तलकाडू : एक प्रवास

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 7:49 am

मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी!

म्हैसूर मधली ती प्रसन्न सकाळ अवतरली. बाकीचे सगळे आवरे पर्यंत म्हटलं,जरा लॉजच्या बाहेर जाऊन चौकशी करून यावी. रस्त्यावर येऊन एका स्वच्छ छानशा हॉटेल मध्ये शिरलो. शिरता क्षणी एका सुंदर भव्य पोस्टरने माझे लक्ष वेधून घेतले. टिपिकल दाक्षिणात्य पध्द्तीच्या गोपुराच्या व सुंदर कळस असलेले मंदिर मनाला भुरळ घालत होते. खाली मंदिराचे नाव वाचले “श्रीकान्तेश्वर शिवालय, नंजनगुड”. म्हटलं, अरेच्या, दोन दिवसा पुर्वी घाईत इंटरनेट्वर बघत असताना नोंद घेतलेल्या दोन ठिकाणां पैकी एक. हे ठिकाण म्हणजे गोपुरवालं शिवालय मंदिर. विचार केला अशी बरीच मंदिरे बघितली, परत आणखी एक बघायचं ? नको! नाहीतरी, नंजनगुड हे म्हैसूर पासुन फक्त २३किमीवर होते . परत कधीतरी चार तासात उरकता आल असतं. हे ठिकाण कॅन्सल.

आता उरलं दुसरं ठिकाण, तलकाडू. रेषा काढून जोडले तर बंगळूरू, म्हैसूर व तलकाडू हा त्रिकोण तयार होतो. बंगळूर ते म्हैसूर १५० किमी. म्हैसूर पासून तलकाडू ४५किमी. म्हणजे जायला जास्तीत जास्त २तास. तिथून बंगळूरु ४ तास. मंदिर बघायला३तास. बाकीचा वेळ २ तास. असे साधारण ८ -९ तास म्हणजे आता सकाळी ८ ला सहल सुरू केली व तलकाडूवरूनच संध्याकाळी पाच सहाला जरी निघालो तरी रात्री ९ वाजेपर्यंत परत बंगळूरुला प्रफुल्लकडे आरामात पोहोचता येईल.

तलकाडूचा त्रिकोण
Img-01

अरे हो, तुम्हाला प्रश्नच पडले असतील की म्हैसूर-बंगळूरु काय, नंजनगुड-तलकाडू काय अन प्रफुल्ल काय? थांबा, जरा स्पष्ट करुन सांगतो. प्रफुल्ल माझा मेव्हणा,त्याची बंगळूरूला बदली झाली. मग तो आणि त्याची पत्नी धनश्री तिकडे बनसवाडीला फ्लॅट भाड्याने घेवून राहायला गेले. वर्षभरानंतरच आनंदाची बातमी आहे असा निरोप आला. प्रफुल्लची आई म्हणजेच माझ्या सासूबाई काळेकाकू तिकडे पोहोचल्या. पंधरा दिवसांनंतर ती आनंदाची बातमी आली, “कन्या रत्नप्राप्त झाले” ! ज्या बातमीची आम्ही आतूरतेने वाट पहात होतो ती मिळताच घरात आनंदाचे वातावरण पसरले.

चार पाच दिवसातच मी, माझी पत्नी सौ. अपर्णा व मुलगा आदित्य असे तिघेजण बंगळूरूला बनसवाडीला प्रफुल्लच्या घरी पोहोचलो. नवागत बाळाचे सु-मुख पाहिले. सर्वांनी आनंद साजरा केला. आठवडा मजेत गेला. पुण्याला परत येण्या पुर्वी दोन चार दिवस हाताशी होते म्हणून म्हैसूर-दर्शन करावे असे ठरले. साता-आठ वर्षांपुर्वी म्हैसूर पाहिले असल्यामुळे परत ही सहल करण्यात मला व सौ. अपर्णाला फारसा रस नव्हता पण काळे काकूंच्या खास आग्रहा वरून आम्ही म्हणजे मी, सौ. अपर्णा, आदित्य व काळेकाकू असे चौघेजण म्हैसूरला पोहोचून तिथल्या स्थल-दर्शनाचा आनंद घेतला. या वेळी “एक मे” हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस या दरम्यान आल्यामुळे, दहा लाख विजेच्या दिव्यांनी लखलखणारा म्हैसूर पॅलेस पाहता आला. ही अप्रतिम अशी “ वास्तू-दिवाळी ” पाहून डोळ्याचे पारणे फिटले. आता एक दिवस हातात उरला होता. बंगळूरूमध्ये असताना इंटरनेट बघताना म्हैसूर जवळील नंजनगुड व तलकाडू ही दोन ठिकाणे छोट्या सहली साठी खुणावत होती. घाईत असल्या मुळे या दोन ठिकाणांची अतिशय त्रोटक माहिती घेतली गेली. नंजनगुड व तलकाडू या दोन नावा शिवाय काहीच लक्षात राहिले नव्हते.

हॉटेलमध्ये काऊंटर वरील मॅनेजर कडे तलकाडूला कसे जायचे याची चौकशी केली असता त्याने सांगितले, यहॉसे तलकाडू जानेके लिये बहोत बस हैं, उधर ” केएसआरटीसी” के बसस्टॅन्डसे बस मिलेगा. लगेच लॉजवर परतलो. सगळे तयार होतच होते. माझीच वाट पहात होते. मी घोषणा केली “ आपण आता तलकाडू जाणार आहोत. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले . “तिथे कावेरी नदीच्या किनारी सुंदर मंदिरे आहेत, ती पहायला आपण जाणार आहोत” असे सांगून घाई करून आवरायला लावले. मग चेक-आऊट करून बसस्टॅन्ड गाठले. तलकाडूच्या नावाची पाटी कुठेच दिसली नाही ! कन्ट्रोलरकडे जावून विचारले असता, त्याने मोडक्या-तोडक्या हिन्दित " तलकाडूको दिनभरमे दो ही बसेस जाता है. एक सुबह आठ बजे और दुसरा दोपरको तीन बजे." बापरे, आता तर साडे आठ वाजलेत, आठ्ची पहिली बस निघून गेली. दुसरा काही मार्ग आहे का? तर, इथून टी. नरसीपुरला जायचे अन तिथून तलकाडूला जायला जीप किंवा रिक्षा पकडायची. आणी, टी. नरसीपुरची बस देखील दोन तासांनी आहे. उशीर करत राहिलो तर उपलब्ध वेळेत हा स्थलदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण होण्यासारखा नव्हता.

अब दुसरा कौनसा बस नहीं मिलेगा क्या असे विचारल्यावर तो उत्तरला “सामनेसे प्रायव्हेट बस हैं, वॅंहा से जाव” या “ सामनेसे” वाल्या ठिकाणाला पोहोचायला दोन चौक अन तीन वळसे मारून पल्याडच्या रस्त्याला लागलो. बॅगा सांभाळत चौघानी तेथे पोहोचणे ही कसरतच झाली.

