हॅरी पॉटर - भाग चार

Primary tabs

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
28 Oct 2017 - 12:30 am

हॉगवार्ट्सच्या संस्थापकानंतर महत्वाची पात्रं पुढीलप्रमाणे -

१ - एल्बस डम्बलडोर

एल्बस डम्बलडोर हे हॉगवॉर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक . त्यांच्या काळातील सर्वात शक्तिमान जादूगार म्हणून हे प्रसिद्ध आहेत . शालेय जीवनात , हॉगवॉर्ट्स मध्ये विद्यार्थी असताना सातही वर्षे त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेची चमक दाखवली , संशोधने करून जादुई जगताला उपयोगी ठरतील असे अनेक शोध लावले ...

दूरदर्शीपणा , माणसं ओळखण्याचं कसब , लोकांच्या मनात आधाराची विश्वासाची भावना निर्माण करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ..

चुकलेल्यालाही दुसरी संधी देणारा , वाईट समजल्या जाणाऱ्या माणसातही चांगले गुण शोधण्याचा आणि त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारा त्यांचा स्वभाव आहे .

ग्रिन्डेलवाल्ड नावाच्या शक्तिशाली पण गैरमार्गावर गेलेल्या - गुन्हेगारी जादूगाराने जादूगारांच्या जगतास जेरीस आणलं होतं . जादू मंत्रालयाने हरेक प्रयत्न करून तो हाती लागत नव्हता . शेवटी डम्बलडोरने त्याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केलं व कैदी बनवलं ( याबाबतीत डिटेल माहिती हॅरी पॉटरच्या शेवटच्या पुस्तकात मिळते ) .

एल्बस डम्बलडोर हॉगवर्ट्स मध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारतात . ग्रिन्डेलवाल्डचा पराभव केल्यानंतर त्यांनी जादू मंत्र्याचे पद ( हे जादूगार समाजाच्या मंत्रालयातील सर्वोच्च पद आहे . ) स्वीकारावे असा संपूर्ण जादूगार समाजाचा आग्रह असतो पण ते नम्रपणे नकार देतात व आपले शिक्षकाचे काम सुरु ठेवतात व कालांतराने हॉगवर्टसचे मुख्याध्यापक बनतात . डम्बलडोर बद्दल बहुतांश जादूगार समाजात अत्यंत आदराची भावना आहे .

२ . वोल्डेमॉर्ट -

जादूचा गैर - गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर केलेल्या जादूगारांमध्ये वोल्डेमॉर्टचं नाव सगळ्यात वर लागतं . असामान्य शक्तिशाली , जादूच्या अनेक शाखा - प्रकारांमध्ये सर्वोत्तम कौशल्य असलेला पण तितकाच क्रूर असा हा जादूगार आहे .

वोल्डेमॉर्ट हादेखील हॉगवर्ट्सचाच विद्यार्थी आहे . पण आज त्याचे पूर्वीचे सहाध्यायी त्याला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते इतके घाबरलेले असतात की त्याबद्दल काहीही बोलण्यास नकार देतात . इतकंच काय पण त्यावेळचे त्याचे शिक्षकही आज त्याचं नाव उच्चारु धजत नाहीत .

पूर्ण जादूगार समाज व मगल जग म्हणजेच संपूर्ण जगावर सत्ता मिळवण्याची त्याची महत्वाकांक्षा होती . सुरुवातीच्या काळात अनुयायी प्राप्त करण्यासाठी त्याने " आपण शुद्ध रक्ताला सर्वश्रेष्ठ मानत असून जगात शुद्ध रक्ताच्या जादूगारांची सत्ता आणणे , मडब्लड्सची कीड नष्ट करणे आणि मगल लोकांना त्यांची खरी जागा दाखवून देणे " हि आपली महान ध्येये आहेत असं जाहीर केलं .

हिंसाप्रिय जादूगार , गुन्हेगारी वृत्तीचे जादूगार , मगल आणि मगलबॉर्न लोकांचा तिरस्कार करणारे जादूगार , शुद्ध रक्ताला महत्व देणारे जादूगार , कायदे - नियमांच्या चौकटीत राहून उद्योगधंदा करू इच्छित नसलेले जादूगार , सामान्य जादूगार समाजाने ज्यांची हेटाळणी केली असे वेअरवुल्फ्स , दानव यांसारखे जादुई जीव ........ असे अनेक प्रकारचे लोक वोल्डेमॉर्टचे अनुयायी झाले . अनेकजण भीतीपोटी वोल्डेमॉर्टच्या आज्ञा मानण्यास तयार झाले होते तर अनेकांना इंपेरियस कर्सचा ( संमोहन शापाचा ) वापर करून त्यांच्याकडून हवं ते करवून घेतलं जात होतं.

