भाग - सोळावा (अंतिम)
धन्यवाद मिपाकरांनो !! मला तुमचे सर्वांचे आभार मानायचे आहेत. ते अशासाठी की वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही लेखमाला वाचलीत आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिलात आणि माझा लिहिण्याचा उत्साह वाढवलात त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. मी हाडाची लेखिका नाही त्यामुळे माझं लिखाण थोडं घरगुती स्वरूपाचं वाटलं असेलही पण माझ्या मनात जे आल ते मे लिहिलं. माझं लिहिण्यात काही चुकलं असेल तर माफ करा. आणि हो मला सांगा की माझ्या लिखाणात मी काय दुरुस्ती करू शकते. व्यनि केलात तरी चालेल. कोणाला लंडन मध्ये फिरण्याबद्दल काही माहिती हवी असेल तर जरूर व्यनि करा. पुन्हा एकदा माझी लेखमाला वाचणार्यांचे आभार!!
---------------------------- --------------------------------------
आज सकाळी लौकर उठलो. सामान सगळं आवरलेलच होतं. आज रूम मधून सकाळी लौकरच चेक आउट करायचं होतं त्यामुळे तिथल्याच एक लॉकर रूम मध्ये सामान ठेवून आम्ही बाहेर पडलो. आज बाहेर पाऊस पडत होता पण काहीही झालं तरी विम्बल्डन ला जायचंच होतं. सेंट्रल लंडन पासून विम्बल्डन तसं लांब आहे. इथे जाण्यासाठी साऊथफिल्ड्स नावाच्या ट्यूब स्टेशन वर उतरावे लागते. विम्बल्डन किंवा विम्बल्डन पार्क स्टेशन वरून लांब पडेल. तर साउथफिल्ड्स हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. इथून चालत जायला साधारण १५ मिनिटे लागतात पण पाऊस पडत असल्याने आम्ही बस ने गेलो.आम्ही विम्बल्डन म्युझिअम आणि लॉन टूर अशी कम्बाईन टूर घेतली होती. या दोन्हीचे मिळून अंदाजे ३५ ते ४० पौंड तिकीट होते. सर्वात आधी आमच्या टूर गाईड ची ओळख पाळख झाली तेंव्हा विम्बल्डन ही स्पर्धा कशी सुरू झाली याचा इतिहास सांगितला.
सर्वात पाहिले आम्ही निघालो कोर्ट क्रमांक १ कडे. इथे जाताना जोकोविच आणि सेरेनाचा मोठ्ठा फोटो लावलेला पहिला. कोर्ट क्र. १ खूपच मस्त आहे. खूप मोठ्ठ कोर्ट आहे. इथे आणि सेंटर कोर्ट वर सगळ्या मुख्य मॅचेस होतात. इथून आम्ही बाकीची सगळी छोटी कोर्ट्स पाहिली. तिथून आम्ही त्या लॉन वर गेलो जिथे लोकं बसून मोट्ठ्या स्क्रीन वर मॅच पाहतात.
इथून पुढे आम्हाला जिथून सगळे खेळाडू प्रवेश घेतात ती जागा दाखवली.
मीडियाच्या लोकांसाठी इथे वेगळी जागा आहे जिथे उभे राहूनच त्यांना शूट करावे लागते.
मीडियासाठी आणि खेळाडूंच्या मुलाखती घेण्यासाठी वेगळ्या खोल्या आहेत त्या दाखवल्या. तिथून पुढे आम्ही आलो एक कॉन्फरन्स रूम मध्ये जिथे खेळाडूंची मुलाखत होते स्पर्धा जिंकून आल्यावर. खेळाडूंच्या रेस्ट रूम्स मात्र त्यांनी दाखवल्या नाहीत.
