कॅम्पस प्लेसमेंट

जातवेद's picture
जातवेद in जनातलं, मनातलं
10 May 2014 - 1:48 am

मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.

--------------------------------------------------------------------------------------------
इंजिनीरींगचे सहावे सेमिस्टर आले ते प्लेसमेंटचे लेबल घेऊन. आतापर्यंत जेवढा घासून कुतून अभ्यास केला तो एन्कॅश करायची संधी. परत रट्टेबाजी चालू झाली. पण या आयटी कंपन्यांसाठी अ‍ॅटिटूड आणि अ‍ॅप्टिटूड फार महत्वाचा. स्वतःचा उगिच अ‍ॅटिटूड न दाखवणे हाच तो अ‍ॅटिटूड आणि अ‍ॅप्टिटूडसाठी आर.एस. अग्रवालची पारायणं, अशी तयारि चालू होती. पण या कंपन्या, तेथे पाहिजे आयटीचे, सिवील मेकॅनिकलचे ते काम नोहे असे म्हणत नाहित. त्यामुळे आणखीन टेन्शन (त्यावेळी).

पहिला १०-१२ कंपन्या यायच्या होत्या. टिपीओ ऑफिसमधे डे-झिरो पासून शेवटापर्यंत सगळ्यांच्या डेट आणि परसेंटेज क्रायटेरिया लागले. ह्याचा अ‍ॅवरेज येवढा त्याचा तेवढा, त्यात आमचे नेत्रदिपक गुण (गोल्डनला दुर्दैवाने सगळे ड गटातले पडलेले प्रश्न सोडवून एम-टू काढलेले लोक आम्ही). जेमतेन दोनच कंपन्या आमच्या लायकीत बसत होत्या (क्रायटेरियाला मराठीत लायकी म्हणतात), काहिही म्हणा पण यातच काय ते जमवायचं होतं. त्यातल्या पहिल्या कंपनीला माझ्या टेक्निकल नॉलेजचं काही पडलं नव्हतं, म्हणजे सगळी मदार त्या अ‍ॅटी-अ‍ॅप्टिटूडवर होती. तर दुसर्‍या कंपनीला मी टेक्निकलमधे बापमाणूस असायला पाहिजे होतं ज्यावर माझी सगळी मदार होती. आता सगळ्यांच्या हातात आर.एस. अग्रवाल दिसायला लागले. प्रेमवीर लोक जे फोन कानाला टांगून बाजूच्या जंगलात तासनतास अंतर्धान पावायचे ते चक्क नजरेला पडायला लागले. दिवस रात्र, खाता पिता, हॉस्टेलवर कॉलेजवर, रात्रिच्या गार्डच्या शेकोटीजवळ बसून सगळ्यांचं एकचं अग्रवाल अग्रवाल चालू झालं.

अखेर डे-झिरो उगवला. आमचं काही काम नव्हतं पण कुहूतूल फार होतं म्हणून बघायला पोहोचलो. सकाळी ८-९ वाजता त्यांची टीम आली, इंट्रोडक्शनं झाली आणि त्यांच्या एच.आर.ने कंपनीची टिमकी वाजवायला सुरू केली. क्रायटेरियावाली दोन-तीनशे पोरं-पोरी अगदी कान टवकारून ऐकत होती, लिहून घेत होती, न जाणो यातलाच एखादा प्रश्न इंटरव्हूमधे विचारायचे. मग चालू झाला अ‍ॅप्टिटूडचा कार्यक्रम. कार्यक्रमच म्हणायला पहिजे कारण यात बाकांवर सीट नंबर घातलेले नसतात, पेरता येतील तशा सेटिंग पेरल्या होत्या. तरी हा असला पहिलाच अनुशव, त्यामुळे बर्‍यापैकी सिरीयसली चालू होतं. (पुढ एकदा एका कंपनीने ऑनलाईन अ‍ॅप्टि टेस्ट घेतली. तेव्हा हि पेरलेली मंडळी उत्तरे काढून नुसती पुरवत होती. हे तिकडे सर्वरवर बसून मॉनिटर करण्यार्‍या कंपनीच्या माणसाला लगेच कळाले, तो भडकला आणि बाहेर येऊन, "हमको क्या xxx समझा है क्या zzz" म्हणून गेला आणि खुन्नस खाऊन फार कमी जणांना घेउन गेला.)

