्याने त्यांनी स्वताहून आम्हाला गड दाखविण्याची जबाबदारी घेतली. स्थानिक लोक बरोबर असले कि काहीतरी नवीन माहिती मिळते, एखादी कथा, घटना समजते हा फार मोठा फायदा असतो. आमच्या बरोबर होते श्री. मोहन कुवर ( 7875201394 ) आणि सुनिल अहिरे ( 8390573599 ).
Dundha 12
देवळाच्या बाजूने गडावर चढायची पायवाट आहे. वाटेच्या सुरवातीलाच गडाची माहिती देणारा फलक लावला होता.
Dundha 13
ही पायवाट गर्द झाडीतून जाते. १० मिनीटात आपण दगडात खोदलेल्या पायर्‍यांपाशी येतो.
Dundha 14
या कातळकोरीव पायर्‍यावरुन गडाचे प्राचीनत्व नक्की करता येते.
Dundha 15
पायर्‍या चढून माथावर निघालो कि तटबंदीचे अवशेष नजरेला पडतात.
Dundha 16
तटबंदीतील उध्वस्त दरवाज्याने आत गेल्यावर शंकर मंदिराजवळ येतो.
Dundha 17
येथे समोरच गोरखचिंचेचे दोन मोठी झाडे असुन या झाडांच्या सावलीत शंकराचे छोटे घुमटीवजा मंदिर व शेजारी एक दगडी इमारत उभी आहे.
Dundha 18
गोरखचिंच उर्फ बॅओबाब ह्या मुळ अफ्रिकन वृक्षाला या गडावर उगवलेले पाहून आश्चर्य वाटले. भारतात जरी याला गोरखचिंच म्हणले जात असले तरी याला चिंचा लागत नाहीत. ह्या जातीचे वृक्ष मी यापुर्वी जंजीर्‍याजवळ दंडा राजापुरीला, वाईजवळ मेणवलीला, पुण्यात बाजीराव रोडवर अभिनव कॉलेजच्या समोर पाहिले होते.
Dundha 19
मंदिराच्या मागे पाण्याचे छोट कुंड व शेजारी छोटासा बांधीव दगडी हौद आहे. या पाण्याला वास येत असल्याने ते पिण्यासाठी योग्य नाही. हे कुंड म्हणजे खांब सोडलेले पाण्याचे टाके असून आत एका खांबावर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे आणि सकाळच्या वेळी सुर्यकिरण आत पडल्यावर ती मुर्ती दिसते , असे बरोबर असलेल्या वाटाड्याने सांगितले. मात्र जत्रेच्या वेळी गडावर आलेल्या लोकांपैकी काही मुले या कुंडात पडली, त्यामुळे हे कुंड आता झाकून ठेवले आहे. सध्या या कुंडात वटवाघळांनी वस्ती केली आहे. आम्ही संध्याकाळी गडावर पोहचल्याने , त्यांची बाहेर पडायची वेळ झाली होती. टाक्यावरच्या लाकडी झाकणाला असलेल्या फटीतून वटवाघळे वेगाने बाहेर झेपावून आकाशात उडत होती.
Dundha 20
मंदिराकडे तोंड करुन उभ राहील्यावर उजव्या हाताला सध्या गडावर राहणार्‍या रामदास महाराजांचे घर दिसते. घरावरुन जाणारी पायवाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे जाते. पायवाटेच्या थोड्या खालच्या अंगाला कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील पाणी थंडगार व चवदार आहे.
Dundha 21
हे टाके देवटाके म्हणुन ओळखले जाते. त्यातील एका टाक्याचे पाणी थंडगार व चवदार आहे तर दुसरे टाके मात्र शेवाळलेले आहे.
आम्ही एक या देवटाक्याकडे निघालो असताना एक थरारक प्रसंग घडला. आमच्या ग्रुपमधील उमेश करवल हा सर्वात पुढे चालत होता. वाट गर्द झाडीतून आणि त्यातच सुर्य मावळायला आल्याने जेमतेम संधीप्रकाश होता. उमेश बर्‍यापैकी पुढे होता आणि त्याच्या मागे वाटाडे होते. अचानक उमेशच्या डाव्या बाजुने झाडीतून बिबट्याने झेप घेतली आणि उतारावरच्या गवतातून तो पसार झाला. उमेशला फक्त त्याचे मागचे पाय आणि शेपुट तेवढे दिसले. आमच्या सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. इथे बिबट्या असेल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळी बिष्ट्याला जाताना बिबट्याने अस्तित्व दाखवले होते तर आता प्रत्यक्ष दर्शन दिले होते. एकाच दिवसात दोन अनुभव. मोहन आणि सुनील या स्थानिक मुलांनाही बिबट्याच्या अस्तिस्वाने धक्का बसला. कारण आजपर्यंत गडावर त्यांना बिबट्या आल्याचे उदाहरण माहिती नव्हते. समोर उत्तरेला असलेली एक टेकडी त्यांनी दाखवली. वनखात्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनीकरण करुन हरीण, सांबर असे तृणभक्षी प्राणी तसेच लांडगे, बिबटे सोडलेत अशी माहिती दिली. कदाचित त्यातील एखादा बिबट्या ईकडे आला असावा.
