दि केक आर्टिस्ट

Primary tabs

उमा @ मिपा's picture
उमा @ मिपा in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:29 pm

व्यवसाय उभा करायचा म्हणजे भरपूर भांडवल, विशेष प्रशिक्षण, वेगळे मनुष्यबळ या गोष्टी हव्यात ही समजूत बाजूला सारत अंगभूत कलागुणांचा उपयोग करून घेत, इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर यशस्वी घरगुती व्यवसाय उभारला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे, वृषाली विनोद.

ग्राहकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्सचे केक बनवून देण्याचं काम वृषाली करते. हा तिने स्वतः सुरु केलेला घरगुती व्यवसाय आहे. वृषालीने बनवलेला केक म्हणजे अगदी बघत रहावा असा, एखाद्या पार्टीत तिने बनवलेला केक आणला गेला की, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण कितीतरी वेळ त्या केकच्या डिझाईनची, त्यातील बारकाव्यांची वाहवा करत राहणार हे पक्कं ठरलेलं असतं. तिने बनवलेल्या वेगवेगळ्या केक्सचे फोटोज पाहून याची खात्री पटते.

.

.

.

.

.

केक म्हणजे घरातील जवळपास सर्वांचं आवडतं डेझर्ट, त्यामुळे त्याचा स्वाद उत्कृष्ट असलाच पाहिजे. वृषालीने बनवलेला केक जिभेवर ठेवताक्षणी त्याचा स्वाद, ताजेपणा थेट तुमच्या मनापर्यंत जाऊन पोहोचतो. इतका मऊ, लुसलुशीत केक की, अक्षरशः जिभेवर विरघळतो.

उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरीनेच मुळच्याच मृदू, संयत, विचारी स्वभावामुळे, ग्राहकांना दिलेली कमिटमेंट पाळून, दर्जेदार केक्स तयार करण्यासाठी ती घेत असलेल्या मेहनतीमुळे वृषालीच्या द केक स्टोरीचा खास ग्राहकवर्ग तयार झाला आहे व दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.

द केक आर्टीस्ट वृषालीसोबत केलेली ही बातचीत

तुझी कौटुंबिक, शैक्षणिक पार्श्वभूमी काय ?

मी सोमैय्यामधून बीएमएम केलं पण त्या क्षेत्रातलं वातावरण तितकसं झेपणार नाही असं वाटून सोमैय्यामधेच पोस्ट ग्रॅजुएशन करताना रिटेल मॅनेजमेंट निवडलं. कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत पॅन्टलून्समध्ये नोकरी मिळाली. तिथे फ्लोअर मॅनेजर म्हणून काम केलं. त्यानंतर त्यावेळी नवीन आलेल्या रिलायंस रिटेलमध्ये नोकरी मिळाली, तिथे तर कंपनी नवीन, सगळं सेटअप नवीन असल्याने कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळाला.

याच दरम्यान माझं लग्न झालं आणि काही महिन्यातच नवऱ्याला युकेला जायची संधी मिळाली, मी नोकरी सोडून त्याच्यासोबत जायचा निर्णय घेतला. सकाळी आठ ते रात्री कितीही (कारण रिटेल क्षेत्र) अशी नोकरी करणारी स्मार्ट करियर वुमन आता पूर्ण वेळ गृहिणी म्हणून सज्ज झाले. युकेला गेल्यावर काही महिन्यातच गोड बातमी समजली. वेगळा देश, वेगळं हवामान आणि पहिलं गरोदरपण. तेवढ्यात परतीच्या प्रवासाची वेळ आली, इथे येऊन सगळी घडी पुन्हा बसवायची, त्यात बाळाचा जन्म. जरा आजूबाजूला बघायला फुरसत नाही.

तरीही मनातल्या मनात कुठेतरी रिकामेपण जाणवत होतं, आधीच्या नोकरीमुळे काम करायची सवय लागलेली, पण करायचं काय आणि कसं ते समजत नव्हतं. एकत्र कुटुंब, लहान बाळ अशात रिटेलसारख्या क्षेत्रात काम करायचं, तिथे घड्याळ पाहून काम करता येत नाही, रविवार सुट्टीचा दिवस नाही, सण म्हणजे कामाचा डोंगर, कशी करणार नोकरी? मानसिक, शारीरिक घालमेल! पीजी डिग्री आहे, अनुभव आहे तरी पाय लहानग्या लेकीत आणि घरच्या जबाबदाऱ्यात अडकलेला.

रिटेल मॅनेजमेंट, नोकरी, पूर्णवेळ गृहिणीपद, लहान मुलगी...मग केक मेकींगकडे कशी वळलीस?

