विज्ञान लेखमाला : ७ : उद्वाहनपुराण

Primary tabs

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in लेखमाला
1 Feb 2016 - 12:02 am

उद्वाहनपुराण
गरज ही शोधाची जननी आहे, हे आपणाला माहीत आहेच.

मानवजातीच्या अनेक गरजांमुळे अनेक गोष्टींचा शोध लागला. त्यातीलच उद्वाहन किंवा आपण ज्याला लिफ़्ट म्हणतो, ते वर-खाली परिवहन करणारे उपकरण. यालाच अमेरिकन इंग्लिशमध्ये 'एलिव्हेटर' असेही म्हणतात. मालाची आणि नागरिकांची टेकडीवर आणि खाली ने-आण करण्यासाठी, तसेच खाणकामात शेकडो फूट खाली-वर करण्यासाठी अशा उपकरणाची गरज होतीच. मग काही शक्कल लढवून हा चढ-उतार करण्यासाठी उद्वाहनाचा शोध लावण्यात आला. आज उद्वाहन आपल्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते सरासरी आयुर्मान आणि जमिनीचा वाढता वापर यातून बहुमजली घरे बांधणे याशिवाय पर्याय नसल्यामुळे, अनेक इमारतींवर मजल्यांवर मजले चढत गेले. या मजल्यांवर जिन्यांवरून चढत जाणे एका ठरावीक मर्यादेपर्यंत शक्य होते, पण खूप उंचीवर चढणे ज्येष्ठ नागरिकांना तर सोडाच, सर्वच नागरिकांना दमछाक करणारे होते. तसेच व्हीलचेअरसाठी चढण बनवण्यालाही मर्यादा होत्या. आणि मग हे करण्यासाठी यंत्र हवेच!

आपणास आश्चर्य वाटेल की उद्वाहनाची गरज आणि शोध ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकातच लागला. आर्किमिडीज या शास्त्रज्ञाला प्रथम उद्वाहन बनवण्याचे श्रेय जाते. अवजड साहित्य वर-खाली नेण्याच्या गरजेतून उद्वाहनाचा शोध लागला. एक दोरखंड, जड वस्तू उचलण्याचे तत्त्व आणि अर्थातच त्यासाठी लागणारी ऊर्जा ही प्राथमिक साधने वापरुन पहिला उद्वाहक बनवण्यात आला.

त्या काळी उद्वाहन हे उघड्या स्वरूपात असे. एका उघड्या पेटीत मनुष्य किंवा माल भरलेला असे. एका आधाराच्या साहायाने हे उद्वाहन मनुष्यसंचालित असायचे किंवा प्राण्यांकडून चालवले जायचे. बिचारे बैल, घोडे, गाढव इत्यादी प्राणी इमानेइतबारे हे उद्वाहन चालवायचे. पाणी आणि बांधकामाचे साहित्य इत्यादी खाली-वर वाहून नेण्यासाठी ही चांगली सुरुवात होती.

मात्र प्रवाशांसाठी पहिले उद्वाहन यायला बरीच शतके जावी लागली. इ.स. १७४३मध्ये फ्रान्सचा राजा लुईसाठी पहिले असे उद्वाहन बनवण्यात आले. पहिल्या मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तो या उद्वाहनाचा उपयोग करत असे. अर्थात हेही मानवसंचालित होते व त्याच्या आज्ञेनुसार त्याचे नोकर ते वर-खाली करत असत आणि त्याला 'उडती खुर्ची' असे मजेशीर नाव होते. एका पेटीत प्रवाशी बसत आणि मनुष्यबळाचा किंवा प्राण्यांचा उपयोग करून ती पेटी एका दोरखंडावरून वर-खाली होई, असे त्या काळी बरेच असे उद्वाहक होते. असाच उद्वाहनाचा शोध लागला. काही ऐतिहासिक माहितीप्रमाणे, इजिप्तच्या सिनाई मठामध्ये - जो टेकडीवर होता - भाविकांची ने-आण करण्यासाठी उद्वाहनाचा उपयोग केला जाई.

उद्वाहन कोणत्या तत्त्वावर चालते? कोणतीही वस्तू एका उंचीवरून दुसर्‍या उंचीवर नेण्यासाठी त्या वस्तूचे वजन तितक्याच किंवा जास्त वजनाने धातूच्या दोरखंडाने ओढून नियंत्रित करून ती वस्तू दोरखंडाच्या आणि त्या वजनाच्या साहायाने वर-खाली करणे या तत्त्वावर हे उपकरण चालते. आता हे दोरखंड आणि वजन वर-खाली करणे यासाठी ऊर्जा लागणारच. ही ऊर्जा वेगवेगळ्या माध्यमांतून घेऊन तिचा उपयोग करून हे उद्वाहनाचे कार्य केले जाते. उदा.: वीज, मनुष्यबळ, द्रवचलित ऊर्जा इत्यादी.

