मराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
27 Feb 2018 - 9:20 am

'आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा.'

आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते. तुकारामाच्या काळापर्यंत ती संस्कृत शब्दांची आवश्यकतेनुसार उचल करत आध्यात्मिक, धार्मिक आणि नीतिपर श्लोक वा अभंगबद्ध काव्यनिर्मिती करण्याच्या क्षमतेपर्यंत येऊन पोहोचलेली आढळते. तद्नंतर मुस्लीम सत्ताधारी वर्गाच्या प्रभावाखाली संस्कृताऐवजी ती अरबी आणि फारसीच्या प्रभावाखाली जाताना दिसते. शिवराज्याच्या उत्थापनाबरोबर फारसी काही प्रमाणात मागे सरून संस्कृतला अधिक महत्त्व मिळाल्याचे जाणवते. त्यानंतर पेशवाईच्या काळात हिंदुस्थानाचे एक सत्ताकेंद्र महाराष्ट्रात आल्यामुळे पेशवाईच्या पत्रव्यवहारात तिला महत्त्वाचे स्थान मिळाले आणि प्रौढ आणि दर्जेदार गद्य लिखाणातही तिचे तुरळक अस्तित्व जाणवू लागते. (उदा. बखरी, नाना फडणवीसांचे आत्मवृत्त इत्यादी.)

तरीही पेशवाईच्या अखेरीस असे दिसते की राजकीय वा महसुली प्रकारचा पत्रव्यवहार आणि काही बखर वाङ्मय सोडले, तर गद्य लेखनाची काही शिस्त मराठीमध्ये विकसित झाली नव्हती. कोकणातली, देशावरची, विदर्भातली, खानदेशी अशी मराठीची जी अनेक स्थलसापेक्ष बोलण्यातली भाषारूपॆ वापरात होती, त्यापैकी प्रमाण मराठी भाषा असे कोणास म्हणावे आणि ती कशी लिहिली जावी ह्याबाबत काहीच विचार झाला नव्ह्ता. ह्याचे कारण म्हणजे लेखन-वाचन ह्या गोष्टींमध्ये काही स्वारस्य असलेला पंडितवर्ग जवळजवळ संपूर्णपणे आपले लक्ष संस्कृत भाषा आणि त्या भाषेतील पारंपारिक ज्ञान ह्यावरच केंद्रित करून होता. मराठी भाषेचा विकास, तिची शब्दसमृद्धी, व्याकरण, प्रमाणलेखन ह्याकडेही लक्ष द्यावे असे कोणाच पारंपरिक विद्वानास जाणवत नव्हते.

१९व्या शतकाच्या पहिल्या २०-२५ वर्षांत इंग्रजी सत्ता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात देशभर पसरली होती. इतका मोठा देश ताब्यात राहायचा, तर येथील प्रजेच्या सहकार्याशिवाय आणि कारभारातील सहभागाशिवाय ते अशक्य आहे, अशी जाणीव सत्ताधारी वर्गात निर्माण झाली होती. ह्या काळापर्यंत युरोप आणि हिंदुस्तान ह्यांमध्ये भौतिक विषयांच्या ज्ञानामध्ये लक्षणीय असमानता निर्माण झाली होती आणि एतद्देशीय प्रजा पारंपरिक विचारांत अडकून पडली असून ह्या कर्दमातून तिला बाहेर काढणे हे आपले ईश्वरदत्त कर्तव्य आहे, असे काही युरोपीय उदारमतवादी विचारवंतांना वाटू लागले होते. हे कर्तव्य पार पाडण्याचा सरळधोपट मार्ग म्हणजे येथील प्रजेस सरसकट ख्रिस्ती बनवून सोडणे असे मिशनरी विचाराच्या लोकांचे मत होते. पण असे केल्यास हिंदुस्थानातील जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊन हा खंडप्राय देश काबूत ठेवणे अवघड होऊन बसेल, अशी स्पष्ट जाणीव सत्ताधारी वर्गाला होती आणि म्हणून (जसे गोव्यात होऊ शकले, तसे) सत्ता वापरून धर्मबदल घडवून आणणे हे येथे घडले नाही. यद्यपि सत्ताधारी वर्गाचे काही प्रतिनिधी वैयक्तिक पातळीवर ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या बाबतीत सहानुभूती बाळगणारे होते, तरीही जाणूनबुजून धर्मबदल हे राज्यसत्तेचे काम नाही असे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ठरविले होते,

हा राज्यशकट चालविण्यासाठी सहभाग देण्याइतपत येथील जनतेस तयार करणे आणि आपले ईश्वरदत्त कर्तव्य पार पाडणे हे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी येथील जनतेस आधुनिक शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या परिघात आणणे आवश्यक असून त्यासाठी येथील भाषांचे समृद्धीकरण केले पाहिजे, असे अशी जाण शासकवर्गातील काही मंडळींमध्ये निर्माण झाली होती. मेकॉलेने आपल्या १८३५ सालच्या प्रसिद्ध ’मिनट'मध्ये पहिल्या ३३ परिच्छेदांमध्ये हिंदुस्तानातील तत्कालीन ज्ञान युरोपीय देशांतील ज्ञानाच्या तुलनेने कसे खालच्या पातळीचे आहे हे दाखविले आणि आणि अखेरीस ३४व्या परिच्छेदामध्ये असे म्हटले:

[34] In one point I fully agree with the gentlemen to whose general views I am opposed. I feel with them that it is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern, -- a class of persons Indian in blood and colour, but English in tastes, in opinions, in morals and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.

