आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ...

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Jul 2015 - 10:50 pm

आषाढीचे निमीत्त साधून एका मराठी विकिपीडिया सदस्याने आज विठ्ठलाच्या बर्‍याच गाण्यांची यादी मराठी विकिपीडियातील लेखात जोडली, हे पाहून मी ही माहितीचा आढावा घेण्यास सुरवात केली. विठ्ठल हे मुख्यत्वे महाराष्ट्रातील दैवत म्हणजे इंग्रजी विकिपीडियावरील लेखासही बहुसंख्य वाचक मराठीच असावेत असे गृहीत धरता येते.

काल पर्यंत गेल्या महिन्यातील(३० दिवसांची मिळून) इंगजी विकिपीडियावरील विठोबा लेखास हिट्सची संख्या ५००० होती तर मराठी विकिपीडियावरील लेखास मिळालेल्या हिट्सची संख्या १००० च्या आसपास. मराठी विकिपीडियावर लेखाची सुरवात १५ सप्टेंबर २००८ ला झाली तेव्हा पासून ६८ संपादने (अंदाजे २७ लेखकांकडून) झाली त्यातील ९ संपादने मागच्या ३० दिवसात झाली आणि लेखाचा सध्याचा आकार १९,५२८ बाइट्स आणि केवळ १ संदर्भ नोंदवलेला आहे.

तर इंग्रजी विकिपीडियावरील लेखाची सुरवात १९ मार्च २००६ ला झाली आजतागायत इंग्रजी विकिपीडियावर २०९० संपादने झाली (एकुण लेखक २८३; बाईट्स आकार ७१,२०३ आणि संदर्भांची संख्या १५०च्या आसपास) त्यातील २००६ ते २००८ कालावधीत अंदाजे ५०० संपादने झाली असावीत उर्वरीत १५०० संपादने २००८ ते २०१५ कालावधीत झाली अर्थात या १५०० संपादनात ५००च्या आसपास नव्हेंबर २००९ ते फेब्रुवारी २०१० (चार महिन्याच्या कालावधी) मध्ये एक मराठी आणि एक ऑस्ट्रेलीयन व्यक्तीने मिळून केली असावीत आणि त्यांच्या कामाचे फळ म्हणजे तो लेख ३ मार्च २००९ला इंग्रजी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर फिचर आर्टीकल झाला होता.

इंग्रजी विकिपीडियावरील लेखास ऑगस्ट २००६ मध्ये माझाही अत्यल्प (११ आणि ९०० बाइट्सच्या आसपास) हातभार लागला होता. उपरोक्त तौलनीक सांख्यिकीतील लक्षात घेण्यासारखे भाग म्हणजे विठोबा लेखास एकुण मराठी वाचकांच्या हिट्सच्या २%च्या आसपास हिट्स मिळत असाव्यात. दुसरे इंग्रजी विकिपीडियावरील हिट्सची संख्या पाच पट आहे पण लेखकांची संख्या दहापट आहे म्हणजे तेथे फक्त वाचकांचा सहभाग अधिक आहे असे नव्हे तर लेखन सहभागाचे प्रमाण अधिक राहीले आहे. अर्थात २००८ ते २०११ हा इंग्रजी विकिपीडियाचा भरभराटीचा काळ होता. गेल्या तीस दिवसात इंग्रजी विकिपीडियावर एकही संपादन नसावे याचा अर्थ मराठी विकिपीडियावर स्थिती चांगली आहे असे नव्हे. नेहमीचेच एक संपादक आज अचानक पोहोचून त्यांनी ९ संपादने केली म्हणून, फुल नाहीतर फुलाची पाकळीचे समाधान एवढेच.

