`रामदास'बोध

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
8 Aug 2008 - 5:22 pm

सं त अंबुमणी रामदास महाराजांचा वर्ग सुरू होता. स्वतः रामदासबुवा व्यसनमुक्तीवर प्रवचन देत होते. समोर साक्षात "भीष्माचार्य' अमिताभ, "युधिष्ठिर' आमिर, "दुर्योधन' सलमान, संजूबाबा, यांसारखे ज्ञानी, अभ्यासू, विचारवंत श्रोते बसले होते. बिपाशा, करीना, दीपिका, प्रियांका यांसारख्या भक्तिणींचा मेळाही जमला होता. सध्या फारशा चर्चेत नसलेल्या मनीषा, राणी, प्रीतीसारख्या भक्तिणी एका बाजूला स्वेटर विणण्याचं सामान आणि तूप व वाती घेऊन बसल्या होत्या.
महाराजांची रसवंती झरझर पाझरत होती. अनेक श्‍लोक, ओव्या, जुन्या काळचे संदर्भ, ताज्या काळातली व्यसनाधीनतेची भीषण स्थिती, यांवरची उदाहरणांमागून उदाहरणं दिली जात होती. कोपऱ्यात बसलेल्या एका श्रोत्याचं मात्र या सगळ्याकडे लक्ष दिसत नव्हतं. तो धुराची वलयं सोडण्यात मग्न होता. "हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया'छाप भाव त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. अखेर रामदासबुवांनी त्याला झापलंच.
"तुमच्या कीर्तनात व्यत्यय तर येत नाहीये ना? छातीचा खोका झाला, तर माझ्या होईल. तुम्हाला काय करायचंय?' स्वभावाप्रमाणं आगाऊपणानंच त्यानं बुवांना विचारलं.
बुवा चरकले, तसंच श्रोतेही.
कुणी तरी विचारलं, "कोण आहे रे तो उर्मट माणूस?'
त्याच क्षणी शेजारच्यानं त्याच्या खाड्‌कन मुक्‍सटात मारली.
""बॉलिवूडच्या "किंग'ला ओळखत नाहीस?'' पाठोपाठ प्रश्‍न आला.
बुवांनी शाहरुखला आणखी खडे बोल ऐकवले. शाहरुखही गप्प बसला नाही. शब्दाला शब्द वाढला आणि वातावरण एकदम तापलं. मग शाहरुखचे मित्रही त्याच्या मदतीला धावले. बच्चनही मदतीला धावले. नंतर बुवांनीच नमतं घेतलं आणि कीर्तन उरकून टाकलं.
मध्यंतरी काही काळ गेला. एरवी शांत, विचारवंत, बुद्धिवंत म्हणून प्रसिद्ध असलेला एक श्रोता - आमिर हा छुपा रुस्तम ठरला. एरवी कुठल्याही वादात आणि "सोहळ्या'त न पडणाऱ्या (आणि फक्त चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीच प्रेसशी जवळीक साधणाऱ्या) आमिरनं स्वतःच सिगारेटच्या व्यसनात अडकल्याचं कबूल करून टाकलं, तेव्हा रामदासबुवांसकट अख्ख्या चित्रपटसृष्टीला धक्का बसला. मात्र, भाच्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आपण या "विकतच्या दुखण्या'तून मुक्त होऊ, असंही जाहीर करून आमिरनं रामदासबुवांना थोडा धीर दिला.
नेहमीच्या स्पर्धेप्रमाणं आधी व्यसन कोण सोडणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. स्वतः व्यसनाची कबुली देणारा आमिरच ग्रेट आणि व्यसन न सोडण्याचं जाहीर करणारा शाहरुख उद्धट, याविषयी कुणाचं दुमत नव्हतं. पण शेवटी "किंग'नंच बाजी मारली.
रामदासबुवांच्या उपदेशाच्या डोसानं नव्हे, तर मुलांच्या प्रेमानं ही किमया केली होती. आपण विमानात 17 तास सिगारेटविना राहू शकतो, तर जमिनीवर का राहू शकणार नाही, असा साक्षात्कार "किंग'ला झाला. कदाचित, त्याला "स्टार' बनविणाऱ्या "बाजीगर'मधल्या एका वचनानं त्याला प्रेरणा दिली असावी- "हार कर भी जितनेवाले को "बाजीगर' कहते है।'

ता. क. ः सिगारेट सोडण्याची "अफवा' शाहरुखनं पुन्हा नाकारली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा रामदासबुवांच्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा विचार त्याचे कुटुंबीय करत आहेत, म्हणे!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

8 Aug 2008 - 9:38 pm | प्रकाश घाटपांडे


सिगारेट सोडण्याची "अफवा' शाहरुखनं पुन्हा नाकारली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा रामदासबुवांच्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा विचार त्याचे कुटुंबीय करत आहेत, म्हणे!


हे तिथ आले तं त्यान्ला व्यसन लावतील.
प्रकाश घाटपांडे

अनिल हटेला's picture

9 Aug 2008 - 10:55 am | अनिल हटेला

हे हे हे !!
काय आहे !!!

महाराज !!

ह्या लोकच्या सिगारेट पिण्याला सुद्धा तुम्ही मिपा वर जागा करुन दिलीत की !!

अवान्तरः आम्ही ही फुके आहोत म्हटल!! ह. घ्या..

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~