यापैकी द्रवचलित ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. द्रवावरील दाब कमी-जास्त करून वजन नियंत्रित करणे असा या ऊर्जेचा वापर केला जातो. ऊर्जा म्हणून याच प्रकारे वाफेचाही वापर केला जातो. ऊर्जा खंडित झाल्यास उद्वाहन पडून आघात होण्याचा संभव या प्रकारच्या तंत्रज्ञानात असतो. तसेच, वजन वाहून नेण्याच्या उद्वाहच्या क्षमतेवर या तंत्रज्ञानात मर्यादा असतात. म्हणून उद्वाहनात नंतर विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला.

जगातील पहिले सुरक्षित उद्वाहन १८५२ साली एलिशा ओटिस या शास्त्रज्ञाने शोधून काढले. आपणास माहीत आहे की आजही ओटिस हा उद्वाहनाचा अग्रगण्य ब्रँड आहे, तो या शास्त्रज्ञाचे स्मरण म्हणूनच. याशिवाय ओटिसचे सर्व वंशज या व्यवसायात स्थिरस्थावर झाले आणि त्यांनी नवोन्मेष घडवून उद्वाहनाचे अनेक प्रकार विकसित केले. दोरखंड सुटल्यास किंवा तुटल्यास उद्वाहन न पडता एका खाचेत बसवून स्थिर करून अपघात टाळता येणे शक्य झाल्याने हे सुरक्षित उद्वाहन खूपच लोकप्रिय झाले.
हे सुरक्षित प्रवासी उद्वाहन प्रथम न्यूयार्क येथील ब्रॉडवे हॉटेल येथे बसवण्यात आले. याचा वेग १२ मीटर्स प्रती मिनिट आणि क्षमता ४५० किलो इतकी होती.

त्याचप्रमाणे १८७४मध्ये शिंडलर या कंपनीनेदेखील अनेक प्रकारचे उद्वाहक विकसित केले. आजच्या घडीला शिंडलर ही कंपनी १४० देशांत कार्यरत आहे. रॉबर्ट शिंडलर आणि एडवर्ड विलीगर या दोन अभियंत्यांनी शिंडलर कंपनीची स्थापना केली. शिंडलर कंपनीने असे उद्वाहक विकसित केले, जे एका एल.ई.डी. पडद्यावर मजला क्रमांकाची कळ दाबून आज्ञा दिल्यास त्या मजल्यावर जाण्याची सोय करतात. ही उद्वाहने ऊर्जा बचत करतात आणि गर्दीच्या वेळी सर्व उद्वाहक वापरणार्‍या लोकांना कमीत कमी वेळात अचूक सेवा देतात.

याच शिंडलर कंपनीने २०१०मध्यॆ सौर ऊर्जेवर चालणारे पहिले छोटेखानी विमान बनवले. अर्थातच प्रचंड ऊर्जा लागत असल्याने हे सौर विमान केवळ एकाच प्रवाशासाठी बनवण्यात यश आले. 'सोलर इम्पल्स' अशी नावे असलेली ही विमाने प्रथम २०१०मध्ये स्वित्झर्लंड ते स्पेन आणि नंतर २०१४मध्ये अबू धाबी ते यू.ए.ई. अशी यशस्वीपणे चालवण्यात आली. अनुक्रमे सोलर इम्पल्स १ आणि सोलर इम्पल्स २ या नावाने ही विमाने ओळखण्यात येतात. नंतर जपान ते हवाई बेटे हा सर्वात लांबचा प्रवास सौर विमानाकडून घडवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. सौर घटामध्यॆ बिघाड झाल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. या विमानाची दुरुस्ती चालू असून या वर्षीच्या एप्रिल महिन्यात हे अंतर सौर विमानाने पुन्हा कापण्याची योजना आहे. त्याबद्दल शुभेच्छा. यथावकाश आपल्याला त्याबद्दल माहिती कळेलच!

यानंतर उद्वाहनाच्या तंत्रज्ञानात वेळोवेळी बदल होत गेले आणि जास्तीत जास्त सुरक्षित आणि आरामदायी लिफ्ट बनवण्यात आल्या.

नंतरच्या काळात ए.सी. आणि डी.सी. विजेवर चालणार्‍या उद्वाहनाचा शोध आणि वापर सुरू झाला.

आता उद्वाहनाच्या महत्त्वाच्या भागांविषयी थोडेसे :

