आत्मरंजन (मुढकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
6 Aug 2015 - 3:35 pm

मला रोज हायवेच्या फाट्यापर्यंत चालत चक्कर टाकल्याशिवाय चैन पडतंच नाही आजकाल. थंडीचे दिवस, पाहुणेराउळे मंजुळेच्या लग्नानिमित्त वस्तीवर संध्याकाळी जमू लागले आहेत. आगत-स्वागतानंतर जेवण वगैरे आटोपून बायका मुलं दमल्यामुळे लवकरच झोपले. लांबचे नवीन पाहुणे अजून येतच आहेत. एकमेकांशी ओळखी-पाळखी करताकरता, त्यांना संध्याकाळचे बाहेर कधी चांगलेच अंधारून आलेलं कळलंच नाही. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे मीही संध्याकाळी निघालो. वस्तीकडे येतानाचा जो रस्ता होता, त्या रस्त्यानंच नेहमी जात असल्यानं मला तो रस्ता माहीत होता. विशेष म्हणजे त्या रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळही नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचच-उंच झाडे, असं वाटत जणू जंगलातच चाललोय. रस्त्यात दूरच्या वस्त्यांची अंधुक रोषणाई दिसत होती म्हणून काही विशेष एकटेपण जाणवत नाही. मधे बर्याचश्या भागात दिवे नसल्यामुळं अंधारच असतो, पण मला सवय होती आता. रानातल्या मंद वार्‍यात पानांची सळसळ स्पष्ट ऐकू येते. आजकाल आकाशही बरेचदा ढगाळलेलं असतं. आकाशातले संथ वाहणारे ढग चंद्राला झाकोळून टाकतात तेव्हा काळोख आणि मंद प्रकाशात चालताना एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं मला. रस्त्यात खूपच चढ-उतार, बाजूला ओढा, त्याच्यावर पूल नसल्यामुळं ओढ्यातून जाणे... नेहमीप्रमाणे वेताळ टेकडीपाशी पोहोचलो, बस्स इथून पुढं ५ मिनिटावर हायवेचा वस्तीकड येणारा फाटा, तेंव्हाच रस्त्यावरून, गावाच्या दिशेने चालत जाणाऱ्या, पांढरे कपडेतल्या स्त्रीला पाहिलं. बहुदा तिचे केस, सोसाट्याच्या वार्यानं मोकळे सुटलेले, तिने तिच्या दोन्ही हातात सांभाळलेलं बाळ बहुदा झोपलेलं. आकाशात ढगांची गर्दी जमलेली अन चंद्र ढगांच्या आड गेलेला, रस्त्यालगत दोन्ही बाजूंना दाट अंधार होता. फक्त मागे लांब असलेल्या वास्त्यांवरच्या ट्यूब लाइटचा अंधुकसा प्रकाश रस्त्यापर्यंत पोहोचू पाहत होता. रस्त्यावर नजरेच्या टप्प्यात दुसरा कुणी माणुसही दिसत नव्हता. वडाखालच्या चावडीवर गावकर्यांच्याकडून वेळोवेळी ऐकलेल्या एक-एक कहाण्या आठवू लागल्या. "ओढ्यात, अलीकडं संध्याकाळनंतर भुत वावरतंय, अन त्याची इच्छा असलं, तरच समोरच्याला दिसतंय ते." अस एकदा का गावकऱ्यानं सांगायला सुरवात केली, की मग लगेचच एकाएकाच्या पोतडीतून, 'आपण स्वतः भुत पाहिलेलं आहे', अश्या अर्थाच्या एकाहून एक सरस गोष्टी निघत. मी नेहमीच त्याकडे फक्त एक टाइमपास म्हणून, त्यांच्या गप्पा ऐकायचो. पण आता क्षणभर असं वाटलं, की आपलं काही खरं नाही; तरीही लगेच मी माझ्य शामळू सिविलियन मनाचा हिय्या करून, ठरवलं की आपल्या मुलीच्या वयाच्या त्या स्त्रीला, काही मदतीची गरज आहे का, हे विचारूया, अरे सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाची राखण केली, तेव्हा नाही डगमगलो, आता मला माझा भिडस्तपणा, एकांत-प्रीय स्वभाव बाजूला ठेवून, तिला व तिच्या बाळाला, मदत केली पाहिजे, शिवाय बाईमाणसाशी सभ्यतेने बोललं की तिला घबारंघुबरं होणार नाही, असा विचार केला.
"ताई …ताई ….कुणाचे पाहुणे तुम्ही ? गावात कुठे जायचं तुम्हाला? " मी सहज आणि मृदू आवाजात विचारलं, किंचित मान वाकवून स्मितहास्यही केलं.
"बोकिलांच्या वस्तीकडे कसं जायचं ? उद्याच्या लग्नासाठी आलीये मी पुण्याहून" माझ्याकडे न पाहता ती गावाकडे सरळ बघत म्हणाली. तिच्या आवाजात एक अनामिक थंडपणा भरलेला होता, की अनोळखी माणसाबरोबर संवादाची भीती, ते काही कळलं नाही मला. पण अंधुक प्रकाशातही तिचे डोळे निष्प्राण ...छ्या! निष्प्राण कसे असतील? थिजलेले वाटले… अरे हड…त्या अंधुक प्रकाशात नेमकं काय दिसतं म्हणा या वयात... फाट्यापासून चालत वस्तीकड यायच्या दगदगिमुळं झाले असतील डोळे तसे कदाचित, मी पण ना काहीही विचार करतो आजकाल...
"अस्स का, म्हणजे बोकील म्हणजे आमच्याच भाउकीले तुम्ही, आता तुम्ही इथून खालच्या अंगाला सरळ जा, अन पुढे बाभळीच रान संपलं की पानाची टपरी लागलं, तिथून आत वाट जाते तसं पुढ जा, शाळेपासून उजवीकड वस्ती लागलं तीथ घरापुढे मांडव असेल बघा… " त्यादिशेनं ती निघाली तशी, चंद्रावरचं ढगाचं सावट बाजूला हलकेच बाजूला सरकलं …. चंद्रप्रकाशात आता आजूबाजूचा परिसर अंधुकसा उजळून निघाला होता....आताशा...
हा, तर मी काय सांगत होतो, मलाही रोज हायवेच्या फाट्यापर्यंत चालत चक्कर टाकल्याशिवाय चैन पडतंच नाही बघा, वर्षभरापूर्वी माझा त्या जागेवर अपघाती मृत्यू झालाना तेव्हापासून ….