वोल्डेमॉर्टच्या अनुयायांमधील सगळेजण प्युअरब्लड होते असं मुळीच नाही , बरेचजण हाफब्लड होते पण ते आपण प्युअर ब्लड असल्याचं सांगत . खरंतर त्यातल्या बहुतेकांना या शुद्ध रक्त - अशुद्ध रक्त संकल्पनेशी फारसं घेणंदेणं नव्हतं .... कोणत्याही प्रकारे कमजोर जादूगार आणि मगल लोकांचे हाल - शोषण / टॉर्चर करण्यास , जीव घेण्यास , लूट करण्यास मुक्त सूट मिळावी यासाठी त्यांनी वोल्डेमॉर्टच्या संरक्षणाचा आश्रय घेतला होता . वोल्डेमॉर्ट स्वतः हाफब्लड होता , त्याला मगल लोकांविषयी तिरस्कार होता पण हाफ ब्लड लोकांविषयी खरोखर संताप नसावा . त्याचे अर्ध्याहून अधिक अनुयायी हे हाफ ब्लडच होते .

वोल्डेमॉर्टने आपल्या अनुयायांना डेथ इटर ( मृत्यूभक्षी / प्राणभक्षी ) असं नाव दिलं . प्रत्येकाच्या हातावर एक आकृती गोंदवलेली असे , वोल्डेमॉर्टने एकाच्या हातावरील आकृतीस स्पर्श केल्यावर सर्व डेथ इटर्स पर्यंत हा संदेश पोहोचे व ते जिथे कुठे असतील तिथून अंतर्ध्यान पावून तत्क्षणी वोल्डेमॉर्टसमोर हजर होत . या आकृतीस डार्क मार्क असं नाव दिलं गेलं .

वोल्डेमॉर्टची खरोखरच जादूगारांचे वंश शुद्ध रक्ताचे असावेत अशी इच्छा होती की सर्व जगावर एककेंद्री , बिनविरोध सत्ता प्राप्त करण्याच्या मार्गातला तो एक भाग होता हे निश्चित सांगता येत नाही .

वोल्डेमॉर्ट आणि त्याचे अनुयायी यांनी मिळून जादूगार समाजात अशी भयानक दहशत निर्माण केली होती की लोक त्याच्या नावाचा उच्चारही करण्यास घाबरू लागले ... वोल्डेमॉर्ट असं कुणी म्हणेना .. त्याच्याबद्दल बोलायचं झाल्यास "you know who " असा उल्लेख होऊ लागला . चुकून कोणी वोल्डेमॉर्ट म्हटलं तर ऐकणारा भीतीने पांढरा होऊ लागला .

मगल लोकांची तर त्याने जनावरांसारखी कत्तल केली .
जादूगार समाजातील अर्ध्याहून अधिक लोक हाफ ब्लड होते . त्यांना या हिंसेच्या मार्गाने सत्ताप्राप्ती नको होती , ना त्यांना वोल्डेमॉर्टचे क्रूर मार्ग हवे होते .
वोल्डेमॉर्ट व त्याच्या अनुयायांनी अनेक हाफब्लड कुटुंबांतील जादूगारांना स्वार्थासाठी / त्याची साथ देण्यास तयार झाले नाहीत म्हणून / मार्गात अडथळा आणला म्हणून यमसदनास पाठवलं होते .

डेथ इटर्स एखाद्या ठिकाणी हत्या केल्यानंतर विशिष्ट मंत्राचा वापर करून त्या ठिकाणी आकाशात डार्क मार्कची मोठी आकृती निर्माण करीत , ही आकृती काही तास टिके . डार्क मार्क आकाशात आहे म्हणजे तिथे कुणाचीतरी हत्या झाली आहे हे कळे . ह्याचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी केला जात होता .

" आपण एके दिवशी घरी येऊ आणि घरावरच्या आकाशात डार्क मार्क चमकत असेल .... याचा अर्थ घरातील कुणीतरी एक किंवा सगळेच ... !! आत काय पाहावं लागेल ... " हि त्याकाळी सगळ्या सामान्य जादूगार समाजाची सर्वात वाईट भीती होती . संपूर्ण सामान्य जादूगार समाजात प्रचंड दहशतीचं , निराशामय वातावरण होतं .

डम्बलडोरच्या नेतृत्वाखाली ऑर्डर ऑफ फिनिक्स हि कुशल , बुद्धिमान आणि धैर्यवान जादूगारांची गुप्त संघटना वोल्डेमॉर्टच्या विरुद्ध काम करू लागली .जादू मंत्रालय सर्वशक्तीनिशी प्रयत्न करूनही वोल्डेमॉर्टचा पराभव शक्य होत नव्हता . खुद्द जादू मंत्रालयात वोल्डेमॉर्टचे हस्तक फितूर होते . त्याच्या अनुयायांची संख्या ऑर्डर ऑफ फिनिक्सच्या सदस्यांपेक्षा 20 पटीने जास्त होती . एकेक करून ते मृत्यूला बळी पडत होते ...