या स्टॉपवर “ म्हैसूर सिटी” छाप लोक नसून रंगीबेरंगी कपडे घातलेले ग्रामिण लोक होते. त्यांना अजिबात हिंदी अथवा इंग्रजी येत नव्हते. एखादी बस स्टॉपवर आली की, आम्ही पळत जाऊन विचारायचो “तलकाडू?” तर ते “ नाही” या अर्था्ची मान हालवत, त्यांना हवी असलेली बस असेलतर पकडून निघून जात. इतर ठिकाणच्या बरयाच बसेस जात होत्या, पण तलकाडूची बस काही लवकर येत नव्हती. चिंताच वाटायला लागली. थोड्या वेळाने एक बस आली. ती तलकाडूचीच निघाली. खासगी बस होती ती. आम्ही चौघेही पटकन बसमध्ये चढलो. बस मिळाली बघून हायसे वाटले. ही तिकडची टिपिकल जुनी टुरिस्ट बस होती. टुरिस्ट रुटवरून रिटायर होवून आता इकडे आली असणार. दहा पंधरा मिनिटात बस फुल्ल झाली. बस विविध संभाषणांनी अन कानडी हेलांनी भरून गेली. कोलाहल वाढू लागला. गाडीत चक्क तीन कंडक्टर होते !

बस दर दोन-तीन किमी नंतर थांबायची अन आधीच गच्चभरलेल्या गाडीत आणखी पंधरा-वीस प्रवासी चढायचे. काही पुढच्या दरवाजाने तर काही मागच्या दरवाज्याने ! पुढ्चा कंडक्टर पुढच्या दरवाजातल्या लोकांचे पैस घ्यायचा तर मागचा कंडक्टर मागच्या दरवाजातल्या लोकांचे पैस घ्यायचा ! बसमधला कानडी कोलाहल वाढू लागला. एक हिंदी-इंग्रजी शब्द कानावर पडेल तर शपथ ! आम्ही कावरल्या बावरल्या सारखे झालो. कोणाशी लावे, कोणाला विचारावे काहीही समजेना.

Img-02

पुढच्या सीटवर नीटनेटक्या कपड्यातले, शहरी वाटणारे एक गृहस्थ होते. त्यांना विचारले, “डू यू अंडरस्टॅंड इंग्लीश ?” ते उत्तरले “येस?” अरे , व्वा कोणाशीतरी आपण संवाद साधू शकतोय याचा आनंद झाला, उभारी वाटली. ते मुळचे म्हैसूरचे होते. गेल्या काही वर्षांपासून बेंगळूरात शिक्षणसंस्थेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. इथे टी.नरसीपुरा जवळ थोडीशी शेत-जमीन विकत घेतली होती. दर दीड-दोन महिन्यांनंतरची ही त्याची रुटीन फेरी होती. त्यांच्याशी गप्पा मारता मारता बरयाच गोष्टी समजल्या. मी त्यांना आमच्या परतीच्या प्रवासा विषयीचा महत्वाचा सल्ला विचारला. कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आज रात्री नऊच्या आत बेंगळूरात प्रफुल्लकडे पोहोचायचे होते. बाळाचा जन्म होऊन आज बारा दिवस पुर्ण झाले होते. रात्री शांती-मंत्र पठण करायचे होते. बंगळूरू, म्हैसूर आणी तलकाडू हा त्रिकोण होता. म्हैसूरहून तलकाडू पोहोचायचे व तिथून थेट बंगळूरू गाठायचे असा विचार होता. म्हणजे हा बेत आमच्या वेळेत व्यवस्थित बसत होता. तलकाडू वरुन बंगळूरूला बस मिळेल का व वेळेत मिळून बंगळूरूला ठरल्या वेळेला पोहोचू ना या विचाराने चिंतीत होतो. या विषयी त्यांना विचारले असता, त्यांनी बजावले की परत म्हैसूरलाच जा व तिथून बंगळूरूची बस पकडा. कारण, तलाकाडूहून बस-सेवा अत्यंत बेभरवश्याची आहे. याची थोडी फार झलक आत्ता आम्ही अनुभवतच होतोच.

बस गच्च भरली होती. प्रदेश कानडी असला तरी गाडीत “आय्यम अ डिस्को डॅन्सर” छाप डिस्को ढिंग-च्याक गाणी जोर-जोरात वाजत होती. क्वचित ऐकली जाणारी बरीच जुनी हिंदी गाणी वाजत असल्यामुळे त्या परक्या वाटणारया कानडी प्रदेशात नाही म्हटले तरी बरे वाटत होते. वीस-पंचवीस वर्षांपुर्वी मराठी, गुजरात व इतर हिंदी भाषिकांमध्ये म्हैसूर-बेंगळुरू-उटी हा सुवर्ण-त्रिकोण पर्यटनासाठी अति-लोकप्रिय होता. जणू त्याकाळच्या कॅसेट आतापर्यंत या लोकांनी जपून ठेवल्या होत्या अन आज सुध्दा ती गाणी वाजवत होते. पण, या गाण्यांनी संपुर्ण चार तासाच्या जातानाच्या प्रवासात करमणूक केली हे मात्र खरे. तर, बस दर पाच-दहा मिनिटांनी प्रवासी घेण्यासाठीच थांबायची व प्रवासी जवळ-जवळ बसवर हल्ला करून बसमध्ये शिरायचे. बस गच्च भरून ओसांडून वहात होती. वीस-तीस जण पुढच्या, मागच्या दारात लटकत होते. आधीच उन्हाळ्याचे दिवस त्यात ही गर्दी, दाटीवाटी ! अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या ! पुढच्या एका स्टॉप बस मध्ये चढण्यासाठी एक मोठा जमाव आला. अरे बाप,रे ! आता कुठे शिरणार हे लोक ? आता आम्हाला तिसरया कंडक्टरचे प्रयोजन समजले. तिसरा कंडक्टर खाली सरसावला, मागच्या शिडीने सर्वांना वर चढवले. मुले, पुरुष व बायकासुध्दा ! सर्वांनाच याची सवय दिसत होती. ऍन्जॉय करत होते हे, हे सर्व! तिन्ही कंडक्टर अतिशय चोखपणे भाडे-वसूली करत होते. एकही जण त्यांच्या निरिक्षणातून सुटत नव्हता ! खिडकीतून बाहेर बघताना कावेरी नदीच्या प्रांतातला अतिशय हिरवागार परिसर, वारयावर डोलणारी शेते, मध्येच नदीची सुंदर वळणे असा सुजलाम-सुफलाम नजारा डोळ्याचे पारणे फेडीत होता. बक्कळ शेती मुळे लोक सधन दिसत होते, चेहरयावर आनंद दिसत होता. एवढे लोक बघितले. एकाही माणसाच्या अंगावर फाटके कपडे दिसत नव्हते ! हे सर्व पाहून छान वाटत होते.

नुकत्याच झालेल्या तलकाडू पंचलींगेश्वर उत्सवा निमित्त बरयाच सुधारणा झालेल्या दिसत होत्या. रस्ता छान केला होता. किमी अंतराचे हिरवे-पांढरे रेखीव बोर्ड ठराविक टप्प्यावर लावलेले होते. त्यावर वाडीचे नांव, तलकाडू पर्यंतेच अंतर, कन्नड व इंग्रजी मध्ये लिहिलेले होते. वाचून आकलन होत असल्याने दिलासा वाटत होता.

