दरीतून रेस्कू आॅपरेशन: ते 28 तास : By राहूल तपासे ABP maza सातारा

बाजीगर's picture
बाजीगर in काथ्याकूट
31 Dec 2015 - 5:03 pm
गाभा: 

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान असलेल्या घाटात दोन दिवसापुर्वी झालेल्या अपघातात जिवाची पर्वा न करता लढलेल्या त्या महाबळेश्वरच्या ट्रेकर्सं टिमचे आभार मानण्यास शब्दच नाहीत...

एबीपी माझाचे रिपोर्टर राहुल तपासे यांचा हा ब्लॉग खूप मोठा आहे पण आवश्यक वाचा.
-सचिन उतेकर

'ते' 28 तास .... आम्ही जीव ओतला !

Last Updated: Wednesday, 30 December 2015 4:33 PM

By:राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा

सातारा : दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना एक फोन आला, ‘भाईसाब, हमारे महिमान लोग कुवेमे अटके हुवे है… गाडी के साथ गड्डे मे गये है, छे लोग है.. उनको बचाव.’ हे ऐकुन ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’चे अध्यक्ष थक्क झाले. घटना घडलेलं ठिकाण विचारलं तेव्हा फक्त ‘महाबळेश्वर से कुछ पच्चीस से तीस किलोमीटर पर ओ लोग है, लेकीन हम बता नही सकते की परफेक्ट कहा पे है.. लेकीन ओ पुनासे महाबळेश्वर जा रहे थे’ असं उत्तर आलं.
प्रसंग मोठा होता .बास एवढ्याशा माहितीवर आता काय शोधायचं, कुठे शोधायचं, हा प्रश्न पडला होता. त्या सुन्न करणाऱ्या माहितीत त्यांनी महाबळेश्वरच्या इतर कार्यकर्त्यांना तातडीने एकत्र करण्यासाठी ट्रेकर्सचे कार्यकर्ते सुनिल भाटिया आणि निलेश बावळेकर यांना सांगितलं. अडीच वाजेपर्यंत सर्व एकत्र जमले. तीन टीम तयार केल्या.
मी साताऱ्यातून वाईकडे निघालो होतो. गाडी चालवतच सर्वांना पुढची व्यूहरचना सांगत होतो. त्या नंतर एका टीमचं नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष सुनिल केळगणे यांच्याकडे देण्यात आलं, दुसऱ्या टीमचं सुनिल भाटियांकडे, तर तिसऱ्या टीमचं सुनिल केळगणकडे. ते पर्यटक पुण्यातुन येणारे म्हटल्यावर महाबळेश्वर ट्रेकर्सची एक टीम पसरणी घाटाकडे रवाना केली. तर दोन टीम जागेवरच थांबवून ठेवल्या.
पर्यटक मेढा येथुन येणाऱ्या केळघर या घाटात अडकले असतील म्हणून दुसऱ्या टीमने मेढा मार्गावरुन शोध मोहिम राबवावी, तर तिसऱ्या टीमने पोलिस यंत्रणेच्या आदेशाकडे लक्ष ठेवावे, त्यांना जर माहिती मिळाली आणि पोलिसांनी जर माहिती दिली तर त्यांच्यासोबतच आपल्या गाड्या रवाना करायच्या, असा मी आदेश दिला होता.
दरीत अडकलेल्या व्यक्तीच्या फोन नंबरचं टॉवर लोकेशन काढण्याबाबतही मी माझ्या पुण्यातील पोलिस अधिकारी मित्रांना सांगितलं होतं. महाबळेवर ट्रेकर्सची एक टीम पसरणीच्या घाटात काम करत होतीच, शिवाय दुसरी टीम पोलिसांच्या संपर्कात होती.

