ये कश्मीर है - दिवस पाचवा - १३ मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
20 May 2017 - 6:02 pm

'रात गई बात गई' हे वाक्य गुलमर्गने ऐकले नसावे, कारण आज आम्ही उठलो तर हवा अगदी कालसारखीच होती. 'नऊ वाजता गुलमर्ग गोंडोलाची तिकीटखिडकी उघडते, वेळेआधी अर्धा तास तिथे पोहोचायला हवे, नाहीतर रांग मारुतीच्या शेपटीसारखी वाढत जाईल आणि मग रखडपट्टी! गोंडोला उरकून आपल्याला आज पेहेलगामला पोहोचायचे आहे' हे गणित पुरते लक्षात असल्याने मी आळस झटकला आणि आवरायला सुरुवात केली. बाथरूमात गरम पाण्याची वेगळीच गंमत होती. पाणी जेव्हा गरम येत होते तेव्हा ते पुरेसे येत नव्हते आणि जेव्हा पुरेसे येत होते तेव्हा गरम येत नव्हते. तशाही परिस्थितीत आम्ही आंघोळी उरकल्या. गुलमर्ग मध्ये आमचा मुक्काम एकच दिवस असल्याने आम्हाला हा बंगला आज रिकामा करायचा होता; तेव्हा आवराआवरी बरीच होती. तिकीटखिडकी हॉटेलजवळच असल्याने बाकीच्यांनी राहिलेले आवरावे आणि मी तिकिटांच्या रांगेत उभे रहावे असे ठरले. तेव्हा मी निघालो आणि रांगेत जाऊन थांबलो. सुदैवाने रांग अजूनही बाल्यावस्थेतच होती.

गुलमर्ग रज्जूमार्ग हा आशिया खंडातला सगळ्यात लांब आणि उंच असा रज्जूमार्ग आहे. 'गुलमर्ग ते कुंगडूर' आणि 'कुंगडूर ते अपरवथ' अशा दोन टप्प्यांत हा रज्जूमार्ग बांधला गेला आहे. गोंडोल्याचा दुसरा टप्पा पार करतो तेव्हा आपण ४२०० मी अर्थात १३७८० फूट एवढी मोठी उंची गाठलेली असते. इतकी प्रचंड उंची गाठत असल्यामुळे ह्या रज्जूमार्गाचा पहिला टप्पा पार करण्यास ९ तर दुसरा टप्पा पार करण्यास तब्बल १२ मिनिटे लागतात. मागे लिहिल्याप्रमाणे गुलमर्गला निसर्गसौंदर्याची देणगी आहेच, पण आताशा ते प्रसिद्ध झाले आहे या गोंडोल्यासाठी.

मी रांगेत थांबलो असताना इतर प्रवाशांशी थोड्या गप्पा मारल्या. रांगेत अमरावतीवरून आलेले एक मराठी गृहस्थ होते. ते काश्मीर चक्क बसने फिरत होते. माता वैष्णोदेवी करून ते आता श्रीनगरमार्गे गुलमर्गला आले होते. जम्मू ते श्रीनगर हे अंतर पार करायला लागलेला वेळ त्यांनी सांगताच मी हबकलोच. हे अंतर पार करायला त्यांना एकूण १६ तास लागले होते. (आम्ही अडीच तासांच्या विमानप्रवसातही वैतागलो होतो!)

तेवढ्यात अचानक ’गोंडोल्याचा दुसरा टप्पा आज बंद आहे’ अशी बातमी कानावर पडली नि मला काळजी वाटू लागली. एवढ्या लांब येऊन फक्त पहिला टप्पा करूनच परत जावे लागणार की काय? थोड्या वेळातच तिकीटघर उघडले आणि तिकीटांची विक्री सुरू होताच एक सुवार्ता कळली; गोंडोल्याचा दुसरा टप्पा चालू होता. मी पटकन तिकिटे काढली. घरातले बाकीचे लोकही तोपर्यंत तिथे पोहोचलेच होते, तेव्हा आम्ही सगळे तत्परतेने गोंडोल्याच्या दिशेने धावू लागलो. गोंडोला जिथून सुटतो त्या लाकडी इमारतीचे काम चालू होते. (आत्ता गेल्यास ती इमारत बनून तयार झालेली दिसावी.) आम्ही धावतपळत त्या इमारतीत शिरलो. एवढी धावपळ करून आलो असलो तरी ह्या इमारतीत आमच्या आधी बरेच लोक हजर होते. (मगाशी तिकीट घेताना तर नव्हते, हे एवढे लोक अचानक कुठून उगवले असावेत?) त्यांच्याशी किंचीत धक्काबुक्की करत आम्ही रांगेत उभे राहिलो. मात्र रांग वेगाने पुढे सरकली आणि सुमारे १० मिनिटे वाट पाहिल्यानंतर आम्ही गोंडोल्यात प्रवेश करते झालो.

