स्टिकीन

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Apr 2018 - 4:48 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्टिकीन

१८८०च्या उन्हाळ्यात मी एका निमुळत्या कनूमधून फोर्ट रँगेलहून निघालो. मला वायव्य अलास्काच्या बर्फाळ प्रदेशाची पाहणी पूर्ण करायची होती. १८७९च्या हिवाळ्यात मला ही भटकंती अर्धवट सोडावी लागली होती. सगळे सामान, म्हणजे फार काही नाही, ब्लँकेट इ.इ. बोटीत चढल्यावर माझ्या इंडियन सोबत्यांचा निरोप समारंभ सुरु झाला. धक्क्यावर त्यांचे बरेच नातेवाईक आणि मित्रपरिवार त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यास जमा झाला होता. मी माझ्या मित्राची वाट पहात होतो. अखेरीस रेव्हरंड यंगसाहेबांचे आगमन झाले पण त्यांच्या मागे एक चिमुकला काळा कुत्राही धावत आला. त्याने लगेचच सामानात जेथे जागा होती तेथे आपले बस्तान मांडले. मला कुत्री आवडतात पण हे कुत्रे इतके छोटे आणि कुचकामी दिसत होते की मी त्याला घेऊन जाण्यास लगेचच विरोध केला.

‘‘ रेव्हरंड याला का घेतलाय बरोबर ? प्रवासात उपयोग तर दूरच, याचे आपल्याला ओझेच होईल. मला वाटते याला तुम्ही धक्क्यावरील एखाद्या इंडियनकडे सोपवलेला बरं. तो त्याला खेळण्यासाठी घरी घेऊन जाईल. मला वाटतं त्याचा तेवढाच उपयोग आहे. आपला या वेळचा प्रवास हा अशा खेळण्याला झेपणारा नाही. बिचारा पावसापाण्यात आणि बर्फात अनेक आठवडे भिजणार. त्याला लहान बाळासारखे कोण सांभाळणार ?’’

पण त्याच्या मालकाने त्याचे बरेच गुणगान गायले. ‘‘ जॉन हा कुत्रा म्हणजे एक आश्चर्य आहे, तो कितीही थंडी सहन करु शकतो, पोहण्यात सीललाही मागे टाकेल असा पोहतो. उपाशी राहण्यात आपण कोणी त्याचा हात धरु शकणार नाही याची मला खात्री आहे. त्या बाबतीत तो अस्वलालाही मागे टाकेल. त्याच्या इतका हुशार, तल्लख बुद्धीचा कुत्रा मी आजवर पाहिलेला नाही…इ.इ.इ…मी सांगतो आपल्या या चमू मधे हा कुत्रा सगळ्यांना भारी ठरेल !’’

मला नाही वाटत कोणाला त्याचे कूळ शोधता येईल. मी एवढी कुत्री पाहिली आहेत पण यात कुठल्याच जातीच्या खुणा मला दिसल्या नाही. हां ! एक मात्र आहे, त्याच्या हलक्या पावलाने तरंगत गेल्यासारखे चालण्याच्या लकबीने मला कोल्ह्याची मात्र तीव्रतेने आठवण आली. त्याचे पाय छोटे होते आणि त्या छोट्या पायावर त्याच्या शरीराचे मुटकुळं अगदी उठून दिसे. त्याची कातडी मऊ आणि केस लांब, रेशमी व थोडे कुरळे होते. जेव्हा त्याच्या मागून वारा सुटे तेव्हा त्याचे केस पार विस्कटून जात. त्यावेळी हा कुत्रा अगदीच वेडा गबाळा दिसे. पाहिल्या, पाहिल्या, त्याची डोळ्यात भरण्यासारखी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्याची डौलदार शेपटी. एखाद्या खारीच्या फुगलेल्या शेपटासारखी आणि गंमत म्हणजे त्यात तशाच रंगाच्या छटाही होत्या. शेपटी इतकी लांब होती की पार त्याच्या नाकापर्यंत पोहोचे. नीट पाहिले तरच त्याचे छोटे तीक्ष्ण कान व डोळे दिसत. डोळ्यावर असणार्‍या गडद रंगाचे ठिपक्यांनी तो थोडासा बनेल ही दिसे.. रे. यंगने मला सांगितले की हा कुत्रा त्‍याच्‍या पत्‍नीला स्‍टिका येथील एका खनीज उत्खनन करणार्‍या एका माणसाने भेट दिला होता. तेव्हा ते पिल्लू एखाद्या घुशी इतके छोटे होते. जेव्हा ते फोर्ट रँगेलला आले तेव्हा स्टिकीन इंडियन्सने त्याला सांभाळले होते आणि शुभशकुनाचे म्हणून त्यांच्या जमातीवरुन त्याचे नाव स्टिकीन ठेवले. थोड्याच काळात स्टिकीन सगळ्यांचा लाडका झाला. जिकडे जाईल तिकडे त्याचे कौतुक होत असे आणि इंडियन्सच्या स्वभावानुसार सगळ्यांनी त्याला देवाची देणगी म्हणून सांभाळले. शुभशकूनी होता ना तो !

आता आमच्या या प्रवासातही त्याने आपल्या स्वभावाचे दर्शन घडवलेच. तो कधीकधी फार विक्षिप्तपणे वागायचा तर कधी कधी एकदम गप्प बसायचा. त्यावेळी त्याला कोणीही बोलका करु शकत नसे. त्याला कितीही डिवचायचा प्रयत्न करा, तो शांतच राही. तो प्रत्येक वेळी काहीतरी स्वतंत्रपणे करत असे. कित्येक वेळा तो कोड्यात टाकणार्‍या गोष्टी करत असे, ज्याने माझे लक्ष त्याने वेधून घेतले. आठवड्या मागून आठवडे उलटले, आम्ही प्रवासात असंख्य ओढे ओलांडले, बेटांना वळसे घातले, डोंगरातून पाणी ओतणार्‍या नद्या ओलांडल्या पण या कुत्र्याने कधीही भुंकून गोंधळ घातला नाही. ज्या दिवशी प्रवासात काही विशेष घडत नसे त्यादिवशी हा कुत्रा बोटीत जगाकडे दुर्लक्ष करुन निवांत पडत असे, जणू काही तो गाढ झोपला आहे. पण मला शंका आहे त्याला बोटीत आणि आजूबाजूला काय चालले आहे हे कळत होते. किनार्‍यावर जेव्हा काही इंडियन बदकाची किंवा सीलची शिकार करण्यासाठी जात तेव्हा ते जाण्याआधीच तो बोटीच्या काठावर हनुवटी टेकवून पेंगुळलेल्या डोळ्यांनी बाहेर पहात बसे. ते पाहिल्यावर मला कंटाळलेल्या पर्यटकांची आठवण आल्याशिवाय रहात नसे. जेव्हा त्‍याच्‍या कानावर आमची किनार्‍यावर उतरण्याची चर्चा पडे तेव्हा मला शंका आहे, त्याला ते कळायचे कारण तो लगेचच उठून आम्ही कुठल्या प्रकारच्या किनार्‍यावर उतरणार आहे हे उठून पाही व बाहेर उडी मारण्याची तयारी करे. किनारा आला की तो पाण्यात उडी मारे व पोहत आमच्या अगोदर किनार्‍यावर उतरे. किनार्‍यावर मग स्वारी अंग जोरजोरात अंग हलवून खार्‍या पाण्याचा निचरा करुन जंगलात शिकारीसाठी नाहिसा होत असे. हा सगळ्यांच्या आधी किनार्‍यावर उतरायचा पण बोटीवर मात्र सगळ्यात शेवटी चढायचा. आम्ही जेव्हा किनार्‍यावरुन परतण्याची तयारी करत असू तेव्हा ही स्वारी गायब असायची. आम्ही त्‍याला हाका मारुन मारुन दमत असे पण हा पठ्ठ्या काही येत नसे. नंतर नंतर आम्हाला कळून चुकले की हा आम्ही बोलवल्यावर येत नसे पण हकलबेरीच्या झाडाझुडपांआडून काय चालले आहे ते पहात असणार. कारण आम्ही कंटाळून बोट पाण्यात ढकलली की हा प्राणी कुठून तरी येत असे व पाण्यात उडी मारुन आमच्या बोटी मागे पोहत येत असे. जणू त्याला खात्री होती की आम्ही वल्हवण्याचे थांबून त्याला बोटीवर घेऊ. हा उडाणटप्पू बोटी शेजारी आला की त्याची मानगूट धरुन कोणीतरी त्याला वर उचलत असे व पाणी निथळण्यासाठी त्याला तसेच बोटी बाहेर धरत असे व मग आत फेकत असे. त्याची ही खोड मोडण्यासाठी आम्ही एकदा त्याला बोटीवर घेतलेच नाही व तसेच बोट वल्हवत राहिलो जेणेकरून त्याला असे केल्यास जास्त पोहायला लागते हे कळेल पण त्याचा उपयोग झाला नाही कारण जेवढे जास्त पोहायला मिळे तेवढा तो जास्तच खूष होई.

