ओबामा अाला रे आला! (वर्‍हाडी) (मराठी भाषा दिन २०१६)

मित्रहो's picture
मित्रहो in लेखमाला
20 Feb 2016 - 5:50 am

ओबामा अाला रे आला
हिंगणघाटाहून काळ्या सडकेन शिद्द निंगाल का शेंड्याच बोरगाव लागत, तेथून चार वावरं गेले का आमच गाव. वघळावरचा पूल लागला का समजाच गाव आल, ते बोर्डगिर्ड फुड हायेत. कधी काळी नदीले पूर आलता तवा वघळात पाणी आलत. आता काय नदीलेच पाणी नाय म्हटल तर वघळाले कुठुन पाणी येइल, तरीबी सरकारन पूल बांधला. आमचा गाव नदीच्या या आंगाले आन हिंगणघाट त्या आंगाले हाय पण गावातल्या लोकायले साऱ्या गोष्टीसाठी हिंगणघाटलेच जा लागते. तूर इकाची हाय जा हिंगणघाटले, बाजार जा हिंगणघाटले, साळा जा हिंगणघाटले, दवाखाना जा हिंगणघाटले. खोट नाही सांगत पण कोणी मेल तर मयतीच सामान आणाले बी हिंगणघाटलेच जा लागते. आता येवढ असूनही आधी गावात यायले काही सडकगिडक नव्हती. पैदलचा रस्ता नाहीतर खासराचा रस्ता. सरकारनबी इचार केला असन गाववाल्यायकड कुठ मोटारसायकली हाय हिंडाले. हे हिंडन तर सायकलीन नाहीतर खासरातून मंग सडक कायले पायजे. बरसादीचे चार महीने नदी दोन्ही थड्या भरुन वाहे, तवा सारा खेळ डोंगेवाल्यायच्याच हातात. त्यायन डोंगा टाकला तर जाच हिंगणघाटले नाहीतर बसा वाट पाहात. आता परिस्थिती बदलून रायली. अजून गावात दवाखाना नाही आला पण सडक आली. येक एस टी बी येते, ऑटो तर दिसभरच धावते. आता बंदे गाववाले ऑटोनच हिंगणघाटले जाते. तसबी गावात हाय तर का अस, हे आपल रामाजीच्या खारी पासून ते मारुतीच्या देवळावरी आन सटवाईच्या पिंपळापासून ते पाटलाच्या पठारावरी. झाल संपल गाव. धा पंधरा कास्तकाराच गाव. सारे एका बैलजोडीचेच कास्तकार, आजकाल दोनजोडीचे मोठाले कास्तकार रायलेच कुठ? एस टी यायले लागल्यापासून रस्त्यावर फाटा झाला. तेथच रव्यान पानठेला टाकला आन रव्याचा रवीभाऊ झाला. गावातले रिकामटेकडे पोट्टे तेथच बसले रायते. गावात पेपरबी तेथच येते. काम नसल का गाववाले बसते पेपर वाचत. आता तुम्हीच सांगा अशा आडगावात कोण कायले याले जाते? आमदार, खासदाराच जाउ द्या, साधा पंचायत समिती वाला बाबू बी कधी गावात भटकत नाही. पटवारी बी हिंगणघाटात बसूनच सात बारे देते. तेथ बसूनच तो साऱ्या वावराच मोजमाप करते. आता येथ ओबामा येनार हाय म्हटल्यावर गावात बोंब होनार नाही तर काय? बंद्या गावात येकच चर्चा ओबामा येनार हाय, ओबामा येनार हाय. कोनी शायना म्हणते तो कायले यायले जाते येथ, हे कोणतरी पुडी सोडली व्हय. तुम्हाले बी वाटत असन नाही हा काहीबी फेकून रायला म्हणून. त्याच झाल अस.
मिरुग अजून लागाचा व्हता, बरसादीची वाट होती. दुपारचा टाइम व्हता, उन मी म्हणत होत. सडकेन काळ कुत्र दिसत नव्हत. रव्या खर्रे घोटत बसला होता. आताच घोटून ठेवले तर मंग गर्दीच्या टायमाले तरास नाही बा. रमेस ट्रॅक्टर घेउन येत होता. रव्याले रमेस दिसताच त्यान त्याले आवाज देला.
“ए रमेस कोठ गेलता उन्हाचा येवढा?”
“नांगर व्हता, बोरगावच्या पाटलाच्या वावरात.”
“येवढ्या उन्हाचा का नांगरत व्हता बे”
“आबे म्या सकाळ वकाळच गेलतो पण रस्त्यात भो**** डिझल संपल. ते आणतवरी उन झाल.”
“तुय नेहमीच हाय घे, ये बस चहा घे.”
येवढ्या उन्हाच ट्रॅक्टर चालवायच रमेसच्या जीवावर आलत म्हणून मंग तेथच ट्रॅक्टर उभा करुन तो रव्याच्या ठेल्यावर येउन बसला. तेवढ्यात एक मोटारसायकल रव्याच्या ठेल्यासमोर येउन उभी झाली. मोटारसायकीवरुन दोन माणस उतरली. कपड्यावरुन साहेबच वाटत होती. पार घामाझोकळ झालते दोघबी.
“भाऊ पाणी पाउच आहे का?”
“हाय ना”
