घारापुरीचे शैवलेणे - मिपाकरांसोबत

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
10 Mar 2014 - 10:01 am

a

बरेच दिवस घारापुरी भ्रमंतीसाठी योजना आखणेच चालले होते पण प्रत्यक्ष जाणे काही दृष्टीपथात येत नव्हते. अचानक मुविंच्या एका मुंबई कट्ट्याच्या धाग्याच्या निमित्ताने उचल खाल्ली आणि मुविंशी संपर्क करून १ किंवा ८ मार्च अशी दोलायमान अवस्थेत असलेली भ्रमंतीची तारीख १ मार्च २०१४ अशी पक्की ठरवली आणि या निमित्ताने पुणेकर आणि मुंबईकरांच्या हृद्य भेटीचा योग जुळवला गेला.

शेवटी १ तारखेची पहाट उजाडली. पुणेकरांनी सिंहगड एक्सप्रेसने सीएसटीच्या दिशेने प्रस्थान केले तर काही मुंबईकर सीएसटीवर तर काही थेट गेट वे ऑफ इंडियापाशी येऊन उभेच होते. आता ह्या सर्व घटनाक्रमाची साद्यंत हकीकत श्री. अत्रुप्तजी आत्मा यांनी येथे आधीच दिल्याने मी परत त्याची द्विरुक्ती करत न बसता मुख्य विषयालाच हात घालतो.

घारापुरी बेटावर जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाच्या ४ नंबरच्या धक्क्यावरून बोटी सुटतात. १२० आणि १५० असे अनुक्रमे इकॉनोमी आणि लक्झरी असे परतीच्या प्रवासासह तिकिटाचे दर आहेत. तिकिटे काढून सर्व मिपाकर लगेचच बोटीत जाऊन बसलो. निम्म्यापेक्षा जास्त बोट ही मिपाकरांनीच भरलेली होती त्यामुळे गप्पांना, दंग्यांना पौर्णिमा/अमावास्येच्या भरतीप्रमाणेच पूर्ण उधाण आले होते. घारापुरी बेटावर जास्तीत जास्त अर्ध्या तासात पोहोचू असे मला वाटत होते. पण हा प्रवास तब्बल तासाभराचा होता. अर्थात ही समुद्रसफर असल्याने समुद्रसहवास खर्‍या अर्थाने उपभोगता येत होता.

तासाभरातच घारापुरी जेट्टीवर पोहोचलो. जेट्टीपासून साधारण अर्धा किमी चालत जाऊन पोहोचल्यावर घारापुरीच्या पायर्‍यांपाशी पोहोचता येते. वाटेत दोन्ही बाजूंना हस्तकलेच्या वस्तूंची बरीच दुकाने आहेत. तिथे वेळ न घालवता आम्ही काही जण भराभर वरती गेलो तर काही जण मागे चहापाण्यासाठी रेंगाळत होते. पायर्‍यांपासून साधारण १०/१५ मिनिटांतच थेट लेण्यांच्या प्रांगणात पोहोचता येते. तिथेच पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे. अर्थात हे पाणी घारापुरीच्या लेणीतीलच एका टाक्याचे असल्याने किञ्चित अशुद्ध आहे पण नक्कीच पिण्याजोगे आहे. तिथेच लेण्यांमध्ये प्रवेशासाठी तिकिट खिडकी आहे. तिकिटे काढून आत गेलो ते थेट घारापुरी येथील जगप्रसिद्ध लेणी क्र. १ च्या पुढ्यातच.

