कृतज्ञ मी

Primary tabs

शामसुता's picture
शामसुता in लेखमाला
8 Mar 2017 - 6:41 am

.

महिला दिनाच्या अंकात आपल्याला कसं सहभागी होता येईल हा विचार डोक्यात सुरू होता. रेडिओवर मस्त गाणी सुरू होती.. एक गाणं कानावर पडलं.. 'बहोत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में हुजूर आप आये..' आणि मनात असा विचार आला की माझ्या आयुष्यात अशा कोण कोण व्यक्ती आहेत, ज्यांना मला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.....

हल्ली वर्तमानपत्रात, टी.व्ही.-रेडिओवर सगळीकडे मुलींवर, महिलांवर होणारे अन्याय, विनयभंग, बलात्कार अशा बातम्या नेहमी वाचायला-ऐकायला मिळतात. खूप त्रास होतो हे सगळं ऐकून. पण मग हल्लीच हे सगळं वाढलंय का? आधी माझ्या लक्षातही आलं नाही की अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. अशा घटनांमध्ये अन्याय करणाऱ्या व्यक्ती बर्‍याचदा जवळच्या किंवा ओळखीच्या असतात, या गोष्टींचं सगळ्यात जास्त वाईट आणि धक्कादायक वाटतं. कधी काका, मामा, दीर आणि काही वेळा तर वडीलही. मग वाटून गेलं की माझं आयुष्य सुंदर बनवणाऱ्या पुरुषांबद्दल लिहावं का?

आमचं एकत्र कुटुंब होतं. घरात वडील, आजोबा, काका होते. पण मला किंवा माझ्या बहिणीला कधीच त्यांचा धाक, भीती वाटली नाही. किंबहुना आम्हाला त्यांची भीती वाटावी असं ते कधी वागलेच नाहीत, असं म्हणणं जास्त योग्य होईल. आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ असं असूनही घरात आम्हा दोघींचे जास्त लाड होत असत. माझे वडील (आम्ही त्यांना अण्णा म्हणतो) महविद्यालयात प्राध्यापक होते. मात्र अभ्यासासाठी किंवा मार्क्ससाठी त्यांनी माझ्यावर कधी दबाव आणलाय, असं मला आठवतही नाही. उलट अभ्यासाव्यतिरिक्त मी एखादी कला शिकावी असा त्यांचा आग्रह होता. मला गाणी ऐकायला आवडतात म्हणून रेडिओ, एफएम, टेप रेकाॅर्डर सगळं आणून दिलं. आमच्यासाठी पुस्तक ते नेहमीच आणायचे, पण मी जेव्हा मोठी होत होते, तेव्हा खास मुलींनी वाचावीत अशीही पुस्तक ते आवर्जून आणायचे.

बारावीत कमी गुण मिळाले, म्हणून निराश झाले होते मी. अगदी निराश झाले होते. तेव्हा अण्णा, काका घरातल्या सगळ्यांनीच खूप समजून घेतलं. त्यानंतर पुढील प्रवेशसाठी प्रवेश परीक्षा द्यायला मी आणि आण्णा मुंबई, पुणे, सांगलीला गेलो, तेव्हा तर मात्र मजा केली आम्ही दोघांनी. आता आलोच आहोत तर फिरू या, असं म्हणून बरंच फिरवलं त्यांनी मला.

भाऊ मोठा असो की छोटा, त्याचं बहिणींवर नेहमीच बारीक लक्ष असतं. माझ्यापेक्षा लहान असूनही माझा भाऊ अडचणीच्या वेळी नेहमी माझ्या मदतीला हजर असतो. लहानपणी मी आणि माझा भाऊ (गणेश) खूप भांडायचो, अजूनही भांडतो कधीकधी. पण काही अडचण आली की सगळ्यात आधी मला त्याचीच आठवण येते. एकदा माझा मुलगा खूप आजारी होता, अॅडमिट करावं लागलं त्याला. त्या पाच दिवसांत गणेश सतत माझ्याबरोबर होता. खूप आधार वाटला तेव्हा त्याचा. नवीन घर घेताना, गाडी घेताना अशा सुखाच्या आणि दुःखाच्या असंख्य प्रसंगी माझा भाऊ नेहमी माझ्याबरोबर असतो.

माझे दोन्ही मामा आणि मी, आमच्यात वयाचं अंतर कमी असल्याने आमच्यात मैत्रीचं नातं जास्त आहे. प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करायला आवडतं मला. लहानपणापासूनच माझे काका, मामा यांना मी 'अरेतुरे'च म्हणते. ए काका, ए मामा असं ऐकून इतरांना थोडं आश्चर्यच वाटतं. पण कदाचित त्याचमुळे आमच्यातलं नातं जास्त खेळकर आणि मैत्रीचं आहे. मी प्रेम-विवाह केल्यामुळे बरेचसे नातेवाईक माझ्यावर नाराज होते. सुरुवातीला काही जण आमच्याशी बोलतही नव्हते. फार त्रास व्हायचा या गोष्टींचा. अशा वेळी माझे काका, मामा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. काही प्रमाणात त्यांनाही त्रास दिला लोकांनी, पण त्याची जाणीवसुद्धा त्यांनी मला कधी होऊ दिली नाही.

लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल, याची थोडी भीतीच वाटायची. पण त्या बाबतीतही मी लकी ठरले. प्रेम-विवाह असल्याने माझ्या नवर्‍याची आणि माझी आधीपासूनच ओळख होती. खूप प्रेम, छान बाॅन्डिंग, दोघांच्या आवडीनिवडी एक हे सगळं तर आहेच, पण मला माझ्या नवऱ्याची सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तो मला देत असलेला आदर. माझ्या मनाचा आणि माझ्या मताचा तो नेहमीच विचार करतो आणि आदरही करतो. मी गृहिणी असल्याने घरातील प्रत्येक काम मीच केलं पाहिजे किंवा ठरावीक वेळेतच केलं पाहिजे असं कोणतंही बंधन माझ्यावर नसतं. गडबडीच्या वेळी, मला गरज असताना किंवा मी आजारी असताना घरातल्या प्रत्येक कामात माझा नवरा मला मदत करतो. माझे सासरे, दीर यांच्याकडूनही मला नेहमी मान मिळाला.

माझे आणि नवऱ्याचे काही सामाईक मित्र आहेत. ते जेव्हा घरी येतात, आम्ही एकत्र फिरायला जातो, तेव्हा त्यांच्याशी बोलताना मला कधीही संकोच वाटला नाही. उलट त्यांची माझ्याशी असलेली वर्तणूक पाहून आमच्यातली मैत्री आणखीनच घट्ट झाली. लग्नानंतर आमच्याकडे खूपच कमी साहित्य होतं. त्या वेळी कधी फॅन, कधी कुकर अशा अनेक मूलभूत संसारोपयोगी वस्तू आम्हाला आमच्या मित्रांनीच दिल्या. अगदी त्यांची फॅमिली ट्रिप असली, घरात काही कार्यक्रम असेल तरीही आम्ही सहभागी असतोच.

कुटुंबातल्या या सर्वांची मी कायमच ऋणी राहीनच, पण या व्यतिरिक्त आयुष्याचा महत्त्वाचा भाग असलेले माझे शिक्षक... त्यांना कशी विसरेन मी? या शिक्षकांमुळे आयुष्य सोपं, सहज, समृद्ध होत गेलं. त्याला योग्य दिशा मिळाली, अर्थ मिळाला. सगळ्यांविषयी लिहिणं शक्य नाही. अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणारे शेजारी, आरोग्याची काळजी घेताना मदत करणारे डाॅक्टर, सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणारे पोलीस आणि सीमेवरचे जवान या सगळ्यांचेच शतशः आभार मानावेसे वाटतात. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. घरात, समाजात सगळीकडेच पुरुष, त्यांचे विचार, त्यांची मत याचाच पगडा जास्त दिसून येतो. अशा वेळी केवळ एक स्त्री म्हणून आपल्याला मदत न करता एक व्यक्ती म्हणून सहकार्याच्या भावनेतून कोणी पुढे येतं, तेव्हा त्याच्यासाठी मनात कृतज्ञता निर्माण होतेच ना?

मला माहीत आहे, प्रत्येक मुलगी, स्त्री इतकी लकी नसते. वैधव्य आलेलं असूनही, सुरक्षित वाटावं म्हणून कित्येक स्त्रिया गळ्यात मंगळसूत्र घालतात, तर काही जणी आयुष्यात येणार्‍या प्रत्येक पुरुषाशी भावाचं नातं जोडतात. मलाही काही कटू अनुभव आले, पण अगदीच नगण्य. म्हणूनच मी ठरवलंय, माझ्या मुलावर असेच संस्कार करीन, त्याला अशी शिकवण देईन जेणेकरून तो मुलींचा, महिलांचा नेहमी आदर करेल.