१. आत उभे राहण्यासाठी जागा. ८ ते १० लोक एका उद्वाहनात उभे राहू शकतात. अर्थात त्यांच्या वजनाची बेरीज मर्यादेपेक्षा जास्त असू नये.
२. उद्वाहन क्षमतेपेक्षा सर्वांचे एकत्रित वजन जास्त भरल्यास एक सेन्सर म्हणजे गजर वाजतो आणि उद्वाहन वर जाऊ शकत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने या सेन्सरला खूप महत्त्व असते.
३. पंखा किंवा वातानुकूलन यंत्र आत बसवलेले असते.
४. मजल्यांची संख्या दाखवणारी बटणे. ही दाबून आपण इच्छित मजल्यावर जाऊ शकतो. दरवाजे उघडण्यासाठी बटणे असतात.
५. दूरध्वनी संच. आपत्कालात (वीज गेल्यावर) तो वापरून उद्वाहन जवळच्या मजल्यावर पाठवण्यासाठी दूरध्वनी करून मदत मागता येते.
६. हल्लीच्या उद्वाहनात दरवाजे स्वयंचलित असतात. उतारू चढल्यावर किंवा उतरल्यावर काही सेकंदात ते आपोआप बंद होतात.
७. मनुष्यनियंत्रित दरवाजे असलेल्या उद्वाहनात सुरक्षितता म्हणून दरवाजे ठरावीक सेकंदापेक्षा उघडे राहिल्यास गजर होतो, जेणेकरून दरवाजा त्वरित बंद केला जावा.

उद्वाहन सूत्र

गगनचुंबी इमारतींमध्ये एकाच वेळी शेकडो लोक उद्वाहनाचा उपयोग करून कार्यालयात जातात, तेव्हा सर्व लोकांची शिस्तबद्ध सेवा करणे हा उद्वाहनाचा उद्देश असतो.
स्वयंचलित उद्वाहनातील संगणक प्रणाली अशा सूत्रांनी सज्ज असते. यालाच 'एलिव्हेटर अल्गोरिथम' असे म्हणतात.

थोडक्यात सांगायचे झाल्यास हे सूत्र खालीलप्रमाणे :

१ जोपर्यंत एका दिशेने (वर किवा खाली) जायची आज्ञा आहे, तोपर्यंत त्या दिशेच्या मजल्यावर जा. त्या दिशेच्या आज्ञा संपल्यास विरुद्ध दिशेची आज्ञा पाहा.
२. वरीलप्रमाणे विरुद्ध दिशेला जा.
३. कोणतीही आज्ञा नसल्यास, सर्वात जवळच्या मजल्यावर थांबा.

उद्वाहनाविषयी रंजक गोष्टी :

१. उद्वाहने स्वयंचलित सरकत्या जिन्यांपेक्षा खूपच सुरक्षित असतात.
२. आजच्या घडीला फक्त अमेरिकेत ७ लाखांपेक्षा जास्त उद्वाहने आहेत.
३ १९२० साली उद्वाहनात प्रथमच संगीताचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे प्रथमच उद्वाहनाचा वापर करणार्‍या लोकांची घाबरगुंडी उडाल्यामुळे, त्यांना शांत करण्यासाठी हा प्रयोग करावा लागला.
४. काही गगनचुंबी इमारतींमध्ये दुमजली उद्वाहने असतात. खालचा मजला विषम क्रमांकाच्या मजल्यावर आणि अर्थातच वरचा सम क्रमांकाच्या मजल्यावर थांबतो.
५. उद्वाहन हे उचलण्याचे एक साधे यंत्र आहे.
६. ज्यू समाजात सब्बाथ या तिथीला पूर्ण विश्रांती घेऊन फक्त प्रार्थना करण्याची रीत आहे. ज्यूबहुल भागात अशी उद्वाहने असतात, जी बहुमजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यांवर सक्तीने थांबतात, जेणेकरून ज्यू नागरिकांना बटण दाबण्याचीही गरज नाही आणि ते उद्वाहनातही आपले प्रार्थनेचे व्रत चालू ठेवतील.
७. जगातील सर्व उद्वाहने मिळून तीन दिवसात पृथ्वीवरील पूर्ण लोकसंख्या वर-खाली वाहून नेतात.
८. बहुमजली स्वतंत्र घरात उद्वाहन असणे ही काळाची गरज झाली आहे.
९. प्राचीन रोममध्ये २४ उद्वाहने २०० माणसे स्वत: बळ लावून वर-खाली करत असत.
१०. प्राचीन काळी उद्वाहनाच्या बाल्यावस्थेत उद्वाहन चालवण्यासाठी घोडा, बैल इत्यादी प्राण्यांचा उपयोग केला जाई.
११. प्रगत उद्वाहनांच्या आजच्या युगातही, खालील मजल्यावरील घरे वरच्या मजल्यावरील घरांपेक्षा किंचित महागच असतात.
१२. आग लागल्यावर वीज जाण्याचा धोका असल्याने, कधीही उद्वाहनाचा वापर करू नये. आपत्कालीन मार्ग जिन्यावरून निर्देशित केलेला असतो.
१३. निकोलस व्हाईट हा इसम मॅनहॅटन अमेरिकेत एका उद्वाहनात तब्बल ४१ तास अडकून नंतर सुखरूप बाहेर आला. त्याने २५ दशलक्ष डॉलर्सची भरपाई मागितली.
१४. ११/९च्या अतिरेकी हल्ल्यात अमेरिकेतील ट्विन टॉवरमधील बळी गेलेल्यांमध्ये २०० लोक उद्वाहानाच्या आत मरण पावले.
१५. थायसेन कृप या कंपनीने वर-खाली, तसेच आडव्या दिशेने सरकणारे उद्वाहन विकसित केले आहे.
१६. डिस्नेलँड, फ्रान्समध्ये एक उद्वाहन असे आहे, ज्याला छप्पर नाही आणि ते शेकडो फूट खाली जाते. यामुळे खोली ताणून मोठी होत असल्याचा आभास होतो.
१७. 'इनक्लाइण्ड एलिव्हेटर' हा उद्वाहनाचा भाऊबंद असून अशा प्रकारचे उद्वाहन वर-खाली जाताना ९० अंशाऐवजी त्यापेक्षा कमी कोनात वर-खाली होते. प्रचंड चढ असलेल्या टेकडीवर जाण्यासाठी अशा उद्वाहनाचा उपयोग होतो.
१८. उद्वाहनात वातानुकूलन यंत्र असल्यास, बाष्पाच्या कणांपासून तयार झालेले पाण्याचे थेंब काढून टाकणे गरजेचे असते. अन्यथा अपघात होतो.
१९. अमेरिकेतील मसुरी राज्यात एक उद्वाहन असे आहे, जे इमारतीचा वरील घुमटाकार भाग पाहण्यासाठी लोकांना इमारतीच्या अगदी तळाला घेऊन जाते.
२०. डम्बवेटर हे फक्त मालाची ने-आण करण्यासाठी वापरले जाते.