ठोस माहिती मिळते का याकडे लक्ष ठेवुन होते. जवळपास दीडशे दोनशे फोन झाले असतील पण काहीच कोणाकडून महिती मिळत नव्हती. चार वाजले होते. पसरणी आणि केळघरच्या घाटाकडे गेलेल्या टीमने सर्व घाट पिंजून काढला. तेवढ्यात सातारा पोलिस कंट्रोलरुम कडुन माहिती मिळाली की पुणे जिल्ह्यातील भोर जवळील वरद घाट हे लोकेशन मिळत आहे. मी सर्व टीम्सना वाईत बोलावुन घेतले. ते येईपर्यंत मी माझ्या संबंधितांच्या घरी जाऊन एक कप चहा प्यायला. तिन्ही टीम्स वाईत सात वाजता पोचल्या. वाईत पोहचल्यावर चर्चा झाली. मांढरदेवी गडाच्या रोड मार्गे भोर गाठले. दोन गाड्या सुसाट वरद घाटाकडे रवाना झाल्या. पोलिसांशी संपर्क साधुन या बाबतची माहिती दिली आणि त्यांच्याकडे असलेली माहिती घेतली.
रात्री साडे आठ वाजता महबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते वरद घाटात जमा झाले. सर्वांनी घाटातुन शोध मोहिम सुरु केली. पण पोलिस कोठे शोधत आहेत की नाहीत हे मात्र माहिती नव्हते. ट्रेकर्सचे कार्यकर्ते दहा वाजता वरद घाटाच्या मध्यावर पोहचले. रात्रीचे दहा वाजले होते. भोरचे वरिष्ठ अधिकारी गाडी लावून थांबले होते. या साहेबांना त्यावेळी ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी विचारले, ‘साहेब, टॉवर लोकेशन नेमके कोणते दाखवले आहे?’ साहेब बुचकळ्यातच होते. हो, मी तेच पहातोय, हे त्यांचं उत्तर उडवाउडवीचं होतं, हे स्पष्ट दिसत होतं.
साहेब सांगत होते आमच्या घाटात ही घटना नाही झाली. आम्ही पाच वाजल्यापासुन घाटात पहातोय. आता हे साहेब जर पाच वाजल्यापासुन या घाटात होते तर त्यांना निदान तीन वाजता तरी या घटनेची माहिती भोरमध्ये असताना मिळाली असणार. आणि ही माहिती त्यांना जर तीन वाजता मिळाली असेल तर त्यांनी तीनपासुन त्या फोन नंबरचे टॉवर लोकेशन नेमके काय आहे, हे पहाण्यासाठी काय केले! साहेबांनी ट्रेकर्सचे कार्यकर्ते आल्यावर फोनाफोनी सुरु केली होती.

तोपर्यंत महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना पुण्यातुन एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी ते टॉवर लोकेशन हे महाड येथील एमआयडीसी असल्याचं सांगितलं. तेव्हाच भोरच्या पोलिस अधिकाऱ्यांना फोन आला की ‘हो, महाडच्या एमआयडीसीचे टॉवर लोकेशन दाखवले जात आहे.’ संपले! साहेबांची हद्द संपली. साहेब ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांसोबत जेव्हा बोलत होते तेव्हा जसं काही त्यांना प्रमोशनच मिळाल होतं. ते खुशीत सांगत होते माझ्या हद्दीतलं नाही टॉवर लोकेशन तर ते महाडच्या हद्दीत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य या सर्वच ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांना समजत होतं.
महाडचे पोलिस ठाणे नेमके कोठे आहे असं ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी साहेबांना विचारले त्यावेळी साहेब म्हणाले चला, तुम्हाला सोडतो महाडच्या पोलिस ठाण्यापर्यंत. आमच्या सर्वांच्या गाड्या सुसाट महाड पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्या. ज्या ठिकाणचे हे लोकेशन दाखवलं जातंय त्या महाडच्या जवळ कोणतीच दरी नव्हती, मग आता हे टॉवर लोकेशन चुकीचे आहे की अपघाताची बातमी सांगणारी व्यक्ती खोटी माहिती देऊन सर्वांची दिशाभुल करत आहे, हे कळत नव्हतं.