(हा उतारा येथे देण्यामागे मेकॉलेच्या मिनटवर चर्चा उघडावी असा माझा हेतू नाही. ती उलटसुलट चर्चा भरपूर झालेली आहे आणि अजूनही होत राहील. मला केवळ इतकेच दाखवायचे आहे की एतद्देशीय भाषांचे उन्नतीकरण करून आधुनिक विचारांची वाहनक्षमता त्यांच्यामध्ये आणणे हा एक हेतू राज्यकर्त्यांच्या मनामध्ये होता, ज्याचा उल्लेख ह्या अवतरणात मिळतो.)

वर उल्लेखिलेल्या मराठीतील बदलांचे उत्तम वर्णन हे बाबा पदमनजी ह्यांच्या शब्दात मिळते. मोल्सवर्थच्या १८५७च्या कोशाची संक्षिप्त आवृत्ती त्यांनी १८६३ साली तयार केली, तिच्या प्रस्तावनेमधून हे अवतरण घेतलेले आहे -

प्राकृत भाषांचा कित्येक दुरभिमानी विद्वान् ब्राह्मण पूर्वी केवढा धिक्कार करीत असत, हे खाली लिहिलेल्या संस्कृत वचनांवरून दिसून येईल. ती वचने खालच्याच पायरीवर बसायास योग्य आहेत, म्हणून त्यांस ह्या पृष्ठाच्या पादतली ठेविली आहेत; परंतु मोरोपंतासारिख्या सुज्ञ कवींची प्राकृत भाषेसंबंधी जी वचने आहेत त्यातून एकदोहोंस एथे सन्मानाची जागा देतो.
अबलांस न कळे संस्कृतवाणी। जैसे आडातील गोड पाणी॥
परी ते दोर पात्रां वाचुनी। अशक्त जनां केंवी निघे॥
तोचि तडागासि येता त्वरे। तात्कालचि तृषा हरे॥
श्रीधर.
संस्कृत सुकृत यद्यपि तथापि अर्थोदका महायास।
न तथा प्राकृत गंगा सहजे अर्थोदका पिया यास॥
मोरोपंत.

असो, ह्या प्रस्तावाच आता अंत केला पाहिजे. प्राकृत कवींनी परोपकार बुद्धीने ज्या महाराष्ट्र भाषेचे आजवर रक्षण केले तिला आता आमच्या बलिष्ठ आणि विद्वान इंग्लिश सरकारचा महदाश्रय मिळाला आहे. आता तिची दशा सरून तिचे सौभाग्य उत्तरोत्तर वर्द्धमान होत चालले आहे. युरोप आणि अमेरिका एथील विद्वान् व परोपकारी पुरुषांनी तिला आपल्या विद्यामंदिरी आमंत्रण केले आहे, व महाराष्ट्र जनातील विद्वानही तिचे अवलंबन करू लागले आहेत. खरोखर महाराष्ट्र भाषेस सुदिन प्राप्त झाला आहे..

प्रख्यात पंडितकवी मोरोपंत हे जेव्हा संस्कृतपासून दूर वळून मराठीत काव्यरचना करू लागले, तेव्हा त्यांनाही समकालीन संस्कृत विद्वानांकडून टीका आणि उपेक्षा अनुभवाला आलेली असावी. त्यांच्या पुढील उद्गारांवरून हा तर्क करता येतो -
गीर्वाणशब्द पुष्कळ जनपदभाषाचि देखतां थोडी ।
यास्तव गुणज्ञ लोकीं याची घ्यावी हळूहळू गोडी. ॥
(येथे संस्कृत शब्द खूप आणि सर्वसामान्यांची भाषा थोडीच आहे. गुणज्ञ लोकांनी समजून हळूहळू ते वाचावे.)

प्राकृतसंस्कृतमिश्रित यास्तव कोणी म्हणोत ही कंथा, ।
भवशीतभीतिभीतस्वान्ताला दाविला बरा पंथा. ॥
(संस्कृत आणि देशी भाषा ह्यांच्या ह्या मिश्रणाला कोणी घोंगडी म्हणोत, पण सांसारिक दु:खांच्या थंडीला घाबरलेल्यांना योग्य मार्ग हिने दाखविला जातो.)

कोठे दूरान्वित पद कोठे चुकली असेल यतिमात्र, ।
अतिमात्र दोष ऐसे न वदोत कवी समस्तगुणपात्र. ॥
(कोठे दोन पदांमध्ये बरेच अंतर असेल, कोठे यति किंवा मात्रा चुकली असेल, तरीही असे दोष फार आहेत असे सर्वगुणमंडित विद्वानांनी म्हणू नये.) मन्त्ररामायण प्रस्तावना.

प्राकृत म्हणोनि निर्भर हासोत अंतज्ञ नीच मत्कृतिला, ।
परि जाणशील बा तू रसिककविवरा मनी चमत्कृतिला. ॥
(दुष्ट पंडित प्राकृत म्हणून माझ्या कृतीला अवश्य हसोत. पण हे रसिक कविश्रेष्ठा, तू मनाने माझ्या चमत्कृतीला जाणशील.) (नामरसायन.)