मराठी विकिपीडियावर लेखाकडे लक्ष गेल्यामुळे मी उपरोक्त आकडेवारी तपासली, मराठी लेखासाठी काही तरी केले पाहीजे म्हणून मराठी गूगल शोध सुरु केला उपक्रम संस्थळावरील बिरुटेसरांची कॉमेंट वर टप्पा मारून रा.चिं. ढेरेंच्या 'श्री विठ्ठल: एक महासमन्वयची बुकगंगा डॉट कॉमवरील सुरवातीची दोन चार पाने चाळली त्यात त्यांनी संस्कृत आणि इतरही स्रोत ग्रंथ आणि दस्तएवज संदर्भांसाठी अभ्यासले जाणे अद्याप बाकी आहे असे नोंदवले आहे म्हणून आंतरजालावर काही संस्कृत शोध 'पुंडरी'क शब्दावर घेतल्यावर खालील श्लोक मिळाले. (मला त्यांचे अर्थ माहित नाहीत पुंडलीकाशी संबंधीत आहेत का तेही माहित नाही. संस्कृत जाणकारांनी खालील श्लोकांचे अनुवाद करून दिले तर मराठी विकिप्रकल्पातून वापरणे सोईचे जाइल. ज्या श्लोकांचा विषयाशी आजिबातच संबंध नाही ते सांगावेत म्हणजे या लेखातून वगळता येतील. ज्या श्लोकात त्रुटी आहेत त्याही सांगाव्यात म्हणजे त्या त्रुटी दूर करता येतील. किंवा खाली न दिलेलेही काही श्लोक आणि अनुवाद उपलब्ध असल्यास त्यांचीही दखल घेता येईल.

ब्रह्माण्डपुराणम्/अध्यायः_३५

या५वल्क्यस्य शिष्यास्ते कण्वो बौधेय एव च ।।
मध्यंदिनस्तु सापत्यो वैधेयश्चाद्धबौद्धकौ ।। ३५.२८ ।।

तापनीयश्च वत्साश्च तथा जाबालकेवलौ ।।
आवटी च तथा पुंड्रो वैणोयः सपराशरः ।। ३५.२९ ।।

इत्येते वाजिनः प्रोक्ता दशपंच च सत्तमाः ।।
शतमेकाधिकं ज्ञेयं यजुषां ये विकल्पकाः ।। ३५.३० ।।

स्कन्दपुराणम्/प्रभासखण्डः_2/प्रभासखण्डः_3
...।। १९ ।। पश्यध्वं मुनयः सर्वे कलिव्याप्तं दिगंतरम् ।। समंतात्परिधावद्भिर्दस्युभिर्बाध्यते प्रजा ।। 7.4.1.२० ।। अधर्मपरमैः पुंभिः सत्यार्जवनिराकृतैः ।। कथं स भगवान्विष्णुः संप्राप्यो मुनिसत्तमाः ।। २१ ।। को वा भवाब्धौ पततस्तारयिष्यति संगतान् ।। न कलौ संभवस्तस्य त्रियुगो मधुसूदनः ।। तं विना पुंडरीकाक्षं कथं स्याम कलौ युगे ।। २२ ।। तेषां चिंतयतामेवं दुःखितानां तपस्विनाम् ।। उवाच वचनं तत्र ऋषिरुद्दालकस्तदा।। २३।। उद्दालक उवाच ।। यावन्न कलिदोषेण लिप्यामो मुनिसत्तमाः ।। अपापा ब्रह्मसदनं गच्छामः

परिसंगताः ।। २४ ।। पृच्छामो लोकधातारं स्थितं विष्णुं कलौ युगे ।। यदि विष्णुः कलौ न स्याद्रुद्रेण ब्रह्मणाऽसह ।। २५ ।। तं विना पुंडरी काक्षं त्यक्ष्यामः स्वकलेवरम् ।। विना भगवता लोके कः स्थास्यति कलौ युगे ।। २६ ।। तच्छ्रुत्वा वचनं तस्य ऋषयः संशितव्रताः ।। साधुसा ध्विति ते चोक्त्वा प्रस्थिता ब्रह्मणोंऽतिकम्।। २७ ।।

।। ४४ ।। वैष्णवानां प्रयच्छंति गोपीचं दनमृत्तिकाम् ।। येषां ललाटे तिलकः गोपीचंदनसंभवम्।। ४५ ।। गोपीचंदनपुंड्रेण द्वादश्यां जागरे कृते ।। विष्णोर्नामसहस्रस्य पाठेन मुक्तिमाप्नु यात् ।। ४६ ।।

ब्रह्माण्डपुराणम्/अध्यायः_११
पीवर्यां वेदशिरसः पुत्रा वशकराः स्मृताः ।।
मार्कंडेयाः समाख्याता ऋषयो वेदपारगाः ।। ११.८ ।।

प्राणस्य पुंडरीकायां द्युतिमानात्मजोऽभवत् ।।
उन्नतश्चद्युतिमतः स्वनवातश्च तावुभौ ।। ११.९ ।।