तर या अ‍ॅप्टिची शॉर्टलिस्ट लागली. या कंपनीने मार्कांच्यामधे लोअर बरोबर उप्पर कटॉफ पण लावला होता. कारण त्यांच्या अ‍ॅनॅलिसीस वरून असे लोक एकतर जॉईनच करत नाहित नाहितर कंपनीत जास्त वेळ राहत नाहित असे दिसले होते. जे शॉर्टलिस्ट झाले होते त्यांच्या टाय मिळवण्याच्या खटपटी चालू झाल्या आणि बाकिचे पुढचं कसं असतय बघयाला मिळावं म्हणून मेसकडे पळाले. पहिले २-३ टेक्निकल राउंड होते त्यात लोकांचा घाम निघाला. अगदी चार-आठ पदरानं गाळून घ्यावं तसं एचआर राउंडसाठी वेचून घेतलेली मुलं, पण पुढे मात्र विशेष काट्छाट न करता एचार राउंड झाला. संध्याकाळी टिपिओने निकाल जाहिर केला. कुणी पार्टी करायला गेले, सेलेक्टेड प्रेमवीर परत गायब झाले, उरलेले दुसर्‍या दिवसाच्या तयारीला लागले.

आणि डे-वन उगवला. आज आणि आजच आपल्याला झळकायचं होतं! लोअर लायकीमुळे मुलं कालच्या पेक्षा एकदम दुप्पट झाली होती. टिमकीवादन झाल्यानंतर अ‍ॅप्टीसाठी क्लासरूममधे बसा असं फर्मान मिळताच धावपळ सुरू झाली. काल सिलेक्ट झालेली आज सेटिंग म्हणून आलेले (अगदी सेक्शनवाईज!). आमची काही सेटिंग नसल्याने आम्हाला अगदी आयसोलेटेड कोपरा मिळाला (हरिशचंद्र आडवा आला दुसरं काय). जिथे अग्रवाल ने तारले तिथे इंग्लिश सेक्शनने पार दांड्या उखडून टाकल्या. तरी एकूणच बाकिच्यांचीपण अ‍ॅवरेज बुद्धिमत्ता माहित असल्यामुळे आशा तग धरून होती. टिपिओने सांगितले की पेपर बरेच असल्यामुळे जसे तपासले जातिल तसे टप्प्याटप्प्याने लिस्ट जाहिर होईल. अशी १५-२० जणांची एक एक लिस्ट दर अर्ध्या-पाउण तासाने मोठ्याने ओरडून सांगायचे. तेवढ्याश्या छोट्या जागेत एवढे लोक अगदी शांतपणे एक एक नाव लक्ष देउन नावे ऐकायचे. त्यातून आपल्या एखाद्या मित्राचे नाव आले तर तेवढ्यापुरते हुर्रे कि परत शूsssssशूssss. अशातच जेवणाच्या वेळा टळून गेल्या, जेवणाचं पार खोबरं झालेलं. कुत्र्यागतं भुका लागल्यामुळे बेकरीच्या आयटमांवर भागवण्यात आले.

