ये कश्मीर है - दिवस सहावा - १४ मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
17 Jun 2017 - 6:22 pm

काहीही पहायचे नाही, फक्त निरूद्देश भटकायचे, आपण थांबलो आहोत ते शहर अनुभवायचे असा एक तरी दिवस सहलीत असायलाच हवा असं माझं आपलं एक प्रामाणिक मत आहे.(अर्थात हाताशी असलेला वेळ नि पहायच्या ठिकाणांची यादी पाहता हे गणित प्रत्येक सहलीत जमणे अवघडच.) आज दिवसभरात आपल्याला काहीही करायचे नाही ही भावना सुखद असते, सहलीच्या वेळी तर ती आणखीनच सुखद बनते.

हे किंवा ते पहायचे आहे असा आमचा आजचा काहीही कार्यक्रम नव्हता. काही चांगले पाहण्यासारखे असले तर पहावे किंवा खुशाल खोलीत लोळत पडावे अशी आजची योजना होती. पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी. मात्र असे असले तरी स्थानिक व्यावसायिकांनी त्यांच्या सुपीक डोक्यातून पहायची अनेक ठिकाणे 'निर्माण' केली आहेत. आणि ही ठिकाणे आडबाजूला, डोंगरात असल्याने तिथे गाडीने जाण्याचा पर्याय उपलब्ध नाही - तिथे घोड्यांनीच जावे लागते. (किंवा मग पायी.) पायी फिरायला आम्ही अर्थातच राजी नव्हतो. घोड्यांनी फिरायला माणशी 1200 रुपये असा जबरदस्त दर होता. अपरिचित, अप्रसिद्ध आणि ज्यांबाबत काहीही खात्री देता येत नाही अशा ह्या ठिकाणांसाठी एवढे पैसे देण्यास आम्ही अजिबात तयार नव्हतो. तेव्हा आम्ही दिवस हॉटेलमधेच घालवण्याचा निर्णय घेतला. काल आम्ही ज्या हॉटेलमधे उतरलो होतो त्याचे आरक्षण एकाच दिवसाचे होते तेव्हा आम्ही सगळे सामान आवरले आणि नव्या हॉटेलात पोचलो. नवी खोली पाहिली आणि दिल खुश झाले. आजची आमची खोली पाहता तिच्यात वेळ घालवणे हाही एक आनंददायी अनुभव ठरणार होता. आतून पूर्णपणे लाकडाने सजवलेली ही खोली हॉटेलच्या तिस-या मजल्यावर होती. खोलीच्या मागे एक ओढा खळखळत वाहत होता. खोलीतून दिसणारे दृश्य अप्रतिम होते. बर्फाछादित डोंगर, त्यांवरचे मोठमोठे पाईनचे वृक्ष आणि तळाशी असलेली हिरवळ. तासनतास पाहत रहावे असे.

दुपारी जरा गाव पाहून यावे ह्या हेतूने आम्ही गाडी काढली आणि पेहेलगाम बाजारपेठेत गेलो. तिथेच एका चांगल्याशा हॉटेलात जेवण केले आणि मग खोलीवर येऊन मस्त ताणून दिली.

संध्याकाळी आजूबाजूला कुठेतरी फिरून यावे आणि तिथेच चहा मारावा असे ठरले. आम्ही रमतगमत गावाच्या दिशेने चालू लागलो. पडावे की पडू नये हा निर्णय करणे पर्जन्यदेवींना अवघड जात असावे, त्यामुळे त्या सारख्या येजा करत होत्या. सगळीकडे अगदी चिकचिक होती. आम्ही एका लहानशा टपरीत शिरलो आणि चहा मागवला. चहा चांगला होता, पण आपल्यासारखी मजा आली नाही. सर्वोत्कृष्ट चहा प्यावा तो महाराष्ट्रातच या कुणीतरी मोठ्या माणसाने (म्हणजे मीच) म्हटलेल्या विधानावर शिक्कामोर्तब झाले.

परत जाताना एक मनुष्य कांगडी पोटाशी घेऊन जाताना दिसला. त्याला कांगडीविषयी विचारल्यावर त्याने उत्साहाने तिची माहिती दिली. कांगडी म्हणजे चालतीफिरती शेकोटी. वेताने बनवलेल्या, फुलदाणीसारख्या आकाराच्या ह्या कांगडीत एक मातीचे भांडे असते ज्यात विस्तव ठेवला जातो. थंडी आली की कांगडीत विस्तव किंवा जळत्या गोव-या टाकायच्या, ती पोटाशी धरायची आणि आपला पायघोळ अंगरखा तिच्याभोवती लपेटून घेऊन चालू पडायचे, मग – थंडीची काय बिशाद? [कांगडीविषयी अधिक माहिती या दुव्यावर उपलब्ध.]

रात्री जेऊन आल्यावर आम्ही उबदार बिछान्यात शिरलो आणि बराच वेळ पत्ते खेळत बसलो. नंतर पाण्याचा आवाज ऐकता ऐकता झोप कधी लागली ते कळलेच नाही.

उद्या? जिवाचे पेहेलगाम!

प्रतिक्रिया

सगळे भाग एकत्र वाचले. केवळ छानछान न लिहिता सर्व अनुभव व्यवस्थित लिहिले आहेत हे आवडले. कश्मिरला कधी जाणार नाही,बर्फासाठी तर नाहीच त्यामुळे लेखनावर भागवतो. तिकडच्या फसवाफसवीच्या किश्शांचा इतरांना नक्कीच उपयोग होईल. सावधान राहतील

जुइ's picture

21 Jun 2017 - 12:20 am | जुइ

तुम्ही लिहिल्या प्रमाणेच आम्हालाही कश्मिर सहलीत आवाच्या सव्वा पैसे स्थानिक गाडीवाल्यांकडून उकळण्याचा अनुभव आला आहे. असेही वाटते की कश्मिर मध्ये उपजीविकेचे साधन पर्यटन सोडल्यास इतर पर्याय कमी असावेत. अर्थात म्हणून या गोष्टीचे समर्थन करता येत नाही.

तुम्ही केलेली निरउदैश भटकंतीची मजाही काही औरच असते. त्यासाठी सहलीत थोडा मोकळा वेळ अवश्य असावा लागतो.

पुढील भाग लिहीत राहा.