आळशीपणात त्याचा हात या अख्ख्या जगात कोणी धरला नसता, तरी हिंडायला किंवा शिकारीला जाताना तो कायम उत्साही व तयार असे. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतक्या अंधार्‍या रात्री एकदा आम्ही रात्री १० वाजता एका किनार्‍यावर उतरलो. ही जागा सालमन माशांच्या झुंडी ज्यात पोहोत होत्या अशा प्रवाहाच्या तोंडाशी होती. पाण्यातील फॉस्पोरसमुळे पाणी प्रकाश फेकत होते. सालमन सळसळत पाण्यात पळत होते. लाखो माशांच्या लाख लाख चंदेरी शेपट्या पाणी घुसळून काढत होत्या. तो सगळा प्रवाहच चांदीसारखा चमकत होता. त्या गडद अंधारात ते सगळे दृष्य डोळ्याचे पारणे फेडत होते. हे विलोभनीय दृष्य अजून चांगले दिसावे म्हणून मी एका इंडियनला बरोबर घेतले व बोटीतून त्‍या प्रवाहामधून पुढच्या खळखळाटापर्यंत जाण्यासाठी निघालो. मला वाटले त्या उसळणार्‍या पाण्‍यात हे दृष्‍य फारच भन्‍नाट दिसेल. आणि तसे ते दिसलेही. माझ्या बरोबर आलेला इंडियन ते सळसळणारे मासे पकडण्यात गर्क असताना मी प्रवाहाच्या दिशेला नजर टाकली. एक धुमकेतूच्या आकाराचे काहीतरी आमच्याच मागे मागे येत होते. त्याच्या मागे धुमकेतूचा असतो तसा प्रकाशाचा पिसाराही दिसत होता. मला वाटले एखादा भयंकर प्राणी अमच्यावर हल्ला करायला येतोय. मी इंडियनला सावध केले व नीट पाहिले तर त्या प्राण्याचे डोळेही चमकलेले मला दिसले. आता हा भयंकर प्राणी काय करतोय असा विचार माझ्या मनात आला तेवढ्यात मला तो प्राणी पूर्ण दिसला. स्टिकीन होता तो !. मी मुक्कामाच्या जागेवरुन निघताना त्याने पाहिले होते व आम्ही काय करतोय हे पाहण्यासाठी गुपचूप आमच्या मागे पोहत त्याने आम्हाला गाठले होते.

आम्ही जेव्हा जरा लवकरच तंबू ठोकत असू तेव्हा आमच्यातील सगळ्यात चांगला शिकारी पटकन जंगलात शिकारीसाठी एखादे हरीण मिळते आहे का ते पाहण्यासाठी शिरे. स्टिकीनला त्याचा वास लागताच तो त्याच्या मागे पळे. किंबहुना जंगलात बंदुक घेऊन कोण जातंय याची तो वाटच पहात असे. मी सांगतोय ते तुम्हाला विचित्र वाटेल किंवा तुमचा कदाचित विश्र्वासही बसणार नाही पण मी कधीच हातात बंदुक घेऊन चक्कर मारण्यास जात नसे पण मी निघालो की स्टिकीन सगळ्यांना सोडून, हो ! त्याच्या मालकालाही सोडून माझ्या बरोबरच येत असे. ज्या दिवशी हवा वादळी असे व बोट वल्हवणे शक्य नसे त्या दिवशी मी जंगलात किंवा एखाद्या टेकडीवर मुक्काम टाके व जंगलात अभ्यास करण्यासाठी फेरफटका मारण्यास जाई. त्यावेळेस स्टिकीन नेहमीच माझ्या बरोबर येई मग हवा कितीही खराब असो, बर्फ पडत असो, पाऊस पडत असो. करवंदांच्या जाळ्यातून, पॅनॅक्स व रबसच्या काटेरी जाळ्यातून एखाद्या कोल्ह्यासारखा तो हलक्या पावलाने तरंगत पळत असे. फार क्वचित त्या झाडांवरील पाणी त्याच्यामुळे खाली सांडत असे. बर्फ तुडवत, धडपडत, बर्फाळ पाण्यातून पोहत, या ओंडक्यावरुन त्या ओंडक्यावर उड्या मारत, बर्फात पडलेल्या भेगांवरुन उड्या मारत एखाद्या कसलेल्या गिर्यारोहकाच्या धीराने, चिकाटीने, निराश न होता तो माझ्या मागे पळत असे. एकदा तो माझ्यामागे एका हिमनदीवर चालत असताना बिचार्‍याचे तळपाय बर्फाच्‍या टोकदार काट्‍यांनी कापले गेले. त्‍याच्‍या प्रत्येक पावलाबरोबर त्याच्या पायाचा रक्ताळलेला ठसा बर्फात उमटू लागला. पण एखाद्या इंडियनसारखा तो चिकाटीने माझ्या मागे येत राहिला. त्याची किंव येऊन मी त्याच्या पंज्यांना माझे हातरुमाल बांधले. कितीही संकट आले किंवा अडथळा आला तरी त्याने कधीच माझी मदत मागितली नाही. किंवा उंऽऽउंऽ ही केले नाही. किंवा कधी कसली तक्रारही केली नाही. एखाद्या तत्वज्ञानी माणसाला समजलेले असते त्या प्रमाणे त्याला बहुधा समजले होते की आनंद मिळवायचा असेल तर कष्ट हे उपसायलाच लागतात.

हे सगळे खरे असले तरी स्टिकीनचा खरा उपयोग आमच्यापैकी कोणालाच कळला नव्हता असेच म्हणावे लागेल. तो कुठल्याही संकटाला काही कारण नसताना, विचार न करता सामोरे जात असे आणि तेही त्याच्या मनाप्रमाणे. त्याने कधीही आमची आज्ञा ऐकली नाही आणि आमच्यापैकी कोणताही शिकारी त्याला शिकारीच्या मागावर सोडू शकला नाही ना त्याने टिपलेला पक्षी आणायला सांगू शकला नाही हे सत्य आहे. त्याची स्थितप्रज्ञता कधी ढळलेली मी पाहिली नाही. कधी कधी वाटे त्याला काही भावना अहेत का नाही ! साध्यासुध्या वादळाचा तो आनंद लुटे आणि पावसाबद्दल म्हणाल तर जशी रोपे पावसाळ्यात तरारुन उठतात तसा तो प्रफुल्लित होऊन चेकाळे. तुम्ही कितीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्याने शेपूट हलविण्यापलिकडे काही भावना व्यक्त केलेल्या मला आठवत नाही. वरवर तो हिमनगासारखा थंड वाटे व गंमतीजमतींपासून अलिप्त राही. परंतु या धाडसी, हुशार, निर्भय, कुत्र्याच्या थंड स्वभावामागे आमची दोस्ती होऊ शकेल असेल असे काहीतरी असेल म्हणून मी त्याच्याशी दोस्ती करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. मी सांगतो म्हातारे मॅस्टिफ आणि अनुभवी बुलडॉगही याच्या इतके अलिप्त राहू शकणार नाहीत. त्याला पाहिल्यावर मला वाळवंटातील स्थितप्रज्ञ, छोट्या कॅक्टसचीच आठवण येते. कितीही वाळूची वादळे येऊ देत कॅक्टसच्या खिजगणतीतही नसते ते वादळ ! स्टिकीननेही कधी आनंदाने शेपूट हलविली नाही ना इतर कुत्र्यांसारखा तो तुमच्याकडे प्रेमाच्या अपेक्षेने पाही. त्याच्याकडे पाहिल्यावर मला तर वाटायचे की त्याची फक्त एकच इच्छा असावी, ‘‘मला एकट्याला राहू दे !’’ खरा निसर्गपूत्र खरा ! त्याच्या जीवनाचे सगळे सार निसर्गाच्या गुढ शांततेत दडलेले असावे. निसर्गातील टेकड्यांइतका जूना आणि तेवढाच सळसळता चिरतरुण त्याचा मूळ स्वभाव त्याच्या डोळ्यात उमटत असे.. त्या डोळ्यात डोकावून पाहण्याचा मला कधीच कंटाळा आला नाही. त्याच्या डोळ्यात पाहणे म्हणजे एखाद्या निसर्गचित्रात डोकावून पाहण्यासारखे होते पण प्रत्यक्षात त्याचे डोळे छोटे आणि एखाद्या डोहासारखे खोल होते. डोह ! ज्यात काहीही स्पष्ट दिसत नाही. माझ्या अभ्यासात मला प्राण्यांच्या आणि झाडांच्या डोळ्यात पाहणे नवीन नव्हते पण या प्राण्याच्या डोळ्यात मला फार लक्ष देऊन पाहायला लागत असे. मनुष्यप्राणी सोडून इतर प्राण्यांमधे लपलेली बुद्धिमत्ता जोपर्यंत एखाद्या प्रसंगात आपल्या समोर येत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही हेच खरे. संत आणि कुत्री हे अनेक प्रसंगांना तोंड देत, त्या प्रसंगातून तावूनसुलाखून बाहेर पडल्यावरच ते परिपूर्ण होतात यावर माझा विश्र्वास आहे.