दिवसभर उन्हात उभा राहून, प्रत्येक वेळी त्या लिस्ट्मधे आपले नाव न ऐकून थोडं निराश होउन सगळ्यांचा चेहरा रापल्यागत झालेला. मुलिंसाठी होस्टेलचं टायमिंग शिथील केलेलं. या अवस्थेत इंटरव्हू द्यायची कुणाचीच तयारी नव्हती. शॉर्ट्लिस्टेड लोकांचे इंटर्व्हू चालूच होते. अखेर रात्री १० वाजता टिपिओ दोन कागद नाचवत बाहेर आला! लगेच शे-दोनशे लोकांच कोंडाळं जमलं. तो म्हणाला, "ह्या दोन लिस्ट शेवटच्या लिस्ट आहेत. आता फार वेळ झाल्यामुळं याचे इंटरव्हू उद्या पुढच्या कंपनीच्या आधि सकाळी ६.३० वा. होतील. आता मी नावे वाचून सांगतो". असे म्हणून तो एक एक तो एकूण कितवा शॉर्ट्लिस्टेड कॅन्डिडेट आहे त्या नंबरसकट नाव वाचून दाखवू लागला. सगळी जिवाचा कान करून ऐकू लागली. आता हुर्रे शूsss नव्हतच कारण अनेक कमी मार्कवाल्या मुलांना इथे करो या मरो परिस्थिती होती. सगळे आपलं नाव येतय काय बघत होती. पहिला कागद संपला, दुसरा संपायला आला आणि तो मधेच म्हणाला, "आणि १५२ नंबरावं शेवटचं नाव आहे", एक बर्‍यापैकी पॉज घेउन, माझं नाव! च्यामारी, जीव भांड्यात कसा पडतो हे चांगलच समजलं मला. त्यादिवशी बर्‍याच जणांनी बर्‍याच शिव्या घातल्या असणार. मला माझा आनंद कळायच्या आधिच शे-दिडशे पडलेले चेहरे दिसले होते. उरलेल्या लोकांत अ‍ॅप्टीवाले अगदी दिग्गज लोक पण होते. माझा मित्र ज्याच्याकडून आदल्या रात्री बर्‍याच गोष्टी शिकलो होतो मी तो माझ्या बाजूलाच उभा होता. क्षणात सगळांचा उत्साह मावळला. मला फक्त कॉग्रट्झ म्हणून तो बाहेर पडला. आता उद्याची कसली तयारी करायची, एचार इंटरव्हू तर होता. फार तर शकुंतला देवी वाचलो असतो पण ते पुस्तक माझ्या नेहमीच डोक्याच भुगा करते.

पहाटे ५ वाजता वडिलांनी फोन करून अलार्म केला. माझ्या पलिकडच्या खोलीमधला एक सिवीलचा पण माझ्या बरोबर होता. सकाळी ७ वाजता इंटरव्हू चालू झाले, माझे नाव आले. मी एका आधिच्या झालेलेल्या कडून टाय गाठीसकट घेउन लावला (हा टाय डे-झिरोच्या सकाळपासून फिरत होता). आत गेल्यावर थोडा अंदाज घ्यायचा होता, पण लगेचच एका केबिनमधे पाठवलं. केबिनचं दार महाघट्ट होतं. आयुश्यातला पहिला इंटरव्हू, इंग्लिश्चे वांदे, त्यातून हे दार उघडना, मे आय कम ईन गंडलं. पहिलं इंप्रेशन खराब! एक पन्नाशिच्या बाई होत्या. ग्रीट करून त्यांच्याकडे फाईल सरकवत खूर्चीवर बसलो. त्यांनी इकडचे तिकडचे वैयक्तिक प्रश्न विचारून नेहमी सारखं एक कोडं घातलं. काय तर एका रूळावर मुलं खेळताहेत आणि दोन्ही बाजूंनी रेल्वे येताहेत, तुम्ही एकाचे ड्रायवर आहेत तर काय कराल? *unknw* एकूणच इंप्रेशन फूल डाउन होत चाललं होतं. माझा आवाज मोठा असल्यामुळे त्यांना मला २-३ वेळा "थोड्या हळू आवाजात बोल" असं सांगावं पण लागलं होतं. अगदी शेवटी त्यांनी मला प्रश्न केला, "तुझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय प्रसंग कुठला?". अरेच्या, हा तर प्रश्न मी तयारच केला नव्हता.

मी म्हणालो, "मला क्वचीत एखादा प्रसंग आधि घडून गेला आहे असे वाटते आणि एकदम जग थांबल्या सारखे वाटते".

तिला वाटले असणार कुणाला आणून बसवले आहे. ती म्हणाली, "म्हणजे ते सिरियल्स मधे कुणीतरी मांत्रिक-तांत्रिक बाबा वगैरे दाखवतात तसे काय?"

"नाही नाही. हा जगात सर्वाना माहित असलेला कन्सेप्ट आहे. याला देजा वू म्हणतात. आणि मुळात हा शब्दच फ्रेन्च की जर्मन काहितरी आहे."

आता ती जरा गंभीरपणे बोलू लागली, "अछा? म्हणजे नेमके असे कसे होउ शकते आणि असे का होते."

मी म्हणालो, "अजून यावर काही सर्वमान्य उत्तर सापडले नाही. प्रत्येकाच्या आपापल्या थेरी आहेत."

"अछा. मग तुझी तेरी काय आहे?" ती.

