तमसो मा ज्योतिर्गमय

प्यारे१'s picture
प्यारे१ in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 12:39 pm

दीपावली. दिवाळी. सणांचा जणू राजा. भारतीय संस्कृतीमधल्या उत्सवप्रियतेचा जणू कळस.
सण प्रकाशाचा, रोषणाईचा, आतषबाजीचा.
सण गोडाधोडाचा, अभ्यंगस्नानाचा, सुवासाचा, सडा घातलेल्या अंगणातल्या सुंदर रांगोळीचा, तुळशीवृंदावनाबरोबर जपल्या जाणार्‍या पावित्र्याचा.
थोडा दिनविशेषांचा विचार करुया.

भारतीय समाजजीवनामध्ये माणसाबरोबरच निसर्गातील मानवासाठी उपयुक्त जवळपास प्रत्येक गोष्टीला सणावारां मध्ये समाविष्ट करुन त्याबद्दल एक प्रकारची कृतज्ञ भावना जपण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. पशु, पक्षी, वृक्ष, सगळ्यांबद्दल अशी भावना विविध सणांद्वारे आपण व्यक्त करतो.

दिवाळीची सुरुवात देखील अशीच होते. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस गणला जावा. ह्या दिवशी गायीची नि वासराची यथायोग्य पूजा, नैवेद्य होतो. आश्विन कृ. द्वादशी ही तिथी.

नंतर धनत्रयोदशी, मग नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा नि शेवटी भाऊबीज हा क्रम आहे.
योग्य मार्गाने आलेल्या धनाची पूजा करुन धनत्रयोदशी साजरी व्हावी, ह्या संपत्तीचा उपयोग नि विनियोग योग्य कारणांसाठी व्हावा ही भावना. ह्याच दिवशी वैद्यकशास्त्राची देवता धन्वंतरीची पूजा होते. आश्विन कृ. त्रयोदशी ही तिथी.

नरकचतुर्दशीदिवशी म्हणे नरकासुराचा भगवान श्रीकृष्णांनी वध केला. अन्यायी, कामांध नरकासुराला मारुन श्रीकृष्णांनी त्याच्या बंदीवासात असलेले राजे मुक्त केले नि अनेकानेक स्त्रियांना देखील मुक्त केलं. तत्कालिन समाज व्यवस्थेनुसार भ्रष्ट झालेल्या ह्या स्त्रियांना कुणी वाली नव्हता त्यामुळे वाईट परिस्थितीत जीवन जगावं लागू नये म्हणून त्या सर्व स्त्रियांचा स्वीकार श्रीकृष्णांनी केला. कृष्णाला स्त्रीलंपट म्हणण्यापूर्वी त्या स्त्रियांना कारागृहातून सोडवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असतं का ह्याचा किमान विचार केला जावा. असो. तत्कालिन सामाजिक स्थितीनुसार योग्य तेच केलं गेलं आहे. पुन्हा असो. आश्विन कृ. चतुर्दशी ही तिथी.

लक्ष्मीपूजनाला श्री पूजन केलं जातं इथं संपूर्ण ऐश्वर्यलक्ष्मीची पूजा होते. व्यापारी वर्ग अत्यंत भक्तीभावानं ही पूजा करतो, नवीन चोपड्या आणल्या जातात. आश्विन अमावस्या ही तिथी.

बलिप्रतिपदेला अमर्याद सत्ताकांक्षेचं प्रतिक असलेल्या बलिचं गर्वहरण झाला असं पुराण सांगतं. त्याला पाताळात धाडलं गेलं. धर्मसत्तेचा वचक नसलेलं राजसत्तेचं ओंगळवाणं रुप आज आपण पाहत आहोत. इथं धर्मसत्ता म्हणजे जे करायला हवं त्याला धर्म मानावं ह्या अर्थी धर्म, कुठलीही उपासना पद्धती सांगणारा एक संप्रदाय ह्या अर्थी धर्म नाही. ते घडत नसल्यानं प्रचंड द्वेषभाव, आसुरी सत्तास्पर्धा, हीन वैयक्तिक नि सामाजिक जीवन असे परिणाम दिसत आहेत. ह्याच दिवशी पतीपत्नीचा नातेसंबंध अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीनं ओवाळलं जातं, ओवाळणी दिली जाते. कार्तिक शु. प्रतिपदा ही तिथी.

भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते नि भाऊ तिच्या रक्षणाला धावण्याची ग्वाही देतो. कार्तिक शु. द्वितीया ही तिथी.
दिवाळी म्हणजे हे सारं खरंच. मात्र फक्त हेच सारं म्हणजे दिवाळी का?

