समाधी मंदिर व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे त्रिशुंड गणपती महाराष्ट्रातील एक अद्वितीय मंदिर आहे. पुण्यातील तुळशीबाग, पर्वती, ओंकारेश्वर, सारसबाग गणपती मंदिर प्रसिध्द आणि लोकांना परिचित आहेत. हे मंदिर दुर्लक्षित राहण्याचे दुसरे कारण म्हणजे १८व्या शतकात नागझिरा ओढ्याच्या काठावर असण्याऱ्या सोमवार आणि मंगळवार पेठेच्या काही भागात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ.स. १६०० मध्ये शहापुरा पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशवे यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापुरा पेठेचा विकास करून सोमवार पेठ असे नामकरण केले. या पेठेत गोसावीपुरा नावाचा भाग होता. गोसावी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात होती, म्हणून ह्याला गोसावीपुरा असे म्हणत. हे गोसावी सधन होते. सावकरी, सुवर्ण-रत्न यांचा बराचसा व्यापार या गोसाव्यांच्या हातात होता. ह्या स्मशानात अनेक गोसावींच्या समाध्या होत्या. त्याकाळात समाधीशेजारी शिवमंदिर उभारण्याची प्रथा होती. मंदिरे स्मशानपरिसरात असल्यामुळे भाविकांची वर्दळ कमी होती. त्यामुळेच उत्कृष्ट कातळशिल्प असूनसुध्दा त्रिशुंड मंदिर हे समाधीमंदिर असल्यामुळे दुर्लक्षित राहिले. म्हणूनच पुण्यातील फार कमी लोकांना त्रिशुंड गणपती मंदिराची माहिती आहे आणि मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत इथे मंदिर आहे हे कळून येत नाही.
हठयोगी आणि गोसावी पंथीयांचे श्रध्दास्थळ असलेल्या त्रिशुंड मंदिराची उभारणी इंदूरजवळच्या धामपूर गावातील भीमगिरजी गोसावी ह्यांनी १७५४ ते १७५७ या काळात केली. ह्या मंदिरावर राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव आहे. त्रिशुंडी मंदिर पेशवेकालीन असले तरी ते पेशवेकालीन मंदिरांपेक्षा वेगळे आहे. पेशवेकालीन मंदिरांचे गर्भगृह दगडी व सभामंडप लाकडी असते, पण हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले आहे.
पूर्वाभिमुखी असलेले त्रिशुंड गणपती मंदिर पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिराच्या खाली तळघर असल्यामुळे हे मंदिर उंच जोत्यावर बांधले आहे. मंदिरासमोर दगडी आंगण आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पध्दतीचे स्तंभ आहेत. स्तंभांवर घटपल्लवांचे स्तंभशीर्ष कोरलेले आहेत. स्तंभांवर किर्तीमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत. स्तंभांच्या वरच्या भागात कीचक किंवा भारवाहक यक्ष कोरलेले असून यक्षांनी छताचा भाग आपल्या पाठीवर व हातांनी तोलून धरला आहे. यक्षांनी हातात साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा पकडलेल्या आहेत. स्तंभाच्या खालच्या बाजूस श्रीकृष्ण, विठ्ठल इ. देवता कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर ब्रिटीश सैनिक कोरलेले असून त्यांनी एकशिंगी गेंड्याला साखळदंडानी बांधलेले आहे. हे शिल्प भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे वर्णन करते. १७५७ साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि आसाम प्रांतावर ताबा मिळवला. आसाम प्रांताचे प्रतिक म्हणून गेंडा कोरलेला आहे. परंतु मंदिरात असलेल्या शिलालेखानुसार मंदिराची उभारणी १७५४ झालेली आहे आणि प्लासीची लढाई झाली १७५७ साली. ह्याचाच अर्थ हे शिल्प प्लासीच्या लढाईनंतर कोरले असावे आणि कारागिरांनी गेंड्याला प्रत्यक्ष बघितलेले असावे. ह्या शिल्पाच्या खाली अर्धउठावातील एकमेकांशी झुंजणारे हत्ती दाखवले आहेत. द्वारशाखेच्या खालती अधिष्ठानावर (जोत्यावर) दोन्ही बाजूला गजलक्ष्मीचे (लक्ष्मीवर दोन्ही बाजूंनी