पराठे, पोळ्या, वडे वगैरे वगैरे

Primary tabs

Mrunalini's picture
Mrunalini in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:41 pm

भरलेल्या ताटात पोळी पुरी भाकरी यातलं काहीतरी हवंच. शिवाय निरनिराळ्या सणांना बनवल्या जाणार्‍या स्पेशल पोळ्या वेगळ्याच. या लेखात भरल्या ताटातली मानाची जागा असणार्‍या या पदार्थांचे काही प्रकार बघू.

१. पालक - कोबी पराठा

साहित्यः

कोबी - दीड कप (किसून)
पालक - १ कप (बारीक चिरून)
बेसन पीठ - ३ चमचे
गव्हाचे पीठ - १ कप
ओवा - १/२ चमचा
आले लसूण पेस्ट - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
तेल - २-३ चमचे
मीठ चवीनुसार
बटर किंवा तूप - भाजण्यासाठी

कॄती:

१. एका बाऊल मध्ये किसलेला कोबी, बारीक चिरलेला पालक घ्यावा. त्यात ओवा, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, बेसन पीठ, तेल व मीठ टाकून मिक्स करावे. हे बाऊल १० मिनिटे झाकून ठेवावे.
२. १० मिनिटांनंतर कोबी व पालकाला मिठामुळे पाणी सुटलेले असेल. ह्या मध्ये बसेल एवढे गव्हाचे पीठ टाकून, घट्ट गोळा मळून घ्यावा.
३. मळलेल्या कणके मधून एक गोळा घेऊन पराठ्याच्या जाडीचा लाटून घ्यावा. हा पराठा तव्यावर चांगला भाजून घ्यावा. भाजताना वरून बटर किंवा तूप लावावे.
४. हे पराठे लोणचे, छुंदा किंवा दह्या सोबत गरम सर्व्ह करावे.

टीप

- मी खाली दिलेल्या फोटो मध्ये जांभळा कोबी वापरला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या जागी साधा कोबी किंवा फ्लॉवर वापरू शकता.

p1

२. लाच पराठा

साहित्यः

मैदा - १ वाटी
बटर - १/२ वाटी
अंडे - १
दूध - १/४ वाटी
मीठ चवीनुसार

कृती:

१०. पराठ्यांसाठी मैदा चाळून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ, १ चमचा बटर, १ फेटलेले अंडे व दूध टाकून त्याची कणीक मळून घ्यावी. १/२ तास ही कणीक झाकून ठेवावी.
११. पोळी साठी जेवढा कणकेचा गोळा घेतो, तेवढा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी.
१२. त्यावर हातानेच पूर्ण पोळीला बटर लावावे व त्यावर थोडा मैदा भुरभुरावा.

p2

१३. आता त्याचा आपण कागदाचा पंखा करतो, त्या प्रमाणे पंखा करून घ्यावा.

p3

१४. ह्या पंख्याचा आता गोल करून घ्यावा व ह्याचा हलक्या हाताने पराठा लाटावा.

p4

p5

१५. तव्यावर नेहमी प्रमाणे पराठा भाजून घ्यावा व शेवटी वरून बटर सोडावे.
१६. गरम पराठा तयार आहे. हा पराठा वाढताना आधी हातात थोडा दाबून घ्यावा. त्यामुळे त्याचे सगळे पदर वेगळे होतात.

p6

३. तिळगुळाच्या पोळ्या

साहित्य :

मैदा - १ कप
गव्हाचे पीठ - १/२ कप
बेसन - ४ चमचे
तांदुळाचे पीठ - ४ चमचे
तीळ - १ कप
किसलेले सुके खोबरे - १/२ कप
गूळ - १ कप
तूप - ४ चमचे
विलयाची पावडर - १/२ चमचा
जायफळ पावडर - १/४ चमचा
मीठ - १ चिमटी

कृती :

१. गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व बेसन एकत्र चाळून घ्यावे. ह्यात २ चमचे तूप गरम करून घालावे व नीट मिक्स करावे. ह्यात थोडे थोडे पाणी टाकून गोळा मळून घ्यावा व झाकून ठेवावा.
२. कढईत तीळ व खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे. त्यानंतर २ चमचे तूप टाकून २ चमचे बेसन खरपूस भाजावे.
३. हे सर्व एका भांड्यात गार करावे. ह्यात १ कप गूळ, विलायची पावडर व जायफळ पावडर टाकावी.
४. हे सारण एकत्र करून एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे. त्यामुळे गूळ नीट बारीक होतो.
५. कणकेतला एक छोटा गोळा घ्यावा. ह्यात पुरणपोळीला जसे सारण भरतो, तसे हे सारण भरून घ्यावे.
६. ह्याची हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. ही पोळी लाटताना ती तांदुळाच्या पिठावर लाटावी. त्यामुळे ती खरपूस भाजली जाते व मस्त कडक होते.
७. पोळी भाजून कागदावर काढून घ्यावी व मग त्यावर तूप लावावे.
९. ही पोळी तशीच किंवा दुधा सोबत किंवा तुपासोबतही छान लागते.

p7

१०. मी फोटो मध्ये तुपासोबत सर्व्ह केली आहे आणि ग्लास मध्ये व्हॅनिला आइसक्रीम सोबत पोळीचे तुकडे करून सर्व्ह केली आहे.

४. मसाला खाकरा

साहित्यः

गव्हाचे पीठ - १ वाटी
हळद - १ चमचा
लाल तिखट - ४ चमचे
पाव-भाजी मसाला - १ चमचा
चाट मसाला - ४ चमचे
कसुरी मेथी - १ चमचा
तूप - ४ चमचे
मीठ - ३ चमचे

कृती:

१. गव्हाच्या पिठामध्ये हळद, २ चमचे लाल तिखट, पावभाजी मसाला, २ चमचे चाट मसाला, कसुरी मेथी, २ चमचे तूप व चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
२. सर्व नीट मिक्स करून झाल्यावर, त्याचे पीठ मळून घ्यावे व १/२ तास झाकून ठेवावे.
३. १/२ तासाने पिठाचे छोटे गोळे करून घ्यावे व त्याच्या पापडा एवढ्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्या.
४. ह्या पोळ्या आधी दोन्ही बाजूने अर्धवट भाजून घ्याव्यात.
५. प्रत्येक पोळी भाजून झाल्यावर ताटलीत काढावी. त्याला थोडे तूप लावावे व वरतुन चाट मसाला भुरभुरावा.
६. अशा प्रकारे सर्व पोळ्या भाजून घ्याव्या व ४-५ तास तशाच ठेवाव्या.
७. ४-५ तासाने १ पोळी घ्यावी. तव्यावर ही पोळी टाकावी. मंद आचेवर ही पोळी फडक्याने दाबत दोन्ही बाजूने कडक होईपर्यंत भाजून घ्यावी.
८. तो पर्यंत एका वाटीत १ चमचा मीठ, २ चमचे लाल तिखट व १ चमचा चाट मसाला मिक्स करून घ्यावा.
९. पोळी कडक झाल्यावर ताटलीत काढावी. त्याला वरतुन तूप लावावे व चाट मसाल्याचे मिश्रण भुरभुरावे.
१०. खाकरे थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे.

p8

p9

५. कोंबडी वडे (मालवणी वडे)

साहित्य

गव्हाचे पीठ - २ वाटी
तांदुळाचे पीठ - १ वाटी
ज्वारीचे पीठ - पाऊण वाटी
बेसन - १/२ वाटी
धणे - १ चमचा
बडीशेप - १ चमचा
जिरे - १/२ चमचा
मेथी - १/२ चमचा
हळद - १ चमचा
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
कोळसा - १

