किस ऑफ लव्ह : जादूची पप्पी

Primary tabs

स्रुजा's picture
स्रुजा in विशेष
8 Mar 2015 - 1:39 am
महिला दिन

नमस्कार मी एक नितीमत्ता रक्षक, धर्म पालक. मी काय काम करतो म्हणता? अहो हेच महान कार्य माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. मी कुठे असतो? अहो मी कुठे नसतो? "संभवामि युगे युगे ", कयामत का दिन या सारखी वचनं त्या प्रभूंनी, अल्लानी आमच्याच जीवावर दिली होती! जिथे जिथे धर्माला ग्लानी येते तिथे तिथे आम्ही तोंडावर पाणी शिंपडायला तत्परतेने हजर असतो.

मध्यंतरी "कीस ऑफ लव्ह" या चळवळीने धुमाकूळ घातला होता. नुकतंच मिसरूड फुटलेल्या वयातली मुलं मुली हिरीरीने या चळवळीचं समर्थन करत होती एखादं कुत्रं जरी खड्ड्यात पडलं तरी त्याला प्रसिद्धी देऊन त्याला जनमानसात कायमचं अमर(?) करणाऱ्या माध्यमांचं काही दिवस या चळवळीवर बरं चाललं. मुळात या धर्मबुडव्यांनी कांगावा सुरु केला जूनमधल्या एका अटकेनंतर. कलाक्षेत्रात काम करणारी एक महिला आपल्या पुरुष सहकाऱ्याबरोबर रात्री प्रवास करण्याचं दु:साहस करत होती, तिला शिक्षा देऊन कायमचं वळण लावण्याचं उच्च काम दोन पोलिस अधिकार्यांनी पार पाडायचं ठरवलं. पण ही बेजबाबदार, पाश्चिमात्य वळणाची तरुण पिढी!! यांना या अत्त्युच्च नीतिमत्तेच्या उचंबळून आलेल्या भावनेतून झालेला थोडा फार कठोर व्यवहार सहन होत नाही. आम्हा सगळ्या स्वयंघोषित नितीरक्षकांचा एक ठोक भावात निषेध करायचा म्हणून तुम्ही जाहीर प्रदर्शन करता? ते ही प्रेमाचं? खरं म्हणजे काडीच्या ही धक्क्याने बुडणारा आपला धर्म अजून जिवंत आहे तो केवळ आमच्या नीतिमत्तेमुळे. एखादी महिला आपल्या मित्राबरोबर खुले आम फिरून जे काही चरित्रहिन प्रदर्शन करतीये ते थांबवण्याचं काम आम्ही स्वतः मद्याच्या धुंदीत आयुष्य सार्थकी लावताना पण न चुकता करतो. आमचा खरं तर सत्कारच करायला हवा.

खरं म्हणजे आयुष्यात प्रेमासारख्या क्षुल्लक गोष्टींना एवढं महत्त्व देण्याचंच काही कारण नाही. केवळ एकमेकांच्या डोळ्यात बघून अथवा एखाद्या देवाची आराधना करून दिव्य संतती होण्याचा उज्ज्वल वारसा सांगणारी महान परंपरा आपली. ते खजुराहोच्या लेण्यांमधल्या काही आकृत्या म्हणे कुणाला अप्रतिम सौंदर्याचा अविष्कार वाटतात. प्रेम भावना म्हणे नाजूक असते आणि तिचा तितकाच तरल आणि शब्दांपलीकडे असणारा आणि तरीही त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना पण चांदण्याचा साज देणारा अनुभव असतो म्हणे. काय हा थिल्लरपणा!