आमच्या कॉम्प्लेक्समधली एक मैत्रीण – रत्ना देशपांडे घरी केक बनवायची, दरवेळी पॉटलक पार्टीला तिच्या हातचे छान छान केक्स पाहून, तिने आम्हाला केक बनवायला शिकवावं म्हणून आम्ही आग्रह करायचो. एक दिवस ती तयार झाली शिकवायला. त्यावेळी तिने केकचे दोन बेसिक प्रकार शिकवले. बहुतेक त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की इसमें कुछ बात है. तिने अजून काही प्रकार शिकवावेत म्हणून मी तिला सतत सांगायचे, ती म्हणायची, जे शिकवलं ते केकचं बेसिक ज्ञान आहे, त्यानुसार आता तू स्वतः अजून प्रकार करून बघ. ते संपूर्ण वर्षभर कोणताही प्रसंग असला की, मी केक बनवून न्यायची, त्यावेळी ब्लॅक फॉरेस्ट आणि पाईनॅपल हे दोनच प्रकार येत होते, पण केक करायचा उत्साह दांडगा होता. बरं ज्यांनी ज्यांनी हे केक्स खाल्ले त्यांनी तारीफ केली, हा घरच्यासारखा केक वाटत नाही, अगदी बाहेरून विकत आणल्यासारखा वाटतोय असं कौतुक व्हायचं, त्यामुळे हे जमतंय, अजून चांगलं करू शकतो हा आत्मविश्वास मिळाला.

व्यवसाय करावा असं ठरवलं होतंस का, द केक स्टोरीचा प्रवास कसा सुरु झाला?

व्यवसाय करावा असं मुद्दाम काही ठरवलं नव्हतं, पण या कामाची खूप आवड निर्माण झाली होती, त्यासाठी अभ्यास करण्याची, मेहनत करण्याची तयारी होती. त्यामुळे आवडीचं रुपांतर व्यवसायात होत गेलं.

एकेदिवशी एका मित्राने सांगितलं, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, इतका छान, घरगुती बनवलेला म्हणजे अगदी फ्रेश केक मिळाला तर बेस्ट होईल, तर तूच बनव केक. ही मला मिळालेली पहिली ऑर्डर. हुरूप वाढला, दोन प्रकार तर चांगलेच येतात आता नवीन काहीतरी करूया असं सारखं वाटू लागलं. पण शिकवणार कोण? आणि मनात शिकण्याची प्रबळ इच्छा असेल तर थांबवणार कोण?

सुरु झाली धडपड, इंटरनेटवर शोध, दुकानांमध्ये जाऊन चौकशी कर. माझ्या सासुबाईंचा वाढदिवस होता आणि मी ठरवलं, आता काहीतरी वेगळं बनवायचंच, स्ट्रॉबेरी केक बनवू. कसा बनवायचा, काय वापरायचं माहिती नाही. इंटरनेटवर दिसणारं साहित्य इकडच्या कोणत्या दुकानात मिळेल माहिती नाही, मग थेट केकचं दुकान गाठलं, त्यांना विचारलं, तुम्ही काय वापरता, कसं वापरता? उत्तर मिळालं, स्ट्रॉबेरी पल्प. एवढंच. मग तो पल्प घेऊन घरी आले, डोकं लढवून केक तयार केला, सजावट म्हणून मॅप्रो सिरपचा वापर केला. केक तर छान झाला होता. फिनिशिंगचं काम सुरु होतं, लेक तेव्हा अगदी लहान होती, आई काही करतेय म्हटल्यावर मध्ये यायचं हा तर बाळांचा हक्कच. सजावटीवर शेवटचा हात फिरवताना धक्का लागून सिरपची वाटी केकवर पडली. सगळी मेहनत वाया गेली म्हणून डोक्याला हात लावला. पण मग लगेच निर्णय घेतला, शांत राहायचं दोन मिनिटं, हळूच वाटी वरच्यावर उचलली, जिथे वाटी पडल्याने खड्डा पडल्यासारखा झाला होता, तिथे क्रिमने नक्षी तयार केली. घरच्यांना मी सांगेपर्यंत समजलं नाही की असं काही झालं होतं.

या प्रसंगाने मला एक गोष्ट शिकवली की केकच्या बाबतीत अगदी शेवटच्या क्षणीदेखील काहीही होऊ शकतं, अशावेळी चिडून, निराश होऊन उपयोगाचं नाही तर डोकं शांत ठेवून कल्पकता पणाला लावायची आणि त्यातूनही काहीतरी सुंदरच घडवायचं. आता ठरवलं की, मागे वळायचं नाही, हेच करायचं.

स्वयंशिक्षण सुरूच होतं, ते अजून वाढवलं, केकबद्दल वाचन, इंटरनेट, वेगवेगळ्या ठिकाणचे केक्स खाणं, इतर लोक केक खाताना मस्त मजा घेत खातात तर मी प्रत्येक घास तोंडात घोळवत विचार करायचे की यात नेमकं काय चांगलं लागतंय आणि का, काही चांगलं नसेल तर ते काय आणि का. अशाप्रकारे हळुहळू अजून चार-पाच वेगवेगळे फ्लेवर्स बनवू लागले. कोणी विचारलं, तुला काय येतं? तर मला पाच प्रकारचे केक येतात हे उत्तर ठरलेलं असायचं.

पण मग अशी एक स्टेज आली की, मला हे सगळं पूर्णपणे सोडून द्यावं लागलं. नवऱ्याला ऑफिसच्या कामासाठी सिंगापूरला जावं लागलं, इकडचं सगळं माझ्या एकटीवरच, त्यात पुन्हा बाबा घरात नसल्याने लेक सतत नाराज असायची, अशा परिस्थितीत इतर काही करणं अशक्य बनलं. घर, मूल सांभाळून जेव्हा अशाप्रकारचं कल्पक, सर्जनशील काम करायचं असेल तर घरून पाठींबा मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि नवऱ्याकडून मला तो पाठींबा नेहमीच मिळत असतो. पण आता तोच इथे नव्हता तर सहा महिने सगळं थांबवावं लागलं.

एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही मनापासून करता तेव्हा नशीबही साथ देतंच, माझ्याबाबतीत तेच घडलं. सहा महिन्यांनी नवरा परत यायचा दिवस जवळ येत होता आणि तेवढ्यात एका बाईंनी मला विचारलं, केक बनवून देशील का? त्यांच्या मुलीच्या शाळेत वाढदिवसाला घरी बनवलेलाच पदार्थ न्यायचा होता आणि इथून माझ्याकडच्या केकच्या ऑर्डर्सचा सिलसिला पुन्हा सुरु झाला. काही दिवसात नवराही परत आला, मग तर केकचा अभ्यास करणं, वेगवेगळे केक्स बनवणं हेही सुरु झालं.

खूप वाटायचं, आपणही एखादा मोठा क्लास जॉईन करूया, पण तेव्हा ऑर्डर्स फार कमी असायच्या, महिन्याला पाच किंवा सहा, त्याही फक्त मैत्रिणींच्या. केक्सचे क्लासेस महागडे, त्यासाठी लांबवर प्रवास करून जावं लागणार, वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करणं योग्य आहे का ते कळत नव्हतं. याकाळात काही मैत्रिणींनी, नवऱ्याने भरपूर प्रोत्साहन दिलं, एक मैत्रीण तर महिन्यातून दोन - तीन वेळा केक्स घ्यायची, मला समजत होतं की, केक करण्याचा माझा उत्साह टिकून रहावा म्हणून केला जाणारा हा प्रयत्न आहे. मग मीदेखील तिच्यासाठी प्रत्येक केक वेगळा, नवीन, अनोखा कसा होईल याकडे लक्ष दिलं.

जानेवारी २०१२ मध्ये हे सुरु झालं. बरं, मैत्रिणींना केक्स आवडताहेत, ऑर्डर्स पुन्हा पुन्हा येताहेत म्हणून बाहेरच्या इतर लोकांना ते आवडतीलच असं गृहीत धरून चालणं बरोबर नाही हेही समजत होतं. आमच्या भागात मॉन्जीनीस, ribbons and balloons ची स्टोर्स आहेत, त्यामुळे लोकांना तेही केक्स सहजासहजी मिळतात, मग आपले केक्स लोकांनी घ्यावेत, त्यांना ते आवडावेत, एकाच व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा ऑर्डर यावी यासाठी काय करावं लागेल याचा अभ्यास करायला सुरुवात केली. एका बाजूला तीन - साडेतीन वर्षांची मुलगी, घर आणि दुसरीकडे स्वतः अभ्यास करून, शोधून नवीन काहीतरी बनवायचं, लोकांना ते आवडेल कसं हे पहायचं अशी कसरत सुरु झाली.

थीम केक ही तुझी खासियत आहे, त्याची सुरुवात कशी झाली, त्यातले काही किस्से सांग.

मार्च २०१२ मध्ये एका मैत्रिणीने सांगितलं, मुलीच्या वाढदिवसासाठी तूच केक बनवून दे पण यावेळी काहीतरी अनोखं डिझाईन बनव, बाहुली बनव. मला तर माहिती नव्हतं, बाहुली कशी बनवायची, इंटरनेटवर पाहिलं, त्यात त्यांनी जी टूल्स आणि साचे वापरले होते ते माझ्याकडे नव्हते, मग ठरवलं स्वतःचं डोकं लढवायचं, आधी सराव करायचा, म्हणून एक आठवडा आधी स्वतःच्या विचाराने दोन किलोचा बाहुली थीम केक बनवला, उत्तम जमला, सगळ्या मैत्रिणींना घरी बोलावलं, सगळ्यांना केक सजावट, स्वाद खूप आवडला. त्यानंतर वाढदिवसासाठी बाहुली केक बनवणं सोपं गेलं, शिवाय माझी स्वतःची खास पद्धत वापरलेली असल्याने तो अनोखा बनला हे विशेष.

.

त्यानंतर एक डोरेमॉन केकची ऑर्डर आली, ती पण मैत्रिणीकडून. तिने सांगितलं तू कसाही बनव. मैत्रिणी इतकं स्वातंत्र्य द्यायच्या, कोणी कधी अस्सच तस्सच म्हटलं नाही. पण मला वाटायचं, यांना बाहेर इतके पर्याय असताना या आपल्यावर विश्वास ठेवतात, आपण त्याचं चीज करायला पाहिजे. त्यांना संपूर्ण समाधान देणारा केक मिळाला पाहिजे. त्यावेळी माझ्याकडे लहान ओवन होता, मोठ्या केकसाठी दोन तीन वेळा बेकिंग करावं लागायचं. डोरेमोनची चांगली पोझ निवडून चित्र काढलं, त्यानुसार केक डिझाईन करायला सुरुवात केली. मे महिना होता, प्रचंड गरम होत होतं, केक विस्कटून जाऊ नये म्हणून एसी लावून त्याचं डिझाईन सुरु केलं, मधेच काही झालं आणि डिझाईन जमेना,
नवऱ्याला दाखवलं, तो म्हणाला हा डोरेमोन दिसत नाहीये, मी बाहेर जाऊन येतो, नाहीच जमलं तर मला फोन कर. मी शोधेन, कुठे डोरेमोनचा केक मिळतो का. आपण तुझ्या मैत्रिणीला खरं काय ते सांगू, पण असा विचित्र डिझाईनचा केक द्यायचा नाही. तो गेल्यानंतर मी डोकं शांत केलं, डिझाईनवर पुन्हा पहिल्यापासून विचार केला आणि मन एकाग्र करून एका वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. अखेरीस संध्याकाळपर्यंत अथक प्रयत्नांनंतर डोरेमोन केक तयार झाला. नवरा परत आला तर तो खुश झाला, म्हणे, i can't believe it is the same cake.

