कृष्णमयी

Primary tabs

सस्नेह's picture
सस्नेह in विशेष
2 Sep 2014 - 12:04 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

4

कातरवेळ झाली अन सकाळपासून तिच्या मनी दाटलेल्या हुरहुरीने आणखीनच उग्र रूप धारण केले. आज दिवसभर त्याचे दर्शन नाही. नित्यकर्मे करताना मनाची तहान वाढतच गेली. अन आता संध्याकाळी त्या व्याकुळतेने पुरते पिसे लावले.
अंधार दाटला, तसे राधेला काही सुचेना. शामसुंदर, श्रीहरी, कृष्ण काळा, कान्हा, मुरारी, मुकुंद, गोविंद, माधव, मिलिंद सगळी नावे आलटून पालटून घेऊन झाली. त्याची लोभस रूपे मन:चक्षुंनी हजार वेळा न्याहाळली. प्रत्यक्ष दर्शनाच्या ध्यासाने ती खुळीबावरी झाली. रात्र दाटू लागली तशी प्रतिक्षेची परिसीमा झाली . पण तो दिसलाच नाही अजुनी.

...त्याची सावळी प्रसन्न त्रिभुवनमोहिनी मुद्रा, त्या मुद्रेभोवती जणू मुकुट असावा तशी महिरप धारण करणारे कुरळे सोनेरी केस, कानातली लखकन चमकून जाणारी कुंडले, शंखासमान डौलदार मान, गोवर्धनाच्या शिखरांशी स्पर्धा करणारे मजबूत स्कंध, त्रिलोकातील सर्व प्राण्यांना सामावून घेणारे विशाल हृदय धारण करणारी छाती, कोटी कोटी जीवांचे अनंत अपराध क्षमा करून आत घेणारे उदर अन कालियाच्या काळासमान मस्तकावर प्रच्छन्नपणे नर्तन करणारे बलशाली पाय... अशी ती प्राणापेक्षाही प्रिय अशी मूर्ती नजरेसमोर आली अन राधा कासावीस झाली. दूरत्वाची, द्वैताची वेदना एखाद्या अग्निशिखेसारखी देहातून सरसरत उफाळून वर आली अन पाहता पाहता तिने राधेचे अस्तित्व वेढून टाकले. विरहाच्या हलाहलाने तिची नाजूक तनु उभी थरथरू लागली. तीरासारखी ती अंगणात धावली आणि तिचे आर्त नेत्र अंधाराचा पडदा वेधू लागले.

..कन्हैयाची झलकसुद्धा नाही...

कातर मन शंका कुशंकांनी डचमळून आले. आज का डोळ्यांना पारखा झाला सखा ? का असा अंत पाहतो आहे ? काल त्याने वेणीत माळलेला गजरा मी रुसून काढून फेकला म्हणून त्याने आज अबोला धारण केला आहे की काय ? गोपींना सतावतो म्हणून यशोदामाई त्याला रागे भरली काय ? अन म्हणून तो आज कुण्णालाच त्रास द्यायला आला नाही ? पण सगळ्या तर त्याने त्रास द्यायची वाटच पहात असतात ! अन हे त्याला पुरेपूर माहिती आहे..खट्याळ कुठला !

...पण त्याने काल मला वचन दिलं होतं, आज संध्याकाळी भेटायचं. मग असा कसा विसरला ?

...की त्याला दुसरी कुणी गोपी आपल्या नेत्रांच्या जादूने गुंतवून घेऊन गेली ? गारुड्याने नागाला गुंगवावे तसे आपल्या मोहवणाऱ्या प्रीतीच्या जाळ्यात गुरफटून बांधून गेली ? माझ्यापेक्षाही कितीतरी सुंदर गोपी या वृंदावनात आहेत. आजवर त्या सगळ्यांपेक्षा माझ्या प्रीतीत तो अंत:करणी रत झाला होता. आज माझ्यापेक्षाही कुणा गोपीची प्रीत सरस ठरली की काय ?