मजल दर मजल करत बस एका तालुक्याच्या गावाला पोहोचायला आली. बोर्ड वाचले, हेच ते टी.नरसीपुरा. पुढच्या सीटवरच्या ओळख झालेल्या गृहस्थानी सांगितले “आता माझे गाव आलेय, उतरतोय मी. मी सांगीतला तसाच परतीचा प्रवास करा. तरच सुखरूप वेळेत पोहोचाल. हॅप्पी जर्नी !” हे गाव म्हैसूरपासून २८ किमीवर होते. बापरे, तीन तास लागले होते इथवर पोहोचायला ! गावाचे टी. नरसीपुरा हे फॅन्सी नांव पाहून गंमत वाटली. या गावाचे पुर्ण नांव तिरुम-कुडल नृसिंहपुर असे आहे. या तिरुम-कुडलचा शॉर्टफॉर्म टी. नरसीपुरा . तिरुम-कुडल म्हणजे त्रिवेणी संगम ! इथे कावेरी, काबिनी (कपिला) नदी अन स्फटिक सरोवर जलाशय असा त्रिवेणी संगम आहे. उत्तर-पश्चिमेकडून येणारी कावेरी व केरळात उगम पावलेली व दक्षिण- पश्चिमेकडून येणारी काबिनी (कपिला) नदी यांचा सुंदर मिलाफ ! तीर्थक्षेत्राचे प्रसिध्द ठिकाण ! अप्रतिम वास्तूकलेचा नमुना असलेली, आठशे वर्ष जुनी शिल्पकला असलेल्या मंदिरांचा समुह आहे. इथले नृसिंहस्वामींचे मंदिर सुप्रसिध्द आहे. दोनच वर्षूपुर्वी डॉ. रामानुज अय्यंगार या अमेरिकेत स्थायिक असलेल्या परदेशस्थ भारतीयाने या मंदिरांच्या प्रेमात पडून तीन कोटी रुपये देवून या मंदिर-समुहाचा जीर्णोध्दार करवून घेतला.

त्या प्रदेशात केंद्रस्थानी असणारया, या गावचा छोटासा बसस्टॅंड आपल्या नीरा-लोणंद बसस्टॅंडची आठवण करून देत होता. सगळा शेतीमालाचा बाजार बसस्टॅंडमध्येच भरला होता. सगळी कडे आम्हाला न कळणारया भाषेचा, संवादाचा कोलाहल माजला होता. लोक असल्या खाजगी बसेस पकडण्यासाठी इतस्तत: धावत होते. आत प्रचंड गरम होत होते. बस कधी एकदा सुटतेय असे झाले होते. ड्रायव्हर, कंडक्टर यांचे चहापाणी व इतर खरेदी संपल्यावर, शेती-माल व सामानाचे गाठोडे घेतलेल्या आणखी काही प्रवाश्यांना घेवून, तब्बल अर्धा-पाऊण तासाने बस सुटली.

आता पुढच्या प्रवासात, खिडकी बाहेर पाहताना, आणखी खेडवळपणा जाणवत होता. आम्हाला कळणारया पाट्या बंद झाल्या होत्या. अन त्या दूर-दूर अंतरावर होत्या. फक्त कानडीत होत्या, ज्यावर किमी अंतर लिहिलेले नव्हते. आता परत अधांतरी वाटू लागले. टी.नरसीपुरापर्यंत त्या इंग्रजी बोलणारया सद्गृहस्थाची साथ होती. अधून-मधून सारखे त्यांच्याशी बोलून माहिती विचारत होतो. आता कुणाला काय विचारणार ? भाषेची अडचण ! आता कधी एकदा तलकाडू येतेय असे झाले. बसमधल्या गोंधळावरून खात्री पटली की बस तलकाडूच्या अजून पुढे जात असणार ! कासावीस होवून बसमधल्या लोकांना विचारत होतो “तलकाडू ?” शेवटी एका छोट्याश्या चौकात बस थांबली. एका प्रवाश्याने “हेच तलकाडू. इथेच उतरा” अश्या अर्थाच्या खुणा केल्या. बाहेर तलकाडूची पाटी काही दिसली नाही. आम्ही चौघेही घाबरतच बसमधून उतरलो.

चौक फिरून पाहिला. तलकाडू पंचलींगेश्वरच्या इंग्रजी पाट्या दिसल्या. किमी अंतरे समजली. इच्छीत ठिकाणीच पोहोचल्यामुळे जीव भांड्यात पडला. घड्याळात पाहिले, दुपारचा एक वाजला होता. ऊन रणरणत होते. ४३ किमीसाठी चार तास ! एक दोन रिक्षा अन दोन-तीन टपरया सोडल्यातर चौक निर्मनुष्य दिसत होता. गाव एका बाजूला होते. व तलकाडू पंचलींगेश्वर, कावरी नदी दुसरया बाजूला. चटकन रिक्षावाल्याकडे गेलो. मंदिराला येण्या विषयी घासाघीस केली. तीनशे रुपयांच्या खाली उतरायला तयार नव्हता. शेवटी तसेच मान्य केले, व मंदिराकडे निघालो. रिक्षावाल्याला विचारले गाईड मिळेल का? त्याने सांगितले, गावात हिंदी-इंग्रजी बोलणारा एकच गाईड आहे. तुमचे नशीब असेल तर मिळेल नाही तर तसेच मंदिर पहा. दोन-तीन किमी गेल्यावर, एका वळणावर रिक्षावाल्याने हर्षभरीत आवाज काढला. त्याला तो गावातला एकमेव गाईड दिसला. त्याने लगेच रिक्षा त्या गाईड समोर लावली. हा गाईड साधारण पंचावन्न-साठीचा, रापलेला चेहरा ! आधी सरकारी खात्यात होता. गेली पाच-सात वर्षे गाईड्गीरी करत होता. गाईडने लगेचच आमच्याशी हिंदी-इंग्रजी मध्ये संभाषणाला सुरुवात केले. त्याचे टोनींग कानडी असल्यामुळे सुरुवातीस समजण्यास जड गेले, पण नंतर सवय झाली. तो म्हणाला, या एरियातला मी एकमेव हिंदी बोलणारा माणूस आहे. मी हैदराबादला काही वर्षे होतो, त्यामुळे हिंदीवर प्रभुत्व आहे. उत्तरेकडचे पर्यटक आले की गावातले लोक मलाच बोलवायचे, हिंदीतून बोलायला. इथल्या मंदिरांची माहिती सांगता सांगता गाईड झालो. त्याने गळ्यातील कर्नाटक टुरीझमचे आयकार्ड दाखवले. तीनशे रुपये सांगितले. हा “एकमेव” असल्या मुळे ताबडतोब मान्य केले. रिक्षावाल्याने आम्ही चौघे, गाईड व आमच्या पाच-सहा बॅगा हे सर्व त्याच्या “कलाकारीने” या पिटूकल्या तीन आसनी रिक्षात फीट्ट बसवले.

आमचा मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू झाला. गाईडने हळूहळू माहिती सांगायला सुरुवात केली. अतिशय साधासुधा असणारया या गाईडने त्याच्या मिठ्ठास, प्रेमळ-रसाळ वाणीने लगेचच आमचे मन जिंकले.
चार-पाच किमी अंतर गेल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार दृष्टीस पडले. त्या सुंदर कलात्मक प्रवेशद्वाराने आमचे डोळे खिळवून ठेवले. समोरच असलेल्या वाहनतळावर रिक्षा पार्क केली. पाणी, अन जुजबी सामान सोबत घेतले. बॅगा रिक्षावाल्याला सांगून रिक्षातच ठेवल्या अन गाईड सोबत मंदिर दर्शनाला सुरुवात केली.