मराठी भाषेस आधुनिक रूप देऊन नव्या विचारांसाठीची वाहनक्षमता तिच्यामध्ये आणण्याचे प्रयत्न १९व्या शतकाच्या प्रारंभापासून आणि इंग्रज शासकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. त्यामध्ये मराठी भाषेसाठी व्याकरण लिहिणे, मराठी भाषेमध्ये पाठ्यपुस्तके लिहिणे असे उपक्रम सुरू झाले. ह्या दिशेने मराठी भाषेचे व्याकरण लिहिण्याचे आणि कोशरचनेचे पहिले पाऊल उचलले ते प्रख्यात रे. विल्यम कॅरी ह्यांनी.

मराठीमध्ये कोशरचना ह्यापूर्वी झालीच नव्हती असे नाही. अशा पूर्वी निर्माण झालेल्या कोशांचा एक आढावा विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी घेतला होता आणि त्याच्या आधारे आपटेकृत ’मराठी शब्दरत्नाकरा’च्या प्रस्तावनेमध्ये कोशसदृश प्रयत्नांची पुढील यादी पाहण्यास मिळते.
१. महानुभाव ग्रंथकारांनी रचलेला मध्यकालीन मराठी शब्दांचा कोश.
२. हेमाद्री पंडिताने श. ११६०मध्ये केलेला काही संस्कृत शब्दांचा मराठी अर्थ देणारा कोश.
३. श. १२३९पर्यंतच्या काळात महाराष्ट्रात यादवांच्या राजवटीत झालेले एक शुद्ध मराठी व संस्कृत-मराठी असे दोन कोश.
४. श. १२३९नंतरच्या तीनशे वर्षांत मुसलमानी अंमल दक्षिणेत जारीने चालू असता अनेक यावनी शब्द मराठी भाषेत प्रविष्ट झाले होते व त्यात विशेषत: जमाखर्चविषयक शब्दांचाच भरणा होता (राजवाडे).
५. शिवराज्याभिषेकानंतरचा राज्यव्यवहारकोश.
६. निजामाच्या दरबारात असलेले पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे ह्यांनी युरोपियन लष्करी शब्दांची परिभाषा लिहून ठेवली होती ती.

(भाषेतील सर्व शब्द अकारविल्हे द्यायचे आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ द्यायचा, ह्या आधुनिक मार्गापासून असे सर्व कोश दूर होते.)

मराठीचे पहिले व्याकरण १८०५मध्ये आणि पहिला आधुनिक पद्धतीचा मराठी-इंग्लिश कोश १८१० साली रे.कॅरी ह्यांनी सेरामपूर प्रेसमध्ये छापला. सुमारे १०,००० शब्दांच्या ह्या कोशात मराठी शब्द मोडी लिपीत लिहिले होते. हा कोश मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात कार्य करणार्‍या मिशनरींच्या उपयोगासाठी लिहिला होता. ह्यापुढील कोश म्हणजे १८२४मधील इंग्लिश-मराठी आणि मराठी-इंग्लिश असा ले.क. व्हान्स केनेडी ह्यांनी केलेला कोश. हा कोश म्हणजे संस्कृत अमरकोशातील शब्द उचलून त्यांचे अर्थ देणारा सुमारे ८,००० शब्दांचा कोश. ह्यापुढील प्रयत्न मोल्सवर्थ आणि कँडी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळशास्त्री घागवे, गंगाधरशास्त्री फडके, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ला, परशुरामपंततात्या गोडबोले, रामचंद्रशास्त्री जान्हवेकर आणि जगन्नाथशास्त्री क्रमवंत ह्या सात पंडितांनी १८२९ साली केलेला मराठी-मराठी कोश. हा जास्त 'पंडिती' असल्याने ह्याचीही उपयुक्तता मर्यादितच राहिली.

तद्नंतर येतो १८३१ साली मोल्सवर्थ ह्यांनी थॉमस आणि जॉर्ज कँडी ह्या जुळ्या भावांच्या मदतीने तयार केलेला सुमारे ४०,००० शब्दांचा कोश.