दोन हत्ती सोंडेत धरलेल्या कलशाने अभिषेक करणारे) शिल्प कोरले आहे. द्वारशाखेच्या ललाटबिंबावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती कोरली आहे. मूर्तीच्या खालच्या भागात गणेशयंत्र कोरले आहे. द्वारशाखेच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. ह्या शिल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मकरमुखातून निघालेली महिरप आहे. ह्या महिरपीच्या वर पिसारा फुलवलेला मोर आणि त्याच्या बाजूस अजून दोन मोर आहेत. महिरपीच्या दोन्ही बाजूला एकमेकांचे हात धरून उभी असलेली वानर आहेत. सर्वात वरच्या पट्टीवर विष्णूचे विविध अवतार दाखवले आहेत. ह्याच पट्टीवर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात एका साधूने स्वतःच्या हाताने दुसऱ्या साधूला खाली डोके आणि वरती अश्या स्थितीत पकडले आहे असे आगळेवेगळे शिल्प आहे. दर्शनी भागात दोन्ही बाजूंना राजस्थानी शैलीची रिकामी गवाक्षे आहेत. ह्या गवाक्षांच्यावरती पक्षी बसलेले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात सर्वात वरती शेषशायी विष्णूची मूर्ती कोरली आहे. मंदिराचे शिखर एकतर बांधले गेले नसावे किंवा पडले असावे आणि त्यामुळे शिखराच्या आतील घुमट आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या दर्शनी भागात काल्पनिक प्राणीसुद्धा दाखवले आहेत.
प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश करताना उंबरठ्याच्या शेजारील डाव्या आणि उजव्या भिंतीत बंद असलेले दरवाजे आपले लक्ष वेधून घेतात. ह्या बंद दरवाज्यांच्या मागे तळघरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवर्षी फक्त गुरुपोर्णिमेला तळघरात जाऊन गुरूंच्या समाधीचे दर्शन घेता येते. बाकीच्या दिवशी हे दरवाजे बंद असतात. वर्षभर ह्या तळघरात गुढघाभर पाणी असते. दगडी सभामंडपाच्या भिंतीत रिकामे कोनाडे आहेत. सभामंडपातून अंतराळात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्यावर गजलक्ष्मीचे सुरेख शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आणि कोनाडे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर उजव्या सोंडेचा गणपती व गणपतीच्या खालच्या बाजूला गणेशयंत्र कोरलेले आहे.
सभामंडपातून अंतराळात आल्यानंतर गर्भगृहाला प्रदक्षिणा घालण्यासाठी उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान दरवाजे आहेत. गर्भगृहात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या दरवाज्याने बाहेर पडल्यानंतर गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर दक्षिणेला असलेल्या देवकोष्ठामध्ये नटराजाची सुबक मूर्ती आहे. पश्चिमेच्या देवकोष्ठामध्ये लिंगोद्भव शिव शिल्प आहे. लिंगोद्भवाची कथा पुराणामध्ये येते. कथेनुसार एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद चाललेला असतो. हा वाद चालू असताना भगवान शंकर तिथे प्रकट होतात व म्हणतात जो कोणी आदीलिंगाचा उगम आणि अंत शोधेल तोच श्रेष्ठ. त्याप्रमाणे ब्रह्मा हंसाचे रुप आकाशात जातो आणि विष्णू वराहाचे रुप घेऊन पाताळात जातो. परंतु दोघांनाही उगम आणि अंत शोधण्यात यश येत नाही. शेवटी ब्रह्मा आणि विष्णू शंकराचे श्रेष्ठत्व मान्य करतात. येथील शिल्पात ब्रह्म हंसरुपात व विष्णू वराहरुपात कोरलेले आहेत. शिवलिंगावर नागाचा फणा दाखवलेला आहे. अनेक शैवलेण्यांमध्ये आणि शिवमंदिरामध्ये लिंगोद्भव गोष्ट दाखवलेली असते. पण त्रिशुंडी मंदिरातील लिंगोद्भव शिव वेगळे आहे. उत्तरेच्या देवकोष्ठामध्ये कोणत्या देवतेची मूर्ती आहे हे ओळखता येत नाही. उत्तरेकडील देवकोष्ठ बघून उजव्या बाजूच्या दरवाज्याने आपण पुन्हा अंतराळात येतो.
