लेडी सीमोर वर्सली या १८व्या शतकातील इंग्लंडच्या नैतिकतेच्या कल्पनांची धूळदाण उडवणाऱ्या बाईबद्दल ऐकून तिला तसंच विसरून जाणं कठीण आहे. तिच्यावरचा अख्खा बीबीसी २ चा 'द स्कँडलस लेडी डब्ल्यू' हा एपिसोड पाहून तर लिहिल्याशिवाय राहवणारच नव्हतं. ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं, तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची,आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता, त्या काळात प्रचंड बदनामी पत्करून आपल्या नवऱ्याने प्रियकरावर चालवलेल्या खटल्यात संपूर्ण निकाल फिरवून दाखवून त्या बदनामीसहित ताठ मानेने जगणारी ही व्यक्ती खरंच होऊन गेली यावर विश्वासच बसत नाही. पण विचार केला, तर स्त्री आणि स्त्रीचा पायदळी तुडवला गेलेला सन्मान यांचे अविश्वसनीय संदर्भ द्यायला आपल्या जनमानसात रुजलेल्या कथा तरी कुठे कमी आहेत? कुंती, द्रौपदी, आणि सीता या आपल्या अग्निशिखांचे नशीब घेऊन त्याचा वणवा करणाऱ्या या मनस्विनीबद्दल लिहिणे म्हणूनच क्रमप्राप्तच होते.
लेडी सीमोर फ्लेमिंग या प्रचंड श्रीमंत सौंदर्यवतीने तिच्या प्रतिष्ठेला साजेशा रिचर्ड वोर्सलीशी लग्न केले आणि तिचं माणूस असणं संपलं. ती आता नवऱ्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास बांधील असलेली एक वस्तू होती. आणि तिच्या नवऱ्याच्या इच्छांसाठी तिने जे केलं, ते आजच्या काळातपण अंगावर शहारे आणेल. रिचर्ड हा ‘voyeur’ होता. तिला अन्य पुरुषांशी प्रणय करताना दाराच्या छिद्रातून बघणे ही त्याची अपेक्षा होती. आणि त्याने तिला यासाठी अक्षरश: वापरले. नवऱ्याचा आदेश पाळणे हे तिचे कर्तव्य समजले जात असल्याने तिने ही गोष्ट सहन केली. नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली.
या कुंतीची द्रौपदी झाली, ती रिचर्डचा जिवलग मित्र, कॅप्टन बिसेट आल्यावर. आतापर्यंत ती कोणत्याही मित्राला वापरू देण्याची वस्तू होती. पण बिसेटच्या ती खरीखुरी प्रेमात पडली होती. त्यांच्या बहरलेल्या प्रणयाने रिचर्डला अजून विकृत आनंद मिळत असल्याने त्याची ना असायला हरकतच नव्हती. आता ती दोन जिवलग मित्रांची ‘पतिव्रता’ झाली. एक लग्नात तिला जिंकून घेणारा ‘मालक’ आणि दुसरा, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं. पण प्रेम म्हणजे शरीरापलीकडे जे काही असतं त्याचे तरंग आता सीमोरच्या आसुसलेल्या अंतरंगात उमटायला लागले होते. या आयुष्याचा तिला मनस्वी कंटाळा आला होता. बिसेटसोबत, तिच्या खऱ्या प्रेमासोबत त्याच्यापासून झालेल्या मुलीला घेऊन तिला संसार थाटायचा होता. हे लोढणं गळ्यात घेण्याचं बिसेटने कुठच्या नशेच्या क्षणी ठरवलं काय माहीत, पण त्या दोघांनी पळून जाण्याचं धाडस केलं. कदाचित सीमोरला वाटलं असेल की रिचर्डची या सगळ्यालाच संमती असल्याने तो तिला सहज घटस्फोट देईल. पण इतक्या पुरुषांना ओळखूनही तिला पुरुषी अहंकार काय चीज असते त्याची ओळख व्हायची होती.
