हल्ली ’सर’ ह्या शब्दाचा चुकीचा उपयोग होतांना दिसतो / ऐकु येतो. अनेक ठिकाणी तसेच टीव्हीवरील कार्यक्रमातुन सुद्धा हा शब्द अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापरला जातो.
माझ्या माहितीप्रमाणे ’सर’ हे विशेषण ( पदवी) हे व्यक्तीच्या नावानंतर लावले जाते. ब्रिटीश काळी सर, रावबहादूर ह्या पद्व्या दिल्या जात. त्यासुद्धा नावाच्या आधी लावल्या जात. उदा. रावबहादुर अमुक तमुक, सर सोमनाथ गोमनाथ ई. इंग्लीश लोक सुद्धा सर ही पदवी नेहमी नावाच्या आधी लावतात. उदा. सर डॉन ब्रॅड्मन. डॉन ब्रॅड्मन सर असे केणीही म्हणत नाही.
हल्लीच एखाद्या व्यक्तीला आदरार्थी संबोधन करण्यासाठी सरचा वापर व्हायला लागला आहे. कधी कधी हे अत्यंत हास्यास्प्द होते. आमच्या कार्यालयात वीसेक लोक काम करतात. मी सगळ्यांचा बॉस आहे. पहिले काही दिवस फक्त दोन तीन लोक कामाला होते.त्यावेळी फ़क्त मीच ’सर’ होतो. पण जसे जसे पसारा वाढत गेला तस तसे अधिक लोक काम करु लागले. प्रत्येक नवा येणारा कर्मचारी त्याच्या आधी लागलेल्या सर्वांना ’सर’ संबोधु लागला. त्यामुळे सध्या आमच्या कार्यालयात एकोणीस ’सर’ आहेत. वीसाव्वा कर्मचारी जो शिपाई आहे आणि नुकताच काही महिन्यापूर्वी लागला आहे तोच एक बिचारा ’सर’ नाही. प्रत्येक कर्मचारी आपल्या आधीपासून काम करणाऱ्या ( तो भलेही फ़क्त एक महिन्याने ’सिनीयर’ असेल ) ईतर कर्मचाऱ्यांचा उल्लेख अमुक सर , तमुक सर असा करतो. त्यामुळे मला जेंव्हा लोक सर म्हणतात तेंम्हा मलासुद्धा एकोणीसांपैकी एक असल्यासारखे वाटते. असो.
अर्थात मुद्दा सर म्ह्णावे किंवा नाही हा नसून एखाद्या व्यक्तीस जर आदरार्थी संबोधन करायचे असेल तर मराठीतही अनेक पर्याय उपलब्ध आहेतच. साहेब हा एक पटकन सूचणारा पर्याय आहे. श्रीमान / श्रीमती किंवा नुसते श्री हा सुद्धा चांगला पर्याय आहे. फ़ारच गहिवरुन आलेले असेल तर सन्माननीय किंवा माननीय हा सुद्धा शब्द आहे. आणि ह्या शब्दांने संबोधन केल्याने व्यक्तीचा योग्य सन्मान नक्कीच होईल.
सध्या झी मराठीवर एक हवा प्रदुषणाचा कार्यक्रम चालतो. त्यात पाणचट विनोद व बालिश वाक्ये तसेच प्रसंग टाकुन प्रेक्षकांचे मनोरंजन होते असा एकुणच त्यांचा दावा आहे. त्यातील सूत्रसंचालक हाच शब्द वापरत असतो आणि कधीकधी तर निमंत्रीत पाहुणा अगदी नवखा कलाकार असला तरीही त्याचा उल्लेख ’अमुक सर आपल्याकडे आलेले आहेत’ असा केला जातो. माझ्या मते सर हा शब्द वापरणे अत्यंत चुकीचे आहे आणि मराठीमधे ईतके उत्तम पर्याय असतांना टीव्हीवरील कार्यक्रमात हे असले शब्द वापरले जाऊ नयेत.
एकुणच आपल्या रोजच्या व्यवहारात सर या शब्दाचा चुकीचा वापर होऊ नये. शक्यतोवर मराठी पर्यायच वापरले पाहिजे असे मला वाटते.