.

जून २०१२ मध्ये मी अजून थोडा advansed थीम केक बनवला, मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस होता आणि तिने सांगितलं, बाईक थीम केक बनव. त्यासाठी उपलब्ध बाइक्सची चित्रं न वापरता मी स्वतः बाईक डिझाईन केली, त्यानुसार केक बनवला.

.

द केक स्टोरीचं वेबपेज, फेसबूक पेज आहे, त्याबद्दल सांग.

माझ्याकडे येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या सतत वाढत होती, मी बनवलेले केक्स अनोखे असतात, कधीही न पाहिलेल्या, थीम्स असतात, शिवाय केक स्वादिष्ट असतात अशी ख्याती पसरू लागली. लोक येउन विचारायचे, तुम्ही कोणकोणते केक्स बनवलेत? मग मोबाईलवर फोटो दाखवावे लागायचे, त्यासाठी लोकांना माझ्याकडे किंवा मला त्यांच्याकडे जावं लागायचं, केक बनवण्याच्या कामातून या मीटींग्जसाठी वेगळा वेळ काढणं हे काही नीट जमेना. लोकांना घर बसल्या मी बनवलेले केक्स पाहता यावेत म्हणून नवऱ्याने आणि मी मिळून एक वेबपेज बनवलं www.thecakestory.co.in, त्यानंतर फेसबूक पेज facebook.com/thecakestorybyvrushali बनवलं. या दोन्हीही ठिकाणी केक्सचे फोटोज् आहेत व तिथून माझ्याशी संपर्क साधता येऊ शकतो.

द केक स्टोरीचं वेबपेज अतिशय साधं, सुबक आहे. अलंकारीक शब्दांमध्ये केलेलं वर्णन नाही, नक्षीदार डिझाईन नाही, पण याठिकाणी असलेले, वृषालीने बनवलेल्या केक्सचे फोटो तिच्या कलेची ओळख पटवून देतात.

आजच्या घडीला तू दिवसभर बिझी असतेस, काम इतकं वाढेल असं वाटलं होतं?

त्यावेळी कल्पनाही केली नव्हती की हे किती प्रमाणात वाढेल, म्हणजे माझे वडील एकदा म्हणालेही होते की, केक कोणी रोज रोज खात नाही, अशा कितीशा ऑर्डर्स मिळणार. मी नाऊमेद व्हावं असा त्यांचा उद्देश नक्कीच नव्हता. तेच काय, मी स्वतःदेखील साशंक होते. एक नक्की होतं, मेहनत करायला मागेपुढे पहायचं नाही, प्रत्येक केक अतिशय मन लावून तयार करायचा, कोणतीही हयगय करायची नाही. हळूहळू असं व्हायला लागलं की, एका घरात केक करून दिला की, त्यांच्या ओळखीच्या अजून पाच सहा लोकांकडून ऑर्डर यायच्या. सगळ्यात आधी घरचे, त्यानंतर मैत्रिणी, मग मैत्रिणींच्या मैत्रिणी, आणि नंतर तर मी ओळखतही नाही अशा लोकांकडून फोन यायला लागले, अमुक ठिकाणी तुम्ही बनवलेला केक खाल्ला होता, आम्हालाही तसाच हवाय.

आता तर, सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही, सतत बेकिंग, डिझाईनिंग सुरूच असतं. ऑर्डर हातात नाही असा एक दिवस जात नाही. सकाळी सहा वाजता काम सुरु होतं ते रात्रीपर्यंत सुरुच असतं, अजूनतरी मी घरातूनच काम करतेय, त्यामुळे मध्येच घरची कामं, मुलीला वेळ देणं, हेही असतंच. निवांत असा वेळ मिळणं खूप दुर्मिळ आहे. बरं, केक एकसारखे नाहीत, प्रत्येक केक वेगवेगळा. त्यामुळे प्रत्येक वेळी हात, डोकं दोन्हींना प्रचंड काम.

बऱ्याचदा इतके केक्सचे फोटो पाहिल्यानंतरही लोक विचारतात की अजून काय वेगळं करू शकशील? त्यामुळे मला सतत अभ्यासदेखील करत रहावा लागतो. पण मला या सगळ्यातून आनंद मिळतो, स्फूर्ती मिळते.

फॉन्डन्ट केक्सची सुरुवात कशी केलीस?