तयोः पुत्राश्च पौत्राश्च भार्गवाणां परस्परात् ।।
स्वायंभुवेंतरेऽतीता मरीचेः श्रृणुत प्रजाः ।। ११.१० ।।

ब्रह्माण्डपुराणम्/अध्यायः_३५

तापनीयश्च वत्साश्च तथा जाबालकेवलौ ।।
आवटी च तथा पुंड्रो वैणोयः सपराशरः ।। ३५.२९ ।।

अजून एक काम केले ते म्हणजे pand या अक्षर समूहावर सेन्सस इंडीया मधील गावांच्या नावांचा शोध आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील गावांवर घेतला. सेन्सस इंडीयाचे वेबसाईट राईट क्लिक करून कॉपीपेस्ट करण्यास अनुमती देत नाही. पण या स्थलनामांच्या बाबतीत नोंदवण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे आंध्रप्रदेश (की तेलंगाणात ?) अशा गावांची नावे कर्नाटकापेक्षा अधिक असावीत. उदाहरणार्थ पण्डलगुण्टा, पण्ड(ल/र)पाडू, पण्डलपाका, पण्डलपर्रू, पण्डीगुण्टा, पण्डीकुंटा, पण्डीकोना, पण्डीलापल्ले,पण्डीपम्पुला, पण्डीराजपल्ले, पण्डीरीमामीदी, पण्डलापुरम, पण्डलुरु, पण्डरंगी, पण्ड्रापोट्टीपल्लम, पाण्ड्रापोलु, पांडरवडा, पण्डुर, अशा प्रकारची नावे आहेत बरीच गाव नावे पाण्डे आणि पाण्डव पासूनही असावीत. पांडुरंगपुरम नावाची दोन गावे खम्मम जिल्ह्यात दिसतात.

कर्नाटकात पाण्डर(हल्ली|वल्ली|गेरा) पण्डीवरीपल्ली, पण्डोगेरे, मग पण्डीत नावा पासून बरीच गावे दिसतात, उडुपी जिल्ह्यात पाण्डेश्वरा तर गदग जिल्ह्यात पाण्डुरंगपूर मिळते.

महाराष्ट्रः पाण्डेश्वर नावाचे गाव महाराष्ट्रातही पुरंदर तालुक्यात दिसते, पाण्डेरी नावाची तीन गावे कोकणात दिसतात, पांढर पासून बरीच गावे आहेत जसे की पांढरकवडा (विदर्भ) पण सोबतीला पांढरदेव पांढरदेवी पांढर(पाणी|वाणी|ढकणी) नावाची गावेही आहेत. पंढरी नावाची दिड डझन तरी गावे आहेत पण पंढरी नावाच्या गावांमध्ये विदर्भ आघाडीवर दिसतो. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपाऊनी, तर गडचिरोली जिल्ह्यात पंढरी भाटल नावाचे गाव दिसते. पंढरपूर नावाची अर्धा डझन गावे वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेली दिसतात पण विठ्ठल देवता पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरात आणि महाराष्ट्रात पुजली जात असली आणि आपण कर्नाटकाचे नाव घेत असलो तरी नामसाधर्म्य असलेल्या ग्रामनामांची संख्या विदर्भ आणि तेलंगाणात अधिक दिसते आहे. मला वाटते अभ्यासकांसाठी हि दखल घेण्या जोगी गोष्ट ठरावी.

अवांतरः एक रोचक योगायोग म्हणजे २०व्या शतकाच्या पुर्वार्धात व्हिएटनाम मध्ये नव्याने बसवलेल्या एका शहरास Panduranga म्हटले जाते ते त्यांच्या भाषेत कोणत्या अर्थाने म्हणतात कुणास ठाऊक ?

या लेखाचे लेखन विकिपीडियासाठी केलेले असल्यामुळे आपले प्रतिसाद नित्याप्रमाणे प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिक नसलेल्या अवांतरांना टाळण्यासाठी आभार.

वाङ्मय

प्रतिक्रिया

जडभरत's picture

26 Jul 2015 - 10:58 pm | जडभरत

अरे देवा वाईट परिस्थिती म्हणायची मराठीसाठी मग?