आणि एक दु:खद गोष्ट..

ख्यातनाम संगीतकार श्री. वसंत देसाई यांचे निधन उद्वाहन अपघातात झाले. उद्वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली.
उद्वाहनाचे अपघात अभावानेच होतात. हलगर्जीपणा टाळल्यास हे अपघात आपण सहज टाळू शकतो.

अशा प्रकारे उद्वाहन हे आजच्या काळातील एक अतिशय उपयुक्त उपकरण आहे. विचार करा - तुम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या कामासाठी नरिमन पॉइंटला एका इमारतील जायचे आहे आणि हे कार्यालय २५व्या मजल्यावर आहे. जर उद्वाहन नसेल, तर चढून जाताना किती चिडचिड होईल? दमछाक वेगळीच. तसेच आजकाल रुग्णालयेही गगनचुंबी इमारतीत असल्यामुळे रुग्णांची ने-आण करण्यासाठी उद्वाहनाशिवाय पर्याय नाही.

धन्य तो महान शास्त्रज्ञ ओटिस, ज्याने अशा परोपकारी उपकरणाचा शोध लावला.. आणि त्यात वेळोवेळी संशोधन करून प्रगत उद्वाहने आणणार्‍या मानवजातीच्या बुद्धीला अगणित प्रणाम!

प्रतिक्रिया

पैसा's picture

31 Jan 2016 - 11:54 pm | पैसा

लिफ्टची मस्त मनोरंजक माहिती!

कंजूस's picture

1 Feb 2016 - 7:01 am | कंजूस

मस्तंय.

अजया's picture

1 Feb 2016 - 7:57 am | अजया

लेखमालेत रोज नवी रोचक माहिती मिळतीये.

छान माहिती. वाफेच्या संयंत्रावर चालणार्‍या उद्वाहनांचीही आणि त्यानंतर विजेवर चालणार्‍या उद्वाहनांनी त्यांना कसे मोडीत काढले याची माहिती यायला हवी होती.

दुसरे म्हणजे, उद्वाहनांमधील सुरक्षाव्यवस्था आणि आपत्कालिन उपाय यांची माहिती देता आली असती.

"प्रगत उद्वाहनांच्या आजच्या युगातही, खालील मजल्यावरील घरे वरच्या मजल्यावरील घरांपेक्षा किंचित महागच असतात." ??? मुंबईत तरी नाही ..... मुम्बैइत तर चांगल्या इमारतींना " फ्लोर राइस " लागतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Feb 2016 - 11:58 am | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय सुलभ भाषेत उत्तम लेख !!

ते सोलर इम्पल्स चा उल्लेख थोडा अस्थानी वाटला, म्हणजे फ़क्त schindler ने बनवले इतके सोडुन लेखाचा मुख्य विषय असलेल्या उद्वहनयंत्रशी त्याची काय लिंक आहे ती प्रस्थापित झाली नाही

लेख उत्तमच आहे फ़क्त जे जाणवले ते मांडले आहे कृपया राग मानु नये

वेल्लाभट's picture

1 Feb 2016 - 3:27 pm | वेल्लाभट

सोलर इंपल्स चं तंत्रज्ञान वापरून शिंडलर ने सोलर वर चालणारी लिफ्ट बनवली आहे.. अँड दॅट्स द नेक्स्ट बिग थिंग इन एलिवेटर वर्ल्ड.

http://www.elevatordesigninfo.com/schindler-introduces-solar-powered-ele...
http://www.sustainablebusiness.com/index.cfm/go/news.display/id/24739

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Feb 2016 - 4:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो मग तशी काही वाक्यं हवी की देवा मधेच एकदम स्टैंडअलोन मधे सोलर इम्पल्स आले म्हणून भंजाळलो न राव आम्ही

शान्तिप्रिय's picture

1 Feb 2016 - 12:35 pm | शान्तिप्रिय

सर्वांना धन्यवाद अगदी मनापासुन!
उद्वाह्नाबद्दल आपणास काही इतर माहिति असल्यास जरुर लिहा.

