आतां आमोद सुनांस जाले

Primary tabs

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
18 Jul 2016 - 12:05 am

अंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.

माझं असं कधी कधी होतं की पुस्तकाशी माझी नाळ जुळत नाही. मग मी पुस्तकाला आणि स्वतःला त्रास देत नाही. बहुतेक त्या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आलेली नाही असे म्हणून ते बाजूला ठेवतो. यथावकाश ते पुस्तक मला बोलावतेच. अश्या प्रकारे पुस्तकाने साद घातलेली असली की ते अगदी कडकडून भेटते. त्यातले विचार अगदी सहज समजतात आणि त्यावर मनातल्या मनात संवाद देखील छानपैकी सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाला स्मरून मी ढेरे सरांची पुस्तके शेल्फवर ठेवून दिली.

मागच्या महिन्यात निर्गुणी भजनांची सिरीज लिहिताना गोरक्षनाथांचा उल्लेख केला होता. त्यावर एका वाचकाशी साद प्रतिसाद करत असताना त्या वाचकाने रा चिं ढेरेंचे "नाथ संप्रदायाचा इतिहास" हे पुस्तक वाचा असा सल्ला दिला होता. आणि मग शेल्फवरील ढेरे सरांची पुस्तके साद घालू लागली. म्हटलं, "आनंदा, वेळ झाली बहुतेक या पुस्तकांची". पण चाल ढकल करत होतो. तेव्हढ्यात ढेरे सर इहलोक सोडून गेल्याची बातमी आली. एक दोन मित्रांनी सरांच्या सर्व ग्रंथसंपदेचे फोटो फेसबुकवर टाकले. त्यात नाथ संप्रदायाचा इतिहास दिसले. आणि मग मात्र मी मॅजेस्टिक मधे गेलो. तिथून ढेरे सरांची सगळी पुस्तकं घेतली. पण वाचायला सुरवात केली ती नाथ संप्रदायाच्या इतिहासाकडून.

मला माझे मडके कच्चे आहे ते माहिती आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. अजून या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आली की नाही? त्यातले विचार समजण्याइतका मी तयार झालो की नाही? असे प्रश्न मनात होते. कदाचित निर्गुणी भजनांवर लिहीत असताना वाचनाला आणि विचाराला दिशा मिळाली असेल त्यामुळे पुस्तक माझ्याशी बोलू लागले. आणि ते काय बोलत आहे ते मला समजू लागले. ढेरे सरांचा प्रचंड व्यासंग आणि विचार मांडण्याची अनाग्रही पद्धत जाणवत होती. एका ज्ञानतपस्व्याच्या जवळ आपण बसलो आहोत असा अनुभव होत होता.

वाचता वाचता पान ३१ वर आलो. त्यात पिण्ड ब्रह्माण्ड या विषयावरचा गोरक्षनाथांचा सिद्धांत या मुद्द्यावर बोलताना ढेरे सरांनी ज्ञानोबा माउलींच्या अमृतानुभवातील नवव्या प्रकरणातील आत्मरतिचे वर्णन करणारी रचना दिली आहे. त्या रचनेचे पहिले वाक्य वाचले आणि एकदम ज्ञानतपस्वी ढेरे सर प्रेमळ अनुभवी मित्रासारखे झाल्यासारखे वाटले. ढेरे सरांनी दिलेली माऊलींची ती पूर्ण रचना आधी देतो आणि मग त्यामुळे माझ्या एका जुन्या कोड्याची उकल कशी झाली ते सांगतो.

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।
जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

यातलं "आमोद सुनांस जाले" वाचलं आणि शाळेपासून पडलेलं कोडं सुटेल असं वाटू लागलं. पुलंचा माझे खाद्यजीवन म्हणून फार प्रसिद्ध लेख आहे त्यात एका ठिकाणी पुलं म्हणतात, " जो भात खदखदू लागला म्हणजे प्रियकराचे प्रेयसीवरचे लक्ष उडून आमोद सुनांस होते, त्याला काय पोषक अन्न या वैद्यकीय कोषात कोंबायचे?" हे वाक्य जेंव्हापासून वाचलंय तेंव्हापासून जीव अडकलाय. कारण आमोद सुनांस येणे याचा काही संदर्भ मिळत नव्हता. बरं आपल्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करावा तर आमोद म्हणजे आनंद. मग आनंद सुनांस येणे म्हणजे काय ते कधीच कळले नव्हते. आणि इथे नाथसंप्रदायाचा इतिहास वाचताना ढेरे सरांनी माझ्यासाठी अगदी अनपेक्षितपणे पूर्ण रचना दिली होती. आता पुलंच्या वाक्याचा संदर्भ मिळाला होता. पण अजूनही आनंद सुनांस येणे याचे कोडे सुटत नव्हते. आणि पुलंनी हे वाक्य भात शिजण्याशी कसे जोडले ते काही लक्षात येईना. तसाच झोपलो.