....अन या विचाराने मात्र तिचा विरह आसवांच्या रूपाने तिला न जुमानता झरू लागला. बाहेर भरून आलेल्या मेघांनी एक गर्जना केली अन सरी बरसू लागल्या.

लखकन विद्दुल्लता प्रकाशली अन राधेला दिसले की शामसुंदर तिच्या नजीकच उभा आहे. सावळ्या मुद्रेतून मंद
हास्याचे शीतल चांदणे पाझरते आहे. शांत नजरेत खोलवर एक मिस्कील छटा...

‘अरे मोहना, कुठे होतास इतका वेळ ? सूर्यास्ताच्या समयी येणार होतास ना रे ? आता काही वेळातच सूर्योदय होईल...!’

‘माझ्यासाठी तर आत्ताच होतोय सूर्योदय, तुझ्या हर्षित मुद्रेच्या रूपाने...’

‘चल, तुझ्या या मधुर बोलांनी मी नाही आता फसणार ! सांग, का नाही आलास संध्याकाळी ? कुठे होतास ? कोणती सौदर्यखनी तुजसमीप होती संध्याकाळी ?’

आता मात्र कृष्णाच्या मुद्रेवर प्रसन्न अन खट्याळ हसू उमटले.

‘म्हणजे तुला इतक्यात समजले ..?’

‘अरे, म्हणजे खरंच का तू दुसऱ्या कुणा गोपीकडे होतास ?’

‘अगं ती ना,.. इतकी मोहमयी आहे ..’

राधेचे काळीजच फाटले.

‘अरे दुष्टा, निदान माझ्यासमोर स्तुती तरी नको करूस !’

‘बरं, प्रिये..’

‘काय बरं ? सांग श्रीरंगा, असे काय तिच्याकडे आहे. ज्यासाठी साक्षात तू तिजरंगी रंगून गेलास, जे मी या मनी देही, या कुडीत बाणवू शकले नाही ? ‘

‘आता, तूच विचारत्येस म्हणून सांगतो बापडा !
..अगं दिसण्यात तर ती तुझ्यापेक्षा मुळीच उजवी नाही. पण जेव्हा माझ्या विचारात दंग असते, तेव्हा तुजपेक्षा भारीच सुंदर दिसते !
..तुज सारखी मला घडीघडी बोलवतसुद्धा नाही ती. पण दिवसाचे आठही प्रहर माझ्या चिंतनात दंग असते.
प्रात:प्रहरी नेत्र उघडते, तेव्हा मी तिथे माझेच प्रतिबिंब पाहतो. स्नान-मुखप्रक्षालनादि कर्मे ती करते ते मलाच शुचिर्भूत करण्यासाठी ! गायींच्या पाठीवर ती हात फिरवते, तेव्हा माझी त्वचा थरथरते. धारा काढून ती पाकसिद्धी करते तेव्हा हर पदार्थीं हरी पाहते.

..मग जनलोक येतात. भाषण तर ती सर्वांशी करते. पण चक्षु मात्र तिचे सर्वकाळ मलाच पहात असतात.
दही मंथायला बसते तेव्हा तिचे कंकण किणकिण किणकिण न करता कृष्णकृष्ण करतात. मग जणू मजवरची तिची प्रीत साकार व्हावी तसे नवनीत वर येते अन नवनीताचा गोळा ती माझ्यासाठी काढून ठेवते.

..दुपारची निद्रा ती घेते तेव्हा तिचे नेत्र मिटले की उघडले, याचा तिलाच पत्ता नसतो. कारण हा काळा तिच्या नेत्रात विलसत असतो. दुपार टळून संध्याकाळ होईतो ती पळे कधीच मोजीत नाही... प्रत्येक पळ तिचा माझ्यापाशीच जातो.
मग सायंकाळ झाली की ती मजसाठी शृंगार करते. तिचे चित्त सदैव मीच व्यापलेले असल्यामुळे कधी कधी कुंकवाच्या जागी काजळ लावते, ओढणीऐवजी पितांबरच ओढते. केसात फुले माळण्याऐवजी मोरपीस खोचते अन हार घालते तुलसीपत्रांचा. अन हे सगळं करून झाल्यावर दर्पणात पाहते तेव्हा प्रतिबिंबालाच मी समजून चापट मारते.