क्रीम वापरुन एका मर्यादेपर्यंत काम करता येतं. टुडी केक मी बनवत होतेच, थ्रीडी केक्ससाठी लोक विचारायला लागले, मग पुन्हा वाटू लागलं एखादा कोर्स करावा, शोध घेतला तर एक चांगला कोर्स होता पण त्याची फ़ी ५००००. नवरा म्हणे, जा तू, कर हा कोर्स. पण माझं मन मानेना. मध्यमवर्गीय घरातून आलेली मी, मला वाटे, नवरा आधीच इतकी मदत करतोय, आणखी त्याला एवढे पैसे द्यायला लावायचे, उद्या काही कारणाने हे सगळं बंद करावं लागलं तर, पैसे वाया. कोर्स कोर्स करत राहण्यापेक्षा काहीतरी उपाय शोधू. पुन्हा अभ्यास सुरु, बाजारात कोणते नवीन केक्स येतायत, सर्जनशीलतेला वाव देणारं नवीन काय आहे, मग फॉन्डन्ट केकची माहिती मिळाली, ते वाचून त्यावर प्रयोग सुरु झाले, दरम्यानच्या काळात दादरला सेठी (32 degree studio) यांनी एक कोर्स सुरु केला. अतिशय माफक फ़ी व दोन दिवसाचा कोर्स म्हणून मी तिकडे गेले. दोन दिवसात सगळं शिकता येणार नाही हे मला माहिती होतं, पण बेसिक टेक्निक समजतं, त्यानुसार आपल्या अभ्यासाची दिशा नक्की करता येते.

रोजच्या येणाऱ्या ऑर्डर्समध्ये छोटे छोटे फॉन्डन्टचे आर्टीकल्स करायला सुरुवात केली. हा नवीन प्रकार लोकांना आवडला. क्रिमवर फॉन्डन्ट राहील की नाही हे समजत नव्हतं, मग त्यासाठी वेगळी कल्पना लढवली आणि ते यशस्वी झालं. संपूर्ण फॉन्डन्टचे केक्स आपल्याकडे कोणाला फारसे आवडत नाहीत कारण ते खूप गोड असतात, मग मी क्रीम केक व त्यावर फॉन्डन्ट accessories असं बनवायला सुरुवात केली, हे केक हिट होऊ लागले. अशाप्रकारे सर्वात सुरुवातीचा एक क्लास, ज्यामध्ये केक बनवायला शिकले आणि त्यानंतर दुसरा ज्यामध्ये फॉन्डन्टचं काम शिकले, या दोन क्लासवर सगळं सुरळीत सुरु आहे.

.

अर्थात वृषालीने दोन क्लासेसना श्रेय दिलेलं असलं तरी तिच्या आजच्या यशामध्ये सर्वात मोठे योगदान ती करत असलेला स्वयंअभ्यास, तिचं हस्तकौशल्य, सचोटी, मेहनत यांचे आहे.

तू बनवलेला प्रत्येक केक छानच असतो यामागचं रहस्य काय?

माझा स्वभाव. मला सवयच आहे की, मी जे काम करेन ते उत्तम असावं यासाठी मी प्रयत्न करते. केकच्या बाबतीत म्हणशील तर आजवरचा एकही केक मी रिसर्च न करता केलेला नाही. चवीच्या बाबतीत मी माझ्या केकच्या चवीचा एक मापदंड ठरवलेला आहे, माझा प्रत्येक केक त्यानुसारच बनवला जातो, त्यात तडजोड नाही. म्हणजे मी काही साहित्य घेताना ते मापाने घेते असं नाही, पण दर्जेदार साहित्य असावं, स्वच्छता असावी. मला जशी ऑर्डर येते त्यानुसार मी केक बेक करते, त्यामुळे तो ताजा असतो.

स्वच्छतेच्या बाबतीत मी अतिशय काटेकोर आहे, एकदा चॉकलेटच्या खोक्यात मुंग्या दिसल्या, मी तो संपूर्ण बॉक्स बाजूला केला, माझ्या मुलीला किंवा घरातल्या कोणालाही मी अशी मुंग्या लागलेली चॉकलेटस् खाऊ देईन का? नाही, तर इतर कोणाच्याही केकसाठी मी त्याचा वापर करणार नाही. प्रत्येक केक, त्याची सजावट मी स्वतः एकहाती करते, त्यामुळे त्यामध्ये स्वच्छता, दर्जा या गोष्टी पुरेपूर पाळता येतात.

केक बनवताना I think, I feel and then create it. केक बनवत असताना त्या संपूर्ण प्रक्रियेतून मला संपूर्ण समाधान मिळालं पाहिजे हे मी पाहते.

गेल्या बऱ्याच महिन्यांच्या अनुभवातून मी कितीतरी वेगळ्या गोष्टींचा वापर करु लागलेय, ज्यामुळे केकचं अनोखेपण वाढतं. उदाहरणार्थ, फिनिशिंगसाठी यूट्यूबवरुन शिकल्याप्रमाणे मी पॅलेट नाईफचा वापर करायचे, पण तरीही कुठेतरी एखादी रेष राहून जायची, ती मला सतत खटकायची. चॉकलेट स्क्रेपर आणून तो वापरुन पाहिला, तरी समाधान होईना. बरीच शोधाशोध केल्यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये ज्या प्लॅस्टीक शीटस् वापरतात त्यांचा उपयोग करता येईल असं समजलं. त्यांचे चौकोनी, आयताकृती तुकडे कापून त्याने एका विशिष्ट तंत्राने फिनिशिंग करु लागले, ती परफेक्ट होऊ लागलं.

