शेअरबाजार :Tips Are for Waiters, Not Traders..

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in जनातलं, मनातलं
4 Sep 2017 - 12:12 pm

माझे एक उत्साही क्लायंट श्री प्रतिक यांना ना एक सवय आहे..त्यांना मिळ्णाऱ्या धमाका, शुअरशॉट, मल्टीबॅगर्स.....कॅटेगरीतील 'टीप्स' लोककल्याणाच्या भावनेने 'फॉरवर्ड' करण्याची.

परवाच गणपतीकरिता गावाला गेलेला मी सुहृदांच्या भेटीगाठी, गप्पाटप्पा आणि उत्सवांत मग्न असतानाच यांची एकापेक्षा एक जॅकपॉट कॉल्सची पकाऊ ढकलपंची अव्याहत चालुच होती. मात्र जेंव्हा अथर्वशिर्षांच्या आवर्तनांदरम्यान पोटांत पडलेला खड्डा आणि समोर नैवेद्याचे मोदकांचे विलोभनीय ताट, अशा नेमक्या 'खवळलेल्या' क्षणीच साहेबांचा आधी कॉल, तो न घेतल्याने पाठोपाठ मेसेज "GA सर,गेले 3/4 दिवस हा अलाणा फलाणा दिवसाअखेर समरी देतो त्याच्या कॉल्सची, 90%+ सक्सेस रेट आहे. प्लीज, बघा तुम्ही आणि सांगा Subscribe करु का??"....आला आणि माझी अवस्था काहीशी '..आंवळे दंतपंक्ती नेत्राग्नी चालील्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे' अशी झाली.

“हे बघा, ते तुमचे तुम्ही ठरवा..तुम्हाला 'Survivorship Bias' ही संकल्पना माहित आहे काय ?? नसेल तर नंतर बोलुया" मी कधी नव्हे तो अति-तुटकपणे उत्तरलो. (If you can't convince them, confuse them.. असे म्हणतात ना, ते हेच ते.)

यावर प्रतिक साहेबांनी काय केले माहित नाही, पण मला आता, पुण्याला आल्यावर 'Survivorship Bias' या बाबत लिहिणे आले असो.

….तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता..ब्रिटिश वायुदलाची विमाने जर्मनांनी डागलेल्या विमानवेधी क्षेपणास्त्रांनी क्षतिग्रस्त होत होती यावर उपाय म्हणुन विमानांची बांधणी अधिक मजबुत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या लष्करी विमानांना बरोबर दारुगोळा व अन्य अवजड युद्धसाहित्यही न्यावे लागत असल्याने या उपायांनी विमानाचे वाढणारे वजन हे डोकेदुखीचे कारण होते.. यावर उत्तर म्हणुन तज्ञांच्या एका समितीने विमानांच्या ताफ्याची बारकाईने पहाणी करुन विमानांना गोळ्या लागलेल्या जागांची तपशीलवार नोंद केली आणि जी आकडेवारी हाती आली त्यावरुन स्पष्ट झाले की गोळ्या सर्वत्र समप्रमाणांत नव्हे तर काही विशिष्ट ठिकाणी, म्हणजे मुख्य ईंजिनाच्या आसपास कमी (1.11/Sq.ft) आणि पंख वा शेपटीकडील काही भागांत जास्त (3.53/Sq.ft) लागल्या आहेत.

समितीने ही आकडेवारी तपासुन विमानांच्या पखांच्या आसपासचे कवच अधिक जाड, मजबुत करावचे ठरविलेच होते. दरम्यान अब्राहम वाल्ड (Wald) नामक एक प्रख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञाला विमानांच्या दुखापतींची ही वितरण सारणी दाखविण्यात आली..

आणि काय आश्चर्य… वाल्ड साहेबांनी समितीच्या निष्कर्षांना चक्क वेड्यात काढले. त्यांच्या मते मजबुतीची सर्वाधिक गरज अन्य कोणत्याही ठिकाणापेक्षा ईंजिनाच्या आसपासच होती. त्यांनी '...The reasons planes have a fewer hits to the engines is that planes that got a hit in the engine, weren't coming back' असे मत नोंदवत 'ज्याअर्थी पंख वा शेपटीजवळ गोळ्या लागुनही विमान सुरक्षित परतु शकते..तेथे आणखी सक्षमीकरण केले नाही तरी चालेल' असे सुचवले. साहेबांच्या या सुचनेमागील बिनतोड तर्क पहाता ती सुचना अमान्य होणे शक्यच नव्हते.