इथून पुढे आम्ही गेलो सेंटर कोर्ट वर. हे येथील मुख्य कोर्ट आहे . जगातील सगळ्यात प्रसिद्ध कोर्ट म्हणजे विम्बल्डन चे सेंटर कोर्ट. माझ्यामते प्रत्येक टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंचं स्वप्न असेल या सेंटर कोर्ट वर येऊन टेनिस खेळण्याचं. या कोर्ट लाच फक्त रूफ आहे पावसापासून संरक्षणासाठी. इथे खूप निवडक मॅचेस होतात. गाईड ने सांगितल्याप्रमाणे हे कोर्ट कुठल्याही इतर सदस्यांना खेळासाठी वापरता येत नाही. कुठल्याच कोर्ट च्या जमिनीवर आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे सगळी कोर्ट्स प्रेक्षक जिथे बसतात तिथूनच बघितली. आणि हो विम्बल्डन चा अजून एक नियम म्हणजे इथे एक शिस्त पाळावी लागते ती अशी की तुम्ही कोणत्याही वयाचे असाल तरीही तुम्हाला इथे पांढरे शुभ्र कपडे घालूनच खेळावे लागते. हा नियम खेळाडूंप्रमाणेच इथल्या सदस्यांनाही लागू होतो. विम्बल्डन चे सदस्यत्व पण खूप मर्यादित लोकांसाठी आहे असे गाईड ने सांगितले.
ही टूर दीड तासांची होती ती झाल्यावर आम्ही म्युझिअम पाहायला गेलो. म्युझिअम मध्ये जुन्या विम्बल्डन टेनिस चा इतिहास, जुन्या पद्धतीच्या रॅकेट्स , टेनिस बॉल्स , जुन्या काळी लोकं कुठल्या प्रकारचे कपडे आणि बूट घालून टेनिस खेळत असत या शिवाय नवीन खेळाडूंचे फायनल मॅच चे कपडे , बूट दाखवलेले आहेत. याशिवाय पुरुष खेळाडूंना स्पर्धा जिंकल्यावर मिळणारा कप आणि महिला खेळाडूंना मिळणारी डिश ठेवलेली आहे.या कप आणि डिश वर कोरलेली खेळाडूंची नावेही दिसतात.
म्युझिअम मधील काही फोटो
सगळ्या खेळाडूंचे फोटो, काही ऐतिहासिक मॅचेस चे रेकॉर्डिंग्स सुद्धा ऐकायला मिळाले. म्युझिअम फिरण्याचा अनुभव खूप छान होता. म्युझिअम पाहून झाल्यावर थोडी खरेदी केली त्यांच्या दुकानांमध्ये आणि बाहेर आलो. इथे त्यांचे एक छोटेसे रेस्टो आहे. तिथे गेलो आणि मस्त हॉट चॉक्लेट प्यायलं. इकडे गेलात तर हे जरूर घ्या.
साडे तीन वाजले होते आता घाई करायची होती कारण ५ वाजता आमची कॅब येणार होती विमानतळावर जाण्यासाठी. बाहेर आलो तेंव्हा नेमका पाऊस पडत होता पण नाईलाज होता. निघावं लागणारच होतं. तसेच भिजत स्टेशन वर गेलो. अपार्टमेन्ट वर पोचेपर्यंत ५ वाजलेच ! लॉकर रूम मधून सामान घेतलं फ्रेश झालो आणि तेवढ्यात आमची कॅब आलीच. इथून बाहेर पडताना पाऊले जड झाली. पाय निघत नव्हता. २१ दिवसांचं वास्तव्य झालं होतं याच अपार्टमेंट मध्ये. सामान कॅब मध्ये घातलं आणि निघालो विमानतळावर. गाडीतून पुन्हा एकदा लंडनचं दर्शन घेतलं आणि ४५ मिनिटांमध्ये विमानतळावर पोहोचलो. सगळे सोपस्कार पार पडले आणि विमानाची वाट बघत बसलो. विमान लागल्याची घोषणा झाली आणि आत जाऊन बसलो.
मायदेशी पोहोचण्याची ओढ होतीच पण एकीकडे थोडं वाईट पण वाटत होतं . २१ दिवस खूप छान गेले होते. खूप नविन अनुभव , आठवणी दिल्या लंडनने. नवीन देश , नवीन माणसं , नवीन जागा कळाल्या आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एका अनोळखी देशात एकटीने फिरल्याचा अनुभव. विकांताला नवरा असायचा सोबत पण इतर वेळी मी एकटीनेच फिरले. खरोखर एकटीने फिरण्याचा अनुभव अवर्णनीय आहे. आत्तापर्यंत एकतर मित्र मैत्रिणी नाहीतर कुटुंबासोबत फिरलेली मी एका अनोळखी देशात एकटी फिरले या गोष्टीचा अभिमान वाटला आणि त्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. माझं लाडकं स्वप्न पूर्ण झालं होतं याचं प्रचंड समाधान होतं :-) या विचारांमुळे विमानाने कधी टेक ऑफ घेतला कळलंच नाही !!
