श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक २ : क्ष

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in लेखमाला
27 Aug 2017 - 12:39 pm

क्ष.
माझा चौथीपासूनचा मित्र. खरं तर तो आमच्या वर्गात आहे, हे सातवीला गेल्यावर कळलं आणि आठवीला आमची ओळख चांगली झाली. मित्र म्हणावा इतपत.
हडपसरला एका झोपडपट्टीत पत्र्याच्या दोन खोल्यांचं घर. घरात आई, वडील आणि क्षचे दोन भाऊ. आई दोन-चार घरी घरकाम करायची. वडील लोकसेवा हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर पोतं टाकून चपला व बूट शिवायचा व्यवसाय करायचे. मोठ्या भावाने सहावी-सातवीनंतर शाळा सोडलेली, तो एका गवंड्याच्या हाताखाली जायचा.
आमच्या शाळेत चौथीच्या व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं खूप महत्त्व असायचं. इतकं, की चौथीच्या आणि सातवीच्या वर्गावर इतर विषय कमी आणि बहुतेक वेळ मराठी, गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास चालू असायचा. प्रत्येक इयत्तेत ऐंशी विद्यार्थी असायचे, त्यातले चाळीस जण शिष्यवृत्तीसाठी निवडलेले असायचे 'अ' तुकडीमध्ये.

तर, क्षचीसुद्धा चौथीला या अ तुकडीमध्ये निवड झाली होती. पण त्याने जास्त अभ्यास नको म्हणून ब तुकडीतच राहण्याचा आग्रह धरला. आमचे शिक्षक, जे बहुतेक सेवाभावी, निरपेक्ष वृत्तीने शिकवणाऱ्या शेवटच्या पिढीतले असतील, त्यांना वाईट वाटलं. अखेर सातवीला मात्र त्यांनी त्याला अक्षरशः शाळेतून काढायची धमकी देऊन 'अ ' तुकडीमध्ये घेतला. त्याने मनाविरुद्ध वर्षभर अभ्यास करून महानगरपालिका शाळांमध्ये पहिला, जिल्ह्यात सातवा व राज्यात सेहेचाळिसावा क्रमांक मिळवला!!
आठवी ते दहावी मात्र त्याने मनापासून अभ्यास केला आणि म्हणूनच आमच्या टॉपर-ग्रूपमध्ये आम्ही त्याला येऊ द्यायचो. दहावीला त्याचा शाळेत पहिला नंबर आला... साडेएकोणनव्वद टक्के! परत एकदा महानगरपालिका शाळांमध्ये तो पहिल्या पाचात होता.

मध्यंतरी घरी बऱ्याच अडचणी वाढल्या होत्या. वडिलांचा व्यवसाय व आईचं काम यातून 'खाऊन पिऊन सुखी' असलेल्या घरात वडिलांच्या व्यसनाचं ग्रहण लागलं. आम्ही आठवीला असताना एकदा क्ष आठवडाभर शाळेतच आला नाही. मित्रांपैकी दोघे-तिघे त्याच्या घरी चौकशीला गेले, तेव्हा कळलं की त्याच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मग त्यांचे उपचार, पोलीस केस यामुळे क्षची शाळा बुडाली होती. आम्ही नववी-दहावीला असताना लग्नसराईच्या सीझनमध्ये शाळेची वेळ १२ ते ५.३० असताना तो थेट अडीचला शाळेत यायचा. आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं की तो कुठे गायब असायचा. पण शिक्षकसुद्धा त्याला काही बोलत नसत. पुढे कळलं की तो जवळच्या एका मंगल कार्यालयात वाढप्याचं काम करायला जायचा. ६० रुपये हजेरीने महिन्याला अठराशे रुपये कमवून घरी द्यायचा. कधी कधी रात्रीचा एखादा रिसेप्शनचा कार्यक्रम असेल तर ते पैसे एक्स्ट्रा मिळायचे.
अकरावीला व बारावीला हडपसरच्याच कॉलेजला होता. बारावीला कॉलेजात पहिला आला आणि पीसीएम ग्रूपला ९३% मिळाले. मेरिटवर (अनुसूचित जातीच्या आरक्षणातून) सीओइपीमध्ये कॉम्प्युटरला ऍडमिशन मिळाली. इकडे तिकडे किरकोळ कामं सुरूच होती. पहिल्या वर्षी ६२% मिळाले आणि त्याने ड्रॉप घेतला!!