“दोन पाणी पाउच द्या बर”
दोघायनबी पाणी पेल, थोडस पाणी तोंडावर मारल. मंग दोघबी तेथच बाकावर बसले. त्यायच्या गोष्टी सुरु झाल्या
“तर मी काय म्हणत होतो, तो ओबामा येनार आहे म्हणून हे सारी झंझट माझ्या मागे लागली. नाहीतर काय गरज उन्हाततान्हात गावोगाव भटकायची.”
“तो येनार कशाला आहे?”
“वरच्या ऑफिसतल्या गोष्टी आपल्याल काय माहीती. आपल्याल सांगितल तो येनार आहे तर सारे रिपोर्ट तयार करुन ठेवा. म्हणून भटकतोय माहीती गोळा करत” घटकाभर आराम करुन दोघ उठले.
“किती झाले भाऊ?”
“दहा रुपये”
“दहा रुपये. पाउचचेही भाव वाढले का?”
“आता उन पण वाढल न साहेब.”
मोटारसायरलीले किका मारुन दोघबी निघून गेले. रमेस, रव्या दोघानबी सार ऐकल होत.
“काहो रवीभाउ तुमाले मालूम हाय का कोन हाय हा ओबामा?”
“नाव कुठतरी आयकल्यासारख वाटते. मांग पेपरात फोटो आलता वाटत”
“तो कोठ येउन रायला म्हणाचा?”
“आता हे साहेबलोक आपल्या भागात हिंडून रायले म्हणजे तो येथच येनार असन ना. नाहीतर ते साहेब इकड कायले हिंडले असते?”
“ते बी खर हाय. पण तो कायले येत असन?”
“का जी न का बा. लक्षुमनले पक्की खबर असन. तो एकटा माणूस हाय आपल्या गावात जो बंदा पेपर वाचते.”
ओबामा गावात येनार हाय त्याची खबर हे अशी आली पाहा. आता रवीभाऊच्या ठेल्यावर बोललेली गोष्ट गावात फैलली नाही अस होतच नाही न जी. गावात मोबाइलच नेटवर्क नसल तरी चालते पण रवीभाऊचा ठेला चालू पायजे येका मिनिटात बातमी बंद्या गावात पसरते. रमेसन फोन करुन लक्षुमनले इचारल. तो तर इचारतच पडला गावात सर्वात समजूतदार तो येकटाच पण त्याले बी पत्ता नाही का ओबामा आपल्या गावात येनार हाय ते. रमेस म्हणतो पक्की खबर हाय तवा आपलच काही चुकल अस समजून त्यान अजून दोन चार पेपर वाचले पण त्याले काही सापडत नव्हत. संध्याकाळवरी काहीतरी सांगतो अस म्हणून त्यान येळ मारुन नेली.
सांजच्या टायमाले पानठेल्यावर पुन्हा मैफल जमली. सुरेस बैलाचे भारे घेउन शिद्दा रव्याच्या ठेल्यावरच आला. भाऱ्यात इळा खुपसुन तो तेथ भाऱ्यावरच बसला. लवकर लवकर वखर आटपून ट्रॅक्टर घरी लावून रमेसबी आला. ढोर बांधून, बैलाले पाणी देउन ग्यानेश्वर आला. दोन चार म्हातारे बी बसले. त्यायले काय येथ बसल काय आन घरी काय सारखच. अर्ध्या गवऱ्या मसनात गेल्यावर कोणी इचारत नाही. दोनचार शेंबडे पोट्टेबी आले आन तेथच बाकावर बसले. रव्या खर्रे घोटतच होता. रमेसन खर्रा तोंडात कोंबला होता, सुरेस सुपारी चघळत होता. साऱ्यायले आता लक्षुमनची वाट होती. अंधार पडतवरी लक्षुमनबी आला. त्याच्या हातात पेपराचे येक दोन पानं होते. रव्या पोट्ट्यावर वरडला आन त्याले बसाले जागा करुन देली.
“बे पोट्टेहो उठा बर तुम्हाले कायले पायजे नसत्या चवकशा.” लक्षुमनन घोटभर पाणी पेल. रव्यान त्याले इचारल.
“लक्षुमन सांग बा कोण हाय हा ओबामा ते? मंगानपासून टाळक भनभन करुन रायलय.”
“ओबामा म्हणजे अमेरीकेचा अध्यक्ष. जसा भारत देस हाय तसा अमेरीका बी येक देस हाय.”
“कोठ?” ग्यानेश्वरन शंका काढली.
“तुय लेका नुसत नावच ग्यानेश्वर हाय पण तुले काही अक्कल नाही. अबे ते लइ दुर रायते. पार साता समुंदरापार. मी काय म्हणतो लक्षुमन त्या अमेरीकेचा अध्यक्ष म्हणजे आपल्या सरपंचासारखा का? नाही म्हणजे जसा आपल्या ग्रामपंचायतीचा अध्यक्ष सरपंच, तसा अमोरीकेचा तो का?”
“ओबामा म्हणजे अमेरीकेतला जन्या भोकन्या म्हणाचा तर. नाही आपला सरपंच तर जन्या भोकन्याच हाय.”
“आपल्या भोकन्यात काही दम नाही पण. त्याच्या घरासमोर ढोर मुतले तर तो त्यायले बी हाकलू शकत नाही.” शंकररावान आपला राग काढलाच. मोका भेटला का शंकरराव सरपंचावरचा राग काढूनच घेते.