जेम्स थॉमस (जे,टी.) मोल्सवर्थ ह्यांचा जन्म ’व्हायकाउंट’ हा किताब असलेल्या उमराव घराण्यात १७९५ साली झाला. सहावे व्हायकाउंट मोल्सवर्थ निपुत्रिक वारल्यामुळे त्यांचा किताब आणि मालमत्ता चुलत शाखेकडे गेले आणि जे.टी.चा थोरला भाऊ रिचर्ड हा सातवा व्हायकाउंट मोल्सवर्थ झाला. ब्रिटिश उमराव घराण्यांमध्ये किताब आणि मालमत्ता primogeniture नियमानुसार पूर्णत: सर्वात थोरल्या मुलाकडे जाते आणि पुढील भावांना आपल्या उपजीविकेसाठी घर सोडावे लागते. अशांपैकी पुष्कळ जण नशीब काढण्यासाठी हिंदुस्तानकडे, अमेरिकन वसाहतींकडे वा अन्य दूरदूरच्या देशांकडे वळत असत. ह्या पद्धतीला अनुसरून जे.टी. मोल्सवर्थ ह्यांना वयाच्या १६व्या वर्षाच्या पुढेमागे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ’एन्साइन’ ह्या कमिशण्ड अधिकार्‍याच्या सर्वात खालच्या पातळीपासून प्रारंभ करावा लागला. कंपनीच्या सर्व अधिकार्‍यांना हिंदुस्तानातील एखाद्या भाषेचे शिक्षण घेणे आवश्यक असे. त्यानुसार १८१४ साली त्यांनी मराठी आणि हिंदुस्तानी भाषांच्या परीक्षा उत्तम प्रकारे दिल्या. हिंदुस्तानात येण्यापूर्वीच त्यांनी ग्रीक आणि लॅटिन या भाषांचा अभ्यास केलेला होता. मराठी आणि हिंदुस्तानीबरोबरच त्यांनी संस्कृतचीही ओळख करून घेतली. त्यांनी ९व्या आणि ६व्या नेटिव पायदळात मराठी आणि हिंदुस्तानीचा दुभाषा म्हणून काम केले. १८१६मध्ये त्यांना लेफ्टनंटची बढती मिळाली आणि पायदळाकडून त्यांची सैन्याच्या पुरवठा विभागामध्ये (Commissariat) बदली झाली.

१८१८ साली त्यांची नेमणूक सोलापुरात असताना आपल्या कामासाठी भाषांतराला उपयुक्त अशा शब्दांची जंत्री करण्याचे काम त्यांनी फावल्या वेळात सुरू केले. त्यांच्याहून ९ वर्षांनी लहान असलेले थॉमस कँडी त्यांच्यासारखेच सैन्यात दुभाषाच्या कामावर नेमलेले होते आणि त्यांनाही अशा जंत्रीच्या कामात रुची असल्याने दोघांनी मिळून सहकार्याने हे काम सुरू केले. ह्या जंत्रीतूनच त्यांना मराठी शब्दकोश निर्माण करण्याची कल्पना सुचली.

तद्नंतर काही वर्षांनी गुजराथेत खेडा येथे काम करीत असताना त्यांनी शब्दकोशाचा हा प्रस्ताव सरकारपुढे मांडला. प्रस्तावानुसार कोशाला हाताखाली नेमेलेल्या साहाय्यक शास्त्रिवर्गाचे वेतन आणि अन्य खर्च मिळून २,००० रुपये लागले असते आणि असा कोश पूर्णपणे तयार करून तो सरकारला प्रसिद्धीसाठी कायमचा सुपुर्द करण्यासाठी ३,००० रुपयांची मागणी त्यांनी केली होती. व्हान्स केनेडी ह्यांचा कोश नुकताच तयार झालेला असल्याने सरकारला ह्या प्रस्तावात प्रारंभी तरी फार स्वारस्य नव्हते. तरीही मोल्सवर्थ ह्यांनी आपल्या जबाबदारीवर कोश करावा आणि तो पूर्ण झाल्यास सरकार तो ३०००ला घेईल, पण तो प्रसिद्ध करायचा का नाही हा निर्णय सर्वस्वी सरकारचा असेल अशी सरकारी मंजुरी मिळाली आणि कोशाचे काम सुरू झाले.

एव्हाना मराठीवरील प्रभुत्वाबाबत त्यांची ख्याती पसरू लागली होती. ह्या बाबतचे तत्कालीन पुस्तकात नोंदवलेले पुढील मत पाहा -

In the case of Lieut. J. T. Molesworth on the Bombay establishment, whom I never saw, this effort of unaided study was made at sea some years ago, under the most discouraging concomitants imaginable, but with such success, that I have every reason to believe this accomplished young officer has long been one of the best hindoostanee linguists in that presidency, and I have no doubt of his being, by this time, an excellent oriental scholar, who must sooner or later, if spared by Providence, attract the notice and merit the patronage of his superiors, and the enlightened governor of so flourishing a settlement, where talents and integrity, such as Lieut. Molesworth's, cannot long remain without the reward they richly deserve, if I may be allowed to judge of them, from his literary correspondence with me, after his arrival in India.

(John Bothwick Gilchrist - Introduction, The Hindee-Roman Orthoepigraphical Ultimatum येथून)

मराठी कोशाचे हे काम दूर गुजराथेत खेडा येथे राहून करणे अडचणीचे असल्याने मोल्सवर्थनी आपली मुंबईला बदली करावी अशी सरकारला वारंवार विनंती केली. कोश करण्याच्या कल्पनेने त्यांना इतके झपाटलेले होते की मुंबईला कोशाच्या कामासाठी बदली केल्यास ३००० रुपयांवरचा हक्क सोडण्याचीही तयारी त्यांनी सरकारला कळवली. अखेर मे १८२५मध्ये सरकारी निर्णय होऊन त्यांना कोशाच्या कामासाठी मुंबईस जाण्य़ाची परवानगी मिळाली. जॉर्ज आणि थॉमस कँडी ह्या जुळ्या भावांनी पूर्वी शब्दांची जंत्री करण्यासाठी मोल्सवर्थना मदत केली होती. ते दोघेही मुंबई सरकारखाली लेफ्टनंटच्या हुद्द्यावर काम करीत होते. त्यांनाही मे १८२६मध्ये मोल्सवर्थच्या मदतीला देण्यात आले आणि अशा रितीने कोशाचे काम मार्गी लागले. १८२६च्या Oriental Herald and Journal of General Literature येथे ह्या नेमणुकीचा उल्लेख पाहण्यास मिळतो.

