द्वि-पात्री प्रयोग...... नारळाचे दूध, वापरून केलेले टोमॅटो सूप....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
26 Jun 2015 - 8:21 pm

डिस्क्लेमर :

१. फोटोची क्वालिटी बघू नका.
२. संपादकांना नम्र विनंती, की त्यांनी फोटोला योग्य तो आकार-उकार द्यावा.

====================================================================
(शुक्रवारची सकाळ.मुले घरात असल्याने, आज चिकन-बिर्याणीचा बेत होता.बायकोला चिकन आणून दिले, आणि मी मिपा-मिपा खेळत बसलो.इतक्यात फोन वाजला.बायको स्वयंपाकघरात असल्याने, फोन मलाच घ्यावा लागला.)

मी : बोला.

आई : तूच फोनवर आहेस हे बरे झाले.

मी : का गं? काही विशेष काम होते का?

आई : हो ना, परवा तू पाठवलेले सूप फार उत्तम होते.तुझ्या बाबांना तर फार आवडले.

मी : बाबा म्हणाले तसे.आज पण करू का?

आई : नको.मला फक्त सूपची पा.कृ. सांग.

मी : का गं? काही विशेष?

आई : तसे विशेष असे काही नाही.आज मंडळांत सूपची स्पर्धा आहे आणि मला तू केलेले सूप ठेवायचे आहे.

मी : ठीक आहे.तुझ्याकडे १ तास वेळ आहे ना?

आई : हो.आहे ना.

मी : मग ठीक आहे.आता साहित्य घे.

४ टोमॅटो, जितके टोमॅटो त्याच्या तिप्पट मिरे.म्हणजे ४ टोमॅटो असतील तर १२ मिरे.जितके टोमॅटो त्याच्या दुप्पट लवंगा, एक इंच दालचिनी बारीक कुटून, ७-८ लसणीच्या पाकळ्या, एक इंच आले, किसून घे.एक मसाला वेलची आणि एक चक्रीफूल आणि एका मोठ्या नारळाचा खवलेला कीस.हा कीस ताजाच पाहिजे.फ्रीझ मधला घेवू नकोस.

आता साहित्य गोळा केलेस की फोन कर.आणि हो एक राहिलेच थोडी मिरपूड पण घेवून ठेव.साहित्याचा फोटो काढ आणि मला "व्हॉट्स अ‍ॅप" वर फोटो पाठव.

इतके बोलून मी फोन ठेवून देतो.थोड्याच वेळात "व्हॉट्स अ‍ॅप" वर साहित्याचा फोटो येतो.

,

अर्ध्या तासातच आईचा परत फोन येतो.

आई : सगळे साहित्य घेतले आणि नारळ पण खवून झाला.आता बोल.

मी : हो मी बघीतला.

आता हे सगळे साहित्य एका मोठ्या पातेल्यात घे.त्यात टोमॅटो अर्धे चिरून घाल आणि टोमॅटोची साले सहज निघतील इतपतच उकड.जास्त उकडू नकोस.हे झाले की मला फोटो पाठव.

फोटो मिळाला की मग मीच तुला फोन करतो.

मी फोन ठेवतो.थोड्याच वेळात मला दुसरे फोटो मिळतात.पहिला फोटो आहे तो टोमॅटो उकडण्यापुर्वीचा आणि नंतरचा फोटो आहे तो टोमॅटो उकडल्या नंतरचा.

,

,

फोटो मिळाल्यावर मी आईला फोन करणार, इतक्यात आईने पाठवलेला अजून एक फोटो मिळतो.

,

फोटो बघून मी आईला, फोन करतो.

मी : टोमॅटो मस्त उकडलेत आणि नारळ पण खवून घेतलास ते उत्तम.आता ह्या टोमॅटो मधल्या पाण्याचा वापर करून नारळाचे दूध काढ आणि मग टोमॅटोचा पण मिक्सर मधून गर काढून घे.मला त्यांचे फोटो पाठव.

आईने थोड्याच वेळांत खालील फोटो पाठ्वले.पहिला फोटो नारळाच्या दुधाचा आणि दुसरा फोटो टोमॅटोच्या गराचा.

,

,

फोटो बघीतल्यावर मी लगेच आईला फोन करतो.

मी : फोटो मिळाले.आता एक जाड बूडाची कढई घे.त्यात एक वाटी पाणी घाल.पाणी थोडे उकळायला लागले, की लगेच त्यात थोडे मिरे आणि मिरपूड घाल.आणि त्यात लगेच टोमॅटोचा रस घाल.थोडी उकळी आली आली की, लगेच त्यात नारळाचे दूध घाल.आता त्यात चवी-पुरते मीठ घाल आणि सूप जास्त न उकळता, गॅस बंद कर.

आता मला हे सगळे फोटो पाठव आणि तुझी स्पर्धा संपली की मला सांग.

५-१० मिनिटातच आईने पाठवलेले फोटो मिळाले.