दिवाळीच्या नावातच दिवा आहे, दिवा म्हणजे प्रकाश दाखवणारं साधन. आतमध्ये असलेली तेलवात योग्य पद्धतीनं प्रज्वलित केली की दिवा 'लागतो' नि शांत, मंद, आवश्यक तेवढं दाखवणारा प्रकाश देतो.
अशा जीवन प्रकाशमय करणार्‍या सणाच्या पार्श्वभूमीवर आपण

ॐ असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय
ॐ शांति: शांति: शांति: ||

ह्या सर्वांना परिचित शांतीपाठाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करुया.
शब्दशः अर्थ अत्यंत सोपा आहे.
आम्हाला असत्याकडून सत्याकडं न्या, अंधाराकडून प्रकाशाकडे न्या, मृत्यूकडून अमरत्वाकडं न्या.... शांती, शांती, शांती.

उपनिषदामधला हा शांतीपाठ आपल्याला काही सांगू पाहतो का ते बघायला हवं.
आधीच थोडं स्पष्ट करतो की संस्कृतमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दांच्या अर्थछटा ह्या व्यवहारामध्ये वापरल्या जाणार्‍या अर्थाशी जवळीक साधतात मात्र त्या व्यवहारातल्या अर्थाएवढाच सीमित अर्थ त्या शब्दाला पुरेसा नसतो. कधी कधी थोडा वेगळा अर्थ, कधी पूरक अर्थ, कधी अगदी उलटा अर्थ ह्या शब्दांचे निघतात. शब्दच्छल एवढंच ध्येय आहे त्यांनी औषधाच्या दुकानात जाऊन औषधं न घेता फक्त नावं घेतल्यानं रोग बरा होतो ह्या वाक्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. असो.

शांतीपाठातलं पहिलं चरण आहे 'असतो मा सद्गमय'. असत्याकडून, खोट्याकडून, मिथ्यत्वाकडून सत्यत्वाकडं, खर्याकडं जाण्याचा विचार.
व्यवहारात अगदी सामान्य पातळीवर जरी विचार केला तरी सामाजिक नीतीमध्ये खोटे बोलू नये खरे बोलावे हा एक संदेश सगळेच जण दुसर्याला देतात. स्वतः थोडीफार अम्मलबजावणी देखील करतात. अशा प्रकारे एक चांगला संदेश ‘असतो मा...’ मधून आपल्याला मिळतो.
मात्र वर म्हटल्याप्रमाणं सत्य नि असत्य, सत नि असत चा अर्थ न घेता नेहमीचा न घेता वेगळा अर्थ घ्यावा लागतो.
सत किंवा सत्य म्हणजे जे त्रिकालाबाधित असतं ते 'सत्य'. भूतकाळात होतं, आज आहे नि भविष्यात सुद्धा असणार आहे नि सगळीकडे तितकंच, तेवढंच असणार आहे त्याला सत म्हणावं असं उपनिषद आपल्याला सांगतं. मग काय सत्य आहे? थोडा आजूबाजूचा विचार करुया.

आज ताजी मिळालेली भाजी उद्या सुकणार आहे. दोन महिन्यापूर्वी ती नव्हतीच. आज ताजी आहे. आठ दिवस शीतकपाटात ठेवली तरे बरी राहील मात्र थोड्या दिवसांनी ती नासणार आहे. ती भाजी आली कुठून? शेतातून? जमिनीतून, पृथ्वीतून. ही पृथ्वी पूर्वी कधीतरी नव्हतीच. आज आहे. काही लाखो, कोटी वर्षांनी नसेल.
आता आपला विचार करुया. कधीतरी एका शुक्राणूपासून सुरुवात झालेला 'मी' केवढा होतो? काही शतांश मिलीग्राम? काही काळाने तो पाच सात पौंडाचा होऊन बाहेर पडतो, ५-१०-२०-४०-६०-७०-८० किलो पर्यंत पोचतो. काही काळ टिकतो नि नंतर नष्ट होतो.

जन्मणे, वाढणे, काही काळ टिकणे, हळूहळू कमी होणे, संपणे अशा पाच सहा अवस्था अथवा उत्पत्ती, स्थिती नि लय अशा तीन बेसिक अवस्था आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या आहेत असं लक्षात येतं.
हे लक्षात घेतलं की असतकडून सतकडं जायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते समजतं.
वरच्या 'असतकडून सतकडे' च्या चरणातली 'सत' व्याख्येत बसणारी, सत्य असणारी गोष्ट कुठली आहे? मुळात आहे का? असल्यास काय केलं म्हणजे ती ओळखता येईल? थोडासा विचार करुया.