सकाळी, संदर्भ मिळाला आहे या आनंदात उठलो. पण अर्थ लागायचा बाकी आहे ते आठवले. मग माझ्यातला आळशी माणूस जागा झाला. ढेरे सरांच्या पुस्तकातील आणि पुलंच्या हसवणूक या पुस्तकातील त्या पानांचा फोटो घेतला आणि दोन मित्रांना पाठवला. एक माझ्या सारखा पुलंप्रेमी तर दुसरा जुन्या मराठी भाषेचा जाणकार. म्हटलं काय अर्थ लागतो का ते सांगा. भाषापटू मित्राने अजून माझा मेसेज बघितला नसावा तर पुलं प्रेमीने लगेच सांगितले की, 'बाबा रे, मला पण याचा अर्थ अजून लागला नाही."

मग थोड्या वेळाने त्याचा पुन्हा मेसेज आला. 'ते आमोद सुनांस "जाले" आहे. सगळे त्याला "आले" म्हणतात. म्हणून मला कळत नव्हते. आता जर तो शब्द "जाले" आहे हे नक्की झालंय तर बहुतेक त्याचा अर्थ "श्रोत्यांस आनंद झाला " असा असणार". मला थोडे पटले आणि थोडे नाही. तेव्हढ्यात अजून एका जाणकार मित्राचा फोन आला. त्याला म्हटलं फोटो पाठवतो. अर्थ सांग. त्याला हे पण सांगितलं की एका मित्राने श्रोत्यांस आनंद झाला असा अर्थ सांगितला आहे. फोटो पाठवले आणि लेक्चरला गेलो. मग दिवसभर आयकर कायदा आणि त्याच्यातील कलमे शिकवताना विषय विसरलो. रात्री जाणकार मित्राचा फोन आला. तो म्हणाला श्रोत्यांचा संबंधच नाही. कारण अमृतानुभव म्हणजे श्रोत्यांशी साधलेलया संवादाचे वर्णन नसून ज्ञानेश्वरांना आलेल्या अमृततुल्य अनुभवांचे वर्णन आहे. हे मला पटले. पण तो ही "सुनांस जाले" या शब्दांचा अर्थ देऊ शकला नाही.

आता माझी अवस्था स्टेशन जवळ आलेले आहे, फलाट दिसू लागलेले आहेत, आपण आपले सामान सुमान घेऊन पॅसेंजर ट्रेनच्या छोट्याश्या दरवाजाजवळ उभे आहोत, पण गाडी स्टेशन बाहेर सिग्नलला थांबल्यावर होते तशी झाली होती. मग आठवण झाली ती संध्याताई सोमण यांची. फेसबुकवर अनेक ठिकाणी कमेंट करताना त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांचे फोटो टाकतात ते आठवले. मग त्यांना फेसबुकरच फोटो पाठवले. आणि म्हटलं "आमोद म्हणजे आनंद हे कळले आहे पण ते सुनांस आले चा अर्थ सांगू शकाल का?" पण मग लक्षात आलं की मी त्यांचा मित्र नाही आहे. स्पॅम टाळण्यासाठी झुक्या बाबा मित्र नसलेल्या लोकांचे मेसेज लगेच दाखवत नाही तर त्याला मेसेज रिक्वेस्ट म्हणून पाठवतो. आणि या रिक्वेस्ट बऱ्याचदा उघडल्या जात नाहीत हे माझ्या स्वानुभवावरून मला माहीत होते. मग संध्याताईंना मित्र विनंती पाठवली. आता त्या कधी ऑनलाईन येतील? कधी मित्रविनंती स्वीकारतील? कधी माझा मेसेज बघतील? आणि कधी उत्तर देतील? या प्रश्नांच्या आवर्तात सापडून शेवटी मी आळस सोडला आणि गुगल वर "आमोद सुनांस जाले" असे शोधायला सुरवात केली.