घारापुरी ठिकाण बहुत प्राचीन. कलियान, श्रीस्थानक, सूप्पारक, चेऊल ही प्रसिद्ध बंदरे येथून जवळ. साहजिकच श्रमणांना हे बंदर बहुत सोयीचे. म्हणूनच इथे अशोककालीन बांधीव स्तूपाचे अवशेष सापडले आहेत. अशोककालानंतर पुढे जाता जाता इसवी सनाच्या दुसर्‍या शतकातील सातवाहन राजा श्री यज्ञ सातकर्णी याचे कारकिर्दीतील नाणी येथे सापडली आहेत. सातवाहनांच्या कारकिर्दीत येथे दोन बौद्ध गुहा कोरल्या गेल्या. साहजिकच घारापुरी बेटावर पूर्वीपासून वस्ती होती हे सिद्धच होते. त्यानंतरच्या कालखंडात घारापुरीचा उल्लेख समुद्राने वेढलेली 'पुरी' असा आढळतो. नंतरच्या काळात इथे राष्टकूट, कलचुरी, कोंकण मौर्य अशा सत्ता आलटून पालटून येत गेल्या व ह्याच सुमारास येथील शैव लेणी कोरल्या गेल्या. त्यानंतर ९ व्या/ १० व्या शतकात राष्ट्रकूटांचे मांडलिक उत्तर कोकणचे शिलाहार यांची पहिली राजधानी 'पुरी' ही होती असे काही शिलालेख आणि ताम्रपटांतून दिसते. काही संशोधक मुंबईजवळील घारापुरी बेट किंवा जंजिर्‍या जवळील राजापुरी हिलाच हे राजधानीचे ठिकाण मानतात. पण ठाणे जिल्ह्यातच कुठेतरी हे ठिकाण वसलेले असावे, असेही मानले जाते. यांच्या राज्यात प्रामुख्याने हल्लीच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या भूभागाचा समावेश होता. जवळपास १४०० गावे ह्यांच्या अमलाखाली होती. उत्तर कोकणातला शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर. देवगिरीच्या यादवसत्तेचा प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा पराभव केला, तरी त्याला उत्तर कोकणाचा कुठलाही प्रदेश ताब्यात मिळाला नाही. पण कृष्णाच्या भावाने आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादवाने (हा देवगिरीचा यादव सम्राट रामदेवरायाचा काका) ही मोहीम अशीच चालू ठेवली. हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्यामुळे त्याने पळून जाऊन बहुधा समुद्रवलयांकित घारापुरी येथे आश्रय घेतला. महादेव यादवाने उत्तर किनार्‍यावरच्या अरब मांडलिकांची मदत घेऊन भर समुद्रातही सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य खर्‍या अर्थाने समुद्रात बुडाले. (इ.स. १२६५).
बोरिवलीच्या एकसर गावात असणार्‍या एका वीरगळात जमिनीवरचे हत्तींच्या साहाय्याने केलेले युद्ध आणि समुद्रावरचे नावांच्या साहाय्याने केलेले युद्ध कोरण्यात आलेले आहे.
यानंतरच्या ४० वर्षांतच देवगिरीच्या यादवांची सत्ता मलिक काफूरने उलथवून टाकली. यानंतरचा घारापुरीचा इतिहास फारसा ज्ञात नाही पण साधारण १४ व्या/ १५ व्या शतकात हे बेट गुजरातच्या सुलतानांच्या ताब्यात होतं. त्यांनी ते पोर्तुगीजांना १५३४ साली विकलं आणि १६६१ सालात इंग्लंडच्या चार्लस राजाला मुंबईबरोबरच घारापुरी बेट हे आंदण म्हणून मिळालं. हा मधला पोर्तुगीज अंमलाखालीन उण्यापुर्‍या १३० वर्षांचा कालखंड घारापुरीसाठी भयानक वेदनामय ठरला. इथल्या लेण्यांतील अतिशय देखण्या मूर्तींवर घणाचे घाव नव्हे तर सैनिकी सराव आणि त्या निमित्त्ये मूर्तीभञ्जन म्हणून बंदुकांचे आणि तोफांचे बार उडवण्यात आले आणि इथल्या मूर्ती विद्रूप केल्या गेल्या. अर्थात इथल्या कसबी कारांगीरांनी त्या इतक्या तन्मयतेने कोरलेल्या आहेत की जरी त्या आज भग्न असल्या तरी त्यांचे मूळाचे सौंदर्य अजिबात लपत नाही. आजही त्या इतक्या उठावदार, इतक्या देखण्या आहेत की त्यांच्या सुवर्णकाळात तर त्या कमालीच्या असाव्यात.
घारापुरी बेटावर एक शिलालेखही होता. पण तो वाचता न आल्यामुळे पोर्तुगीजांनी तो पोर्तुगालला पाठवला त्यानंतर तो गहाळ झाला त्यामुळे ह्या अद्भुत लेण्यांचा निर्माता कोण हे आजही एक रहस्यच आहे. अर्थात लेणी खोदण्याच्या शैलीवरून त्या ६ व्या ते ८ व्या शतकात कोरलेल्या असाव्यात. काही जण राष्ट्रकूटांना, काही जण कलचुरींना तर काही जण कोंकण मौर्यांना लेणी निर्मितीचे श्रेय देतात. घारापुरी लेणीचे वेरूळ मधील लेणी क्र. २९ अर्थात धुमार लेणे किंवा सीतेची नहाणी ह्या लेणीशी प्रचंड साम्य आहे. जणू एकाच राजवटीत ही खोदली गेली असावीत. घारापुरीचे कोरीव काम हे धुमार लेणीच्या आधी झाले असे मानले जाते. ह्या लेण्यांच्या प्रांगणातच पूर्वी भव्य असे दोन दगडी हत्ती होते त्यावरूनच पोर्तुगीजांनी ह्या बेटाला 'एलेफंटा' असे नाव दिले. ह्यातील एक हत्ती आज पूर्णपणे नष्ट झालाय तर दुसरा हत्ती मुंबैतल्या कुठल्यातरी बागेत आहे.

घारापुरीचा थोडक्यात इतिहास तर सांगून झाला. चला तर आता घारापुरी भ्रमंतीला सुरुवात करूयात.

घारापुरीचे शैवलेणी म्हणजे ५ गुहांचा समुदाय. ह्यातले सर्वात प्रसिद्ध असे हेच ते क्रमांकाचे शैवलेणे अर्थात लेणी क्र. १.

लेणी क्र. १

हे एक भले प्रचंड लेणे. ह्याची तुलना वेरूळमधल्या धुमार लेण्याशीच होऊ शकते आणि ते रास्तही आहे. प्रशस्त असा लांबरूंद सभामंडप, सभामंडपाच्या छतास तोलून धरलेले भव्य स्तंभ, सभामंडपातच उजवीकडच्या कोपर्‍यात एकीकडे शिवलिंग असलेले सर्वतोभद्र प्रकारचे गर्भगृह, दोन्ही कडेच्या भिंतींवर शिवाशी निगडीत असलेले पौराणिक प्रसंग कोरलेले आणि डावीकडे एकेक उपलेणे, ती उपलेणीही कोरलेलीच आणि त्यातीलच एका उपलेण्यात पाण्याचे प्रचंड टाके अशी याची रचना.