ह्या कामाचा प्रारंभ म्हणून जिल्ह्या-जिल्ह्याच्या कलेक्टरांकडून त्यांच्या-त्यांच्या भागात प्रचलित असलेल्या शब्दांच्या याद्या मिळविल्या. ह्या याद्या स्थानिक शास्त्रीपंडित आणि सर्वसामान्य जनता ह्यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या होत्या. अशा मार्गाने गोळा झालेल्या शब्दांवर कोशात समाविष्ट करण्याच्या हेतूने केलेले संस्करण कोशाच्या १८३१जूनमध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये वर्णिले आहेत. त्याचा (माझ्या शब्दांत) सारांश असा -

’गोळा झालेल्या शब्दांना पुनरावृत्ती, दुसर्‍या शब्दाचे केवळ बिघडलेले रूप, फार विद्वज्जड, फार हीन दर्जाचा, अति-मर्यादित वापराचा अशा चाळण्या लावून सुमारे २५,००० शब्द उरले. त्यांची यादी करण्यात आली. तिघा युरोपियनांपैकी एकाने (मोल्सवर्थ, जॉर्ज, थॉमस कँडी) ह्या यादीतील प्रत्येक शब्दाची ५ ते ७ पंडितांबरोबर एका ठिकाणी बसून छाननी केली. ह्या छाननीमध्ये शब्दाची व्याकरणातील जात, व्युत्पत्ती, लिखाणाची पद्धत, स्पष्ट आणि लाक्षणिक अर्थ, वापर - योग्य/बोलणार्‍यांच्या मुखातला, सार्वत्रिक/मर्यादित, अशा बाबी नोंदविण्यात आल्या. आवश्यक तेथे वापराच्या बाबीत ग्रंथांचे आधार शोधण्यात आले. एका मुळाक्षराने प्रारंभ होणारे सर्व शब्द छाननी करून झाले की निर्माण झालेली सर्व सामग्री दुसर्‍या पातळीवर तपासण्यासाठी राखून ठेवली आणि पुढच्या मुळाक्षराला प्रारंभ केला. दुसर्‍या खोलीत तिघांपैकी दुसरा एका पंडिताबरोबर बसून उपलब्ध हस्तलिखित ग्रंथ, पत्रव्यवहार, सरकारात आलेले अर्ज अशांची छाननी करून नवे शब्द शोधण्याच्या कामावर गुंतलेला होता. अशा शब्दाची वरील प्रकाराने छाननी केली जात होती. असे झालेले सर्व काम पुनर्निरीक्षणासाठी तिसर्‍याच्या हाती सोपविले गेले. पंडितांपैकी सर्वात अधिक ज्ञानी पंडित त्याच्याबरोबर बसून त्या दोघांनी पहिल्या दोन गटांच्या कामाचे पुन:परीक्षण केले.'

अशा छाननीमधून सर्व शब्द गेल्यावर एकूण शब्दसंख्या २५,०००वरून ४०,००० इतकी वाढली.

कोशामध्ये कोणते शब्द घ्यायचे ह्याबाबत पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये काही स्पष्ट विधान आढळले नाही. मूळचे अरेबिक आणि फारसी असलेले पण मराठीत सरसकट वापरात असलेले ३,००० शब्द कोशात आहेत, हा उल्लेख दिसतो. दुसर्‍या १८५७च्या आवृत्तीत ह्यावर खालील विधान केलेले सापडते -

...but that the Sanskrit, in its height and depth, and with all its vigour and elegance and majesty, and the common tongue, with its provincialisms and colloquialisms, yea, and the multitudes of its expressive and fondly loved vulgarisms, should and do concur to compose the grand and popular language of Maharashtra. Without sanctioning this pretension of its fullness, a dictionary of the Marathi confessedly constituted of elements of wealth and variety, must certainly contain Sanskrit words learned as well as ordinary, recondite as well as familiar, regarding but the two considerations of present currency and probable serviceableness; whilst of Marathi words it must contain the uncommon and the common, the local and the general, the coarse and the neat, the domicialated import and the genuine home-stock; not daring to discard what Maratha speakers are pleased to employ, or too delicately to discriminate betwixt the corrupt and the pure, or even betwixt the unchaste or the unclean and the altogether comely.

(सारांश - असे म्हणता येईल की संस्कृत - तत्सम - शब्द घेताना चालू वापर आणि व्यवहारात वापरला जाण्याची शक्यता हे निकष लावले आहेत. देशी शब्दांना लावलेला निकष इतकाच आहे की तो शब्द बोलणार्‍यांच्या मुखात असावा. अन्य कोणताही निकष - उदा., सामान्य/असामान्य, स्थानिक क्षेत्रात मर्यादित/सर्वत्र आढळणारा, हीन/सभ्य, परक्या भागातून आलेला/मूळचा येथील - लावलेला नाही. जे शब्द मराठी बोलणार्‍यांच्या वापरात आहेत, त्या सर्वांना स्थान दिले आहे.)