सुम डुम आणि ताकूच्या उंच कड्यामधून वाहणार्‍या खाड्‍यांचा अभ्‍यास केल्‍यावर आमची बोट स्‍टिफनच्‍या खिडीतून लिनच्‍या कॅनॉलमधे शिरली. त्‍यानंतर आयसी स्ट्रेट मधून क्रॉस साऊंड मधे आम्ही जेथे कोणी मनुष्य पोहोचला नाही अशा दर्‍यांमधील ठिकाणांचा शोध घेतला. ही जागा फेअरवेदर रेंजच्‍या बर्फाळ डोंगरांमधे शिरणार्‍या समुद्रापाशी आहे. या ठिकाणी आम्हाला उधाणाची योग्य दिशा मिळाली खरी पण त्‍याचबरोबर ग्‍लॅशियर बेमधील समुद्राला मिळणार्‍या मोठमोठ्‍या हिमनगांचे आरमारही आमच्‍या सोबत प्रवास करत होते. आम्‍ही हळूहळू वल्‍हवत व्‍हॅनक्‍युअर पॉईंट व विंबल्‍डनला वळसा मारला. केप स्पेन्सर नंतर तर आमची नाजूक बोट हवेवर पिसाने हेलकावे खावे तशी त्या पाण्यात हेलकावे खात होती. पुढे कित्येक मैल आमचा आवाज आकाशाला गवसणी घालणार्‍या उंच कड्यांनी वेढला गेला. या कड्‍यांवर आदळणार्‍या लाटांचा आवाज छातीत धडकी भरवत होता. एकंदरीत सगळे दृष्‍य भितीदायकच होते. आमच्‍या बोटीला काही झाले असते तर किनार्‍यावर उतरण्‍याचा काही प्रश्नच नव्‍हता कारण ते सरळसोट सुळके पाण्‍यामधे खोलवर उतरले होते. आम्‍ही मोठ्‍या उत्‍सुकतेने उत्‍तरेकडील काठ न्‍याहाळत चाललो होतो. कुठे बोट लावता येईल का हे पहात होतो. आम्‍ही त्‍या सुळक्‍यांबद्दल चर्चा करत असताना स्‍टिकीन मात्र शांतपणे त्‍या सुळक्‍याकडे त्‍याच्‍या मिचमिच्‍या डोळ्‍यांनी पहात बसला होता. शेवटी एकदाची जेथे समुद्राचे पाणी आत घुसले होते ती जागा दिसली. आता त्‍या जागेला टेलर बे असे नाव आहे. संध्‍याकाळी साधारणत: ५ वाजता आम्‍ही त्‍या मुखापाशी पोहोचलो आणि एका अवाढव्य हिमनदीच्या समोर, स्प्रुसच्या बनात मुक्काम टाकला.

तंबू उभा करायची तयारी चालू असताना ज्यो नावाचा एक शिकारी पूर्वेची भिंत चढून डोंगरावर गेला. तो तेथे रात्रीच्या जेवणासाठी एखादी जंगली मेंढी मिळते का ते बघणार होता. मी आणि रे. यंग हिमनदीकडे गेलो. आमच्या लक्षात आले की ती हिमनदी पाण्यापासून तिच्या प्रवाहाने वाहून आणलेल्या रेताड मुरुमासारख्या मातीने वेगळी झाली होती. ज्या सुळक्यांच्या भिंती होत्या तेवढ्या लांबीएवढी ही रेताड, घसरडी माती पसरली होती. तिची लांबी जवळजवळ असेल तीन मैल. पण सगळ्यात महत्वाचा शोध आम्हाला लागला तो म्हणजे ती नुकतीच पुढेपर्यंत पसरली होती आणि परत मागे गेली होती. हिमनदीच्या टोकाला ती माती वाहत्या बर्फाने नांगरली गेली होती आणि तिच्यात असलेली झाडे अस्ताव्यस्त उखडली गेली होती. बरीचशी झाडे मुळापासून उन्मळून पडली होती तर काही गाडली गेली होती. कित्येक झाडे बर्फाच्या सुळक्यावरुन खाली कलली होती आणि केव्हाही उन्मळून पडतील अशी त्यांची अवस्था होती तर काही बर्फाच्या आधाराने भक्कमपणे पाय रोवून अजून उभी होती. जी झाडे उभी होती त्यांच्या माथ्यावर बर्फाचे उंच मिनार तयार झाले होते. झांडांवर आकाशाला टेकणार्‍या निमुळत्या सुळक्यांना त्या प्राचीन वृक्षांच्या फांद्या जवळजवळ टेकल्या होत्या. ते दृष्‍य मला तरी फारच आगळे वेगळे वाटले. मी जेव्‍हा त्‍या हिमनदीवर पश्‍चिम बाजूने चढून गेलो तव्‍हा मला आढळले की ती खूपच फुगली होती व तिच्‍या किनार्‍यावरील झाडांना तिने कवेत घेतले होते.

ही प्राथमिक टेहळणी केल्‍यानंतर मुक्‍कामाला परत जातानाच मी उद्यासाठी त्‍या हिमनदीवर अजून खोलवर शिरण्‍याची योजना मनात आखली. मला दुसर्‍या दिवशी पहाटेच जाग आली. काल पाहिलेल्या दृष्यं डोळ्यासमोर होतीच पण मुख्य कारण होते वादळाच्या भयानक आवाज. वार्‍याने उत्‍तरेकडून बर्फाचे वादळ आणले होते तर खाली पावसाच्‍या ढगांनी पावसाच्‍या सरीवर सरी पाठवून पूर आणला होता जणू काही जगबुडीच येणार होती. ओढे भरभरुन वहात होते व त्‍याचे पाणी किनार्‍यावर चढले होते. पण मुख्‍य म्‍हणजे असंख्‍य नवीन ओढे, प्रवाह तयार झाले व एखादा समुद्रच जमिनीवर पसरल्याचा भास होत होता. पाण्याचा रौद्र आवाज व फेसाळलेले पाणी वाट मिळेल तिकडे घुसत होते. मी कॉफी करणार होतो व थोडेसे खाऊनही घेणार होतो पण वादळ पाहिल्यावर मात्र मी विचार बदलला. कारण निसर्ग त्याचे सगळ्यात महत्वाचे धडे त्याच्या रौद्र रुपातच शिकवतो आणि जर थोडी काळजी घेतली तर आपण त्या वादळाबरोबर निसर्गात हिंडू फिरु शकतो, त्याच्याबरोबर आपले नाते प्रस्थापित करु शकतो. आपणही नॉर्डिक दर्यावर्द्यांसारखे गाऊ शकतो, ‘‘फुटणारी वादळे आमच्या वल्ह्यांना जोर देतात तर चक्रीवादळ आमचा चाकर आहे आणि आम्हाला पाहिजे तेथे घेऊन जाणे त्याचे काम आहे.’’ थोडक्यात मी काही उगीचच धोका पत्करण्यांपैकी नाही पण मी कशाला घाबरतही नाही. मी माझ्या समोरचा ब्रेड खिशात टाकला आणि पटकन बाहेर पडलो.

रे. यंग आणि इतर इंडियन्स अजून झोपले होते आणि स्टिकीनही झोपलेला असेल असे मला वाटले. पण मी काही यर्ड गेलो असेन नसेन, त्याने आपले तंबूतील अंथरुण सोडले. त्या वादळातून वाट काढली व माझ्या मागे आला. आता माणसाला वादळाचे आकर्षण वाटावे, त्यात भाग घेऊन त्याने धाडस दाखवावे, मुसळधार पावसाचे आणि वादळी वार्‍याचे संगीत ऐकावे, किंवा निसर्गाचा अभ्‍यास करावा, हे मी समजू शकतो पण या असल्‍या वादळाचे या छोट्‍या कुत्र्याला काय आकर्षण वाटले असेल हे माझ्या आकलनाच्या पलिकडचे होते. पण तो माझ्या मागे आला, कसलीही न्याहरी न करता, श्र्वास गुदमवणार्‍या वादळी वार्‍याला तोंड देत मागे मागे आला. मी थांबलो व त्याला परत पाठविण्याच खूप प्रयत्न केला.

‘‘बास्स ! आता पुढे येऊ नकोस’’ मी त्याला वादळात ऐकू यावे म्हणून ओरडलो. ‘‘स्टिकीन ! तुझ्या डोक्यात हे काय भलतेच शिरलंय ? तुला वेड लागलंय. या वादळात तुझ्यासाठी काहीच नाही. एखादा ससाही तुला मिळायचा नाही. वादळाशिवाय आज येथे काही नाही. तंबूत परत जा आणि उबेत मस्त झोप. तुझ्या मालकाबरोबर न्याहरी कर. जरा शहाण्यासारखा वाग ! स्टिकीन. मी तुला बरोबर नेणार नाही. हे वादळ तुला ठार मारेल !’’