आपले अयशस्वी अनुभव वगळुन केवळ निवडक यशस्वी प्रसंग (येथील संदर्भ बाजारांतील व्यवहार) सांगुन यशाचा डंका पिटणारे महानुभाव आणि त्यांच्या भजनी लागणारे गुंतवणुकदार यांची मांदियाळी पाहिली आणि 'Survivorship Bias is a cognitive bias that occurs when someone tries to make a decision based on past successes, while ignoring past failures' ही व्याख्या आधी आठवली आणि पाठोपाठ याचेच काव्यात्म भाषांतर असावे अशी सुप्रसिद्ध चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांची 'तुला स्वीकारलं तेव्हा, तुझे दोष हि मी घेतले ! गुणांपेक्षा दोषांवरच, मी माझं आयुष्य बेतले'!!.. ही चारोळी सुद्धा.

येथे मी Jordan Ellenberg यांच्या 'How Not to Be Wrong: The Hidden Maths of Everyday Life' या पुस्तकाचा ऋणनिर्देश करतो, ज्यात मी हा किस्सा प्रथम वाचला. या पुस्तकातच 'Survivorship Bias ही संकल्पना म्युचुअल फंडसबाबतही कशी उपयुक्त आहे याचेही विवेचन आहे.

सारांशः सध्या बाजारांत हमखास फायदा मिळवुन देणाऱ्या ढीगांनी मिळत असलेल्या टीप्स आणि डायबिटीस, कॅन्सरादी दुर्धर आजार बरी करणारी टीव्ही जाहिरांतीतील औषधे यांची विश्वासर्हता ही शुन्यवतच आहे. प्रख्यात गुंतवणुकविषयक लेखक जिम क्रॅमर यांच्या, Real Money: Sane Investing in an Insane World या पुस्तकातुन निवडलेले या लेखाचे शिर्षक हेच ध्वनित करते

अर्थात, माझे मात्र तसे नाही, माझ्याकडे या टीप्स वा औषधेवाल्यांपेक्षा पुर्णतः वेगळे, दोन दशकांहुन अधिक काळाच्या अभ्यास व निरिक्षणावर आधारित आयुष्यांत करोडोपती (कोटी....एकावर सात शुन्ये) कसे व्हावे याचे काही रामबाण उपाय आहेत.. सांगतो.

(1) एकदा तरी किमान दीड कोटीचे बक्षीस असणारी लॉटरी जिंका
(2) एखाद्या कोट्याधिशाच्या एकुलत्या एक मुलीशी लग्न करा.
(3) एखाद्या गढ्गंज संपत्ती असलेल्या नातेवाईकाच्या मृत्युपत्रांत आपले नाव प्रमुख वारस म्हणुन येइल, अशी व्यवस्था करा
(4) राजकारणांत प्रवेश करुन आमदार, खासदार,... गेला बाजार किमान नगरसेवक व्हा
(5) स्मगलिंग, हवाला... किंवा तत्सम प्रकारचा व्यवसाय निवडा
(6) स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु होण्यासही हरकत नाही

....आणि हे सोपे उपाय अगर आप के बस की बात नही...तर आणखी एक, शेवटचा उपाय पहा जमलं तर-
...
...
(7) आपल्या निवृती पर्यंत आपल्या मासिक शिल्लक रक्कमेच्या निदान 10% एखाद्या उत्तम ईक्विटी म्युच्युअल फंडात 'S.I.P' व्दारे गुंतवा.

- प्रसाद भागवत

अर्थकारण

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

4 Sep 2017 - 1:42 pm | दीपक११७७

छान मांडणी
उत्तम लेख

पुंबा's picture

4 Sep 2017 - 1:48 pm | पुंबा

भन्नाट शैली..
सुंदर लेख..

राजाभाउ's picture

4 Sep 2017 - 1:57 pm | राजाभाउ

अतीशय खुसखुशीत !!
पहीले ६ उपाय कसे एकदम रामबाण आहेत, ७ व त्या मानाने उपयोग होईल नाही होईल असा :)

मराठी_माणूस's picture

4 Sep 2017 - 2:35 pm | मराठी_माणूस

मस्त.