येथुन थोडे पुढे गेल्यावर वाट खाली उतरताना दिसते. या ठिकाणी गडाचे दुसरे प्रवेशदार असण्याच्या खाणाखुणा दिसतात. वापरात नसलेल्या या वाटेने उतरणे धोकादायक आहे.
Dundha 22
या बाजुला खाली दरीत प्राचीन दगडी बांधणीचे हनुमान मंदिर पहायला मिळते. अर्थात वेळेअभावी आम्ही ते पहायला गेलो नाही.
Dundha 23
टाक्यातील पाणी पिऊन पुन्हा पायवाटेवर आल्यावर सरळ चालत, किल्ल्याच्या अर्ध्या डोंगराला वळसा घालून गेल्यावर दगडात खोदलेले पाण्याच टाक दिसत, १० फूट × ५फूट टाक्यातील पाण्यावर हिरव्यागार शेवाळ्याचा थर जमलेला असतो.
Dundha 24
येथून पुढे जाण्यासाठी पायवाट नसल्यामुळे आल्या वाटेने परत मंदिराजवळ यावे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताची पायवाट ५ मिनिटात दगडात खोदलेल्या टाक्यापाशी जाते, याला आंघोळीचे टाकं म्हणतात, येथून पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पुन्हा शंकर मंदीरापाशी यावं लागतं या मंदिराच्या मागून जाणारी पायवाट किल्ल्याचा माथ्यावर जाते. वरवर जाणाऱ्या या मधल्या पायवाटने दहा मिनिटात आपण गडावर ध्वजापाशी पोहोचतो पण वाटेत खुपच घसारा असल्याने जपून जावे लागते. तिथून आजूबाजूचा सर्व प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. इथेच थोड्या अडचणीत चुन्याचा घाणा पहायला मिळतो. हा सर्वोच्च माथा समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची २२८० फुट तर पायथ्यापासुन साधारण ९०० फुट आहे.
दुन्धा गडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो तर पायथ्यापासुन गडावर येण्यास अर्धा तास लागतो. माथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी-तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, कऱ्हा तसेच अजमेरा दिसतात. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. किल्ल्याचा डोंगर सुटा उभा असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा.
Dundha 25
बिबट्याचा थरार सोडला तर अतिशय रम्य अशा दुंधा गडाच्या माथ्याची सफर आनंददायी होती. लांबवर लखमापुर गावाचे दिवे टिमटिमत होते. अजून रात्रीचे जेवण शिजवायचे होते. त्याची कांदा कापण्यापासून सगळी तयारी करायची होती. बॅटरीच्या उजेडात आम्ही पायथा गाठला. जेवणावर आडवा हात मारून सगळ्या चिंता दुर सारून उघड्या पडवीतच मस्तपैकी ताणून दिली.
Dundha 26
( खानदेशाचा ब्रिटीशकालीन नकाशा )
या धाग्याबरोबरच खानदेशातील गडाची भटकंती थांबवणार आहे. या परिसरातील साल्हेर, मुल्हेर यांच्यावर पुढे लिहीन. आतापर्यंत ज्या किल्ल्यांवर धागे लिहीलेत, ते सोडून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणीचा किल्ला, कोंढवळचा भुईकोट जळगाव जिल्ह्यातील सातपुडा रांगेतील चौगावचा किल्ला, मांगीतुंगीजवळचे पिसोळ आणि रतनगड उर्फ न्हावी गड यांच्यावर लिहायचे बाकी आहे. त्यावर पुढे केव्हातरी नक्कीच लिहीन.
सध्या या मालिकेत खानदेशातून आपण मराठवाड्यातील गडकोट पहाणार आहोत. सुरवातीला औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगरी गड पाहून नंतर उत्तमोत्तम भुईकोटांची भ्रमंती करणार आहोत.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटिअर
२ ) दुर्गभ्रमंती नाशिकची:- अमित बोरोले
३ )शोध शिवछत्रपतिच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
४ ) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