“राहू दे राहू दे. तुन तर जसे खंडीभर ढोर हाकले रोज”
“मंग रायले का?”
“आबे चूप बसा बे, तो लइ मोठ्या देशाचा अध्यक्ष हाय कोण्या गावचा सरपंच नाही. बंदे त्याले वचकून रायते.”
“अस. या ओबामान असे कणचे तीर मारले बा का समदे त्याले वचकून रायते?”
“लइ डेंजर माणूस हाय तो. त्यान त्या ओसामाले त्याच्या घरात घुसन मारला.”
“त्यात काय मोठ. कालच बोकड्याच्या पोट्ट्यान गंगीच्या भाच्याले त्याच्या घरात घुसुन मारला. काहो रवीभाऊ. रवीभाऊल तर माहीत हाय. येथच बाचाबाची झालती.”
“आबे खेड्यातल्या येड्यावानी बोलू नका. समजत नाही धोंड आन दाखव मले भेंड.”
“लक्षुमन तू त्यायच्याकड लक्ष नको देऊ. मले सांग तो फाटक तोडून शिद्दा घरात घुसला नाही. येकदम दबंगच म्हणाचा आपल्या भाऊवाणी.”
“तसा फाटक तोडून नाही गेला, छपरातून घुसला डायरेक्ट”
“च्यामारी, हे खासच”
“तो ओसामा लइ म्हणजे लइ डेंजर माणूस होता. त्यान हजाराच्यावर माणस मारली होती. अशा माणसाले माराले मिशन करा लागते बाबा मिशन.”
“ट्रॅक्टरच मशीन आयकल व्हत. साल हे मिशन काय नव?” तोंडातला खर्रा थुकत रमेस बोलला.
“मिशन म्हणजे कोण्या डेंजर माणसाले इचार करुन, ठरवुन माराच. य़ेकट्या दुकट्यान नाही जाच तर सोबतीले चांगल पंधरा वीस माणस घेउन जाच, बंदुका संग न्याच्या. त्या ओबामान अस मिशन केलत. तो सोता नाही गेलता तेथ त्यान माणस पाठवले. तस मिशन कराले लइ पॉवर लागते राज्या. अस येड्यागबाळ्याच काम नाही ते.” आता साऱ्यायची बोलती बंद झाली होती. ओबामा म्हणजे काही वेगळीच भानगड हाय हे पटल होत. मंगानपासून फालतूची मजाक करनारे बी आता चूप बसले होते. पोट्टे चूप झाल्याचे पाहून मंगानपासून चुपचाप सार आयकनारा एक म्हातारा बोलला.
“मी काय म्हणतो”
“बोल बुढ्या बोल तु बी बोलून घे.”
“हा जो कोणी मिशनवाला ओबामा हाय तो आपल्या गावात आला तर त्याले आपण वळखाच कस? आपल्याल का मालूम तो काळा का गोरा, ठुसका का लंबा. त्याचा कोणाकड फोटो बिटो हाय का बा?”
“हो तुया घरातच घुसनार हाय ना तो, तुयी बकरी चोरुन न्याले. तुले ओबामा म्हणजे कोण वाटला बे? आबे तो लय पॉवरफुल माणूस हाय. त्याची लय मोठी गाडी रायते. त्या गाडीतच जेवाची, खाची, मुतायची समदी सोय रायते. तो असा पैदल हिंडनार हाय का, कारे लक्षुमन बरोबर हाय का नाही?” लक्षुमन नंतर गावात जर कोणाले शहाणपणा आला असन तर तो ठेल्यावर खर्रे घोटून घोटून रव्यालेच आला होता.
“बुढ्या त्याची चिता नको करु, म्या त्याचा फोटो आणला हाय. घे पाहून घे.” लक्षुमनन पेपराच येक पान बुढ्याले दिल.
“हे पोरग.”
“नाही गा चांगला चाळीशीचा माणूस हाय.”
“आमच्यासाठी पोरगच न. येवढ्या मोठ्या पोस्टवर हाय म्हणते तवा एखादा बुजुर्ग माणूस तरी बसवाचा. पोराबाळाचा काही नेम सांगता येते का. गेली डोसक्यात हवा म्हणजे झाली का पंचाइत.”
“काही पंचाइत होत नाही. लक्षुमन मले येक सांग तो येथ कायले येउन रायला? आता आपण का कराले पायजे?”
“येत असन आपली शेतीवाडी पायले.”
“आपल्या गावातली शेतीवाडी का पाहाची हाय. ह्या सुरेसन मारे बोर खोदली, पंप लावले. कायच काय आता बसला बोंबलत, डोक्यावर कर्ज झाल पण बोरले पाणीच नाही. आधी म्हशीचा धंदा तरी होता दुधाले भाव नाही म्हणून म्हशी बी विकून टाकल्या साऱ्यायन. का पाहाच हाय येथ सारा ‘मले पहा फुल वाहा’ असाच कारभार हाय पाय.” मंगानपासून चूप बसलेला ग्यानेश्वर बोलला.