माहितगार's picture

27 Jul 2015 - 9:19 am | माहितगार

अरे देवा वाईट परिस्थिती म्हणायची मराठीसाठी मग?

हो मराठी लोकांच्या मराठी विकिपीडियावरील सहभागाबाबत ओव्हरऑल वस्तुस्थिती आहे ती. मराठी व्याकरण असो अथवा मराठी साहित्य आज तागायत तरी त्याबाबत इंग्रजी विकिपीडियावरील लेख आणि मराठी विकिपीडियावरील लेख यातील फरक ठळकपणे जाणवणारा आहे हे उदाहरण या साठी की इंग्रजीतून मराठी साहित्याबद्दल भरभरून लिहिण चालू असत मराठीबद्दल मराठी मागे रहातय हे कमी जण लक्षात घेत असावेत.

धार्मीक लेखांच्या बाबतीत 'गणपती' लेखाची स्थिती बरी आहे पण तेही बहुधा कुणीतरी इंग्रजी विकिपीडियावरील लेखातील बर्‍या पैकी भाग अनुवादीत करून घेतला असण्याची शक्यता असू शकते.

मराठी विकिपीडियावर संत तुकाराम लेखाची स्थिती विठ्ठल या लेखा पेक्षा जराशी (सांख्यिकी नुसार दुप्पट) बरी आहे म्हणजे १७७ संपादने आणि ६७ च्या आसपास लेखकांनी/संपादकांनी काम केले आहे पानाचा आकार ३६००० बाइटच्या आसपास आहे. पण तेच समर्थ रामदास लेखाशी तुलना केलीत तर संपादक जरासे कमी आहेत ६१ जणांनी काम केले आहे पण संपादन संख्या ३४३ म्हणजे दुप्पट आहे आणि मजकुर १,१७,७०३ बाइट म्हणजे खूपच आहे अर्थात तो सर्वच ज्ञानकोशीय उल्लेखनीयच्या निष्कर्षास बसतो असे नाही. समर्थ रामदासांवरच्या लेखात एकच संदर्भ आहे, म्हणजे ज्ञानकोशीय संपादकीय कात्री लावल्या नंतर बराच मजकुर वगळला आणि बदलला जाण्यास पात्र असू शकतो.

वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. मंडळी वारकरी किर्तनकारांच्या यादीत नाव लावून घेण्यासाठी हिरहिरीने येतात ( आम्ही जमेल तेथे हितसंघर्षाचे साचे लावतो) पण वारकरी संप्रदाया संबधीत इतर लेखांमध्ये त्यांचा सहभाग फारसा दिसत नाही. तेच रामदासी भक्त संप्रदाय संप्रदाया संबंधीत लेख लिहितोच त्या शिवाय 'शहाणे करोनी सोडावे, सकलजन.' या समर्थ उक्तीसाठी मराठी विकिपीडियातील लेखांमध्ये अधीक झटतो (त्या मानाने वारकरी संप्रदायाचे भक्तगण मुक वाचक होणे अधिक पसंत करत असावेत), अर्थात या समर्थ संप्रदायींचा 'शहाणे करोनी सोडावे, सकलजन.' मधून येणार्‍या स्वतःची व्यक्तीगत मते / कल टाकण्यास आवर घालण्यासाठी तटस्थ लेखन करणार्‍यांना वेगळे प्रयत्न करावे लागतात.

द-बाहुबली's picture

27 Jul 2015 - 4:12 pm | द-बाहुबली

श्रीविठ्ठल हा देवच नक्कि कधी समजला नाही ना त्याच्या उत्पत्तीबद्दल माहिती ना इतर काही... जे काहीए कानी वाचे मनी आले ते संतांच्या अभंगातुन म्हणजे पुन्हा ते त्याच्यावरच का रचले याचा खुलासाच नाही... एकुणच विठ्ठलाबाबत कधी आसच तयार झाली नसल्याने हे घडले असु शकेल त्यामुळे आपला पास... बघुयात इतरांचा उल्हास...

माहितगार's picture

26 Aug 2015 - 7:30 pm | माहितगार

बघुयात इतरांचा उल्हास...

उद्याची तारीख २७-८-२०१५ आहे, सो यू वर राईट बॉमकेसजी :)

पैसा's picture

26 Aug 2015 - 8:08 pm | पैसा

पुंड्र म्हणजे कपाळावर लावलेला एक प्रकारचा टिळा. पुंडरीक म्हणजे कमळ.