अखेर जगप्रसिद्ध गुलमर्ग गोंडोल्याचा आमचा प्रवास सुरु झाला! घुर्र घुर्र असा आवाज करत गोंडोला वरवर जाऊ लागला. आम्ही जिथे गोंडोल्यात शिरलो ती लाकडी इमारत हळूहळू लहान होताना दिसू लागली. पाइनची उंचच उंच झाडे, लांबवर दिसणारे गुलमर्ग शहर, इथे तिथे मागे राहिलेली बर्फाची ठिगळे हे सारे आम्ही पहातच होतो तोवर गोंडोल्याचा पहिला टप्पा आलाही.

आई व बाबा दुस-या टप्प्यावर येणार नसल्याने (हा एक चुकीचा निर्णय होता हे आम्हाला नंतर कळले) आम्ही परत आल्यावर त्यांना कुठे शोधायचे ते ठरवून घेतले आणि दीड-दोन तासांत भेटू असे म्हणून त्यांचा निरोप घेतला. गोंडोल्याच्या दुस-या टप्प्यावर जाण्यासाठीही फारशी गर्दी नव्हती, तेव्हा आम्ही लगेचच आत शिरलो आणि अफरवात पर्वताकडे आमचा प्रवास सुरू झाला.

प्रामाणिकपणे सांगायचे तर गुलमर्ग गोंडोल्याची सगळी मजा या दुस-या टप्प्यातच आहे. आम्ही वर जाऊ लागलो तसतशी झाडे हळूहळू कमी होऊ लागली आणि सगळीकडे बर्फच बर्फ दिसू लागले. ज्या डोंगरावर गोंडोला बांधला आहे त्याची चढणही आता तीव्र होऊ लागली. बर्फाचे ते सरळसोट कडे पाहून नाही म्हटले तरी थोडीशी भिती वाटलीच. आणि अचानक गोंडोला थांबला! बाहेर पाहिले तर थर्माकोल घासल्यावर त्याचे जसे लहान गोळे उडतात तसे लहानसे पांढरे गोळे उडताना दिसत होते, बर्फवृष्टी सुरू झाली होती! मघाशी ’वर हवामान चांगले नाही’ असे कुणीतरी म्हटले होते त्याची आठवण झाली. नेमके काय झाले असेल वर? गोंडोला बंद तर पडला नाही? आणि तो परत सुरूच झाला नाही तर? मग आपले काय? आपण असेच लटकत राहणार की काय? एवढे सगळे विचार झर्रकन येऊन जाताहेत तेवढ्यात गोंडोला परत सुरू झालाही.

काही वेळातच गोंडोला वर पोचला आणि आम्ही गोंडोल्याच्या बाहेर आलो. तिथले ते दृश्य पाहून मी क्षणभर थबकलो. गोंडोल्याने आम्हाला बर्फाने पूर्णपणे झाकून टाकलेल्या एका पर्वतशिखरावर आणून सोडले होते. इथे सगळीकडे फक्त बर्फ होता. इकडे तिकडे, वर खाली - बर्फ, बर्फ आणि फक्त बर्फ. बर्फ मी आयुष्यात आधी पाहिला असला तरी ’फुलोंकी घाटी’ मधला बर्फ ग्लेशियरचा बर्फ होता आणि कालचा सोनमर्गचा काळपट रंगाचा, खराब झालेला बर्फ. या बर्फाची मात्र रीतच न्यारी होती. हा बर्फ होता आकाशात दिसणा-या ढगांच्या रंगाचा, एकही डाग नसलेला. `पांढराशुभ्र` हा शब्द या बर्फाला पाहूनच बनला असावा असे वाटायला लावणारा.

