पाणीच पाणी चोहीकडे...

विकास's picture
विकास in काथ्याकूट
19 Sep 2008 - 11:34 pm
गाभा: 

आत्ताच म.टा. आणि सकाळ मधे वाचले त्याप्रमाणे नाशिकमध्ये महापूर आला आहे आणि पुण्यासकट महाराष्ट्रात इतरत्रही पावसाच्या पाण्याने पूरसदृश्य परीस्थिती झाली आहे...

काही ठळक माहीती (वास्तवीक सगळेच ठळक आहे पण...)अशी:

  1. पुराच्या पाण्यामुळे गोदावरीकाठी असलेल्या प्रसिद्‌ध नारोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाली आहे. नाशिक शहरातील मधील चैतन्यनगर भागात पाणी शिरल्याने अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेने बोटीचा वापर सुरू केला आहे.
  2. ५०हून जास्त बिल्डिंगाभोवती पाण्याचा वेढा
  3. गोदावरीमधून सद्यस्थितीत ७५ हजार कयुसेक्‍स पाणी वाहते आहे. त्यामुळे निफाड तालुक्‍यातील चांदोरी, सायखेडा यांच्यासह १२ गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
  4. दरम्यान पुरामुळे हरसूल, त्र्यंबकेश्‍वर, गिरणारे, नाशिक यांसह सायखेडा,चांदोरी या गावांचा संपर्क तुटलेला आहे.
  5. खडकवासला धरणातून २२ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याने मुठेतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

हे सर्व होण्याची अनेक कारणे आहेत. पण दोन पटकन सांगाविशी वाटणारी कारणे:

  1. वास्तवीक श्रावण (राखी/नारळी) पौर्णिमेनंतर कमी होणारा पाऊस हा अजूनच अतिवृष्टीकडे वळत आहे. याचा संबंध काही प्रमाणात वातावरण बदल/क्लायमेट चेंज शी लावता येऊ शकतो. तसा आहे देखील...
  2. पाऊस हा कधीतरी जास्त पडतो / पडू शकतो (मग तो पावसाळ्यात असेल अथवा इतर कारणांमुळे इतर वेळेस असेल!) इतके जरी मान्य केले तरी आजच्या या परीस्थितीस जबाबदार कोण आहेत या वर विचार केल्यास वाटते - वाटेल तेथे वाटेल तशा इमारती बांधणारे बिल्डर्स, त्याला परवानगी देणारे सरकार/नोकरदार आणि त्याचा विचार न करता ते घेणारे सामान्य नागरीक...

पाण्याला नीट आडवले आहे असे म्हणण्या इतकी धरणे नक्कीच आहेत. पण उरलेले पाणी परत जमिनीत झिरपण्यासाठी लागणारी जमिन ही काँक्रीट अथवा डांबराने भरलेली झाली आहे...अशा वेळेस कृष्णामाई असोत अथवा गोदावरी असोत ती संथ कशी वाहत बसेल... निसर्ग आपली वाट शोधतो. गंगा जशी आळशाला फलदायी नसते तशीच ती गैरवापर करणार्‍यास पण फलदायी ठरणार नाही हे लोकांना किमान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी समजणे भाग आहे असे वाटते...

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

20 Sep 2008 - 12:01 am | भास्कर केन्डे

समयोचित लेखन... आभार!

याचा संबंध काही प्रमाणात वातावरण बदल/क्लायमेट चेंज शी लावता येऊ शकतो. तसा आहे देखील...
-- ते कसे हे सुद्धा जरा विस्तारून सांगा ना. आम्हाला किमान वाचायला तरी आवडेल.

आपला,
(पर्यावरणवादी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विकास's picture

20 Sep 2008 - 12:38 am | विकास

याचा संबंध काही प्रमाणात वातावरण बदल/क्लायमेट चेंज शी लावता येऊ शकतो. तसा आहे देखील...
-- ते कसे हे सुद्धा जरा विस्तारून सांगा ना. आम्हाला किमान वाचायला तरी आवडेल.

