पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात???

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
16 Jul 2014 - 7:52 pm

मंडळी
लेखाच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह टाकायचे कारण या ट्रेकबद्दल मी ज्या ज्या लोकांशी बोललो होतो त्या सर्वांनी हा ट्रेक करायला किमान दोन दिवस पाहीजेतच असे ठासुन सांगितले होते.त्यामुळे भावाने मला जेव्हा सांगितले की मुंबईचे जिजाउ प्रतिष्ठान हा ट्रेक एका दिवसात करते आणि आजपर्यंत सहा वेळा त्यांनी दर वर्षी हा ट्रेक असाच केलाय तेव्हा मी त्याला वेड्यात काढले.

हा ट्रेक "द लाँगेस्ट वन डे इन सह्याद्री" म्हणुन ओळखला जातो. पन्हाळागड ते विशाळगड अंतर अंदाजे ५७ कि.मी.
जे या ट्रेकला जाऊन आले असतील किंवा ज्यांनी वाचले ऐकले असेल त्यांना या ट्रेकच्या कठीणपणाबद्दल कल्पना असेलच.मलाही होती आणि त्यातच माझ्या ड्रीम ट्रेकमधे टॉपवर असलेला हा ट्रेक गेली अनेक वर्षे मला हुलकावणी देत होता.

शेवटी धीर केला आणि मुंबईच्या साटम सरांना फोन लावला.(साटम सर मुंबई महापालिकेत नोकरीला आहेत आणि ट्रेकिंग हा त्यांचा व्यवसाय नाही .केवळ ईतिहासाच्या वेडापायी असे ट्रेक घेउन जातात,शिवाय स्वतः सुद्धा कायम फिरतीवर असतात.) साटम सरांनी स्पष्ट शब्दात मला सांगितले "हे पहा,हा अतिशय कठीण ट्रेक आहे.बाजीप्रभु आणि मावळ्यांनी ते अंतर एका दिवसात तोडले होते.त्यांना श्रद्धांजली म्हणुन आम्ही तो एका दिवसातच करतो.मग २०/२२/२४ कितीही तास लागोत.तुम्ही आपापल्या तब्येतीचा विचार करा आणि मगच या.तिकडे येउन काही त्रास झाला
तर मध्ये काही मदत मिळण्याची शक्यता कमीच." पण सर जसजसे माझे ब्रेनवॉशिंग करत होते तसतसा माझा निश्चय पक्का होत होता.आणि मी शेवटी माझा सहभाग पक्का करुन टाकला.
====================================================

थोडा ईतिहास सांगतो....

अफझलखान वधानंतर महाराजांनी मोठी मोहीम सुरु केली आणि आदीलशाहीचा बराच मुलूख जिंकला.त्यांचे पारीपत्य करण्यास आदीलशहाने सिद्दि जौहरची नेमणुक केली आणि मोठ्या फौजेसह त्याला रवाना केले.सिद्दीने महाराज पन्हाळ्याला असताना गडाला वेढा दिला. त्यावेळच्या युद्धशास्त्रानुसार हा वेढा फारतर पावसाळ्यापर्यंत टिकेल आणि मग सिद्दी माघार घेईल असे महाराजांना वाटत होते. पण सिद्दीने पावसाळ्यातही वेढा कायम ठेवला. बाहेरुन वेढा फोडायचे नेताजी पालकरांचे अनेक प्रयत्न सिद्दीच्या सावधगिरीने फसले.गडावरही फार मोठी कुमक नव्हती.
अखेर राजांनी निवडक मावळ्यांसह विशाळगडावर पळुन जायचे ठरवले.आषाढ पौर्णिमेचा दिवस ठरला.रात्री किर्र अंधारात आणि पावसात ६०० मावळे घेउन राजे पुसाटी बुरुजाकडुन मसाईच्या पठारावर उतरले आणि वेढ्यातुन निसटुन विशाळगडाच्या मार्गाला लागले.पण खानाला याची कुणकुण लागली आणि त्याने मोठी फौज देउन सिद्दी मसुदला राजांच्या मागावर पाठवले. सिद्दीने राजांना गजापूरजवळ घोडखिंडीत गाठले आणि लढाईला तोंड फुटले.

६०० मावळ्यांचा एव्हढ्या मोठ्या सैन्यासमोर निभाव लागणे शक्यच नव्हते. शेवटी लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहीजे या नियमानुसार बाजीप्रभू देशपांड्यांनी राजांसमोर एक प्रस्ताव ठेवला.राजांनी ३०० मावळे घेउन पुढे कूच करायचे आणि ३०० मावळ्यासह बाजींनी खिंड थोपवुन धरायची.बाजींना खुण म्हणुन राजांनी विशाळगडावर पोचल्यावर तोफ उडवायची असे ठरले.