लेणीत प्रवेश करण्याच्या आधीच दोन्ही बाजूंना भव्य असे कोरलेले खडक दृष्टीस पडतात. त्यांची आमलकसदृश रचना पाहून हे स्तंभशीर्षांचे आमलक असावेत हे सहजी लक्षात येते. लेणीच्या प्रवेशद्वारात चार स्तंभ असून दोन/ तीन पायर्‍या चढून आपला प्रवेश लेणीत होतो.

लेणीचे प्रवेशद्वार
a

सभामंडपाची रचना

a

सभामंडप
a

लेणीत प्रवेश केल्यानंतरच डाव्या बाजूच्या भिंतीत एक शिल्पपट कोरलेला दिसतो. तो हा महायोगी शिव अथवा योगेश्वर शिवाचा.

महायोगी शिव.

महायोगी शिव म्हणजे ध्यानमग्न शिवाची योगी स्वरूपातली प्रतिमा.
कमलासनावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेला शिव. कमळाचा दांड्याला डावी उजवीकडे असलेले दोन नागपुरुष आधार देत आहेत. ही प्रतिमा महायान पंथाच्या ध्यानस्थ बुद्धावस्थेवरून प्रेरित आहे हे सहजी लक्षात येते. परंपरा बदलत असताना शिल्पाचे मुख्य स्वरूप तसेच राहते मात्र आजूबाजूची पात्रे बदलत जातात जसे इथे शिवाच्या डाव्या बाजूस हंसारूढ चतुर्मुखी ब्रह्मदेव, उजवे बाजूस गरूढारूढ विष्णू, अश्वारूढ सूर्य तर शिल्पपटाच्या वरच्या बाजूस गंधर्व, अप्सरा आणि ऋषी शिवाचे ध्यानमग्न रूप पाहण्यास जमले आहेत. दोळे मिटलेल्या शिवाच्या चेहर्‍यावर कमालीचे शांत भाव आहेत. दोन्ही हात भग्न केलेले असले तरी प्रचंड सुंदर अशी ही मूर्ती आहे.

महायोगी शिव शिल्पपट

a

थोडे अधिक जवळून. उजवीकडे गरूढारूढ विष्णू व त्याच्या वरचे बाजूस सूर्य आहे. तर डावीकडे वरच्या बाजूस ब्रह्मा आहे.

a

विष्णू, सूर्य आणि गंधर्व व अप्सरा

a

याच्या समोरच्याच भिंतीवर म्हणजेच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूचे भिंतीवर नटराज शिवाचा शिल्पपट कोरलेला आहे.

नटराज शिव

ही शिवाची तांडव अथवा नृत्य स्वरूपातील मूर्ती.
नृत्यमग्न अवस्थेत असलेल्या अष्ट्भुज शिवाचे नेत्र अर्धोन्मिलित आहेत. एका हातात त्याने नागबंधात अडकवलेले शस्त्र हाती घेतलेले दिसते आहे बाकी भुजा भग्न झाल्यामुळे त्या हातांमध्ये काय काय होते ते आज कळत नाही पण डमरू, त्रिशूळ, अग्नी, कपाल अशी साधने त्यांत असावीत.
इथेही शिवमूर्तीच्या डाव्या बाजूला भाला हातात धरलेला स्कंद अथवा कार्तिकेय आहे तर त्याच्या वरती परशुधारी गणेश व ब्रह्मदेव आहेत. तर उजव्या बाजूला पार्वती, गरूढारूढ विष्णू, गजारूढ इंद्र आहेत. तर वरचे बाजूस ऋषी, गंधर्व व अप्सरा आहेत.

नटराज शिव

a

हंसारूढ ब्रह्मा, ऋषी आणि गणेश

a

हे दोन्ही शिल्पपट पाहून आम्ही घारापुरीतल्या सर्वात महत्वाच्या मूर्तीकडे वळलो. ही मूर्ती म्हणजे जगद्विख्यात त्रिमुखी शिवाची अर्थात सदाशिवाची.

सदाशिव.

ह्या मूर्तीचे स्थान प्रवेशद्वाराच्या बरोबर समोरील बाजूच्या भिंतीवर आहे. दोन्ही बाजूंस स्तंभांच्या रांगा आहेत. ही मूर्ती येथील सर्वात महत्वाची असल्यामुळे येथील शिवपिंडीचे गर्भगृह हे मधोमध न ठेवता ते उजवीकडच्या कोपर्‍यात कोरलेले आहे.