गर्भगृहाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून हातामध्ये साखळी पकडलेले जटाधारी साधू आहेत. दरवाज्याच्या ललाटबिंबावर उजव्या सोंडेचा गणपती व गणपतीच्या खालच्या बाजूला गणेशयंत्र कोरलेले आहे. दरवाज्याच्या वरती शिव आणि त्याच्या एका मांडीवर पार्वती बसलेली असून दुसऱ्या मांडीवर बसलेली स्त्री कोण आहे हे सांगता येत नाही. मूर्तीच्या एका बाजूला शंकराचे वाहन नंदी व दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले आहे. दरवाज्यावर सुबक महिरप कोरलेली आहे. दरवाज्याच्या वरती दोन देवनागरी लिपीत व संस्कृत भाषेत आणि एक फारशी शिलालेख कोरलेला आहे.
गर्भगृहात तीन सोंडा असलेली मयुरारूढ गणेशमूर्ती आहे. मोराने चोचीत फणा उगारलेला नाग धरला आहे. मूर्तीच्या महिरपीवर व गणपतीच्या कानावर असलेल्या छिद्रांचा उपयोग दागिने घालण्यासाठी केला जात असावा. गणपतीला सहा हात आहेत. वरच्या उजव्या हातात अंकुश, मधल्या उजव्या हातात शूल, खालच्या उजव्या हातात मोदकपात्र, वरच्या डाव्या हातात परशु, मधल्या डाव्या पाश आणि खालच्या डाव्या हाताने मांडीवर बसलेल्या शक्तीला आधार दिला आहे. गणपतीची डाव्या बाजूची सोंड शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करते. उजव्या बाजूची सोंड खालच्या उजव्या हातात असलेल्या मोदकपात्राला स्पर्श करते. मधली सोंड मोराच्या डोक्याला स्पर्श करते. मोराच्या उजव्या बाजूला उंदीर आणि डाव्या बाजुला स्त्री भक्त आहे. तसेच मोराच्या दोन्ही बाजूंना चवरीधारी स्त्रिया कोरलेल्या आहेत. गणपतीच्या मागच्या भिंतीवर शेषशायी विष्णु आणि गणेशयंत्र कोरलेले आहे. गाभाऱ्याच्या उजव्या भिंतीतून तळघरात जाण्याचा मार्ग असून पुजारी समाधीपाशी दिवा लावण्यासाठी ह्या मार्गाचा वापर करतात.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेले शिलालेख
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एकूण तीन शिलालेख आहेत त्यापैकी पहिला आणि दुसरा शिलालेख संस्कृत भाषेत (देवनागरी लिपी) आणि तिसरा शिलालेख फार्सी भाषेत आहेत.
पहिला शिलालेख
पुण्यनगरी पुरी
|| श्री गणेशाय नमः || श्री ||
|| सरस्वत्यै नमः || श्री गुरु ||
|| दक्षिणामूर्तये नमः || स ||
|| वत् १८०१ तथा नृपशाली ||
|| वाहन शके १६७६ भावाना ||
|| म संवत्सरे मार्गशीर्ष शुक्ल ||
|| सौम्यवासरे शुभवेला ||
|| यां अस्य स्थाने श्रीमहका ||
|| ल रामेश्वर प्रतिष्ठितं सु ||
|| तिष्ठितमंस्तु || श्री देवदत्त ||
|| इह स्छान शुभं भवतु श्री रस्तु ||
सारांश
लेखाच्या पहिल्या पुण्यनगरी पुरी अर्थात पुणे शहराचा उल्लेख आहे. तसेच लेखात गणपती, सरस्वती, श्री गुरु आणि दक्षिणमूर्ती यांना नमन केले आहे. संवत १८०१ शालिवाहन शके १६७६ भावनाम संवत्सर मार्गशीर्ष महिन्यात सौम्यवार (बुधवार) रोजी श्री देवदत्त याने श्री महकाल रामेश्वराची स्थापना केली असे लेखात लिहिले आहे.