आपल्या देहाचाच विचार करुया. रात्री छानपैकी झोपलेली व्यक्ती कधीकधी सकाळी स्वतःहून उठत नाही. सर्व साधारण आयुष्याच्या विचारात दहा वीस वर्षं आधीच काहीतरी गडबड होते नि 'संपतं' असं आपण म्हणतो. आता हे संपतं म्हणजे नेमकं काय संपतं? रात्री झोपलेली व्यक्ती नि सकाळी पलंगावर असलेली 'ती' एकच 'दिसते' मात्र एकच 'असत' मात्र नाहीत. अजून दहा वीस वर्षं टिकू शकणारं ते शरीर आज एखाद दोन दिवसात नाश पावायला लागतं.
दिवाळीच्या, सणाच्या तोंडावर असं अभद्र नको वाटतं ऐकायला नाही? (बाकी खरंच भद्र म्हणजे 'चिरंतन भलं' व्हावंसं वाटत असेल तर थोडं 'अभद्र' म्हणण्यापेक्षा वास्तव ऐकायला काय हरकत आहे? दिवाळीमध्ये लोक 'जाणं' थांबत नाही हे वास्तव आहे नि वास्तव हे वास्तव असतं.)

ठीक आहे. मला माझ्या प्रियेचे केस खूप आवडतात. लांबसडक, सुळसुळीत, सिल्की. एखाद दिवशी काय होतं कळत नाही जेवायला बसलेला असताना मी घास तोंडातून बाहेर काढतो. बघतो तर एक असाच लांब केस माझ्या घासाबरोबर तोंडात गेलेला आहे. जोडला गेलेला असताना अत्यंत प्रिय असलेला तो केस मला अप्रिय का झाला? कारण त्याचं जे 'जोडले पण' होतं ते संपलं. हे जोडलेपण ज्यामुळं, ही हालचाल ज्यामुळं, ज्यामुळं हे असलेलं चैतन्य जाणवतं ते तत्त्व हेच 'सत्य'. ते कधीही कमी जास्त होत नाही, काल कमी होतं आज जास्त आहे असंही घडत नाही, शक्य नाही.

त्यालाच आत्मा, कॉन्शसनेस, इ.इ.इ. नावे आहेत. हेच खरं 'माझं' स्वरुप आहे. कारण केस नसला तरी जसं मी असतो तसंच एखादा हात नसला तरी मी असतोच की!

आता हे सत्यत्व आपल्या आतच आहे (ही बोलण्याची भाषा, खरंतर ते सग्ळीकडेच आहे. ते हृदया पाशी जास्त नि पायाच्या नखाशी कमी असं नसतं मुळात शरीरात जास्त नि बाहेर कमी असं नस्तंच) मग असत्याकडून सत्यत्वाकडं जाणं म्हणजे काय? तर असत्य गोष्टींचा म्हणजेच जगातल्या प्रत्येक गोष्टीचाच खरंतर विचार करताना, बघताना, अनुभवताना त्यामधल्या चैतन्य तत्त्वाची जाणीव करुन घेतली, एखादी गोष्ट जाणार आहे म्हणून तिच्याबद्दल शोक न करता त्यामागच्या 'शोक केला तरी जाणार न केला तरी जाणार' ह्या वास्तवतेचा विचार करणं. दुसर्‍याचा जाणार माझा जाणार नाही असं काही आहे का? मात्र मुळात माझा देह गेला तरी 'मी' जाणार आहे का? असा विचार केला तर आपली आपल्या भविष्यात कधीतरी जाणार्या देहाची आसक्ती कमी होते, आपला शोक कमी होतो नि आपण सत्यत्वाकडे 'जातो', त्याची जाणीव समजून घेतो. हा विचार अस्तित्वाच्या पातळीवरचा आहे. (अस्ति)

शांतीपाठातलं दुसरं वाक्य/चरण आहे 'तमसो मा ज्योतिर्गमय' नि हे आपल्याला दीपावलीशी साधर्म्य दाखवतंय. तमस म्हणजे अंधार. ज्योतिचाच अर्थ प्रकाश नि त्यामुळं सहज सोपा अर्थ होतो तो म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडं जाण्याचा विचार व्हावा. अंधार, काळोख म्हणजे जणू अज्ञान, भीती, धास्तीचा विचार तर प्रकाश म्हणजे ज्ञान, शक्ती, ऊर्जा, निर्भयता.