मी नुकतच स्वामी विवेकानंदांच एक योग पुस्तक वाचलं होत. ज्यात त्यांनी एका व्याख्यानात जगाच्या चक्राविषयी सांगितले होते, "यापुर्वीही अगणित वेळा मी इथे उभा राहून तुमच्या समोर हेच व्याख्यान दिले आहे. यापुर्वीही अगणित वेळा तुम्ही इथेच बसून हेच व्याख्यान ऐकले आहे. आणि यापुढेही अगणित वेळा असेच होईल".

मी तो पुर्ण भाग समजाउन देउन म्हणालो, "म्हणजे यापुर्वीही अगणित वेळा मी हा इंटरव्हू दिला आहे; यापुर्वीही अगणित वेळा तुम्ही इथेच बसून हा इंटरव्हू घेतला आहे. आणि यापुढेही अगणित वेळा घ्याल."

त्या बाईंनी स्वतःची प्रायवेट डायरी पिशवी उघडून काढली, मला देजा वू चे स्पेलिंग विचारून लिहून घेतले आणि म्हणाल्या, "धन्यवाद. झाला तुझा इंटरव्हू. जा तू आता. बेस्ट लक!".

जीवनमानतंत्रनोकरीअनुभवप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 2:12 am | तुमचा अभिषेक

मस्तच .. फुल्ल धमाल आली वाचताना .. प्रत्येक वाक्यावाक्या शब्दाशब्दाला अगदी अगदी वाटत होते.. साला मी आणि माझ्या मित्रांचे टोळकेच आठवत होते .. टायची सोय तर अशीच व्हायची तसेच, अ‍ॅप्टीट्यूड आणि टेक्निकल लेखी परीक्षेतून क्लीअर होऊन ग्रूप डिस्कशन आणि ईंटरव्यूसाठी शॉर्टलिस्ट झाल्यावर मी हॉस्टेलमध्य मित्राच्या रूमवर दाढी करायला पळालो होतो ते आठवले .. त्या नादात जेवायचे राहीले होते .. संध्याकाळपर्यंत... पहिलाच अनुभवा होता तो.. पार ताटकळत उपाशी राहत दिवस मावळताना मी अंतिम फेरीत फिनिश लाईनच्या अगदी जवळ पोहोचून ऐन मोक्याला स्पर्धेतून बाद झालोय हे समजल्याने रात्रीचे जेवण देखील घशाखाली ऊतरले नव्हते. तरीही अखेरीस कँपस इंटरव्यू मधूनच सिलेक्ट झालो .. अर्थात, कॉलेज आपला शंभर टक्के कँपसचा रेकॉर्ड वगैरे राखायला वा दाखवायला सर्वांसाठीच ज्याच्या त्याच्या लायकी नुसार कोणती ना कोणती तरी कंपनी आणेलच असा विश्वासही होताच ..

असो, झक्कास लेख पण.. बाकी पुढे काय झाले हे लेखात नाही सांगितले पण प्रतिसादांत तरी सांगा की .. ;)

जातवेद's picture

10 May 2014 - 7:06 am | जातवेद

धन्यवाद. पुढे ८.३० वा. आम्हाला सर्वांना एका वर्गात नेउन निकाल वाचण्यात आला. माझे नाव टिपिओने जरा चुकीचेच वाचले, त्यामुळे गोंधळलो, पण मग पुन्हा जीव आणि ते भांड *lol* पहिला घरी फोन करून कळवलं. पुढचे २ तास सिलेक्टेड मित्रांसोबत टिपिओ ऑफिसच्या पायर्‍यांवर बसून त्या दिवसाच्या कंपनीसाठी चाललेली इतरांची पळापळ बघत बसलो होतो :)

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 1:38 pm | तुमचा अभिषेक

मी घरी कधीतरी दहा-पंधरा दिवसांनी सहज विषय निघाला म्हणून कळवले होते ... अरे हा, आमची परीक्षा या या तारखेला संपल्यावर पुढच्या एक तारखेपासून मी कांदिवलीला नोकरीला जाणार आहे.. असे फायनल ईयरची परीक्षा व्हायच्या आधीच पोरगा नोकरीला लागला असेल याची कल्पनाच नव्हती घरी ..
अर्थात ती नोकरी कन्फर्म होऊनही मधल्या काळात अजून यापेक्षा काही चांगली मिळतेय का याची शोधाशोध होतीच म्हणून आवर्जून घरी सांगितले नाही इतकेच .