कृती:

१. कढईमध्ये धणे, बडीशेप, जिरे व मेथी भाजून घ्यावी. हे गार झाल्यावर मिक्सर मध्ये एकदम बारीक पूड करून घ्यावी.
२. एका भांड्यामध्ये सर्व पिठे, चवीनुसार मीठ, हळद व बारीक केलेली पूड टाकून एकत्र करून घ्यावे. हे पीठ गरम पाण्याने चपातीच्या कणके प्रमाणे मळून घ्यावे.
३. हे करताना गॅसवर कोळसा गरम करून घ्यावा व २-३ चमचे तेल गरम करून घ्यावे.
४. मळलेल्या पिठामध्ये एक खड्डा करावा. त्यात गरम केलेला कोळसा ठेवावा व त्यावर गरम केलेले तेल ओतावे. लगेच ते पीठाने झाकावे.
५. ही कणीक झाकून रात्रभर किंवा ७-८ तास उबदार जागी ठेवावी.
६. ७-८ तासांनंतर पीठ चांगले फुगून येईल. पीठ परत एकदा थोडा तेलाचा हात लावून मळून घ्यावे.
७. कढईमध्ये तळणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
८. मळलेल्या पिठाचे छोट गोळे करून घ्यावे. एका प्लॅस्टिकच्या पिशवीला तेलाचा हात लावून त्यावर गोळा हाताने थापून घ्यावा.
९. वडा एकदम पातळ किंवा एकदम जाड नको. वडा थापून झाल्यावर त्या मध्ये एक भोक करून घ्यावे.
१०. तेल गरम झाले असल्यास त्यात थापलेला वडा अलगद सोडावा. वडा दोन्ही बाजूने सोनेरी होई पर्यंत तळावा.
११. गरम गरम मालवणी वडे मटणाचा रस्सा किंवा चिकन सोबत सर्व्ह करावा.

p10

६. चिकन खिमा पराठा

साहित्यः

चिकन खिमा - १/२ किलो (चिकनच्या thigh meat चा खिमा केल्यास जास्त चांगले)
मैदा - २ वाट्या
कांदा - १/२ वाटी बारीक चिरलेला
टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरून
दही - ३ चमचे
आले-लसूण पेस्ट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
चाट मसाला - १/२ चमचा
हिरवी मिरची - २ बारीक चिरून
कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरून
मीठ चवीनुसार

कृती:

१. चिकनच्या thigh meat चा मिक्सर मध्ये खिमा करून घ्यावा.
२. मैद्यामध्ये चवीपुरते मीठ, १ चमचा तेल टाकून नीट मिक्स करून घ्यावे. लागेल तसे गार पाणी वापरून त्याची मऊ कणीक मळून झाकून ठेवावी.
३. कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा टाकून १ मिनिट परतून, आले-लसूण पेस्ट घालावी. कांदा गुलाबीसर होई पर्यंत परतून घ्यावे.
४. कांदा परतल्यावर त्यात हिरवी मिरची व टोमॅटो टाकून २-३ मिनिटे परतावे. त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकून मिक्स करावे.
५. मसाल्याचे तेल सुटू लागल्यावर त्यात खिमा व चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
६. खिमा थोडा परतल्यावर त्यात दही टाकावे. आता कढईवर झाकण ठेवून खिमा शिजू द्यावा.
७. ५ मिनिटात खिमा शिजेल. खिमा पूर्ण सुका होई पर्यंत परतून घ्यावा. सगळ्यात शेवटी त्यात चाट मसाला व कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा. आता हे पराठ्या साठी सारण तयार आहे.
८. भिजवलेल्या कणकेतून एक छोटा गोळा घ्यावा. त्याची छोटी पुरी लाटून घ्यावी. त्याच्या मधोमध हे गार केलेले खिम्याचे सारण भरून पुरी बंद करावी.
९. ह्याचा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा.
१०. तव्यावर हा पराठा दोन्ही बाजूंनी, बटर लावून मस्त भाजून घ्यावा.
११. गरमा-गरम पराठा खायला तयार आहे.