तुम्ही म्हणाल, महिला दिन विशेषांकात हे पुरुषांचं कौतुक काय चाललंय? पण पुरुषांबद्दल नेहमी नकारात्मक, वाईट बाजूच समोर आली पाहिजे असं काही नाही ना? बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं की आजच्या काळात कोणी कोणाला विचारत नाही, अगदी रक्ताचं नातं असलं तरीही कोणी मदत करत नाही.... वगैरे वगैरे. पण आत्तापर्यंत मला जे चांगले अनुभव आले, ते इथे मांडावेसे वाटले. मुळात स्त्री आणि पुरुष सारखेच महत्त्वाचे असतात की! दोघांची एकमेकाला साथसंगत असेल, तर आयुष्याचा प्रवास अगदी सुखकर होऊन जातो. तुम्हा सगळ्यांनाही असे मित्र, सोबती मिळोत, ज्यांच्या सहवासाने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात फक्त आनंद असेल. म्हणूनच ज्यांनी मला 'स्त्री' म्हणून मान दिला, माझं 'स्त्रीत्व' जपलं, माझं आयुष्य सुंदर आणि परिपूर्ण करायला मदत केली, ते माझे जिवलग, नातेवाईक, मित्र, सहचर सगळ्यांची मी मनापासून ऋणी आहे.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

उल्का's picture

8 Mar 2017 - 4:17 pm | उल्का

मला खूप आवडला हा लेख.
अगदी मनापासून लिहिला आहेस तू.

पद्मावति's picture

8 Mar 2017 - 11:25 pm | पद्मावति

लेख फार आवडला.
लेखाचा विषय आणि मांडणी दोन्हीही.

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 12:06 pm | सविता००१

आवडला लेख

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 5:21 pm | प्रीत-मोहर

लेख आवडला शामसुता.

लिहिते रहो :)

पैसा's picture

9 Mar 2017 - 6:07 pm | पैसा

जवळपास प्रत्येक स्त्रीच्या भावना लिहिल्यास! लिहीत रहा!

अगदि मनापासून लिहिलय तुम्ही. साधं, सोप्प आणी आटोपशीर....आवडला आपल्याला...अशाच लिहीत राहा. शुभेच्छा !!!

संजय क्षीरसागर's picture

10 Mar 2017 - 12:59 am | संजय क्षीरसागर

कारण त्यात हे सुखाचं सूत्र किती सहज मांडलं आहे

मुळात स्त्री आणि पुरुष सारखेच महत्त्वाचे असतात की! दोघांची एकमेकाला साथसंगत असेल, तर आयुष्याचा प्रवास अगदी सुखकर होऊन जातो. तुम्हा सगळ्यांनाही असे मित्र, सोबती मिळोत, ज्यांच्या सहवासाने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात फक्त आनंद असेल. म्हणूनच ज्यांनी मला 'स्त्री' म्हणून मान दिला, माझं 'स्त्रीत्व' जपलं, माझं आयुष्य सुंदर आणि परिपूर्ण करायला मदत केली, ते माझे जिवलग, नातेवाईक, मित्र, सहचर सगळ्यांची मी मनापासून ऋणी आहे.

स्वतःच्या स्त्रीत्वा विषयी अशीच कृतज्ञता सर्व स्त्रीयांना लाभो !

मितान's picture

10 Mar 2017 - 8:20 am | मितान

प्रांजळ लेखन आवडले :)

छान मनापासून उतरलेला लेख.

गिरिजा देशपांडे's picture

10 Mar 2017 - 12:20 pm | गिरिजा देशपांडे

खूपच सुंदर लेख. छान लिहिलयेस. फार आवडलं.

स्नेहांकिता's picture

10 Mar 2017 - 12:27 pm | स्नेहांकिता

साधं सरळ आणि प्रांजळ कथन !

रेवती's picture

12 Mar 2017 - 11:25 pm | रेवती

लेख आवडला.

सानझरी's picture

13 Mar 2017 - 4:45 pm | सानझरी

सुंदर लेख. छान लिहिलंय..

कविता१९७८'s picture

16 Mar 2017 - 2:21 pm | कविता१९७८

लेख आवडला.

सुचेता's picture

16 Mar 2017 - 10:36 pm | सुचेता

मला खूप आवडला हा लेख.

नूतन सावंत's picture

16 Mar 2017 - 11:34 pm | नूतन सावंत

Sadhya ,sopya bhashetala mansala bhavlela lekh

शामसुता's picture

18 Mar 2017 - 3:01 pm | शामसुता

सर्व वाचकांचे आणी प्रतिसाद देणार्‍यांचे आभार.

अगदी मनापासून लिहीलेला लेख आणि म्हणूनच मनाला भिडला.

बरखा's picture

24 Mar 2017 - 5:35 pm | बरखा

मी देखिल स्वताला तुमच्या सारखि लकी समजते. लेख आवडला , मला देखिल माझ्या आयुष्यात मार्गदर्शक ठरलेल्या सासर-माहेर दोन्ही कडच्या लोकांचे आभार मानायचे आहेत. तुमचा लेख वाचुन माझा हुरुप वाढला आहे.

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2017 - 9:14 pm | चौथा कोनाडा

अगदी मनापासून लिहिलेला सुरेख लेख !
आवडला.

रुपी's picture

13 Apr 2017 - 3:34 am | रुपी

+१