“ते जरी खर असल तरी आपण आपला गाव तर स्वच्छ ठेवू शकतो का नाही.” लक्षुमनन समजावल. साऱ्यायची पक्की खात्री झालती का ओबामा लइ मोठा माणूस हाय. आता येवढा मोठा माणूस गावात येनार हाय तवा परत्येकान गावासाठी काहीतरी केल पायजे. असाच इचार करीत येकेक जन उठला आन घराकड निंगाला. रमेस तेथच बसला. तसाही तो रोजच ट्रॅक्टर चालवून आला का रव्याच्या टपरीवरच बसला रायते. त्याच्या डोक्यात बी ओबामाच फिरत होता. समदे गेल्यावर त्यान पुन्हा येक शंका काढली.
“काहो रवीभाऊ हा ओबामा तुमची बिसलेरीच पित असन नाही. त्याले थोडी बोरींगच पाणी देनार हाय.”
“का मालूम. कोनी म्हने नुसती बियरच पिते.”
“आबा! अस कस जमन त्याले सांगाच लागन, ह्या वर्धा जिला हाय. येथ अस काही चालत नाही म्हणा. दारुबंदी हाय.”
“कोण सांगन त्याले? आपला पोलीस पाटील? तो तर सोताच पिउन पडला रायते. तो कोणाले का सांगाले जाते.”
“अशान कस जमन रवीभाऊ. त्या ओबामासमोर गावाची बदनामी होइन ना. जिल्ह्यात दारुबंदी असूनही भट्टी चालते म्हणून बोंब होइन ना. पेपरागिपरात छापून येइन. ते भट्टी पयले बंद केली पायजे. पाटलाले सांगतलच पायजे.”
दसरथ गावचा पोलीस पाटील. गावातले लोक दिसभरात काही वाकड करत नाही याच्यावर त्याचा लई भरवसा म्हणूशान तो दिवसभर गावात भटकतच नाही. तसाही तो अकरा वाजल्याशिवाय उठत नाही आन उठला का सरकारी काम हाय सांगून हिंगणघाटात जातो. तेथ जाउन का करते कोणास ठाऊक पण त्याले गावात आल्यावर कोणीबी शुद्धीत पायला नाही. आता जर का कधी तो चारचौघासारखा बोलाले लागला न तर गाववाल्यायले वाटन याले जरा जास्तच चढली. रव्याची ठेला बंद कराची येळ आन दसरथची गावात यायची येळ येकच हाय. आज रव्या आन रमेसन त्याची वाट पाहाची ठरवल. तो बराबर त्याच्या येळेत आला.
“का पाटील आज लवकर”
“उशीर झाल का ऑटो नाही भेटत मंग पायी या लागते.”
“बाकी पाटील तुमाले पता लागला का नाही?” रमेसन इचारल.
“कायचा गा. सरपंच मेला का काय?”
“कायले त्याच्या जीवावर उठले जी. तो जिता हाय. तो ओबामा येनार हाय आपल्या गावात.”
“काहून? अस का झाल गावात. कोण व्हय हा ओबामा? कणच्या पोलीस स्टेशनले असते? तस तर साऱ्यायलेच वळखतो मी. हे नाव नाही आयकल कधी.” मंग रमेस आन रव्यान त्याले ओबामा कोण, त्यान ओसामाले कसा त्याच्या घरात घुसुन मारला, तो आता येथ येनार हाय अशी सारी हकीकत सांगतली. दसरथले सार काही समजल नाही पण कोणीतरी लय मोठा डेंजर साहेब गावात येनार हाय हे त्याच्या बरोबर ध्यानात आल.
“आता का कराच रे आपण?”
“जे काही कराच ते तुमालेच कराच हाय पाटील”
“अस का करा लागन?”
“पयल म्हणजे तो गावात येतवरी ते भट्टी बंद केली पायजे.”
“काहून बा, त्याचा का संबंध? तो का तेथ जानार हाय का?”
“तस नाही. त्याच काही नेम सांगता येते का, तो कवा बी येतो कुठबी जातो. चुकुन पोचला म्हणजे भट्टीकड. बोंब होइन ना. आर गावात भट्टी हाय याचा अर्थ काय? भट्टी हाय म्हणजे गावात पोलीस पाटील नाही. मंग तुयीच पंचाइत होइन ना राज्या.”
“हे अस गणित हाय नाही. हे त्या भोकन्याच डोक नाही वाटत. जाउ दे. आजच पंजाबले सांगतो तो ओबामा येतवरी भट्टी बंद म्हणून. तो गेल्यावर पायजेन तर चालू कर पण तो येतवरी बंद म्हणजे बंद येकदम. तो माया म्हणण्याच्या बाहेर नाही.”
“हे बेस हाय, येकदम बेस. तू बी तो येतवरी पिण बंद ठेव. तो गेल्यावर चालू करुन देजो. थोड्याच दिवसाचा प्रश्न हाय.”
“येकदम बंद”
ओबामा गावात येनार का नाही पत्ता नाही, तो कधी येनार याचा बी पत्ता नाही, तो कायले येनार याचा बी पत्ता नाही पण तो येनार म्हणून जर का तो येतवरी गावातली भट्टी बंद होनार असन तर तो ओबामा गावात न आलेलाच बरा. मारुतीराया लक्ष असू दे रे बाबा.