तेवढ्यात एक तज्ञ त्या ठिकाणी महाड पोलिसांनी बोलावला. त्या तज्ञाने दिलेली माहितीच या सर्वांसाठी उपयुक्त ठरली. रायगड जिल्यातील पोलादपुरच्या जवळील जो घाट आहे त्यातील काही घाटाला या महाडच्या टॉवर मधुन फिक्वेन्सी जाऊ शकते अस ठाम मत त्याने नोंदवलं. बास… अशी माणसं पाहिजेत म्हणजे पुढे काम करायला जोर येणार… कसलाही विचार न करता सगळ्या ट्रॅकर्सच्या कार्यकर्तांच्या गाड्या पोलादपुरच्या घाटाकडे रवाना झाल्या.

कोणाचा कसालाही विचार न करता तीन टीम टप्प्याटप्प्याने शोधमोहिमेत सक्रीय झाल्या. चालत अनेक अवघड वळणं तपासायला सुरुवात केली. ट्रेकर्सचा अनुभव होता जरी एखादी गाडी दरीत गेली तरी त्या ठिकाणी व्रण रहातात असे नाही. झाडांना वाकवुन गाडी दरीत कोसळली तरी झाड पुन्हा जैसे थे उभी राहू शकतात. म्हणुन डोळ्यात तेल घालुन सर्व कार्यकर्ते किर्र अंधारात थंडीची तमा न बाळगता शोध मोहिमेत जीव तोडुन सक्रिय झाले.

शोध मोहिम सुरु असताना दरीच्या दिशेने निलेश बावळेकर या कार्यकर्तांला दरीतुन एक आवाज आला. हा भास होतो की खराच आवाज आला हे माहिती नव्हते. म्हणुन त्याने सर्वांना शांत रहाण्यास सांगितले. तेवढ्यात खालुन पुन्हा आवाज आला. त्या आवाजातील वाक्य समजली नाहीत पण निश्चितच ते बचाव बचाव असंच काहीसं म्हणत असावेत…..
त्या ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांचा कोणी नातेवाईक किंवा घरातला नव्हता पण हा आवाज ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले. कारण स्पॉट समजला होता. गाडीतलं सर्व साहित्य काही क्षणात बाहेर निघाल होतं. आवाज नेमका कोठुन आला त्याच्याजवळ, जायला नेमका रस्ता कोठुन … खाली कोठुन जायच असे अनेक प्रश्न…

काळोखात, बॅटरीच्या मंद प्रकाशात शोध मोहिम सुरु झाली. सर्वांचा विचार पक्का झाला. कोठुन खाली उतरायच. आणि ते ठिकाण निश्चित झाल्यावर मी आणि सनी बावळेकर आणि असे दोघे जण झटाझट कसलीच पर्वा न करता त्या जंगलात घुसलो. जंगलातील त्या दरीत आत घुसत असतान कोणता प्राणी समोर येईल का, कोणता साप विंचु असेल का याची कोणतीच भीती न बाळगता आम्ही दोघांनी खाली उतरायला सुरुवात केली. पहिला टप्पा संपतो न संपतो तोच भली मोठी दरी खाली दिसली.
मी वरच्या कार्यकर्त्यांना मोठ्याने आवाज दिला. दीड हजार फुटाच्या दोऱ्या आमच्या दिशेने घेऊन कोणालातरी पाठवुन द्या. काही वेळातच संदीप जांबळे, सुनिल निलेश बावळेकर हे दोघे त्यांच्यापर्यंत येऊन पोहचले.
डोक्याला लाईटची कॅप असल्यामुळे माझे दोन्ही हात मोकळे होते. दरीतली धोक्याची परिस्थिती समोर आहे का याची कोठेच चिन्ह दिसत नव्हती. तरीही आम्ही आमचे खाली उतरण्याचे काम सुरुच ठेवले…. एक तास वाट काढत त्या आवाजाच्या दिशेने सरकत गेलो. जसजशे आम्ही जवळ जाऊ तसतसे आम्हाला आवाजातील वाक्य समजायला लागली…. हेल्प हेल्प.. बचाव बचाव…. बास पुढे दरीचे तीन टप्पे पुर्ण केल्यावर चौथ्या टप्यात आम्हाला अंधारात पुसटशी गाडी दिसली….आम्ही खुश होतोच पण किती लोक जिवंत असतील आणि किती लोक मृत पावले असतील माहिती नव्हते… तसेच पुढे सरकत होतो. आमच्या कंबरेला बांधलेल्या दोऱ्यांमुळे आम्ही बऱ्यापैकी सुरक्षित होतो.
त्यांच्याजवळ जाण्याचा शेवटचा टप्पा आम्ही पार केला. जशी मी बॅटरी त्यांच्यावर मारली तशी आम्हाला ती दहा वर्षाची चिमुकली दिसली. तिच्या बाजुलाच दोन जण होते.. बॅटरीच्या प्रकाशात त्या मुलीच्या चेहऱ्यातील आनंद खुप काही सांगत होता… तिघांच्याही आनंदाचे डोळ्यातुन आश्रु वाहात होते. दरीतुन किती खाली आलो याचं कोठेच भान मला आणि माझ्या सहका-याला नव्हते, पण त्याच्या डोळ्यातील पाणी पहाताना मात्र खरच आमच्या आनंदात भर पडली होती की आपण त्यांच्याजवळ पोहचलो.