पण निसर्गाचे वेड जसे माणसाला असते तसे कुत्र्यांनाही असावे. तोच माणसाला आणि बहुधा कुत्र्यालाही त्याला पाहिजे तसे वागण्यास उद्युक्त करतो. आपल्याला, कितीही खडतर रस्ता असला तरी मग आपण ठेचकाळत, तो सांगेल त्या रस्त्याने जात राहतो कारण निसर्गाला आपल्याला काही धडे द्‍यायचे असतात. मी बर्‍याच वेळा थांबलो, आरडाओरडा करुन पाहिला पण त्‍याला झिडकारणे काही मला जमले नाही. आता सांगा पृथ्वीला चंद्राला झिडकारणे शक्य आहे का ? मी एकदा त्‍याच्‍या मालकाला एका डोंगरावर असेच नेले होते आणि तेथे एका किरकोळ अपघातात बिचार्‍याचा खांदा निखळला होता आज त्‍याच्‍या कुत्र्याची पाळी दिसत होती. हा छोटा प्राणी तेथेच पावसात भिजत, लुकलुकत्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात होता आणि जणू सांगत होता, तुम्ही जाणार तेथे मी येणार आहे. काही झाले तरी !’’ मग मात्र मी त्याला परत पाठविण्याचा नाद सोडला व त्याला बरोबर येण्याची परवानगी दिली. त्याला एक ब्रेडचा तुकडा दिला.. यानंतर सुरुवात झाली अकराळ विकराळ निसर्गातील माझ्या आयुष्यातील सगळ्यात धाडसी सफरीची..

पुराचे पाणी वार्‍याने आमच्‍या चेहर्‍यावर फटकारे ओढत होते. आम्‍हाला अक्षरश: चाबकाने फोडून काढल्‍यासारखे आम्‍हाला झोडपून काढत होते. शेवटी आम्‍ही ग्‍लॅशियरच्‍या समोरील एका घळीत श्र्वास घेण्यासाठी व परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी थांबलो. माझा मुळ उद्देश ग्लॅशियरची पाहणी करण्याचा होता परंतु वार्‍याचा वेग उघड्‍यावर प्रचंड होता. आम्हाला अक्षरश: ढकलत होता. अशा वार्‍यात बर्फातील एखाद्‍या छोट्‍या भेगेच्‍या काठावरुन तोल सावरत उडी मारणेही धोक्‍याचे होते. पण माझा वादळाचा अभ्‍यास मात्र मस्त चालला होता. बर्‍याच बाबींची मी मनोमन नोंद करत होतो. त्‍या ग्‍लॅशियरच्‍या शेवटी अंदाजे ५०० फुट उंचीच्‍या खडकावर पाण्‍याचा प्रवाह गोठला होता. त्या खडकावर गोठल्यामुळे तो धबधबा पुढे झुकला होता. उत्तरेकडून वादळ घोंघावत ग्लॅशियरवरुन खाली आले पण ते आमच्या डोक्यावरुन जात असल्यामुळे आम्ही त्या रौद्र निसर्गाचा अनुभव घेऊ शकलो. ते वादळ कुठल्या मंत्राचे पठण करतंय, वादळाने उडविलेल्या ओल्या मातीचा वास, आणि दबत्या आवाजात ते आम्हाला काय सांगतंय हे सगळे आम्ही डोळे विस्फारुन अनुभवत होतो. जंगलातून फांद्या भिरभिरत आमच्याकडे उडून येत होत्या. त्या फांद्यातून आणि पानांतून वारा शिळ वाजवत होता, एवढेच काय वार्‍यावर उडणारे बर्फाचे छिलकेही आवाज करत होते. एखादे लावलेले वाद्य जसे कर्णमधूर आवाज काढते तसेच हे सगळे आवाज मला वाटत होते. ग्‍लॅशियरच्‍या कडेला असणार्‍या पाण्‍यातून बर्फाचे मोठमोठे हिमनग, एकमेकांना हाका मारत, आरडाओरड करत, वरची थंडी न सोसल्‍यामुळे समुद्राच्या उबदार पाण्याकडे सर्व शक्तीनिशी गडगडत धाव घेत होते. त्या हिमनगांमुळे काही खडकही आपल्या जागेवरुन सुटून त्यांच्याबरोबर खाली येत होते.

आम्ही ज्या आसर्‍याला उभे होतो त्‍या जागेवरुन मी दक्षिणेकडे नजर टाकली. आमच्‍या डोक्‍यावर डाव्‍या बाजूला ते वाहणारे पाणी होते आणि त्‍याच्‍यावर दाट जंगल असलेला डोंगर. बर्फ जमलेले सुळके उजव्‍या बाजूला तर समोर धुरकट, कोंदट काहूरा. मी तो निसर्ग माझ्‍या रेखाटनाच्‍या वहीत बंदीस्‍त करण्‍याचा प्रयत्न केला पण वाऱ्याने आणि पावसाने माझा तो प्रयत्न उधळून लावला. जे काही तयार झाले त्याला मी काही रेखाटन म्हणणार नाही. वादळ थोडे ओसरल्यावर मी ग्लॅशियरच्या पूर्वेच्या बाजूची पाहणी केली. जंगलाच्या काठावर असलेल्या सर्व वृक्षांची वादळाने पार वाट लावली होती. जी काही झाडे उभी होती, त्यांच्या बुंध्यांवर बर्फाने उमटवलेले ओरखडे स्पष्ट दिसत होते. गेली हजारो वर्षे तग धरुन उभे असलेले हजारो वृक्ष जमिनदोस्त झाले होते तर काही त्या मार्गावर होते. बऱ्याच ठिकाणी मला पन्नास एक फुट खालचे दिसत होते. तेथे मी अचंबित करणारे दृष्य पाहिले. खडबडीत दगडी भिंती आणि पाण्यामधे सापडून दोन तीन फुट रुंदीचे ओंडके चक्क कापले जात होते, आणि काहींचा तर लगदा होत होता.

मी तीन मैल अंतरावर स्टिकीनसाठी त्या हिमनदीच्या बर्फाच्या पृष्ठभागावर माझ्या आईसॲक्सने पायऱ्या केल्या व तो भाग चढून गेलो. जेथेपर्यंत माझी नजर पोहोचत होती तेथपर्यंत आकाशाखाली ती हिमनदी पसरली होती. तिला हिमनदी म्हणावी की हिमनद म्हणावे असा प्रश्र्न मला पडला इतका त्याचा पसारा अवाढव्य होता. असे वाटत होते की त्या हिमनदीला अंतच नव्हता. पाऊस सुरुच होता फक्त त्याचे पाणी आता बर्फाइतकेच थंड होऊ लागले होते. त्या बर्फाळ पाण्याची मला विशेष काळजी वाटत नव्हती पण खाली ओथंबणारे ढग जेव्हा हिमासारखे दिसू लागले तेव्हा मात्र मी ठरवले की आता जमिनीपासून जास्त दूर जाण्यात अर्थ नाही. पश्र्चिम किनारा दिसतच नव्हता.. हे ढग जर खाली विसावले किंवा वाऱ्याने परत जोर धरला तर मला बर्फाला पडलेल्या तड्यांच्या जंजाळात सापडण्याची भीती वाटत होती. बर्फाचे स्फटीक म्हणजे ढगांची फुले. हा एक नाजूक सुंदर फुलांचा प्रकार आहे पण जेव्हा ही फुले वादळात वाऱ्यावर उडतात तेव्हा भयंकर रुप धारण करतात. गोठवणारी ही फुले दंश करतात. जेव्हा ती एकत्र होतात तेव्हा त्यांच्या हिमनद्या तयार होतात आणि त्यात खोल भेगा पडतात व बर्फात अनेक खाई तयार होतात. त्या तसल्या वातावरणात मी हळुवार पावलांनी त्या हिमफुलांच्या समुद्रावर फिरलो. साधारणत: एका मैलावर मला बर्फ बऱ्यापैकी निर्धोक वाटला. हिमनदीचा मधला भाग कधी कधी बाजूच्या भागांपेक्षा जास्त वेगाने धावतो तेव्हा मात्र त्या बर्फाला प्रचंड प्रमाणात भेगा पडतात. या येथे त्या अगदी अरुंद होत्या. काही भेगा अर्थातच मोठ्या होत्या पण त्याला मी वळसा मारुन जाऊ शकत होतो आणि शिवाय थोडीशी उघडीपही झाली.

या उघडिपीने धीर येऊन मी दुसऱ्या बाजूला जायला निघालो; निसर्ग शेवटी तुम्हाला त्याला पाहिजे ते करण्यास भाग पाडतो हेच खरं. सुरुवातीला आम्ही भरभर चालत होतो. आकाशही एवढे धोकादायक दिसत नव्हते. मी माझ्या कंपासने माझ्या दिशेची नोंद ठेवत होतो कारण जर परतावे लागले आणि जर तुफान आले तर अगदीच आंधळे व्हायला नको. पण ग्लॅशियरवरील खुणा याच माझ्या मुख्य मार्गदर्शक होत्या. पश्चिमेला आम्हाला अनेक भेगा पडलेला बर्फ लागला. ज्यावरुन आम्हाला उड्या मारुन त्या पार कराव्या लागल्या. शेवटी आडव्या पसरलेल्या मोठ्या भेगा लागल्या. त्यातील कित्येक वीस ते तीस फुट रुंद व हजार एक फुट तरी खोल असाव्यात. दिसण्यास त्या सुंदर पण त्याच वेळी भयंकर भीतीदायक होत्या. त्याच्या काठावरुन चालताना मी अत्यंत काळजीपूर्वक चालत होतो पण आमचे स्टिकीन महाराज एखाद्या ढगाप्रमाणे तरंगत माझ्या मागे येत होते. एखादी अरुंद भेग मी उडी मारुन पार करत असे व स्टिकीन तर ती सहज उडी मारुन पार करत होता. हवामान पटकन बदलत होते. धुरकट वातावरणातून मधून मधून आंधळे करणारा प्रकाश चमकत होता. जेव्हा सूर्य पूर्णपणे ढगातून बाहेर आला तेव्हा त्या हिमनदीच्या काठावरील सुळक्यांनी तेजाने झळकत आम्हाला दर्शन दिले. त्यांनी गळ्यात ढगांच्या माळा घातल्या होत्या तर खाली प्रचंड सपाटीवर हिमकणांची उमललेली फुले प्रकाशाने चमचम करीत होती. हे बघत असतानाच एकदम अंधार पसरे व ते दृष्य अंधारात बुडून जाई.