महाराष्ट्रातील शिलालेखात उत्तरेकडील विक्रम संवत दिले जात नाही. महाराष्ट्रात विक्रम संवतचा उल्लेख असलेला हा महत्वाचा लेख आहे.
दुसरा शिलालेख
|| श्री गुरुदेव ||
|| दत्त ||
|| श्री गणेशाय नमः महेशा ||
|| न्नापरो देवो महिम्नो नाप ||
|| रा स्तुति: || अघोरान्नापरो
|| मंत्रो नास्ति तत्वं गुरो: परं ||
|| जयति मंगला | काली भद्र
|| काली कपालिनी || दुर्गा
|| क्षमा शिव धात्री स्वाहा
|| स्वधा नमोस्तु ते || सर्व मंग
|| ल मांगल्ये शिवे सर्वार्थसा
|| धके || शरण्ये त्र्यंबके गौ
|| री नारायणी नमोस्तु ते ||
|| यत्र योगेश्वर: कृत्सनो यत्र पा
|| र्थो धनुर्धर: || तत्र श्रीर्विजयो
|| भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||
सारांश
ह्या लेखात काल कोरलेला नाही तरी हा लेख पहिल्या लेखाबरोबरच कोरलेला असावा असे वाटते. लेखाच्या सुरुवातीला गुरुदेव दत्त आणि गणपती यांना वंदन केले आहे. या लेखात शंकराची व कालीची स्तुती कोरलेली आहे. सर्वात शेवटी यत्र योगेश्वर हा गीतेतील श्लोक दिला आहे.
तिसरा शिलालेख
ई मकान गुरुदेवदत्त
फुकरा फी तारीख हफ्तुम
शहर जूकअद रोज चहार शम्बेह
सनह ११६७ तअ्मीर नमूदे शुद
सारांश
फकीर गुरुदेव यांचे हे मकान (घर) तारीख ७ माहे जिल्काद हिजरी ११६७ या दिवशी बांधून पूर्ण झाले. हा शिलालेख उठावाचा असून लेखात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. हिंदू मंदिरातील फारसी शिलालेख म्हणून ह्या लेखाला महत्व आहे.
मंदिरात असलेले तिन्ही शिलालेख मंदिराच्या बांधकामासंदर्भात आहेत. शिलालेखांनुसार हे मंदिर श्रीमहाकाल रामेश्वर आणि दत्तगुरू यांचे आहे. तिन्हीपैकी एकाही लेखांत गणपती मंदिराचा कोणताही उल्लेख नाही आहे. शंकर आणि दत्त या देवतांचा लेखात उल्लेख असताना गणपतीच्या मूर्तीची स्थापना कोणी, कधी आणि का केली? गणपतीच्या स्थापनेनंतर शंकराच्या मूर्तीचे (किंवा शिवलिंगाचे) आणि दत्ताच्या मूर्तीचे काय झाले. असे मानले मंदिर गणपतीचेच आहे, तर मग विष्णू आणि शंकर यांच्या शिल्पांबरोबर त्यांच्या विविध अवतारांची शिल्प मंदिरावर का आहेत? गणपती संदर्भात एकही शिल्प का नाही आहे? मंदिराबद्दल प्रश्न भरपूर आहेत, पण उत्तर एकाचेही मिळत नाही.
एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्ताकरिता प्रसिद्ध असलेले मंदिर आज त्रिशुंडी गणपती नावाने ओळखले जाते. भरवस्तीत असूनसुध्दा हे मंदिर पुणेकरांसाठी आजही अपरिचित आहे. समाधी मंदिर, सुबक कोरीवकाम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्प, शिवाचे अवतार, गणेश यंत्र, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती हे सर्व बघण्यासाठी मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्यावी लागेल.
