ठिणगीच्या शोधाचा समारोप.

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
7 Aug 2008 - 9:11 pm
गाभा: 

गेल्या काही लेखांमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी केला.माझी भाषा ,मांडणी आणि त्यातून मांडत असलेल्या विचारांचा कुठेतरी गोंधळ होतो आहे हे पाहिल्यानंतर समारोपाच्या ह्या लेखात काही मुद्दे परत तुमच्यासमोर ठेवत आहे.
१:दहावीचे मार्क आणि पुढची करीयरची वाटचाल याचा एकमेकांशी फारसा संबंध जोडू नये.दहावीचे मार्क एक इंडीकेटीव्ह मेझर आहे असे समजावे.पालक या मार्कांवर अनाठायी विश्वास ठेवून मुलांच्या मनावर आपल्या महत्वाकांक्षा लादण्याचा हट्ट करतात.
२:काही मुलांच्या मनात ९०% म्हणजे हुशार आणि म्हणून सायन्स हा गैरसमज भरवला जातो.
३:सरकारी कॉलेज वगळता इतर खाजगी संस्थांमध्ये व्यावसायीक शिक्षणाचा खर्च किती असतो याची पालकांना काडीमात्र कल्पना नसते.इंजीनीयरींग सुमारे आठ लाख आणि वैद्यकीय शिक्षणासाठी सुमारे विस लाख.हा खर्च येत्या तीन वर्षात दुप्पट होण्याची शक्यता आहे.तीन वर्षापूर्वी हाच खर्च निम्मा होता.
४: ९०%टक्के मार्क मिळवलेल्या मुलांना आणि पालकांना सरकारी जनरल कॅटेगरीतल्या जागा आणि त्यासाठी स्पर्धकांचं प्रमाण काय आहे याची कल्पना नसते.
५: सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या मुलांना आणि पालकांना अकरावीचे वर्षं विश्रांतीचे नाही.कायम सजग राहून मुलांनी अभ्यासाकडे आणि पालकांनी त्यांच्या वागणूकीकडे लक्ष ठेवून ती नवीन वातावरणात वाहवत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
अकरावीत जर गुणवत्ता घसरली तर बारावीनंतर डोनेशन ची तयारी ठेवावी.सुमारे तीन ते तीस लाख.
वरील पाच मुद्दे आजूला बाजूला, नातेवाईकांमध्ये,पोहचवण्यासाठी तुम्ही काउंसीलर असण्याची गरज नाही.केवळ पोटतिडीकेपोटी हा कार्यक्रम मी बरीच वर्षे राबवीत आहे.माझा पोटापाण्याचा व्यवसाय सांभाळून.
माझे आधीचे आणि हा लेख वाचून आपल्यापैकी कुणिही हा कार्यक्रम करायचे ठरवले तर मी एका पायावर तयार आहे.आपण हे कार्य स्वताच केले तर फारच उत्तम.माझ्यासारखे शंभर प्रभू दिवसरात्र राबले तरीही ह्या समस्येचा फारच थोडा भाग काबूत येईल.शंभर कशाला दहा प्रभू या निवेदनातून तयार झाले तर ही लेखमालीका सफल झाली असे मी समजेन.एकदा का ही साखळीची क्रिया सुरु झाली की मग प्रभूंच्या लेखमालेची आवश्यकता संपेल पण तोपर्यंत आपलं भेटणं अनिवार्य आहे.
You can not reach people who do not want to be reached and people will reach you when the issue hits them hard.so raise the issue and forget about success rate.
Amen.

प्रतिक्रिया

धनंजय's picture

7 Aug 2008 - 9:31 pm | धनंजय

थेट असल्यामुळे सहज समजली.

मुद्दे क्र १ आणि २ कळीचे. हे समजले तर "कला/वाणिज्य = हुशार नाही" सारखे चुकीचे समज दूर होतील.

३, ४ मुळे अवास्तव ताण घ्यायला नको, पण योजना आखण्यासाठी ही माहिती असणे महत्त्वाचे.