प्रतिसाद म्हणून विषय मोठा आहे, पण थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो:

सर्व प्रथम ९०च्या दशकात "ग्लोबल वार्मिंग" हा शब्द जास्त प्रचलात होता कारण जगाचे सरासरी तपमान वाढत आहे म्हणून. पण जेंव्हा सरासरी वाढते तेंव्हा त्याचा दुसरा अर्थ असा असतो की ते काही ठिकाणी कमी होते तर काही ठिकाणी जास्त. त्यामुळे जे वातावरणात बदल घडतात ते जास्त करून स्थानीक असतात म्हणून त्याला "जागतिक तापमान वृद्धी"च्या ऐवजी "पर्यावरण बदल" असा शब्द प्रचलात आणला गेला...

या बदलाचे जे परीणाम स्थानीक पर्यावरणावर असतात ते चित्रविचित्र असतात - त्याला "एक्स्ट्रीम वेदर कंडीशन" असे म्हणतात. उ.दा. तुम्ही-आम्ही रहात असलेल्या न्यू इंग्लंड भागातला बर्फ कमी होणे अथवा वेळेवर न पडता कधीतरी वेगळ्याच वेळेस पडणे असे घडते. उ.दा.: बॉस्टनमधे बर्फाचा मौसम हा साधारण मार्च मधे संपतो, नंतर पडला तरी अगदी विरळ एप्रिल मधे पडतो... पण १९९६ साली मार्चपर्यंत बर्फ सरासरीपेक्षा कमी पडला. आणि अचानक १ एप्रिलला आता माहीत असलेले "एप्रिल फूल" हिमवादळ आले आणि २४ तासाच्या आत जवळ जवळ ३६ इंच बर्फ हा वसंत ऋतूत - स्प्रिंग मधे पडला. असे प्रकार युरोपात पण झाले जेंव्हा अतीवृष्टी झाली अथवा तापमान नको इतके वाढल्याने फ्रान्समधे अनेक माणसे दगावली...

अशा एक्स्ट्रीम वेदर कंडीशन्स या कधिपण न सांगता येतात. त्याचा प्रत्येक वेळेस पर्यावरण बदलाशी संबंध असतोच असे नाही. पण शास्त्रज्ञांच्या मते वर्तमान आणि भविष्यात असे प्रकार वाढीस लागणार आहेत. लागलेले आपण बघू देखील शकतो. म्हणूनच याचा संबंध पर्यावरण बदलाशी लावता येऊ शकेल असे म्हणले.

पर्यावरण बदलासंदर्भात नजिकच्या काळात घडणार्‍या घटना बदलण्यासाठी आपल्या हातात काही नाही (त्याचे प्रमाण कमी करणे आणि थांबवणे अर्थातच आपल्या/जगाच्या हातात आहे!). पण समोर चालून येणारी संकटे ओळखून तयारी करणे नक्कीच हातात आहे. पण त्यासाठी लागणारे नागरीकरण नियोजन आणि बांधकाम व्यवस्थापन हे गंभिरपणे घेणे गरजेचे आहे. आज तरी क्लायमेट चेंज हा प्रकार आपण वाळूत मान खुपसून नाहीच आहे असे सिद्ध करण्यात मश्गूल आहोत असे वाटते.

भाग्यश्री's picture

20 Sep 2008 - 12:19 am | भाग्यश्री

फोटोज पाहीले मी त्या पुराचे.. महापूरच म्हणायचा! किती ते पाणी बापरे!

कारणं पटली.. उपाययोजना काही होत असतील असं वाटत नाही..

विसोबा खेचर's picture

20 Sep 2008 - 12:20 am | विसोबा खेचर

निसर्ग आपली वाट शोधतो. गंगा जशी आळशाला फलदायी नसते तशीच ती गैरवापर करणार्‍यास पण फलदायी ठरणार नाही हे लोकांना किमान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी समजणे भाग आहे असे वाटते...

सहमत आहे!

पुराचं एवढं प्रचंड पाणी वाया जातं परंतु ते अडवायची, जिरवायची काहीच सोय आपण केलेली नसल्यामुळे एवढा पूर येईस्तोवर पाऊस पडूनही अजून अवघ्या दोनचार महिन्यांतर दोन कळश्या पाण्याकरता दोन दोन मैल वाट तुडवण्याचे भोग बायकांच्या नशीबी आहेतच!