ते दोघं पळून गेले आहेत हे कळल्यावर रिचर्डने थयथयाट केला. सीमोर आणि बिसेट यांच्या प्रेमाला तो मान्यता देत होता तो त्याच्या आनंदासाठी, तिच्या नव्हे हे ते दोघंही विसरून गेले होते. रिचर्ड हे राजकारणातील बडं धेंड होतं. त्याची नाचक्की त्याला कदापि सहन झाली नसती. त्याने बिसेटवर कोर्टात केस टाकली, आणि त्याच्या मालकीची बायको पळवल्याबद्दल त्याच्यावर तब्बल २०००० पाऊंडचा दावा ठोकला. आता बिसेट हबकला. हे असं काही त्याला अपेक्षितच नव्हतं. एवढी मोठी नुकसानभरपाई देऊन तो रस्त्यावर आला असता. लग्नबाह्य संबंधाबद्दलचे कायदे बघता तो सरळ सरळ दोषी होता. आणि इथे उभी राहिली ती अग्निदिव्याची तयारी असणारी सीमोरमधली सीता. तिला कोर्टात जाऊन साक्ष देणं शक्य नव्हतं. म्हणून तिने तिला ज्यांच्यासोबत शय्यासोबत करायला रिचर्डने भाग पाडलं होतं त्या लोकांना कोर्टात उभं केलं. बिसेटला वाचवण्यासाठी तिने आपली अब्रू पणाला लावली. इतका रसभरीत विषय मिळाल्यावर त्याचं चर्वितचर्वण होणारच. या केसची अनेक वर्णनं, त्यावरची व्यंगचित्रं अतिशय प्रसिद्ध झाली. सीमोरच्या आयुष्यात एकूण २७ पुरुष होते अशी वर्णनं इंग्लंडमधे प्रसिद्ध झाली. इतका वणवा पेटवलेल्या सीमोरने शेवटी निर्णय फिरवला. गुन्ह्यात जर आरोपीला दावेदाराची साथ असेल, तर गुन्ह्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे केसचा निर्णय लागला तेव्हा कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून बिसेटने रिचर्डला १ शिलिंग एवढी रक्कम द्यावी असा निर्णय दिला. जिला जवळपास वेश्येसारखं वागवलं गेलं, तिने स्वतःचा उलटा लिलाव करून स्वतःची किंमत २०००० पाऊंडवरून १ शिलिंग करवून घेतली.
प्रचंड नाचक्की सहन केली सीमोरने, तिच्या प्रियकरासाठी, एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी. पण जगात धोब्याच्या शब्दावरूनपण स्त्रीला टाकता येतं, इथे तर सगळ्या जगासमोर तिने चारित्र्याच्या कल्पनांचे बुरखे टराटरा फाडले होते. त्या बिसेटने तिला काही काळातच सोडून दिलं. त्यानंतर तिने वाईट परिस्थितीत दिवस काढले. अजून सूड पूर्ण न झालेल्या रिचर्डने तिला घटस्फोट दिलाच नव्हता. त्यासाठी त्याने तिला फ्रान्सला ४ वर्षे जाण्याची अट घातली. सीमोर फ्रान्सवरून परत आली आणि रिचर्डचा मृत्यू झाला. तिला विधवा म्हणून तिच्याच राहिलेल्या हुंड्यामधली शिल्लक मिळाली.
सीमोरने आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक प्रचंड त्रास सहन केला. पण तिच्या लग्नाच्या भयाण वास्तवातून बाहेर पडल्यावर तिने जगाला काही किंमतच दिली नाही असं दिसतं. हुंड्याची रक्कम मिळाल्यावर रॉयल लायसन्सने तिने आपलं लग्नापूर्वीचं आडनाव परत मिळवलं आणि स्वतःपेक्षा दोन दशकांनी लहान असणाऱ्या एका संगीतकाराशी लग्न केलं. तिच्या या नवऱ्याने लग्नानंतर तिचं आडनाव घेतलं होतं..