तर तिथे मराठी साहित्य ब्लॉगस्पॉट इन या संकेतस्थळावर, दि बा मोकाशी यांच्या "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे रसग्रहण सापडले. त्यात ब्लॉग लेखकाने एका परिच्छेदात माझ्या शंकेचं निरसन केलेलं होतं. तो परिच्छेद असा आहे,

"कथेविषयी लिहिण्याआधी थोडेफार शीर्षकाविषयी सांगणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांची 'आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले' ही अमृतानुभवातल्या 'ज्ञान-अज्ञान भेद कथन' या प्रकरणातील ही ओवी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा आणि जे जाणायचे ती गोष्ट) यांच्यातील अद्वैत दर्शविते. आमोद म्हणजे सुगंध, सुनास म्हणजे नाक - हे एक उदाहरण. या कथेतही वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या गोष्टींतले द्वैत - अद्वैत लेखक दाखवून देतो"

सगळा घोटाळा आमोद म्हणजे आनंद या समजुतीमुळे झालेला होता. आमोद म्हणजे आनंद असा जरी अर्थ असला तरी आमोद या शब्दाला अजूनही अर्थ असू शकतात ही शक्यताच मी विचारात घेतली नव्हती. त्यामुळे पुढे सुनांस आले किंवा जाले चा अर्थ लागत नव्हता. आता जेंव्हा आमोद म्हणजे सुवास असा अर्थ घेतला तेंव्हा सुनांस म्हणजे नाक हा अर्थ लागला. आणि मग सुनता है गुरु ग्यानी या निर्गुणी भजनात कबीर कुंडलिनी साधकाच्या अवस्थेचे वर्णन करत आहेत हा मला लागलेला अर्थ आणि त्याच अवस्थेचे माउलींनी आमोद सुनांस जाले असे केलेले वर्णन एकदम जुळून आले. जेंव्हा साधकाची कुंडलिनी जागृत होते, तेंव्हा त्याला जो अनिर्वचनीय आनंद होतो त्या अमृतानुभवाचे वर्णन करताना माउली म्हणतात.

सुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. माथा स्वतः चाफयाप्रमाणे सुगंधीत होतो. जीभ स्वतःच चव बनते, चकोर स्वतःच चांदणे आणि चंद्र बनतो, फुले स्वतःच भ्रमर बनतात, तरुणी स्वतःच नर बनून स्वतःचे स्त्रीत्व उपभोगू शकते. थोडक्यात सगळे रस आणि त्या रसांचे रसपान करणारे एकरूप होतात. त्यांचे अद्वैत होते. ज्याला भोगायचे आहे आणि जे भोगायचे आहे ते हे दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचे आहे आणि जे जाणायचे आहे ते एकरूप होतात. आणि हा अमृतानुभव असतो. असा या रचनेचा अर्थ आहे.

आता माझी गाडी फलाटाला लागली होती. मन शांत झाले होते. मी शाळेत असल्यापासून पुलंनी घातलेले कोडे पण सुटले होते. भात शिजताना जो सुगंध दरवळतो त्यामुळे जणू तो वासच नाक होतो. वासाचे आणि नाकाचे वेगळे अस्तित्व उरत नाही. त्या दोघांचे अद्वैत होते. खरा खवैय्या प्रियकर मग तो सुवास उपभोगतो आणि त्यात इतका एकरूप होतो की तो आपल्या प्रेयसीला देखील विसरतो.

आणि मला जाणवले की; माउली, कबीर, नाथ संप्रदाय, आणि पुलं यांना सगळ्यांना एका माळेत गुंफून ढेरे सरांनी आंतरजालाने मला एका मोठ्या रोलर कोस्टर राईडचा अनुभव दिलेला होता. तो माझ्यासाठी अतिशय रोमहर्षक होता. मला वाटले संपली राईड. म्हणून खूष होऊन फेसबुकवर आलो. तर संध्याताईंनी मित्र विनंती स्वीकारली होती. मग त्यांना हा अर्थ सांगून तो बरोबर आहे का अशी विचारणा केली. तर त्यांनी दुजोरा देताना त्यांच्याकडील एका पुस्तकाचा फोटो पाठवला. पुस्तकाचे नाव होते "अनुभवामृतातील प्रतिमासृष्टी" लेखिका "सई देशपांडे" फोटोत दिसणारे पण वाचले. आपल्याला लागलेला अर्थ बरोबर आहे याचा आनंद झाला. आणि अजून एक गंमत दिसली. एका देशपांडेंनी आपल्या पुस्तकात घातलेले कोडे शेवटी दुसऱ्या देशपांडेंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या दुजोऱ्याने खात्रीलायक सुटले.