खेडूत's picture

4 Sep 2017 - 2:44 pm | खेडूत

आवड्ला!..

एस's picture

4 Sep 2017 - 4:05 pm | एस

भारी लिहिलं आहे.

पगला गजोधर's picture

4 Sep 2017 - 7:11 pm | पगला गजोधर

भागवत सर, +१ अतिशय उत्तम लेखं,
या अश्या लेखांमुळेच मिपावर मी अदृश्य वा मा मोड सोडून प्रतिक्रिया आवर्जून द्यायला येतो.
आपल्या पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत.

जाता जाता एक शंका / मार्गदर्शन विनंती .....

ब्यांकेपेक्षा (उदा SBI) उत्तम रीतीने चालवण्यात येणाऱ्या गृहकर्जअर्थ संस्थेमधे (उदा HDFC ) पैसे गुंतवणे जास्त सयुक्तिक आहे का ? कारण (जेव्हा कधी भविष्यात रेपो रेट सैलावतील) ब्यांका एन पी ए मुळे तेव्हडा परतावा देऊ शकणार नाहीत कदाचित..... ?

प्रसाद भागवत's picture

5 Sep 2017 - 9:11 pm | प्रसाद भागवत

गजोधर साहेब.आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

आपण व्यक्त केलेल्या शंकेबाबत माझा दृष्टिकोन असा की रेपो रेट्चा परिणाम NPA वर कितपत होईल याबद्द्ल मला शंका आहे. NPA याच मुद्द्यावर बोलायचे झाल्यास राजकीय हस्तक्षेप वा व्यावसायिक अकार्यक्षमता अशासारख्या घट्कांनी झालेल्या या दुखण्यांतुन चांगल्या सरकारी बॅका बाहेर पडत आहेत आणि येथुन NPAची पातळी पुर्वीपेक्षा खुप वाढेल असे मला तरी वाटत नाही..

दुसरीकडे रेपो रेट्मधील हालचालींचा संबंध व्याजदराशी असल्याने गृहकर्जांवरही तो लागु होईलच होईल. शिवाय अशा कंपन्यांकडे, अगदी त्या उत्तम रीतीने चालवण्यात येणाऱ्या असल्या तरी विक्रीकरीता विविध्य नाही, त्यातत सध्या गृहबांधणी क्षेत्र मंदीत आहे. अशावेळी मी थोडा बदल करुन सरकारी पेक्षा खासगी बॅका असा प्राधान्यक्रम ठेवने पसंत करेन. उदा. आपण सुचविलेल्या HDFC पेक्षा HDFC Bank..

पगला गजोधर's picture

5 Sep 2017 - 10:03 pm | पगला गजोधर

धन्यवाद, सर

तुषार काळभोर's picture

4 Sep 2017 - 7:15 pm | तुषार काळभोर

सहा उपाय तर कित्ती कित्ती सोप्पे आहेत.
सातवा काही अपने बस की बात नही...

सुबोध खरे's picture

4 Sep 2017 - 9:03 pm | सुबोध खरे

अतिशय उत्तम लेख.
लोक बाजारात नुकसान करून घेण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण.
PEOLPE BUY ON TIPS AND SELL ON NEWS
अजून एक सल्ला या क्षेत्रातील दिग्गज देतात तो म्हणजे
आपल्याला जेवढी बचत करायची आहे ती सर्वात पहिल्यांदा करा आणि नंतर खर्च करा. बहुसंख्य लोक पहिल्यांदा खर्च करतात आणि मग महिनाअखेरीस बचतीसाठी पैसाच उरत नाही.

दशानन's picture

4 Sep 2017 - 10:53 pm | दशानन

+1

सहमत!

भंकस बाबा's picture

4 Sep 2017 - 10:30 pm | भंकस बाबा

भागवतजी रॉक्स

भंकस बाबा's picture

4 Sep 2017 - 10:31 pm | भंकस बाबा

भागवतजी रॉक्स

भंकस बाबा's picture

4 Sep 2017 - 10:31 pm | भंकस बाबा

भागवतजी रॉक्स

उपाशी बोका's picture

5 Sep 2017 - 5:27 am | उपाशी बोका

Tips Are for Waiters, Not Traders.. Investors असे पाहिजे.