सीमोरची कथा हादरवून टाकते. ही घटना घडून दीड शतकपण लोटलं नाहीये, हे अजून हादरवून टाकतं. जे रामायण-महाभारतातले संदर्भ माझ्या भारतीय मनात पक्कं मूळ धरून होते, त्यांना गदागदा हलवते सीमोर. कुंती काय, द्रौपदी काय, सीता काय, समाजाने ठरवून दिलेल्या नियमांसाठी आपला आत्मसन्मान गिळाव्या लागलेल्या स्त्रिया. त्यांच्या, आणि असमानतेच्या इतिहासातील अनेक व्यथांना चव्हाट्यावर आणणारी सीमोर कधीच विसरली जाणार नाही.
प्रतिक्रिया
5 Dec 2016 - 9:01 pm | हतोळकरांचा प्रसाद
वाचतो! धन्यवाद गापै!
6 Dec 2016 - 10:39 am | एमी
ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं , तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची , आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता >>
अजून सगळे प्रतिसाद वाचले नाहीत पण वर्तमानकाळातही भारतीय कायद्यानुसार
१. पत्नी ही पतीची मालमत्ता आहे.
२. पतीच्या संमतीने पत्नी स्वखुशीने कितीही पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवू शकते.
३. पतीची संमती न घेता पत्नीने इतर पुरषाशी संबंध ठेला तर तो त्या प्रियकराविरुद्ध खटला दाखल करू शकतो. ज्यात ३ महिने कारावास आणि ५००० रुपये शिक्षा आहे.
7 Dec 2016 - 10:52 am | पिशी अबोली
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अजून ही परिस्थिती आहे हे आपले माणूस म्हणून हक्क गृहीत धरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलापण माहीत नव्हतं. ज्यांना हे कळूनही त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, त्या महाभागांना काही करू शकत नाही. पण काही संवेदनशील पुरुष आयडिंचेही उत्तम प्रतिसाद(अगदी आक्षेपसुद्धा संयमाने नोंदवणारे, असे) बघून ही परिस्थिती काही पिढ्यांनी तरी बदलेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही.
10 Dec 2016 - 1:28 am | एमी
मलातरी आतापर्यंत एकही अशी विवाहीत/विवाहोत्सुक व्यक्ती भेटली नाही जिने आपण लग्न करुन कोणत्या डिफॉल्ट कायद्यांना संमती देतोय ते माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अथवा माहीत झाल्यावर त्याबद्दल स्वतः काहीतरी अॅक्शन घेतलीय. वरील तीन मुद्द्यांखेरीज लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नसणे, ४९८ अ चा गैरवापर वगैरे मुद्देदेखील मला महत्वाचे वाटतात.
'ही परिस्थिती काही पिढ्यांनी तरी बदलेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही' ही मला केवळ निष्क्रियता वाटते. पटत नाही. ज्यांना खरोखरच हे कायदे मान्य नाहीत त्यांनी पर्सनल काँट्रेक्ट करायला चालू करावे.
7 Dec 2016 - 2:45 pm | प्रसाद गोडबोले
बापरे फारच गंभीर प्रकार दिसतो हा ! जरा योग्य ते कायद्यांचा रेफरन्स देता का ? आपण लगेच ह्याची सत्यासत्यता तपासुन पाहु .
हे कायद्याचे तत्व ऐकुन आहे , एखादी विवाहित स्त्री स्वेच्छेने परपुरुषासोबत संबंध ठेवत असेल तरीही ती निर्दोषच मानली जाते , एकुणच ती बिच्चारी आहे , निष्पाप आहे , विक्टिम आहे असे गृहीत धरुन संबंध ठेवणार्या पुरुषालाच शिक्शा होते !