पुण्डरीक म्हणजे कमळ असलं तर पुढचं सोप्पं होतंय. अक्ष म्हणजे डोळे.
कमलासारखे डोळे असलेला म्हणून पुण्डरीकाक्ष असणार. कमलनयन. पण पुण्डलिकाची काय गोष्ट आहे? जी प्रचलित आहे तिला पुराणआधार वगैरे आहे का काही???

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

अवांतरः एक रोचक योगायोग म्हणजे २०व्या शतकाच्या पुर्वार्धात व्हिएटनाम मध्ये नव्याने बसवलेल्या एका शहरास Panduranga म्हटले जाते ते त्यांच्या भाषेत कोणत्या अर्थाने म्हणतात कुणास ठाऊक ?

पांडुरंग/गा (Panduranga) किंवा स्थनिक व्हिएत भाषेत फान रांग (Phan Rang) हे शहर प्राचिन मध्य व दक्षिण व्हिएतनामधील चंपा (२ रे ते १५ वे शतक) नावाच्या सधन शैव हिंदू राज्याची (नगर चंपा उर्फ चंपा राज्य) शेवटची राजधानी होती. चंपा राज्याची राजभाषा संस्कृत होती. राजे-रजवाडे-सम्राटांची (भद्रवर्मन, जय हरिवर्मन, इंद्रवर्मन, इ) आणि शहरांची (इंद्रपुरा,१० वे शतक; विजय/या, १२ वे शतक; अमरावती, इ.) नावे संस्कृतप्रचूर होती. मध्य व दक्षिण व्हिएतनाममध्ये अनेक ठिकाणी हिंदू संस्कृतीचे अवशेष आहेत. व्हिएतनाम युद्धात त्यांचे बरेच निकसान झाले आहे. आताची राजवट त्यांना पर्यटनासाठी विकसित करत आहे.

या साम्राज्याच्या शेवटच्या अनावस्थेच्या कालात तेथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. नंतर त्यातल्या काही भागांत मुस्लीम धर्मही स्विकारला गेला.

आधुनिक फान रांग शहर जरी २० व्या शतकात पुनर्वासित केले गेले असले तरी त्याच जागेवरच्या पांडुरंग/गा शहराचा प्रथम उल्लेख पो नगर येथील इ स ८१७ सालच्या शिलालेखात सापडतो.

(जालावरून साभार; चाम राज्याचा भाग हिरव्या रंगात दाखवलेला आहे)

राही's picture

27 Aug 2015 - 9:45 am | राही

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभंसुरेशम् | विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्|
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्| वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्||
हे सुप्रसिद्ध विष्णुस्तवन उद्धृत करण्याचे कारण कमलनयन, पद्माक्ष, कमलनेत्र, पद्मनेत्र, पुण्डरीकाक्ष ही सर्व विष्णूची नावे आहेत. कमलाप्रमाणे विशाल आणि मोहक डोळे असलेला असा त्याचा अर्थ आहे.
पांढरी, पांढर, ही नावे म्हणजे जमिनीचा एक प्रकार आहे. काळी म्हणजे पिकाऊ जमीन, सुपीक शेतजमीन तर पांढर म्हणजे निरुपजाऊ नापीक जमीन, जिच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. म्हणून पुरातत्त्व शास्त्रात पांढर जमिनीवरच्या ढिगार्‍याचे उत्खनन करतात कारण तिथे जुन्या वसतीचे पुरावे सापडण्याची दाट शक्यता असते. पांढरपेशा हा शब्द यावरूनच आला आहे. जो काळीमध्ये कसत नाही, म्हणजे जो शेतकरी नाही, तो पांढरपेशा. म्हणजे धोबी, सुतार, कासार, लोहार, तांबट, कोष्टी वगैरे बिगर शेतकरी व्यवसाय आणि लोक.
कोंकणात काळी-पांढरी हा भेद नाही कारण तिथे काळी कसदार माती नसते तर लोहखनिजयुक्त लाल माती असते. शिवाय कोंकणात पाणी विपुल असल्याने पाणी या शब्दावरून अनेक स्थाननामे बनली आहेत. उदा. पाणंद, पाणंदी, पाणदण(पांदण), पांदी इ. तसेही कोंकणातली ग्रामव्यवस्था आणि दक्खन पठारावरची ग्रामव्यवस्था यात फरक आहे.