ह्या सर्व परिश्रमामधून दोन कोश निर्माण झाले - १८२९ सालचा सात पंडितांचा मराठी-मराठी कोश आणि १८३१चा मोल्सवर्थ-कँडी बंधूंची नावे असलेला मराठी-इंग्लिश कोश. पंडितवर्गाने केलेला कोश मराठी-मराठी कोश सुमारे ७-८,००० शब्दांचा होता. ’यावनी’ राज्यकर्त्यांनी आणलेले ’दर’, ’तयार’, ’रोज’, ’साल’ अशा प्रकारचे शब्द त्यात नाहीत. तसेच दिलेले अर्थ क्लिष्ट आणि पाल्हाळिक पद्धतीने दिले आहेत असे त्याचे मूल्यमापन गो.वा. आपटे-कृत ’मराठी शब्दरत्नाकर’ ह्या १९२० साली प्रकाशित झालेल्या कोशाच्या प्रस्तावनेमध्ये करण्यात आले आहे.

मराठी-इंग्लिश कोशाचे नाव A Dictionary Murathee & English असे छापले आहे. देवनागरी शब्दांचे रोमनीकरण करण्याचे सर्वमान्य प्रघात ह्या वेळेपर्यंत पडले नव्हते. ह्या पुस्तकातील रोमनीकरण गिलख्रिस्ट पद्धतीनुसार केलेले आहे, असा प्रस्तावनेमध्ये उल्लेख आहे.

तयार झालेला मराठी-इंग्लिश कोश सरकारकडून स्वीकार केला जाण्याबाबत प्रथम काही मतभेद होते, पण अखेर सप्टेंबर ७, १८३१ ह्या दिवशी सरकारातून कोशाबाबत समाधान व्यक्त करणारे पत्र पाठविण्यात आले. पुढे लौकरच डिसेंबर ५, १८३२ रोजी इंग्लिश-मराठी कोश करण्यासाठीही सरकारची मंजुरी मिळाली.

पंडितवर्गाने बनविलेला मराठी-मराठी कोश नंतर विशेष गाजला नाही. ह्याचे कारण असे दिसते की मोल्सवर्थचे वर वर्णिलेले सर्वसमावेशक धोरण पंडितवर्गाने आपल्या कोशात वापरले नाही. मोल्सवर्थच्याच शब्दांत -

...For so backward are the Brahmins in adopting the principles in adopting the principles I have prescribed, that to this moment, they would reject words expressive of ideas and corresponding to terms which though abstract and learned are to us familiar and of which the occurrence will be constant in translations from English; whilst they would receive readily high Sanskrit words for sun and moon, wood, water and stone...

कोशाबरोबरच मोल्सवर्थ बाँबे नेटिव एज्युकेशन सोसायटीसाठी मराठी क्रमिक पुस्तके करण्याच्या कामातही गुंतलेले होते. त्यांचे बहुतेक वास्तव्य मुंबई आणि महाबळेश्वर येथे असे. मुंबईत स्कॉटिश मिशनच्या रे.विल्सनबरोबर त्यांचा चांगला परिचय होता, कारण मिशनरी कार्यासाठीही ते आपल्या मराठीच्या ज्ञानाचा उपयोग करीत असत, असा उल्लेख मिसेस विल्सन ह्यांच्या आठवणीच्या पुस्तकात मिळतो.

प्रकृतिअस्वास्थ्याच्या कारणासाठी १८३६च्या प्रारंभी त्यांना इंग्लंडला रजेवर जाण्याची परवानगी मिळाली आणि इंग्लिश-मराठी कोशाचे काम पूर्ण न करताच ते इंग्लंडला परतले. तेथेही त्यांची तब्येत सुधारली नाही आणि तब्येतीच्या कारणासाठी तेथूनच त्यांनी आपल्या सैन्यातील जागेचा राजीनामा दिला. (Capt. JT Molesworth of 11 NI retired in England 24th April 1837 -The Asiatic journal and monthly register 1837.)

असा राजीनामा देण्यामागे आणखी एक कारण म्हणजे ख्रिश्चन धर्म आणि सैन्यातील सेवा हे एकमेकांच्या विरोधी आहेत अशी त्यांची धारणा बनली होती. नोकरी सोडल्यानंतर आपला सैन्यातील हुद्दा न वापरता, तसेच उमराव घरातील जन्मामुळे येणारे ’Honourable' हे पद न स्वीकारता मि. मोल्सवर्थ ह्या साध्या नावाने ओळखले जाणे त्यांनी पसंत केले. तसेच सैन्यातील नोकरीचे निवृत्तिवेतनही न घेण्याचे ठरविले. आतापर्यंतचा सर्व काळ आणि ह्यानंतरही ते अविवाहितच राहिले.

इंग्लडमध्ये त्यांनी काय केले, त्यांची उपजीविका कशी चाले ह्याबाबत काहीच उल्लेख मिळत नाहीत. ख्रिश्चन चळवळींमध्ये आणि विचारांमध्ये त्यांना बरेच स्वारस्य असावे असा तर्क करता येतो, कारण अशा चर्चेत त्यांनी भाग घेतल्याचे त्रोटक उल्लेख आढळतात.