...तिला माझा विरह कधीच भासत नाही, कारण ती सदैव माझ्यातच लीन असते. ती मजवीण दु:खी होत नाही, कारण मला ती सदैव संनिद्ध बाळगते. मजपासून दूरत्व द्वैत हे तिच्या ठायी, तिच्या गावी नाही , कारण ती सदैव अद्वैतात समरस असते...!

...अन अशी ती सर्वकाळ मजशी अद्वैत साधून राहते, म्हणून नित्य माझ्या हृदयीं वास करते.. ‘

आणि हे सगळं वर्णन मुकुंदाच्या मुखातून ऐकता ऐकता राधेची अशी तंद्री लागली, की कान्हा तिला किती अनिमिष नेत्रांनी अवलोकतो आहे, हेही तिला समजले नाही !

..मग जेव्हा कान्हाने तिला स्पर्श करून भान आणले, तेव्हा ती गद्गद स्वरात म्हणाली,

‘आणि ही नि:संग कृष्ण-मोहिनी कोण आहे ते सांग ना आता ! मला आता तुजपेक्षा तिच्या दर्शनाची आस लागली आहे...’

पुन्हा त्याच्या मुद्रेवर एक घनगंभीर हास्य उमटले. त्याने तिचा हात आपल्या सावळ्या हातात पकडला अन तिला भिंतीसमोर नेऊन उभे केले.

‘पहा माझी प्रिया...’

दर्पणातले चकित नेत्र राधेला न्याहाळत हसू लागले.

‘म्हणजे ? ती गोपी मीच की काय ?’

‘अगं तूच तर हे सगळे करत असतेस ! अन हे सगळं विसरतेस तेव्हा माझ्या विरहात बुडून जातेस !’

‘अरे कान्हा...!’

...अन पाहता पाहता ती पुरती कृष्णमयी होऊन गेली ! ! !

(चित्र आंजावरून साभार!)

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

2 Sep 2014 - 12:13 am | किसन शिंदे

प्रचंड आवडलं. एकीकडे राधेची भावव्याकुळता तर दुसरीकडे कृष्णाचा अल्लडपणा! या दोघांच्याही अंतरंगात डोकावून ते तितक्याच समर्थपणे सादर करण्याच्या तुझ्या लेखणीला सलाम.

सुंदर, अप्रतिम आणि अद्भुत लेख आहे हा.
लेखाने एवरेस्ट एवढी उंची गाठली आहे!

स्पंदना's picture

2 Sep 2014 - 4:26 am | स्पंदना

बाई ग!
मनोवेधक लिहिलसं.

अर्धवटराव's picture

2 Sep 2014 - 6:41 am | अर्धवटराव

खुप संदर लिहीलय.

अजया's picture

2 Sep 2014 - 8:38 am | अजया

अप्रतिम!

प्रचेतस's picture

2 Sep 2014 - 8:49 am | प्रचेतस

खूप छान लिहिलंय.

अवांतर: जय जयदेव, जय गीतगोविंद

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 3:44 pm | बॅटमॅन

जय जयदेव, जय गीतगोविंद

अगदी अगदी हेच म्हणतो!!!!

अतिअवांतरः

धीरसमीरे यमुनातीरे वसति वने वनमाली
गोपीपीनपयोधरमर्दन चंचलकरयुगशाली ;)

हा लेख म्हणजे जणू गीतगोविंदाच्या एखाद्या भागाचे गद्य भाषांतरच वाटते आहे.