५. मध्ये "भरकटणार नाही याच्याकडे लक्ष देणे" हा मुद्दा आवडला. पण पौगंडावस्थेतली ही वर्षे (भावी व्यवसायावेगळी) मानसिक वाढ होण्यासाठीही जरुरीची असतात, याच्याकडे डोळेझाक होता कामा नये.आईवडलांच्या सुरक्षाछत्राखाली, थोडीशी चक्रम डेअरिंगबाजी करून जगाकडून टक्केटोणपे खाणे, थरार अनुभवणे, हे मानसिक प्रशिक्षण पूर्णपणे बाद करू नये.

तुमच्या सेवाभावी कामाबद्दल तुमचे अभिनंदन! अशाच ठिणग्या पेटवत राहा, हीच तुम्हाला माझी विनंती.

प्रियाली's picture

7 Aug 2008 - 9:39 pm | प्रियाली

माहिती वाटली. आणखी विस्तृतही चालली असती.

परंतु, पाचही मुद्दे मुलांना इंजिनियर किंवा डॉक्टर बनवण्यासाठीच उपयुक्त वाटले. त्याव्यतिरिक्तही जग असते आणि करियरच्या संधी उपलब्ध असतात याचीही जाणीव करून देता का? वेगळ्या शब्दांत, विविध करियर-ऑप्शन्सची ओळख करून देता का?

संजय अभ्यंकर's picture

7 Aug 2008 - 10:08 pm | संजय अभ्यंकर

आपली लेखमाला आपण लवकर संपवलीत!

१. आपल्या जवळ सांगण्या सारखे खूप आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे.
परंतु मि.पा. वरून (ह्या विषयाशी संबंधित) फार लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नाही, ह्याचीही जाणिव आहे.

२. आपण आपले प्रबोधन विविध व्यासपीठांवरुन चालू ठेवावे ही विनंती.

३. प्रियालीजींनी सांगितल्या प्रमाणे पर्यायी क्षेत्रांची माहीती पालक व पाल्यांना व्हावी असे मला ही वाटते. ह्या विषयी, आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभदायक ठरेल.

४. आपल्या सारखे तज्ञ भारतात आहेत, परंतू अमेरिकनां प्रमाणे आपण भारतीय, आपले ज्ञान पुस्तक रुपाने वाटत नाही, ह्याची खंत मला नेहमी वाटते.
प्रकट प्रबोधना व्यतिरिक्त, आपण आपले प्रबोधन पुस्तक रुपाने प्रसिद्ध केल्यास, आपले विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचतील असे वाटते.

धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

8 Aug 2008 - 1:27 am | चतुरंग

संजय अभ्यंकर म्हणतात तसे आपण ह्या विषयावर पुस्तक लिहा अशी माझी विनंती आहे. पुस्तकाने आपण खूप लोकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोचता.

पुढील मुद्द्यांचा उहापोह त्यात असला तर सामान्य माणसांपर्यंत ते नीट पोचेल असे मला वाटते.

१:दहावीचे मार्क आणि पुढची करीयरची वाटचाल याचा एकमेकांशी फारसा संबंध जोडू नये.दहावीचे मार्क एक इंडीकेटीव्ह मेझर आहे असे समजावे.पालक या मार्कांवर अनाठायी विश्वास ठेवून मुलांच्या मनावर आपल्या महत्वाकांक्षा लादण्याचा हट्ट करतात.

नुसते संबंध जोडू नये असे सांगून लोक ऐकत नाहीत. कारण सरळ आहे इंजिनियरिंग मधेच सर्व काही नाही असे मी सांगितल्यावर लोक विचारतात "तू इंजिनिअर झालास आणि आम्हाला त्यात काही नाही असे सांगतोस मग तू वेगळी करियर का नाही घेतलीस?" तेव्हा वेगळे समर्थ पर्याय कोणते आहेत, पर्याय निवडून व्यवहारिक आयुष्यात यशस्वी झालेले/यशाच्या वाटेवर असलेले कोण आहेत ह्याची माहिती ही जास्त उपयोगी पडेल.