मुक्त विहारि's picture

10 May 2014 - 9:20 am | मुक्त विहारि

आमच्या नशिबात, हे कँपस इंटरव्ह्यु चे सूख आलेच नाही.

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 1:39 pm | तुमचा अभिषेक

माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या नशीबी कांदेपोहे कार्यक्रमाचे सुख आले नाही म्हणून हळहळत असतो.
हे देखील त्याच प्रकारचे मिसवलेत मग तुम्ही ..

मुक्त विहारि's picture

11 May 2014 - 2:38 pm | मुक्त विहारि

फक्त कांदे पोह्यांची जागा कॉफी-पानाने घेतली.

शेवटी काय हो, खाण्या-पिण्याशिवाय बारसे पण होत नाही आणि बारावे पण होत नाही.

खाद्य पदार्थांतच आणि सुख-दु:खातच काय तो फरक.

मंदार कात्रे's picture

10 May 2014 - 8:25 pm | मंदार कात्रे

अगदी कॉलेज तरुणाच्या मनाची तगमग छान उतरली आहे लेखणीतून.
पु ले शु

विजुभाऊ's picture

11 May 2014 - 11:22 am | विजुभाऊ

कँपस इंटर्व्ह्यू साठी कॉलेजातलया पोरांच्या काही घट्ट गैरसमजूती कॉलेजातल्या मास्तर लोकानी करुन दिलेल्या असतात.
१) अ‍ॅप्टी टेस्ट आणि गृप डिस्कशन हे फारसे महत्वाचे नसते (खरेतर जर फुल्ल मॉब असेल तर इलिमिनेशन साठी हमखास वापरला जातो.)
२) आयटी मधे उत्तम प्रोग्रमिंग येणे हाच फक्त एकमेव निकष लावला जातो ( खरेतर हा क्रायटेक्रीया फक्त १०% भाग पुरता अपेक्षीत असतो.)
३) सी व्ही मधे मागल्या सर्व सेमिस्टर्स मधे उत्तम गुण असावेच लागतात.( हाही एक मोठ्ठा अपसमज)
४) तुम्ही केलेला प्रोजेक्ट फारसा महत्वाचा नसतो. ( प्रोजेक्ट कसा एक्झीक्यूट केलात हे ऐकण्यात मुलाखत घेणाराला सर्वात जास्त रस असतो. त्यावर इन्टर्व्ह्यू तारून नेऊ शकता. ६० वेटेज म्हणा ना.)
(इन्टर्व्ह्यू मधे तुम्हाला किती नॉलेज आहे यी पेक्षाही तुम्ही जे आहे ते कसे मांडता / किती आत्मविश्वसाने मांडता यावर बरेच अवलंबून असते.)
५) तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा प्रोफेसर/.मास्तरानी जे सांगितले तेच जगात अद्ययावत आहे. ( प्रत्यक्षात कॉलेजात जे शिकवले जाते ते अगदीच जुजबी /प्राथमिक ज्ञान असते.)

एका मोठ्या अभियान्त्रिकी शिक्षण तज्ञाने तीन महिन्यापूर्वी एक भयानक सत्य दाखवून दिले होते. भारतात अभियान्त्रिकी कॉलेजात शिक्षकांना जे शिकवता येते ते शिकवले जाते. उद्योगधंद्यासाठी (आणि पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी) काय जरुरी आहे ते नव्हे. teachers teach what they know/ can teach, not what the industry needs. आणि अशाच एका सर्वेक्षणात असे आढळून आले कि फक्त २६ टक्के अभियंते आणि १८ टक्के व्यवस्थापकीय विद्यार्थी ( मनेजमेंट) यांच्या कडे नोकरीसाठी आवश्यक ते ज्ञान आहे( employable skill/ knowledge). त्यामुळे आपण काय शिकलो आणि काय विकले जाते यात असणारी तफावत दूर करणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला आवश्यक असणारे तंत्र आहे . .

मस्त कलंदर's picture

15 May 2014 - 3:17 pm | मस्त कलंदर

शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील तर अवघड आहे.

