रटाटौली / रॅटाटूई/ रॅटॅटूई !!!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
20 Feb 2016 - 11:46 pm

ख्रिसमसची राकलेटे,फॉन्ड्यु ष्टोलन, केक्स खाऊन वजनं वाढवून बसायचं. थंडी कमी व्हायचं नाव घेत नसते त्यामुळे बाहेर जाणंही 'लिमिटेड एडिशन' होते आणि मग साहजिकच गरज भासते जरा कमी कॅलरींच्या, हलक्या पदार्थांची.. सारखं सॅलड किवा तत्सम पदार्थ खाऊन जीभ असहकार पुकारते आणि मग आठवण होते रटाटौलीची.. वांगी, टोमॅटो, गाजरे, कांदे, ढोबळी मिरच्या अशा अनेक प्रकारच्या भाज्यांनी बनलेली ही एक फ्रेंच डेलिकसी आहे. फ्रान्स मधल्या प्रोवेन्स आणि निस प्रांतातली, म्हणून तर तिचे पूर्ण नाव ratatouille niçoise, रटाटौली निस् !
(माझ्या जिभेला झेपणारेच उच्चारण लिहिले आहे)
rata = अन्न्पदार्थ touiller = ढवळणे ह्यापासून रटाटौली शब्द बनला त्याचा रटाटौली ह्या अ‍ॅनिमेशन पटातल्या उंदरांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, :) (बादवे- २००७ मधला हा अ‍ॅनिमेशन पट मस्त धमाल आहे, त्याविषयी परत कधीतरी..) तर सांगत काय होते की फ्रान्स मध्ये उगम पावलेली ही मिश्रभाजी इटाली आणि ग्रीसनेही आपापल्या रंगात रंगवली. इटालीत कियांबोता (ciambotta ) नावाने तर ग्रीसमध्ये ती तौरुलु (tourlou) नाव घेऊन आपल्या ताटात येते. तर काही ठिकाणी तिला briami असे बिर्याणीशी साम्य असणारे नावही आहे पण बिर्याणीची चुलत मावस बहिणच काय दूरची नातेवाईकही ही बया नाही. असो.. नमनालाच ऑलिव्ह ऑइलचा बुधला रिकामा झाला आहे. आता जरा रेसिपी बघू या.
मघाशी सांगितल्याप्रमाणे ही साइड डिश भरपूर भाज्या घालून केली जाते. भात, न्यूडल्स, पास्ता, ब्रेड किवा फिश बरोबर खाल्ली जाते. न संपणारी यादी आहे.आपल्याला हवे ते काँबीनेशन करता येते. मसाला डोशासारखी क्रेप्स मध्ये भरूनही सर्व्ह केली जाते.
ह्यासाठी लागणारे साहित्य-
भाज्या-
१ मोठे वांगे, १ झुकिनी, ३ मध्यम टोमॅटो, २ मध्यम कांदे,
लाल, पिवळी, हिरवी ढोबळी मिरची लहान असल्यास प्रत्येकी एक मोठी असल्यास प्रत्येकी अर्धी
मसाले-
लसणीच्या पाकळ्या- मोठ्या पाकळ्या असल्यास २ ते ३, लहान असल्यास ४ ते ५ मात्र लसूण ह्यात हवीच त्याशिवाय स्वाद मे 'मझा नही आता' !
१ टेबलस्पून ऑलिव्हऑइल, १ टीस्पून विनेगर किवा लिंबाचा रस
२ टेबलस्पून हर्ब्ज दे प्रोविन्स. युरोप, अमेरिकेत ग्रोसरीशॉपमध्ये हे मिळते पण इतर मंडळींना मिळाले नाही तर गडबडून जाऊ नका. आपण काही फ्रान्सच्या प्रोविन्स प्रांतात हर्ब्ज खुडायला जाणार नाही.
रोझमेरी, बेसललिव्ज पावडर, ओरेगानो, फेनेल (बडिशेप), दालचिनी पावडर असं सगळंकिवा ह्यातलं जे मिळेल ते थोडं थोडं घेऊन साधारण २ टेबलस्पून होतील एवढं घेऊन एकत्र करायचं आणि त्यात एक तमालपत्र ही घालायचं.
मीठ आणि मिरपूड चवीनुसार