तलकाडू : पंचलिंगेश्वर मंदिर-समुह : अप्रतिम शिल्पकलेने नटलेलली मंदिर-वास्तू
Img-03

जाता-जाता, तलकाडू बद्दल माहिती: बेंगळूरूपासून १३३ किमी आणि म्हैसूरपासून ४५ किमी अंतरावर असणारे तलकाडू हे कावरी नदीच्या डाव्यातीरावर वसलेले नगर आहे. इथे कावेरी नदी ९० अंशात टोकदार वळण घेते. विशाल नदीपात्र अन किनारयां वरची सुंदर पिवळी रेती/वाळू या मुळे या परिसराने अतिशय सुंदर निसर्ग-रम्य रूप धारण केलेले आहे. पौराणिक कथेनुसार येथील दालवनात किरीटभिल्लां मधले “तल” व “काडू” हे जुळे बंधू एक वृक्ष कुऱ्हाडीने तोडत होते. काही काळच्या विश्रांतीनंतर ते परत उरलेली वृक्ष तोड करण्यासाठी आले तेंव्हा काही वन्य हत्ती त्या वृक्षाची पुजा करताना आढळून आले. त्या वृक्षा मध्ये शिवाचा आकार पाहून तल व काडू चकित झाले. हत्तींची पुजा संपल्यानंतर चमत्कार झाला ! तो वृक्ष पुर्वी होता तसा झाला. अन त्या हत्तींचे रुपांतर ऋषींमध्ये झाले. ऋषींना मोक्ष प्राप्त झाला ! आणि दालवनातील या ठिकाणाला “तलकाडू” हे नांव पडले. याच ठिकाणी मंदिरे बांधली गेली व मंदिरा भोवती नगर वसले. या नगरीच्या इतिहासानुसार अकराव्या शतकात चोल घराण्याने तलकाडूवर राज्य प्रस्थापित केले. त्यावेळी हे अतिशय महत्वाचे महानगर व सांस्कृतिक केंद्र झाले. नंतरच्या शतकात होयसाळ घराण्याने इथे पाय रोवले. त्या वेळच्या तलकाडू महानगरात आजूबाजूच्या सात गावांचा समावेश असल्याचे उल्लेख आढळतात. चौदाव्या शतकाच्या अखेरीस हे महानगर विजयनगर साम्राज्याचा भाग बनले. सतराव्या शतकात तलकाडू म्हैसूर राजांच्या अधिपत्याखाली आले.

तलकाडू वाळूच्या टेकड्यांखाली लुप्त कशा झाल्या याची एक कहाणी सांगितली जाते.

सोळाव्या शतकात विजयनगरचा महत्वाचा मंत्री रंगरायायाची पत्नी रंगम्मा हिने राजखजिन्यातील दुर्मिळ अन अमुल्य अशा रत्नासाठी तलकाडूच्या पैलतीरावर मलांगी येथे कावेरी नदीत आत्मसमर्पण केले. जलप्रवेश करताना “ तलकाडूचे रुपांतर रेतीत होऊ दे” अशी वाणी उच्चारली. आणि हे महानगर मंदिरांसकट वाळूखाली लुप्त झाले !

भौगोलिक दृष्ट्या किनारपट्टीवरच्या तीव्र वादळांमुळे वाळूच्या लाटांनी मंदिरांवरती थरा वर थर लावले, बाजूस वाळूच्या टेकड्या (सण्ड-ड्यून्स) तयार झाल्या. कित्येक वर्ष , ९ ते १०फूट, वर्षाला असे वाळूचे थर चढले जात होते अन तिथल्या वस्तीला मागे-मागे हटवत होते. मग हे ऐतिहासिक नगर वाळूखाली कित्येक मिटर खोल गाडले गेले. गेली काही दशके वाळूचे अतिक्रमण थांबले व हळूहळू लुप्त नगरीचे अवशेष लोकांच्य दृष्टीस पडू लागले !

(आपल्या इथेही कोकणात केळशी येथे सात आठवर्षांपुर्वीच्या त्सुनामीमुळे वाळूच्या टेकड्या तयार झालेल्या आहेत. त्या तश्या खुपच कमी उंचीच्या आहेत)

तलकाडु येथील मंदिरसमुहातले नंदीशिल्प विशेष: मंडपावरील सुंदर नंदीशिल्प
Img-04

तलकाडू तेथील पंचलिंगेश्वर मंदिर-समुहासाठी प्रसिध्द आहे.

असे म्हटले जाते की, या ऐतिहासिक-पौराणिक नगरीत अजूनही अशी तीस मंदिरे वाळू खाली गाडली गेली आहेत.
“तल” व “काडू” यांची आणखी एक कथा सांगितली जाते. हे दोघे शिकारी वृक्ष तोड करत असताना त्यांनी चुकून एका पवित्र वृक्षा वर त्यांची कुऱ्हाड चालवली. वृक्षावरील घावातून भळाभळा रक्त वाहू लागले. त्या दोन्ही शिकाऱ्यांना काय करावे समजेनासे झाले. त्यांनी त्या वृक्षाचीच पाने व साली काढून त्या जखमांवर लावल्या. रक्तस्त्राव थांबला अन तो वृक्ष पुर्वी होता तसा झाला. तल व काडू अमर्त्य व चिरंजीव झाले. त्या पवित्रवृक्षाने अर्थातच शिवाने स्वत:वर उपचार करून स्वत:ला बरे केले यामुळे या शिवाला “वैद्यनाथेश्वर” म्हणून ओळखले जाते.

सुरवातीस वैद्यनाथेश्वरचे मंदिर होते. पंचलिंगेश्वर मंदिर-समुहात वैद्यनाथेश्वर, पाताळेश्वर, मारुलेश्वर, अर्केश्वर, , मल्लिकार्जून अशी पाच शिवाची मंदिरे येतात. त्या पैकी मुख्य मंदिर वैद्यनाथेश्वरचे आहे. पाचपैकी वैद्यनाथेश्वर, पाताळेश्वर, मारुलेश्वर, तीन मंदिरे एकमेकांजवळ आहेत. ही तीनही मंदिरे प्रशस्त मार्गिकेने जोडलेली आहेत. वैद्यनाथेश्वर मंदिर अप्रतिम अश्या शिल्पकलेने नटलेले आहे. दरवाज्यावरची कला-कुसर आपली नजर खिळवून ठेवते ! तिथले द्वारपाल तर या कलेचा उत्कृष्ट नमुना ठरावेत. द्वारपालाचे पोट व दोन वक्ष यातून नंदीच्या मुखाचा होणारा भास हे आमच्या गाईड्ने छानपैकी उलगडून दाखवले. हे पाहून आम्ही थक्क झालो. त्याने आम्हाला छताच्या नक्षीकामाचा भाग असलेली, दगडातून कोरलेली साखळी दाखवली. आपली शिल्पकला, वास्तूकला किती प्रगत होती या विचाराने आम्ही भारावून गेलो. गर्भगृहात वैद्यनाथेश्वर शिवलिंग व आतली सजावट पाहून मन प्रसन्न झाले, धन्य वाटले. याच मंदिराच्या मागिल बाजूस, प्रदक्षणा मार्गावर, पाच शिवलिंगे आहेत. ही वर उल्लेखलेल्या पाच लिंगांची प्रतिकात्मक छोटी मंदिरे आहेत. अर्थातच ही देखील सुंदर अश्या शिल्पकलेने नटलेली आहेत.