'टँकरमुक्त गाव' हे अद्याप तरी स्वप्नच राहणार आहे!

आपला,
(दु:खी!) तात्या.

धनंजय's picture

20 Sep 2008 - 6:39 am | धनंजय

काँक्रीटमुळे आणि डांबरामुळे पाण्याचा निचरा होत नाही. पूरही होतो, पण भूजलपातळीही वाढत नाही.

पण उत्तर महाराष्ट्रात इतके काँक्रीट आणि डांबरीकरण झाले आहे का?

जंगलतोडीमुळे बोडक्या झालेल्या जमिनीतही पाणी मुरत नाही असे ऐकले आहे. त्यामुळेसुद्धा ही समस्या वाढली असेल काय?

पण उत्तर महाराष्ट्रात इतके काँक्रीट आणि डांबरीकरण झाले आहे का?
जंगलतोडीमुळे बोडक्या झालेल्या जमिनीतही पाणी मुरत नाही असे ऐकले आहे. त्यामुळेसुद्धा ही समस्या वाढली असेल काय?

जेंव्हा पाउस पडायला लागतो, तेंव्हा त्यातील पाणी मुरायला जमिनीचा शोध घेत असते. जेंव्हा अतोनात इमारती सरकारी नियमांप्रमाणेच निसर्गाचे नियमपण धाब्यावर बसवतात तेंव्हा अथवा जेंव्हा घराच्या आजूबाजूला काँक्रीट्/डांबर वापरून कार पार्कींग अथवा रस्त्यासाठी जागा करतात, तेंव्हा त्याचे दोन परीणाम होतात - पहीला पाण्याची मुरण्याची जागा जाते आणि दुसरे, त्यामुळे ते पाणी रस्त्यावरून अथवा जशी वाट मिळेल तसे उतारावरून वाहत वाहत नदी/तळे/नैसर्गिक जलसंचयापाशी जाऊन मिळते. त्यात जर आजूबाजूला असलेली गटारे ही साफ केली नसली तर त्यामुळे त्यातील पण पाणी अडते. बघता नदी प्रदुषीत नक्कीच होते आणि जर पाऊस जास्त पडला तर तिची पातळी वाढायला लागते. त्यात जर धरणाची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर जाऊ लागली तर त्यातील अतिरीक्त पाणी नदीस मिळते आणि तो पूर अथवा महापूर होऊ शकतो. त्यात आपण म्हणता तशी जंगलतोड झाल्यामुळे तिथली धूपपण वाढते आणि पाणी पसरत जाते.

नाशिकची वाढ पण पुण्यासारखीच झालेली आहे. लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याचबरोबर घरांसाठीची मागणी. त्यात आश्चर्य नाही पण त्या मागणी साठीची नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) होणे पण महत्वाचे आहे. ते न करता आत्यंतिक हावेने जेंव्हा वाटेल तसे ओढे बंद करून, उपनद्यांपण बुजवून (हे नाशिक मधे झाले आहे का नाही ते माहीत नाही, पण पुण्यात झाल्याचे ऐकले आहे) जेंव्हा जमिन तयार केली जाते तेंव्हा पाण्याला जायला कमी पर्याय राहतात आणि मग "कमी विरोधाच्या मार्गाने" ("लाईन ऑफ लीस्ट रेझिस्टन्स") जाण्याचा नैसर्गिक स्वभाव वापरत पाणी कसेही जाऊ लागते.

ऍल गोअरच्या "ऍन इनकन्व्हीनियंट ट्रूथ" या पुस्तकात पर्यावरण बदलामुळे होणारे पावसाचे जागतीक कमी अधिक परीणाम यासंदर्भात एक छान चित्ररूपी आलेख आहे. त्यात दाखवलेल्या शास्त्रीय माहीतीप्रमाणे मुंबई/महाराष्ट्रातील पाउस हा आता ५०% वाढला आहे/वाढत आहे. "टेरी" ("दी एनर्जी अँन्ड रीसोअर्सेस इन्स्टीट्यूट") या भारतीय संस्थेच्या माहीती प्रमाणे मुंबईतील सागरी पातळी पण वाढत आहे. त्यात आता ह्या काँक्रीटीकरणाचा, वृक्षतोडीचा, डांबरीकरणाचा आणि अनिर्बंध घरबांधणीचा विचार करा, म्हणजे समजेल की महापूर कसा येतो ते.