स्तंभांच्या रांगेमधून दिसणारा सदाशिव
a

बरेच जण ह्या मूर्तीला ब्रह्मा, विष्णू आणि महेश समजतात पण ही तशा प्रकारची अर्थात दत्त मूर्ती नाही. कारण हे पूर्णपणे शैवलेणे आहे. ब्रह्मा, विष्णू ह्या मूर्तींना ह्या लेण्यामधील इतर शिल्पपटांत दुय्यमच स्थान दिलेले आहे.
ही सदाशिवाची मूर्ती एका चौकटीत कोरलेली आहे. चौकटीच्या दोन्ही बाजूस आधारासाठी बटू घेऊन उभे राहिलेले भव्य द्वारपाल आहेत. हे बटू म्हणजे कोणी सेवक नसून द्वारपालांची शस्त्रे आहेत. अशा प्रकारच्या मूर्तीला आयुधपुरुष म्हणतात. आणि इथले इतरही शिल्पपटांत दिसणारे द्वारपाल हे आयुधपुरुष द्वारपालच आहेत.

तर आता मुख्य मूर्तीकडे वळूयात.

ही मूर्ती प्रचंड मोठी आहे. इथे जरी प्रत्यक्ष तीन मुखे दिसत असली तरी ही मूर्ती पंचमुखी शिव अथवा सदाशिव असे मानले जाते. ही दृश्य तिन्ही मुखे शिवाच्या चेहर्‍यावरील तीन वेगळे भाव दाखवतात. डावीकडचे अघोर मुख, मधले तत्पुरुष मुख, उजवीकडचे वामदेव मुख ही तीन दृष्य मुखे तर चौथे सद्योजात नावाचे मुख मस्तकाच्या मागच्या भागी तर पाचवे इशानचे मुख हे वरचे बाजूस अर्थात आकाशात असल्याचे मानले जाते.

a

आता ह्या तीन दृश्य मुखांपैकी एकेक मुख आपण बघूयात.

अघोर

हे मुख दर्शकाच्या डावीकडे आहे. नावाप्रमाणेच हे मुख शिवाच्या रौद्र स्वरूपाचे प्रतिक आहे. शिवाच्या चेहर्‍यावर मिशी असून कपाळी तिसरा डोळा आहे. कानात नागरूपी कुंडल आहे तर एका हातातही त्याने नाग उचलून धरीला आहे. केश्कुरळे असून मुकुटावर कवटी कोरलेली आहे तर चेहर्‍यावरील भाव बेफिकीर आहेत.

अघोर मुख
a

तत्पुरुष

हे शिवाचे मुख अतिशय प्रसन्न भाव दर्शवतात. जटासांभारावर त्याने सालंकृत मुकुट धारण केला असून हाती मोदकसदृश असे काहीतरी फळ आहे. जणू ह्या मुखाने शिव जनांचे पालन करीत आहे.

a

वामदेव

हे मुख दर्शकाच्या उजवीकडे आहे. शिवाच्या डावीकडे ते असल्याने त्याला वामदेव म्हणतात हे पार्वतीचे मुख असेही मानले जाते. ह्या मुखावरील भाव अतिशय सात्विक आहेत. ह्याच्या मुकुटाची ठेवणही वेगळी असून त्याने हाती कमळ धरीले आहे.

a

अत्यंत देखण्या अशा ह्या सदाशिवाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर तितकेच सुरेख असे दोन शिल्पपट कोरलेले आहेत.

आता ह्यापैकी डावीकडच्या शिल्पपटाकडे आम्ही वळलो. हा अत्यंत सुंदर शिल्पपट आहे तो अर्धनारीश्वर मूर्तीचा.

अर्धनारीश्वर

अर्धनारीश्वर म्हणजे शिव आणि पार्वतीची एकत्रित मूर्ती अर्थात पुरुष आणि प्रकृती यांचे एकत्रीकरण म्हणजेच सृजनमूर्ती.
येथील मूर्ती ही अतिशय सुंदर आहे. अर्धनारीश्वराची मूर्ती त्रिभंगमुद्रेत असून चतुर्हस्त आहे. शिवाच्या अर्ध्या भागाने उभे राहण्यासाठी नंदीचा आधार घेतला असून आपले कोपर त्याच्या वशिंडावर टेकविले आहे. तर पार्वतीचा अर्धा भाग हा स्त्रीरूप असल्याने तो जास्तच कमनीय दाखवला आहे. पार्वतीने आपल्या कंबरेचाच आधार हात टेकवण्यासाठी घेतलेला आहे. शिवाच्या एका हातात नागबंधन असून पार्वती ही मात्र स्त्री असल्याकारणाने तिच्या हाती दर्पण आहे. हा आरसा बहिर्वक्र आहे कारण तत्कालीन आरसे हे काचेपासून न बनवले जाता ते शिशाचे अथवा दगड घासून घासून गुळगुळीत करून बनवलेले असत. बहिर्वक्र स्वरूपामुळे हे आरसे जास्तीत जास्त मोठी प्रतिमा दाखवू शकत. शिव-पार्वतीच्या मस्तकातील दोन्ही कर्णभूषणे भिन्न असून शिवाच्या जटाभारात अर्धचंद्र आहे तर पार्वतीने आपल्या केसांचा अंबाडा घातलेला दिसून येतो.
अर्धनारीश्वराच्या शिवाच्या डाव्या बाजूला भालाधारी स्कंद उभा आहे. त्याचे वरचे बाजूस ब्रह्मा आणि ऐरावतारूढ इंद्र आहे तर पार्वतीच्या भागाच्या उजवीकडे मकरारूढ वरूण आणि गरूडारूढ विष्णू आहे. विष्णूच्या हाती चक्र आहे. तर वरचे बाजूस गंधर्व, अप्सरा आहेत तर अर्धनारीश्वराच्या खालचे बाजूस सेवक सेविका आहेत.