नाही आवडला लेख. कुठल्यातरी तीन चार ऑनलाईन लेखांचे भाषांतर वाचत असल्याप्रमाणे वाटले. शिंडलरच्या सोलार उल्लेखाने ही शंका बळावली. दोन तीन महिन्यांपूर्वी लोकरंग मध्ये एका सदरात अगदी सुरेख माहीती वाचल्याचे स्मरते. तिथे ह्या लेखापेक्षा छोट्या लेखात बराच मोठा आढावा घेतला गेलेला. हा लेख तुलनेत त्रोटक वाटला. चित्रे, इलस्ट्रेशन वगैरे टाकून अजून माहीतीपूर्ण करता आला असता. रोप, मोटार, बॅलन्स वेट अन कंट्रोल्स चे काम कसे चालते हे दाखवता आले असते. ट्रॅक्शन, सेमी ऑटोमॅटिक, चेअर लिफ्ट, होम लिफ्ट, ऑटोमॅटिक, हॉस्पिटल, इंडस्ट्रीअल अशा वेगवेगळ्या प्रकारची माहीती देता आली असती.
चौराकाका आधीच म्हणल्याप्रमाणे "एक नक्की की जे काही इथे येणार आहे ते कुणाचेही स्वत:चे नसणार आहे." हे पटले आत्ता.

आर्किमिडीज या शास्त्रज्ञाला प्रथम उद्वाहन बनवण्याचे श्रेय जाते. अवजड साहित्य वर-खाली नेण्याच्या गरजेतून उद्वाहनाचा शोध लागला. एक दोरखंड, जड वस्तू उचलण्याचे तत्त्व आणि अर्थातच त्यासाठी लागणारी ऊर्जा ही प्राथमिक साधने वापरुन पहिला उद्वाहक बनवण्यात आला.

त्या काळी उद्वाहन हे उघड्या स्वरूपात असे. एका उघड्या पेटीत मनुष्य किंवा माल भरलेला असे. एका आधाराच्या साहायाने हे उद्वाहन मनुष्यसंचालित असायचे किंवा प्राण्यांकडून चालवले जायचे. बिचारे बैल, घोडे, गाढव इत्यादी प्राणी इमानेइतबारे हे उद्वाहन चालवायचे. पाणी आणि बांधकामाचे साहित्य इत्यादी खाली-वर वाहून नेण्यासाठी ही चांगली सुरुवात होती.

विहिरीतून पाणी काढणार्‍या मोटेचा शोध आर्किमिडीजने लावला का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Feb 2016 - 4:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

ती मोट आहे का माहीती नाही त्याला आर्कमिडीज स्क्रू असे म्हणतात आद्य पम्पिंग डिवाइस होते ते एक , मोट ह्या अर्थाने कामी येणारे पहिले यंत्र माझ्या माहीती प्रमाणे egyptian shadoff सिस्टम होते,

चु भू दे घे

.
(आर्कमिडीज स्क्रू)

.
(शदूफ सिस्टम)

शान्तिप्रिय's picture

1 Feb 2016 - 5:05 pm | शान्तिप्रिय

प्रामाणिक प्रतिसादांबद्दल धन्यवाद माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे
चुका, त्रुटी , अपुरेपणा आहे या लेखात.

लेख वाचल्याची ही पोच. चांगला प्रयत्न.

पुढील लिखाणास शुभेच्छा.

लिफ्टसंदर्भात वाचलेला एक किस्सा.

एका बहुमजली हॉटेलमध्ये गडबड सुरू होती. प्रवाशांना पुढचे काही महिने खोल्या मिळणार नाहीत, आरक्षण घेतले जाणार नाही असे सांगितले जात होते. पुढचे अनेक दिवस हॉटेल बंद राहणार होते आणि त्यामुळे भरभक्कम नुकसान होणार होते पण याला काही पर्यायही नव्हता.

हॉटेलच्या वरच्या मजल्यांवर जिने चढत जाण्यासाठी प्रवासी नकार देत होते व पर्याय नसेलच तर नाखुशीनेच जात होते. त्यासाठी हॉटेलच्या मालकांनी लिफ्ट बसवण्याचा निर्णय घेतला मात्र अनेक मजल्यांवर तोडफोड करून लिफ्ट बसवताना प्रवाशांची गैरसोय होणार होती.

एका साध्या कामगाराने तेथे आलेल्या एका इंजीनीयरला विचारले. "हे सगळे कशासाठी सुरू आहे?"

"येथे लिफ्ट बसवायची आहे, त्यामुळे अनेक मजल्यांवर काम सुरू होईल, त्यादरम्यान प्रवाशांना आवाजाचा त्रास होवू नये म्हणून हॉटेल बंद ठेवले जाणार आहे" - इति इंजीनीयर.