दरवेळी काहीतरी नवीन घडवावं अशी माझी खूप इच्छा असते आणि मी ते करतेच. थीम केक असो किंवा साधा केक असो, त्यात काहीतरी नवीन करुन माझा टच देण्याचा प्रयत्न असतो. बरं त्यासाठी फार मोठं काही करावं लागत नाही, साधा केक असेल तर एखादं छानसं फुल, स्टार्स किंवा थीम केक असेल तर कॅरॅक्टर्सच्या चेहऱ्यावरचे भाव, थीमनुसार एखादी वस्तू असं तुम्ही करु शकता.

तू बनवलेला केक तोंडात अक्षरशः विरघळतो, हे कसं जमवतेस?

केकची चव चांगली असावी, तो मऊसूत असावा यासाठी नेहमी लक्षात ठेवावं की, बेकींग मध्यम तापमानाला झालं पाहिजे. आजकाल खूप जण मायक्रोवेवमध्ये बेकींग करतात, पण त्याची पॉवर खूप जास्त असते. बेकींग उत्तम व्हावं असं वाटत असेल तर ओटीजी किंवा गॅसचा वापर करावा. तापमान १५०, १६० च्या पुढे जाऊ देऊ नये, मग त्यासाठी अर्ध्या तासाऐवजी पाऊण तास लागला तरी चालेल. बेकींग करताना केकमधील आर्द्रता टिकून रहायला हवी.

केक बेक झाल्यावर त्यात शुगर सिरप घालावे. केक गरम असताना मऊ असतो, जसजसा तो थंड होतो, त्यातील मऊपणा कमी होतो. त्यासाठी त्यात फ्लेवरनुसार लिक्वीड किंवा शुगर सिरप घालावे. केकमध्ये जर आर्द्रता पुरेशा प्रमाणात नसेल तर त्यावर क्रीम लावल्यावर क्रीममधील आर्द्रता केक शोषून घेईल व क्रीम सुकं वाटेल, केकचा स्वाद बिघडेल. म्हणूनच केकला इतक्या प्रमाणात मॉयश्चर द्यायचंय की, तो क्रीममधील मॉयश्चर शोषून घेणार नाही.

फॉन्डन्टचे केक खूप आकर्षक असतात, ते करतानाच्या खास टिप्स सांग.

पूर्णपणे फॉन्डन्टने झाकलेला केक करायचा असेल तर शुगर सिरप वापरता येत नाही, त्यामुळे फॉन्डन्ट विस्कटलं जाऊ शकतं. खरंतर फॉन्डन्टच्या वस्तू चिटकवताना पाण्याचा वापर होतो पण तो अतिशय कमी प्रमाणात, फॉन्डन्टला जास्त प्रमाणात पाणी लागता कामा नये, त्यामुळे त्यावर फ्रेश क्रीमदेखील वापरु नये, केकमध्येदेखील आर्द्रता कमीच असावी लागते. अशावेळी बटर आयसिंग, हार्ड ट्रफलचा वापर करावा. आयसिंग झाल्यावर ते काहीवेळ फ्रीजमध्ये सेट केलं पाहिजे.

पावसाळी हवेमध्ये फॉन्डन्ट केक करणं जिकीरीचं काम असतं, हवेतल्या आर्द्रतेमुळे फॉन्डन्ट चिकट बनते. फॉन्डन्टपासून एखादी वस्तू बनवताना घाई करुन चालत नाही. उदाहरणार्थ, बाईक बनवायची असेल तर मी त्याचा प्रत्येक भाग वेगवेगळा तयार करुन घेते, ते कडक होईस्तोवर वाळवून नंतर जोडणी करते.

बाजारात गम पेस्टदेखील मिळते, पावसाळी हवेत फॉन्डन्टमध्ये गम पेस्ट वापरु शकतो पण त्यामुळे बनवलेली वस्तू खूपच कडक होते, इतकी की, कोणीही ते खाऊ शकणार नाही.

फॉन्डन्टच्या वस्तू केकवर उभ्या करताना मी टूथपिकऐवजी स्पगेटी स्टीक्सचा वापर करते. लहान मुलांना या वस्तू पटकन उचलून तोंडात टाकण्याची सवय असते, टूथपिकमुळे त्यांना इजा पोहोचू शकते.

केक असा बनवा, असा सजवा की, त्यातील प्रत्येक भाग खाण्यायोग्य असावा, खासकरुन मुलांना कोणताही त्रास होता कामा नये.

केकसाठी साचे, टूल्स असं बरंच सामान असेल तुझ्याकडे, कसा करतेस त्याचा वापर?

केक बनवायचा व्यवसाय म्हणजे वेगवेगळे साचे, उपकरणं खरेदी करायची असा लगेच समज करुन घेऊ नका. एकतर ही उपकरणं फार महाग असतात, एक उपकरण एखाद्या विशिष्ट डिझाइनपुरते वापरायचे असते. त्याऐवजी तुम्ही क्रिएटीविटी वापरुन घरातल्या वस्तुंपासून डिझाईन करु शकता, फॉन्डन्टच्या वस्तू करताना साच्याऐवजी हातांचा वापर करा.

तू क्लासेसदेखील घेतेस ना?

