उन्हाळा-१ व २

दोयल's picture
दोयल in जनातलं, मनातलं
30 Jul 2008 - 8:59 am

होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत
आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल,
धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे. परसदारी अनेक झाडांची मांदियाळी होती, घराला खेटुन गुलमोहोर, मागच्या दारा पासुन थोडे पुढे विलायति चिंच, मोठ्ठा कडुनिंब, पायरि आणि रायवळ आंबा, दोन पेरु, काहि रामफळ, सिताफळ, डाळिंब, ए़कांडी पपइ, कारंजा आणि चार मोठी मोठी पांगार्याचि झाडे.
थोडा मोगरा, एक गुलाबाचा ताटवा आणि अजुन काहि अबोली, शेवंति, झेंडु, हजारि मोगरा, कण्हेर अशी फुलझाडे. सकाळी दात घासताना परसदारी मोगर्याच्या कळ्या मोजणे,
डाळींबाची फुले मोजणे असले उद्योग चालयाचे. आंघोळीला कढत पाणी लागत नसल्याने हिवाळ्या प्रमाणे चूल फुंकायची, त्यात सारण सारायची गरज नसे , आई गॅसवरच पटकन
पाणी काटा मोडे पर्यंत तापवायची.
हा असा सुखनैव कार्यक्रम सुरू असताना, आई बाबांकडे माझी भुणभुण सुरू होई ..बाहेर कधी पासून जायच झोपायला? चढता उन्हाळा आमच्या कौलारू घरालाही सोडत नसे.
रात्रि उकाड्याने झोपमोड होणे सुरू होत असे. पंखा जरी असला तरी त्याची हवा मच्छरदाणित फारशी शिरत नसे. नदी किनारी घर आणि आजुबाजुला रान, त्यामुळे मच्छरदाणी हि आमचि कवचकुंडलेच म्हणा, तिच्याशिवाय झोपणे हि अशक्यच. बाहेर झोपण्याविषयीच्या माझ्या भुणभुणीवर आईच एकच उत्त्तर असे.. " परि़क्षा संपल्यावर"
रात्री जेवल्यावर अंगणात शतपावली घालताना बाबांजवळ वशिला लावयाचा प्रयत्नही मी करून पहात असे. बाहेर झोपल्याने चांगली झोप येऊन मेंदु तरतरीत होईल आणि परि़क्षेत
चांगले मार्क पडतील असा युक्तिवादही मी नित्यनियमाने करीत असे. अर्थातच ते कधिच दाद देत नसत.
होता होता परिक्षा जवळ येई, सुरू होई आणि संपूनहि जाई.
दुसर्‍या दिवसा पासून उशीरा उठणे, थंड पाण्याने अंघोळ करणे, उन्हात वणावणा हिंडणे ( हा खास आईचा शब्द्कोश), उभ्या उभ्या माठातले पाणी ढोसणे असे हंगामी वर्तन सुरु होई.आई पहाटेच मोठ्ठा काळा माठ तिपईवर मागच्या दारी सावलीत ठेवायची आणि त्याला ओल फडक गुंडाळायची. एखाद मोगर्‍याच फुल त्यात टाकायची. खेळता खेळता
पाणी प्यायला घरात शिराव लागत नसे आणि बसून पाणी पी, चि़खलाचे पाय घरात का आणले, आता दुपारच उन्हात खेळायच नाही ह्या आणि अशा अनेक बोलण्यापासून सूट़का
होत असे. ह्या माठावर येणार्‍या मधमाशा बघत बसणे, त्यांना पकडणे आणि जबरदस्ती कुठल्या तरी फुलावर नेऊन सोडणे ह्यात मला फार रस होता. एकदा ह्या प्रयत्नात मधमाशी मला डसली देखिल होती. तुळशी जवळची काळी माती लावल्यावरच तो दाह कमी झाला. असच एखाद दिवशी बाबा स्वत:च म्हणत, आज पासून बाहेर झोपायचे.
उड्या मारतच शेजारिपाजारी जावून ही खबर मी देत असे.
शेजारची घरे आणि आमचे घर अगदी लागून, पुढच अंगण आणि मागच परसदार खेटून. घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आमच अंगण जिथे संपायच तिथे शेजारच्यांचे ओटे
सूरू व्हायचे, त्यामुळे अंगणाला आपसूकच तटबंदी मिळालेली. पुढच्या अंगणाला आम्ही फरशी घातली होती, ह्या अंगणात/ओट्यांवर भाजी निवडणे, वर्तमानपत्र वाचणे ( आपले आणि दुसर्‍यांचे!),वाळवणे वाळवणे ( त्या विशयी पुन्हा कधी), कपडे वाळवणे, अभ्यास करणे, गप्पा मारणे, मारामारी करणे असे अनेक उपाक्रम वेळ, काळ, वय ह्या नुसार चालू
असत. ह्या ओट्याअंगणांनी मंगल कार्य सुद्धा पाहिली. संध्याकाळचा चहा झाला, उन्ह उतरणीला लागली की बाबा बागेला पाणी घालायची नळी घरातून घेऊन पुढे अंगणात आणत. थोड्याशा उतरत्या संध्याकाळी अंगणात फरशीवर पाणी मारणे, घराच्या भिंतीवर पाणी मारणे ही कामे केली जात. दिवसभर तापलेल्या फरशा, भिंती थंड होत असत. ही रात्रि बाहेर झोपण्याची पूर्वतयारी..शेजारपाजारी ही थोड्याफार फरकाने हाच कार्यक्रम सुरू असे, एकमेकांवर पाणी टाकायला ऊत यायचा. नळी फिरवायचा कंटाळा आला किंवा ती चिखलानी माखली असल्यास बाद्ली तांब्याने पाणी मारायचो. शेवटच तांब्याभर पाणी हवेत उडवून त्याच्याखाली " पाऊस" असे ओरडून उभे राहिल्या शिवाय मला चैन पडत नसे. तिन्हिसांजेला आईची हाक येई पर्यंत मनसोक्त खेळून झाल्यावर, हात पाय धुवून, परवचा म्हणून झाल्यावर मी आईला स्वयपाकात मदत करीत असे. कोशिंबीर बनव, पापड भाज, भाजी चिर, पान घे असली शेलकी कामे झाली आणि रात्रिची जेवण आटोपली कि फडताळातली बडीशेप खावून मी सरळ बाहेर धूम ठोकी (जेवणा नंतरची आवरा आवर आणी रात्रीची भांडी घासणे हे दादाचे आणि बाबांचे काम होते..). बाहेर येवून अंगण झाडुन घेत असे, अंगण झाडून आणी सतरंजी घालून झाली कि बाहेरूनच गाद्या आणा असे ओरडत असे. येव्हाना उष्मा कमी होऊन छान वारा सुटलेला असायचा. बाबा गाद्या घेऊन बाहेर यायचे.काहि दिवसापुर्वी उन्हात तापवून, काठिने ठोकल्याने गाद्या मस्त खमंग, गुबगुबीत झालेल्या असत. मधल्या खोलीत कपाटाशेजारच्या फटीत उभ्या , हा त्यांचा नेहमीचा पत्ता. उन्हे दाखवल्यावर मात्र गाद्या काढताना आणि ठेवताना बरीच तोशीस पडे.
गाद्या बाहेर आणल्या की त्यांच्या गुंडाळ्या लाथ मारून उलगडायची मजाच काहि और होती. आमचे सख्खे शेजारिही येव्हाना गाद्या घालण्यात मग्न असत. पलीकडचे मयुरा आणि
संकेत आमच्याच वयाचे दंगा मस्तिला ऊत येत असे. गाद्या घातल्या, चादरि अंथरल्या, उश्या पांघरूण आणली की दादा आणी मी पत्ते खेळायला , शेजारीच संकेत, मयुरीच्या
गाद्यांवर जात असू. त्यांचे बाबा म्हणजेच कुलकर्णी काका पत्ते खेळायला उत्साही, त्यांनीच मेंढीकोट, झब्बू, उनो, नॅट ऍट होम, डीक्लेअर असे अनेक डाव आम्हाला शिकवले.
कुलकर्ण्यांच्या घराच्या डाव्या हाताला अंगण संपले कि मोठ्ठे आंब्याचे झाड होते.पलीकडे लगेच कुंपण सुरू व्हायचे. कुंपणाला लागून शेवग्याची काहि झाडे, काहि मोठे जुने कडुनिंब, आणि काहि सुबाभुळीची झाडे होति. उजव्या बाजूला भोसल्यांच्या अंगणात मोठा पेरु, काहि जाई जुईचे वेल, पलिकडे डिसूझांच्या बाजुला शेवगा आणी बाभळीच रान. आमच्या लागुन असलेल्या चार घरा व्यतीरिक्त अजून एक बंगला होता आमच्या कंपाऊंड मध्ये. कंपाऊंड मध्ये शिरल कि बंगलाच दिसायचा आधि, पाठिमागे आमची घरे.
कंपाउंड मध्ये शिरताच बंगल्या समोर भलापुराणा औदुंबर. वाढलेली फांदि काढली तर दोन दिवस पांणि वहात होत त्या तुटलेल्या फांदिमधून. जुन्या काळचा बंगला प्रचंड मोठा..
त्याला दोन घरात विभागल होत भिंत टाकून आणि आता त्यात दोन कुटुंब रहात.त्यातल्या एका घराची स्वयपाकघराची खिडकि आमच्या अंगणापुढे यायची