प्रसाद भागवत's picture

5 Sep 2017 - 8:48 pm | प्रसाद भागवत

लेखांत म्हटल्याप्रमाणे या लेखाचे शिर्षक प्रख्यात गुंतवणुकविषयक लेखक जिम क्रॅमर यांच्या, Real Money: Sane Investing in an Insane World' या पुस्तकातुन निवडलेले आहे.

या वाक्यात मला 'जेथे ट्रेडर्सनाही टीप्स उपयुक्त नाहीत ..इन्व्हेस्टर्सना तर त्या नसणारच' हा गर्भितार्थ जाणअला..म्हणुन मी ते तसेच्या तसे ठेवले आहे.

उपाशी बोका's picture

6 Sep 2017 - 12:17 am | उपाशी बोका

जिम क्रेमर स्वत: टिप्स देण्याचेच काम करतो CNBC वर Mad Money या कार्यक्रमात. त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते तुम्हीच ठरवा.

प्रसाद भागवत's picture

6 Sep 2017 - 9:02 am | प्रसाद भागवत

लेखांतील विषयास समर्पक, चमकदार, आधीपासुन चर्चित असे एक वाक्य शिर्षक म्हणुन मी निवडले, याचा अर्थ संबंधीत लेखकाची कार्यपद्धती, विचारसरणी आणि विश्वासार्हता मी मान्य केली असा निष्कर्ष आपण काढत असाल..... तर ठीक आहे. धन्यवाद

जेम्स वांड's picture

5 Sep 2017 - 8:50 am | जेम्स वांड

प्रसादराव,

सध्या बाजारात उत्तम एसआयपी ऑप्शन्स कुठले आहेत हे तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या सांगता येणार नसलं तर हरकत नाही. पण, जर सांगू शकलात तर किमान कित्येक मिपाकरांना स्मार्ट इन्व्हेस्टमेंट पॉईंटर फॉर अ स्टार्ट मिळतील असं वाटतं.

लेखाकरता आभार :)

II श्रीमंत पेशवे II's picture

5 Sep 2017 - 12:42 pm | II श्रीमंत पेशवे II

बरोबर ....

प्रसाद भागवत's picture

5 Sep 2017 - 8:58 pm | प्रसाद भागवत

SIP या पर्यायातच averaging करण्याचा अंगभुत गुण असल्याने व्यक्तीशः मी फक्त Equity Funds, त्यातही अधिक आक्रमक ईक्विटी फंड्स निवडेन.. बॅलन्स्ड फंडस, वा ईक्विटी व्यतिरिक्त फंडस हे मी SIP करिता त्याज्य समजतो. त्यातही मध्यम ते मोठ्या आकाराचे, आणि किमान ३/४ वर्षांचा ईतिहास असलेले असेच फंड्स विचारात घ्यावेत..

मराठी_माणूस's picture

6 Sep 2017 - 12:20 pm | मराठी_माणूस

मुळात डझनवारी फंड हाउसेस आणि शेकड्यांनी योजना मधुन निवडणे फार अवघड काम वाटते.
Mutual Fund Insight ह्या मासिकात शेवटी एक तक्ता दिलेला असतो त्यात स्कीम चे नाव आणि स्टार रेटींग दिलेले असते. त्यातुन जास्त स्टार रेटींग असलेल्या निवडाव्या का ?

पगला गजोधर's picture

5 Sep 2017 - 5:36 pm | पगला गजोधर

अवांतर : सध्या विविध अर्थविषयक, भांडवली बाजार विषयक झ वाहिन्यांवर, 'नोटबंदीचे अर्थव्यवस्थेला झालेले फायदे ' या विषयक प्रस्तुत होणारे सेगमेंट, हे 'Survivorship Bias' चे उत्तम उदाहरण आहे का ? कृ जा प्र टा

धर्मराजमुटके's picture

6 Sep 2017 - 9:41 am | धर्मराजमुटके

शेअर बाजाराशी संबंधित चित्रपट आवडणार्‍यांनी 'मनी मॉन्स्टर्स' हा चित्रपट आवर्जुन पहावा. रोचक आहे.

धर्मराजमुटके's picture

6 Sep 2017 - 9:42 am | धर्मराजमुटके