आम्हाला एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र दिसले तर आम्ही त्यांचा हा थिल्लरपणा मुळातून उखडणार. म्हणे आम्ही मित्र आहोत. हा आणखी एक वात्रटपणा. बायकांशी मैत्री करायची?? बाईला केवढं महान कार्य दिलंय निसर्गाने, आमच्या परंपरेने! ती आमची देवी, ती आमची मर्यादा, ती आमच्या भविष्याचा उद्धार करणारी जगन्माता! आता एवढं भारी काम करत असताना तिला स्वतःला नाही जमत स्वतःचं रक्षण करणं, तिच्या कर्तृत्वाला जर बहार आणायची असेल तर तिला वेसण घालायला नको? देवीला मनुष्य सुलभ भावना कशा असतील? तिला मैत्रीची, प्रेमाच्या प्रदर्शनाची, गेला बाजार समुद्रावर बसायला साथीदाराची काय गरज? हा एक प्रकारे तिचा अपमानच आहे ना? सीता-सावित्रीचा वारसा सांगणारा आमचा देश, लग्न झाल्याशिवाय स्त्री तिच्या कोशातून बाहेर येईलच कशी? आणि लग्नानंतरसुद्धा ती बाहेर येणार ते वनवासात जायला, नाहीतर नवऱ्याचं आयुष्य वाढवायला. बाकी तिच्या दैवी शक्तीचा दुरुपयोग करिअर करायला? कुणा अनोळखी पुरुषाशी मैत्री करायला? त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याशी स्पर्धा करायला?? छे छे!! अक्षम्य गुन्हा, अघोर पाप आहे हे …

आता तर हे लोकं म्हणतात की आम्ही चार लोकांसमोर मिठ्या मारणार, मुके घेणार. झालं म्हणजे पानिपतच पार. आमची लहान मुलं काय शिकणार? की हे सगळं निसर्ग निर्मित सहज सुलभ आणि देखणं आहे? त्यांना हे सगळं आवडायला लागलं तर? त्यांचा असा जर गैरसमज झाला की कुणा स्त्रीशी मैत्री करणं किंवा तिच्याबद्दल आकर्षण वाटणं अथवा तिला आकर्षण वाटणं हे पाप नाहीये, तर?? न जाणो उद्या ते बायकांना बरोबरीने वागवायला लागतील. त्यांना वाटेल की ज्या अर्थी सगळ्यांना या भावना आहेत त्या अर्थी त्या अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या मुलभूत गरजा आहेत. हल्ली काय हो जाहिरातीचं युग आहे. आकर्षक वेष्टनात दिसलं की लोक वाट्टेल त्याला भुलतात. उद्या या हसत्या खेळत्या मुलामुलींना बघून त्यांना जर असं वाटलं की मोकळेपणाने वावरणं हा काही गुन्हा नाही, आपल्या आवडत्या माणसाने एखाद्या अत्त्युत्कट क्षणी उत्स्फूर्तपणे हात पकडणे अथवा मिठीत घेणे याने निर्भेळ आनंद होतो तर मग? हे चरित्रहिन लोकं साध्या रातराणीच्या सुगंधाने मोहरून येतात, त्यांना चांदण्यात फिरताना मारवा ऐकू येतो, पहाटेच्या निरव शांततेत त्यांना म्हणे समुद्राची गाज ऐकायची असते, कुणी तरी आवडतं त्यांना आणि मग त्यांच्या आयुष्यात म्हणे केवड्याचा वास भरून राहतो. बर यांना हे सगळं गुलदस्त्यात ठेवायचं नसतं. त्या आवडत्या माणसाला घेऊन म्हणे लग्नाआधी फिरायचं असतं, काय तर म्हणे मोरपंखी दिवस असतात, फुलपाखरासारखे उडतात ते दिवस सोनेरी वर्ख लावून. कप्पाळ माझं. आणि अहो कधी कधी ते उच्चशिक्षण घेतात हे सगळं चालू असताना.. मग म्हणे कमवत नाहीत लग्न कसं करायचं? काय गरज आहे उच्च न फिच्छ शिक्षणाची? आम्ही कुठे पास झालो कॉलेज तरी? नोकरीच करणार न कुठे तरी शिक्षण घेऊन. देशाची अर्थव्यवस्था गेली उडत आधी लगीन धर्माचं. आधीच आमचा धर्म सतत अतिदक्षता विभागात असतो. कोमात जाईल ना तो असल्या विचाराने!!