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

30 Jul 2008 - 9:10 am | भाग्यश्री

खूप सही लिहीत आहेस.. अगदी माझं लहानपण आठवलं... तस्सच्या तस्सं! :)

मिसळपाव's picture

30 Jul 2008 - 3:54 pm | मिसळपाव

लहानपणी धुळ्याला आत्तेकडे सगळी भावंडं जमायचो त्याची आठवण झाली.

एक प्रश्न;
'.....समोर भलापुराणा औदुंबर. वाढलेली फांदि काढली तर दोन दिवस पांणि वहात होत त्या तुटलेल्या फांदि'........'
पाणी वहात होतं? औदुंबराचा चीक पाण्यासारखा पातळ असतो? का औदुंबर खूप भराभर पाणी शोषुन घेतो? काही कल्पना आहे का?

बापु देवकर's picture

30 Jul 2008 - 5:12 pm | बापु देवकर

मस्तच्....अजुन येऊ दे...

राज....

स्वाती दिनेश's picture

30 Jul 2008 - 5:14 pm | स्वाती दिनेश

आठवणी छान लिहिल्या आहेस.. आवडले.अजून येऊ देत.
स्वाती

प्राजु's picture

30 Jul 2008 - 9:43 pm | प्राजु

येऊदे अजून...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/