स्टिकीनला मात्र या प्रकाशाचे, अंधाराचे, घळींचे, बर्फाचे, किंवा तो ज्यात घसरु शकला असता अशा पाण्याच्या ओहोळांचे काहीही पडले नव्हते. त्याला मुळी कशाची भीतीच वाटत नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत नव्हती ना काळजी, ना आश्चर्य ना भीती. तो आपला त्या हिमनदीवर हुंदडत मजेत फिरत होता. एखाद्या बागेत फिरल्यासारखं ! त्याच्या शरीराचा जणू एक उड्या मारणारा चेंडूच झाला होता. त्याला बर्फातील घळींवरुन सहज उड्या मारताना बघणे हा एक प्रसन्न अनुभवच होता. तो खरोखरीच धाडसी होता का धोका काय आहे हे न कळल्यामुळे तो धाडस करत होता हे समजणे कठीण आहे. मी मात्र प्रत्येक वेळा त्याला सावध करत होतो. वेळोवेळी त्याच्यावर ओरडत होतो. मी त्याच्याबरोबर अनेक दौरे केले असल्यामुळे मला त्याच्याशी बोलण्याची सवयच लागली होती. मी बोलतो ते त्याला समजत असणार असा माझा विश्र्वास होता.

पश्चिम किनाऱ्यावर पोहोचण्यास आम्हाला अंदाजे तीन तास लागले असतील. या ठिकाणी हिमनदीचे पात्र साधारणत: सातएक मैल असेल. तेथे मी उत्तरेकडे वळलो मला फेअरवेदर माउंटनमधील धबधबे पहायचे होते, अर्थात ढग बाजूला सरले असते तर ! जंगलाच्या परिघावरुन चालणे तुलनेने बरेच सोपे होते पण त्या किनाऱ्यावरही वादळाने व फुगलेल्या हिमनदीने झाडांची धुळदाण उडवली होती. तासभर चालल्यावर आम्ही एक समुद्रात उतरलेला ताशीव कडा वरुन पार केला. आम्ही थबकलो. आम्ही त्या हिमनदीच्या एका फाट्यावर आलो होतो. तेथे दोन मैल रुंदीचा एक धबधबा आमच्या समोर उभा ठाकला. मुख्य पात्रावरुन तो पश्चिमेला पाणी ओतत असणार. आता मात्र त्या धबधब्याचे पाणी मधेच गोठले होते. गोठलेल्या क्षणी ज्या लाटा त्यात उठत होत्या त्या अजुनही तशाच होत्या तर काही बर्फाचे कडे तुटलेल्या अवस्थेत दिसत होते. प्रवाह खूपच खळखळता, उसळता व भयंकर असणार. त्या धबधब्याबरोबर तीन चार मैल चालल्यानंतर तो एका तलावात पडत असल्याचे मला दिसले. त्यातही त्याने मोठमोठ्या बर्फाच्या लाद्या आणून ओतल्या होत्या.

त्या तळ्याचे पाणी पुढे कुठे जाते आहे हे पाहण्याची मला खरे तर उत्सुकता होती पण दिवस ओसरला होता आणि शिवाय आकाशात चिन्हे काही ठीक दिसत नव्हती. दिवस मावळायच्या आत बर्फावरुन खाली उतरणे ठीक होते. मी पुढे जाण्याचा विचार मनातून काढून टाकला व त्या नयनरम्य, सुंदर देखाव्यावरुन नजर फिरवली व परतीचा रस्ता पकडला पण परत केव्हातरी या ठिकाणी जास्त वेळ काढायचे असे मनोमन ठरवूनच ! आम्ही चांगलीच चाल पकडली व लवकरच ग्लॅशियरच्या मुख्य भागावर आलो. आता पश्चिम किनारा दोन मैल तरी मागे राहिला असेल. येथे मात्र आम्हाला बर्फातील भेगांचे जाळेच लागले व ढगातूनही हिमाचे कण पडू लागले आणि थोड्याच वेळा हिमवर्षाव सुरु झाला. आता मात्र त्या हिमवर्षावात परतीची वाट सापडेल का ? या काळजीने मला त्रस्त केले. स्टिकीन मात्र घाबरलेला दिसत नव्हता. नेहमीप्रमाणे तो शांत होता. पण मी एक पाहिले होते की वादळ सुरु झाल्यानंतर जो आकाश झाकाळून टाकणारा अंधार पसरतो त्यात मात्र तो इकडे तिकडे न पळता माझ्या मागे, अगदी जवळून चालत असे. हिमवर्षावाने आम्हाला चालण्याची घाई केली पण आमची वाटही झाकून टाकली. मी घाईघाईने, शक्य असेल तेवढ्या वेगाने चालत होतो. प्रसंगी पळत उड्या मारत भेगा पार करत होतो, बर्फाच्या लाद्यांवरुन ढांगा टाकत चालत होतो. मला तेथून लवकर बाहेर पडायचे होते. दोन तास असे चालल्यावर आम्ही एका भल्या मोठ्या भेगेपाशी आलो. अगदी सरळ, पण खोल अशी ही छोटी दरी एखाद्या नांगराच्या फाळाने कापावी तशी दिसत होती. मी आता काळजीपूर्वक उडी मारण्याआधी माझ्या ॲक्सने भुसभुशीत बर्फात एक पायरी तयार करुन मग त्यावरुन उडी मारत होतो. कारण येथे फक्त एकच संधी मिळते. स्टिकीन अर्थातच विनासायास माझ्या मागे उड्या मारत येत होता.

असे बरेच अंतर काटल्यावर आम्ही जवळ जवळ पळायला लागलो कारण रात्री त्या ग्लॅशियरवर मुक्काम करण्याच्या कल्पनेनेच माझा थरकाप उडाला. स्टिकीनची मात्र कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची तयारी दिसत होती. जर तेथेच मुक्कम करावा लागला असता तर आम्ही एक रात्र त्या बर्फावर नाचत नाचत शरीरात उब निर्माण करुन राहू शकलो असतो, नाही असं नाही, पण आम्ही भिजलो होतो आणि आम्हाला भूकही लागली होती. वाऱ्यात अजूनही बर्फ उडत होता व थंडी मी म्हणत होती. रात्रीचा मुक्काम जरा अवघडच झाला असता. बर्फाच्या उडणाऱ्या कणांमुळे मला कुठली वाट कमी धोक्याची आहे हे समजत नव्हते. ढगातून मधे मधे ते सुळके दिसत होते पण त्यामुळे वातावरण अधिकच भीतीदायक वाटत होते. मी आपला वाऱ्याची दिशा पाहून आणि अंदाजाने वाट काढत होतो. प्रत्येक भेगेजवळ माझा कस लागत होता पण स्टिकीन आरामात माझ्या मागे येत होता. किंबहुना जशा अडचणी वाढल्या तसा त्याचा अत्मविश्र्वास मला वाढतोय की काय अशी शंका मला येऊ लागली. गिर्यारोहकांचेही असेच असते. जेवढ्या अडचणी, धोके जास्त तेवढा आत्मविश्र्वास जास्त. प्रत्येक भेग पार केली की आम्ही इच्छा करत असू की ही शेवटची असू देत पण भेगा जास्तच धोकादायक होत होत्या.

शेवटी आमची वाट एका सरळसोट आणि रुंद भेगेने अडवलीच. मी लगेचच त्याच्या काठावरुन उत्तरेकडे चालत जात कुठे ती पार करण्यासारखी जागा आहे का याची पाहणी केली. तेथे अशी जागा नाही म्हटल्यावर खालच्या बाजूला उतरलो. या अंदाजे दोन मैलांच्या अंतरात मला फक्त एकच जागा अशी सापडली की जेथे मी ती भेग पार करण्याचा विचार करु शकलो. पण उडीसाठी हे अंतर बरेच जास्त होते आणि पुढच्या बाजूला बर्फ भुसभुशीत होता. मला तो प्रयत्न करावासा वाटला नाही. पण एक फायदा होता तो म्हणजे माझी बाजू पलिकडील बाजूपेक्षा एक फुट तरी उंच होती. पण काहीही म्हणा ती रुंदी छातीत धडकी भरवणारी होती हे मात्र खरे. जेव्हा असली भेग लांबलचक आणि सरळसोट असते तेव्हा तुमचा तिच्या रुंदीचा अंदाज नेहमीच चुकतो हे मला चांगले माहीत होते. मी जरा पुढची बाजू नीट निरखून पाहिली व अंतराचा नीट अंदाज घेतला. शेवटी मी ती उडी मारु शकेन असा आत्मविश्र्वास मला आला पण त्याच वेळी परत मागे उडी मारण्याची वेळ आली तर ती मारता येईल का? ही खात्री माझे मन मला देईना. अनोख्या जागेवर पाऊल ठेवायचे तर त्या जागेहून परत पहिल्या ठिकाणी येता आले पाहिजे असा सर्व गिर्यारोहकांचा अलिखीत नियम असतो. मी खाली बसलो व शांतपणे हा नियम मोडायचा का नाही यावर गंभीरपणे विचार केला.