प्रचेतस's picture

4 Sep 2014 - 4:28 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
आता परत गीतगोविंद वाचायला हवे.

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 5:11 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!

सस्नेह's picture

5 Sep 2014 - 2:15 pm | सस्नेह

जयदेवांच्या लेखनाशी तुलना हा खूपच मोठेपणा आहे. माझी तितकी योग्यता नाही.
..आता 'गीतगोविंद' वाचणे आले...

गीतगोविंद वाचा, मग कळेल किती तस्संच्या तस्सं लिहिलंय ते. मला वाटलेलं तुम्ही अगोदर गीतगोविंद वाचला होता म्हणून. पण खाली गोनीदांचा उल्लेख केल्यावर रम्य शैलीचे रहस्य उलगडले! शैली खासच जमलीये.

प्रचेतस's picture

5 Sep 2014 - 5:46 pm | प्रचेतस

नाही हो, तुलना नाहीच.

पण राधेसारख्या काल्पनिक पात्राला जयदेव कवीने गीतगोंविंदात आणून इतकं अजरामर केलंय जणू ती मूळ संहितेतच मिसळून गेलीय.

गीतगोविंद वाचाच एकदा. रसाळ आहे खूप.

बॅटमॅन's picture

5 Sep 2014 - 6:19 pm | बॅटमॅन

गीतगोविंद वाचाच एकदा. रसाळ आहे खूप.

जरा जास्तच रसाळ.

सस्नेह's picture

5 Sep 2014 - 9:54 pm | सस्नेह

वाचायलाच हवे आता. राधा हे पात्र सर्व गोपींच्या कृष्णावरील उत्कट प्रीती आणि भक्तीचे प्रतीकात्मक प्रतिनिधी आहे असे वाटते. दुसर्‍या बाजूने ते परमेश्वराशी निरलस भक्ती, समर्पण अन एकरूपतेचे दर्शक वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Sep 2014 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्तच लिहिले आहे. फार म्हणजे फारच आवडले.
पैजारबुवा,

मूकवाचक's picture

4 Sep 2014 - 5:47 pm | मूकवाचक

+१

रुमानी's picture

2 Sep 2014 - 9:50 am | रुमानी

अतिशय सुरेख...!

इनिगोय's picture

2 Sep 2014 - 10:00 am | इनिगोय

वाह! मस्तच गं मस्तच..
एव्हरग्रीन प्रेम आहे हे. सुरेख लिहिलंयस.

सविता००१'s picture

2 Sep 2014 - 10:09 am | सविता००१

सुंदर लेख

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Sep 2014 - 10:17 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कृष्ण कृष्ण कृष्ण!!

कवितानागेश's picture

2 Sep 2014 - 10:30 am | कवितानागेश

राधा-कृष्ण, द्वैत-अद्वैत, उन्ह-सावली, मिलन-विरह .... सगळंच हळूवार उलगडतंय... फारच सुंदर. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2014 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले. लिहित जा हो .

दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

4 Sep 2014 - 3:39 pm | सुहास..

व्वा !!

कविता१९७८'s picture

4 Sep 2014 - 3:44 pm | कविता१९७८

खुपच सुंदर लेखन

मदनबाण's picture

4 Sep 2014 - 3:50 pm | मदनबाण

सुरेख ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

पैसा's picture

4 Sep 2014 - 4:11 pm | पैसा

गोनीदांच्या हळुवार रसाळ लिखाणाची आठवण आली! मस्त लिहिलंय!

गोनीदांच्या लेखनाची माझ्यावर छाप आहे खरी !

रेवती's picture

5 Sep 2014 - 5:36 pm | रेवती

छान लिहिलयस.

मराठे's picture

5 Sep 2014 - 7:23 pm | मराठे

अतिशय सुंदर

सखी's picture

5 Sep 2014 - 9:40 pm | सखी

सुरेख लिहलं आहेस स्नेहांकिता, तुझ्या लिखाणाची ही शैलीपण आवडली.