अकरावी-बारावीला एका स्थानिक चांगल्या दर्जाच्या खाजगी क्लासचालकाने त्याची हुशारी हेरून त्याला विनाशुल्क क्लासमध्ये घेतलं होतं. पुढे इंजीनियरिंगलासुद्धा तो त्या सरांच्या संपर्कात होता. त्या सरांना हे ड्रॉपचं कळलं.
त्यांनी क्षला बोलावलं आणि कारण विचारलं. तो म्हणाला, “सर, इंजीनियर झाल्यावर हजारो रुपये मिळायचेत तेव्हा मिळतील. आता मला घर चालवणं जास्त महत्त्वाचंय. आता एका ठिकाणी सोसायटीत हेल्परची कामे करून महिन्याला तीन हजार पगार मिळतोय. तीन वर्षांनी मिळणाऱ्या हजारो रुपयांसाठी मी आताचे तीन हजार नाही सोडू शकत. मला माझ्या घरातलंय लोकांची पोटं भरायचीत.”

सर म्हणाले, “तीन हजार मी तुला देतो. वाटल्यास मला क्लासमध्ये पेपर तपासायला मदत कर आणि त्याचा पगार समजून पैसे घे, पण इंजीनियरिंग सुरू ठेव.” अशा पद्धतीने क्षचं क्लासमधलं काम सुरु झालं, जे पुढे बीई होईपर्यंत सुरु होतं. यथावकाश आमचा क्ष बीई झाला. अर्थात, अपेक्षेप्रमाणे (एका ड्रॉप वर्ष पकडून) बाकी थ्रू-आऊट ऑल क्लिअर आणि प्रथम श्रेणी होती. शेवटच्या वर्षी ६८% होते.
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एका कंपनीने त्याला निवडलं. त्याला पगाराची अपेक्षा विचारली. त्याने सांगितलं, “मी तीन हजारासाठी इंजीनियरिंग सोडलं होतं. तुम्ही द्याल तो पगार चालेल.”
चार वर्षं फक्त कॉलेज व घर चालवणं एवढं केल्याने मार्केटमध्ये काय चालू आहे काहीच माहीत नव्हतं त्याला.
कंपनीने त्याला साडेतीन हजार देऊ केले. त्याने ती नोकरी स्वीकारली. पुढे कंपनीने त्याचं काम पाहून तीन महिन्यांनी त्याला पंधरा हजार पगार सुरू केला. पण 'मार्केट' मध्ये आल्यावर त्याला पगार किती असू शकतो त्याचा अंदाज आला आणि त्याने नोकरी बदलली. पगार वाढला. मग दोन-तीन वर्षांनी नोकरी बदलत राहिला.

सध्या क्ष पुण्यातल्या एका मोठ्या व प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरी करतो. दोन वर्षांपूर्वी त्याला वीस लाखाचं पॅकेज आहे, असं सांगत होता. लग्न केलंय. बायको आवर्जून उच्चशिक्षित व अतिगरीब घरातली केलीय. तो बायको व एका मुलगी यांच्याबरोबर एका वन बीएचकेमध्ये राहतो. पहिल्या नोकरीत एक पल्सर घेतली होती, ती आणि हौस म्हणून एक वापरलेली वॅगन आर घेतली होती, त्याला आता सात वर्षे झाली - अजून तीच वापरतोय. विनाकारण गरजा निर्माण करायच्या नाहीत, असं आयुष्य जगतोय. बाकी मग आईवडिलांना फुरसुंगीजवळ एका छोट्या प्लॉटवर एक छोटं घर घेऊन दिलंय. मोठ्या भावाला, जो शिकला नव्हता, त्याला एक ट्रक घेऊन दिलाय. वडील आता घरीच असतात. आई अजूनही कामाला जाते. त्या दोन कुटुंबांनी इतकी वर्षं घर चालवायला मदत केली, होईल तोपर्यंत तिथे काम करत राहायचं ठरवलंय. बायको व मुलीला घेऊन वर्षातून एक-दोन वेळा फिरायला जातो. मध्ये एकदा अमेरिकेची व एकदा इंग्लंडची ऑनसाईटची ऑफर होती, त्याने नकार दिला. भारत सोडायचा नाही म्हणून.
जेव्हा जेव्हा मला एखाद्या गोष्टीसाठी पैसे कमी पडताहेत असं वाटतं, तेव्हा मी ‘क्षने काय केलं असतं?’ याचा विचार करतो.