वस्तुस्थिती अशी आहे, राजकारण सगळीकडे आहे. अभ्यासक्रम बनवणारे फक्त आपल्या महाविद्यालयातल्या लोकांवर/ओळखीतल्या ती जबाबदारी सोपवतात. (मुंबई विद्यापीठाचा गेल्यावेळचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम कुणी कसा बनवला यावरून हे मत बनवले आहे.) सध्या तिसर्‍या-चौथ्या वर्षात शिकवला जात असलेला अभ्यासक्रम सत्र सुरू झाले तरी आला नव्हता यावरून विद्यापीठांना त्याबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात दिलेला अभ्याक्रम शिकवावा लागतो, त्यामुळे फक्त आपल्याला येते तेच शिक्षक शिकवतात हा मुद्दा गैरलागू आहे. काळेगोरे सगळीकडेच असतात त्याप्रमाणे शिकवणारे व न शिकवणारेही सगळीकडेच असतात. त्यामुळे सरसकटीकरण करणार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं.

एकीकडे अभ्यासक्रमाची बोंब आहे, आणि दुसरीकडे क्लासेस आणि टेक्मॅक्स/टेकनीकल सारख्या नोटसवाल्या लोकांचे पेव फुटले आहे. धादांत खोटी माहिती देणे हा या लोकांच्या हातचा मळ आहे. माझ्या माहितीनुसार, पूर्ण अभ्यासक्रमाचे एक, परीक्षेपूर्वी तीन दिवस आणि एक उत्तर- अनेक प्रश्न या छापाची पुस्तके बाजारात आहेत. ज्या दहा प्रश्नासाठी पाठ केलेले एक उत्तर माहिती असणार्‍या विद्यार्थ्याला उत्तर नक्की कशा प्रकारे अनुषांगिक (रेलेव्हंट) आहे हे माहित नाही, त्याला इंजिनिअरिंग काय कप्पाळ कळणार आहे? एका बर्‍यापैकी नावाजलेल्या महाविद्यालयात मी नुकतीच Distributed Systems या विषयाची BE Computer Engg च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली. तिथल्या एकाही विद्यार्थी/विद्यार्थिनीने how to access a network resource? या साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी वाचलेल्या नोटस अनुसार नेटवर्कमध्ये फक्त फाईल्स असतात आणि कुठेतरी दोनदा क्लिक केल्यावर नेटवर्कमधला संगणक वापरता येतो. आयपी अ‍ॅड्रेस-तो कसा वापरावा याबाबतचं उत्तर बर्‍याचशा हिंट्स देऊन पण मिळालं नाही. आणि तिसर्‍या वर्षाच्या Advanced Computer Network या विषयात त्यांना याचं सखोल प्रॅक्टिकल्स मध्ये हे शिकवलं जातं. आता इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा करायच्या याची माहिती स्वतःला असायला हवी असे जर विद्यार्थ्यांना वाटत नसेल, तर तिथे शिक्षक प्रत्येक घोड्याच्या तोंडात पाणी आणून ओतू शकत नाही.

मी माझ्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सचं काम पाहाते. मुलांना स्वतःची लायकी(बौद्धिक्/कष्ट करण्याची तयारी) काही का असेना, आम्हाला गुगल-फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट्स का देत नाही ही ओरड कायम असते. आम्ही Job Description, Key Responsibilities, CTC, Location, About Company ही सगळी माहिती देऊनसुद्धा कोर्‍या पाटीने येणारी मुले म्हणजे नेहमीचे चित्र आहे. Pre-placement Talk मध्ये आम्ही काय करतो असं कंपनीवाल्याने विचारल्यावर पिन्ड्रॉप सायलेन्स पण सवयीचा. कशात करियर करायचंय याबद्दल यांना काहीही प्रश्न नसतात आणि आपसूक उत्तरे तर त्यापलिकडे माहित नसतात. त्यातच एका निकालानंतर दाढी करायला पळाणारे, रेझ्युमेची प्रिंट, फोटो आणायला जाणे हेही नेहमीचे. बरेचदा दोन राऊंडमध्ये इतका वेळही नसतो. ज्या लोकांना आपल्याला पुढे जायची संधी मिळेल असे वाटत नाही, आणि त्यानुसार ते तयारीने ते येत नसतील, तर त्यांनी येऊच नये असं माझं ठाम मत आहे. माझ्या कॉलेजमध्ये ७५०+ विद्यार्थी आहेत आणि वर्षाकाठी कमीत कमी ५५ कंपन्या येतात. अशा वेळेस प्रत्र्येक वेळेला असली कारणं घेऊन येणारे विद्यार्थी आणि नाकाने कांदे सोलणार्‍या एच आर जाम वैताग आणतात.