kathaaविरंगुळा

प्रतिक्रिया

कथा चांगली आहे. फक्त निवेदक स्वतःच भूत असणे हा ट्विस्ट आता बराच वापरून झाला असल्याने शेवट अपेक्षित असल्यासारखा वाटला.

पण एकूण मस्त रंगवलेय आत्मरंजन.

मस्त शब्दरचना फार चांगली आहे.
पगल गजोधर पण आता उतरणार भयकथांत. मस्तच!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Aug 2015 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्मरंजन वाचुन मिपावर लोकांना टॅग करायची सोय नसल्याबद्दल खंत वाटली.

चालु द्या तुमचं निरर्थक अत्मरंजन, लुलुलु वगैरेंची आठवण झाली. :)

#अत्मुरॉक्स =))

उगा काहितरीच's picture

6 Aug 2015 - 9:31 pm | उगा काहितरीच

पगजी फूल फॉर्ममध्ये ! जिकडे तिकडे पग पग ! .;-)

या महिन्यात जोपर्यंत मला अँक्सेस मिळाला आहे तोपर्यंत जिलब्या पाडतोय…
लवकरच फायरवॉल उभी राहणार त्यानंतर ……

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2015 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान आहे कथा !

तुडतुडी's picture

7 Aug 2015 - 11:29 am | तुडतुडी

असं झालं होय . बरं मग ?