प्रतिक्रिया

एमी's picture

27 Aug 2017 - 12:49 pm | एमी

_/\_

मस्त! प्रेरणादायक. खूप आवडलं.

अमितदादा's picture

27 Aug 2017 - 1:10 pm | अमितदादा

छान लेख... अशी कष्ट करणारी लोक पाहिली कि एक प्रकारचं बळ मिळत. मला अशे दोन मित्र आहेत
१. गरीब, अशीक्षिती आणि मागासवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी, आयटीआय ते आयआयटी (मास्टर ) असा उत्तुंग प्रवास, आता एका आंतराष्ट्रीय कंपनीच्या संशोधन विभागात.
२. घराची श्रीमंती वडिलांनी मटक्या च्या व्यसनापायी फुकून टाकल्यानंतर मित्राच्या नशिबी कष्ट, अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला कॉलेज मध्ये पहिला आणि युनिव्हर्सिटी मध्ये पहिल्या ५ मध्ये येऊन हि दुसऱ्या वर्षाला गॅप घ्यावा लागला पैसे नसल्यामुळे. नंतर छत्र्या, बूट विकून दुसऱ्या वर्षासाठी पैसे उभारले स्वतः., आता पुण्यात चांगला जॉब आणि स्थिरस्थावर.
जगात खूप खतरनाक लोक आहेत याची प्रचिती नेहमी येत राहते.

तुषार काळभोर's picture

27 Aug 2017 - 4:24 pm | तुषार काळभोर

तुमच्या मित्रांबद्दल अतीव आदर वाटतोय.
खचून जायची वेळ येते तेव्हा अशा संघर्षकथांमुळे पुढे जायची प्रेरणा मिळते.

यशोधरा's picture

27 Aug 2017 - 6:17 pm | यशोधरा

क्या बात!

पद्मावति's picture

27 Aug 2017 - 2:06 pm | पद्मावति

अतिशय प्रेरणादायक_/\_

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2017 - 5:25 pm | स्वाती दिनेश

तुमच्या मित्राला सलाम!
इथे हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
स्वाती

पैसा's picture

27 Aug 2017 - 5:37 pm | पैसा

ग्रेट!

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Aug 2017 - 8:11 pm | माम्लेदारचा पन्खा

समाजाच्या व्याख्येनुसार मोठा माणूस झाल्यावरही क्ष चे पाय जमिनीवर आहेत हे फारच महत्वाचं आहे . . . . .

नि३सोलपुरकर's picture

27 Aug 2017 - 8:30 pm | नि३सोलपुरकर

तुमच्या मित्राला __/\__.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2017 - 8:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

केवळ स्पृहणिय आणि प्रेरणादायक !

प्रतिकूल परिस्थितीत भल्या भल्या मोठ्या माणसांना डोकं खांद्यावर ठेवून योग्य विचार करता येत नाही. इतक्या लहान वयापासून ते साध्य करणार्‍या तुमच्या मित्राबद्दल बोलायला शब्द नाहीत.

तुषार काळभोर's picture

28 Aug 2017 - 1:57 pm | तुषार काळभोर

प्रतिकूल परिस्थितीत भल्या भल्या मोठ्या माणसांना डोकं खांद्यावर ठेवून योग्य विचार करता येत नाही.

बर्‍याचदा प्रतिकूल परिस्थितीत मोठ्यांनाही व्यसनांचा आधार घेण्याचा अथवा कुमार्गाचा मोह टाळता येत नाही. क्षच्या बाबतीत तर परिस्थिती या दोन्ही गोष्टींसाठी अतिशय पोषक होती. त्याच्या घराच्या परिसरातील निम्म्याहून अधिक मुले शाळेतून बाहेर पडलेली, तंबाखू-मावा-गुटखा-बीयर-दारू सर्व काही शाळेत असतानाच सुरू झालेली, मारामारी, गुंडगिरी यात आयुष्य घालवणारी, अशी होती. त्यामुळे क्ष या गोष्टींत अडकणे अतिशय साहजिक होते. पण तो कमळाप्रमाणे या सर्वांत असूनही त्याच्या बाहेर होता. तो कुणात मिसळत नसायचा असे नाही, पण कुणाचा एकही दुर्गूण त्याने स्वतःला चिकटून दिला नाही.