तो कामगार म्हणाला. "मी इंजीनीयर असतो तर हॉटेलबाहेरून लिफ्ट बांधली असती"

...आणि जगातील पहिल्या "इमारतीबाहेरच्या लिफ्टचा" जन्म झाला..!!!

हा खरच इंजीनीयर असायला हवा होता. कॉमन सेन्स वापरलाय पठ्ठ्याने :)

पिंगू's picture

2 Feb 2016 - 8:18 am | पिंगू

हे लय भारी.

सध्या मी इमारतीबाहेर लिफ्ट लावून देण्याचीच कामे करतो.

शब्दबम्बाळ's picture

1 Feb 2016 - 6:58 pm | शब्दबम्बाळ

राग मानू नका पण तांत्रिक निबंध वाटला.. पण त्यातही तांत्रिक गोष्टींचा फार उहापोह झाला नाही..

दुसरा मुद्दा म्हणजे आपण मराठीत किचकट शब्द निर्माण करण्याचा चंग का बांधतो? "उद्वाहक" अरे काय हे नाव!!
लिफ़्ट हा शब्द किती सरळपणे निर्माण झाला आहे, आपण नवीन शब्द संस्कृत मधून जणू संधी-समास करून आयात करतो!

अवांतर: विज्ञान लेखमालेचे मुखपृष्ठ एकदम सुंदर झालेच आहे पण त्यातही लांबलचक संस्कृत सुभाषित खटकले. विज्ञान हे लोकांना किचकट वाटता काम नये, ते सोप्पे सुटसुटीत असावे असे मला वाटते. नाहीतर सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचणार कसे?

वेल्लाभट's picture

1 Feb 2016 - 11:02 pm | वेल्लाभट

ही तुमची मतं आहेत. उद्वाहक हा शब्द, ही संज्ञा तुम्हाला रुचली नाही; हरकत नाही. पण ती यथोचित आहे.
दुसरं म्हणजे विज्ञान हलकं फुलकं करणं यातच लेखमालेचं फलित आहे. सुभाषित हा त्याचाच एक भाग आहे.

बाकी आपली आपली मतं आहेत.

मराठी कथालेखक's picture

2 Feb 2016 - 1:59 pm | मराठी कथालेखक

उद्वाहक हा सर्वमान्य शब्द आहे. उद्वाहक चालवण्याचे प्रमाणपत्र सरकारी संस्थेकडून मिळते त्यातही हाच शब्द वापरलेला असतो. बहूधा असे प्रमाणपत्र उद्वाहकाच्या आत चिकटवलेले असते.
अशाच एका प्रमाणपत्रात व्हेरिओ ड्राईव्हला 'बदलते गतीमान' असा प्रतिशब्द वाचला आहे.

आपण मराठीत किचकट शब्द निर्माण करण्याचा चंग का बांधतो?

झालंच तर मराठीतून बोलताना आपण अनेक कठीण , मोठे इंग्लिश शब्द वापरतो आणि सहज सोपे मराठी शब्द आपल्याला उगाच किचकट वाटतात. ही मनोवृत्ती (हं..इथेही आपण सहजपणे मेन्टॅलिटीच म्हणतो) बदलायला हवी.

शब्दबम्बाळ's picture

2 Feb 2016 - 4:09 pm | शब्दबम्बाळ

"उद्वाहक हा प्रमाण शब्द आहे." हे मान्य आहे पण "उद्वाहक हा सर्वमान्य शब्द आहे" हा निष्कर्ष कसा काढलात?
एक गम्मत सांगतो, काल whatsapp (याला मी कायाप्पा म्हणणार नाही! :) )वर "उद्वाहक" या शब्दाचा अर्थ ग्रुपच्या सदस्यांना विचारला.(सगळे मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि उच्चशिक्षित आहेत) फक्त एकाला सांगता आला अर्थ, तोही खात्रीने नाही!
असे का झाले असावे? फक्त मनोवृत्ती?

प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांमध्ये तफावत हि राहतेच आणि जे शब्द बोलण्यात राहतात शक्यतो तेच आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर येणाऱ्या नव-नवीन शब्दांसाठी आपण मराठीला बोली भाषेतील नवीन शब्द द्यायला कमी पडलो असे वाटत राहते.
कुठल्याही नवीन शब्दाच्या उत्पत्तीसाठी आपण संस्कृतकडे धाव घेतो. हे थोडे कमी झाले पाहिजे असे वाटते.

डोळा, आई असे शब्द कशापासून तयार झाले असतील. कधीतरी संपूर्ण नवीन आणि सोप्या शब्दांची भर भाषेत पडायला सुरुवात व्हावी.

ज्यावेळी मराठी शिक्षणामध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झुंजते आहे अशावेळी काही सोप्पे बदल करण्यापेक्षा समाजाची मनोवृत्ती बदलण्याचा इरादा मराठीला फारसा परवडणारा नाही.