ही बातमी वाचलीत का :
18 वर्षांची तरूणी बनली आई, 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा
http://www.lokmat.com/storypage.php?newsid=17070860&catid=2
बिच्चार्या १८ वर्षाच्या निष्पाप स्त्रीला १२ वर्षाच्या क्रुर पुरुषाने कसे बळी पाडले आहे पहा ! दुत्त दुत्त !
एक शक्यता अशीही असु शकते की :
बिचार्या सी मोअर मॅडम २७ जणांना घोळवत असताना त्यांच्या नवर्याने रंगे हाथ पकडले असावे त्यांना . पण कायद्याने सी मोअर मॅडमची स्वेच्छा/ कन्सेंट कोर्टात पुराव्याशिवाय सिध्द करता येणार नाही म्हणुन बिसेट सरांना प्रत्यक्षदर्षी म्हणुन बोलावले असणार अन नंतर बिसेटरावांनी कधीतरी पार्टी चेंज केली असणार. ( फॉर ऑब्वियस रीजन्स ;) )
अशीही शक्यता असु शकतेच की.
सी मोअर मॅडम ना कोणी प्रत्यक्ष भेटले नाहीये , त्यामुळे २७ प्रकरणांमध्ये त्यांचा कंसेंट होता कि नव्हता हे कोणीच १००% खात्रीशीर सांगु शकत नाही ! कन्सेंट असुही शकतो , नसुही शकतो , कदाचित सी मोअर मॅडम नवर्याच्या विकृत स्वभावाच्या व्हिक्टिम असु शकतात , कदाचित वर्सलीसर महाचालु बायच्कोच्या आतख्याली स्वभावाचे 'बेसिक इन्स्टिंक्ट'चे व्हिक्टिम असु शकतात , ५०%-५०% चान्सेस आहेत. जर शक्यताच नाकारायच्या असतील आणि प्रतिकुल मते मांडणार्यांवर असंवेदनशीलतेचा शिक्का मारायचा असेल तर त्यापेक्षा साहित्य कोनाड्यातच ठेवलेले काय वाईट ? , तिकडे प्रतिकुल मते येणाचे चान्सेस कमी !
असोच्च असो.
अवांतर : मुळ महाभारत न वाचणार्यांसाठी : आदिपर्वात उद्दालक श्वेतकेतु संदर्भात एक उपाख्यान आहे की ज्या मध्ये सर्वप्रथम श्वेतकेतुने विवाहबाह्य संबंधाना निषिध्द ठरवणारी मर्यादा घालुन दिली आहे , त्या पुर्वी आर्षकाळात सर्व स्त्री पुरुष स्वेच्छेने परस्त्रशी/ परपुरुषाशी ऐच्छिकपणे रत होवु शकत होते ! आता बोला !!
10 Dec 2016 - 1:45 am | एमी
बापरे फारच गंभीर प्रकार दिसतो हा !
जरा योग्य ते कायद्यांचा रेफरन्स देता का ? आपण लगेच ह्याची सत्यासत्यता तपासुन पाहु . >> भारतीय कायदा कलम ४९७. १८६० सालचा आहे.
बेसिकली कोणत्याही जेंडरच्या पार्टनरवर मोनोगमी एन्फोर्स 'केवळ स्पाऊस'च'' करु शकतो.
www.ebc-india.com/lawyer/articles/2001v6a3.htm
http://m.timesofindia.com/india/Wife-is-private-property-so-no-trespassi...
माझ्यामते अडल्टरी हा केवळ सिवील गुन्हा असावा क्रिमिनल असू नये. हे कारण मान्य करुन घटस्फोट मिळावा.
===
लेखात आणि वर कुठल्यातरी प्रतिसादात आलाय तो 'विवाहीत स्त्रिला प्रियकरापासून मुल झाले तरी ते पतीचेच मानण्यात यावे' हा कायदादेखील बहुतेक अजून तसाच आहे. अगदी रिसेंटली कदाचीत बदलला असेल पण बहुतेक नाहीच.