माहितीपूर्ण आणि रोचक प्रतिसाद

याचा अर्थ पुंडरीक आणि पंढरपूर या दोन्ही विशेषनामांचा (व्युत्पत्ती) प्रवास स्वतंत्रपणे झालेला आहे. म्हणजे पुंडरीक आणि पंढरपूर हि नावे एकाच संदर्भात येण हा निव्वळ योगायोग असण्याची शक्यता अधिक आहे, तर आधी पुंडरीक आणि त्यावरून पंढरपूर हे गणित सपशेल चूकीच ठरत आहे असे दिसते.

बर थोडे अनुषंगिक प्रश्न

१) शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभंसुरेशम् हे कोणत्या संस्कृत ग्रंथातून येते

२) पुण्डरीकाक्ष आणि पुंडरीक हि विशेषनामे विष्णु आणि पंढरपूरचा पुंडलीक सोडून इतर कुणा व्यक्ती संदर्भाने प्राचीन साहित्यात आढळतात का ?

मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हे कथासूत्र अनेक भारतीय कथांमध्ये सामायिक दिसत, भारतीय जन मानसावर या कथासूत्रांचा मोठा प्रभाव आहे.

१) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक भारतीय कथांची यादी/सूची करून हवी आहे.
२) भारताबाहेर अशी कथासूत्रे आहेत का ?
३) या कथासूत्रांचा माता पित्यांचा मूलगा हा मुख्य टार्गेट असतो. (मुलगी टार्गेट असलेली कथानके आहेत का ? असतील तर कोणकोण-ती ?)

४) क्रमांक ३ च्याच प्रश्नाकडे सर्वसामान्य भारतीय स्त्री कोणत्या दृष्टीने बघत असे ? किंवा बघते ? किंवा त्याबाबत फारसा विचार भारतीय स्त्रीकडून होत नाही ?

५) क्रमांक ३ च्याच प्रश्नाकडे लिंगभाव अभ्यास अथवा स्त्रीवादी दृष्टीकोणातून कसे पाहिले जाऊ शकते ?

६) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक कथासुत्रांचे भारतीय जनमानसाच्या विचारप्रणाली/संकल्पनांवर कोण कोणते प्रभाव आणि संस्कार झाले ?

७) क्रमांक ६ च्याच अनुषंगाने मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक कथासुत्रांचा भारतीय जनमानसावरील प्रभाव २०व्या शतकानंतर ओसरू लागला आहे असे तुम्हाला वाटते का ? वाटत असेल तर त्याची कारणे कोणती ?

८) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हि कथासूत्र जाणीवपुर्वक बिंबवली नाही तरीही अंशतः हि बुद्धी मानवाला उपजत असते का ? मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हि कथासूत्र जाणीवपुर्वक बिंबवलेला प्रभाव असलेला भारतीय समाज आणि तसा जाणीवपूर्वक प्रभाव नसलेला उर्वरीत भारतीय समाज आणि भारताबाहेरील समाज यांच्या आचार विचारात कोण कोणते फरक जाणवतात ?

खरंतर अनुषंगिक तरीही वेगळ्या धाग्याचा विषय आहे. पण गेल्या महिन्याभरात माझे आधीच बरेच धागे झाले आहेत म्हणून सध्या या धाग्यावरच चर्चा करून मग नंतर स्वंतत्र धाग्यात स्थानांतरीत करूयात

Ramesh Patil's picture

20 Jan 2019 - 3:11 pm | Ramesh Patil

भक्त पुंडलिक अन विठ्ठलाची गोष्ट माहिती आहे. पण अर्थात नव-लेखकांनी कादंबरीकारांनी खूपसारे प्रश्न मनात निर्माण करून ठेवले आहेत. मध्यंतरी एक पुस्तक वाचण्यात आले त्यामधे लेखकाने शैव-वैष्णव दृष्टीकोन समोर आणला व पुंडलिक हे शैव तर विठ्ठल हे वैष्णव सांगितले अन ऐतिहासिक दृष्ट्या शैव स्थान असलेल्या पंढरपुराचे नंतर वैष्णव स्थान झाले असे सांगितले.

याविषयी अधिक माहिती असल्यास सांगा