(काही गावाची नावे सोडली तर कथा आणि सारी पात्रे पूर्णतः काल्पनिक आहे.
भाषा: वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांतल्या ग्रामीण भागात बोलणी जाणारी भाषा. बरीचशी वऱ्हाडीशी जुळनारी पण बऱ्याच ठिकाणी वेगळी.)
मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

5 Mar 2016 - 2:46 pm | पद्मावति

:) मस्तं आहे कथा. आवडली.

वपाडाव's picture

22 Apr 2016 - 4:53 pm | वपाडाव

मालक आपण हिगणघाटाचे का राहणारे?

मित्रहो's picture

23 Apr 2016 - 5:11 pm | मित्रहो

वर्धा, हिंगणघाट जवळ शेती आहे.

विवेकपटाईत's picture

22 Apr 2016 - 9:31 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Apr 2016 - 9:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

बापा हे कशीच हुकली गोठ म्हणो म्या!! निरानाम ख़तरा हो मित्रहो साहेब !! एकदम बंबाट!!

मित्रहो's picture

23 Apr 2016 - 5:13 pm | मित्रहो

विवेकपटाइत साहेब आणि बापू साहेब

मित्रहो's picture

28 Oct 2016 - 8:10 pm | मित्रहो

हि कथा युनिक फीचर्सच्या कॉमेडी कट्टा या दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आली आहे.
श्रीरंग जोशी साहेब आपले विशेष आभार, कथेचा शेवट बदलला.

श्रीरंग_जोशी's picture

28 Oct 2016 - 9:45 pm | श्रीरंग_जोशी

तुम्ही ही कथा उत्तम रंगवली आहे. कॉमेडी कट्टा या दिवाळी अंकात प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन.

माझी सुचवणी स्वीकारल्याबद्दल धन्यवाद.