मनीषासाठी..

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in काथ्याकूट
4 Apr 2016 - 10:27 pm
गाभा: 

मनीषासाठी तुमच्याकडे माझी ही मदतीची याचना

असे मेसेज मी सहसा फॉरवर्ड करत नाही. पण हा १०० टक्के खराय, याची खात्री असल्याने करतोय. संपूर्ण वाचून इच्छा झाल्यास मदत करता येईल. बघा जमलं तर.

पालघर जिल्हा व तालुक्यातील सफाळे नजीकच्या नवघर-घाटीम ग्रामपंचायतीमधील पेणंद या आदिवासी पाड्यातून यंदाच्या वर्षी फक्त एकाच मुलीने दहावीची परीक्षा दिली. तिचं नाव आहे मनीषा बरफ.

मनीषाला दहावी पुढेही खूप खूप शिकायचंय, परंतु तिला शिकता येईल का?

पेणंद तसेच त्याच्या आजुबाजूच्या पाड्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. ‘आपण फक्त दहावीपर्यंतच शिकू शकतो, ते ही घरातल्यांनी शिकू दिले तरच; महाविद्यालयीन शिक्षण घेणे आपल्याला आणि आपल्या घरातल्यांनाही अजिबात परवडणारे नाही. मुळात महाविद्यालयीन शिक्षण आपल्यासाठी नाहीच’ – तिथल्या मुलींशी बोलताना आपल्याला उत्तरं मिळतात ती ही अशी. आई-वडिलांची निरक्षरता, घरातले दारिद्र्य, जवळपास नसलेली शाळा, महाविद्यालय, शिक्षणासाठी लागणाऱ्या एकूणच साधनांचा अभाव यामुळे पेणंद पाड्यातून आजपर्यंत एकही मुलगा किंवा मुलगी पदवीधर होऊ शकलेली नाही.

मनीषाचं गणित चांगलं आहे. मराठी आणि हिंदी हे तिचे आवडीचे विषय आहेत. जेवण बनवण्यापासून ते कपडे-भांडी धुण्यापर्यंत सगळी घरातली कामे करून पुन्हा ती आईला जंगलातून करवंद, बेलाची पाने, निंबाची व आंब्याची पाने आणून देण्याचं देखील काम करते. हे सगळं करून स्वतः चा वेळ काढून ती अभ्यास करायला मात्र विसरत नाही. मनीषाचे आई-वडील दोघेही निरक्षर आहेत. आई आंब्या-निंबाची पानं, करवंद असं काहीबाही जंगलातून गोळा करून ते विकते. तिच्या वडिलांना काही दिवसांपूर्वीच डोळ्याला मार लागल्यामुळे ते आता मजुरीच्या कामावर जात नाहीत. मनीषापेक्षा २ वर्षांनी मोठा असणारा तिचा भाऊ हीच तिच्या घरातली एकमेव कमावती व्यक्ती आहे.

“घरातल्यांनी यापुढे कामावर जायला सांगितलंय, पुढे शिकता नाही येणार.” मनीषा डोळ्यात दाटलेलं पाणी पुसता-पुसता सांगत होती. मनीषाच्या घरातल्यांनादेखील तिचं शिक्षण थांबवायचं नाही. परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील नाही. मनीषाची काम करता-करता सुद्धा शिकायची इच्छा आहे. आता गरज आहे ती तिला पैसे मिळवून देणाऱ्या चांगल्या कामाची.

मला तुम्हाला आवर्जून सांगावसं वाटतंय की या मनीषासाठी सफाळे, पालघर किंवा विरार, फार तर वसईपर्यंत एखादं काम हवंय. आपण जर मनीषाला काम मिळवून देऊ शकलो तर मात्र तिचं खूप-खूप शिकण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. शिवाय तिला शिकताना पाहून तिच्यापाठून आता दहावीत गेलेल्या पाड्यातल्या आणखी ८ मुली व ६ मुलांना देखील शिकण्याची नवी उर्मी प्राप्त होऊ शकेल. तुमची छोटीशी मदत मनीषाच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊ शकेल...

मनीषासाठी तुमच्याकडे माझी ही मदतीची याचना...

संपर्क - अक्षय वणे – ९९८७६५१२९४ - 9987651294

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 12:24 am | टवाळ कार्टा

तिथे रहाणारे काही मित्र आहेत माझे...त्यांना विचारतो

कविता१९७८'s picture

5 Apr 2016 - 8:46 am | कविता१९७८

पालघरला जेनेसिस म्हणुन एम आय डी सी एरीया आहे तिथे मनिषाला सहज काम मिळु शकेल. तिलाच प्रयत्न करावे लागतील,

कविता१९७८'s picture

5 Apr 2016 - 8:48 am | कविता१९७८

पण शिक्षण दहावीच असल्याने चान्गल्या नोकरीची अपेक्षा ठेवता येणार नाही.