पहिल्यांदा त्या चिमुकलीला बाहेर काढायच असा मी निर्णय घेतला आणि त्या मुलीला घेऊन पुन्हा परतीचा प्रवास पकडला… त्या दोघांना काळजी करु नका आम्ही पुन्हा येतोय असे सांगुन आम्ही सर्वजण तेथुन पुन्हा त्या खडतर वाटेने दरी पार करत वरती चढायला सुरुवात केली. एक तासात वरती आलो. असे एक एक करत यातील चारही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आम्हा ट्रेकर्स ना यश आले.

महबळेश्वरच्या तिन्ही टिम यात पुर्ण सक्रीय झाले होते. प्रत्तेक जण आपापली भुमिका बजावत होता. चार टप्यात चार ठिकाणी कार्यकर्ते हळु हळु पोहचले होते. तर रस्त्यावर खाली सोडलेल्या दोरखंडावर कंट्रोल करण्यात आणि मार्गदर्शन करण्यात सुनिल भाटीया, सुनिल केळगणे, अनिल शिंदे मग्न झाले होते. महाबळेश्वरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंत यांना दुरध्वनीवरुन गाडी ट्रेस झाल्याची माहिती देण्यात आली होती त्यामुळे ते स्वतःच पोलिस गाडी चालवत घटनास्थळी पोहचले होते. नुसते पोहचलेच नाहीत तर रश्शी हातात घेऊन ट्रेकर्सला मदतीत सक्रिय झाले.
सकाळी सहा वाजता ही मोहिम थांबवली होती. कारण सर्वच कार्यकर्ते पुरते दमले होते. या माहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्स ला आनंद झाला होताच कारण ही मोहिम राबवताना जो विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होता तो तसा काहीसा नव्हता. गाडीखाली सर्वजन चिरडले गेले असावेत आणि एक जण जो वाचला असेल त्याने तो मॅसेज पाठला असणार. पण तसं काही नव्हतं. चार जण तरी सुखरुप होते. एवढ्या भयाण परिस्थितीत आणि त्यांच्याकडुन मिळालेली माहिती तर ती त्याहुनही भयाण होती ते म्हणजे ते २८ तास या दरीत मृत्युशी झुंज देत आहेत.