आम्ही त्या बर्फात शिरलो. बर्फ ताजा, भुसभुशीत असल्याने पाय त्यात रूतत होते आणि चालायला त्रास होत होता. आम्ही तसेच चालत राहिलो. दूरवर काही खडक होते, आम्ही त्या दिशेने निघालो. तिथे पोचल्यावर मी चारही दिशांना नजर टाकली. आजूबाजूला दिसणा-या सगळ्या पर्वतांमधे आमचा हा अफरवात पर्वत सगळ्यांत उंच होता. (हे शिखर मी काही चढून आलो नव्हतो, तरी मनाला उगीचच थोडे बरे वाटले.) तेवढ्यात ढग दूर झाले आणि वरूणराजांनी दर्शन दिले. वरूणराजांचे आगमन होताच सगळे हिम अगदी चकाकू लागले. त्या तकाकीने डोळ्यांना त्रास होऊ लागला. बर्फ असल्याने आम्ही इथे गरम कपडे घालून आलो होतो तेव्हा थोडे उकडूही लागले. पण अचानक ढगांनी पुन्हा एकदा वरूणराजांवर कडी केली आणि वातावरण पुन्हा ढगाळ झाले.

मी आजूबाजूला पाहिले. स्लेड गाड्यांचा राक्षस इथेही होताच, शिवाय बर्फ भरपूर असल्याने इथे स्कीईंगचीही सोय होती. लोक बर्फात खेळत होते, बर्फाचे गोळे एकमेकांना मारत होते. आम्ही वर एका बाजूला आलो होतो, ते पाहून काही लोक आमच्या दिशेने येऊ लागले. त्यात एक पोक्त माणूसही होता. तो माझ्याजवळ आला, `सिगारेट घेणार का?` सिगारेटचे खोके दाखवत त्याने विचारले. मी धूम्रपान करत नाही, तेव्हा मी त्याला नाही म्हटलो. धूम्रपान मला पसंत नाही, पण खरे सांगायचे तर मला त्या क्षणी त्याचा हेवा वाटला. या बर्फाच्छादित शिखरावर, या अतीशीत वातावरणात सिगारेटचे गरम गरम झुरके घेण्याची मजा काही औरच होती!

आणि तेवढ्यात, ही सगळी मजा कमी होती म्हणून की काय, हिमवृष्टी सुरू झाली. बर्फाचे ते इवलेसे गोळे आमच्या डोक्यावर, दगडांवर हळूहळू आदळू लागले आणि जिथे पडतील तो पृष्ठभाग धवल रंगात रंगवू लागले. वा-याने धूर वाहून न्यावा तसे ते चिमुकले गोळे वरून आमच्याकडे उडत येऊ लागले. दूरवर कुठेतरी जन्मलेले व्हायोलिनचे स्वर हवेबरोबर तरंगत येतात तसे. मी एका दगडावर बसलो आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या हिववर्षावाची मजा लुटू लागलो.

आम्ही जवळजवळ एक तास त्या शिखरावर होतो. माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम तास जर मी कधी काढले तर त्यांमधे या तासाचा नंबर बराच वरचा असेल. पण एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अंत कधीतरी होतोच. अफरवात पर्वतशिखरावरची आमची वेळ आता संपत आली होती. पहिल्या टप्प्यावर आईबाबा आमची वाट पहात होते - पाहण्यासारखे किंवा करण्यासारखे तिथे काहीच नसल्याने ते कंटाळले असणार होते. त्यांना बरोबर न आणून आम्ही मोठी चूक केली होती. इथली चढाई अवघड असेल, इथली थंडी आपल्याला मानवणार नाही अशी एक भिती त्यांना वाटत होती. इथे आल्यावर आम्हाला जाणवले की ती निराधार होती. त्यांच्या वयाचे काय, त्यांच्यापेक्षा वृद्ध असे अनेक नागरिक इथे आम्हाला मजा करताना दिसत होते. ’आईबाबांना वर आणायला हवे होते’ असे एकमेकांना सांगत आम्ही खाली निघालो. गोंडोल्यांच्या इमारतीकडे जाताना उजवीकडे भारतीय सैन्याचा तळ दिसला. मी मनोमन त्यांना सलाम केला आणि निघालो.