मस्त कलंदर's picture

15 May 2014 - 3:28 pm | मस्त कलंदर

आणखीही दुसरी बाजू म्हणून माझीही शँपेनच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..

आनन्दा's picture

12 May 2014 - 10:40 am | आनन्दा

आमचं पण सेम असच होत.. अगदि गोल्डनवर जऊन नाही, पण गोल्डन वर जाता जाता वाचलेला एम-४..
आमच्या कडे पण सगळे आर एस अग्रवाल, आणि आम्ही आता आपल्या इंग्लिशचे कसे होणार या विवंचनेत. अखेरीस अ‍ॅप्टि झाली, आणि गम्मत म्हणजे त्या अ‍ॅप्टिमध्ये ४० पैकि ९ मार्कांना एक गुगली टाकली होता, आणि त्यात भले भले अ‍ॅप्टिवाले गारद झाले. इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यावर काम सोपे होते.

जातवेद's picture

15 May 2014 - 9:22 pm | जातवेद

ते टेंशन मिस केलं तुम्ही. गोल्डन चा पेपर देणं म्हणजे अगदी काय सांगायचं आत :)

पैसा's picture

15 May 2014 - 11:29 am | पैसा

लिखाण आवडलं. वरच्या मार्कांना कटोफ हा किस्सा माझ्या बाबतच घडला आहे (२५ वर्षांपूर्वी). एका ग्रामीण बँकेच्या इंटरव्ह्यूमधे मला तोंडावरच सांगितलं होतं. की तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमची क्वालिफिकेशन्स जास्त आहेत! तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत टिकणार नाही.

ब़जरबट्टू's picture

15 May 2014 - 1:21 pm | ब़जरबट्टू

मस्त जमलय.. अजुन येऊ द्या..
नशिबाने हे सर्व योग नशिबात आले नाही.. आमची लायकी माहीत होतीच, त्यामुळे असेल कदाचीत...पण नतंर झालेला हा किस्सा..
एका कंपनीत इन्टरव्युला गेलो.. फ्रेशरभरती सुरु होती.. त्यात अ‍ॅप्टिटूड ठेवलेली..मोजुन १० जण होतो.. कसेतरी त.त.म.म करत दिली परिक्षा..दिवस वाया गेला म्हणून रडत होतो.. निकाल आला.. सिलेक्टेड... विश्वासच बसेना...
ज्वाईन झाल्यावर एकेदिवशी ब्वासला विचारले, सर, मला वाटले नव्हते हो मी कट आ॓फ पास करेल..तो रागाने म्हणाला.. नालायकांनो, तुम्ही नाय कट आफ पास केला.. एकपण तिथपर्यन्त पोहचला नाही, म्हणुन शेवटी आम्हीच तो खाली आणला होता :))

स्मिता श्रीपाद's picture

15 May 2014 - 1:58 pm | स्मिता श्रीपाद

मस्त लेख...माझंपण कॅम्पस सेलेक्शन आठवलं...
हे सगळं वर्णन सेम टु सेम माझ्याच कॉलेज च आहे असं वाटत होतं वाचताना...
"तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असंच आलं मनात :-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 May 2014 - 7:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदम मस्त लेख भौ

ती गर्दी,काँपिटिशन, आयत्या वेळची तयारी करुन जायची इंजीनियरिंगची सवय,तरीही आपल्याला सर्व काही येताय हे दाखवण्याची धडपड, छान जॉब मिळवण्यासाठीची अधीरता,काम होइपर्यंत भुकेल्यापोटी ताटकळत राहणे,उधारीचा टाय सगळं सगळं आठवलं राव
पुलेशु

लेखन अगदीच आवडलं. मस्त, एकदम चित्रदर्शी!

जातवेद's picture

15 May 2014 - 9:27 pm | जातवेद

,