हे एक उपवासाला चालणारे लिंबाचे झटपट लोणचे आहे. माझी आई हे लोणचे छान करते.
साहित्यः एक लिंबू, गूळ, लाल तिखट, मीठ, भाजून केलेली जिरेपूड, आवडत असल्यास दाण्याचे कूट.
कृती: लिंबू चिरून कुकरमध्ये उकडून घ्यावे. उकडताना दोन चमचे पाणी घालावे (जास्त नको). उकडलेल्या लिंबाच्या बिया काढून हाताने कुस्करून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे व चवीप्रमाणे गूळ, मीठ, लाल तिखट, जिरेपूड घालून कालवावे. लिंबू उकडल्यावरही त्यात थोडा कडसरपणा असतोच, तो ज्याना आवडत नसेल त्यांनी छोटा चमचा दाण्याचे कूट घालावे.
साबूदाण्याची खिचडी / वडे, वर्याचे तांदूळ याबरोबर बरटा चांगला लागतो. एरवी पोळी किंवा ब्रेडबरोबरही छान तोंडीलावणे आहे.
(अवांतर - ताजा केलेला बरटा आत्ताच संपल्याने चित्र चढवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व! पुढच्या वेळी आठवणीने चित्र देईन.)
रेवती
प्रतिक्रिया
30 Aug 2008 - 8:49 pm | प्रभाकर पेठकर
पाककृती छान आहे.
पण अगदी एकाच लिंबाची असल्यामुळे 'चेटूक' केल्यासारखी वाटतेय.
30 Aug 2008 - 10:06 pm | यशोधरा
वेगळीच आहे पाकृ. करुन बघते. साल तशीच ठेवायची का लिंबाची??
30 Aug 2008 - 11:22 pm | रेवती
धन्यवाद पेठकरकाका,
माझ्या जवळच्या ग्रोसरी दुकानात मोठ्ठी लिंबे मिळतात. एका लिंबाचा एक वाटी बरटा होतो व जेमतेम दिड दिवस पुरतो. ताजा असताना लिंबाचा स्वाद असतो जो दुसर्या दिवशी कमी होतो म्हणून एका लिंबाचा करते.
यशोधरा,
जरूर करून बघ. उपवास वगैरे नसताना मी डाळ तांदुळाबरोबरच लिंबू वेगळ्या भांड्यात शिजवून घेते म्हणजे फक्त लिंबासाठी कुकर लावायला नको. लिंबाची साल असणे महत्वाचे आहे. त्याचा उग्र वास शिजवल्यावर बराच कमी होतो व साल हाताने कुस्करता येते.
रेवती
31 Aug 2008 - 3:54 pm | विसोबा खेचर
वा! बरटा सह्हीच! :)
31 Aug 2008 - 5:42 pm | धनंजय
लिंबाच्या कुठल्याही लोणच्याचे नाव ऐकल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटते.
कडसर, आंबट, तिखट + झटपट! पाकृ आवडली.
1 Sep 2008 - 10:59 am | किर्ति
पा कॄ आवड्ली
1 Sep 2008 - 9:57 pm | रेवती
बरट्याची चव घेणार्या सर्व खवय्यांचे आभार!
रेवती
2 Sep 2008 - 12:52 pm | किर्ति
रेवती
मी हि रेसिपी लगेच केली
माझ्या मिस्टरा ना आवडली
3 Sep 2008 - 2:17 am | चकली
रेसिपी आवडली. याला बरटा हे नाव नवीन ऐकले.
चकली
http://chakali.blogspot.com
3 Sep 2008 - 7:14 am | रेवती
किर्ती व चकली,
पाककृती आवडल्याचे कळवल्याबद्दल आभार!
किर्ती, आपण बर्याच उत्साही दिसता. लगेच करूनही बघीतलीत पाकृ!
रेवती
3 Sep 2008 - 3:57 pm | स्वाती दिनेश
हे लोणचे करून पाहिनच,एकाच लिंबाचे करता येते हे आणि उत्तम!
बरटा हे नाव प्रथमच ऐकले ,:)
स्वाती
12 Sep 2008 - 7:49 pm | खादाड
:H छान आहे ! करुन पहिली आवडलि !