मला बरेच जण सांगायचे की आम्हाला शिकव हे काम, पण दुसऱ्याला शिकवायचं कसं हे समजत नव्हतं, त्यासाठीदेखील आधी स्वतःचा गृहपाठ केला, काय शिकवायचं, कसं शिकवायचं हे ठरवलं. आणि मग केक शिकवायला सुरुवात केली. मी आजवर कधीही स्वतःच्या क्लासची जाहिरात केलेली नाही, शिवाय कोणी समोरून विचारलं तरी क्लासच्या एका बॅचमध्ये किमान चार व्यक्ती हव्यात ही अट असते. त्यामुळे विचारणा केलेल्या सगळ्यांनाच माझ्या क्लासला यायला मिळालं असंही नाही. तरीही गेल्या दोन वर्षात मी दहा बॅचेसना केक्स शिकवलेत.

या कामात घरच्यांचा सहभाग कशा प्रकारचा असतो?

या सगळ्यात माझ्या नवऱ्याचं, सासर-माहेर दोन्हीकडच्या आई-वडिलांचं, घरातील इतर व्यक्तीचं खूप सहकार्य मिळतं हे मला आवर्जून सांगावसं वाटतं. बेकींग, डिझायनिंगसाठीचा विचार, पूर्वतयारी, प्रत्यक्ष काम यात माझा इतका वेळ जातो की, सामान आणायला बाजारात जाण्याइतका वेळ नसतो, शिवाय केकच्या गुणवत्तेला धक्का लागू नये यासाठी मी काही खास ब्रॅन्डस्, कंपन्या, दुकानांचीच निवड करते, पण त्यासाठी फार लांब जावं लागतं. माझा नवरा स्वतःचा व्यवसाय सांभाळून, मला सामान आणून देणं, केकची डिलीवरी करणं, मी कामात असेन तेव्हा मुलीला पाहणं ही कामं अगदी आनंदाने करतो. हे माझं आवडीचं काम मी अतिशय पॅशनने करत रहावं यासाठी तो मला सतत प्रोत्साहन देत
असतो. सासर-माहेर दोन्हीकडचे आई-वडील माझ्या कलेचं, मेहनतीचं कौतुक करुन अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठीचा हुरुप देतात.

तुमचं काम चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला उत्तम टिकाकार मिळायला हवेत. माझा नवरा आणि आता मुलगीदेखील, हे माझे बेस्ट क्रिटीक्स आहेत. केकमध्ये जराही काही उणीव असेल तर ही दोघंही ते लगेच सांगतात, ती उणीव कशी भरून काढता येईल याच्या उपयुक्त टिप्सदेखील त्यांच्याकडून मिळत असतात.

भविष्यातील योजना काय आहेत?

घरच्या घरी केक बनवून डिझाईन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे, बऱ्याच लोकांना हे काम अतिशय उत्तम जमतं. परंतु केक तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस, डिझाईनसाठी लागणारे जिन्नस, वेगवेगळ्या वस्तू, उपकरणे, साचे आणि तेदेखील चांगल्या दर्जाचे, सहज उपलब्ध होणं ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा माझा अंदाज आहे. ठाणे, मुंबईसारख्या शहरातही चांगल्या दर्जाचे जिन्नस, वस्तू सगळीकडे मिळत नाहीत. त्यामुळे केक सप्लाईजचं स्टोर सुरु करावं असा मी विचार करतेय. सध्या माझ्याकडे येत असलेल्या ऑर्डर्सचा ओघ पाहता, केक बेकिंग आणि डिझाईनसाठी एक स्वतंत्र किचन असावं, असंही मला वाटतं. क्लासेस घ्यावेत यासाठीसुद्धा खूप लोकांकडून विचारणा होत असते, स्वतंत्र किचन असेल तर क्लाससाठी त्याचा वापर करता येईल. एक one stop shop असावं, जिथे केक, पेस्ट्रीज मिळतील, केक सप्लाईज मिळतील, केक मेकिंगचे क्लासेस चालवता येतील.

दुसरं एक असं की, अमेरिकेसारख्या देशांमध्ये केक डिझाईनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करणारे स्पेशालीस्ट असतात, या वस्तूंची ऑनलाईन विक्रीदेखील होते. केक मेकर्स ही सुविधा मोठ्या प्रमाणावर वापरतात. आपल्या देशात पायाभूत सोयींची अवस्था बघता ऑनलाईन खरेदीविक्री शक्य होणार नाही पण माझ्याच परिसरातील काही मुली किंवा गृहिणींना कलात्मक वस्तू करण्याची आवड, इच्छा असेल तर त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन मला केकमध्ये डिझाईनसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू मी त्यांच्याकडून बनवून घेऊ शकते. यामध्ये माझा वेळ वाचेल शिवाय त्यांना घरबसल्या फावल्या वेळेत काम करून पैसे कमावता येतील.

संधी मिळाल्यावर तिचं सोनं करण्यासाठी अभ्यास, संशोधन, इच्छाशक्ती, मेहनत, परिपूर्णतेचा ध्यास, व्यावसायिक नितीमत्ता यांच्या जोरावर आज ही माझी केक आर्टीस्ट मैत्रीण यशस्वी, समाधानी उद्यमी बनली आहे.

वृषाली विनोद
९८२०१५०३४०
ठाणे.
www.thecakestory.co.in
facebook.com/thecakestorybyvrushali

प्रतिक्रिया

पियुशा's picture

16 Oct 2015 - 10:30 am | पियुशा

वा खुप छान माहीती,वृषालीच कौतुक , उमातै धन्स अ लॉट :)

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 11:08 am | प्रीत-मोहर

वाह!!! इतके अनोखे डिजाईन्स वृषाली तुझ कौतुक आणि अभिनण्दन!!!
उमा धन्स ग इतक्या छान "सुंदर" मुलाखतीसाठी

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 2:56 pm | वेल्लाभट

वाह..... कमालच ! सहीच....