समाप्त !!
** थोडी माहिती :-
घरगुती खाण्याचे सामान मिळण्याची ठिकाणे - टेस्को , सेन्सबरीस. आम्ही जिथे राहत होतो तिथे भारतीय दुकाने नव्हती त्यामुळे आम्हाला या जवळच्या दुकानांमध्ये सामान घ्यावे लागले.
खादंती - इथे बऱ्याच चेन रेस्टो आणि कॉफी शॉप्स आहेत जिथं सॅन्डविच आणि मफिन्स खूप छान मिळतात. प्रेट अ मॅन्गर मध्ये उत्तम प्रतीचे सॅन्डविच आणि मफिन्स मिळतात. आम्ही इथेच जायचो. याशिवाय कोस्टा , स्टारबक्स , मॅकडी आहेच. याशिवाय मॉन्युमेंट च्या बरोबर समोर एक फलाफल म्हणून छोटा जॉइंट आहे तिथे फलाफल मस्त मिळतात, साऊथ केन्सिंग्टन स्टेशन च्या बाहेर बरीच खाद्य भ्रमंती करता येईल. बेन्झ कुकीज म्हणून एक चेन आहे इथे अप्रतिम कुकीज मिळतात. तुम्हाला वेगळ्या देशांमधील खाद्यपदार्ध ट्राय करायचे असतील तर कॅमडेन टाऊन ला जा आणि खायची हौस भागवा. आणि मागील भागात सांगितल्याप्रमाणे GBK Gourmet Burger Kitchen सुद्धा छान आहे.
खरेदी- Oxford Street , वेस्टफील्ड मॉल , कॉवेंट गार्डन , कॅमडेन मार्केट इथे खरेदीसाठी बऱ्याच गोष्टी आहेत.
***टिप्स ***
** लंडन मध्ये पाऊसाचा काही भरोसा नाही त्यामुळे एक रेन जॅकेट किंवा छत्री कायम सोबत ठेवा.
** आपले एक ओळखपत्र शक्यतो पासपोर्ट ची झेरॉक्स कायम जवळ असुद्या
**भरपूर चालण्याची तयारी ठेवा
**थोडे कोरडे खाण्याचे सामान सुद्धा बरोबर ठेवा.( इथे गल्लोगल्ली आपल्यासारखे खाण्याचे जॉइंट्स नाहीत ;) )
प्रतिक्रिया
29 Jun 2016 - 12:19 am | राघवेंद्र
सुन्दर ट्रिप !!!
29 Jun 2016 - 12:58 am | Jack_Bauer
हे वाचून कंगनाची आणि Queen चित्रपटाची आठवण झाली. आपले अनुभव share केल्याबद्दल धन्यवाद. लंडनला गेल्यावर 221 बी बेकर स्ट्रीटला जायची खूप इच्छा आहे.
1 Jul 2016 - 8:56 pm | विनीत संखे
मी गेलोय २२१ बी बेकर स्ट्रीट ला... पण तिथे शेरलॉक नव्हता. साधा वॉटसन सुद्धा भेटला नाही. टुकार गल्ली ती!
29 Jun 2016 - 1:23 am | रेवती
लेखमाला आवडली. आणि घरगुती स्वरुपाचे लेखन असल्याने जास्तच भावली. सर्व फोटू आवडले.
धन्यवाद.
29 Jun 2016 - 1:55 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सचित्र लेखमाला.
दुसर्या प्रसिद्ध लेखनाचे अनुसरण न करता आपले लेखन आपल्याच पद्धतीने करावे, त्यामुळे ते "तुमचे लेखन" होते आणि त्यामुळेच जास्त भावते. "जसे पाहिले तसे" आणि "त्यावेळी जे मनात आले ते" लिहिण्याच्या पद्धतीमुळे ही लेखमाला जास्त आवडली !
अजून काही जरूर लिहा.
29 Jun 2016 - 10:43 pm | प्रचेतस
सुरेख लेखमालिका.