इकडे हिंदुस्तानात त्यांच्या कोशाची ख्याती हळूहळू पसरत होती. १८४७मध्ये थॉमस कँडी ह्यांनी इंग्लिश-मराठी कोश पूर्ण करून प्रसिद्ध केला. १८३१च्या कोशाच्या प्रती संपत आल्या होत्याच. ही संधी साधून सरकारने मोल्सवर्थ ह्यांना त्याची सुधारित दुसरी आवृत्ती काढण्यासाठी बोलवावे, असा प्रस्ताव कँडी ह्यांनी मांडला. तो सरकारने स्वीकारल्याने सुमारे १५ वर्षांच्या अनुपस्थितीनंतर मोल्सवर्थ पुन: हिंदुस्तानात परतले.

१५ वर्षांनंतर मोल्सवर्थ ह्यांचे मराठीवरील प्रभुत्व जराही कमी झालेले नव्हते. त्यांना ह्या सुमारात मुंबईत भेटलेले एक अधिकारी डेविड डेविडसन ह्यांनी पुढील आठवण नोंदवली आहे -

Some days after, at the same quarters, I heard a palanquin draw up, and a gentleman speaking to the bearers in the purest Marathee. This was Captain Molesworth, who, associated with George Candy's twin-brother Tom, had twenty years before completed the first part of his Marathee Dictionary, the most perfect work of the kind that ever was produced. He had retired from the service in very feeble health, and, after twenty years, had been induced to return to carry on and publish the second part (the English and Marathee) of his admirable dictionary.

(David Davidson - Memoirs of a Long Life, पृ.२७६-२७७ येथून).

पहिल्या आवृत्तीपेक्षा ह्या आवृत्तीच्या वेळचा अनुभव वेगळाच होता. पहिल्या वेळेस सर्व अनिश्चित होते. मेहनत घेऊन केलेल्या पुस्तकाचे सरकारकडून कसे स्वागत होईल ह्याबाबत शाश्वती नव्हती. कामाला योग्य वातावरण मिळावे ह्यासाठी झगडायला लागत होते. ह्या खेपेस सरकारकडून आमंत्रण येऊन आणि सर्व अटी मान्य करून घेतल्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. सर्व काम पुणे आणि महाबळेश्वर येथे करण्यात आले. मोल्सवर्थ ह्यांना ह्या खेपेस आरोग्यानेही उत्तम साथ दिली. १८५७ साली २०,००० अधिक शब्दांची भर असलेली दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली.

पहिल्या आवृत्तीची किंमत प्रारंभी ६५ रुपये इतकी ठेवण्यात आली होती, पण किंमत अधिक वाटल्याने पुष्कळ इच्छुकांकडून तक्रार आल्याने ती कमी करून प्रारंभी ५० रुपये आणि शेवटी २० रुपये करण्यात आली होती. दुसरी सुधारून वाढविलेली आवृत्ती सुरुवातीपासूनच ३६ रुपयांना विक्रीस ठेवली गेली आणि १८७०पर्यंत बहुतेक पुस्तके संपून गेल्यामुळे पुस्तक दुर्मीळ झाले. १८५७मध्ये छापली गेलेली एक प्रत मला आमच्या येथील ग्रंथालयात हाताळायला मिळाली. 'दुर्मीळ'असे तिचे वर्गीकरण असल्याने ती ग्रंथालयाच्या संदर्भ विभागात बसूनच चाळावी लागली.

१८५७च्या कोशाची किंमत अधिक होती, तसेच त्याच्या विस्तारामुळे आणि आकारामुळे पुष्कळ प्रसंगी तो जवळ बाळगणे अवघड होते, अशा कारणांनी १८६३ साली बाबा पदमनजी ह्यांनी ह्या कोशाचा संक्षिप्त कोश तयार केला. मुळातील ६०,०००च्या जागी ह्या संक्षेपात ३०,००० शब्द आहेत. त्याची किंमतही ग्राहकांना परवडेल अधिक इतकी - उत्तम कागदाच्या प्रतीस ६ रुपये आणि साध्या कागदाच्या प्रतीस ५ रुपये अशी - ठेवण्यात आली. संक्षेपाचे नाव ’A Compendium of Molesworth's Marathi and English Dictionary असे देण्यात आले.

अलीकडच्या काळात १९७५मध्ये ना.गो. कालेलकरलिखित प्रस्तावना आणि शरद गोगटेलिखित मोल्सवर्थ आणि सहकार्‍यांवर चरित्रविषयक टिपण ह्यांसह १८५७च्या आवृत्तीवरून कोशाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे आणि तद्नंतर त्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण अनेक वेळा करण्यात आले आहे.

१८६०च्या सुमारास ’मोरेश्वरशास्त्री’ (त्यांच्या संपर्कातील पंडितांचा शब्द) पुन: इंग्लंडला परतले. त्यांचे तेथील उर्वरित आयुष्य कसे गेले ह्याबाबत काहीच माहिती उपलब्ध झाली नाही. जुलै १३, १८७१ ह्या दिवशी क्लिफ्टन येथे त्यांचे निधन झाले.

.
.
1

संस्कृतीवाङ्मयभाषाप्रकटनआस्वादमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

सुमीत भातखंडे's picture

27 Feb 2018 - 11:04 am | सुमीत भातखंडे

माहितीपूर्ण लेख.
अवांतरः १८५७ साली २० रु. म्हणजे प्रचंडच किंमत होती.