अर्धनारीश्वर शिल्पपट

a

अर्धनारीश्वर अधिक जवळून

a

वरूण, विष्णू, काही दिक्पाल आणि अप्सरा

a

अर्धनारीश्वर शिल्पपट पाहून आम्ही सदाशिवाच्या उजव्या बाजूच्या भिंतीत असलेला शिल्पपट पाहू लागलो.
हा शिल्पपट आहे तो गंगाधर शिवमूर्तीचा अथवा गंगावतरण प्रसंगाचा.

गंगाधर शिव अथवा गंगावतरण

गंगावतरणाची कथा ही रामायणात विस्ताराने आलेली आहे. रामाचा पूर्वज इक्ष्वाकू वंशीय सगराला साठ सहस्र पुत्र होते. सगराच्या अश्वमेध यज्ञाच्या अश्वाचे हरण इंद्राद्वारे केले जाते व इंद्र तो अश्व पाताळात तप करीत बसलेया कपिलमुनींशेजारी बांधून टाकतो. स्वतःच्या ताकदीने उन्मत्त झालेले सगरपुत्र यज्ञीय अश्वाचा शोध घेण्यासाठी पृथ्वी खणत खणत पाताळात जातात. पाताळात तप करीत बसलेल्या पुराणपुरुष कपिलमुनींची तपश्चर्या सगरपुत्रांच्या खणाखणीमुळे भंग होते. आपल्या अश्व ह्या कपिलमुनींनीच चोरलेला आहे ह्या गैरसमजुतीमुळे सगरपुत्र त्यांच्या अवमान करतात क्रोधदग्ध कपिलमुनी आपल्या दृष्टीक्षेपात सर्व सगरपुत्रांचे जाळून भस्म करतात. बरेच दिवस सगरपुत्रांचा पत्ता न लागल्याने सगर आपल्या नातवास अंशुमानास आपल्या साठ सहस्त्र पुत्रांचा शोध घेण्यास सांगतात. पाताळात शोध घेता घेता आपल्या भस्मीभूत झालेल्या चुलत्यांचा शोध अंशुमानास लागतो. तिथे जलाञ्जली देण्यासाठी त्याला कोठेही जलाशय दिसत नाही. तिथेच असलेला पक्षीराज गरूड केवळ गंगेच्या पवित्र जलानेच ह्या सगरपुत्रांना मुक्ती मिळेल असे अंशुमानास सांगतो आणि तिथे सुरु होतो गंगावतरणाचा अट्टाहास. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सगरानंतर राज्यावर आलेला अंशुमान तप करतो व अंशुमानानंतर त्याचा पुत्र दिलीप तप करतो पण दोघांचे तप निष्फळ जाते. दिलीपानंतर त्याचा पुत्र भगीरथ राजगादीवर होतो. राज्यत्याग करून आपल्या पितरांना मुक्ती देण्यासाठी तो ब्रह्मदेवाचे आवाहन करण्यासाठी कठोर तप करतो. शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न होऊन गंगेला पृथ्वीवर अवतरीत होण्यासाठी सांगतात. मात्र गंगेचा स्वर्गातून येणारा प्रचंड ओघ थोपवण्यासाठी तिला मस्तकावर धारण करण्यासाठी भगवान शंकराशिवाय कोणीही समर्थ नाही असे सांगून त्यास शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सांगतात. मग भगीरथ परत शिवाचे कठोर तप करून त्यास प्रसन्न करून घेतो. शिव प्रसन्न होऊन गंगेस आपल्या मस्तकी धारण करण्यासाठी तयार होतात व गंगेचे शिवाच्या मस्तकी अवतरण होते. आपली एक जटा हळूच सोडवून शिव गंगेस पृथ्वीवर सोडतात व ती परमपाविनी गंगा भगीरथाच्या पाठोपाठ पाताळात जाऊन आपल्या पवित्र प्रवाहाने भस्मीभूत झालेल्या सगरपुत्रांचा उद्धार करते.

अशी ही गंगावतरणाची थोडक्यात कथा.

इथले गंगावतरणाचे शिल्प थोडे वेगळे आणि ओळखण्यास किञ्चित अवघड असे आहे.

शिवपार्वती त्रिभंगमुद्रेत उभे असून शिवाच्या खालचे बाजूस भगीरथ हात जोडलेल्या अवस्थेत बसून शिवाची प्रार्थना करीत आहे. शिवाच्या मस्तकावर आकाशात तीन मुख असलेली गंगा जटेत येण्यासाठी उत्सुक आहे. गंगेच्या तीन मुखांचे कारण म्हणजे तिला त्रिपथगा म्हणतात. कारण ती स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असा तीन पथांतून प्रवास करत आहे. स्वर्गातून उडी घेताना ती मंदाकिनी असते, पृथ्वीवर ती भगीरथ प्रयत्नांनी येत आहे म्हणून ती भागीरथी आहे तर पाताळात सगरपुत्रांचा उद्धार करायला जाताना ती भोगवती आहे.
आपल्या पतीच्या मस्तकी दुसरी स्त्री येत असलेली पाहून स्त्रीसुलभ मत्सरामुळे पार्वती शिवापासून दूर सरकलेली आहे. शिव पार्वती ह्या दोघांच्याही शरीराचा तोल एकमेकांच्या विरूद्ध बाजूस झुकल्यामुळे ह्या शिल्पपटाचा समतोल अतिशय सुरेखरित्या साधला गेलाय. गंगावतरणाचा हा चमत्कार बघण्यासाठी इथेही ब्रह्मा, विष्णू, गंधर्व आणि अप्सरा आलेले आहेत.