29 Jun 2016 - 4:47 am | स्रुजा
एक तर सगळ्यात पहिले, तुम्ही इतक्या केअरफुली आणि उत्साहाने सगळी ट्रिप आखली आणि पार पाडली त्याबद्दल तुमचं कौतुक. साधं सरळ कुठल्याही कृत्रिमतेशिवाय उतरलेलं लेखन हे भावतंच. अजुन एक आवडलं म्हणजे तुम्ही १६ ही भाग निगुतीने पुरे केलेत. भटकंतीसारख्या धाग्यांवर कधी कधी प्रतिसाद संख्या कमी असते , त्यात एका मागे एक भाग असल्यावर आण्खीन होऊ शकतं पण तुम्ही मनावर न घेता एक लेखन प्रवास पूर्ण केला याबद्दल अभिनंदन.
असेच अजुन तुमचे भटकंतीचे इरादे पूर्ण होऊ देत.
ईंग्लंड ला गेल्यावर विंबल्डन, २२१ बेकर स्ट्रीट आणि लॉर्ड्स याचि देही बघायची जबरदस्त इच्छा आहे. भारतात आल्याशिवाय युरोप ट्रिप होईल असं काही वाटत नाही मात्र. बघु कसे योग येतायेत. तो पर्यंत तुमच्या सारख्या लेखांमुळे आमची पर्वणी !
29 Jun 2016 - 10:02 am | स्नेहल महेश
"जसे पाहिले तसे" आणि "त्यावेळी जे मनात आले ते" लिहिण्याच्या पद्धतीमुळे ही लेखमाला जास्त आवडली !
+१११
29 Jun 2016 - 10:23 am | अजया
लेखमालिका आवडली.एकट्याने अनोळखी देशात फिरण्याची मजा वेगळीच.
पुलेशु
29 Jun 2016 - 11:41 am | विलासराव
आवडली.
29 Jun 2016 - 11:46 am | पद्मावति
अतिशय सुंदर लेखमाला.
29 Jun 2016 - 12:48 pm | नीलमोहर
'एका अनोळखी देशात एकटी फिरले या गोष्टीचा अभिमान वाटला आणि त्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला.'
- हे विशेष आवडले.
अशाच अजून अनेक प्रवासांसाठी शुभेच्छा.
29 Jun 2016 - 6:16 pm | जगप्रवासी
तुमच्या सरळ साध्या प्रवास वर्णनाने आम्हाला देखील लंडन फिरवून आणलात, एकट्याने फिरून इतकी ठिकाणे फिरलात त्याबद्दल कौतुक. तुमच्या अशाच भटकंती होत राहोत आणि आम्हाला वाचायला मिळाव्यात यासाठी सदिच्छा.
30 Jun 2016 - 10:26 am | वटवट
आवडेश.... मस्त
30 Jun 2016 - 2:29 pm | मेघना मन्दार
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार :) तुमच्या प्रतिसादांमुळे हुरूप आला !!
30 Jun 2016 - 3:32 pm | मोदक
सुंदर वर्णन आणि फोटो. शेवटच्या भागाची वाट पहात होतो. आता सवडीने संपूर्ण लेखमाला वाचेन.
वाचनखूण साठवली आहे.
पुढील प्रवासासाठी (आणि लेखमालेसाठी) शुभेच्छा. :)
1 Jul 2016 - 4:13 pm | विशाखा राऊत
सगळी लेखमाला खुप मस्त झाली. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया नाही देता आली.
सुंदर फोटो, उपयोगी माहिती.
पुढच्यावेळी येण्याआधी नक्की सांगा लंडन कट्टा करु
3 Jul 2016 - 2:04 pm | मेघना मन्दार
नक्की नक्की :) मला आवडेल भेटायला !!
1 Jul 2016 - 4:38 pm | उल्का
छान लेखमाला :)
2 Jul 2016 - 2:16 am | अभिजीत अवलिया
असेच वेगवेगळ्या देशात तुम्हाला फिरायला मिळो.
2 Jul 2016 - 3:10 am | पिलीयन रायडर
मस्त लेखमाला!
लंडनला कधी तरी जायची इच्छा आहे. तेव्हा तुमच्या लेखांचा उपयोग होइल.
लिहीत रहा!
2 Jul 2016 - 10:51 pm | स्वाती दिनेश
लेखमाला आवडली,
स्वाती
3 Jul 2016 - 2:03 pm | मेघना मन्दार
सर्वांचे आभार :)
3 Jul 2016 - 2:34 pm | प्रसाद_१९८२
छान लेखमाला,
सर्व प्रवास वर्णन आवडले.
14 Aug 2016 - 4:37 pm | महेन्द्र ढवाण
छान लेखमाला,
सर्व प्रवास वर्णन आवडले.