13 Jul 2018 - 1:15 pm | कपिलमुनी

या गडाची इतिहासात कुठे नोण्द आहे ?

सटाण्याजवळच्या दुंधा, अजमेरा, कर्‍हा आणि बिष्टा या चारही किल्ल्यांचे ईतिहासात फार मोठे उल्लेख नाहीत. एकतर बागलाणातील साल्हेर, मुल्हेर सारखे बलदंड किल्ल्यांच्या तुलनेत हे गड दुय्यम म्हणायला हवेत. त्यात शिवकालात हे गड मोगलांकडेच राहिले. पुढे पेशवाइत किल्ल्यांचे महत्व संपल्याने या गडांचे उल्लेख फक्त मोगल कागदपत्रात दिसतात. या चारही गडांचा इतिहासाचा आढावा मी
अनवट किल्ले ३४ : बिष्टा ( Bishta )
इथे घेतला आहे. या चौकडीपैकी दुंधा हा सर्वात प्रेक्षणीय गड आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2018 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच अनवट आणि प्रेक्षणिय !

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Jul 2018 - 2:00 am | अमरेंद्र बाहुबली

मस्तच. पुन्हा एकदा वाचून सफर घडली. त्याच बरोबर खान्देशातील किल्ल्यांवरील लेख संपल्याचे वाईटही वाटले.

वरुण मोहिते's picture

15 Jul 2018 - 5:34 am | वरुण मोहिते

लिहीत आहात. मिपा वरची वाचनीय लेखमाला.

प्रचेतस's picture

16 Jul 2018 - 9:57 am | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.
तुम्ही उल्लेखलेले वीरगळाचे पहिले छायाचित्र हे बहुधा जैनांच्या चौमुखीचे असावे. जैन संथारा व्रत घेऊन प्रायोपवेशन करून प्राणत्याग करतात त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे बांधण्यात आले असावे. अशी चौमुखी मी अंजनेरीला पाहिली आहे. अर्थात इतर तिन्ही बाजूंचे कोरीव काम नीट पाहिल्यावरच ह्याबद्दल निश्चित काय ते सांगता येईल.

प्रतिसादाबध्दल धन्यवाद वल्लीदा ! मला या चौमुखीबध्दल कल्पना नाही. अधिक माहिती दिली तर बरे होईल. बाकी मी त्या स्तंभाची आणखी काही प्रकाशचित्रे काढलेली आहेत. ती इथे टाकतो, त्यावरुन काही निष्कर्ष काढता येतो का पहा.
Dundha 30

Dundha 31

Dundha 32

Dundha 34

जैन धर्मात संम्लेखन व्रताला फार महत्व आहे. स्व ओळखणे. अर्थात स्वतःच्या आत्म्याला शारीरबंंधनातून मुक्त करणे. म्हणजेच उपोषण करुन प्राणत्याग करणे. साधकाच्या ह्या व्रताच्या स्मरणार्थ अशा स्वरुपच्या चौमुख्या उभारल्या जातात. ह्या चारही बाजूंनी कोरीव असतात.
खालील चित्रातील डावीकडील वीरगळ असून उजवीकडील चौमुखी आहे. ह्यात दोन चौकटी असून वरच्या चौकटीत भगवान महावीर आहेत तर खालचे चौकटीत जैन साधक अन्नपाण्याचा त्याग करुन व्रताचे पालन करताना दाखवला आहे. साधकाचे खालचे बाजूस पूर्णपणे खराब झालेला असा अतिशय अस्पष्टसा शिलालेख आहे.

a

तुम्ही दिलेली अधिकची छायाचित्रे बघता ही चौमुखी वाटत नाही. हे बहुधा नंतरच्या काळातील वीरगळ सदृश स्मरणशिळा असावी. ह्यातील काही चौकटींवर हरीण वगैरे पशु देखील दिसत आहेत. अशाच प्रकारच्या प्राणी असलेल्या शिळा रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराच्या आसपास विखुरलेल्या आहेत.

दुर्गविहारी's picture

17 Jul 2018 - 10:56 am | दुर्गविहारी

चौमुखीच्या माहितीबध्दल धन्यवाद. याची आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही दिलेल्या प्रकाशचित्रातील चौमुखी कोठे पहायला मिळेल ?

प्रचेतस's picture

17 Jul 2018 - 12:42 pm | प्रचेतस

अंजनेरी गावातील जैन मंदिर संकुलात.

नेहेमीप्रमाणेच सुंदर लिखाण पण यावेळेस थरारक अनुभवाची जोड होती त्याला ..

दुर्गविहारी's picture

19 Jul 2018 - 5:11 pm | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार. उद्या पावसाळी भटकंतीमधे वारुगडाची माहितीचा धागा टाकेन.