कृती-
सर्व भाज्यांचे चौकोनी मोठे तुकडे करा. लसूण बारीक चिरा.
एका पसरट पॅन किवा कढई मध्ये ऑलिवऑइल गरम करा. त्यात वांगे, झुकिनी व बेल पेपर्सचे तुकडे घाला व साधारण ५ मिनिटे परता. तुकडे गोल्डन व्हायला हवेत पण पूर्ण शिजायला नकोत, क्रंची हवेत. मग हे वेगळ्या वाडग्यामध्ये काढून ठेवा.
आता पॅनमध्ये कांदा, लसूण आणि हर्ब्ज दे प्रोविन्स घाला,तमालपत्र घाला आणि कांदा गोल्डन होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो घाला आणि २-३ मिनिटे परता.
आता ह्यात वाडग्यात काढून ठेवलेले वांगे+झुकिनी+बेलपेपर्स घाला.
मीठ व मिरपूड घाला. लिंबाचा रस किवा विनेगार घाला.
नीट ढवळून घ्या व परत एकदा परता.
काही जण ह्यात थोडे पाणी व/किवा कुकिंग वाईन घालून ती मंद आचेवर शिजवतात. स्ट्यु करतात तर काहीजण भाज्या क्रंची ठेवतात. भात, फिश किवा न्यूडल्सबरोबर खायचे असेल तर अशी स्ट्युड रटाटौली चांगली लागते. क्रेप्स मध्ये भरून खायला किवा सॅलडसारखी नुसतीच खायला क्रंची रटाटौली छान लागते.
मला व्यक्तिशः क्रंची रटाटौली आवडते. स्ट्यु करायचे असेल तर थोडे पाणी व/किवा कुकिंग वाइन घालून अजून १५-२० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
गरम रटाटौलीचा अस्वाद भात, ब्रेड, न्यूड्ल्स तुम्हाला हवे असेल त्याबरोबर घ्या.

.

राइसकुकर वापरल्यास-
सर्व भाज्या, ऑलिवऑइल, मसाले थोडे पाणी किवा कुकिंग वाइन राइस कुकर मध्ये एकत्र करा व साधारण २५ ते ३० मिनिटे शिजवा. स्ट्युड रटाटौली तयार होते.

.

एअर फ्रायर वापरल्यास-
२०० अंश से वर ए फ्रा प्रिहिट करा.
सर्व भाज्या व मसाले त्यात घाला. १० मि. ए फ्रा करा. मग बास्केट बाहेर काढून भाज्या ढवळून घ्या थोडेसे ऑलिव्हऑइल ब्रश करा व परत ५ ते ६ मिनिटे ए फ्रा करा. २ ते ३ मिनिटे ए फ्रा मध्येच भाजी राहू द्या. नंतर सर्व्ह करा.
ए फ्रा मधील किवा अवन मधील रटाटौली मस्त क्रंची होते.

.

अवन वापरल्यास-
२०० अंश से वर अवन प्रि हिट करा.
बेकिंग डिशला ऑलिव्ह ऑइलने ब्रश करून घ्या.
सर्व भाज्या, मसाले, चमचाभर ऑलिव्हऑइल,लिंबाचा रस सगळे एकत्र करा व बेकिंग डिश मध्ये घाला.
साधारण ३५ ते ४० मिनिटे बेक करा.
अवन रोस्टेड क्रंची रटाटौली तयार होईल.

.

सर्व प्रकारच्या रटाटौली कशा दिसतात हे समजावे म्हणून काही प्र. चित्रे फ्रेंच मित्रमंडळींकडून उधार घेतली आहेत.

प्रतिक्रिया

छान पाकॄ! फोटूही रंगीबेरंगी आलेत. रॅटॅटुईची रेशिपी नुसतीच बघायची बघायची असे मनात चालले होते आणि तू ती दिलीस त्याबद्दल आभार. तुझ्या फ्रेंच मित्रमंडळानेही उत्साहाने चित्रे पाठवलीत म्हणून मजा वाटली.