शिलालेख संदर्भ
१. तेंडूलकर महेश, मराठी व संस्कृत शिलालेखांच्या विश्वात, स्नेहल प्रकाशन, २०१५
प्रतिक्रिया
24 Jan 2017 - 9:11 am | यशोधरा
लेख व फोटो चांगले आहेत पण फोटोंमध्ये फोटोंपेक्षा वॉमाकडे अधिक लक्ष जाते आहे, तसे नसल्यास उत्तम.
वॉमा जरुर टाका, पण फोटो अधिक महत्वाचा.
24 Jan 2017 - 9:16 am | समेळ पंकज विजय
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळेपासून नक्की काळजी घेईन.
24 Jan 2017 - 9:26 am | एस
चांगली माहिती दिली आहे. प्रचेतस यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. तोपर्यंत वाचनखूण साठवून ठेवतो.
24 Jan 2017 - 12:17 pm | सूड
+१
24 Jan 2017 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा
@चांगली माहिती दिली आहे. प्रचेतस यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. ››› +१ अगदी अगदी..
हल्ली आगोबाला सुद्धा पांडूसारखे बोलावून आणावे लागते. आगोबा... ये रे ये! =))
24 Jan 2017 - 5:58 pm | प्रचेतस
तपशीलवार लिहिलंय.
मध्ये ब्याट्या आणि विजापूरचे एक नामवंत संशोधक अब्दुल अझीझ राजपूत ह्यांच्याबरोबर मंदिराला भेट दिली होती, तेव्हा ते दोघेही त्या फारसी शिलालेखाचे जागेवर वाचन करत होते ते पाहून लै भारी वाटलं.
तेव्हाच तळघरात जाण्याचा योग आला होता. गुरुपौर्णिमेचा दिवस नव्हता तरीही जाता आले.
दुष्काळ असल्याने तळघर प्रथमच कोरडे पडले होते. आत अक्षरश: भुलभुलैय्या आहे. अनेक खोल्या, अनेक वाटा आहेत. संधी मिळाल्यास हे तळघर अवश्य बघावं.
बाकी हे मंदिर नाथपंथी गोसाव्यांचे असल्याने काहीसे तंत्रमार्गाचा विचार करून बांधल्यासारखं आहे. गणपतीचे नक्कीच नाही.
24 Jan 2017 - 8:38 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्त लेख आणी माहीती.. आता हे बघणे आले..
रच्याकने.. पंकज तुझे मिपावर स्वागत.. आता तुझ्याकडचा बाकी खजाना लेख रुपात मिपावर येऊदे.. तु किल्ले, मंदीरे, लेण्या असे बरेच भटकलाहेस तेव्हा तुझ्या लेखणीतून आम्हालापण त्याचा आनंद घेऊदे... खासकरून मुंबईतील लेण्यावरची तुझी भटकंती...
25 Jan 2017 - 7:00 pm | यशोधरा
ह्यांचे फोटो बघायचीही उत्सुकता आहे.
25 Jan 2017 - 10:39 pm | मनिमौ
आता हे मंदिर मी नक्की बघेन
25 Jan 2017 - 10:45 pm | पैसा
अगदी तपशीलवार लिहिले आहे आणि फोटो प्रचंड आवडलेत.
26 Jan 2017 - 4:36 pm | संजय पाटिल
नविन ओळख आणि महितीपुर्ण लेख
26 Jan 2017 - 9:16 pm | मदनबाण
माहितीपूर्ण लेखन आवडले ! असेच लिहीत रहा.


वरुन दुसर्या फोटोत असलेले यंत्र हे बगलामुखी / बगुलामुखी यंत्र असल्याचे वाटते. जे शत्रु स्तंभन आणि सातत्याने शत्रुवर विजय मिळवण्यासाठी वापरले जाते. १० महाविद्या पैकी आठव्या स्थानावर असलेल्या देवी बगलामुखी ही मुख्यत्वे स्तंभनाची देवी आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shakira - Chantaje (Official video) ft. Maluma