p11

टिपा

१. ह्या पराठ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारे सारण भरू शकतो.
२. एक पोळी लाटून, त्यावर सगळीकडे सारण भरायचे व वर दुसरी पोळी ठेवून, कडा बंद करून भाजायचे.
३. मैद्याची एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची. त्याच्या मधोमध चौकोनात सारण भरायचे व चारी बाजूने उरलेली पोळी आत दुमडायची. हलक्या हाताने थोडेसे लाटून पराठा भाजून घ्यावा.
४. ह्याच सारणात एक अंडे फेटून, मिक्स करून पराठ्यामध्ये भरले तरी मस्त लागते. पण मग त्यासाठी आधी पातळ लाटलेली पोळी तव्यावर ठेवून, त्यात सारण भरायचे व बाजूची उरलेली पोळी आत दुमडायची.

७. बाजरीची भाकरी

साहित्यः

बाजरीचे पीठ - १ वाटी
गरम पाणी लागेल तसे
तीळ - १ चमचा
मीठ चवीनुसार

कृती:

१. बाजरीचे पीठ चाळून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करावे.
२. ह्यात पीठ भिजेल इतके गरम पाणी टाकून, पीठ चांगले मळून घ्यावे.
३. पिठातील छोटा गोळा घेऊन, त्याची भाकरी थापून घ्यावी.
४. भाकरी थापल्यावर त्यावर थोडे तीळ टाकून, हलक्या हाताने किंवा एकदा लाटणे फिरवून त्यावर बसवून घ्यावे.

p12

५. गरम तव्यावर नेहमी प्रमाणे भाकरी भाजून घ्यावी.
६. तयार झालेल्या भाकरीवर तूप लावून, गरमा गरम लाल मांस सोबत सर्व्ह करावे.

टिपा

१. बाजरीचे पीठ हे फ्रेश दळून आणलेलेच असावे.
२. पीठ जर जुने असेल तर, भाकरी नीट थापता येत नाहीत व तसेच त्यांची चव कडू लागते.
३. पीठ भिजवताना चांगले गरम केलेले पाणी वापरावे, म्हणजे भाकरी नीट थापली जाते.

p13

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 12:49 pm | पैसा

छान कलेक्शन दिलंस! माहीत नसलेले काही प्रकार आहेत ते नक्की करून बघेन. आणि फोटो नेहमीप्रमाणेच कातिल!!

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 3:10 pm | प्रीत-मोहर

असेच म्हणते!!!

एक से एक फोटोज !! एक एक करुन सगळे व्हेज प्रकार करुन बघेन.

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 3:55 am | सानिकास्वप्निल

चविष्ट, लाजवाब आहेत सगळेच प्रकार.
सगळे फोटो कातिल आहेत मृ, शेवटचा तर काय च्या काय जबरी आलाय.
इतके रुचकर प्रकार दिल्याबद्दल धन्यवाद, नक्की करुन बघणार :)

ऊगाच उघडला धागा.लच्छा पराथा,भाकरि,खाकरा सगळेच फोटो मस्त.

अजया's picture

17 Oct 2015 - 6:26 pm | अजया

काय ती भाकरी आणि पराठा दिसताहेत! सुगरण खरीच!

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 9:56 pm | सामान्य वाचक

सगळेच फोटो आणि पाककृती सुपर्ब

गिरकी's picture

19 Oct 2015 - 10:04 am | गिरकी

केवढे ते प्रकार ! मस्त !

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 12:27 pm | मांत्रिक

काय एकसे एक खतरा रेसिपीज दिलेल्या आहेत! लाच पराठा, कोंबडी वडे विशेष आवडले. फोटो तर लाजवाब!