आता ढेरे सरांचे पुस्तक खाली ठेववत नाही. विकत आणून ठेवलेली त्यांची सगळी पुस्तके मला बोलावत आहेत. बहुतेक त्या पुस्तकांची माझ्या आयुष्यातील वेळ सुरू झाली असावी. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व, ढेरे सर इहलोक सोडून गेल्यावर घडले. आणि त्याच बरोबर थोडा आनंद देखील वाटतो की उशीरा का होईना पण मला त्यांच्या पुस्तकातील विचार थोडे फार समजू शकतील.

वाङ्मयभाषाप्रतिशब्दशब्दार्थआस्वाद

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

18 Jul 2016 - 12:13 am | चित्रगुप्त

सुंदर.

प्रचेतस's picture

18 Jul 2016 - 12:32 am | प्रचेतस

अप्रतिम लिहिलंय.

इनू's picture

18 Jul 2016 - 12:46 am | इनू

सुंदर! :स्मित:

चतुरंग's picture

18 Jul 2016 - 12:49 am | चतुरंग

बरक्या फणसाच्या सोनेरी गर्‍याला सोडून आठळीने अलगद बाहेर यावे तसाच सोलीव अनुभव तुम्ही आमच्यासमोर मांडला आहेत! :)

(आमोदित्)रंगा

राघवेंद्र's picture

18 Jul 2016 - 3:02 am | राघवेंद्र

+१

पद्मावति's picture

18 Jul 2016 - 12:53 am | पद्मावति

खुप सुरेख!

संदीप डांगे's picture

18 Jul 2016 - 1:22 am | संदीप डांगे

राम शेवाळकरांची आठवण झाली. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2016 - 4:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हालाही नवा अर्थ समजला. छान लिहिलंय.
ढेरे सरांचा प्रभाव माझ्यावरही आहे. श्री विठ्ठल एक महासमन्वयाचा तर खूप.... कोणता मानू मी विठ्ठल असं किरकोळ लेखन मिपावर त्यांच्या प्रभावातूनच केलं होतं.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

18 Jul 2016 - 6:51 am | कंजूस

आमचंही "बरक्या फणसाच्या सोनेरी गर्याला सोडून आठळीने अलगद बाहेर यावे तसाच सोलीव अनुभव---" असंच होतं बय्राचदा.
नंतर आठळी उकडून खातो,पोट भरतं.

अजया's picture

18 Jul 2016 - 7:33 am | अजया

वा!सुंदर लिहिलंय.

कविता१९७८'s picture

18 Jul 2016 - 8:32 am | कविता१९७८

छान लेखन

बोका-ए-आझम's picture

18 Jul 2016 - 9:38 am | बोका-ए-आझम

ब-याच दिवसांनी लेख आला! वाचून छान वाटलं. असे मनात राहिलेल्या संकल्पनांचे अर्थ अचानक समजल्यावर जो आनंद होतो त्याला तोड नसते!

सुरेख लिहिलंय. योगायोग असा की कालच नाथ संप्रदायाचा इतिहास वाचायला घेतलं आहे.

रोमहर्षक व माहितीपुर्ण अनुभव . बाकी "संगीत लग्नकल्लोळ" या मराठी नाटकामध्येही "आतां आमोद सुनांस जाले " असे गाणे ऐकले आहे .

गामा पैलवान's picture

18 Jul 2016 - 11:21 am | गामा पैलवान

Anand More,

अर्थोत्पत्तीची हुरहूर अप्रतिमपणे मांडलीत! :-)

आ.न.,
-गा.पै.

रातराणी's picture

18 Jul 2016 - 11:42 am | रातराणी

सुंदर लेख! आवडला!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2016 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

अतिशय आवडला हा लेख..
पैजारबुवा,

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

बोका शेठ तुमचा प्रतिसाद वाचला आणि "अवचिता परिमळू" ही रचना आठवली. तसा अनुभव घेण्याइतका माझा अभ्यास आणि भाव दोन्ही नाही. पण हो जुन्या कोड्यांची अनपेक्षित रित्या होणारी उकल फार आनंददायक असते.

आणि आत्ता आठवले की निर्गुणी भजनांची सिरीज मिपावर टाकली नाही आहे. आता टाकीन म्हणतो.

उडन खटोला's picture

18 Jul 2016 - 3:04 pm | उडन खटोला

आषाढी, गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आमच्या साराख्यांना असे लेख म्हणजे पर्वणी.