उदाहरणादाखल विषयांतर करतो: गुगलचे मूळ उत्पन्न हे शोधपानांच्या बाजूस, इमेलच्या बाजूस असलेल्या जाहीरातींवर टिचक्या मारल्याने होते. त्याला ऍड सेन्स म्हणतात. देणार्‍याला टिचक्यांवर आधारीत पैसे द्यावे लागत असल्याने विशेष वाटत नाही, टिचक्या मारणार्‍याचे काहीच जात नसल्याने त्याला काही वाटत नाही, पण गुगल मात्र यातून लाखो डॉलर्स मिळवते! कवडी कवडी माया जोडी! तसेच नगर रचनेचे आहे, पर्यावरणासंदर्भात आहे. थोडे काँक्रीटीकरण असले तर काय बिघडले? असे वाटू शकते, पण असे जेंव्हा करणारे अनेक असतात तेंव्हा त्यात काही काळ व्यक्तिगत उपाय मिळाला (घरबांधणी, गाडीची जागा, रस्ता आदी) असे वाटले तरी सामुहीक दृष्ट्या हा मोठा प्रश्न होऊ शकतो.

कदाचीत पुढचा काही काळ यावर वृत्तपत्रे, राजकारणी, "विचारवंत" चर्चा करतील नंतर विसरतील. भारतीय समाज (त्यात मी पण आलो) तर काय सहनशील, शूर वगैरे सर्व आहे - बाँब पडले म्हणून न भिता कामावर जातो... तेथे असला पूर कोठे घेऊन बसलात? किस झाड की पत्ती!

ह्यातील उपरोध हा तुम्हाला अथवा इतरांना व्यक्तीगत नाही आहे.कृपया गैरसमज नको. थोडेफार त्राग्याने नक्कीच लिहीलेले आहे. त्यात नकारात्मक अथवा भिती घालण्याचा उद्देश नाही आहे, पण आपल्या क्रियांना मिळणार्‍या प्रतिक्रीया आणि कृतींचे होणारे दुष्परीणाम दाखवण्याचा प्रामाणिक हेतू मात्र नक्की आहे.

अवांतरः "स्टॉर्मवॉटर ऍसेट मॅनेजमेंट" अर्थात "पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन" या विषयावर मला इपिए (एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्षन एजन्सी) च्या अनुदानाने संशोधन करायला मिळाले होते. देश आणि गाव जरी वेगळे असले तरी अतिकाँक्रीटीकरणाचे होणारे परीणाम कमी अधिक फरकाने समानच असतात.

प्राजु's picture

20 Sep 2008 - 6:45 am | प्राजु

मी सकाळ वर पाहिली ही चित्रे...
गोदावरीने पात्र सोडून वाहण्या इतके काँक्रीटीकरण नाशिक आणि भागात झाले आहे का?? मी कधीही या भागांत नाही गेलेली.
पण जे काही चालू आहे ते अतिशय गंभिर आहे आणि कदाचित आणखी १० वर्षांनी या पेक्षा बिकट परिस्थिती निर्माण होईल त्या आधीच योग्य ती उपाय योजना करायला हवी.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