आणि मग पावनखिंडीत घोर रणसंग्राम माजला."तोफेआधी मरे न बाजी सांगा म्रुत्यूला" अश्या आवेशाने बाजीप्रभू खिंडीत लढले आणि तोफ ऐकल्यावर ३०० मावळ्यांसह त्यानी प्राण सोडले.
या अतुलनीय शौर्याला सलाम म्हणुन अनेक ट्रेकर मंडळी हा ट्रेक १० ते १२ जुलै दरम्यान करत असतात.तसेच वर्षभरसुद्धा वेगवेगळ्या ऋतूमध्ये करतात.
==================================================
शनिवार १२ जुलै २०१४ वेळ पहाटेचे ४.३०
मुंबई -पुण्याची १७ आणि कोल्हापूरची १० अशी एकुण २७ जण वार्‍यापावसाची तमा न बाळगता पन्हाळगडावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याशी गोलाकार उभे होते.साटम सर सर्वांना उद्देशुन भाषण करत होते. प्रथम त्यांनी वर दिलेला ईतिहास सांगितला.मग हा ट्रेक एका दिवसात करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला.बरोबर काय घ्या काय नको याच्या सूचना दिल्या. ट्रेक कठीण आहे हे परत एकदा सांगितले. आम्हाला ईथवर घेउन येणारी गाडी पुन्हा आम्हाला पांढरपाणी गावात भेटणार होती.त्यामुळे एकदा ईथुन सुटलो की किमान ४० कि.मी. चालणे आहे याची कल्पना दिली आणि "हरहर महादेव" "प्रौढप्रताप पुरंदर......" घोषणांनी आसमंत दणाणुन टाकत मंडळी निघाली.

सुरुवातीचा डांबरी रस्ता कधीच संपला आणि शेताच्य बांधावरुन वाटचाल सुरु झाली.मी मी म्हणणारी मंडळी धापकन घसरुन पडु लागली आणि त्यांना सावरता सावरता ईतरसुद्धा..कोण कोणाला सावरणार अशी परिस्थिती झाली.पण थोड्याच वेळात उजाडले आणि रस्ता नीट दिसु लागला.
६.३० वाजत आले होते आणि आम्ही मसाईच्या पठारावर आलो.
a
दाट धुके आणि भणाण वार्‍याने आमचे स्वागत केले.कधीकधी १०० फुटांवरचा माणुस दिसेना अशी परीस्थिती होती.पण अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता.
c
मसाईचे पठार प्रचंड मोठे आहे आणि चकवा लागला तर माणुस दोन दोन दिवस फिरत राहील अशी वेळ येउ शकते.

b

साधारण ९ वाजता एक मुख्य खूण दिसली आणि सर्वांनी हुश्श केले.मसाईचे देउळ हीच ती खूण
d

लगेच मंडळींनी सॅकमधुन खाण्यापिण्याच्या वस्तू काढल्या आणि एक मोठा नाश्ता ब्रेक झाला.

e

नाश्ता करुन पुन्हा निघालो. कधी चढ तर कधी उतार,कधी पावसाची सर तर कधी दाट धुके अशी वाटचाल सुरु होती.
h
f
t
g
मधेच गावातले रस्ते तर कधी शेते साथ करीत होती.
i
g

निसर्गाचे विविध चमत्कार बघायला मिळत होते आणि आश्चर्य वाटत होते.
k
h
मधे मधे छोटीमोठी गावे लागत होती.
l
o
वाटेत भरारी संस्थेने केलेल्या बाणांच्या खुणा आम्हाला वाट भरकटण्यापासुन वाचवत होत्या.
अशातच दुपारचा एक वाजला .ज्या गावात पोचलो तिकडेच आपापले डबे उघडुन खाउन घेतले.
मुंबईची भरारी वगैरे काही संस्था हा ट्रेक २ किंवा ३ दिवसात करतात. पण ते सुद्धा सर्वांना पॅकलंच देतात. कारण कोण किती भरभर चालु शकेल आणि जेवणाच्या वेळी कुठल्या गावात असेल हे सांगु शकत नाही.

m
j
वाटेत २-३ वेळा मोठे ओढे लागतात. पण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने ओढ्यांना फारसे पाणी नव्हते.वातावरणात एक छान गारवा मात्र होता.वाटेत जळवांचाही तत्रास होउ शकतो. मला मात्र जळवा कुठे दिसल्या नाहीत.
n
संध्याकाळ होत आली.सकाळी उत्साहाने फसफसलेली मंडळी आता एकमेकांच्या आधाराने कशीबशी चालत होती.
आता सर्वांचे कॅमेरे सॅकमध्ये गेले होते.पाय इतके दुखायला लागले होते की लोक केवळ यांत्रिकपणे चालत होते. हास्यविनोद वगैरे कधीच बंद झाले होते आणि त्या जागी आ,आई गं,आउच असे आवाज येत होते. :)कधी एकदा पांढरपाणीला पोचतो असे झाले होते. वाटेत लागणार्‍या गावकरी मंडळींना विचारावे की "पांढरपाणी किती लांब आहे ?"तर एकच उत्तर मिळे "लई लांब आहे"