प्रचेतस's picture

21 Feb 2016 - 9:19 am | प्रचेतस

भारी.
करायलाही सोपी एकदम.

यशोधरा's picture

21 Feb 2016 - 9:23 am | यशोधरा

भा हा री ही ही!

माहितगार's picture

21 Feb 2016 - 10:11 am | माहितगार

माहिती देण्याची शैली मस्तच आहे त्या शिवाय नाविन्य पूर्णता नवे प्रयोग उपाय हे सगळे 'स्वाती दिनेश' यांच्या पाकृंची वैशिष्ट्ये दिसतात. त्यांनी त्यांच्या पाकृचे पुस्तक काढून छापले तर चांगले खपू शकेल असे वाटते.

त्यांच्या मागच्या पाकृ धागे आत्ता वेगळ्याच कारणाने उघडून पाहिले. कारण मला हा धागा लेख अजून एका कारणासाठी आवडला ते म्हणजे इंग्रजी भाषिक शब्दांचा मुक्त स्विकार. सर्वनाम आणि क्रियापदा शिवाय इतर शब्दांवर भाषिक बंधने लावू नयेत अशा मताचा मी आहे.

या धागा लेखात पहा

* ही एक फ्रेंच डेलिकसी आहे.
* नमनालाच ऑलिव्ह ऑइलचा बुधला रिकामा झाला आहे. आता जरा रेसिपी बघू या.
* मघाशी सांगितल्याप्रमाणे ही साइड डिश भरपूर भाज्या घालून केली जाते.
* आपल्याला हवे ते काँबीनेशन करता येते.
* २ टेबलस्पून हर्ब्ज दे प्रोविन्स. युरोप, अमेरिकेत ग्रोसरीशॉपमध्ये हे मिळते
* आपण काही फ्रान्सच्या प्रोविन्स प्रांतात हर्ब्ज खुडायला जाणार नाही.
* तुकडे गोल्डन व्हायला हवेत पण पूर्ण शिजायला नकोत, क्रंची हवेत.
* मग हे वेगळ्या वाडग्यामध्ये काढून ठेवा. आता पॅनमध्ये कांदा, लसूण आणि ..... आणि कांदा गोल्डन होईपर्यंत परता.
* स्ट्यु करतात तर काहीजण भाज्या क्रंची ठेवतात.
* क्वचित आठवणीने मराठीकरण केलेले शब्दही आहे जसे प्र. चित्रे फ्रेंच मित्रमंडळींकडून उधार घेतली.

बहुधा भविष्यातील प्रमाण मराठी याच्याही पुढे असेल पण मधली अल्पकालीन स्टेज अशीच काही असू शकेल का ?

एनिवे त्यांच्या मागच्या तीन-चार पाकृपेक्षा या पाकृत अधिक भाषिक बदल आहे का ?

स्वाती दिनेश's picture

22 Feb 2016 - 2:28 pm | स्वाती दिनेश

माहितगार, तुमचे निरिक्षण बरोबर आहे. ही पाकृ लिहिताना इंग्रजी शब्दांचा मुक्त वापर झाला आहे. कदाचित जर्मन मित्राच्या फ्रेंच मैतरिणीच्या फ्रेंचाळलेल्या इंग्लिश मधून पाकृ समजावून घेतल्याने असेल आणि दुसरे कारण म्हणजे शब्दशः भाषांतर मला आवडत नाही. उगाचच इंग्रजीचे सरसकट मराठीकरण करण्यात तो 'इसेन्स' कधी कधी घालवून बसतो आपण.. उदा. डेलिकसी, हर्ब्ज, साइडडिश यांना चपखल शब्द मला आठवले नाहीत. 'ऑलिव्ह तेल' पेक्षा ऑलिव्हऑइल जवळचे वाटले. पण म्हणून "मराठी वर्डस रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं " असंही नकोच.
तसेच कांदा गोल्डन ऐवजी गुलाबीसर परता, हवे ते काँबीनेशन ऐवजी.. भात,न्यूडल्स, क्रेप्पं इ. पैकी हवे त्या बरोबर खाऊ शकतो असे लिहिता आले असते. ते लिहिण्याच्या ओघात लक्षात आले नाही.
बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद,
स्वाती