,...,

.

,...,

====================================================

आता सांगायला हरकत नाही, आमच्या (म्हणजे मी आणि माझ्या आईने बनवलेल्या) सूपला, पहिले पारितोषिक मिळाले.

प्रतिक्रिया

वॉल्टर व्हाईट's picture

26 Jun 2015 - 8:31 pm | वॉल्टर व्हाईट

पाककृती आवडली. याला क्रमांक एक चा लेख म्हणुन, द्विपात्री सुपांची मालिका होउन जाउ द्या आता.

उगा काहितरीच's picture

26 Jun 2015 - 9:06 pm | उगा काहितरीच

सोप्प आहे की ! (फक्त नारळाचे दुध काढून द्यावे कुणीतरी .)

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 9:30 pm | मुक्त विहारि

नारळ खवता येत नसेल तर, नारळाच्या करवंटीवर हळूहळू मारा.करवंटी पासून खोब्रे वेगळे झाले की, वेगळे झालेले खोब्रे, किसून घ्या.

हे किसलेले खोब्रे, थोडे गरम पाणी टाकून मिक्सर मधून काढा.

हा रस, गाळून घ्या.

चोथ्यात परत थोडे गरम पाणी घाला आणि मिक्सर मधून काढा.

हा रस परत गाळून घ्या.

चोथा जर अजून ओशट वाटत असेल तर, परत एकदा चोथा आणि गरम पाणी, मिक्सर मधून काढा.

आमच्या इथे नारळ फार उत्त्म मिळत असल्याने ३ वेळा मिक्सर वापरायला लागतो.

जास्तीत जास्त अर्ध्या तासात, एका नारळाचे दूध काढून होते. अगदी खवण्यापासून.

गवि's picture

27 Jun 2015 - 10:09 am | गवि

a

पैसा's picture

29 Jun 2015 - 1:57 pm | पैसा

खोबरेल तेलाचा वास येतो.

gogglya's picture

30 Jun 2015 - 8:04 pm | gogglya

पार ३ र्या धारेचे नारळाचे दूध? खूपच चांगले दिसतायत तिथले नारळ!

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 9:22 pm | मुक्त विहारि

होलसेल दुकानदार असल्याने, भाव पण कमी असतो.

तुम्हाला हवे असल्यास, पुढच्या आकुर्डी ट्रिपला आणतो.

नाहीतर मुला बरोबर पाठवतो.

(तुम्ही पण पुण्यात रहात असल्याने, नारळाला "श्रीफळ" म्हटले आहे.)

मस्त!! आता उद्या टॉमेटोचं सार करणं आलं.

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 9:34 pm | मुक्त विहारि

पण तिखट वापरू नकोस.

मिरे-लवंगा ते काम करतात.

आणि दालचिनी-चक्रीफुल, एक वेगळाच जबरदस्त स्वाद देतात.

सध्या पावसाळा असल्याने, हे सूप नक्की कर.

बाद्वे,

सध्या काय तुझा सौजन्य सप्ताह चालू आहे? की ही पा.कृ. मनापासून आवडली?

(सुडांचे शाब्दीक आसूड सकारात्मक घेणारा) मुवि

सध्या काय तुझा सौजन्य सप्ताह चालू आहे?

कोकणी खवचटपणा समजणार्‍यालाच समजतो. तुम्ही ज्याला सूप म्हणताय, तसं टॉमेटोचं सार करतात आमच्याकडे!!
आता माझा प्रतिसाद परत वाचा, बघा सौजन्य सप्ताह वाटतोय का!! =))

dadadarekar's picture

27 Jun 2015 - 6:10 am | dadadarekar

जिर्‍याची फोडणी दिली की हे तर टोम्याटोचे सार झाले.

हो, तुपाची फोडणी लिहायची राह्यली.

सानिकास्वप्निल's picture

27 Jun 2015 - 12:16 am | सानिकास्वप्निल

++१११

टोमॅटोच्या साराचीच आठवण आली पाकृ वाचून.

मुवि पाकृ लिहिण्याची शैली आवडली :)
फोटो पण छान आणि तुमचे व तुमच्या मातोश्रींचे मनःपूर्वक अभिनंदन!!

मुक्त विहारि's picture

27 Jun 2015 - 6:56 am | मुक्त विहारि

१. तूप-जिर्‍याची, फोडणीची ह्या पा.कृ.ला आवश्यकता नाही.फोडणी केलीत अथवा नाही केलीत तरी चालते.

२. टोमॅटोच्या सारात मी तरी नारळाचे दूध किंवा मक्याचे पीठ वापरत नाही.

तुपाची फोडणी लिहायची राह्यली...

तुम्ही लिहीली नाहीत असं म्हणायचं नव्हतं, माझ्या प्रतिसादात लिहायचं राहून गेलं.