या धाग्यावर विषयांतर केल्याबद्दल क्षमा असावी.
खालील धाग्यावर या मुद्द्यांवर चर्चा झालेली दिसली.
धागा

वेल्लाभट's picture

2 Feb 2016 - 5:41 pm | वेल्लाभट

केवळ 'अजून' विषयांतर नको म्हणून शब्द आवरतोय. नाहीतर बरंच बोलता आलं असतं मनोवृत्तींबद्दल.

कपिलमुनी's picture

2 Feb 2016 - 6:30 pm | कपिलमुनी

त्याच कस्स्काय समूहावर उद्वाहक म्हणजेच लिफ्ट असे सांगा .
२०-१५ लोकांना कळेल . अशा पद्धतीने मराठी भाषा वृद्धींगत होइल.

असंका's picture

3 Feb 2016 - 6:05 pm | असंका

+ १

नक्कीच मी तर फॉलो करतो हा सल्ला.

मराठी कथालेखक's picture

2 Feb 2016 - 7:27 pm | मराठी कथालेखक

एक गम्मत सांगतो, काल whatsapp (याला मी कायाप्पा म्हणणार नाही! :) )वर "उद्वाहक" या शब्दाचा अर्थ ग्रुपच्या सदस्यांना विचारला.(सगळे मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि उच्चशिक्षित आहेत) फक्त एकाला सांगता आला अर्थ, तोही खात्रीने नाही!

ज्या उद्वहनामध्ये रोज ये जा करतो त्यात चिकटवलेले प्रमाणपत्र (आता प्रमाणपत्र म्हणजे काय हे पण अनेकांना माहित नसेल कदाचित) वाचले तरी खूप झाले.
खरी गोष्ट आहे की अनेकांना अनेक ठिकाणी मराठी शब्द वापरताना लाज वाटते बहूधा.
वरचा शब्द थोडा चुकला आहे. तो 'उद्वाहक' नसून उद्वाहन असायला हवा.

डोळा, आई असे शब्द कशापासून तयार झाले असतील. कधीतरी संपूर्ण नवीन आणि सोप्या शब्दांची भर भाषेत पडायला सुरुवात व्हावी.

हे काहीसे मान्य. बाकी वाहन हा शब्द मराठीत आहेच आणि बर्‍यापैकी वापरला जातो. उद्वाहन हा समास असला तरी फारसा कठीण वाटत नाही उलट वाहन शब्दाचा अर्थ माहीत असल्याने उद्वाहनाचा अर्थ लावणे सोपे जाते (जरी अर्थ आधीपासून माहित नसला तरी) त्याऐवजी पुर्णतः नवा असा मराठी शब्द असेल तर त्याचा अर्थ शोधण्यास काही श्रम घ्यावे लागतील. खरतर लिफ्ट या शब्दातून ते एक प्रकारचे वाहन आहे आणि माणसे वा वस्तू वाहून नेते हे समजून येत नाही. पण उद्वाहनातून त्याचा उद्देश , कार्य याची कल्पना लगेच करता येते.
बाकी तुम्ही म्हणता तसे पुर्णत: नवीन शब्द नवीन प्रकारच्या गोष्टींसाठी करणे अधिक उचित राहील म्हणजे स्ट्रॉबेरी वा पिझ्झा ई ना पुर्ण नवीन शव्द असायला हरकत नाही

नया है वह's picture

1 Feb 2016 - 7:03 pm | नया है वह

ले़ख आवडला!

शान्तिप्रिय's picture

1 Feb 2016 - 7:13 pm | शान्तिप्रिय

शब्द बंबाळ ......
आपल्या प्रतिसादाचा मी आदर करतो. धन्यवाद.
मराठीतील शब्द हा वादाचा मुद्दा आहे. उद्वाहक म्हणजे लिफ्ट म्हणजे एलिव्हेटर.
ज्याला जे सोयिस्कर वाटते ते समजुन घ्यावे.
सर्व जणांना लेख लिहायची संधी मिळावी असा द्रुष्टीकोण ठेवून यानंतर यावर्षी कुठ्ल्याही लेखमालेत लेख
लिहिणार नाही. माझे सामान्य लेखन जमेल तसे चालूच राहिल.
मिसळपावचा मला संधी दिल्याबद्दल मी शतशः आभारी आहे.

शब्दबम्बाळ's picture

1 Feb 2016 - 7:25 pm | शब्दबम्बाळ

माफ करा पण आपल्या लिखाणावर फक्त टीका करण्यासाठी मी प्रतिसाद लिहिला नाही..
पण जे वाटले ते लिहिले, ज्यांना लिखाण आवडले आहे त्यांनी कौतुक देखील केल आहे!
त्यामुळे कृपया तसे वाटून घेऊ नका.

अहो तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय?

लोकं चांगल्यासाठी सांगत आहेत असे समजा. पटले तर सुधारणा करा अन्यथा दुर्लक्ष करा. सिंपल. :)

सर्व जणांना लेख लिहायची संधी मिळावी असा द्रुष्टीकोण ठेवून यानंतर यावर्षी कुठ्ल्याही लेखमालेत लेख
लिहिणार नाही.