"शेवटी किती अंत माझा पाहशी अनंता" म्हणता म्हणता ६.३० ला पांढरपाणी गाव आले.गावात एकच चांगले हॉटेल दिसल्याबरोबर मंडळींनी तिकडे डेरा टाकला.पोहे,चहा,ऑम्लेट,बुर्जी नुसती वर्दळ उडाली.आमची टेम्पो ट्रॅवलरसुद्धा तिथे येउन पोचली होतीच.एक एक करता सर्व जण आले अणि पुढचा विचारविनिमय सुरु झाला.पावनखिंड अजुन ६ कि.मी लांब होती आणि विशाळगड तिथुन पुढे १२ कि.मी.
अर्ध्या लोकांनी आम्ही आता गाडीतुनच येणार असा मनसुबा जाहीर केला. मी आणि काहीजणांनी मात्र ईथवर आलोच आहोत तर पावनखिंडीपर्यंत चालण्याचे पुण्य पदरात पाडुन घ्यायचे ठरवले आणि निघालो.रात्रीचे ८.३० वाजले होते. पाउस रिपरिप करत होता आणि अंधार मी म्हणत होता.साधारण १० च्या सुमाराला पावनखिंडीत पोचलो. साटम सरांनी तिथेच भर पावसात उभे राहुन तिकडचा ईतिहास सांगितला.अतिशय रोमांचकारी क्षण होता तो.

शिवाजीराजे आणि बाजीप्रभूंची जिथे उभे राहुन शेवटची गळाभेट झाली असेल तिथे आम्ही प्रत्यक्ष उभे होतो.तेही त्यांच्यासारखेच सलग १६-१७ तास चालुन...अर्थात त्यांच्या असामान्य शौर्याची सर आमच्या ट्रेकला येणार नव्हती.पण आमचा आदर तरी त्यातुन आम्ही व्यक्त करु शकलो हे ही नसे थोडके.

तळटिप-: डावा गुढघा फार दुखत असल्याने मी यानंतर गाडीतच बसुन जाणे पसंत केले.साटम सर व अजुन ४ जण विशाळगडापर्यंत चालत गेले.त्यांना आम्ही रात्री २ वाजता गाठले आणि गाडी मुंबईच्या दिशेने धावु लागली.

जय महाराष्ट्र!!जय हिंद!!

प्रतिक्रिया

चांगला उपक्रम आहे, वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले.

फक्त रोमांचकारी झण - क्षण बदलुन घ्या.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 12:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

बदल केला आहे.

आदूबाळ's picture

16 Jul 2014 - 8:09 pm | आदूबाळ

जबरदस्त!

अजून तपशिलात लिहिले असते तर मजा आली असती.

एसमाळी's picture

16 Jul 2014 - 8:13 pm | एसमाळी

काय बोलणार.....

कंजूस's picture

16 Jul 2014 - 8:13 pm | कंजूस

धन्यवाद .

मधुरा देशपांडे's picture

16 Jul 2014 - 8:20 pm | मधुरा देशपांडे

भारी. वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले.

vikramaditya's picture

16 Jul 2014 - 8:35 pm | vikramaditya

छान वर्णन आहे. एवढे अंतर चालण्यापुर्वी थोडा सराव केला तर ट्रेकचा आनंद जास्त मिळेल. अन्यथा दमछाक झाल्याने त्रास होतो.

स्वप्नांची राणी's picture

16 Jul 2014 - 8:47 pm | स्वप्नांची राणी

सही..!! सुरुवातीचे ढगाळलेले आणि मग क्लियर होत गेलेले फोटो खुपच आवडले.

मला एकदम बर्‍याच वर्षांपुर्वी केलेला भिमाशंकर ते नाणेघाट हा ४ दिवसांचा पावसाळी ट्रेक आठवला.

प्रचेतस's picture

16 Jul 2014 - 9:23 pm | प्रचेतस

मस्तच.

बाकी पावनखिंडीचे स्थान बघता राजे खिंडीतून गेले असावेत असे वाटत नाही.
पन्हाळ्यावरून येताना खिंडीतून चढावे नाही तर उतरावे लागते. खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. अर्थात खिंडीतून उतरून गेले तर कदाचित अंतराच्या दृष्टीने कमी वेळात विशाळगडावर पोहोचता यावे पण हा मार्ग काट्याकुट्यांनी, दगडधोंड्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे.
बाजीप्रभूंनी खिंडीचा वरचा भाग हा रोखून धरला असावा.