मी डोळे मिटले व डोळ्यासमोर सकाळच्या प्रवासाचा नकाशा आणला व त्यावर माझा मार्ग रेखाटला. माझ्या अंदाजाने आत्ता मी जेथे बसलो होतो ती जागा सकाळी मी जेथे ही भेग पार केली होती त्यापेक्षा दोन एक मैल वरच्या बाजूला होती. सगळ्यात वाईट म्हणजे ही जागा मी सकाळी पाहिलीच नव्हती. थोडक्यात मी परतीचा रस्ता चुकलो होतो. धोका पत्करुन ही उडी मारावी का पश्चिमेच्या काठावर असलेल्या जंजगलात घुसावे व तेथे मस्तपैकी शेकोटी पेटवून रात्र काढावी? असा प्रश्र्न मला छळू लागला. तसे केले असते तर फक्त भुकेशीच सामना करावा लागला असता. पण मी आत्ताच इतका दमलो होतो व इतका बर्फ तुडवला होता की त्या या असल्या वादळात त्या जंगलापर्यंत मी पोहोचू शकेन याची माझी मलाच खात्री देता येईना. पण त्या भेगेच्या पलिकडे दिसणारा प्रदेश मला तुलनेने सपाट वाटला. शिवाय मला वाटले की मी आता दोन्ही किनाऱ्यांच्या जवळपास मध्यभागी होतो. मी आहे त्या वाटेवरुन जायचे ठरवले पण ही एक भयंकर, भीती वाटणारी उडी माझ्या वाटेत ’आ’ वासून उभी होती. शेवटी पाठीमागे जाण्याच्या वाटेवरील संकंटांचा विचार केल्यावर मी धीर करुन उडी मारलीच. मी व्यवस्थित पण थोडासा धडपडत पलीकडे पोहोचलो आणि स्टिकीनही माझ्या मागोमाग आला. आता भीती पार पळाली होती पण हा आनंद थोडा वेळच टिकला कारण आम्ही शंभर एक यार्ड चाललो असू नसू, आमच्या समोर अजून एक पण जास्त रुंद व खोल भेग दत्त म्हणून उभी राहिली. मी ताबडतोब त्याची पाहणी करायला घेतली. मला खात्री होती की दोन्ही टोकाला कुठेतरी एखादी पार करण्यासाठी जागा सापडेल. वरच्या बाजूला साधारणत: अर्ध्या मैलावर ती भेग मी नुकतीच जी भेग पार केली होती त्याला मिळाली होती. मी परत मागे फिरलो व दुसऱ्या टोकाला काय आहे ते पाहण्यास मागे फिरलो. तेथेही ही भेग त्याच भेगेला मिळालेली पाहून मी हादरलोच. थोडक्यात काय, आम्ही आता दोन मैल लांबीच्या एका छोट्या बेटावर उभे होते आणि बर्फातील खोल खाईंनी वेढले गेलो होतो. आता सुटकेचे दोनच मार्ग होते ते म्हणजे आलेल्या मार्गाने परत जाणे किंवा जेथे जाणे अशक्य आहे अशा एका बर्फाच्या नैसर्गिक पूलावरुन ती भेग पार करणे. हा पूल अंदाजे त्या खाईच्या मध्यभागी असेल.

हा शोध लागताच मी खचलो व त्या पुलाच्या दिशेने पळालो व त्याचे अत्यंत बारकाईने निरिक्षण केले. हिमनदीच्या वेगवेगळ्या भागांचा वाहण्याचा वेग वेगवेगळा असल्यामुळे आणि खाली तळाशी जमिनीचा भाग कमी जास्त सखोल असल्यामुळे या भेगा तयार होतात. सुरवातीला प्रत्येक भेग ही इतकी बारीक असते की त्यात चाकूचे पातेही आत जाऊ शकत नाही. ही भेग हळूहळू मोठी होत जाते. आता काही ठिकाणे या भेगा सांधल्या जातात किंवा काही ठिकाणी भेगांच्या चिरफळ्या उडतात. अगदी लाकूड तोडतान जसे लाकडावे तुकडे एकमेकांना चिकटलेले राहतात तसे. काही भेगा या पुलाने जोडल्या जातात. जसा बर्फ वितळतो तशी भेगा मोठ्या होत जातात आणि हे पूल जे पहिल्यांदी चांगले भक्कम असतात त्याचा बर्फाचा एक जाड पापूद्रा होतो. मधला भाग वातावरणाला जास्त उघडा असल्यामुळे तो अधीक वितळतो झुलत्या पुलाचे दोरखंड जसे खाली वर्तुळाकार होत जातात अगदी तसेच. अतिशय धोकादायक असा हा प्रकार. माझ्या समोरचा हा पूल तसा बराच जुना दिसत होता कारण त्याची बरीच झीज झालेली दिसत होती. त्याखाली असलेली भेग जवळजवळ पन्नास फुट रुंद असावी आणि त्यावरील तिरक्या पूलाची लांबी असेल सत्तरएक फुट. मधला पातळ थर पृष्ठभागापासून अंदाजे २५ ते ३० फुट खाली होता व त्याची उलटी कमान दोन्ही बाजूला पृष्ठभागापासून अंदाजे आठ ते दहा फुट खाली जोडली गेली होती. हे आठफुट खाली उतरायचे आणि परत वरती चढायचे हे सगळ्यात कठीण काम होते कारण या भिंती अगदी ताशीव व सरळसोट होत्या. माझ्या पूर्वायुष्यातील भटकंतीत अनेक प्रसंग येऊन गेले पण एवढा भयानक कुठलाच नव्हता. आणि तो सुद्ध आम्ही भुकेलेले व ओलेचिंब असताना ओढवलेला होता. आकाश गडद झाले होते. बर्फ उडत होता आणि रात्र जवळ येत चालली होती. पण नाईलाजने आम्हाला या सगळ्यांना सामोरे जायला लागणार होते. त्याशिवाय गत्यंतरच नव्हते.

मी भेगेच्या कडेला पण जरा आतल्या बाजूला माझा गुडघा रोवता येईल एवढा मोठा खड्डा खोदला. मग खाली वाकून माझ्या छोट्या कुऱ्हाडीने १७ ते १८ इंच खाली एक पायरी खोदली. त्याच बरोबर हाताच्या पकडीसाठी एक खोबणही खोदली. ही पायरी जरा अरुंद होती पण चांगली झाली. आतल्या बाजुला थोडीशी उतरती असल्यामुळे माझ्या टाचांना त्या पायरीत चांगली पकड मिळत होती. मग त्या पायरी उतरुन मी माझी डावी बाजू भिंतीला लावली व खाली वाकून, वाऱ्याचा अंदाज घेत, तोल सावरत खाली माझ्या डाव्या हाताने आधार घेत, उजव्या हाताने पायऱ्या व खोबणी खोदत गेलो. खाली पूलापर्यंत पोहोचल्यावर मी तेथे एक उतरण्यासाठी ६ ते ८ इंचाची एक पायरी खोदली. अर्थात या पायरीवर तोल सांभाळत उभे राहून त्या पुलावर पाय ठेवणे ही एक अवघड कसरत होती. पूल पार करणे त्या मानाने सोपे काम होते. वर आलेली बर्फाची अणकुचीदार टोके कु़ऱ्हाडी ने हळुवारपणे सपाट करत, एक दोन इंच पुढे सरकायचे, असे करत मी गुडघ्यावर रांगत पुढे गेलो. मी खाली बघत नव्हतो ना आजुबाजूला. समोरचा निळसर बर्फ एवढेच काय ते मला दिसत होते. अशा तऱ्हेने पूल पार करुन मी सगळ्यात अवघड काम सुरु केले, ते म्हणजे समोरच्या भिंतीत पायऱ्या खोदण्याचे. पायरी खोदायची, खोबण खोदायची आणि त्याच्या आधाराने, घोंघावणाऱ्या वाऱ्यात उभे राहून वरची पायरी खोदायची. अशावेळी तुमचे शरीरच तुमची दृष्टी होते आणि कोणास ठाऊक कसे तुमच्या अंगात १०० हत्तींचे बळ संचारते. आजवर एवढ्या तणावात मी कधीच राहिलो नव्हतो. मी ते धाडस कसे केले, हे आता सांगू शकत नाही. मला तर वाटते कोणीतरी ते माझ्याकडून करवून घेतले असणार. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात मृत्युचा तिरस्कार कधीच केला नाही. पण कधी कधी डोंगर दऱ्यातून फिरताना माझ्या मनात अशा डोंगरात हिंडताना, फिरतानाच मृत्यु यावा, किंवा एखाद्या हिमनदीवर यावा, आजारी पडून किंवा किरकोळ अपघातात नको असा विचार आला आहे, किंबहुना मी तशी परमेश्र्वराकडे प्रार्थनाही केली आहे बरेचदा ! पण असा मृत्यु समोर उभा ठाकला की त्याला सामोरे जाणे फार कठीण असते हे मी आता अनुभवाने सांगू शकतो. अगदी तुम्ही परिपूर्ण, आनंदी आयुष्य जगला असलात तरीही..