पहिल्या टप्प्यावर आईबाबांना भेटलो तर आमच्या अंदाजानुसार ते कंटाळले होते. (तिथे पडत असेलेल्या पावसाचा या कंटाळ्यात मोठा वाटा होता.) आम्ही सगळे निघालो. खाली जाणारा गोंडोला पकडून काही मिनिटांतच गुलमर्गला पोचलो. सज्जादसाहेबांना शोधून आम्ही पेहेलगामकडे निघालो तेव्हा २ वाजून गेले होते.

बर्फाच्छादित शिखरांवरून विमानातून उडत असताना “या शिखरांवर जर कुणी आपल्याला अलगद उतरवलं तर!” असा एक विचार नेहमी माझ्या मनात येत असे. आज गुलमर्ग गोंडोल्याने मला तो अनुभव मिळवून दिला होता. आमची गाडी पेहेलगामच्या दिशेने धावत असली तरी मी मनाने अजून अफरवात पर्वतावरच होतो!

गुलमर्गमधून निघाल्यावर आम्ही वाटेत एका लहानशा हॉटेलात जेवण केले. पावसाची भुरभुर चालू होतीच. थोडे पुढे आल्यावर मात्र तो थांबला.

गुलमर्गहून पेहेलगामला जाण्यासाठी पुन्हा श्रीनगरमधेच यावे लागते. सज्जादशी गप्पा मारताना कधीतरी आम्ही त्यांना त्यांच्या घराविषयी विचारलं असावं. श्रीनगरमधून जाताना एका चौकात आल्यावर “आपको मेरा घर देखना था ना? अभी चलते हैं? यहीं पास हैं.” असं त्यांनी म्हटल्यावर आम्ही लगेच तयार झालो. एका सामान्य काश्मिरी माणसाचे घर कसे असते हे पहायची उत्सुकता आम्हालाही होतीच. आम्ही त्याच्या मुलांसाठी थोडी चॉकलेटस्, बिस्कीटे घेतली आणि निघालो. एका दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर सज्जाद रहात होता. तो, त्याची दोन मुले, आई नि त्याची बहीणही त्यांच्यासोबत रहात होती. घर फारसे मोठे नव्हते. 3 खोल्या असाव्यात. हॉलमधे खालीच गाद्या टाकल्या होत्या, त्यावर आम्ही बसलो. सज्जादने बोलवल्यावर त्यांची आई नि बहीण आमच्याशी गप्पा मारायला आल्या. सज्जादची बहीण तर बरीच बोलघेवडी होती. माझे वडील सिव्हिल इंजिनियर आहेत हे कळल्यावर ती म्हटली, “भाईसाहेब, मेरा एक काम है आपके पास. मुझे एक नया मकान बनवाना है. आप मुझे उसकी ड्रॉइंग्ज बनाके देंगे?” गेल्या वर्षीच्या पुरात तिच्या घराचं बरंच नुकसान झाल्यामुळे तिला आता ते परत बनवायचे होते. माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते, आर्किटेक्ट नव्हते. आणि पुण्यातून तिला हे प्लॅन वगेरे पाठवणार कसे? “अरे नक्की नक्की.” काहीतरी म्हणून आम्ही वेळ मारून नेली. थोड्या वेळात सज्जादची पत्नी चहा घेऊन आली. बरोबर चविष्ट रोट होते. तिथे आणखी थोडा वेळ थांबून आम्ही निघालो.