6 Dec 2016 - 7:35 pm | गामा पैलवान
नगरीनिरंजन,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
१.
माझ्याशी वाद न घालण्याचा निर्णयाचा आदर आहे.
२.
झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर याच परिस्थितीतून पुढे आल्या होत्या. आनंदीबाई पेशवे या मोठ्या हिकमतीच्या होत्या.
अधिक वाचनासाठी लेख : http://voiceofdharma.org/books/ohrr/ch07.htm
आ.न.,
-गा.पै.
6 Dec 2016 - 11:10 pm | पैसा
कोणाच्या म्हशी आणि कोणाला उठाबशी. ती सीमोर, रिचर्ड्स आणि बिसेट आणि कोण कोण असतील ते सगळे मरून शंभराहून जास्त वर्षे झाली. त्यातल्या कोणाला आपण भेटून बोललेलो नाही. त्या काळात इंग्लंडात काय सामाजिक परिस्थिती होती याबद्दलही आपले सगळ्यांचे ज्ञान खरे तर अगाधच. कारण आपण त्याची लांबून सुद्धा कल्पना करू शकत नाही. तरी पण कोणी सिमोरबद्दल भानगडीची बाई इ. उद्गार वाचले. ___/\___ 'शांतता कोर्ट चालू आहे' ची आठवण आली का कोणाला? आताच्या काळचे आणि तेही भारतीय समाजाचे मापदंड सिमोरला लावणे हे विचित्र आहे खरे तर.
7 Dec 2016 - 11:01 am | कवितानागेश
शांतता कोर्ट चालू आहे ची आठवण आलीच!
म्हण आवडली. लक्षात ठेवेन. बहुतेक प्रत्येक धाग्यावर हि म्हण लिहिता येईल! :)
10 Dec 2016 - 2:23 am | ट्रेड मार्क
त्यावेळी इंग्लंडातल्या परिस्थितीचे ज्ञान नसताना, आताच्या काळचे आणि तेही भारतीय समाजाचे मापदंड लावून त्यावरून एखाद्या स्त्रीला बदचलन ठरवणे म्हणजे खरंच कोपरापासून __/\__
गमतीची गोष्ट म्हणजे हेच महाशय शहरात राहणाऱ्या लोकांना गावातील जीवनाची कल्पना नसते म्हणून उगाच स्वतावरून दुसऱ्याची परीक्षा करू नये म्हणून ज्ञानामृत पाजत फिरत होते. अवघड आहे.
8 Dec 2016 - 2:17 pm | मनीषा
सिमोर ची कहाणी अत्यंत र्हुदयद्रावक आहे. त्यातही काही अगदी "टीप्पीकल मानसिकता" दर्शवणार्या प्रतिक्रिया वाचल्यावर वाटले परिस्थितीत अजूनही फारसा फरक पडला नाहीये.
असही असू शकेल की, २७ वेळा पर्यंत तिने सारे बिनविरोध सहन केले कारण तोवर तिला बिसेट भेटला नव्हता म्हणून. तिच्या संपर्कातले सारेच पुरूष जर तिच्या पतिसारखेच असतील तर ती विरोध कशासाठी करणार ? आणि कुणाच्या आधारावर करणार?
शरीरापलीकडे देखिल काही नाते असू शकते, हे कळल्यावर तिने विरोध करण्याचे धाडस दाखविले असणार.
अर्थात या सर्व जर-तर च्या गोष्टी. खरंखोटे काय ते देव जाणे ---
9 Dec 2016 - 11:24 am | बाळ सप्रे
एक्झॅक्ट्ली..
8 Dec 2016 - 8:06 pm | चौथा कोनाडा
लेडी सीमोरची कर्मकहाणी वाचून अंगावर काटा आला.
धन्यू पिशी अबोली या थरारक रोचक लेखाबद्दल
8 Dec 2016 - 10:03 pm | प्रीत-मोहर
पयल्याच शेकड्याखातीर पिशी तुका खुब्ब परबी!!
