रायगड वारीच्या वेळेला "सह्याद्रीचे शिलेदार" नावाची संस्था गड साफ सफाईच काम करीत होती. त्यांच काम पाहून मनात काहीतरी हलल होत. गड संवर्धना बद्दल आतापर्यंत खूप वाचल होत, वाटायचं की आपण देखील काहीतरी कराव नुसत गड किल्ल्यांना भेट देऊन काय होणार. इतके लोक काम करताहेत आपण देखील काहीतरी कराव. यातूनच दुर्गवीर संस्थेच्या सुरगड श्रमदानाबद्दल कळाल, लगेच संपर्क साधून श्रमदानासाठी नाव नोंदणी केली.
"श्रमदान १ : सुरगड" - मुंबई गोवा महामार्गावरून सहज नजरेस पडणारा हा गड पण आतापर्यंत त्याची माहितीच नव्हती. या गडाच्या ट्रेक बद्दल कोणाच्याच ब्लॉग वर पण काही वाचल नव्हत, ट्रेक क्षितीज च्या साईट वर जाऊन गडाबद्दलची माहिती वाचली.
भिर्याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला कोर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला, व नदितून तीच्या खोर्यातून जाणार्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. खांब गावाजवळील घेरा सुरगडवाडी जवळ असलेला सुरगड हा महत्वपूर्ण गड याच साखळीत आहे
शनिवारी संध्याकाळी जमून निघायला रात्रीचे ९ वाजले. सुरगड पायथ्याशी असणाऱ्या गावात रात्री मुक्काम करून सकाळी ७ ला गड गाठला. गडावर प्रवेश करतानाच मारुती रायाची छान मूर्ती दिसली. दुर्गवीर संस्थेने इथे येण्यासाठी कातळ दगड एकत्र करून पायऱ्या बांधल्यात. मारुतीच्या मंदिराजवळ आधी खूप गवत, तण माजल होत ते त्यांनी ३ / ४ वेळा साफ केले, मुळापासून उपटून काढल्यामुळे आता तिथे गवताच प्रमाण खूप कमी होत. एकदम नगण्य.
वरती पोहोचून सामग्रीची पूजा केली. सचिन रेडेकर जो मोहिमेचा प्रमुख होता त्याने कामाची जागा दाखवली, नेमक काय करायचं आहे ते सांगितलं आणि कामाची विभागणी केली. मी, तुषार आणि नरेशने तटबंदीवर वाढलेल्या वेली, झाडे काढून टाकायचे तर सचिन आणि अजून तिघे (नाव लक्षात नाहीयेत) ते तटबंदीला लागून असणाऱ्या एका टाक्यातील दगड साफ करायचे. मग काय शिवरायांच्या नावाचा जयजयकार करून त्यांना वंदन करून कामाला सुरुवात केली.
उन वाढायच्या आधी जितके जास्त काम करता येईल तितके काम करायच्या मागे लागलो. पहिल्यांदाच कोयतीने खुरटी झाडे तोडत होतो, घाव नीट बसत नव्हते मग तुषारने कोयती कशी मारायची ते दाखवले. काटेरी झाडं खूप होती त्यांना तोडत त्यातून वाट काढत तटबंदी जवळ जायचे म्हणजे खायचं काम नव्हत. फुल स्लीव असलेल टी शर्ट हाताच त्या काट्या पासून बचाव करत होते पण हाफ प्यांट मुळे पायावर बरेच ओरखडे आले होते. जवळ जवळ ६५ मीटर तटबंदी वरील झाड, वेली साफ केल्या. टाक्यातील पन्नास दगड तोपर्यंत सचिनच्या टीमने काढले होते आणि टाक्याच्या बाजूने कुंपणा सारखे रचले होते जेणेकरून परत आत पडू नयेत आणि नवीन दगड, माती आत जाऊ नये. १२ च्या उन्हात काम करण जेव्हा कठीण झाल तेव्हा काम थांबवल. कामा आधी आणि कामा नंतरचे फोटो काढून घेतले आणि गड उतरायला चालू केले. उतरताना घळीत गार वारा लागत होता, आधीच दमलो होतो मग काय घळीत सावली बघून प्रत्येक जन दगड बघून १० मिनिट झोपले. गावात येउन जेऊन रविवारी मुंबईला परत. (गडाबद्दल सविस्तर माहिती नंतर कधीतरी.)