तलकाडू : वैद्यनाथेश्वरचे मंदिराचा दरवाजा
Img-05

द्वारपालाचे पोट व दोन वक्ष यातून नंदीच्या मुखाचा होणारा भास
Img-06

छतावरची शिल्पकला: पाषाणातून कोरलेल्या साखळी-कड्या
Img-07

यानंतर आम्ही पाताळेश्वर व मारुलेश्वर यांचे दर्शन घेतले. हा परिसर वाळूंच्या टेकड्यांनी वेढलेला असल्यामुळे या मंदिरांना जोडणारया मार्गिकेत पायाखाली वाळू असते. सुरवातीस मऊ वाळूतून चालताना मजा वाटते, पण पाय रुतत असल्यामुळे नंतर दुखून येतात. मग, मार्गिकेतून बाहेर येवून साध्या मातीच्या टेकाडांवरून चालावे लागते. उन्हापासून बचावासाठी मार्गिकेवर पत्र्याचे छत टाकलेले आहे. यामुळे हे तीन-चार किमी चालताना दिलासा मिळाला.

पंचलिंगेश्वर प्रदक्षिणा परिसरातील वाळूची मार्गिका : उन्हापासून बचावासाठी मार्गिकेवर पत्र्याचे छत टाकलेले आहे.
Img-08

या शिव-मंदिराच्या समुहाच्या उत्खननातच किर्तीनारायण हे विष्णूचे मंदिर सापडले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून, पुरातत्वतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या अवषेशांची जुळणी चालू आहे. सध्या "महाद्वार" ही प्रवेशकमान पुर्णपणे जुळवण्यात यश मिळाले असून मंदिराच्या इतर जुळणी, भागाचे कोरलेले दगड, स्तंभ शोधून त्यांची जुळणी करण्याचे काम चालू आहे. तीस फूट खोलीवर वाळूच्या ढिगाऱ्यात हे काम सुरु आहे. खाली उतरून हे सर्व बघताना मजा आली.

किर्तीनारायण विष्णू मंदिर : "महाद्वार" अवषेशांची जुळणी चालू आहे.
Img-09

ही फेरी पुर्ण करून मुख्य मंदिर प्रांगणात परत येताना घडीव दगडात बांधलेली सुंदर पुष्करणी पाहिली. त्यातले स्फटिकासारखे स्वच्छ पाणी पिऊन ताजेतवाने झालो. उरलेली दोन शिवमंदिरे, अर्केश्वर आणि मल्लिकार्जून दहा-बारा किमी त्रिज्येच्या क्षेत्रात येतात. आताच दुपारचे साडेतीन वाजत आले होते. वेळे अभावी ही दोन टिकाणे बघता येणे शक्य नव्हते. गाईडकडून या दोन मंदिराची माहिती घेवून त्यातच समाधान मानले. सकाळी निघाल्यापासून खाण्याकडे दुर्लक्ष झाले होते, आता कडकडून भूक लागली होती. इथे हॉटेल कुठे दिसलीच नव्हती. जेवणाचे अवघड होते. बोलता बोलता गाईडने विचारले “घरगुती ठिकाणी खायला आवडेल का ? आम्ही अर्थातच आनंदात होकार दिला. जवळच्याच एका छोट्या घरात आम्ही शिरलो. केळीच्या पानावर अत्यंत रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. तृप्त झालो.

आता आस लागली होती, कावेरी नदी पाहण्याची. महाराष्ट्रातील नद्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील नद्या भव्य असल्या मुळे त्या पाहण्यात एक वेगळीच मजा असते. काही वेळ चालल्यावर नदीकाठी पोहोचलो. या ठिकाणी कावेरी नदी ९० अंशात टोकदार वळण घेते. अहाहा.. काय सुंदर दृष्य होते ! विशाल अशी नदी अन तिच्या किनाऱ्यावरची बारीक पिवळी रेती ! संध्याकाळच्या पाचच्या सौम्य उन्हात, दृष्य सोनेरी दिसत होते. पात्रात काही मोजकी मंडळी मजेत डूंबत होती. किनाऱ्या वर वरेच वृक्ष होते. मोठे निसर्ग-रम्य दृष्य दिसत होते ! मला तीस वर्षापुर्वीच्या चंद्रेभागेची अन त्या वाळवंटाची आठवणझाली! खरंच, वेळ असता तर मस्त पैकी तास-दोन तास डूंबून घेतले असते. रमून गेलो होतो या स्वर्गीय वातावरणात ! घड्याळाचा काटा पुढे सरकत होता.

तलकाडू : कावेरी नदीचे विशाल पात्र
Img-10

तलकाडू : कावेरी नदीचा रमणीय किनारा व किनार्यावरची लुभावणारी पिवळी रेती
Img-11

संध्याकाळचे सहा वाजत आले होते, परतीची घाई करणे आवश्यक होते. धावत पळत आम्ही ज्या छोट्या चौकात येताना उतरलो होतो, तिथे पोहोचलो. एक बस उभी होती. येताना बसमध्ये भेटलेल्या सदगृहस्थांनी सल्ला आठवला. आता यावेळी इथून बंगळूरूकडे जाणारी एकही बस अथवा जीप नव्हती! नशिबाने आम्हाला म्हैसूरकडे जाणारी बस मिळाली. बस म्हैसूरच्या पुढे कुठल्या तरी गावाला जाणार होती. म्हैसूरकडे जाणारे मोजून दोन-चार प्रवासी होते. बसही लगेच सुटली. अडीच तासानंतर आल्या मार्गे परत टी.नरसीपुरा इ. गावे करत बस म्हैसूर मध्ये पोहोचली. आम्हाला पुढे बंगळूरुची बस पकडायला म्हैसूर स्टॅंडला जायचे होते. रात्रीचे साडे-आठ-पावणेनऊ वाजले होते. कोपऱ्यावर कंडक्टरने बेल मारली. बसथांबली. मी, सौ. अपर्णा व आदित्य बस मधून उतरलो. बॅगा पटापट खाली उतरवल्या. तो पर्यंत कंडक्टरने “जल्दीउतरो” ची घाई चालवली होती. आम्ही उतरलो, बस सुरू झाली अन वेगाने सुटली देखील ! खाली बघतोय तर काळे काकू नाहीतच ! ……. अरे बापरे, त्या उतरल्या नाहीच !बस त्यांना घेवून तशीच पुढे निघून गेली ! सौ. अपर्णा व आदित्यने “आई, आजी” बसमध्येच राहिली” चा पुकारा सुरू केला. काळजाचा ठोका चुकला ! आता काय करायचे ? बस वेगाने निघून जाऊ लागली होती. मी बॅगा तिथेच टाकून, सौ. अपर्णा व आदित्यला तिथेच सोडून , भान विसरून बसच्या मागेमागे धावत सुटलो. एका धावत्या रिक्षावाल्याने मला पळताना पाहून रिक्षा थांबवली व “कहॉं जाना?” असे विचारले. मी त्या बस कडे निर्देश केला. लगेच त्याने “बैठो साब” म्हणत मला घेवून बसचा पाठलाग सुरु केला. आठ-दहा चौक ओलांडल्यानंतर, तीन-चारकिमी अंतरावर बसला गाठले. तो पर्यंत बसवाल्यांनाही घटनेचे गांभीर्य कळून त्यांनी बस थांबवली. अकारण अशी घाई करून आमच्या तोंडचे पाणी पळवल्याबद्दल कंडक्टरची चांगलीच कान-उघाडणीकेली. काळेकाकूना घेवून रिक्षाने परत सौ. अपर्णा व आदित्य होते तिथे परतलो. दोघेहीजण चिंताग्रस्त होवून बसले होते. आम्हाला पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. रिक्षावाल्याला या मदती योग्य ती बक्षिसी देवून, मनोमन धन्यवाद दिले.

