नारळीभात..

प्राजु's picture
प्राजु in पाककृती
18 Aug 2008 - 5:54 am

नारळीभाताची पाककृती अभिज्ञ ने मागितली होती. इथे माझी रेसिपी देत आहे.

साहित्य :
१. १ वाटी बासमती तांदूळ.
२. तूप २ टे, स्पून
३. लवंगा ५-६
४. वेलची ३-४
५. गूळ(किसून किंवा चिरून) सव्वा वाटी
६. ओल्या नारळाचा चव १ वाटी.
७. ड्राय फ्रुट्स

कृती :
१. प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचा मऊ मोकळा भात शिजवून घ्यावा. आणि तो गरम असतानाच एका तसराळ्यात पसरून ठेवावा.. पसरताना त्याची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
२. एका जाड बूडाच्या पातेल्यात तूप घालावे. ते गरम झाले की , त्यात लवंगा आणि वेलची घालावी. त्यातच काजूचे तुकडे, बदामाचे काप इ. सुका मेवा परतून घ्यावा. खूप लाल करू नये.
३. आता त्यात गूळ घालावा. गूळ विरघळू लागतो आणि त्याचा पाक होऊ लागतो. गूळ पूर्ण विरघळला की, त्यात ओल्या नारळाचा चव घालावा आणि चांगले हलवावे. नारळ त्यात शिजू लागतो. आणि गूळाचा पाक घट्ट होऊ लागला की, त्यात शिजवलेला भात घालावा आणि चांगले हलवावे. हलवताना शिते मोडू नयेत. वरून तूप सोडावे. आणि पुन्हा एकदा वाफ येऊ द्यावी. चांगली वाफ आली की गॅस बंद करावा. हवा असल्यास वरून आणखी सुकामेवा घालावा.

माझी नारळीभात करण्याची अशी पद्धत आहे. आणखी कोणाला काही वेगळे माहीती असेल तर इथे जरूर लिहावे ही विनंती.

- प्राजु

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

18 Aug 2008 - 7:49 am | विसोबा खेचर

धन्यवाद प्राजू, ही आमची वीकप्वाईंट रेसिपी..... :)

तात्या.

शितल's picture

18 Aug 2008 - 6:08 pm | शितल

परवा तात्यांनी साखरभात तु नारळीभात...
मस्त चालु आहे...
मी ही असाच खाते म्हणजे आई असाच प्रकारे करते...
मी केलेला नाही अजुन. पण करण्याचे धाडस नक्की करते....

अभिज्ञ's picture

18 Aug 2008 - 9:45 pm | अभिज्ञ

पाककृती बद्दल प्राजुताई आपले धन्यवाद.

आमचा आवडते पक्वान आहे हा भात म्हणजे.

अभिज्ञ.

स्मार्ट बनी's picture

22 Aug 2008 - 3:11 am | स्मार्ट बनी

मीठ कधि घालायचे ? ..भात शिजवतन घातले तर नहि छान लागत ...गुळाबरोबर चालेल? की नहिच घालयचे

प्राजु's picture

22 Aug 2008 - 3:23 am | प्राजु

बहुतेक नसावे. मी तरी नाही घालत. सुगरणींनी प्रकाशझोत टाकावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

22 Aug 2008 - 5:12 am | रेवती

हे गूळ विरघळताना एक चिमूट घालावे, हवे असल्यास!!
रेवती