"श्रमदान २ : किल्ले कुलाबा" - १ मे महाराष्ट्र दिन. आपल्या मराठी माणसाच्या अस्मितेचा दिवस. कुणी या दिवशी बाईक rally काढत, कुणी कार्यक्रम करतात. पण आम्ही महाराष्ट्र दिन कुलाबा किल्ल्यावर साफ सफाई करून साजरा करायच ठरवल. मार्च महिन्यात झालेल्या कुलाबा किल्ल्यावरील श्रमदानावेळी मला वडिलांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे जाता आल नव्हत, अगणित दारूच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, शीतपेयाच्या बाटल्या असा एकंदरीत तेव्हा १० पिशव्या भरून कचरा काढला होता. यावेळेला दोन तीन दालन आणि एक तटबंदी साफ करायची होती.
शनिवारी गेटवे वरून अलिबागला जाणारी बोट पकडून अलिबागला आलो. आम्हाला यायला थोडा उशीर झाला होता त्यामुळे सर्व बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या होत्या. आम्हाला किल्ल्यावर आता पाण्यातून चालत जावे लागणार होते. ओहोटी लागली होती पण पाणी उतरायला अजून १ /२ तास होते म्हणून किनाऱ्यावर गप्पा मारत जेवण करून घेतले. रात्री ११ च्या दरम्यान आम्ही कंबर भर पाण्यातून चालायला सुरुवात केली. किल्ल्याजवळ आल्यावर वस्तीवरील कुत्र्यांनी भुंकून आमच स्वागत केल. मंदिरात येउन कपडे बदलून तटबंदीवर झोपायला गेलो. वरती आकाशात असंख्य तारे चमकत होते चंद्राच्या प्रकाशाने पाणी चमकत होत. साला अशा वेळेला काय मस्त झोप लागते जी आपल्या घरात उबदार गोधडीत पण येत नाही.
अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे. अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला-ट्रेक क्षितीज वरून साभार
सकाळी ६ ला उठून एका घरात चहा घेतला, देवीच दर्शन घेतलं. सामानाची पूजा करून अमित दादाने कामाची विभागणी केली. गेल्यावेळी जिथे काम संपवलं होत तिथून यावेळेला सुरुवात करायची होती. बाहेरचा परिसर साफ करण्यात ७ जण गुंतले तर दोन दालन सफाचाट करण्यात आम्ही ५ जण लागलो. गेल्यावेळे पेक्षा यावेळेला कमी दारूच्या बाटल्या भेटल्या हे त्यातल्या त्यात चांगली गोष्ट होती. वाढलेलं गावात कापण्यात गुंतलेलो असताना गौतम दादांनी तटबंदीवर असलेल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाला तोडायचं का विचारल मग काय चालू हाणामारी. शिडी लावून दोन्ही झाड तोडली. झाड तोडून आणि गावात जाळून झाल्यावर ते दालन खूप छान दिसत होत. आता पुढच काम हेच होत की साफ झालेल्या जागेवर परत गावात उगवायला द्यायचं नाही.
वरून सुर्य आग ओकायच काम करत होता, तटबंदीवर काम करताना तर उन्हामुळे अंग भाजून निघत होत. फिरायला आलेले बरेच पर्यटक आमच काम पाहून विचारणा करत होते, पुढल्या वेळेला काम करायला येण्यासाठी बऱ्याच जणांनी उत्सुकता दाखवली. त्यांची नाव, नंबर लिहून घेतले आणि आमचे देखील दिले. पुढच्या तारखांची माहिती द्यायची आश्वासन देऊन आम्ही परत कामाला भिडलो. आता उन्हात काम कारण खूप कठीण जात होत, मिनिटा मिनिटाला पाण्याच्या बॉटल संपत होत्या तितक्या परत विहिरीवरून परत भरून आणत होतो.