अरे असे नका बोलु राव ! तुम्हि छान लिहिलेय.

रक्तबंबाळ करणार्‍यांनी शब्दबंबाळ नाव घेतले तरी त्याने त्यांचे काम काही साहित्यिक होत नाही.
त्यामुळे नाउमेद होऊ नका.

शब्दबम्बाळ's picture

2 Feb 2016 - 7:48 pm | शब्दबम्बाळ

काय भारी वाक्य लिहिलंय! पण मी काही साहित्यिक वगैरे नाही हो! (जर तुम्ही तशी काही प्रमाणपत्र देत असाल तर!)
धाग्याच काश्मीर नको उगाच...

शान्तिप्रिय's picture

1 Feb 2016 - 7:29 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद . तसे काहि नाहि.
नंतर सुधारणा करेनच.

लेख आवडला. अजून थोडी माहितीची भर असायला हवी होती.

लेखातील उल्लेख केलेल्या ओटिस कंपनी बद्दल एक्का काकांच्या ह्या लेखात माहिती वाचलेली होती.

राघवेंद्र's picture

1 Feb 2016 - 8:36 pm | राघवेंद्र

माझ्या उडत ऐकलेल्या माहिती प्रमाणे, उद्वाहक (लिफ्ट) फार कमी वेगाने खाली-वर करतात आणि आतील लोकांना लागलेला वेळ लक्षात येऊ नये म्हणुन आरसे लावलेले असतात.

किलमाऊस्की's picture

1 Feb 2016 - 9:31 pm | किलमाऊस्की

प्रयत्न चांगला आहे.

मदनबाण's picture

1 Feb 2016 - 10:58 pm | मदनबाण

माहिती आवडली...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Stressed Out [OFFICIAL VIDEO]

Jack_Bauer's picture

2 Feb 2016 - 12:54 am | Jack_Bauer

एलिव्हेटर अल्गोरिथम विषयी अजून माहिती येऊ द्यात. ह्या मध्ये वेळ आणि अंतराचे कसे गणित बांधले जाते ? उदा : २० मजल्याच्या इमारतीत २ लिफ्ट आहेत. एक २० व्या मजल्यावर आणि एक तळ मजल्यावर. जर मी १० व्या मजल्यावर वर जाण्याचे बटन दाबले तर कोणती लिफ्ट येईल हे कसे ठरवले जाते ? किंवा लिफ्टच्या आतील माणसांनी केलेल्या रिक्वेस्ट आणि बाहेर एखाद्या मजल्यावर उभ्या असलेल्या माणसांनी केलेल्या रिक्वेस्ट ह्यामध्ये कोणा एकाला प्रायोरिटी असते का ?

सुनील's picture

2 Feb 2016 - 8:06 am | सुनील

जुन्या काळात घेऊन गेलात राव!!

एलिवेटर अल्गोरिदम (आणि एक्स्प्रेशन पार्सर) म्हणजे मेंदूला खुराकच. किती तरी तास घालवले हे लिहिण्यात तेव्हा!

बाकी लेख एकदम बाळबोघ वाटला. थोडी रेखाचित्रे वगैरे टा़कून अधिक रंजक करता आला असता.

प्राची अश्विनी's picture

2 Feb 2016 - 9:01 am | प्राची अश्विनी

लेख आवडला, पु. ले. शु.

शान्तिप्रिय's picture

2 Feb 2016 - 4:28 pm | शान्तिप्रिय

सगळ्यांना पुन्हा धन्यवाद!
काही कन्स्ट्रक्टिव्ह टीका आहेत जरुर! .
परंतु तरिही "निंदकाचे घर असावे शेजारी" या उक्ती प्रमाणे हे हवेच!

शान्तिप्रिय's picture

2 Feb 2016 - 4:29 pm | शान्तिप्रिय

त्याशिवाय उत्तरोत्तर सुधारणा होणार नाहि लेखनात.

मारवा's picture

2 Feb 2016 - 10:50 pm | मारवा

अदनान सामी च गाण आठवल राव
भारी रोचक लेख आहे आवडला. पुढच्या वेळेस लिफ्ट मध्ये गेल्यावर आठवेल सर्वात अगोदर
अस असतय होय. पुण्यभुमीतल्या मित्राने एकदा गप्पांत हा शब्द सांगितलेला की पुण्यात लिफ्ट मध्ये
महापालिकेची एक सुचना असते अनेक ठीकाणी चिकटवलेली त्यात हा शब्द उदवाहन का काय हा असतो.
हा शब्द पहील्यांदा ऐकुन मोठी मौज वाटली होती.
माहीतीपुर्ण लेखासाठी धन्यवाद

Maharani's picture

3 Feb 2016 - 9:04 pm | Maharani

Rochak mahiti...

एक एकटा एकटाच's picture

4 Feb 2016 - 9:08 am | एक एकटा एकटाच

मस्त आहे.
वाचायला मजा आली