सर...सर...सर--- मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने
गाभा:
प्रतिक्रिया
15 Apr 2016 - 12:07 pm | म्हसोबा
हे फक्त तुमच्या हापिसातच नव्हे तर अगदी जळी स्थळी काष्ठी आणि पाषाणीही होत आहे.
15 Apr 2016 - 12:22 pm | प्रचेतस
होय.
येथे अगदी मिपावरही आम्ही आमच्या एका मित्रांना 'सर' म्हणूनच हाक मारत असतो.
15 Apr 2016 - 12:54 pm | बाबा योगिराज
जपून हां, नै तर 'सर' वर्गा बाहेर अंगठे धरून उभं करतील.
15 Apr 2016 - 4:15 pm | पैसा
सर सर झाडावर!
15 Apr 2016 - 4:48 pm | विजय पुरोहित
प्रत्येक नवा येणारा कर्मचारी त्याच्या आधी लागलेल्या सर्वांना ’सर’ संबोधु लागला. त्यामुळे सध्या आमच्या कार्यालयात एकोणीस ’सर’ आहेत. वीसाव्वा कर्मचारी जो शिपाई आहे आणि नुकताच काही महिन्यापूर्वी लागला आहे तोच एक बिचारा ’सर’ नाही :)
15 Apr 2016 - 5:24 pm | वेल्लाभट
ते सर पासून सॉरी पर्यंत सगळ्यालाच हे लागू होतं.
15 Apr 2016 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहेब शब्दाची जागा 'सर' शब्द घेत आहे. हा शब्द
ज्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदराने बोलायचं आहे, उपरोधानेही बोलायचं आहे त्यासाठी वापरला जाऊ लागला आहे. आता ते चूक की बरोबर हे ठरवता येणार नाही, पण म्हणून भाषेचं नुकसान होत आहे असे आपण म्हणू नये, नव्या पिढीने केलेला बदल स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.
-दिलीप बिरुटे
15 Apr 2016 - 5:43 pm | इरसाल
शुद्ध एमएनसी मधे काम करायचा एक फायदा असतो. सर-पैर वगैरे प्रकार तिथे चालत नाही. सुरुवातीला भारतिय मन पार एमडी, सीईओला नावाने हाक मारायला धजावत नाही पण नंतर पडते अंगवळणी.
सही!!!!!!!
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
16 Apr 2016 - 11:43 am | जव्हेरगंज
खूप दिवसान्नी ही सही वाचली. मस्त आहे.
15 Apr 2016 - 5:58 pm | आदूबाळ
सरा-सरी असू नये याबद्दल एकदम सहमत आहे.
पण कधीकधी एखाद्या माणसाबद्दल खराखुरा आदर वाटतो. एमेन्सी कल्चरमुळे त्यालाही झक्कत नावाने हाक मारावी लागते.
असा प्रसंग एकदा आला. माणूसही मराठीच होता - आमच्या क्षेत्रातलं जानंमानं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. तेव्हा न राहवून त्यांना फोन करून सांगितलं, की तुम्हाला कॉलवर (ए) नितीन म्हणालो तरी आपण प्रत्यक्ष भेटल्यावर अहोच म्हणेन.
15 Apr 2016 - 10:27 pm | असंका
मराठी माणूस सर म्हणून थांबतो तरी...हिंदी वाले तर त्या सर पुढे आणखी एक जी पण लावतात... सरजी!!
कहो ना प्यार है मधे अनुपम खेर - सरजी!
16 Apr 2016 - 3:57 pm | भंकस बाबा
पुष्कळदा ऑफिसमधे एमबीएची डिग्री घेऊन नवीन बॉस डोक्यावर येऊन बसतात. फक्त पुस्तकी ज्ञान असलेले हे गुळगुळीत साबणाच्या वड्या नाही ते नियम आणून डोक्याचे भजे करतात. अशा लोकांना सर बोलताना त्यांचे नाव घेऊन थोडा पॉज घेऊन सर बोलावे. आईच्यान लई मजा वाटते बाबा!