इशा१२३'s picture

16 Oct 2015 - 3:42 pm | इशा१२३

छान नेटक्या शब्दात मुलाखत लिहिली आहेस.
अत्यंत सुंदर केक आहेत.प्रत्येक फोटो पहाण्यासारखा.
प्रचंड मेहनतीचे काम इतक्या कलात्मकणे केलय.कौतुकच वृषालिचे.

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2015 - 7:17 pm | स्वाती दिनेश

उमा, नेटकी मुलाखत!
वृषालीचे कौतुक!
स्वाती

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 8:50 pm | कविता१९७८

छान मुलाखत

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 10:10 pm | सानिकास्वप्निल

उमा अगदी उत्तम मुलाखत!!
अप्रतिम बनवलेले केक आहेत स्गळे, हॅट्स ऑफ!!
वृषालीचे कौतुक, त्यांनी आपल्या पॅशनला अगदी यशस्वीपणे फुलवले आहे.
त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!!

अजया's picture

16 Oct 2015 - 10:18 pm | अजया

उमा, फार छान झाली आहे मुलाखत.वृषालीचं कौतुक तिच्यापर्यंत नक्की पोहचव.

मुलाखत आवडली. वृषालीताईंचे कौतुक वाटते.

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 7:39 pm | प्यारे१

+१

मधुरा देशपांडे's picture

17 Oct 2015 - 2:29 pm | मधुरा देशपांडे

वरच्या सर्व प्रतिसादांना मम. प्रेरक आहे.

पैसा's picture

17 Oct 2015 - 7:16 pm | पैसा

आधी फोटो पाहिले, जबरदस्त आहेत. मग मुलाखत वाचली! अतिशय उत्तम झालीय!!

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 10:11 pm | नूतन सावंत

उम मुलाखत घेणं हि पण एक कला आहे मुलाखत देणाऱ्याला योग्य प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती काढण्याचं कौशल्य तुझ्यकडे आहे.तुझ्या मेत्रीनीच्या कसबाबद्दल काय बोलावं?फोटोच बोलके आहेत.तिच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा.

पद्मावति's picture

18 Oct 2015 - 12:19 am | पद्मावति

इतके सुंदर केक्स बघून खूप मस्तं वाटलं. लहान मुलांसाठीचे केक्स तर तूफानच आहेत. तृप्तीच्या कसबाचे कौतुक करावे तेव्हडे कमी आहे. उमा, खूप छान मुलाखत.

उम मुलाखत घेणं हि पण एक कला आहे मुलाखत देणाऱ्याला योग्य प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती काढण्याचं कौशल्य तुझ्यकडे आहे.

...हेच म्हणायचे आहे.

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 4:54 pm | मांत्रिक

खतराच केक्स आहेत! केक आर्टिस्ट वृषाली यांच्या सोबतचा संवाद ही उपयुक्त वाटला.

के.पी.'s picture

19 Oct 2015 - 12:58 pm | के.पी.

कसले मस्त मस्त केक्स आहेत!

प्रेरक मुलाखत. उत्तम शब्दांकन. वृषालीला अनेक शुभेच्छा!

मितान's picture

21 Oct 2015 - 7:57 am | मितान

अतिशय उत्तम मुलाखत उमा!!
किती ते केकचे प्रकार!! एकाचढ एक!
ही कल्पकता जोपासणार्या या सळीला प्रणाम! !!

मितान's picture

21 Oct 2015 - 7:58 am | मितान

सखी* ला वाचावे.

भुमी's picture

21 Oct 2015 - 1:18 pm | भुमी

बार्बी चा केक सुंदर , वैविध्यपूर्ण डिजाईन्स... लेख आवडला.

एकसे एक आहेत केक..मुलाखत पण छान...

Mrunalini's picture

21 Oct 2015 - 6:05 pm | Mrunalini

मुलाखत आवडली.
फोटोमधले केक तर काय सुंदर बनवलेत.

ओघवती, सोप्या भाषेतील तरीही खूप काही सांगणारी अशी ही मुलाखत फार आवडली. हा विषय स्पष्ट करण्यासाठी आवश्यक फोटोंची निवड केवळ अप्रतिम. या वेगळ्या क्षेत्राची नवीन माहिती मिळाली. घरगुती केक करताना उपयोगी अशा टिप्सपण मिळाल्या. सर्वांगसुंदर मुलाखत.

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 9:10 pm | बोका-ए-आझम

अप्रतिम मुलाखत! प्रेरणादायी आहे एकदम!

अनन्न्या's picture

23 Oct 2015 - 6:26 pm | अनन्न्या

उमा चांगला विषय निवडलास, वृषालीचे खास अभिनंदन!

सविता००१'s picture

27 Oct 2015 - 5:28 pm | सविता००१

मस्त मुलाखत, छान ओघवतं लिखाण आहे गं तुझं.
केक्स तर उचलून तोंडात घालता येत असते तर?????? असं फार्फार वाटतंय

विशाखा राऊत's picture

28 Oct 2015 - 3:54 am | विशाखा राऊत

सुंदर