श्रीनगरहून पेहेलगामला जाताना `पांपोर` नि `अवंतिपूर` गावे लागतात. आधी लागले पांपोर. सा-या जगभर हे गाव प्रसिद्ध आहे तिथल्या केशरासाठी. इथल्या सगळ्यात प्रसिद्ध दुकानासमोर सज्जादने आमची गाडी उभी केली. मालक केशराची चक्क एक मोठी बरणी घेऊन समोर बसले होते. गंमत म्हणजे हीच बरणी समोर ठेवलेला त्यांचा फोटो दुकानाच्या दर्शनी भागात झळकत होता. (200 रुपये प्रति ग्रॅम या दराने त्या बरणीची किंमत दोनेक लाख सहज होत असावी. ती पळवता आली तर काय बहार येईल असा एक व्रात्य विचार चटकन माझ्या मनात येऊन गेला.) केशरासोबतच खुर्बानी, जर्दाळू, सुके अंजीर असा स्थानिक नि आयात केलेला इतर सुकामेवाही होता. हो आणि काश्मीरचा तो प्रसिद्ध चहा `काहवा` अर्थातच होता. स्वत:साठी व इतरांना भेट देण्यासाठी सुकामेव्याची भरपूर खरेदी झाली. `खाऊन तर पहा` असे म्हणत मालक वेगवेगळ्या सुक्यामेव्याने भरलेली वाटी प्रत्येक गि-हाईकासमोर ठेवत होते, तेव्हा (फुकटची) खादाडीही बरीच झाली. असो, खिसा हलका करून नि बॅगा जड करून आम्ही निघालो.

नंतर आले अवंतिपूर. हे आम्ही परत येताना पाहणार होतो; तेव्हा ते मागे टाकून आम्ही पुढे निघालो. पेहेलगामला पोहोचलो तेव्हा बराच उशीर झाला होता. आम्ही हॉटेलात शिरलो आणि ताजेतवाने झालो. आज काहीही स्थलदर्शन नव्हते तेव्हा जेवणानंतर झोप हाच कार्यक्रम होता. आम्ही गरमागरम बिछान्यात शिरलो ते बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारीची स्वप्ने पाहतच!

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

20 May 2017 - 8:58 pm | संजय क्षीरसागर

घरबसल्या अफरवातची मजा आली :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 May 2017 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सफर. चहूबाजूला पसरलेल्या ताज्या पांढर्‍याशुभ्र बर्फवर्षावाच्या जादूची मजा काही औरच असते ! तुमच्या लेखनात ती उतरली आहेच.

पद्मावति's picture

21 May 2017 - 1:41 am | पद्मावति

सुरेख!

एकदम सही लिहिलंय. पुभाप्र.

हे प्रकरण जरा धोकादायक ठरू शकते असे आहे.
झाले असे की आम्ही शिखरावर असताना पाऊस सुरु झाला. धो धो वगैरे नव्हता, पण होता. वर थांबावे असे ठिकाण नाही त्यामुळे समस्त लोक गोंडोला पकडायला धावले आणि ही...गर्दी झाली - अगदी ८:२३ ची लोकल पकडायला ठाण्याच्या एक नंबर फलाटावर व्हावी तशी, खचाखच. त्या पॉइंटला, जिथे कार्स (लेखातील पहिल्याच चित्रात दिसताहेत त्या) तुम्हाला सोडतात तिथे थांबायला अशी जागा नाही. लोक उतरतात व चालू पडतात आणि परतीचे लोक काही गर्दी करून परत जात नाहीत, फुरसतीने जातात. त्यामुळे सामान्यपणे गर्दी होत नाही (नसावी). ह्या कार्स संपूर्ण थांबत नाहीत लोकांना घ्यायला किंवा उतरवायला. पण वेग इतका कमी असतो की चढणे उतरणे सोपे असते. पण जर एका कारमध्ये चढायला १५-२० लोक धावले तर काय होईल? मग लोकांनी काय केले तर जिथे चढायला म्हणून जागा केली आहे त्याही पलीकडे जाऊन कार पकडायला सुरुवात केली. पण पलीकडे जायला जेमतेम दीड-दोन फूट रुंदीची वाट होती - तीही कशी तर डावीकडे भिंत आणि उजवीकडे सतत जात असलेल्या कार्स ह्या दोहोंच्या मध्ये जी काही होती तेवढीच! पण तिथूनही लोक चालले आपले पलीकडे. मला खरे तर जायचे नव्हते तसे पण पुन्हा मुंबई लोकल! तुम्ही गेला नाहीत तर ढकलले जाता पुढे. मीही तशीच चालती कार पकडली. दुसरा एकजण दरवाजात अडकला कारण कारचे दरवाजे बंद होतात (पण कार काही पुढे जायची थांबत नाही). मग आमच्यातील काही पुढे गेले, काही खूप नंतर आले.
सारांश, लहान मुले, वयस्कर मंडळी इ. बरोबर असतील तर हवामान वगैरे बघून जरा जपूनच जावे हे श्रेयस्कर. Because safety & risk management have never been our serious concerns.