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Aug 2017 - 9:07 pm | भ ट क्या खे ड वा ला

अस काही अनुभवलं कि शब्द अपुरे पडतात.

रेवती's picture

27 Aug 2017 - 10:22 pm | रेवती

प्रेरणादायी लेखन आवडलं.

योगेश सुदाम शिन्दे's picture

27 Aug 2017 - 10:41 pm | योगेश सुदाम शिन्दे

अभिमान वाटतो आणि कौतुक ही _/\_

अतिशय प्रेरणादायी! तुमच्या मित्राला आणि अमितदादा तुमच्या मित्रांनाही प्रणाम!

यावरून एक मुद्दा विचारात घ्यावासा वाटला, की भारतात ज्याला श्रमप्रतिष्ठा म्हणतात ती समाजात अजूनही पुरेशी रुजलेली नाहीये. मुलांनी तारुण्यात जितक्या लवकर स्वावलंबी बनता येईल तितकं बनावं आणि स्वतःचं शिक्षण, करिअर स्वतः घडवावं हा विचार समाजात फारसा दिसत नाही. अद्यापही बापाच्या पैशांच्या जीवावर ऐश करणारे दिवटे दिसतात. पण त्यांच्यासारख्यांमुळे एकतर हुशार, होतकरू, गुणी परंतु गरीब अशा विद्यार्थ्यांना पुरेशी संधी मिळणं कठीण होतं. आपल्या घराची परिस्थिती चांगली जरी असली तरी अर्धवेळ काम करून आपल्याला लागणारा पॉकेटमनीतरी निदान स्वतः कमवावा असं मुलांना वाटत नाही. आणि जे गरजू विद्यार्थी काम करतात त्यांच्याकडे समाज एकतर कोरड्या सहानुभूतीने तरी बघतो किंवा त्यांची हेटाळणी तरी करतो. हे चित्र बदलायला हवं. देशाची तरुण पिढी ही श्रमांना आणि बुद्धिमत्तेला सारखेच महत्त्व देणारी निपजायला हवी. या खऱ्या गुणवंतांना मनापासून सलाम!

फारएन्ड's picture

28 Aug 2017 - 1:08 am | फारएन्ड

जबरी आहे हे. टोटल रिस्पेक्ट!

ज्योति अळवणी's picture

28 Aug 2017 - 8:05 am | ज्योति अळवणी

अत्यंत मन:स्पर्शी. तुमच्या मित्राला आदरपूर्वक नमस्कार

सविता००१'s picture

28 Aug 2017 - 9:13 am | सविता००१

__________/\__________
प्रेरणादायी लोक

अत्यंत स्पृहणीय आणि प्रशंसनीय चरित्र .

सुमीत भातखंडे's picture

28 Aug 2017 - 11:35 am | सुमीत भातखंडे

सलाम!

सिरुसेरि's picture

28 Aug 2017 - 1:45 pm | सिरुसेरि

मस्त लेख . या श्री गणेश लेखमालेतील सर्वच लेख आवडले . "success has no shortcut" , "practice make man perfect" याची जाणीव करुन देणारे लेख .

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2017 - 2:02 pm | प्रीत-मोहर

__/\__

संग्राम's picture

28 Aug 2017 - 2:04 pm | संग्राम

प्रशंसनीय
_/\_

नीलमोहर's picture

28 Aug 2017 - 5:24 pm | नीलमोहर

असे चाकोरीबाहेरील विचार आणि लोकही हल्लीच्या जगात दुर्मिळच.

मृत्युन्जय's picture

28 Aug 2017 - 5:27 pm | मृत्युन्जय

प्रेरणादायी लेख

जेडी's picture

28 Aug 2017 - 6:06 pm | जेडी

तुम्ही लिहिलंय त्यापेक्षा कितीतरी जास्त विदारक परिस्थिती त्या मित्राने स्वतः अनुभवली असेल , किती क्षण असे असतील कि ज्यावेळी वाटले असेल ... हे सर्व मिळवणे आपल्या नशिबातच नाही . किती दिवस उपाशी काढले असतील , किती अपमान झाले असतील हे फक्त भोगलेला माणूसच सांगू शकतो....