पण आमच्या बिचाऱ्या स्टिकीनची काय अवस्था झाली असेल त्याचा विचार करा ! मी जेव्हा माझ्या पहिल्या खड्ड्यात गुडघा रोवून खाली वाकून खोदत होतो तेव्हा या बिचाऱ्या छोट्या कुत्र्याने माझ्या खांद्यावरुन त्याचे डोके खुपसून, वाकून खाली काय चालले आहे ते पाहिले. त्याने त्याच्या गुढगर्भित डोळ्यांनी तो खालचा चमकणारा बर्फ पाहिला आणि मग त्याने माझ्या नजरेला नजर दिली, खालच्या स्वरात जरा गुरगुरला व जणू विचारले, ‘‘ तू इथून उतरणार आहेस? या खाईत उतरणार आहेस ?’’ ही पहिली वेळ होती जेव्हा मी त्याला खाईत स्वत:हून डोकावून पाहताना पाहिले. माझ्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यात अविश्र्वास उमटलेला मला स्पष्ट दिसला. त्याला त्या खाईचा धोका जाणवला हेच त्याच्या शहाणपणाचे लक्षण होते. आजपर्यंत बर्फावर घसरणे किंवा त्यात काही धोका असतो हे त्याच्या खिजगणीतही नव्हते. त्याच्या डोळ्यात उतरलेली भीती आणि आवजातील फरक मला इतका जाणवला की मी त्याच्याशी एखाद्या घाबरलेल्या लहान मुलाबरोबर बोलतात तसा बोलू लागलो. मला त्याला शांत करायचे होते कदाचित माझीही भीती त्यामुळे कमी झाली असेल काय माहीत…‘‘ मनातील भीती काढून टाक पोरा ! जरी अवघड असले तरी आपण पलीकडे सुखरुप जाणार आहोत. जगात कुठलीही वाट सोपी नसते. जास्तीत जास्त काय होईल ? आपण घसरुन खाली खाईत पडू पण एक फायदा लक्षात घे. असले भारी थडगे सोम्यागोम्यांच्या नशिबी नसते आणि जेव्हा बर्फ वितळेल तेव्हा आपली हाडे त्या मातीत मिसळून जातील.’’

पण माझ्या या उपदेशाने त्याला काही धीर आलेला दिसला नाही. तो रडू लागला. त्याने एक नजर त्या हिमनदीवर टाकली आणि तो सैरावैरा पळू लागला. त्याला बहुधा दुसरीकडे कुठंतरी ती भेग पार करता येते का हे बघायचे असावे. तो जेव्हा इकडे तिकडे पळून, गोंधळून परत जागेवर येई तेव्हा माझी एखादी पायरी खोदून झालेली असायची. मला मागे वळून बघणे शक्यच नव्हते पण मी त्याला ऐकू शकत होतो. जेव्हा मी आता या पूलावरुन जाणार आहे याची त्याला खात्री पटली तेव्हा मात्र त्याने निराशेने मोठ्या आवाजात रडण्यास सुरुवात केली. ते सगळे दृष्य कोणाच्याही छातीत धडकी भरवणारेच होते पण ते तसे आहे हे कळण्याची बुद्धिमत्ता एवढ्या छोट्या प्राण्याकडे होती हे मात्र मला विशेष वाटले. कुठल्याही अनुभवी गिर्यारोहकालाही हा धोका एवढ्या पटकन ओळखता आला नसता. मलाही आला नव्हता.

मी पलिकडे पोहोचलो आणि मग मात्र तो किंचाळू लागला. पुढे मागे पळून तो परत परत त्या उतरण्याच्या जागेवर येई व मोठ्याने गळा काढे. बहुधा त्याला मृत्युची चाहूल लागली असावी. तो शांत, अलिप्त स्टिकीन हाच का ? असा प्रश्र्न मला पडला. मी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ओरडलो. त्याला सांगितले की पूल दिसतो तेवढा धोकादायक नाही, तू सहज पार करु शकशील पण तो प्रयत्न करण्यासच घाबरत होता. हे शहाणपण त्याच्यात कुठून आले ? मी परत परत त्याला बोलवत होतो, चुचकारत होतो. त्याला सांगत होतो की एकदाच प्रयत्न कर ! तो पुढे आला, त्याने खाली पाहिले आणि परत एकदा केकाटला व खाली लोळण घेतली.. जणू तो म्हणत होता, ‘‘उं..उंऽऽऽ कसली भयानक जागा आहे ही…मी कधीच तिकडे येणार नाही…’’ भीतीच्या वादळात नेहमीचा स्टिकीन हरवून गेला होता. ती तशी परिस्थिती नसती तर मी त्याच्या घाबरण्याला खोऽखो हसलो असतो पण खालच्या खाईत मृत्यु दबा धरुन बसला होता आणि त्याच्या ह्रदयद्रावक केकाटण्याने कदाचित परमेश्र्वराला जागही आली असती… बहुधा आली असावी. त्याच्या सर्व हालचाली आता पारदर्शक झाल्या. पूर्वी त्याच्यावर एक निष्काळजीपणाचे आवरण त्याने चढवलेले असायचे ते आता गळून पडले. आता मला तो काय विचार करत होता आणि त्याच्या ह्रदयात काय कालवाकालव चालली आहे हे स्पष्ट वाचता येत होते. त्याचा स्वर आणि हालचाली, आशा आणि निराशेच्या खेळात त्याच्या डोळ्यात उमटलेल्या भाव भावना इतक्या मनुष्यासारख्या होत्या की त्या वाचताना कोणाचीही चूक होणे शक्यच नव्हते. त्यालाही माझा प्रत्येक शब्द कळत होता. त्याला तेथेच रात्रीभर सोडणे माझ्या जीवावर आले होते. मला ते शक्यच नव्हते. सकाळी तो सापडला नसता तर ? या विचारानेच माझा थरकाप उडाला. त्याला प्रयत्न करायला लावण्यासाठी मी त्याला घाबरविण्याचे ठरवले. मी त्याच्याकडे पाठ करुन चालायला लागलो व त्याला सोडून जाण्याचे नाटक केले. पण त्याचाही फायदा झाला नाही. मी एका उंचवट्याआडून पहात होतो. मला तसे करताना पाहून तो जास्तच जोरात रडू लागला. मी थोडावेळ तेथे लपून परत काठावर गेलो व त्याला गंभीर आवाजात सांगितले की आता मात्र त्याला सोडून जाण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही आणि तो जर आला नाही तर मी फक्त उद्या परत येण्याचे वचन देऊ शकतो. ‘‘परत जंगलात गेलास तर तुला लांडगे फाडून खातील तेव्हा तिकडे जाऊ नकोस.’’ मी त्याला हातवारे करुन खूप समजावले. ‘‘ चल ! स्टिकीन चल ! युऽऽयुऽऽ

मी काय म्हणत होतो हे त्याला कळत होते. शेवटी धीर धरुन त्याने त्याचे अंग चोरुन मी खोदलेल्या पायरीवर पाय टाकला. त्याने त्याचे शरीर मागे बर्फाच्या भिंतीला टेकवले जणू त्याच्या कातडीचा त्याला आधार मिळत होता. त्याने पहिल्या पायरीवर नजर टाकली, पुढचे पाय एकत्र केले व त्या पायरीवर तो हळूच घसरल. जवळजवळ डोक्यावरच उभा होता तो. मग पाय न उचलता तो त्या पायरीच्या काठावर आला व परत पुढचे पाय त्याने खालच्या पायरीवर टेकले. तो हळूहळू तोल सावरत, वादळाला तोंड देत, घड्याळाचा सेकंदाचा काटा जसा थरथरतो तसा थरथरत त्याने पूलावर पाय ठेवला. तो टोकाला पोहचला आणि क्षणभर थबकला तेव्हा मी गुडघ्यावर खाली बसलो व त्याला उचलण्याची तयारी केली. पण मला भीती वाटत होती की तो आता ही भिंत चढणार कशी ? माझ्याकडे जर एखादी दोरी असती तर मी त्याला फासाने वर उचलून घेतले असते पण माझ्याकडे दोरीही नव्हती. कपड्याची दोरी तयार करता येईल का असा मी विचार करत असतानाच स्टिकीन मी खोदलेल्या पायऱ्यांकडे व खोबणींकडे टक लाऊन पहात असल्याचे मला दिसले. जणू काही तो त्या मोजत होता आणि त्यातील अंतर त्याच्या मेंदूत गणीतासाठी साठवत होता. आणि एकदम त्याने उसळी मारली. पायऱ्यांवर आणि खोबण्यात पंजे रोवून त्याने जी उडी मारली ती पार माझ्या डोक्यावरुन.. ते त्याने इतक्या वेगात केले की मला कळलेही नाही. ‘‘चला ! सुखरुप आला एकदाचा !’’ मी सुटकेचा नि:श्र्वास टाकला.