अर्थात हा फक्त अंदाज. पुरावा कुठलाच नाही.

पावनखिंडीची छायाचित्रे येथे पहा.

a

a

a

a

a

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 2:42 am | प्रभाकर पेठकर


>>>>खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत.

मला वाटतं त्या वाटा सोप्या असल्याकारणानेच टाळल्या असाव्यात. शत्रू सैन्याला चुकवित मार्गक्रमणा करताना सर्वसाधारणपणे शत्रू ज्या वाटांवर अपेक्षेने शोध घेईल त्या वाटा टाळून 'छे: त्या रस्त्याने कोणी जाऊच शकत नाही' अशा वाटांचाच विचार केला गेला असावा. सिंहगडावर चढाई करतानाही जिथून शत्रूसैन्य येण्याची शक्यता नाही अशा भ्रमात राहीलेल्या गडकर्‍यांवर महाराजांच्या सैन्याने त्या अशक्य कड्यावरूनच चढाई करून गड हस्तगत केला. शाहिस्तेखानाचा 'कात्रज' करणे, सूरतेची लूट अवघड वाटांनी महाराष्ट्रात आणणे अश्या अनेक क्लुप्त्या महाराजांनी वापरल्याचे इतिहासात (अर्थात कादंबर्‍यांमधून) वाचावयास मिळते. हा गनिमी काव्याचाच भाग असावा. त्यामुळे पावनखिंडीतून महाराज गेले असावेत ह्या विचारांना पाठबळ मिळते.
शिवाय काट्याकुट्यांचे भय आपल्यासारख्या शहरी लोकांना वाटते. आजही अनेक आदिवासी लोकं डोंगर दर्‍यातून, जिथे आपले पाय लटपटतात, अनवाणी, बिनधास्त आणि भरभर चालताना दिसतात.
महाराजांच्या पथकात, नेहमीच असे अवघड पण सुरक्षित आणि कमी अंतराच्या वाटांचे माहितगार असायचे असे वाटते आहे.
प्रतापगडाखालील जावळीतील शत्रूसैन्याची कत्तल, लाडाचे कारंजेवरून आणलेली लूट, सुरतेची लुट आणि देशावरून तळकोकणात उतरायच्या अवघड वाटा अशी अनेक वर्णने इतिहासात येतात.

पावनखिंड मीही पाहीली आहे. भयानकच आहे ती. आपली सर्व छायाचित्रे खिंडीची भव्यता, रौद्रता दर्शविणारी अत्यंत बोलकी आहेत.

नक्की काहीच सांगता येत नाही अर्थात सभासद बखर आणि इतर ठिकाणी खिंड थोपवून धरल्याचे उल्लेख आहेत.
महाराजांवरील आणिक एक संकट म्हणजे त्यावेळी विशाळगडावरही जसवंतरावाने मोर्चे लावून ठेविले होते. तस्मात जसवंतरावाचे मोर्चे ध्वस्त करूनच विशाळगडावर पोहोचणे जरूर होते.
एकूणातच 'पन्हाळ्यावरून सुटका' किंबहुना महाराजांचे सर्व चरित्रच अतिशय अद्भूत आहे.

संजय क्षीरसागर's picture

16 Jul 2014 - 9:40 pm | संजय क्षीरसागर

*i-m_so_happy*

मुक्त विहारि's picture

16 Jul 2014 - 10:03 pm | मुक्त विहारि

झक्कास...

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2014 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

भले साहसी ट्रेक ! अभिनंदन !!

यशोधरा's picture

16 Jul 2014 - 11:10 pm | यशोधरा

मस्त! काय भावना मनात दाटत असतील अशा पावनखिंडीसारख्या ठिकाणी उभे राहून!

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 2:53 am | प्रभाकर पेठकर

आनंद, भारावलेपण आणि विशाद ह्या तिनही भावना मनात निर्माण होतात.
आनंद अशासाठी की आपल्याला आपल्या आयुष्यात पावनखिंडीसारख्या ऐतिहासिक मैलाच्या दगडापाशी पोहोचण्याचे भाग्य लाभले.
अवर्णनिय भारावलेपण. महाराजांचा इतिहास, बाजी प्रभू आणि त्यांच्या साथी मावळ्यांची पराकोटीची स्वामीनिष्ठा, ते वेड, ती स्वराज्यासाठीची जाणूनबुजून दिलेली आत्माहुती आपल्याला भारून टाकते.
विशाद अशा साठी की पावनखिंडीसारख्या मराठ्यांच्या महापराक्रमाची साक्षीदार खोडखिंड पावन झाली पण सरकारकडून दुर्लक्षित राहिली आहे. धड नामफलक नाही, आत उतरायच्या शिड्यांची अवस्था दयनिय आहे इतिहास सांगणारा फलक नाही, बाजीप्रभूंचा पुतळा किंवा मावळ्यांना वाहिलेली आदरांजली नाही. वाईट वाटतं एव्हढ्या महत्वाच्या स्थळाची दुरावस्था पाहून.