लगेचच म्हैसूर स्टॅन्ड गाठले. वेळ न घालवता, घाई करत बंगळूरूची बस पकडली. बंगळूरूला म्हैसूर-रोड बसस्टॅन्डवर उतरलो तेंव्हा रात्रीचे बारा वाजले होते. तिथून रिक्षा ठरवून बनसवाडीला प्रफुल्लकडे पोहोचलो तेंव्हा रात्रीचा एक वाजला होता. प्रफुल्ल व धनश्री वाट पाहून झोपून गेले होते अन नवागत बाळासाठी शांती-मंत्रपठण करायचे राहूनगेले. याची रूखरूख आम्हाला जन्मभर राहणार होती.

असा पार पडला आमचा तलकाडू : एक प्रवास, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीच्या प्रदेशातला, “वेळेशी शर्यत” करत केलेला.
- चौथा कोनाडा

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

द्वारपालाचे पोट व दोन वक्ष यातून नंदीच्या मुखाचा होणारा भास खराच आहे.
अप्रतिम शिल्पकला पाहून मन प्रसन्न झाले.

गाडीत चक्क तीन कंडक्टर होते !(हि गोष्ट पीएमटी ला कधी लक्षात येईल, देव जाणे! येथे फक्त तीन दरवाजे हवे असतात!!!)

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 11:10 pm | चौथा कोनाडा

खरंच, नंदीच्या मुखाचा होणारा भास पाहून आपण थक्क होऊन जातो.

>>> गाडीत चक्क तीन कंडक्टर होते !(हि गोष्ट पीएमटी ला कधी लक्षात येईल, देव जाणे! येथे फक्त तीन दरवाजे हवे असतात!!! <<< सही ! सही निरिक्षण ! पीएमटीची वाट लावण्यात पुणेकर राज्यकर्ते दादा, भाई, साहेब, ताई यांचा सिंहाचा वाटा आहे ! बीआरटीकी पिक्चर बाकी है मेरे दोस्त !

किती सुंदर , सहज ओघवते प्रवास वर्णन :)

एका वेगळ्याच ठिकाणाचा परिचय दिल्याबद्दल धन्यवाद

४३ किमी ला ४तास लागलेले पाहून इथे हपिसातच घाम फुटला :)

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 11:12 pm | चौथा कोनाडा

>>> सुंदर , सहज ओघवते प्रवास वर्णन <<< थॅक्स स्पा !

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 2:23 pm | माम्लेदारचा पन्खा

नवीन माहिती मिळाली तुमच्या द्वारे.... धन्यवाद.

प्रमोद देर्देकर's picture

21 Oct 2014 - 4:41 pm | प्रमोद देर्देकर

खरं तर या तलकडुची माहिती या आगोदर मी डीस्कवरी चॅनलवर जुलै महिन्यात दाखवलेली पाहिलेली होती.
नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते असा काहीसा त्यांचा माहितीचा आढावा होता. पण गावकर्यांनी त्याला दंत कथेचे रुप दिले असे तो माहिती देणारा सांगत होता.

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 11:03 pm | चौथा कोनाडा

>> नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते << धन्यवाद, या विशेष माहितीसाठी ! पाहिला पाहिजे हा डीस्कवरी चॅनलवरील कार्यक्रम. आपल्या कडची बहुतेक भौगोलिक विशेष हे दंतकथा अथवा देवादिकांच्या मंदिरांच्या आड दडून राहिलेत, आणी सगळा बाजारूपणा झालाय.

>>> नदी वळण घेते त्याच्या आतल्याकडेला गाळ साठवण होते व बाहेरील बाजुला गाळ पसरवत नेते <<< धन्यवाद प्रमोदजी या खास माहितीसाठी ! आपल्या कडील बरीच सुंदर मंदिरे दंतकथा आणी अतिक्रमणाने वेढलेली असतात. त्यामागिल भौगोलिक, वास्तूशास्त्रीय विशेषता दृष्टीआड होऊन जाते. बघीतला पाहिजे हा डीस्कवरी चॅनलवरचा कार्यक्रम ! या चॅनेल वरचे असे वास्तूवरचे कार्यक्रम परिपुर्ण अन फार देखणे असतात. दूद-भारती वर सुद्धा अश्या सुंदर सुंदर डॉक्युमेंट्रीज लागत असतात.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 5:29 pm | प्रभाकर पेठकर

मोठी आहे कथा किंवा वर्णन, काही म्हणा. देवळांची छायाचित्रे मस्त आहेत.
लहानपणापासून मनांत 'तकलादू' हा शब्द घर करून आहे त्यामुळे 'तलकाडू' स्थापित करणयास जरा वेळ लागला. असो.
प्रत्यक्ष 'तलकाडू' गावात राहायची वगैरे व्यवस्था आहे का? तिथे २ दिवस राहून निवांत फिरायचे म्हंटल्यास शक्य आहे का? वगैरे प्रश्न मनात पडले आहेत.

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 10:45 pm | चौथा कोनाडा

हो, लिहिता लिहिता झाली खरी कथा मोठी, पण लिहिताना विविध प्रसंग तपशिलवार आठवले अन ओघात लिहिले गेले. चला, म्हंजे मी दीर्घ लिहू शकतो :-) धन्यू फॉर धीस अ‍ॅप्रिसिएशन !

मला देखील सुरुवातीला "तलकाडू" ऐकल्यावर "तकलादू" हाच शब्द मनात घोटाळत होता, पण "तलकाडू" निकराने लक्षात ठेवून पुढील प्रवास केला.
तिथे रहायची सोय होऊ शकेल. भाषेचा प्रश्न आहेच. म्हैसूर मध्ये पर्यटना मुळे हिंदी बरयापैकी समजते पण तल़काडूत ही अडचण आहेच. खरंच तिथे दोन तीन दिवस राहिल्यास कावेरी नदीच्या परिसरात फेरफटका केल्यास तो एक वेगळाच अनुभव असेल !

एस's picture

21 Oct 2014 - 7:45 pm | एस

छायाचित्रे पाहून हे तलकाडू पाहण्याची इच्छा झाली आहे. एखाद्या दिवशी नक्कीच प्लॅन केला जाईल.