धन्य धन्य ती माउली आणि तिचा लेक!!!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2015 - 9:39 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/soup-smiley-emoticon-emoji.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jun 2015 - 10:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एवढी मिरी चांगली नव्हे. अगदी माझ्यासारख्या अट्टल तिखट खाणार्‍यालासुद्धा बरी नव्हे.

रामपुरी's picture

26 Jun 2015 - 10:15 pm | रामपुरी

अ‍ॅल्युमिनियमच्या कढईत टोमॅटो???

वॉल्टर व्हाईट's picture

27 Jun 2015 - 3:47 am | वॉल्टर व्हाईट

अ‍ॅल्युमिनियमच्या कढईत टोमॅटो???

असल्याने काय होते ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी आहे मायलेकांचा व्दीपात्री पाककृती प्रयोग ! करून पाहण्यात येईल... फक्त मी फोनऐवजी लॅपटॉपसमोर बसून ओरडून सांगेन. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2015 - 1:48 am | डॉ सुहास म्हात्रे

मातोश्रींना अभिनंदन कळवा आणि तुमचे पण अभिनंदन !

एस's picture

26 Jun 2015 - 11:37 pm | एस

छान पाककृती!

अंडे पुणे घालून करता येईल का? ;-)

मुक्त विहारि's picture

27 Jun 2015 - 6:59 am | मुक्त विहारि

दंडवत.

प्रचेतस's picture

26 Jun 2015 - 11:50 pm | प्रचेतस

भले शाब्बास.
एकदम झकास पाकृ.

अरे वा! अभिनंदन! सूप चांगले दिसतेय.

तुम्हा दोघांचे अभिनंदन!! प्रयोग अवश्य करून बघण्यात येईल.

छान.. लिहिण्याची पद्धत खूप आवडली. फक्त तो शेवटच्या फोटोतला सूपचा रंग आवडला नाही..

रमेश आठवले's picture

27 Jun 2015 - 5:12 am | रमेश आठवले

ह्या सूप ची चव थोडी फार सोलकढी ची आठवण करून देते का ?

इरसाल's picture

27 Jun 2015 - 10:13 am | इरसाल

सुटलेत नुसते मुवी.

पैसा's picture

27 Jun 2015 - 10:16 am | पैसा

मस्त लिहिलंय ओ मुवि! सूप म्हणून प्या नायतर सार म्हणून भातावर ओता. दोन्ही मस्तच!

त्रिवेणी's picture

27 Jun 2015 - 3:45 pm | त्रिवेणी

तयार ना.दु. वापरून करुन बघेन.
तुमच्या आई तुम्हाला रागवल्या नाही का तुम्ही त्याना कामाच्या,घाईच्या वेळी असे फोटो बिटो kadhayache रिकामे उद्योग(माझ्या आई च्या भाषेत) करायला संगीतलेत म्हणून.
मी अस काही फ़ोटो सांगितल असते तर---------

पद्मावति's picture

29 Jun 2015 - 12:25 pm | पद्मावति

तुमची मायलेकाची टीम एकदम रॉकिंग आहे.

सुबोध खरे's picture

29 Jun 2015 - 1:49 pm | सुबोध खरे

असेच म्हणतो

कवितानागेश's picture

1 Jul 2015 - 6:40 am | कवितानागेश

मस्तच. ते तिखट पदार्थ कमी करून तयार करेन एकदा.

पिलीयन रायडर's picture

1 Jul 2015 - 10:29 am | पिलीयन रायडर

तुमची आई नीट मोबाईल वापरुन, त्यावर फोटो काढुन (ते ही स्वयंपाक करता करता) आणि यशस्वीरित्या तुम्हाला ते वॉट्सअ‍ॅप वर पाठवते ह्या बद्द्ल फार फार कौतुक वाटले...!!!
सुप नक्की करुन पाहीन..

(एकच बारिकशी काडी - "आईचा फोन येतो" ह्या पेक्षा "आईचा फोन आला" असं हवं ना? तुम्ही थर्ड पार्टी बनुन भल्त्याच लोकांची गोष्ट थोडीच सांगताय. स्वतःचा अनुभव सांगताय, मग "मी फोन ठेवतो" "फोटो येतात" ही वाक्यरचना टेक्निकली चुक नाही का? कुणीतरी हे मला सांगाच राव एकदाचं..)

बॅटमॅन's picture

1 Jul 2015 - 1:00 pm | बॅटमॅन

क्या बात!

सविता००१'s picture

2 Jul 2015 - 9:30 am | सविता००१

पण हे सारच आहे हो मुवि
तुम्ही किस्सा मस्त सागितलाय.
एवढे मिरीचे दाणे शक्य नाही बुवा
बाकी त्रिवेणीशी बाडीस ;)

आपल्याला जाम आवडतं हे. नुसतं प्यायला हि आणि भुरके मारत गरमागरम भाताबरोबरहि....आय हाय मुवि तुस्सी तो छा गये!!!

हा सूप नक्की करून पाहिन