१९९२ - ९३ च्या दरम्यान एक पोस्ट मोर्टेम पाहण्याचा योग आला. वय २५-२६ पूर्ण बेदरकार, प्रगल्भता शून्य.(माझ्याबाबतीत तरी....शेंडेफळ नेहमी उशिरा प्रगल्भ होत असावे.)
पूर्वी म्हणजे १९७५-१९८० ह्या दरम्यान जेव्हा एखादा माणूस गाडी खाली आला कि त्याला तसेच फलाटावर आणून ठेवत. त्यामुळे तो पांढर्या कपड्यातला लाल ठीपक्यातला देह भेसूर दिसे पण हंड्ल न देतील तर ते मित्र कसले त्यांनी अरे शाळेत नाहीका बेडूक कापला होता तसेच त्यात काय भ्यायचे! असे म्हणून भरीस घातले आणि बेडकाची एवढीच काय ती धैर्याची शिदोरी घेऊन केलेलं ते धाडस!
आम्ही ३ "वीर " निघालो. आणि पीएमसाठी आवश्यक स्टाफ, थंडगार जागा, एक प्रकारचा अनोळखी दर्प आणि आयुष्यात प्रथमच थंडगार नग्न देह तो हि स्त्रीचा पाहावा लागला. ६ प्रेतांपैकी स्त्रीप्रेताचीच निवड हा निव्वळ योग योग कि दुसर्या दिवशी आलेल्या अनुभवाची पार्श्वभूमी निसर्गाने आदल्याच दिवशी केली होती ते कुणास ठाऊक. संपूर्ण पी एम प्रचंड (हा शब्द फार थिटा आहे ) दबावाखाली पाहिले.
ज्यांनी त्या शरीराचे विच्छेदन केले तो माणूस अत्यंत रिस्पेक्ट्ने शरीर हाताळत होता. एक एक गोष्ट उलगडून सांगत होता. मी पूर्ण बधीर आणि प्रचंड घाबरलो होतो केव्हा हे संपतेय असे मला झाले होते पण त्या मानसिक अवस्थेतही त्या माणसाबद्दल मनात नकळत आदर निर्माण झाला कारण मृत असला तरी तो "माणूस" आहे आणि त्यातून ती स्त्री आहे ह्याचे पूर्ण भान त्याला होते आणि कदाचित त्याचा दरारा स्टाफलाहि असावा त्यामुळे सगळे शिस्तीत पार पडले आणि मी थेट टोयलेटला गेलो तिथेहि अंधुक प्रकाश असल्याने आणखीन अवस्था बिकट झाली कार्यभाग उरके पर्यंत ब्रह्मांड आठवले सतत कुणी तरी मागे आहे हि भीती.
हि मनाची अवस्था असूनहि दुसर्या दिवशी ओ टी ला हार्ट सर्जरी पाहायला. ती सर्जरी कदाचित तितकीशी सिरीयस नसावी कारण तिथे सर्व लक्ख होते सगळा पांढरा हिरवा रंग विखुरला होता. दडपण नव्हते. जेव्हा आत गेलो तेव्हा जे सर्जरी करणारे डॉक्टर होते ते म्हणाले या "डॉक्टर पेठकर".... फुल गुदगुल्या झाल्या.... त्यांनी आमची ओळख इतरांना करून दिली का कुणास ठाऊक पण गरज नसताना हि सर्व स्टाफ हसतोय असे वाटले पण तोंडावर मास्क असल्याने काही आकलन झाले नाही असो योग योग हा कि इथे हि एक स्त्री पेशंट होती पण बेशुद्ध. डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेऊन आपले शरीर त्यांना सोपवलेली एक स्त्री. त्या क्षणीतरी निरागस-निर्विकार शुद्धीवर असताना कशी असेल कुणास ठाऊक.
मग सिनेमा आणि इतर विषय वगैरे सुरु झाले बाजूला सर्जरीची तयारी हि सुरु होतीच. मग सर्जरीही झाली.तयारी ते सर्जरी झाली ह्या काळात घडलेल्या घटना मी इथे मांडू शकत नाही. (म्हणजे कपडे काढणे ते कपडे पुन्हा घालणे पर्यंतचा प्रवास) पण सर्जरी सुरु झाल्यापासून, माझा इंटरेस्ट पहिल्या ५ मिनिटातच संपला होता. भीती नव्हतीच. त्या दिवशी एक गोष्ट कळली कि जर मनात राग हि एक भावना असेल तर भीती हि दुसरी भावना किंबहुना कुठलीच इतर भावना निर्माण होत नाही. पण जस जशी सर्जरी पुढे सरकत होती तसे टेबलवर पडलेल्या त्या बाईच्या शरीराबाबत अतिषय अश्लील विनोद सुरु होते त्या अनुषंगाने नॉनवेज जोक्स चालू होते ,हसत होते मध्येच आम्हालाही त्यात ओढण्याचा त्यांचा प्रयत्न करत होते.
एकूण वातावरण मनात घृणा, चीड निर्माण करणारे होते आणि ती गोष्ट इतकी हाईप झाली कि एक क्षण ओ टी तून बाहेर पडावे असे झाले पण मग तो त्या सर्जनचा किंवा ज्यांच्या ओळखीने हा कार्यकम आखला त्यांचा अपमान झाला असता आणि मी घाबरलो अशी माझी चेष्टाही झाली असती. काय करू? हा निर्णय होईना आणि निर्णय होई पर्यंत कार्यक्रम संपला.
मी ह्या द्वंद्वात होतो, कि मी थांबलो म्हणून मीही ह्यात सहभागी आहे का? जर मी निघून गेलो असतो तर माझ्या मनाची अवस्था काय हे सगळ्यांना कधी कळले असते का ? की ते कळायची काही गरजच नव्हती.
म्हणजे मी त्यांच्या अश्लील कोट्या करण्याचा राग येऊन निघालो कि घाबरून पळालो ह्याचा अर्थ त्यांनी घाबरून पळाला असाच लावला असता आणि मीच त्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याला जबाबदार ठरलो असतो.
आजही अनेक अनुत्तरीत प्रश्नाची कलेवर रचून आयुष्याची मार्गक्रमणा चालूच आहे.
प्रतिक्रिया
28 Dec 2013 - 7:57 am | आतिवास
हं! अस्वस्थ करणारा अनुभव आहे खरा! अनेकदा काय निर्णय घ्यावा हे द्वन्द्व राहतेच आपल्या आयुष्यात!!
28 Dec 2013 - 8:38 am | खटपट्या
ऑपरेशन नंतर तुम्ही मुख्य डॉक्टरांना भेटून तुमची नाराजी व्यक्त करू शकला असतात.
मी तुमच्या ठिकाणी असतो तर मीही तसाच वागलो असतो.
तूर्तास गोंधळलेला…।
28 Dec 2013 - 10:56 am | ज्ञानव
ते जमेल. पण त्या वयातली दडपणे इल्लोजीक्ल असली तरी असतातच आणि मग साधी नाराजीही व्यक्त करण्याची हिम्मत होत नाही.
28 Dec 2013 - 8:52 am | आनंदराव
जास्त विचार करु नका.
28 Dec 2013 - 10:54 am | ज्ञानव
मी उत्कृष्ट लिहू शकत नाही (जसे अन्य मिपाकर लिहितात....हेवा वाटतो.)
त्यामुळे,माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलात त्याबद्दल
मनापासून धन्यवाद