एस's picture

21 May 2017 - 11:35 pm | एस

बापरे! :-O

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 May 2017 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

कठीण आहे ! =O

तेथे केबल कारमध्ये लोकांना शिस्तीने बसवायला रोपवेचे कर्मचारी असतात की नाही ?

रविकिरण फडके's picture

22 May 2017 - 5:47 pm | रविकिरण फडके

"तेथे केबल कारमध्ये लोकांना शिस्तीने बसवायला रोपवेचे कर्मचारी असतात की नाही?"
वरील प्रसंग घडला तेव्हा फक्त १-२ कर्मचारी होते. (पहिल्या दोन पॉईंटवर भरपूर होते, की ज्यांच्यशिवाय प्रचंड अनागोंदी झाली असती.) मुख्य म्हणजे, पहिल्या दोन पॉईंट्सवर लोकांना रांका लावायला मुबलक जागा आहे तशी ती शेवटच्या टप्प्यावर नाही. तिथे ती अगदीच कमी आहे. म्हणजे कर्मचारी असले तरी, पुन्हा तशाच प्रसंग आला (पाऊस, हिमवर्षाव, अन्य काही) तर रेटारेटी अपरिहार्य आहे. बाहेर आणखी एक शेड वगैरे बांधली तर. नपेक्षा केव्हातरी दुर्घटना अटळ आहे.

वरुन खाली येत असताना आम्ही आमच्या कार मधुन उतरत असतानाच मागुन येणारी केबलकार आमच्या कारला येऊन धडकली होती. तिथं तक्रार ऐकुन घ्यायला सुद्धा कोणी नसतं आणि याची सेफ्टी इन्सीडंट म्हणुन काहीही नोंद घेतली गेली नाही.

प्रचेतस's picture

22 May 2017 - 7:12 am | प्रचेतस

फोटो आणि वर्णन उत्तम

पैसा's picture

22 May 2017 - 11:05 am | पैसा

मस्त!

चौकटराजा's picture

24 May 2017 - 6:20 pm | चौकटराजा

जम्मू ते श्रीनगर हा प्रवास रमणीय व भयानक दोन्ही आहे. ते सोळा तास कसे गेले हे रमणार्‍या माणसाला कळत देखील नाही. जम्मू - उधमपूर- पटनी टॉप-बागलीहार धरण -रौद्र अशी बनिहाल पास- मुंडा मग काश्मीर खोर्‍याचे एकदम दर्शन - संगम- ते श्रीनगर या प्रवासात फार काही पहायला मिळते. असा प्रवास टाळून विमानाने श्रीनगरला जाणे म्हण्जे बरेच काही गमविण्यासारखे आहे.

इडली डोसा's picture

25 May 2017 - 5:26 am | इडली डोसा

सुंदर वर्णन, तुमच्या लिखाणातुन काश्मिरच्या पुनर्भेटीचा अनुभव घेता येतोय.

अत्रे's picture

25 May 2017 - 5:47 am | अत्रे

वर्णन आवडले!

हा गोंडोला बराच जुना आहे असे वाटते

Work on Gulmarg Gondola Project (Phase-I and Phase-II) was taken up for execution by the Government of Jammu and Kashmir through Department of Tourism in the year 1987 and the work for supply, erection, installation and commissioning was awarded to the French Company, namely, M/S Pomagalski of France In the year 1988, the Government of J&K established J&K State Cable Car Corporation under the Companies Act, 1956 with an authorized capital of Rs. 2500.00 lacs to pursue the following main objectives, as laid down in its Memorandum of Articles and Association:-

http://gulmarggondola.com/about_gondola.php

अत्रे's picture

27 Jun 2017 - 5:00 pm | अत्रे

डेंजर आहे!

At least seven people were killed after a tree fell on a cable car in Gulmarg on Sunday.

The tree, uprooted by strong winds, fell on the ropeway of Gulmarg Gondola and severed the lines due to which the cable car came crashing to the ground,

http://indianexpress.com/article/india/gulmarg-gondola-baramulla-jammu-a...