माहितगार's picture

22 Feb 2016 - 2:44 pm | माहितगार

मराठी वर्डस रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं

मी इंगमराठी आणि मिंग्लीश दोन्हीनाही बोलीभाषा म्हणून स्विकारतो-हे भाषाशास्त्र नसेल पण भाषिकांच्या सर्वसमावेशकतेची गरज असेल-, खास करून बृहनमहाराष्ट्रातील नव्या पिढीला इंगमराठी बोलीभाषा सोपी पडेल तर वर्षाकाठी तीन-चार लाख मुले मराठी मूले इंग्रजी शाळातून बाहेर पडत आहेत त्यांची बोलीभाषा मिंग्लीश हिच असणार आहे.

मराठी विकिपीडिया मेनुबार मध्ये ग्रामिण लोकांनाही सोपे जावे म्हणून शब्द निवडताना ग्रामिण लोकांना समजण्यास सोपे म्हणून काही शब्दांची योजना केली होती, त्यानंतर मी पुण्यातल्या ग्रामीण भागातून सर्वाधिक विद्यार्थी येणार्‍या महाविद्यालयात एक पद्धतशीर सर्वे घेतला ६० टक्के शब्द विद्यार्थ्यांना त्यांच्या वापरात आलेले नसल्यामुळे कळाले नव्हते. शेवटी आपल्यासाठी भाषा आहे भाषा बदलली की आपणही बदलायचे.

रातातूलीं ला आपल्याकडील खदखदं जवळचं असावं.

सस्नेह's picture

21 Feb 2016 - 2:30 pm | सस्नेह

ऊंधिओची आठवण आली.

रमेश आठवले's picture

23 Feb 2016 - 3:13 am | रमेश आठवले

+ १

पैसा's picture

22 Feb 2016 - 9:23 pm | पैसा

मस्त पाकृ!

आनंदयात्री's picture

22 Feb 2016 - 11:32 pm | आनंदयात्री

करून पाहिली, चवीला छान लागली. 'बगारा वैंगन' या हैदराबादी प्रकारातही वांगी अशी तळून (शेलो फ्राय करून) घालतात, त्या धाटणॆचॆ चव आहे. धन्यवाद.

अमेरिकन त्रिशंकू's picture

23 Feb 2016 - 4:43 am | अमेरिकन त्रिशंकू

तिचे पूर्ण नाव ratatouille niçoise, रटाटौली निस् !
(माझ्या जिभेला झेपणारेच उच्चारण लिहिले आहे)

रॅटॅटूई निस्वा

स्वाती दिनेश's picture

23 Feb 2016 - 3:10 pm | स्वाती दिनेश

असाच काहीसा उच्चार आमच्या जर्मन मित्राची फ्रेंच मैत्रिण करते, पण तो बाबा मात्र स्वच्छ 'रटाटौली' असे म्हणतो.. मग तेच आहे जिभेवर.
धन्यवाद,
स्वाती

अजया's picture

23 Feb 2016 - 7:25 am | अजया

छान आहे पाकृ.सोपी.

पिच्चरच्या नावाचा उच्चार रॅटाटूई असा ऐकलेला...

असंका's picture

23 Feb 2016 - 11:33 am | असंका

लेकुरवाळी भाजी?

मुक्त विहारि's picture

24 Feb 2016 - 1:31 pm | मुक्त विहारि

मिश्र भाजीची पा.कृ. आवडली...

पद्मावति's picture

2 Mar 2016 - 3:03 pm | पद्मावति

रंगेबिरंगी आणि पौष्टिक पाककृती आवडली.

सूड's picture

31 May 2016 - 8:35 pm | सूड

हर्ब्ज दे प्रोविन्स

प्रवीण मसालेवाल्यांचे फ्रेंच बंधु आहेत का हे?