२:काही मुलांच्या मनात ९०% म्हणजे हुशार आणि म्हणून सायन्स हा गैरसमज भरवला जातो.

काही मुलांच्याच कशाला अजूनही आपल्याकडे पालकांच्या डोक्यातही आर्टस्/कॉमर्स म्हणजे गल्ली चुकलेले लोक हे समीकरण पक्के असते. त्याहून आणखी वेगळी करियर म्हणजे व्यावसायिक चित्रकार, गायक, वादक म्हणजे तर वाया गेलेलेच लोक! मुळात ९०% म्हणजे हुषार ह्याचीच पुन्हा छाननी व्हायला हवी असे माझे मत आहे.

३:सरकारी कॉलेज वगळता इतर खाजगी संस्थांमध्ये व्यावसायीक शिक्षणाचा खर्च किती असतो याची पालकांना काडीमात्र कल्पना नसते.इंजीनीयरींग सुमारे आठ लाख आणि वैद्यकीय शिक्षणासाठी सुमारे विस लाख.हा खर्च येत्या तीन वर्षात दुप्पट होण्याची शक्यता आहे.तीन वर्षापूर्वी हाच खर्च निम्मा होता.

इथेही दुसरे समर्थ पर्याय कोणते आहेत ह्याचे विस्ताराने स्पष्टीकरण आवश्यक वाटते. कारण नाही म्हटले तरी मुलांच्या भवितव्याचा प्रश्न म्हटल्यावर लोक सर्व गोष्टींचे डिसेक्शन करुन बघणारच!

४: ९०%टक्के मार्क मिळवलेल्या मुलांना आणि पालकांना सरकारी जनरल कॅटेगरीतल्या जागा आणि त्यासाठी स्पर्धकांचं प्रमाण काय आहे याची कल्पना नसते.
वरील मुद्द्यासाठी पुन्हा एकदा विस्तृत आकडेवारी, चार्टस ह्याची वर्षानुसार माहिती आणि उदाहरणे हे मोलाची आणि नेमकी दृष्टी पुरवतील.

५: सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या मुलांना आणि पालकांना अकरावीचे वर्षं विश्रांतीचे नाही.कायम सजग राहून मुलांनी अभ्यासाकडे आणि पालकांनी त्यांच्या वागणूकीकडे लक्ष ठेवून ती नवीन वातावरणात वाहवत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
धनंजय म्हणतो तसे 'योग्य प्रयोगातून' शिकण्याची संधी ही शिस्तीच्या बडग्याखाली चिरडली जाऊ नये इतपत अंकुश असावा. पण हे पुन्हा व्यक्तिसापेक्ष होत जाते त्यामुळे प्रबोधन हा एक मार्ग ठरतो.

बाकी आपले प्रयत्न, त्यामागची कळकळ, सामाजिक जाणीव ह्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा!

चतुरंग

विदुषक's picture

8 Aug 2008 - 12:04 pm | विदुषक

माझ्या मते तर सध्य्या
तूमची बुद्धीमत्ता - घेतलेले शिक्षण - नोकरी/व्यवसाय - आणी मिळणारा पैसा - ह्यान्चा अपापसात काहिही सम्बन्ध नसतो ....
असलाच तर ... inversly praportional (मराठी मधे काय म्हणतात ?)

मजेदार विदुषक

inversly praportional... यास मराठी मधे "व्यस्त प्रमाण" असे म्हणतात

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 1:37 pm | विसोबा खेचर

यावेळेस अगदी साध्या, सोप्या अन् सरळ शब्दात लिहिल्यामुळे लेखन समजायला अत्यंत सोप्पे गेले! अभिनंदन प्रभूसाहेब! :)

आपली कळकळ समजली. येणारे दिवस हे खरंच आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत ही अंमळ चिंता करण्याजोगीच बाब आहे. आपण या बाबतीत शक्यतो वर्तमानपत्रातदेखील अगदी असंच भरभरून व पोटतिडिकेने लिहित रहावे.

तात्या.