ही शोध मोहिम पार पाडत असताना आम्हाला जो काही अनुभव मिळाला त्यात काही अधिकाऱ्यांच्या भुमिका ह्या पोलिस खात्यालाच नव्हे तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या होत्या. हद्द सांभाळत काम करताना दिसत होते. पोलिसाची आई वडील भाऊ बहिन किंवा त्याचे कोणी जवळचे नातेवाईक असते तर त्यांची भुमिका ही हद्दीप्रमाणेच चालली असती का, हा प्रश्न त्याच अधिकाऱ्यांना विचारला पाहिजे. हीच का मानुसकीची भावना घेऊन हे अधिकारी ही वर्दी घालतात. पोलिस खात्यात येताना दिलेली शपथ कशी काय ते विसरतात. एखादं अख्खं कुटुंब दरीत आहे त्यांना वाचवणं हे मोलाचं होतं की त्यांची हद्द. मग त्यातल्या त्यात त्या महाबळेश्वरच्या पोलिस अधिका-याचे का कौतुक करु नये
त्याची ती हद्द नसताना ती व्यक्ती महाबळेश्वरातुन काही वेळात घटनास्थळी पोहचली होती.
अशी माणुसकी असणारे किती अधिकारी या पोलिस खात्यात आहेत याचा शोध लागणे कठिणच, असंच चित्र या शोध मोहिमेत दिसुन आलं. यातुन एकच दिसल की या मोहिमेत सक्रीय झालेले सुनिल केळगणे, सुनिलबाबा भाटिया, निलेश बावळेकर, सनी बावळेकर, संदिप जांबळे, अनिकेत जांबळे, प्रथमेश जांबळे, सुनिल वाडकर, कृष्णा बावळेकर, रवी झाडे, जयवंत बिरामने, अनिल शिंदे, कुमार केळगणे, महेश पुजारी, ओमकार नाविलकर, अक्षय माने, बाबु वागधरे, समोमनाथ वाघदरे, दिनेश जाडे, मनेश झाडे, निशांत शिंदे, दृवास पाटसुते, महेश माने या सर्व महाबळेश्वर ट्रेकर्स च्या कार्यकर्तांचे भाऊ बहिन अशा नात्यातले होते म्हणुनच ते उपाशी तापाशी या दरित अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात या काळोख्यात थंडीच्या कडाक्यात आपले जीव पणाला लावुन त्या लोकांना बाहेर काढण्यात जीव ओतुन काम करत होते. माणुसकीहीन आणि माणुसकी असलेले पैलु यातुन समोर आले.

-सचिन उतेकर (संपादक)

प्रतिक्रिया

omg एकीकडे काहीही clue नसतांना अफाट काम करणारे ट्रेकर्स, दुसरी कडे हद्द ची पळवाट शोधणारे नादान वर्दीधारी.

दूसर्यांसाठी जीव धोक्यात घालण्यार्या जाॅंबाझ ट्रेकर्स टीम ला प्रणाम
उत्तम टीमवर्क

यशोधरा's picture

31 Dec 2015 - 5:10 pm | यशोधरा

सगळे वाचले ह्याचा आनंद! ट्रेकर्सगणांचे खूप कौतुक.
ज्या पोलिसांनी ह्या ना त्या प्रकारे मदत केली असेल, त्यांचेही कौतुक.

रेवती's picture

31 Dec 2015 - 5:14 pm | रेवती

बापरे! खरे ट्रेकर्स व माणूसकीचे लोक आहेत. सर्वांचे आभार.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

31 Dec 2015 - 5:20 pm | अरवीन्द नरहर जोशि.

अति उत्तम काम केले आहे.

बाय द वे, भौतेक २ व्यक्तींचा मृत्यू झाला, असे वाचले होते. आणि चार जण बचावले होते.

यशोधरा's picture

31 Dec 2015 - 6:10 pm | यशोधरा

ओह. :(

कसल्याही परतीची अपेक्षा न ठेवता ट्रेकर्स नी केलेल्या मदतीमुळे चार जणांचे प्राण वाचले. सलाम त्या ट्रेकर्सना.

अजया's picture

31 Dec 2015 - 6:06 pm | अजया

सलाम.