काही नाही तुम्हाला सांगतो हा सगळ्या त्या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आहे. आम्ही कधी गेलो नाही तिकडे, कशाला जायचं पाप्यांच्या देशात? पण माहिती आहे न आम्हाला सगळं सगळीकडचं. हल्ली ही युवा पिढी जाते तिकडे आणि इकडे येउन आम्हाला अक्कल शिकवते. तिकडे काय म्हणे वयाच्या १५-१६ व्या वर्षापासून मुलं मुली हिंडतात गळ्यात गळे घालून. ते निर्लज्ज लोक याला डेटिंग म्हणतात. शाळा कॉलेज मध्ये नाचगाण्याचा कार्यक्रम होतो, तिथे पालकपण जातात. मुली तर सगळ्या नटमोगऱ्या. आई बाबा कौतुक करतात, तो मित्र येउन अदबीने बाहेर घेऊन जातो, मुलींना असं डोक्यावर चढवतात की त्यांना लग्न आधी हिंडणं फिरणं यात गैरच वाटत नाही. खुशाल एखादा मुलगा आवडला तर त्याच्याशी बोलतात, जेवायला जातात बाहेर. आमच्या बायका बघा, आमच्या हातात असलं ना तर चूल न मुल शिवाय काही करायची तसदी घेऊ देणार नाही आम्ही. या असल्या वागण्याने त्या मुली फारच डोईजड होतात. तिथल्या लोकांना चरित्र हे फक्त बाईच्या वागण्याशी संलग्न असतं एवढं साधं गणित कळत नाही आणि मग त्या मुली म्हणे त्यांच्या उमलत्या वयात (धर्मबुडव्यांचा लाडका शब्द, माझा नाही) प्रेमाबाद्दलच्या आणि स्वतःच्या सगळ्याच भावनांबाद्दलच्या भलत्या सलत्या कल्पना घेऊन मोठ्या होतात. त्यांना मग आदर हवा असतो, बरोबरीची वागणूक हवी असते, नवरे किंवा मित्र यांना प्रेमाने (कसलं बोडक्याचं प्रेम!) जवळ घेतात किंवा चुंबन घेतात, त्यांच्या नटमोगरेपणाला सौंदर्य समजतात आणि या बायका त्यात स्वतःच्या स्त्रीत्वाचा गौरव समजतात. या बायका बाहेर जाऊन नोकऱ्या तर करतातच शिवाय हवे तसे कपडे घालतात, हवं तिथे हवं त्याच्याबरोबर फिरतात आणि पुरुष सगळे 'असेल त्यांना आवडत असले कपडे, जिचा तिचा प्रश्न" म्हणून सोडून देतात?? या मुलींची अपेक्षा वर अशी की त्यांचं नातं हळुवारपणे उलगडत जावं, एखाद्या हळव्या जुन्या चित्रपटासारखं मनावर उमटत जावं, त्यांच्या स्त्री असण्याची दखल घेऊन आणि तरीही त्यांना बरोबरीने वागवून अन त्यांच्या समर्पणाला स्वामित्व बहाल करून पुढे सरकावं, काय ही जगावेगळी अपेक्षा! कुणाला एवढा वेळ आहे? आम्हाला धर्म वाचवायचाय. ज्या मुला मुलीना आमचा प्राधान्यक्रम कळत नाही, ज्यांना या उथळ भावनांनी घेरून टाकलंय त्यांना आम्ही वठणीवर आणणारच. सांगा बर आमचा काय चुकलं?

प्रतिक्रिया

साती's picture

8 Mar 2015 - 6:50 pm | साती

तिरकस शैलीतला लेख आवडला.

अन्या दातार's picture

8 Mar 2015 - 11:39 pm | अन्या दातार

लेख आवडला.

भाग्यश्री's picture

11 Mar 2015 - 4:34 am | भाग्यश्री

सहमत!

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 7:24 pm | सविता००१

नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर लेख.
जो तिरकसपणा आहे तो अगदी भावला मनाला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 7:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकदम संस्कृतीरक्षकांच्या डोस्क्यात घूसून लिहीलेला लेख :)

आवडला, हेवेसांन.

जुइ's picture

9 Mar 2015 - 12:09 am | जुइ

लेखातील तिरकसपणा आवडला :)

छान फटके लावलेत. वाचताना मजा वाटली.
सांगा बर आमचा काय चुकलं?
छ्या! अज्याबात नाही. असाच विचार करत र्‍हावा........

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 5:03 am | स्पंदना

हाण्ण तेच्या मारी!!
न्हेउन ठेवला घाटावरी!!

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 5:05 am | स्पंदना

तसे हे धटींगण आमच्या किंवा त्यांच्या धर्मात दुष्टांचे निर्दालन करणार्‍या स्त्रीयाच होत्या हे सोयिस्कर विसरतात.