20 Sep 2008 - 9:08 am | चतुरंग

नदीवर बांधलेली धरणे पाणी आडवतात. प्रत्येक धरणाचे एक पाणलोट क्षेत्र असते (पाणलोट क्षेत्र म्हणजे धरणाच्या वरच्या बाजूला नदीला ज्या ज्या ठिकाणाहून पाणी येऊन मिळते तो भाग). ह्यात उपनद्या, नाले, ओढे, ओहोळ, डोंगरावरुन वाहून येणारे पाणी असे सगळे अंतर्भूत असते. बेसुमार जंगलतोडीने डोंगर बोडके होतात. माती धरुन ठेवायला वृक्ष लागतात. पावसाळ्यात पडणारे पाणी भरमसाठ माती वाहून नेते. बरीचशी माती हळूहळू धरणात येऊन गाळाच्या स्वरुपात अडते. काही वर्षात धरणाची पाणी साठा करण्याची क्षमता घटते. धरण पूर्वीपेक्षा लवकर भरते. आता धरणातून पाणी सोडून देण्याशिवाय गत्यंतर नसते. जोरदार पावसाच्या काळात धरणाच्या खालच्या अंगाला आधीच नदीला भरपूर पाणी असते. शिवाय विकासने वर उल्लेख केल्याप्रमाणे नदीवर शहरी भागात झालेले अतिक्रमण,छोट्या नद्या, ओहोळ बुजवून त्यावर बिल्डिंग उभारणे असले प्रकार झालेले असले की शहरातले सगळे पाणी गदीचे पात्र फुगवते. नदीला नैसर्गिक विस्ताराला जेवढी जागा अपेक्षित आहे त्यावर माणसांचे अतिक्रमण झाल्याने पाणी वस्त्यांमधे शिरणारच. त्यातच धरणातून अनिवार्यपणे सोडलेले पाणी मिळाले की पूर येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जास्त प्रमाणात एकवटल्या की त्याचे रुपांतर महापुरात होते! म्हणजे वस्तुतः नदी तिचे नैसर्गिक पात्र धरुनच वाहिली असती पण आपण पात्रात जाऊन घरे बांधणार आणि ओरडणार की पुराने घर बुडाले, असा उलटा न्याय आहे.

उपाय -
१ - धरणातील गाळ वरचेवर उपसा करणे. (ही माती अतिशय सुपीक असते. शेतीला विकत देता येऊन सरकारला उत्पन्नाचे साधन होऊ शकते.)
२ - वृक्षतोड रोखणे व नवीन झाडे लावणे.
३ - डोंगरावर छोटे बंधारे घालून पाणी नदीला मिळण्याआधीच जमिनीत जिरवणे (विशेषतः पाणलोट क्षेत्रात).
४ - शहरातून पडणारे पावसाचे जास्तितजास्त पाणी जमिनीत निचरा होईल असे बघणे - ह्यात बोअरवेलचे पुनर्भरण, जमिनीखाली पाण्याच्या टाक्या बांधून गच्चीवर आणि अंगणात पडणारे पावसाचे पाणी साठवून ते वापरणे. इ. उपाय होऊ शकतात.
५ - शहरात गटारे साफ ठेवणे जेणेकरुन पाणी नीट निचरा होईल.
६ - शहरी भागात झालेले नदी, ओहोळ ह्यावरचे अतिक्रमण अतिशय कठोर कारवाईने दूर करणे.