‘‘ छान छान ! मी ओरडलो ‘‘शाबास रे पोरा ! शाबास !’’ मी त्याला पकडून कुरवळण्याचा प्रयत्न केला पण तो निसटला आणि भुंकत भुंकत बागडू लागला. निराशेच्या गर्गेतून आशेच्या दिशेने मारलेली अशी झेप मी तरी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. आणि त्यानंतरचा त्याचा अवर्णनीय आनंद… त्याने स्वत:भोवती गिरक्या मारल्या, माझ्या भोवती फिरला, जमिनीवर अत्यानंदाने लोळला आणि त्याने काय काय केलं हे मी सांगितले तर तुम्हाला खोटे वाटेल. मी त्याच्याकडे धावलो. मला वाटले आता याला जर शांत केले नाही तर हा हर्षवायुने मरेल. मी त्याला पकडणार तेवढ्यात तो निसटला व थोडे अंतर पळाला, अचानक वळाला आणि तेथून त्याने माझ्या चेहऱ्यावर झेप घेतली. मला जवळजवळ खालीच पाडले त्याने. तो परत एकदा केकाटला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. हे मी स्वत: पाहिले आहे. भावनांचा हा उद्रेक मी प्राण्यांमधे कधीच पाहिला नाही ना अनुभवला. या छोट्या कुत्र्यामधे या भाव भावना आहेत हे कोणी मला आधी सांगितले असते तर माझा त्यावर विश्र्वास बसला नसता. एवढ्या सहनशील व गंभीर स्वभावाच्या या कुत्र्यात या एवढ्या भावना दडल्या आहेत हे कळल्यावर कोणीही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला असता. मीही मग तेच केले.

पण हर्षवायु आणि अतिदु:ख किंवा अति भीती या भावनांना शांत करण्याइतके महत्वाचे दुसरे काम त्यावेळी नसते. त्यासाठी मी पुढे धावलो व त्याच्यावर हा तमाशा बंद करण्यासाठी ओरडलो. आम्हाला अजून बरेच अंतर काटायचे होते आणि अंधार डोकवत होता. आमच्यापैकी कोणीही असल्या दुसऱ्या संकटाला घाबरत नव्हतो कारण परमेश्र्वर असली परिक्षा जन्मात फक्त एकदाच घेतो असे म्हणतात. त्यावेळी तरी आम्ही त्यावर विश्र्वास ठेवला खरं ! पुढे हिमनदीवर भेगांचे अक्षरश: जाळे पसरले होते पण त्या सगळ्या छोट्या व सर्वसाधारण आकाराच्या होत्या. संकटातून सुटका झाल्याचा आनंद आमच्या मनात मावत नव्हता. आम्ही न दमता धावलो. विजयाची धग आमच्या स्नायूत उतरली होती. स्टिकीन तर जे मधे येईल त्याच्या वरुन उडतच चालला होता तो पार अंधार पडेपर्यंत. त्यानंतर मात्र त्याने त्याची नेहमीची कोल्ह्याची चाल पकडली. शेवटी ती ढगाळ शिखरे आमच्या दृष्टीस पडली. आमच्या पायाखाली दगड आहे याची आम्हाला जाणीव होऊ लागली आणि आम्ही आता संकटातून बाहेर पडलो आहोत याची आमची खात्री पटली. आम्ही प्रचंड दमलो आहोत याचीही आम्हाला जाणीव झाली. अंधारात आम्ही ती रेताड जमीन पार केली. सकाळचा ओळखीचा रस्ता पार करुन आम्ही रात्री दहा वाजता मुक्कामी पोहोचलो. मोठी शेकोटी पेटली होती आणि मेजवानीची तयारी चालू होती. हूना इंडियन्सची एक टोळी आम्हाला भेटण्यास आली होती आणि त्यांचेच स्वागत करण्यासाठी ही तयारी चालली होती. त्यांनी रे. यंग यांच्यासाठी छोट्या व्हेलचे मांस व जंगली स्ट्रॉबेरीज आणल्या होत्या. ज्योने शिकारीवरुन एक जंगली बोकड आणला होता. पण आम्ही दमल्यामुळे फारसे खाऊ शकलो नाही. लवकरच आम्ही निद्रेची आराधना करु लागलो. ‘‘जेवढे जास्त कष्ट तेवढी जास्त गाढ झोप’’ ही म्हण तयार करणाऱ्याने खरे कष्ट केले आहेत का ही शंका माझ्या मनात आली पण पापणीआड बर्फाच्या भेगा पाहता पाहता मला केव्हा गाढ झोप लागली हेच कळले नाही.

त्या अनुभवानंतर स्टिकीन बदलला. नंतर त्या मोहिमेत एकटे एकटे राहण्याऐवजी तो मला चिकटून रहात असे. एवढेच काय तो मी सोडून कोणाच्याही हातातून साधा घासही घेत नसे. रात्री जेव्हा सगळीकडे किर्र शांतता पसरे तेव्हा तो शेकोटीपाशी येऊन माझ्या गुडघ्यावर त्याचे मस्तक ठेऊन बसत असे. जणू काही मी त्याचा परमेश्र्वर आहे. आणि जेव्हा त्याची नजर माझ्या नजरेस भिडे तेव्हा तो जणू म्हणे, ‘‘त्या ग्लॅशियरवर काढलेला तो दिवस किती भयंकर होता नाही….?’’

नंतर बरीच वर्षे गेली पण त्या दिवसाच्या आठवणी माझ्या मनातून काही केल्या जात नाहीत. त्या अजूनही मनात ताज्या आहेत. कधी कधी निवांत क्षणी मी तो दिवस परत एकदा अनुभवतो. ते ढग, ते सुळके, ती उध्वस्त झाडे, गोठलेले धबधबे, खोल खोल बर्फातील खाई, पडणारा बर्फ, मी खोदलेल्या पायऱ्या आणि अर्थातच त्यावर घाबरुन उतरलेला स्टिकीन, त्याचे केकाटणे, रडणे आणि नंतर त्याचा आनंद, हे सगळे माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. मी आयुष्यात अनेक कुत्री पाहिली आणि त्यांच्या हुशारीच्या व निष्ठेच्या गोष्टीही सांगितल्या पण स्टिकीनची सर कोणालाही येणार नाही. पहिल्यांदा दुर्लक्षित असलेला हा छोटा कुत्रा नंतर मात्र सगळ्यांचा लाडका झाला. आम्ही वादळाशी दिलेल्या झुंजीने तो एका रात्रीत सगळ्यांना माहीत झाला. आज एखाद्या खिडकीतून पहावे तसे स्टिकीनच्या डोळ्यातून मी प्राणिमात्रांकडे अनुकंपेने पाहतो, त्यांच्याबद्दल विचार करतो.

दुर्दैवाने स्टिकीनच्या कुठल्याच मित्राला शेवटी स्टिकीनचे काय झाले हे माहीत नाही. माझे काम झाल्यावर मी कॅलिफोर्नियाला गेलो आणि माझ्या या छोट्या मित्राला परत कधीही पाहिले नाही. मी त्याच्याबद्दल त्याच्या मालकाकडे बऱ्याच वेळा चौकशी केली. शेवटी रे. यंग यांनी मला उत्तर दिले की १८८३च्या उन्हाळ्यात स्टिकीनला एका पर्यटकाने फोर्ट रँगेलवरुन चोरुन नेले व एका बोटीतून त्यांच्या बरोबर नेले. त्याचे पुढे काय झाले हे रहस्यच राहिले. आता तो या जगात नसेलच पण मी त्याला कधीच विसरु शकणार नाही.

माझ्यासाठी स्टिकीन अजरामर आहे…..

मुळ लेखक : जॉन मुर
अनुवाद: जयंत कुलकर्णी.

रेखाटनभाषांतर

प्रतिक्रिया

एस's picture

2 Apr 2018 - 5:05 pm | एस

थरारक!

दीपक११७७'s picture

2 Apr 2018 - 5:27 pm | दीपक११७७

सहजं

लेख लिहिला 2 Apr 2018 - 4:48 pm

आणि

प्रतिक्रिया 2 Apr 2018 - 5:05 pm

प्राची अश्विनी's picture

3 Apr 2018 - 8:36 am | प्राची अश्विनी

स्टिकीन आवडला.

मुळ कथा आणी अनुवाद दोन्हीही छान . अशा साहसकथांचे पुस्तक उपलब्ध आहे का ?

पैसा's picture

3 Apr 2018 - 9:08 pm | पैसा

स्टिकिन खूपच आवडला!!

पद्मावति's picture

4 Apr 2018 - 11:57 am | पद्मावति

अतिशय सुंदर अनुवाद. चित्रदर्शी. स्टिकिनच्या मन:स्थितीचे वर्णन वाचून डोळ्यात पाणी आले.