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 10:47 pm | चौथा कोनाडा

जरूर प्लान करा, हे ठीकाण अजून व्हर्जिन आहे. टिपिकल कमर्शियल पणा अजून तरी इथे नाही पोहोचला. टी-नरसीपुरा ही आवर्जून बघा.

फोटो व वर्णन इतके छान केले आहेत की तुमच्याबरोबर मीही फिरत असल्यासारखे वाटले. शेवटी घरी पोहोचायला १ वाजला म्हणून "झाले कल्याण!" असेही म्हटले. ;)

तुम्ही हाताने मार्गदर्शनपर रेखाटन केले असल्याची चित्रे आवडली.

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 10:50 pm | चौथा कोनाडा

लेखन आवडले व वेळ देऊन केलेली हस्तरेखाटने आपणा आवडली या अभिप्रायाने छान वाटले. थॅन्क्स !

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 6:18 pm | मुक्त विहारि

नक्की जाणार....

मुंबई सोडल्यास इतर सगळ्या ठिकाणी प्रायव्हेट जीप करणेच योग्य.

वेळ वाचतो आणि खाण्या-पिण्याची सोय चांगली होते.

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 10:53 pm | चौथा कोनाडा

हो. आपले स्वतःचे वाहन अथवा ठरवलेली प्रायव्हेट जीप नसेल तर टाईम फॅक्टरचा बट्ट्याबोळ होतो हे मी बरयाच वेळा आपल्या कोकणात अनुभवलेले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2014 - 1:30 am | डॉ सुहास म्हात्रे

एका नविन प्रेक्षणिय ठिकाणाची माहिती कळली !

एक एक करत यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच जात आहे... अख्खा भारत बघून होईल की नाही अशी धास्ती पडली आहे !

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 10:57 pm | चौथा कोनाडा

हो, ना. अश्या ठीकाणांबद्दल वाचले की मोह होउ लागतात पर्यटनाचे ! नुकत्याच वल्ली यांनी टाकलेल्या लेखातले वडगाव दर्या गुहामंदिरस्थळ मला असेच खुणावतेय.

चौकस२१२'s picture

26 Nov 2021 - 3:08 am | चौकस२१२

तुमच्या यादी साठी : पुण्याहून अहमदनगर कडे जाताना वाटेत एक लिंब गणेश म्हणून साधे ठिकाण आहे

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2014 - 9:10 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, मित्रानो ! लेख आवडला व छान प्रतिसाद मिळाले, त्यामुळे या वर्षी माझ्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत झाला !

मंदिरांना रंग न फासल्याबद्दल कर्नाटक सरकारचे अभिनंदन!!
फार छान झालय वर्णन अन मार्गदर्शनपर रेखाटन.

चौथा कोनाडा's picture

27 Oct 2014 - 9:02 pm | चौथा कोनाडा

कर्नाटक सरकारचे खरोखरच अभिनंदन करायला हवे! आजकाल फॅशनच झालीय पुरातन दगडी मंदिरीना रंग फासून बरबटून ठेवायची. अन मग रंगाचा थर चढला की मंदिरातली शितलता कमी होते. बीन रंगवाल्या मंदिरात प्रवेश केला की कसला भन्नाट एसी जाणवतो. सुख हो, नुसते सुख ! धन्यवाद अपर्णा-अक्षय या छानश्या प्रतिसादा साठी.

काही करा पण मंदिराची डागडुजी करताना त्याला रंग फसू नका " कोना एका मराठी चित्रपटात सोनाली कुलकर्णी च्या तोंडी हे वाकय होते ,,, (ती सरकारी अधिकारी असते )
वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपती ला पण रंग फासलेला आहे! कधी ते माहित नाही
रंग फासायला पैसे आहे पण त्याचं शेजारी असलेलया मंदिराच्या कळसावरील उगवलेले वृद नीट पद्धतीने काढायला काही काही केलेले नाही !

प्रचेतस's picture

28 Oct 2014 - 12:46 pm | प्रचेतस

सुरेख आणि माहितीपूर्ण लेखन.

बबन ताम्बे's picture

30 Oct 2014 - 12:28 pm | बबन ताम्बे

श्री. चौ.कोनाडा साहेब,
अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत रेखाटलेले प्रवासवर्णन. खूप आवडले. अगदी तिथे फिरून आल्यासारखे वाटले.
फोटोही छान आहेत. मंदिरे, द्वारपाल आणि नंदीमुख अप्रतिमच. कोण होते हे अज्ञात कलावंत कोणास ठाऊक. पण अलौकीक असा कायमचा ठेवा ठेवून गेलेत - पुढच्या अनेक पिढ्यांसाठी.
पण आपण नतद्रष्ट ! साधे वेरूळ, अजिंठा नीट सांभाळता आले नाही.

प्रवासवर्णन सहज आणि ओघवते आहे.
नवीन ठिकाण कळले.
कधी पाहायला मिळेल, माहिती नाही!

सानिकास्वप्निल's picture

30 Oct 2014 - 6:50 pm | सानिकास्वप्निल

प्रवासवर्णन आवडले, फोटो ही सुरेख आहेत :)

पैसा's picture

30 Oct 2014 - 8:17 pm | पैसा

अतिशय ओघवत्या शैलीत लिहिलंय आणि फोटो पाहून प्रत्यक्ष जायची इच्छा झाली आहे!

मधुरा देशपांडे's picture

2 Nov 2014 - 2:14 pm | मधुरा देशपांडे

वरील सर्वांप्रमाणेच म्हणते. अगदी ओघवते प्रवासवर्णन आणि छान फोटो. आवडले.

जुइ's picture

3 Nov 2014 - 4:03 am | जुइ

फोटो आवडले :)

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2014 - 1:02 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, वल्ली, बबन ताम्बे, आतिवास, सानिकास्वप्निल, पैसा, मधुरा देशपांडे आणी जुइ !

jo_s's picture

20 Sep 2015 - 11:46 am | jo_s

सुन्दर लेख आणि फोटो

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Apr 2016 - 12:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्तच झालीये तुमची भटकंती. पण वयस्कर लोक आणि लहान मुलांना बरोबर घेउन सरकारी सेवेच्या भरवशावर असे धाडस परमुलुखात केलेत ह्याचे जास्त आश्चर्य वाटत राहिले वाचताना. एकटे फिरताना किंवा मित्रमंडळींबरोबर फिरताना फार प्लॅनिंग न करता असे फिरु शकतो. पण सहकूटूंब फिरताना बस चुकणे, जेवणाला उशीर होणे, फार उन लागणे, प्रवासात फसवले जाणे या गोष्टिंचा फार ताप होतो. म्हणजे या सगळ्यांचे खापर आपल्यावर फुटायची शक्यता असते/ वाढते.आणि त्यामुळे सहलीच्या आनंदाला उगीचच गालबोट लागते.

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2016 - 9:51 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, राजेंद्र !
हो, असे सरकारी भरोसे प्रवास करणे धोक्याचेच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सोबत असलेल्या सगळ्यांची काळजी घेत सहल आयोजन करावे लागते.
पण त्या वेळी जमुन गेले. रिस्क होतीच पण अनुभव थरारक झाला. एक वेगळा अनुभव आला.
ट्रिप फारच आखिव-रेखीव असेल तर जरा कंटाळवाणी अन टिपिकल होते.
या वृतान्ता सोबत तुम्ही तलकाडुची सहल एन्जॉय केली केलीत ! धन्यवाद !