गंगावतरण. खाली उकीडवा बसलेला भगीरथ

a

शिव पार्वती व शिवाच्या मस्तकी प्रवाही गंगा

a

गंगावतरणाच्या पुढील बाजूस आहे ते कल्याणसुंदर शिवाचे शिल्प अर्थात शिवपार्वती विवाहपट

कल्याणसुंदर शिव

हा इथला एक नितांत सुंदर शिल्पपट. इथला शिवपार्वतीच्या विवाहाचा प्रसंग हा वेरूळच्या क्र. २१ मधील रामेश्वर लेणीतील शिल्पपटापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा आहे.
शिवपार्वतीच्या विवाहाचे पौरोहित्य करायला साक्षात ब्रह्मदेव आलेला आहे. तो खालती बसून विवाहसोहळ्याची मांडामांड करत आहे. पार्वतीचा पिता हिमवान आपल्या कन्येला अलगदपणे घेऊन येत आहे. हिमवानाच्या मागून अमृतकुंभ घेऊन चंद्र येत आहे. आपल्या कन्येचा पती हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे. तर पार्वतीच्या अर्धोन्मिलित चेहर्‍यावर अतिव समाधान साकारले आहे. पार्वतीने आपल्या एका हाताने शिवाचा हस्त पकडलेला आहे तर शिवही समाधानात बुडून गेला आहे. शिवपार्वतीच्या अनुपम विवाहसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येथेही देवदेवता, गंधर्व, ऋषी, अप्सरा आदी आलेले आहेत.

कल्याणसुंदर शिव

a

हिमवान, पार्वती आणि भगवान शिव. किती सुरेख त्या भावमुद्रा

a

ह्या शिवाच्या अत्यंत संतुलित मूर्तीच्या समोरच शिवाची संहारमूर्ती आहे ती म्हणजे अंधकासूरवधमूर्ती

अंधकासुरवधमूर्ती

अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणार्‍या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याचे कातडे अंगाभोवती गुंडाळून एका हाती कपाल धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. आपल्या त्रिशुळावर उचलून धरलेल्या अंधकाचे रक्त गोळा करता यावे म्हणून हाती कपाल धारण करतो. त्या कपालाबाहेर पडणारे पडणारे रक्ताचे चुकार थेंब त्वरेने शोषून घेण्यासाठी आपल्या योगसामर्थ्याने मातृकेची (चामुंडेची) उत्पत्ती करतो.

इथली मूर्ती अतिशय प्रत्ययकारी आहे. गजासुराला फाडून त्याचे चर्म आपल्या अंगाभोवती गुंडाळून क्रोधाने दग्ध झालेल्या अष्टभुज शिवाने आपल्या एका हाती खङ्ग धारण केले आहे तर दुसर्‍या हाताने अत्यंत आवेशाने आपला त्रिशूळ अंधकाच्या शरीरात खुपसला आहे. हाती कपाल धरून त्यात तो अंधकाचे रक्त गोळा करीत आहे. शिवाला इतका क्रोध आलेला आहे की त्याचे डोळे जणू खोबणीबाहेर येत आहेत तर त्याचा दात त्याच्याच ओठात रूतून बाहेर आला आहे व त्याने त्याचा ओठ जणू काही फाटला आहे. शिवाच्या मुकुटावर कवटी कोरलेली असल्याने त्याचे खवळलेले रौद्र रूप विलक्षण उठावदार दिसत आहे. एका पायावर भार देत शिवाने आपला दुसरा पाय वर उचलून ठेवला आहे. पायापाशी बसलेले पार्वती, सेवक आज भग्न झाल्यामुळे दिसत नाहीत पण त्यांचे अवशेष मात्र आजही दिसतात.

अंधकासुरवधमूर्ती संपूर्ण शिल्पपट

a

गजचर्म, खङग, कपाल धारण केलेला व त्रिशूळावर अंधकाला उचलून धरलेला शिव

a

शिवाचा खवळलेला चेहरा व ओठात रूतलेला दात

a

अंधकासुरवधमूर्ती पाहून आम्ही आता सभामंडपाच्या डाव्या बाजूकडील म्हणजे अर्धनारीश्वराच्या डावीकडील दोन शिल्पपट पाहाण्यास गेलो. इथला एक शिल्पपट आहे तो म्हणजे उमा माहेश्वर मूर्तीचा

उमा माहेश्वर मूर्ती अथवा शिव पार्वती अक्षक्रीडा

इथली मूर्टी बरीच भग्न असून शिव पार्वती सारीपाट खेळताना दाखवले आहेत. अर्थात ह्यात सारीपाटाचा पट भग्न असल्याने दिसू शकत नाही. शिवपार्वतीची अक्षक्रीडा पाहण्यासाठी खाली शिवगण जमलेले आहेत. खाली नंदी असून पार्वतीच्या उजवीकडे स्कंद उभा आहे तर वर देव्गण, गंधर्व जमलेले आहेत. शिवाच्या खेळातील नैपुण्यामुळे अर्थात शिव सतत खेळात जिंकत असल्याने पार्वती किञ्चित चिडलेली आहे आणि शिवापासून थोडी दूर सरकलेली आहे. तर शिव एका हाताने तिचा हात पकडून तिचे आर्जव करीत आहे.

