कांद्याची पातीची पातळ भाजी ?

बहुगुणी's picture
बहुगुणी in पाककृती
1 Sep 2008 - 8:42 pm

घरात एकटा मी, रविवारचे दुपारचे १२ वाजत आलेले, कालच्या थोड्याश्या तापाने प्रकृति नरम-गरम, म्हणून बाहेर जाऊन काही खायची किंवा घरात काही कष्टपूर्वक काही मसालेदार करायची हिंमत नाही, तेंव्हा काहीतरी सोपं, पचायला हलकं असं करावं म्हणून भाज्या बघायला फ्रिज उघडलं...आत फक्त कांद्याची लुसलुशीत पात...म्हंटलं चला मुगाच्या डाळीचा तडका देऊन काही करता येतंय का पहावं. तर अशी ही मला नाव माहित नसलेली पाककृती (तुम्हीच द्या नाव पदार्थ आवडला तर) ..
साहित्यः १० पातीचे कांदे, १/२ टोमॅटो, पाव वाटी मुगाची डाळ, फोडणीसाठी तेल -मोहरी - हिंग, बारीक चिरलेली अर्धी मिरची, प्रत्येकी अर्धा टी-स्पून धणा-जिरा पावडर आणि मीठ
वेळः १५ मिनिटे
- एकीकडे वाटीभर भात electric cooker मध्ये लावून दिला आणि पातीचे कांदे बारीक चिरले, टोमॅटोच्याही चौकोनी फोडी करून घेतल्या. गरम तेलात फोडणी करून त्यातच मुगाची डाळ आणि चिरलेली अर्धी मिरची घालून परतली. चमचाभर पाणी घालून झाकण ठेवून २ मिनिटे वाफ आणली आणि मग त्यात चिरलेले पात आणि टोमॅटो घालून परतले. मग धणा-जिरा पावडर आणि मीठ घालून एकदा परतून, १/२ कप (अंदाजे १०० ml) पाणी घालुन, झाकण ठेऊन १० मिनिटे शिजवले. तोपर्यंत तयार झालेल्या भातावर ही कांद्याची पातीची पातळ भाजी पसरून खायला मस्त मजा आली. बघा आवडते का ही कृती.

प्रतिक्रिया

नभा's picture

2 Sep 2008 - 10:23 am | नभा

मि.पा. वरती पहिले पाऊल टाकत आहे.

बहुगुणी. पाककृती आवडली. पण नावे ठेवणे आम्हाला जमत नाही :)

एकच शंका आहे. मुगाची डाळ भिजत न घालताच फोडणीत घालायची का?

विसोबा खेचर's picture

2 Sep 2008 - 11:29 am | विसोबा खेचर

वा! इन्सटंट भाजी अंमळ बरी बनवलेली दिसते आहे!

शाब्बास रे बहुगुणी... :)

आपला,
(कांद्याची पात हा प्रकार अंम़ळ कमीच आवडणारा) तात्या.

सुनील's picture

2 Sep 2008 - 12:01 pm | सुनील

दरबारात सरदार मंडळी चर्चा करीत होती - कोणते हत्यार सर्वश्रेष्ठ? कोणी म्हटले जंबिया तर कोणी तलवार. बिरबलाने स्वतःवर बेतलेला एक प्रसंग सांगितला. एक बिथरलेला हत्ती त्याच्यावर चाल करून येत होता. लपायला जागा नाही आणि हातात काही हत्यार नाही. बाजूनेच एक कुत्रे जात होते. बिरबलाने त्याचे शेपटी पकडली, त्याला गरागरा फिरवले आणि हत्तीच्या दिशेने भिरकावले. हत्ती बावचळला, क्षणभर थांबला आणि उलट दिशेने पळून गेला!

(मनेकाजी, बिरबलाला माफ करा!)

थोडक्यात, हातात येईल ते हत्यार सर्वश्रेष्ठ!!

जेवणाच्या बाबतीतही कधी कधी असेच होते. करायचा, बाहेर जायचा कंटाळा येतो आणि घरातही फारसे काही नसते. तेव्हा जे काही घरात असेल तेच उत्तम मानून पदार्थ बनवायचा!

असो, कांद्याची पात तशी "बहुगुणी"! मला कांद्याची पात आवडते. किंबहुना, तूर किंवा मूग डाळ बनवताना जर कांद्याची पात किंवा मुळ्याची पाने उपलब्ध असतील तर मी आवर्जून घालतो. छान स्वाद येतो.

तुम्ही पदार्थाला नाव काय द्यायचे असे विचारले आहे. पण नावात काय आहे असे तुकारामांनी म्हटलेच आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बहुगुणी's picture

2 Sep 2008 - 7:52 pm | बहुगुणी

नभा: होय, मुगाची डाळ न भिजवताच फोडणीत घालायची, नंतरच्या पाण्यात ती (खिचडीसारखी) छान शिजते.
सुनीलः बिरबलाची गोष्ट आवडली. पण तुलनेने कांद्याच्या पातीचा वापर गोष्टीतल्या कुत्र्याप्रमाणे झाला असं तर आपल्याला सुचवायचं नाही ना? ;-) तसं असेल तर तात्यांना आनंदच वाटेल बहुधा!