सलाम! रेस्क्यू ऑप हेच मुळात अवघड काम असते. त्यात अपघाताचे नक्की ठिकाण माहीत नसताना ते अजूनच खडतर बनले.

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सर्व सदस्यांना, त्यांना मदत करणार्‍या इतरांना आणि अपघातग्रस्तांच्या संघर्षाला सलाम!

त्रिवेणी's picture

31 Dec 2015 - 7:12 pm | त्रिवेणी

त्रिवार सलाम सर्व ट्रेकेर्स ला आणि मदत करणाऱ्या खाकी वर्दीला.

त्रिवेणी's picture

31 Dec 2015 - 7:13 pm | त्रिवेणी

त्रिवार सलाम सर्व ट्रेकेर्स ला आणि मदत करणाऱ्या खाकी वर्दीला.

जानु's picture

31 Dec 2015 - 7:16 pm | जानु

ज्यांनी या कार्यात निरपेक्षपणे मदत केली आणि ४ जीव वाचवले त्या सर्वांचे अभिनंदन.

बोका-ए-आझम's picture

31 Dec 2015 - 7:38 pm | बोका-ए-आझम

खरी माणुसकी दाखवून दिली या सगळ्यांनी!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2015 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

अफाट माणुसकी आणि कर्तृत्वाचे दर्शन घडविणार्‍या महाबळेश्वर ट्रेकर्स आणि इतर संबधितांना सलाम !

एक प्रेरणादायक कृती मिपावर प्रसिद्ध केल्याबद्दल बाजीगर यांचे आभार व अभिनंदन !

नाव आडनाव's picture

31 Dec 2015 - 8:00 pm | नाव आडनाव

हे सगळे खरे हिरो. जबरदस्त काम केलंय सगळ्यांनी. कडक सलाम.

चौघांचा जीव वाचवला ही केवढी मोठी कामगिरी आहे!!
राहुल तपासे आणि इतर सर्व ट्रेकर्सना सलाम! __/\__
आणि ही बातमी आवर्जून इथे देणार्‍या बाजीगर यांचेही अनेक आभार.

-रंगा

अनुप ढेरे's picture

31 Dec 2015 - 9:14 pm | अनुप ढेरे

__/\__ सलाम!

गामा पैलवान's picture

31 Dec 2015 - 9:57 pm | गामा पैलवान

बाजीगर,

दुर्गम प्रांती लीलया संचार करणाऱ्या दुर्गवीरांना अभिवादन. सगळे वाचले हे बरे झाले. जावळीचं रान आजही खतरनाक आहे.

पोलादपूर व महाबळेश्वर यांच्यामध्ये आंबेनळी घाट आहे तर पोलादपूर व खेडच्या दरम्यान कशेडी घाट आहे. मात्र पुण्याहून महाबळेश्वरास जातांना/येतांना यांपैकी एकही घाट वाटेत लागत नाही. त्यामुळे कोणत्या घाटात गाडी पडली होती ते नीटसं कळलं नाही.

आ.न.,
-गा.पै.

कविता१९७८'s picture

31 Dec 2015 - 10:04 pm | कविता१९७८

सलाम , ,सलाम , सलाम, आताच चेपुवर फोटो पाहीले

नाखु's picture

1 Jan 2016 - 9:16 am | नाखु

आणि सर्व निस्वार्थी, निरपेक्ष मदतनीस ट्रेकरचे अभिनंदन.

पोलीस खात्यातील चांगल्या नगांचे प्रमाण १० स एक आहे याचा प्रत्यवाय आलेला नाखु.

मार्गी's picture

1 Jan 2016 - 10:20 am | मार्गी

कर्तृत्वाला सलाम! किती तळमळीचं काम! किती मेहनत! बापरे!

आनंदराव's picture

1 Jan 2016 - 10:47 am | आनंदराव

सलाम
केवळ सलाम !

रुस्तम's picture

1 Jan 2016 - 11:01 am | रुस्तम

सलाम

भाग्यश्री कुलकर्णी's picture

1 Jan 2016 - 1:27 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सलाम. _/\_