चतुरंग

मिंटी's picture

20 Sep 2008 - 11:42 am | मिंटी

अधिक माहितीसाठी इथेवाचा :-

http://www.esakal.com/esakal/09202008/SpecialnewsEDDB762911.htm

मराठी_माणूस's picture

20 Sep 2008 - 12:40 pm | मराठी_माणूस

सर्व प्रथम आपण हि माहिति इथे दिल्याबद्दल धन्यवाद. काल जेंव्हा हि बातमि समजलि तेंव्हा पासुन टी.व्ही लाउन ठेवला होता पण कुठेच काहि सविस्तर दाखवत नव्हते . एका चॅनल वर फक्त टिकर टेप वर तेच तेच येत जात होते. सह्याद्रि च्या रत्रिच्या ९.३० च्या बातम्या लावल्या तर मथळ्या मधे कूठेच उल्लेख नाहि. डेव्हिस कप चा मात्र आवर्जुन उल्लेख होता. सविस्तर वॄत्तात थोडा उल्लेख होता पण बातमि नाशिक व इतर शहरांचि सांगताना व्हिडिओ फित मात्र कुठलि ते काहिच समजत नव्हते. आज सकाळि सह्याद्रिच्या बातम्या लावल्या तर सर्व काहि कालचेच दाखवत होते , क्लिप मधे काहिच बदल नाहि. दुसर्‍या एका चॅनल वर एक नवि बातमि होति ति म्हणजे कसारा घाट ठ्प्प झाल्याचि . ह्या निमित्ताने कसारा घाटाचि दखल तरि घेतलि गेलि एरवि सुध्दा हा घाट बरेचदा ठप्प होतो पण त्याला कधिच कव्हरेज मिळत नाहि , लोक तासं तास थांबुन असतात, लहान मुले , मधुमेह असलेले पेशंट , वॄध्द , ज्याना वेळच्या वेळि खाणे गरजेचे असते त्यांचे किति हाल होत असतिल. मधे एकदा मुंबई -पुणे express highway काहि तास बंद होता तर हे चॅनल वाले किति तरि वेळ ते दळण दळत होते. (अति विशाल वाहनाना मुंबई - पूणे मार्ग वापरण्यास परवानगि नाहि त्याना नाशिक मार्गे पाठवले जाते. मुंबई-पुणे साठी express highway, आणि जुना चौपदरि मार्ग उपलब्ध असताना. नाशिक - मंबई अजुन तरि दोन पदरिच आहे)

एका नाशिक च्या मित्राला(जो स्वतः मुंबई च्या २६ जुलै च्या संकटात सपडला होता) त्याला फोन केल्यावर त्याने सांगितले कि तुलना करायचि झालि तर , परस्थिति हि २६ जुलै शि च करता येइल.
(२६ जुलै चि क्लिप आजतागायत मधुन अधुन दिसत असते)

हे विषयांतर वाटत असले तरि मुद्दा असा आहे कि , वेळीच योग्य दखल घेतलि नाहि किंव्हा सतत दुर्लक्ष करत राहिले तर परस्थिति सुधारायच्या ऐवजि बिघडतच जाइल, हाता बाहेर जाइल. कारण काहि शहरांचि स्थिति अजुन हि नियंत्रणात आणलि जाउ शकते.

विकास's picture

20 Sep 2008 - 5:01 pm | विकास

हे विषयांतर वाटत असले तरि मुद्दा असा आहे कि , वेळीच योग्य दखल घेतलि नाहि किंव्हा सतत दुर्लक्ष करत राहिले तर परस्थिति सुधारायच्या ऐवजि बिघडतच जाइल, हाता बाहेर जाइल. कारण काहि शहरांचि स्थिति अजुन हि नियंत्रणात आणलि जाउ शकते.

अगदी खरे आहे. हा भेदभाव मुंबईपासून साधारण समान अंतरावर असलेल्या दोन शहरांच्या संदर्भात होतो अशी वाटणारीच वस्तुस्थिती आहे.

संजय अभ्यंकर's picture

20 Sep 2008 - 1:17 pm | संजय अभ्यंकर

गेले दोन आठवडे नाशिकात होतो.
सतत पाऊस पडत होता आणी रोज गोदामाई ओलांडताना तिचे रौद्र रुप दिसत होते.

काल नाशिकातुन सकाळि निघालो तेव्हा नाशिकात पाऊस नव्हता. परंतु कसारा घाटात शिरता शिरता तो सुरु झाला आणी, भिवंडीत येई पर्यंत, धुवांधार बरसत होता. वाटेतील सर्व नाले-ओढे दुथडी भरुन वाहताना दिसले.
नेहमीप्रमाणे एक अपघात व एका अडकलेल्या गाडीने ट्राफिक जाम केले
सकाळी सातला निघुन रात्री आठला बोरिवलीत पोहोचलो.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2008 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाश्कातल्या या महापुराने जायकवाडीच्या धरणात जमा होणा-या पाण्याने ,साठ्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी होऊ नये म्हणुन जायकवाडी धरणाचे सर्व म्हणजे २७ दरवाजे जेव्हा उघडण्यात आले तेव्हा 'याची देही याची डोळा' आम्ही तो प्रसंग पाहिला. पोटात गोळा निर्माण करणारे प्रचंड वेगाने पाणी गोदावरीच्या पात्रात वाहात होते, प्रतिष्ठाण नगरीतही सखल भागात पाणी जमा झाले होते. पुढे शहागड पर्यंत नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.
जायकवाडी धरण