यशोधरा's picture

17 Jul 2014 - 2:58 am | यशोधरा

खरं आहे..

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 11:13 am | राजेंद्र मेहेंदळे

@पेठकरकाका.....पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत.वरच्या बाजुला मोठे स्मारक ..शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले

मी तिथे रात्री पोचलो त्यामुळे दाट अंधारात फोटो काढायला जमले नाही.पण वल्लीने दिलेले फोटो खासच.

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 12:35 pm | प्रभाकर पेठकर

>>>>पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे.

पावनखिंडीच्या भयप्रद रुपाला सौम्य करणारे नसेल अशी आशा करतो. कारण पावनखिंड ही आहे तशीच नैसर्गिक राहावी तरच बाजीप्रभूंच्या आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांच्या साहसाचे महत्व आणि तो रणसंग्राम डोळ्यासमोर उभा राहतो.

>>>>तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत.
मी वरच्या बाजूने गेलो होतो. खिंडीत उतरलो नाही. एकतर माझे वजन जास्त (तरी बाजीप्रभूंचा पन्हाळ्यावरील पुतळा पाहता त्यांच्यापेक्षा कमीच असेल), शिवाय पावसाळ्यामुळे दगड निसरडे झाले होते आणि शिडी लटपटत होती.
खिंडीच्या दुसर्‍या बाजूला (खालच्या बाजूला) गेलेलो नाही. आता पुढच्या भेटीत जाईन. पायर्‍या करायला नकोत असे वाटते.

>>>>वरच्या बाजुला मोठे स्मारक ..
हे मी गेलो होतो तेंव्हा नव्हते. फक्त एक ढाल-तलवार होती टांगलेली.

>>>>शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले

हे पुढच्या वेळी पाहिनच.

सरकारने पावनखिंडी बाबत रस घेतला असेल तर कौतुकास्पदच आहे. असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.

कपिलमुनी's picture

17 Jul 2014 - 1:31 pm | कपिलमुनी

असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.

आपल्याकडे वाट लावतात हो किल्ल्यांची..
नको नको ते घडत असता मग अशा ठिकाणी..
सध्या राजमाची लाच बघा ..

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 1:36 pm | प्रभाकर पेठकर

तिकिटांच्या मिळकतीतून रखरखाव आणि किल्याचे संरक्षण ह्यावर खर्च व्हावा.

प्रचेतस's picture

17 Jul 2014 - 5:24 pm | प्रचेतस

पायर्‍या फक्त खिंडीपर्यंत जाणार्‍या उतारावरच आहेत जिथे ढाल तलवार आहे तिथपर्यंत. तिहून खिंडीत उतरायला आजही त्याच जुन्या, निरुंद आणि डुगडुगणार्‍या शिड्या आहेत.

पण पावनखिंड भयप्रद अशी वाटली नाही. अर्थात दुर्गम जरूर आहे.

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 5:31 pm | प्रभाकर पेठकर

सहा हजारांचं शत्रूसैन्य अंगावर घेण्यासाठी भयप्रद. दुर्गम तर आहेच. कदाचित हेच मुद्दे बाजीप्रभूंना सोयीचे वाटले असतील. त्या माणसाची देहयष्टी आणि चेहर्‍यावरील करारी निर्धार पाहता (आणि अर्थात सामरिक चातुर्य) त्यांच्यासाठी घोडखिंड अवघड नसेलही.

प्रचेतस's picture

17 Jul 2014 - 5:34 pm | प्रचेतस

हो.
ते आहेच.
अवघी मोजकी माणसं खचितच खिंड बराच काळ लढवून ठेवू शकतात. एकदा खिंडीत उतरल्यावर परत बाहेर जाणे अति कठीण. खिंड अधिकाधिक खोल खोल होत जाते. त्यात मध्ये मध्ये पाण्याचे डोह.

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2014 - 11:35 pm | स्वाती दिनेश

पावनखिंडीचा ट्रेक, नुसत्या कल्पनेनेच रोमांच येतात..
तुमचा ट्रेक छान झालेला दिसतोय..
स्वाती

खटपट्या's picture

17 Jul 2014 - 1:40 am | खटपट्या

ज-ब-र-द-स्त !!!!