वोल्डेमॉर्ट अंतिम विजयापासून काही हातच दूर होता , आणखी काही वर्षातच त्याने जादू मंत्रालयाची सत्ता नष्ट करून जादूगार समाजावर स्वतःची एककेंद्री जुलमी राजवट स्थापन केली असती . आणि त्यानंतर मगल समाजाला आपलं गुलाम बनवलं असतं , अमर्याद , अनियंत्रित हत्या , हिंसा केली असती .

या परिस्थितीत वोल्डेमॉर्टला एका भविष्यवाणीची माहिती कळली . या भविष्यवाणीनुसार ज्यांनी 3 वेळा वोल्डेमॉर्टचा पराभव केला आहे अशा दाम्पत्याच्या पोटी वोल्डेमॉर्टचा पराभव करणाऱ्याने जन्म घेतला आहे , जुलैच्या अखेरीस त्याचा जन्म झाला आहे .

भविष्यकथन हि जादूच्या अनेक शाखांमधली एक शाखा आहे . हे भविष्य वर्तवणारे भविष्यवाण्या करतात . पण यातल्या 100 % भविष्यवाण्या खऱ्या ठरतात असं मुळीच नाही पण तरी वोल्डेमॉर्टला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती .

वोल्डेमॉर्टला समजलेला हा भविष्यवाणीचा भाग अर्धाच होता , पण हे त्याला माहीत नव्हतं . या भागाप्रमाणे 3 वेळा त्याच्यापासून वाचलेली आणि ज्यांच्या मुलाचा जन्म जुलैच्या अखेरीस झाला आहे अशी 2 दाम्पत्यं होती . हि दोन्ही दाम्पत्यं ऑर्डर ऑफ फिनिक्सची सदस्य होती .

एक म्हणजे फ्रँक आणि ऍलिस लॉंगबॉटम आणि त्यांचा मुलगा नेव्हील व दुसरं कुटुंब म्हणजे जेम्स आणि लिली पॉटर आणि त्यांचा मुलगा हॅरी .

लॉंगबॉटम हे शुद्ध रक्ताचं घराणं होतं , नेव्हील हा प्युअर ब्लड होता . तर जेम्स पॉटरचं घराणं शुद्ध रक्ताचं होतं पण लिली हि मगलबॉर्न / मडब्लड होती त्यामुळे हॅरी हाफ ब्लड होता .

वोल्डेमॉर्ट स्वतः हाफ ब्लड होता . त्यामुळे भविष्यकथनात म्हटलेला मुलगा हाफ ब्लडच असणार , हाफ ब्लडच माझ्याइतका शक्तिशाली असेल , मला टक्कर देऊ शकण्याएवढा बलवान असेल असं त्याने मनाशी म्हटलं आणि छोट्या हॅरी पॉटरला संपवून आपल्याला निर्माण होणारा संभाव्य धोका नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला .

वोल्डेमॉर्टच्या गतजीवनाबद्दल अतिशय रोचक आणि महत्वाची माहिती हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स या पुस्तकात मिळते . तो कोण , कुठे वाढला , त्याचे आईवडील कोण आणि वाईट मार्गावर त्याची वाटचाल कशी झाली याची संपूर्ण डिटेल माहिती या पुस्तकात मिळते .

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

पैलवान's picture

28 Oct 2017 - 7:04 am | पैलवान

चालू दे..
आम्ही वाचतोय.

उगा काहितरीच's picture

28 Oct 2017 - 7:57 am | उगा काहितरीच

+१

मनिमौ's picture

28 Oct 2017 - 10:28 am | मनिमौ

आने दो

संग्राम's picture

29 Oct 2017 - 4:02 pm | संग्राम

वाचतोय

स्नेहांकिता's picture

30 Oct 2017 - 12:20 pm | स्नेहांकिता

हा भाग अतिशय रोचक झाला आहे !. पु. भा. प्र.

उपेक्षित's picture

30 Oct 2017 - 7:37 pm | उपेक्षित

वाचतोय

अनन्त अवधुत's picture

31 Oct 2017 - 6:48 am | अनन्त अवधुत

छान सुरु आहे मालिका. पु. भा. प्र.

हा भाग लहान वाटला.. पुभालटा.

mayu4u's picture

31 Oct 2017 - 1:12 pm | mayu4u

हेच टायपायला आलेलो.

एस's picture

31 Oct 2017 - 7:42 pm | एस

रोचक आहे.

पाटीलभाऊ's picture

1 Nov 2017 - 1:53 pm | पाटीलभाऊ

वाटलं नव्हतं...रोलिंगबाईनी एवढ्या खोलात जाऊन एक वेगळंच विश्व बनवलं असेल.
पुढचा भाग लवकर येऊ द्या.

पुढचा भाग आलाय का? कधी येणार?