उमा माहेश्वर शिल्पपट

a

शिव पार्वती व स्कंद

a

ह्याच मूर्तीच्या विरूद्ध बाजूस शिवाची अनुग्रहमूर्ती आहे ती म्हणजे रावणानुग्रहशिवमूर्ती

रावणानुग्रहशिवमूर्ती अथवा रावणकैलासोत्थापन

कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची अक्षक्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची थोडक्यात कथा.

ह्या शिल्पपटात रावणाने कैलास पर्वत उचलून धरलेला दिसत असून त्याच्या पराक्रमामुळे शिवगण भयभीत झालेले दिसत आहेत. पार्वतीचे नुकतेच अक्षक्रीडेवरून शिवाशी भांडण झाल्यामुळे ती शिवापासून दूर सरकलेली आहे आणि त्याच सुमारास रावण तिथे येऊन कैलासास हलवण्याचा प्रयत्न करीत आहे. दूर सरकलेल्या पार्वतीला एका हाताने सावरून धरत भेदरलेल्या शिवगणांना धीर देत शंकर सस्मित मुद्रेने आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरत रावणाचे गर्वहरण करीत आहे.

रावणानुग्रहशिवमूर्ती

a

रावणानुग्रहशिवमूर्ती अधिक जवळून

a

रावणानुग्रहाचा हा भव्य शिल्पपट पाहून आम्ही ह्याच सभामंडपातील उजवीकडच्या कोपर्‍यात असलेले गर्भगृह पाहण्यास निघालो.

गर्भगृह

हे गर्भगृह 'सर्वतोभद्र' प्रकारचे आहे. म्हणजे हे चारही बाजूंनी मोकळे असून आत प्रवेश करण्यासाठी चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारांवर अतिशय भव्य असे आयुधपुरुष द्वारपाल असून आत शिवलिंग आहे.

सर्वतोभद्र गर्भगृह

a

गर्भगृहातील शिवलिंग

a

हे गर्भगृह पाहून आम्ही आता उजवीकडील उपलेणे पाहण्यास निघालो

उजवीकडील उपलेणे

हे उपलेणे साधे असून ह्या भागात जमिनींतर्गत खोदलेले पआण्याचे भलेमोठे टाके असून शेजारीच एक गाभारा आहे. आतमध्ये शिवलिंग असून ओसरीच्या भिंतीवर योगेश्वर शिवाची प्रतिमा कोरलेली आहे.

ओसरीतील महायोगी शिव

a

हे उपलेणे पाहून आम्ही आता सभामंडपाच्या डावीकडील उपलेणे बघावयास गेलो.

डावीकडील उपलेणे

हे उपलेणे मात्र भव्य आहे. पुरातत्व खात्याने येथील स्तंभांची पुनरूर्भारणी केल्याचे दिसते आहे. सभामंडप, आतमध्ये गर्भगृह. त्याच्या दोन्ही बाजूंना सिंह. शेजारीच दोन्ही बाजूंनी अनुक्रमे भैरव आणि शैव आयुधपुरुष द्वारपाल आणि त्याही पलीकडे दोन्ही बाजूंना लहानसे उपमंडप अशी याची रचना.

लेण्याच्या समोरील मोकळ्या जागेत एक प्रचंड रंगशिळा असून येथे पूर्वी नंदी उभारण्याची सोय केलेली असावी किंवा येथे शिवमूर्तीसमोर वादक आपली कलाकारी दाखवित असावेत.

उपलेण्याचा दर्शनी भाग

a

मध्यभागातील गर्भगृह आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सिंह

a

डावीकडच्या उपमंडपावर स्थित असलेला भैरव

a

उजवीकडील उपमंडपाच्या बाहेर असलेला शैव आयुधपुरुष

a

उजवीकडील उपमंडप

हा उजवीकडील उपमंडप मात्र महत्वाचा. ह्याच्या अंतर्भागात भव्य असा अष्टमातृकापट आहे. तर दोन्ही बाजूस काटकोनांत असलेल्या भिंतीवर समोरासमोर गणेश आणि स्कंद प्रतिमा आहेत.

a

अष्टमातृका

येथील शिल्पपटावर आठ मातृका दाखवल्या आहेत. तर त्यांच्या शेजारी गणेशसुद्धा आहे. ऐंद्राणी, वैष्णवी, ब्राह्मणी, कौमारी, वाराही, माहेश्वरी आणि चामुंडा ह्या नेहमीच्या सप्तमातृकांच्या जोडीला कधीकधी नारसिंही नामक आठवी मातृकासुद्धा दाखविली जाते ती येथे आहे. ह्या मातृका उभ्या अवस्थेत आहेत त्यांनी आपापली बाळे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचे ध्वज आहेत तर ध्वजांवर त्यांची वाहने स्थापित आहेत. अर्थात ह्या मातृका बर्‍याच भग्न झाल्यामुळे नीटशा ओळखू येत नाहीत पण हंसामुळे ब्राह्मणी, मोरामुळे कौमारी, गिधाडामुळे चामुंडा तर नंदीमुळे माहेश्वरी ह्या काही मातृका मात्र बर्‍यापैकी ओळखता येतात.