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 2:56 am | प्रभाकर पेठकर

मेहेंदळे साहेब, सर्व छायाचित्र, साहस-सहलीचे वर्णन अप्रतिम झाले आहे. अभिनंदन.

झकासराव's picture

17 Jul 2014 - 11:15 am | झकासराव

सुरेख!!! :)

मसाई देवीच्या मंदिराची डागडुजी झालेली दिसतेय.
तिथलं झाड तोडलं वाटतं. :(

अप्रतिम. इतकं चालून पायाचे तुकडे पडल्यास नवल नाही. तुमच्या जिद्दीला एक कडक सलाम! _/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 1:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

कसली जिद्द राव...माझी आई म्हणते पावनखिंडीत बाजीप्रभू लढले आणि आमचे वीर रडले :)

बाकी तुकडे गोळा करणे अजुन चालु आहे.

तीन वर्षापुर्वी राजगड ट्रेक भर पावसात ३ वर्षाच्या लेकीला पाठिला बांधुन केला होता,पायाचे गोळे तर मी मी म्ह्णत होते पण तिला बांधलेला बेल्टने पाठिची सोलवटलेली कातडी प्रचंड आग करत होती भर पावसात घाम कसा येतो याचा लय भारी अनुभव घेतला होता.आणी विषेश म्हणजे चढताना आणी उतरताना एकदाही घसरगुंडी झाली नव्हती,लहानपणी डोंगरावर बोंबलत फिरल्याचा फायदा पहिल्यांदाच झाला.

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2014 - 12:17 pm | प्रसाद गोडबोले

एकदा हा ट्रेक करायचाय ...आता कधी मुहुर्त लागतोय देव जाणे !

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 1:09 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्वांचे आभार... :)

धमाल मुलगा's picture

17 Jul 2014 - 2:58 pm | धमाल मुलगा

लै भारी ट्रेक आहे राव ह्यो. त्यात आणि एका दिवसात उरकायचा म्हणजे ब्येक्कारच. खिंडीपर्यंत पोहोचलात हेच खूप. त्याबद्दल अभिनंदन. :)

आम्ही २०१०च्या जुलैमध्ये गेलो होतो. पावनखिंडीच्या लढाईला ३५० वर्षे झाल्याचा मुहुर्त साधून. रात्री ९:५० ला बाजींच्या पुतळ्यापासून सुरुवात करुन पुढे राजदिंडीतून खाली उतरायचं. हेऽऽ रपारपा पाऊस, काळामिट्ट अंधार अन आम्ही साठसत्तर टाळकी, महाराजांची मुर्ती पालखीत घेऊन निघालो होतो. राजदिंडीच्या तोंडाशीच पुढचा उतार अन अंधार्+पाऊस+चिखल पाहून काहीजण मागे फिरले. उरलेले पडत धडपडत पुढे गेलो. कसंबसं पहाटे चारएक वाजेपर्यंत चाललो, पण नडगीपर्यंतचा चिखल, मरणाचा पाऊस, सोलवटलेले पाय असल्या सगळ्या भानगडीत आमची आठजणांची टीम जायबंदी झाली. सालं आयुष्यात पहिल्यांदाच 'जांघेतही गोळे येऊ शकतात' हे कळालं ते त्याच रात्री.,म्हसवडेच्या अलिकडं कुठेतरी थांबलो अन तिथून उलटं चालत आंबवड्याकडं गेलो. तिथून गाडीनं खिंडीपर्यंत. लाज वाटली होती लाज स्वत:ची. हे असं अर्ध्यातून सोडून आल्याबद्दल. ते असो.

हे असलं अवघड प्रकरण तुम्ही पार पाडलंत त्याबद्दल कौतुक वाटतं. पुन्हा एकदा अभिनंदन!! :)

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 5:00 pm | प्रभाकर पेठकर

अरे धमाल मुला,

शहरात राहून 'सुख लोलुप झाली काया' अशी आपणा सर्वांचीच कथा आणि व्यथा आहे. तरीपण मनांत महाराजांबद्दल असणारा आदर, मावळ्यांच्या धाडसाचं आणि स्वामीनिष्ठेचं कौतुक आपल्यालाही अशा धाडसाला प्रवृत्त करतं. तुला जेवढं जमलं तेवढंही कौतुकास्पद आहे. मी प्रयत्न केला तर माझी अवस्था अजून बिकट होईल असा अंदाज आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 4:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

हे प्रकरणच अवघड आहे .त्यात तुम्हाला पाउस आणि चिखल जास्तच लागलेला दिस्तोय.त्यामुळे अशी हालत झाली हे समजु शकतो.
सुदैवाने(की दुर्दैवाने) ह्या वर्षी पावसाने ओढ दिली असल्याने नडगीएव्हढा पाय रुतेपर्यंत चिखल मलातरी कुठे लागला नाही.कदाचित म्हणुनच ट्रेक पुर्ण करु शकलो. :)