याय!!
9 Dec 2016 - 8:06 pm | गामा पैलवान
लोकहो,
आंतरजाळ्यावर थोडा हात मारला तेव्हा काही माहिती गवसली. सोळाव्या शतकाच्या अखेरपासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इंग्लंडमध्ये पत्नीची विक्री करण्याची पद्धत होती. त्या काळात पती पत्नीस हुंडा देत असे. ही हुंड्याची रक्कम परत मिळावी म्हणून देखील पत्नीची विक्री केली जाई.
यावरून लेडी सीमूरच्या बाबतीत काय घडलं असावं याचा अंदाज बांधतो.
१. लेडी सीमूरला तिच्या नवऱ्याने २७ वेळा विक्रीसाठी प्रस्तुत केली असावी. तसा संशय घेण्यास वाव आहे. तो मैथुनप्रेक्षी असता तर इतर कुणाचंही मैथुन बघता आलं असतं. बहुतेक त्याने विक्रीसाठी मालाची जाहिरात केली असावी. (प्रॉपर्टीचा अर्थ माल असा होतो. त्याकाळी पत्नी पतीची मालमत्ता समजण्यात येत असे.)
२. त्यापैकी मॉरीस बिसेट म्हणून एकजण तिला पसंत पडला. बऱ्याच प्रसंगी नवऱ्यापासून सुटण्यासाठी बायकाच स्वत:ची विक्री करवून घेण्यात पुढाकार घेत. तसा काहीसा आग्रह लेडी सीमूरचा देखील असावा. म्हणूनच बहुधा २७ प्रस्तुतीकरणे घडली.
३. बिसेट आणि वर्सली याचं पैशावरून फाटलं. म्हणून पत्नी चोरल्याचा २०,००० पौंडांचा दावा वर्सलीने बिसेटवर लावला. पण त्यात लेडी सीमूरदेखील अडकली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात २०,००० पौंड ही खूप म्हणजे खूपंच मोठी रक्कम आहे.
४. या कालावधीत तिचं पाहिलं अपत्य परलोकवासी झालं होतं. म्हणून तिने बिसेटकडून त्यांच्या भावी आयुष्याशी सुसंगत अशी अपत्यप्राप्ती करवून घेतली.
५. मात्र वर्सलीच्या दाव्यामुळे बिसेट आणि ती अडचणीत येणार म्हणून तिने वीसहजार पौंडांचा दावा एक शिलिंगवर आणला. यासाठी तिने अनेक साक्षी काढल्या.
६. २०,००० पौंड मिळणार नाहीत हे कळल्यावर वर्सलीने तिला काडीमोड द्यायचं नाकारलं. केवळ विभक्ती मान्य केली. लग्न करता येणार नाही हे समजल्यावर बिसेटचा तिच्यातला (आणि बहुतेक तिचाही त्याच्यातला) रस संपुष्टात आला.
७. आतापावेतो तिचं इंग्लंडमधलं बाजारमूल्य चांगलंच उणावलं. म्हणून बाईसाहेबांनी प्यारिसास प्रस्थान केलं. पैसे तर तिथेही लागतातंच. म्हणून वर्सलीकडे (उचित) तगादा लावला.
८. अखेरीस वर्सली मेल्यावर बाईसाहेब इंग्लंडला परतल्या. त्याची इस्टेट घेऊन नवा भिडू शोधला.
असो.
हा केवळ माझा अंदाज आहे. लेडी सीमूरवर अन्याय झाला की नाही हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं आहे. बाई मोठी धडाडीची आहे हे निश्चित. ती घाण्यास जुंपली जाणार होती पण तिने नकार दिला. खरंतर डावंच उलटवला. (She was taen for a ride, but she refused. In fact she turned the tables.)
या अर्थी तिची द्रौपदीशी केलेली तुलना उचित वाटते.
आ.न.,
-गा.पै.