जिभेच्या मनावर अत्याचार झालाय....:)

काय हे फोटो ! खलासच.

बाकी लाच पराठा की लच्छा पराठा? मी लच्छा ऐकलंय.
कीमा पराठा लाजवाब दिसतोय.
अन ते कोंबडी वडे...
शॅ! फारच म्हणजे विचलित करून गेले ते फोटो..

नूतन सावंत's picture

20 Oct 2015 - 10:16 pm | नूतन सावंत

मृ,वा!चिकन खिमा पराठा आणि लच्छा पराठा झकासच.

काय तो चिकन खिमा पराठा आणि काय ते कोंबडी वडे...आईआई ग्ग्ग्ग..तोंपासु...
त्यात ते फोटो इतके अप्रतिम फोटो...आह्हा!!

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2015 - 11:56 am | पिलीयन रायडर

जेवणाच्या वेळेला असले लेख वाचु नये अशी बेसिक अक्कल असु नये का मला???

अगं फोटो आहेत की गम्मत?? कधी येऊ जेवायला...?
काय त्या भाकर्‍या झाल्यात.. सुगरण आहेस एकदम!

सगळ्यांचे धन्यवाद. हो तो लच्छा पराठा आहे. बहुतेक टाईप करतान चुक झालीये.
संपाद्क प्लीज हि चुक सुधाराल का?

अगदी कहर आहे एकसे एक फोटो आणि पदार्थ !!!

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 1:50 pm | बोका-ए-आझम

बरोब्बर सात पाकृ आहेत. दररोज एक अशी खायला हरकत नाही.

मधुरा देशपांडे's picture

25 Oct 2015 - 2:12 am | मधुरा देशपांडे

अप्रतिम फोटो आणि सादरीकरण. आजच स्वातीताईकडे कोंबडीवडे खाल्ले यातले. खाकरा, इतके विविध पराठे जे मी फक्त हॉटेलातच खाल्लेत ते असे पदर्थ तु घरी करतेस याचे खूप कौतुक वाटते.

आरोही's picture

25 Oct 2015 - 12:22 pm | आरोही

सहीच मृ !! एकसे एक पदार्थ ..नक्की करणार ..फोटो मस्त !!

पालक व कोबीचा पराठा फार आवडला. पांढरा कोबी तर आणला जातोच पण मुद्दाम जांभळा कोबी आणून हा पराठा करणार.

आज नाश्त्याला लच्छा पराठा !!!:)

सर्वच फोटु तोंपासु आलेत!

स्वाती दिनेश's picture

26 Oct 2015 - 5:38 pm | स्वाती दिनेश

सग्गळे फोटो तोंपासु आहेत.
मस्तच !
(काही प्रकार खूप दिवसात केले गेले नाहीत ह्याचा साक्षात्कार करून दिलात मृ देवी..)
स्वाती

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:18 pm | कविता१९७८

वाह , मस्तच गं, काय एकेक प्रकार आहेत, हा लाच पराठा दिलाय तो , मास्टरशेफ इंडीया च्या पहील्या एपिसोड मधे अक्षय कुमारने सगळ्या कंटेस्टंटना एकदा दाखवला होता आणि ते पाहुन बाकीच्यांनी जश्याच्या तसा बनवायचा होता. तेव्हा कळाले होते पराठ्याचा शेप असाही असतो.

Maharani's picture

2 Nov 2015 - 5:02 pm | Maharani

खुपच मस्त..वाह वाह

दीपा माने's picture

2 Nov 2015 - 8:44 pm | दीपा माने

अप्रतिम आणि चविष्ट पाकृ आहेत. जांभळ्या कोबीचे पराठे आणि कोंबडी वडे नक्कीच करणार आहे. तुमच्या कोकणी पध्दतीच्या मस्याहारी पाकृही लिहीत रहा.

कोबी व पालकाचे पराठे आज केले होते. फारच आवडले. धन्यवाद.