धमाल मुलगा's picture

17 Jul 2014 - 5:54 pm | धमाल मुलगा

२०१० साली पन्हाळ्यात पावसानं लैच्च ऊत घातला होता. ट्रेकदिवशी संध्याकाळी एकेक बातम्या येत होत्या, अमुक ओढा भरुन गेला, तमुक ओढ्याला बेकार ओढ आहे, अमुक रस्ता पाण्यानं बंद झाला वगैरे. चिखल नव्हता म्हणजे खूपच चांगली अवस्था.

तिमा's picture

17 Jul 2014 - 5:17 pm | तिमा

ट्रेकर्स ची दोन स्वप्ने असतात. सह्याद्रीत पन्हाळगड ते विशाळगड आणि हिमालयात मानससरोवर व कैलाश प्रदक्षिणा! माझी दोन्हीही कधी पूर्ण झाली नाहीत. तुमचा अचाट पराक्रम बघून कौतुक वाटले आणि साटम सरांविषयी आदर वाटला.
अजून येऊ द्यात असे अनुभव!

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 6:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

राजगड-तोरणा आणि पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमण ही माझी ट्रेकिंगमधली दोन स्वप्ने पुर्ण झाली आहेत.
आता पुढे गिरनार आणि अर्थातच पैसे जमल्यावर कैलास-मानस...बघुया कधी योग येतोय ते

किसन शिंदे's picture

17 Jul 2014 - 9:11 pm | किसन शिंदे

जबरदस्त!!

मी करू शकेन का हा ट्रेक?

ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी ३५ ते ४० किमी चाललोय मी चढउतार, खाचखळग्यातून.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jul 2014 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

का नाही करु शकणार? ४-५ जणांचा ग्रुप असेल आणि थोडे दिवस आधीपसुन जॉगिंग वगैरे सुरु केले तर नक्की जमेल.
तुम्हाला माझ्या शुभेच्छा *good*

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2014 - 4:43 pm | प्रसाद गोडबोले

कधी करायचा हा ट्रेक किसनराव ...तुम्ही कधी फ्री आहात बोला ...

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 3:07 am | प्यारे१

वाचून एकदम गोंधळ उडालाय. नेमकं शब्दात व्यक्त केलंय पेठकर काकांनी!

बाकी वर्तमान स्थिती पाहता ह्या सगळ्या महापुरुषांनी नेमकं कशासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं हा प्रश्न पडतोय. आमच्या जमिनी आम्ही स्वतःच विकतो नि नंतर तिथं वॉचमन म्हणून राहतो. स्व घालवला नि राज्य आपसुक गेलं. :(

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 5:01 pm | मुक्त विहारि

जय नेहरू.

सुहास झेले's picture

18 Jul 2014 - 4:52 pm | सुहास झेले

सहीच.... दुर्गम जागा तरी जास्त वेळ सुरक्षित राहतील अपेक्षा आहे...

बबन ताम्बे's picture

18 Jul 2014 - 5:12 pm | बबन ताम्बे

हा धागा वाचल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंच्या "राजा शिवछत्रपती" तील हा प्रसंग पुन्हा वाचला. धन्य ते छत्रपती, बाजीप्रभू आणि मावळे.

चलत मुसाफिर's picture

19 Jul 2014 - 3:33 pm | चलत मुसाफिर

मी हा ट्रेक ३ वर्षांपूर्वी पावसाळ्यात एकट्याने केला होता. त्याचे वर्णन इथे आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jul 2014 - 8:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकट्याने?
ब्लॉग् वाचला...जाम भारी लिहिलेय

चलत मुसाफिर's picture

20 Jul 2014 - 12:22 am | चलत मुसाफिर

इतर पोस्टही वाचून अभिप्राय द्यावा.

अप्रतीम लिहिलेय ओ. लयच आवडले वाचून.

शाली's picture

22 Jul 2014 - 4:51 am | शाली

ऊत्तम

पन्हाळ गड - विशाल गड मोहीम या वर्षी करायचा बेत होता.... पण तुमचा लेख वाचून पुढच्या वर्षी एका दिवसात करायची सुरसुरी चढलीये. पुढच्या वर्षी रविवार आहे १२ जुलैला. त्यामुळे आयती सुट्टी पण आहे. फक्त साटम काकांचा नंबर दिलात तर पुढच्या वर्षीची हाजरी लावून ठेवतो......