यशोधरा's picture

1 May 2016 - 12:27 am | यशोधरा

मस्त लिहिले आहेत. फोटोही आवडले.

चौथा कोनाडा's picture

7 May 2016 - 2:42 pm | चौथा कोनाडा

_/\_

धन्यु फॉर एप्रिसिएशन !

नाखु's picture

7 May 2016 - 4:16 pm | नाखु

हा लेख पाहिला गेला नाही. जबरी ठिकाण दिसतेय आणि गड-किल्ला नसल्याने कौटुंबीक सहलीस उत्तम.

चांगला भक्कम/टिकाऊ लेख "तकलाडू"वर.

नितवाचक नाखु

चौथा कोनाडा's picture

8 May 2016 - 1:07 pm | चौथा कोनाडा

येस्स नाखु.
कौटुंबिक सहली साठी मस्त छान ठिकाण आहे.
आंघोळीचे सोबत कपडे नेल्यास कावेरी झकासपणे डुंबता येइल.
धन्यु नाखुदा, लेखाला टिकाऊपणा बहाल करुन कौतुक केल्याबद्दल !

नीलमोहर's picture

7 May 2016 - 4:37 pm | नीलमोहर

तलकाडू, तलकावेरीला चारेक वर्षांपूर्वी जाऊन आलो होतो, त्या आठवणी ताज्या झाल्या.
हा सर्वच परिसर आणि मंदिरे अतिशय सुरेख आहेत. त्या वाळूच्या मार्गिकेतून अनवाणी जातांना अगदी शांत आणि प्रसन्न वाटले होते. किर्तीनारायण मंदिर अवशेष जुळवणीचे काम तेव्हाही सुरू होते.

याप्रमाणेच कर्नाटकातील श्रवणबेळगोळ, बेलूर, हळेबीडू, ऐहोळ, पट्टडकल इ.ठिकाणे, तेथील मंदिर समूहे पहायलाच हवीत अशी आहेत, हंपी-बदामी बद्दल बोलायचे तर वेगळा लेख लिहावा लागेल.

चौथा कोनाडा's picture

8 May 2016 - 6:38 pm | चौथा कोनाडा

वाह, तुम्ही पण गेला होतात तर ! खरंच, वाळू मार्गिकेतून प्रदक्षिणा करतानाचा अनुभव दिव्य होता !

आमची देखिल देखिल २०१५ डिसेंबराच्या शेवटी तळकावेरीला सहय होण्याचा योग आला. कुर्ग (कोडगु) चा प्रदेश नितांत सुंदर आहे! कुर्गची अप्रतिम शितल हवा अनुभवल्यानंतर कळते की कुर्गला "स्कॉटलॅण्ड ऑफ इंडिया" का म्हणतात ते ! कुर्गला दोन दिवस राहणे व तिथल्या कॉफी इस्टेटच्या मळ्यांमध्ये फिरणे म्हंजे सहलीची चांदीच ! तळकावेरी म्हंजे पश्चिमे घाटांमधुन उगम पाऊन दक्षिण-पुर्वेकडे तामिळनाडुत सागरास मिळणार्‍या भव्य अश्या कावेरी नदीचे उगमस्थान ! डोंगररांगांनी वेढलेल्या आसमंतातल्या दगडी बांधकामातल्या तळकावेरीचा मंदिर परिसर अतिशय सुंदर व स्वच्छ आहे, ओपन टू स्काय ! एका बाजुला केरळ व एका बाजुला आपण कर्नाटका मध्ये उभे असतो. खुपच सुंदर !

१) तळकावेरीचा नितांत सुंदर आसमंत व मंदिर
TLK1सु

२) तळकावेरीच्या डोंगररांगांमधील क्षितिजावरच्या निळ्या जादुई रेषा
TLK2

धन्यु, नीमो या आठवणी ताज्या केल्याबद्दल, परत स्मरणरंजन करायला मजा आली !

श्रवणबेळगोळ, बेलूर, हळेबीडू, हंपी-बदामी या मंदिरांना भेट देण्याचा योग कधी येतो कोणास ठाऊक !

लेख पुन्हा वाचायलायही तितकेच छान वाटले.
कावेरी नदी व तिच्या पात्राभोवतीचे वाळवंट पाहून सुबुक्तिनच्या चिंचणी ताम्रपटातील नमनाची आठवण झाली.

गिरिसुताहरयोरविभिन्नयो विहरतार्नियमार्थमवन्तु व:| सरसयावकभस्मविचित्रता स्त्रिपथगापुलिने पदपंक्तय: ||

चौथा कोनाडा's picture

15 May 2016 - 1:43 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, प्रचेतस !
ताम्रपटाचा संदर्भ भारीय.
शेवटी दिलेल्या संस्कृत ओळींचा अर्थ काय आहे ?

प्रचेतस's picture

15 May 2016 - 1:46 pm | प्रचेतस

गंगा नदीच्या वाळवंटातून शिवपार्वती जात असता त्यांची पावले कधी भस्मयुक्त तर कधी अलक्तरसयुक्त अशी उमटतात. त्या पावलांच्या रेषा तुमचे रक्षण करोत.

चौथा कोनाडा's picture

17 May 2016 - 1:10 pm | चौथा कोनाडा

धन्य ! चित्रदर्शी सुंदर अर्थ आहे.

इरामयी's picture

6 Jul 2019 - 5:01 pm | इरामयी

स्थळवर्णनाबरोबरच प्रवासवर्णनही छान आहे!

कॅलक्यूलेटर's picture

23 Nov 2021 - 3:27 pm | कॅलक्यूलेटर

अतिशय सुरेख प्रकाशचित्रे आणि लिखाणाची शैली तर अप्रतिम. खूप काही शिकण्या सारखा आहे.
असच मार्गदर्शन करत राहा, धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

29 Nov 2021 - 5:45 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, कॅलक्यूलेटर !
तुमचीही भटकंती वर्णने येऊ द्या !

सुधीर कांदळकर's picture

25 Nov 2021 - 6:57 am | सुधीर कांदळकर

ओघवत्या भाषेत लिहिलेले वर्णन सुंदर. दोन्ही दंतकथा रंजक. प्रचि पाहून जावेसे वाटते की वर्णन वाचून जावेसे वाटते हे सांगता नाही येणार.

तिन्ही कंडक्टर्सना आणि वरच्या मजल्यावरून प्रवास करणार्‍यांना सलाम.

आम्ही अजूनही कारवारला गेलो की अगोदर बसमध्ये बसतो आणि मग सहप्रवाशाला 'सुकेरी वयतां?' म्हणून विचारतों आणि हो म्हणाला तर बसतो नाहीतर उतरतो.

हा लेख नजरेतून कसा काय सुटला याचे आश्चर्य करीत होतो. तारीख पाहिल्यावर उलगडा झाला. धागा वर काढणार्‍यांना धन्यवाद.

मस्त लेखाबद्दल 'चौथा कोनाडां'ना धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2021 - 1:06 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, सुधीर कांदळकर !

🙏