किल्ल्याच्या प्रवेश द्वारा जवळील तटबंदीवरील तोफ अस्ताव्यस्त पडली होती. ती उचलून व्यवस्थित ठेवली तसच पुढे बुरुजावर असलेल्या तीन तोफा नीट उचलून दगड लावून ठेवल्या जेणेकरून त्या नीट राहतील. १२.३० ला काम आटोपत घेऊन परत मंदिरात आलो. विहिरीवर फ्रेश होऊन, गोळा केलेला कचरा घेऊन किल्ल्याच्या बाहेर पडलो. बाहेर आल्यावर एका घोडा गाडीत कचऱ्याच्या ६/७ पिशव्या ठेवल्या आणि निघालो. जून महिन्यात उरलेली तटबंदी साफ करायची आहे आणि गडाच्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करणार आहोत जेणेकरून फिरायला आलेले पर्यटक थोडा वेळ झाडांच्या सावलीत आराम करू शकतील. बरेच साफसफाईच काम बाकी आहे, सर्वात महत्वाच म्हणजे याबद्दल जनजागृती व्हायला हवी. गड फिरायला आलेले बरेच जण फक्त स्वतःचे फोटो काढण्यात मश्गुल होते आणि पाणी पिउन झाल्यावर बॉटल सहज फेकून देत होते. कितीतरी जणांना बॉटल फेकताना अडवल आणि त्या बॉटल आमच्या कचरा पिशवीत जमा केल्या. गडावर सर्वात जास्त कचरा हा पाण्याच्या बॉटल आणि चिप्सच्या पिशव्यांचा होता.
टीप : हा धागा स्वतःच्या कामाचा डंका पिटून पाठ थोपटून घेण्यासाठी नाही तर या मोहिमेत अजून लोक सहभागी होण्यासाठी खरडला आहे. अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या विविध किल्ल्यांवर साफसफाई करत आहेत आणि आपण फक्त ट्रेक करून स्वतःला ट्रेकर म्हणवून घेत आहोत याची लाज वाटत होती म्हणून मी देखील या संवर्धनाच्या कामात खारीचा वाटा उचलला.
शिवसेवक,
जगप्रवासी
प्रतिक्रिया
2 Jun 2016 - 1:30 pm | अनिरुद्ध प्रभू
चांगलं करताय...असेच चालु दे...
2 Jun 2016 - 1:32 pm | एस
वा! फार छान. काही प्रमाणात असं कार्य आमच्या मित्रमंडळींनी मिळून केलं इतर किल्ल्यांवर. फार समाधान लाभतं.
2 Jun 2016 - 1:34 pm | यशोधरा
खूप चांगलं काम केलं आहे. कौतुक सगळ्यांचच.
2 Jun 2016 - 2:19 pm | कंजूस
चांगलंय.
2 Jun 2016 - 2:34 pm | शशिकांत ओक
आपल्या या कामाचे फोटो पहायला मिळाले तर आवडेल. कौस्तुभ बुटाला यांनी पुढाकार घेऊन प्रताप गडावर बुरुजाच्या बांधकामातून गड संवर्धनाच्या कामाला सुरुवात करून ठेवली आहे. त्यांचा पुढील प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. त्याबद्दल उत्साही मिपाकरांच्या मित्रपरिवारातील कोणीही अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ९८८१९०१०४९.
2 Jun 2016 - 2:54 pm | स्वच्छंदी_मनोज
स्तुत्य उपक्रम आणी तुमचेही अभीनंदन. दुर्गवीरच्या संतोष हासुरकरला आणी नितीनला ओळखत असल्याने त्याच्या कामाबद्दल माहीती होतेच. तसेही त्यांनी दुर्गसंवर्धन केलेल्या मानगडावर जाऊन आल्याने त्यांच्या कामाविषयी आदरच आहे.
अवांतरः नागोठणे, चौल, रेवदंडा इथून घाटावर सुधागड मार्गे जाणार्या घाटवांवरचा एक महत्वाचा किल्ला म्हणजे सुरगड.किल्ला सुंदर तर आहेच पण किल्ल्यावर एक वेगळाच शिलालेख आहे अर्धा उर्दू आणी अर्धा देवनागरी स्क्रीप्ट असा.