अष्टमातृकापट

a

शेजारील भिंतीवरील गणेश

a

स्कंद

अष्टमातृकांच्या उजवे बाजूस स्कंद प्रतिमा कोरलेली आहे. स्कंदाने एका हाती भाला तर दुसर्‍या हाती कोंबडा धारण केलेला आहे जो त्याला अग्नीने दिला आहे. स्कंदाच्या बाजूस दोन्ही बाजूस अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, शिवगण, गंधर्व व अप्सरा आहेत.

स्कंद

a

हे उपलेणे पाहिल्यावर घारापुरी क्र. १ चे लेणीदर्शन संपते.

ह्या थोडे पुढे गेल्यावर पुढच्या लेणी आहेत पण काही अर्धवट खोदलेल्या तर काही अगदीच साध्या. सध्या तेथे पुरातत्व खात्यातर्फे डागडुजीचे काम चालू असल्याने त्या लेणी बघायला अंतर्भागात जाता आले नाही त्यामुळे बाहेरूनच ती बघून अशतः समाधान मानून घ्यावे लागले.

लेणी क्र. २

हे लेणे खोदण्याचे काम अर्धवट राहिलेले आहे.
a

लेणी क्र. ३

दर्शनी भागावर असलेल्या स्तंभांमळे हे लेणे भव्य दिसते. ओसरी, गर्भगृह आणि गर्भगृहांच्या प्रवेशद्वारावर कोरलेले द्वारपाल अशी याची रचना.

a

लेणी क्र. ४

हे लेणे अर्धवट राहिलेले दिसते. ह्या लेणीच्या दर्शनी भागावर पण आयुधपुरुष द्वारपाल आहेत.

a

लेणी क्र. ४ चा दर्शनी भाग
a

लेणी क्र. ५

हे लेणे तर खूपच अर्धवट आणि प्रचंड पडझड झालेले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित केलेले आहे. कोरीव काम काहीही नाही.

a

इथे आमच्या घारापुरी लेणीदर्शनाची समाप्ती होते.

तसे बघायला घारापुरीची ही लेणी बघायला २० मिनिटे पुरेशी आहेत. पण आम्ही सर्वजण शिल्पे समजावून घेऊन पाहात असल्याने ही सर्व लेणी बघायला तब्बल अडीच तीन तास लागले.
मुविंना ब्राह्मणसभेतील भाषणानिमित्ताने लवकर जायचे असल्याने ते कंजूस, स्पा आणि सौरभ उप्स काहीसे लवकर निघून गेले. आता ४ वाजत आल्याने निघायची तशी थोडी घाईच झाली होती. थोडासा नाष्टा करून आम्ही ५ च्या बोटीने मुंबई - अपोलोबंदर येथे जाण्यासाठी प्रस्थान केले. बोटीत विजुभाउ, मकी, ५०, किसन आदी मिपाकरांशी भरपूर गप्पा झाल्या. सीगल पक्ष्यांच्या झुंडीने भरपूर मनोरंजन केले. ६ वाजता गेटवे ऑफ इंडियाला उतरलो.
तिथे एक ग्रूप फोटो काढून पुढच्या भ्रमंती कट्ट्याची योजना आखत एकमेकांचा निरोप घेतला.

काही क्षणाचित्रे

फोटो काढण्यात दंगलेले स्पा, परसु, लीलाधर, धन्या आणि बुवा
a

उपलेणीच्या उंबरठ्यावर माझीही शॅम्पेन, दिपक कुवेत, अत्रुप्त आत्मा, मुवि, गिर्जाप्रसाद गोडबोले आणि प्रशांत
a

सीगल
a

सीगल्सच्या झुंडी
a

गेटवे पाशी पोचताना
a

निरोपाची वेळ

a

समाप्त

धन्यवाद.

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

10 Dec 2019 - 2:53 pm | जॉनविक्क

मस्त बियर मारू पोटभर नैतर सुलु रेड वाईन घेऊ.

जॉनविक्क's picture

3 Dec 2019 - 11:10 pm | जॉनविक्क

व धागा वरआणणाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक अभिन्नदन.

आज बरेच मिपाकर ओळखीचे झाले म्हणता येईल, आणी देखण्याफोटोंमध्ये शिल्पकलेला देखणेपणात कॉम्पिट करतील तर ते म्हणजे आपले लाडके मिपाकर काका मुविच

विजुभाऊ's picture

8 Sep 2022 - 6:01 pm | विजुभाऊ

या निमीत्ताने पुन्हा एकदा आनंद घेता आला सहलीचा

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2022 - 12:44 pm | चौथा कोनाडा

काय ते मिपाकर, काय तो कट्टा, काय त्या लेणी ...

समदं ऑक्के, भारी !

पुन्हा कधी होईल हा कट्टा ?

ओक्टोबर मधे पुन्हा एकदा करुया. कार्ला लेणी केली तर पुणेकरदेखील येऊ शकतील