मोरे सर खूप सुरेख लिहिलंय.
अर्थ समजण्याआधीची तगमग म्हणजे दातात काही अडकलं आहे आणि निघता निघत नाही.
नि अर्थ सापडल्यानंतरची भावना म्हणजे नंतर कधीतरी हळूच जीभ फिरवुन अलगद निघाल्यावर होणारं समाधान.

पुन्हा पुन्हा वाचतोय. आभार.

सनईचौघडा's picture

18 Jul 2016 - 3:25 pm | सनईचौघडा

आता कळले की तुम्ही इतके दिवस मिपावर का नव्हतात ते. आता जेवढे अनुभव तुम्हाला येतील त्यातले थोडेस कण इकडे वाटा हो. नाहीतर आम्हाला तरी कधी कळणार या गोष्टी. लेख सुंदर झालाय.

सई कोडोलीकर's picture

18 Jul 2016 - 3:32 pm | सई कोडोलीकर

तुमच्या चिकाटीला सलाम! वाचन करत असताना माहित नसणारे असे अनेक संदर्भ येत असतात. अशीच परिस्थिती नगरकरांचे सात सक्कं त्रेचाळिस वाचताना अनेकदा झाली होती ते आठवले. न समजलेले तिथेच सोडून मी तशीच पुढे वाचत रहाते. कधीतरी कुठेतरी ह्या निरगाठी अचानक सुटत जातात. मात्र तुम्ही त्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत :-)

मैत्र's picture

18 Jul 2016 - 4:20 pm | मैत्र

तुमच्या विचारांबरोबर आणि आता आमोद सुनासि आले च्या अर्थ शोधात वाचकालाही बरोबर चालल्याचा अनुभव येतो.

दुसरा एक योगायोग - मराठी साहित्य हा ब्लॉग जुन्या व्यासंगी मिपाकर नंदनचा आहे. आणि दोन्ही कडे उत्तम लेख मिळतील.
बरेच काही उगवून आलेले हा एक सुंदर लेख आहे नंदनचा पण या विषयाशी संबंधित नाही.

विशाल चंदाले's picture

18 Jul 2016 - 6:37 pm | विशाल चंदाले

सुंदर लेख !!
मोकाशींची कथा माहीत होती, आणि त्या ओळीचा अर्थ काय असावा असा प्रश्न ही पडला होता. अर्थ आता कळाला, धन्यवाद.
तुमच्या नावातही आमोद आहेच की. :)

जव्हेरगंज's picture

18 Jul 2016 - 6:37 pm | जव्हेरगंज

लेख आवडला!!

अमित खोजे's picture

18 Jul 2016 - 8:59 pm | अमित खोजे

माझं असं कधी कधी होतं की पुस्तकाशी माझी नाळ जुळत नाही. मग मी पुस्तकाला आणि स्वतःला त्रास देत नाही. बहुतेक त्या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आलेली नाही असे म्हणून ते बाजूला ठेवतो. यथावकाश ते पुस्तक मला बोलावतेच. अश्या प्रकारे पुस्तकाने साद घातलेली असली की ते अगदी कडकडून भेटते. त्यातले विचार अगदी सहज समजतात आणि त्यावर मनातल्या मनात संवाद देखील छानपैकी सुरू होतो असा माझा अनुभव आहे.

अगदी खरं! माझ्याबाबतीत असे पुष्कळ वेळेला होते अन मला ते असे का होते याचा उलगडाच होत नव्हता. तुमचा अनुभव शब्दात मांडून तुम्ही माझ्या मनातील विचारांना वाट करून दिलीत. कितीतरी छान छान पुस्तके घरी आहेत परंतु बरेच वेळेस ती वाचाविशी वाटत नाहीत. खरेच माझ्या आयुष्यात अजून त्यांची वेळ आली नसावी.

अगम्य's picture

19 Jul 2016 - 12:54 am | अगम्य

छान लेख. धन्यवाद.
त्या निमित्ताने मराठी साहित्यविषयक ब्लॉग निर्माण करणाऱ्या, आणि त्यावर आमोद सुनांसी आले ह्या कथेचे सार्थ रसग्रहण टाकणाऱ्या नंदन ह्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत.

नाखु's picture

19 Jul 2016 - 10:14 am | नाखु

डोही आनंद तरंग !!!

मस्त लिखाण अगदी एखादी लहान्शी गोश्ट बाल्काला कळल्यावर जो निर्भेळ आनंद मिळतो तोच मिळाल्याचे लेखातून जाणवत राहते.

नितवाचक मिपा वारकरी नाखु