सुधीर's picture

28 Jul 2014 - 8:59 pm | सुधीर

सुरेख... लेख आवडला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jul 2014 - 10:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

फेसबूकवर पन्हाळगड-विशाळगड ,चंद्रकांत साटम किंवा जिजाऊ प्रतिष्ठान शोधलंत तर सगळे रेफरन्स मिळतील

विअर्ड विक्स's picture

14 Jun 2015 - 11:11 am | विअर्ड विक्स

यावर्षी जाण्याचा विचार आहे. साटम सरांना FB वर संदेश पाठवला आहे.

मिपा करांची संगत मिळाली तर सोन्याहून पिवळे…

किसन शिंदे's picture

14 Jun 2015 - 1:14 pm | किसन शिंदे

नक्की येईन.

तुमचा भ्रमणध्वनी कळवा व्यनितून.

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Jun 2015 - 11:11 am | राजेंद्र मेहेंदळे

नक्की भेटुया

विअर्ड विक्स's picture

21 Jun 2015 - 7:41 pm | विअर्ड विक्स

आंतरजालावर आताच माहिती मिळाली.

EVENT DETAILS PANHALGAD- PAVANKHIND- VISHALGAD, 11TH-12TH JULY 2015
पन्हाळगड ते विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम !
वर्ष - ८ वे.

पहाटेचे ५ वाजले होते . मलकापूरच्या दिशेला असलेल्या सिद्धी जोहरच्या छावणीत शिवरायांच्या वेशात असणाऱ्या शिवा काशिदांच्या शरीराच्या चिरफळ्या उडाल्या होत्या . त्याला कारणही तसेच होतेना! शिवाजी राजे पन्हाळ गडावरून निसटले होते . कित्येक दिवस करकचून आवळलेल्या वेद्यातून अलगद निघून गेले होते . सिद्धी जोहरच्या पायाची आग मस्तकात गेली होती . नामुष्की , नाचक्की झाली होती . कोणत्या तोंडाने तो आता विजापूरच्या दरबाराला सामोरे जाणार होता ?
सिद्धीने कंबर कसली . राजांचा पाठलाग सुरु केला . राजे आपल्या निवडक बांदल बांधवांसह पायी विशाळगडाची वाट तुडवत निघाले होते .
पहाटेचे ८ वाजले होते . गनीम पाठलागावर आहे याची जाणीव राजांना व बाजी प्रभू देशपांड्याना झाली शत्रू कधीही समोर उभा ठाकू शकत होता . वेळ खूप थोडा होता . गनिमास रोखणे जरुरीचे होते . बाजींनी राजांस सावध केले ." लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे . राजे तुम्ही पुढे व्हा, आम्ही हि खिंड लढवतो . गनिमास खिंड चढो देत नाही . मात्र विशाल गडावर पोहचतास भांड्यांचे आवाज काढा . जो पर्यंत माझा राजा गडावर सुखरूप पोहचत नाही तोपर्यंत आम्ही हि खिंड भांडवितो . मुजरा राजे मुजरा !
आणि मग तो देवांनाही हेवा वाटावा असा समर प्रसंग गजापुर् च्या खिंडीत घडला . बाजी आणि त्यांच्या निवडक मावळ्यांच्या रुधीराने खिंड न्हावून निघाली , पावन झाली .
३५५ वर्षे होत आहेत या गोष्टीला . म्हणूनच जिजाऊ प्रतिष्ठान सलग आठव्या वर्षी पन्हाळगड ते विशाळगड हा एकदिवशीय ट्रेक आयोजित करीत आहे . तारीख आहे ११ जुलै २०१५ . नाव नोंदणी साठी संपर्क ९८१९०२८०१२ . कृपया फेसबुक वर नोंदणी करू नये . फोन वर संपर्क साधावा हि विनंती.

अदमासे खर्च - रु. १८०० / -
अदमासे अंतर - ५७ कि मी.
प्रस्थान - शुक्रवार दि. १० - ७ - २०१५, साय. ५ वा. मुंबईहून
पदभ्रमण - शनिवार दि. ११ - ७- २०१५, पहाटे ४ वा. पासून.........
आगमन - रविवार दि. १२ - ७ - २०१५, दुपारी २ वा. मुंबईत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jul 2015 - 11:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

साटम सरांना फोनवुन माझा आणि ऑफिसमधुन येणार्‍या काही लोकांचा सहभाग पक्का केलाय.
आम्ही पुण्याहुन जॉईन करु.तुमचे कसे काय?

विअर्ड विक्स's picture

1 Jul 2015 - 11:14 pm | विअर्ड विक्स

मी मुंबईहून नि माझा भाऊ पुण्याहून येणार आहे. fingers crossed since its week day…

आशिष काळे's picture

9 Jul 2015 - 3:54 pm | आशिष काळे

विशाल येनार अहेस ना?