इशा१२३'s picture

9 Mar 2015 - 7:34 am | इशा१२३

छान फटके टाकलेस तथाकथीत धर्मरक्षकांना!शैली छानच.

अजया's picture

9 Mar 2015 - 10:11 am | अजया

ये हुई ना बात!दे दणादण!!

मितान's picture

9 Mar 2015 - 10:32 am | मितान

खमंग शैली आवडली. :)

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 11:41 am | मधुरा देशपांडे

लेख आवडला.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 2:12 pm | प्रीत-मोहर

आवडेश ग.

सस्नेह's picture

9 Mar 2015 - 3:53 pm | सस्नेह

सुसंस्कृतता आणि उथळ दिखावेगिरी यातली सीमा फारच पुसट झालीय...
लेखन छान .

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 4:58 pm | सामान्य वाचक

छान लेख

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 9:55 pm | स्वाती दिनेश

चिमटे घेत लिहिलेला लेख आवडला,
स्वाती

कौशी's picture

10 Mar 2015 - 1:49 am | कौशी

मस्तच, आवडले लेखन.

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2015 - 2:51 pm | सानिकास्वप्निल

लेख तर आवडलाच पण लेखन शैली जबरदस्त.
जे फटके लगावलेस ते कडक एकदम....आवडेश.

वेगळ्या शैलीतला लेख आवडला !!

स्वाती२'s picture

11 Mar 2015 - 12:31 am | स्वाती२

लेख आवडला.

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 9:02 am | प्राची अश्विनी

एकदम सही!

एकदम मस्त लिहिले आहेस ग..आवडेश

स्पा's picture

13 Mar 2015 - 2:06 pm | स्पा

असेच म्हणतो

एक नंबर लेख आहे. फेबुवर टाकुयात का?

स्रुजा's picture

20 Mar 2015 - 6:21 am | स्रुजा

हो टाक ना :)

कन्यारत्न's picture

12 Mar 2015 - 4:16 pm | कन्यारत्न

छान कानउघनि करनारा लेख...

भिंगरी's picture

13 Mar 2015 - 10:28 pm | भिंगरी

खेकड्याची चाल.
निघाली संस्कृती रक्षकांची खाल.

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 12:42 am | उमा @ मिपा

चपखल! वर्मी घाव घातलायस.

विशाखा पाटील's picture

15 Mar 2015 - 10:30 am | विशाखा पाटील

किती चिमटे घेतलेस! लालबुंद होतील ना बिच्चारे!
फारच आवडलं! हे वाचताना याच अंकातली पद्मश्री चित्रे यांची 'जगणे कसले' ही कविता आठवली.

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 11:24 pm | मनुराणी

मस्त लिहिलेस स्रुजा.

निवेदिता-ताई's picture

15 Mar 2015 - 11:33 pm | निवेदिता-ताई

छान ग

त्रिवेणी's picture

16 Mar 2015 - 12:49 pm | त्रिवेणी

नेहमीप्रमाणेच दमदार लेखन.

पैसा's picture

16 Mar 2015 - 5:09 pm | पैसा

फटकेबाजी मस्तय!

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2015 - 6:16 pm | पिलीयन रायडर

अरे... किती ते चिमटे!!!
जमलाय लेख!

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:47 pm | कविता१९७८

मस्त लेख

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:47 pm | कविता१९७८

मस्त लेख

स्रुजा's picture

20 Mar 2015 - 6:19 am | स्रुजा

सगळ्यांना धन्यवाद :)

अंतरा आनंद's picture

20 Mar 2015 - 2:38 pm | अंतरा आनंद

मस्त जमलाय लेख. फक्त उपरोधाची धार मध्ये मध्ये कमी झाल्यासारखी वाटते.

पटलं मला. काहीतरी विस्कळीत मला पण वाटत होतं. पण तुम्ही नेमकेपणाने सांगितलत.

अतिशय सुरेख लेखनशैली...लेख अप्रतिम.

श्रीरंग_जोशी's picture

23 Mar 2015 - 1:05 am | श्रीरंग_जोशी

मार्मिक लेखन आवडलं.

एस's picture

23 Mar 2015 - 3:08 pm | एस

अतिशय मार्मिक आणि कडक.

पिशी अबोली's picture

25 Mar 2015 - 1:21 pm | पिशी अबोली

आवडलं.. :)