अतिशय सुंदर आणि मिपावरील सांप्रत सर्वाधिक वाचनीय लेख. मराठी भाषादिन उपक्रमाची सुरुवात दणदणीत झाली आहे.

(रच्याकने, नूलकरजींकडून मुद्रितशोधन करवून घ्यावे अशी छोटीशी सूचना.)

अरविंद कोल्हटकर's picture

27 Feb 2018 - 11:47 pm | अरविंद कोल्हटकर

नूलकरजींकडून मुद्रितशोधन करवून घ्यावे अशी छोटीशी सूचना.

लेखांमध्ये काही टंकनदोष मला दिसत आहेत पण मुद्रितशोधन करण्यायोग्य जागा कोठल्या हे कळल्यास माझे स्पष्टीकरण देऊ शकेन.

लेखामध्ये मेकॉलेच्या ’मिनट’ खालची hyperlink संपादनामध्ये गळाली आहे असे दिसते. ज्यांना मूळ ’मिनट’ वाचायची इच्छा असेल त्यांना ते येथे पाहता येईल. ह्या ’मिनट’चा परिणाम म्हणजे १८३४-३५ पर्यंत केवळ संस्कृत वा अरेबिक पारंपारिक ज्ञानावर आधारित शिक्षणाचे रूप बदलून इंग्रजी भाषा आणि तिच्या आधारे आधुनिक भौतिक विषयांच्या ज्ञानाला शिक्षणपद्धतीत महत्त्वाचे स्थान मिळाले.

आनंदयात्री's picture

28 Feb 2018 - 12:18 am | आनंदयात्री

अकारनिल्हे हा शब्द अकारविल्हे असा हवा ना?

लेख अतिशय माहितीपूर्ण आहे, खूप आवडला. उत्तर लोक म्हणतायेत तसे मराठी दिनाच्या लेखमालेची सुरुवात अगदी दणक्यात झाली आहे. धन्यवाद.

सुधांशुनूलकर's picture

28 Feb 2018 - 9:56 am | सुधांशुनूलकर

मुद्रितशोधन करायला थोडा उशीर झाला.

लेख छान आहे. गेले काही महिने मी स्वतः एका कोशाचं काम करत असल्यामुळे लेख खूप भावला.

पैसा's picture

27 Feb 2018 - 11:39 am | पैसा

अतिशय सुरेख, माहितीपूर्ण धागा. शब्दकोष अगदी छोटा दिसतो. पण त्यामागे प्रचंड मेहनत असते. हे जाणवत नाही. मातृभाषा सोडून इतर भाषांमधे लिहिता वाचताना शब्दकोह खूप उपयोगाला येतात.

आपल्याकडचे जुने कोष अकाराने सुरू होणारे किंवा अक्षरानुसार वर्गीकरण केलेले नसत, तर त्यांची कोणत्या प्रकारची रचना असे?

नितांतसुंदर, प्रचंड माहितीने भरलेला लेख.
एक शंका:

तोचि तडागासि येता त्वरे।

या ओळीचा अर्थ काय आहे?

सूड's picture

27 Feb 2018 - 5:08 pm | सूड

तडाग = तलाव

पुंबा's picture

27 Feb 2018 - 5:09 pm | पुंबा

आभार.

पद्मावति's picture

27 Feb 2018 - 4:43 pm | पद्मावति

सुरेख महितीपुर्ण लेख.

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2018 - 5:42 pm | प्राची अश्विनी

+१११११

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2018 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच रोचक माहितीने भरलेला माहितीपूर्ण लेख !

प्रचेतस's picture

28 Feb 2018 - 8:38 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.

भीडस्त's picture

28 Feb 2018 - 4:26 pm | भीडस्त

मोल्स्वर्थ कोश प्रचंड मोठं काम . चाळत बसलं तरी ध्यानात येतं काय आवाका आहे ते.

अप्रतिम लेख आहे सर..

विकास's picture

28 Feb 2018 - 8:16 pm | विकास

माहितिपूर्ण लेख.

या वरुन आठवले...

१८९९ मध्ये रेव्हरंड मेन्वेरींग यांनी मराठी म्हणींचा कोश तयार केला होता. तो संग्रही ठेवण्यासारखा आहे... गुगलबुक्स वर तो मुक्तस्त्रोतात उपलब्ध आहे.

उत्तम, माहितीपूर्ण लेख. शब्दच नव्हे तर भाषाशैलीही कालानुसार बदलत जात असते. आता ह. ना. आपटे किन्वा गो. नि. दातार यान्ची भाषा समजते तरी पण त्या आधीची बखरीसारखी "मराठी" भाषा कळण्याकरता उर्दू, फारसी इत्यादी मधले शब्द माहित तरी असावे लागतात किन्वा सम्पादन करणार्‍याची कृपा असेल तर तळटिपा मदत करतात.

कलंत्री's picture

3 Mar 2018 - 3:30 pm | कलंत्री

ब्रिटीश लोकांबद्दल मला नेहमीच साहित्यिक अंगाने विचार केला तर फारच कौतुक वाटत आले आहे. आपला देश सोडून कोठल्यातरी परक्या देशात अशी सरस्वती साधना करणे म्हणजे केवढे अचाट काम असेल ना?

सुधीर कांदळकर's picture

6 Mar 2018 - 6:52 am | सुधीर कांदळकर

आवडला.

धन्यवाद.