प्रेरणादायी लेख __/\__

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2017 - 7:02 pm | पिलीयन रायडर

लेख आवडला. तुम्ही तिसर्‍या माणसाची गोष्ट लिहीली असल्याने किचित त्रोटक वाटला. त्या मित्राचे स्वतःछे अनुभव, विचार आणि आज मागे वळून ह्या सगळ्याकडे बघताना काय वाटतं हे वाचायला आवडेल.

लेख वाचताना माझ्या वडिलांची आठवण आली. ते ही अत्यंत हुशार पण घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरचं. खेडेगावात एक साधे मातीचे - शेणाने सारवलेले घर. अशा ठिकाणी रहाणार्‍या माणसाची स्वप्नेही काय असणार? भिक्षुकी किंवा टेलरिंग असे पर्याय त्यांनी स्वतःला दिले होते. पण मार्क्स चांगले पडले म्हणून डिप्लोमा केला. पैसे नसल्याने पुढे शिकता आलं नाही. नंतरचं आयुष्य केवळ अपरिमित कष्ट. गादी घ्यायला पैसे नाहीत तर पेपर टाकून त्यावर झोपायचे. आईने मोठ्या घरातली असूनही साथ दिली. दोघांनी गरीबीत दिवस काढले. पण आज बाबा एका कंपनीत फार मोठ्या पदावर आहेत. त्यांची वृत्तीच समाधानी असल्याने त्यांना ते सुद्धा खूप वाटतं. पण आम्हाला सतत खंत वाटते की आमच्या बाबांनी इंजिनिरिंग केलं असतं तर आज ते कुठे असते.

आपल्याकडे नसलेल्या पाठबळाची जागा ह्या लोकांनी प्रचंड कष्ट करून भरून काढली. मला तर कधी कधी वाटतं अशीच लोकं फार पुढे जातात. आपण सगळं काही हाताशी असून फार काही दैदिप्यमान केलंय असं नाही. ह्या लोकांनी मात्र पाठीवर सगळ्या जबाबदार्‍यांचं ओझं घेऊन वाटचाल केलीये. हे खरं यश!

जुइ's picture

28 Aug 2017 - 11:58 pm | जुइ

अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे तुमच्या मित्राचे आणि खूप कष्ट करायची तयारी देखिल. त्यांना योग्य वेळी इतरांकडून मिळालेली मदतही बहुमोल ठरली.

आतिवास's picture

29 Aug 2017 - 11:21 am | आतिवास

प्रेरणादाची जगणं आणि विचार.
तुमच्या मित्राला लिहितं करा अशी विनंती . खूप सकस वाचायला मिळेल याची खात्री आहे.

मित्राचे नाव दिले नाहीत ते बरोबर आहे पण त्या खाजगी क्लासचालका नाव मात्र द्या लेखात. त्यांचा रोल खुप महत्वाचा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2017 - 9:14 pm | अत्रुप्त आत्मा

ग्रेट! __/\__

नूतन सावंत's picture

30 Aug 2017 - 11:21 am | नूतन सावंत

तुमचा मित्र आणि त्यांचे गुरू याना सादर प्रणाम.

इरसाल कार्टं's picture

30 Aug 2017 - 3:09 pm | इरसाल कार्टं

ग्रेट आहे हो तुमचा मित्र.

सप्तरंगी's picture

30 Aug 2017 - 7:22 pm | सप्तरंगी

त्याचे, क्षचे, पाय अजूनही जमिनीवर आहेत , तो आजही विलासी वृत्तीच्या आहारी गेला नाही याचा आनंद वाटला.

मित्रहो's picture

31 Aug 2017 - 8:24 pm | मित्रहो

प्रेरणादायी उदाहरण आहे तुमच्या मित्राचे.

पाटीलभाऊ's picture

4 Sep 2017 - 9:53 am | पाटीलभाऊ

अत्यंत प्रेरणादायी...आणि मुख्य म्हणजे क्ष चे पाय अजूनही जमिनीवर आहेत _/\_