ह्याच सुरगडावरून क्रॉसकंट्री ट्रेक करून डायरे़क्ट पालीला आणी सरसगडला जाता येते. ह्याच क्रॉसकंट्रीच्या वाटेत उसर नावाचे गाव लागते जिथे जुने उत्तम वरदायनीचे मंदीर आहे. पुढच्या वेळेला जेव्हा जाल तेव्हा सुरगड-सरसगड असा ट्रेक करा :)
2 Jun 2016 - 2:57 pm | प्रचेतस
उर्दू नसून फ़ारसी आहे.
2 Jun 2016 - 3:09 pm | स्वच्छंदी_मनोज
वल्लीसर... ताबडतोब दुरुस्तीबद्दल धन्यवाद :) :)
(आम्हाला फारसी काय किंवा उर्दू काय सगळे सारखेच :) )
2 Jun 2016 - 4:13 pm | जगप्रवासी
सूरगडावरील शिलालेख
मारुती रायाची देखणी मूर्ती
दगडी सिंहासन
वरून दिसणारा नजारा-१
वरून दिसणारा नजारा-२
2 Jun 2016 - 4:45 pm | नाखु
काम.
सेल्फीच्या जमान्यातही सेलफ्री काम म्हणजे मस्तच.
सेलफ्री सेल दालन फ्री (कचरामुक्त)
नाखु
2 Jun 2016 - 5:18 pm | प्रचेतस
संधी असूनही केवळ हळहळण्यापलीकडे दुर्गसंवर्धनाचे काम कधीच केले नाही ह्याची नेहमीच खंत वाटते.
9 Jun 2016 - 2:51 am | डॉ सुहास म्हात्रे
हळहळण्यापलीकडे दुर्गसंवर्धनाचे काम कधीच केले नाही ह्याची नेहमीच खंत वाटते.+१११
दूर्गवीर संस्था स्पृहणिय काम करत आहे. लेखकाने त्यात लावलेला हातभारही स्तुत्य आहे.
2 Jun 2016 - 7:31 pm | दुर्गविहारी
उत्तम कार्य. या साठी माझाही खारीचा वाटा असावा हि फार इच्छा आहे. बघुया कधी योग येतो.
3 Jun 2016 - 12:52 am | बोका-ए-आझम
फारच छान! पुढच्या वेळी वेळ मिळाला तर नक्की येईन. फार छान काम!
4 Jun 2016 - 1:56 am | मनो
शिलालेखाचे वाचन झाले आहे का? फोटोमध्ये वाचणे अवघड आहे, पण साधारण मजकूर काय आहे?
7 Jun 2016 - 3:43 pm | जगप्रवासी
मला माहित नाही, तो फारसी आणि मोडी लिपीत असल्यामुळे काहीच कळल नाही पण आपले मिपाकर प्रचेतस याबाबतीत माहितगार असल्यामुळे त्याचा फोटो काढून ठेवला.
7 Jun 2016 - 3:50 pm | प्रचेतस
नै हो. मला मोडी आणि पर्शियन येत नाही. बॅटमॅन मात्र वाचू शकतो.
9 Jun 2016 - 2:26 am | मनो
मोडी नाहीये हो ती. साधी आपली बाळबोध मराठी दिसतेय. शब्द अपरिचित असतील कदाचित. एखादा चांगला फोटो मिळतो का ते पाहतो आणि प्रयत्न करतो वाचायचा. रोहीड्यावर पण असाच दोन भाषेत शिलालेख आहे. राजगडाच्या पाली दरवाज्यावरहि एक आहे. बहुतेक निजामशाहीचा असावा हा शिलालेख.
4 Jun 2016 - 12:55 pm | पैसा
अतिशय उत्तम काम करता आहात!
4 Jun 2016 - 6:04 pm | पद्मावति
उत्तम कार्य!
7 Jun 2016 - 3:40 pm | जगप्रवासी
सर्वांचे धन्यवाद, जमेल तस तुम्ही देखील काहीना काही करत रहा. बऱ्याच संस्था दुर्ग संवर्धनासाठी झटत आहेत. कुठल्याही संस्थेला जॉईन व्हा आणि लागा कामाला.
12 Nov 2016 - 12:33 pm | शशिकांत ओक
नमस्कार शक्य असेल तर 9881901049 वर बोलायला आवडेल.