अंधारात असलेला बागुलबुवा ही आपण लहानग्याला दाखवत असलेली भीती त्याला वाटत असलेल्या अज्ञानातून येते.
इथं थोडा वरचाच विचार मात्र तो ज्ञानाच्या पातळीवर करावा लागतो. मला जे ज्ञान होतं ते कसं होतं? आपल्या इंद्रियांच्या ‘माध्यमातून’ होतं. अंतःकरण म्हणजे आतलं करण म्हणजे इंद्रिय. ह्याच्या ‘माध्यमातून’ देखील होतं. एक उदाहरण घेऊ. दूध तापायला ठेवलेलं असताना दूधाकडं लक्ष ठेवता ठेवता डोळे पातेल्या कडं बघत असतात मात्र दूध ओतू जातं.

म्हणजे इंद्रिये आपल्याला ज्ञान करुन देतात का? डोळे आपल्या पर्यंत एखादी प्रतिमा आणून दाखवतात तेव्हा ते समजून घेण्यामागं 'काहीतरी' असायला हवं की नाही? वरच्या उदाहरणातल्या पलंगावरच्या 'ती' ला डोळे असतातच की. मात्र आत ज्ञानाची जाणीव आहे का? ह्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे.

ही ज्ञानाची जाणीव ज्या चैतन्य शक्तीच्या बळावर आपल्याला होते ती शक्ती म्हणजे मी, माझं स्वरुप आहे हा विचार आपल्याला ज्ञानापर्यंत नेऊन पोचवतो. तमसो मा ज्योतिर्गमय ह्या चरणातून आपल्याला जे मी म्हणजे माझा देह, माझी इंद्रिये, माझं मन, माझे प्राण असं वाटत असतं त्या अज्ञानापासून मी म्हणजे नेमकं काय ह्या ज्ञानापर्यंतच्या प्रवासाचा विचार करता येतो.

देह, इंद्रिये म्हणजे मी नाही हा विचार वर केला. 'जे माझं असतं ते मी नाही' ह्या अत्यंत सामान्य वाटणार्‍या पण अत्यंत तर्कशुद्ध वाक्याचा आवाका लक्षात घेतला तर मी म्हणजे मला स्वत: वाटणारी माझं नाव, माझा देह, माझं शिक्षण, माझा आयक्यू, माझी प्रतिष्ठा, माझी संपत्ती, माझी सत्ता, माझी किर्ती, माझं घर, माझी नातेवाईक मंडळी, बायको मुलं,'माझे'पण असलेला प्रत्येक आतला घटक सुद्धा जसं की माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, माझा अहंकार ह्यातलं एकही मी नसतो.

एकदा हे वास्तव पटलं की मृत्यू आला तर मी जाणार की माझं काही जाणार आहे ह्याबाबतची खात्री नक्की होते नि स्वत:च्या अ-मृतत्वाची जाणीव आपल्याला होते. अर्थात हे निव्वळ शब्दांनी नव्हे तर विचारांनी, त्यांच्या निदिध्यासानंच शक्य होतं. 'मृत्योर्मा अमृतं गमय' हे चरण म्हणजे जणू वरच्या दोन्ही चरणांचा परिणाम आहे. वरचे दोन जमले की आपसूकच तिसरं समीकरण सुटतं.

एकदा वास्तवाची ओळख पटली की हव्यास थांबतो कारण अनाकलनीय संग्रह, स्पर्धा, चुरस, भीती, द्वेष, मत्सर सगळं सगळं थांबतं नि आत्यंतिक शांततेचा अनुभव 'आतमध्ये' येतो. 'शांति: शांति: शांति:' म्हणण्यामागची भावना असते. मात्र वर म्हटल्याप्रमाणं हे सगळं आत्यंतिक संयमपूर्वक, विचारांचा योग्य वेळी अवलंब करुन, (मुळात त्या त्या प्रसंगात तो विचार जागा राहण्यापासून सुरुवात असते.)

ह्या दीपावलीच्या मंगलप्रसंगी आपल्या सर्वांना सत्यत्वाचा, ज्ञानाचा, अमृतत्वाचा अनुभव घेता येवो किमान त्या मार्गाने मार्गक्रमणाला सुरुवात होवो हीच परमात्मस्वरुपाकडं प्रार्थना.

|| शुभ दीपावली ||

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2013 - 2:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर अभ्यासपूर्ण लिखाण..

ह्या दीपावलीच्या मंगलप्रसंगी आपल्या सर्वांना सत्यत्वाचा, ज्ञानाचा, अमृतत्वाचा अनुभव घेता येवो किमान त्या मार्गाने मार्गक्रमणाला सुरुवात होवो हीच परमात्मस्वरुपाकडं प्रार्थना.

आमेन टु दॅट!!! लेखन आवडले.

सविता००१'s picture

1 Nov 2013 - 4:50 pm | सविता००१

काय मस्त लिहिलं आहेस. आवडलं अगदी आणि पटलं सुद्धा

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2013 - 1:02 am | अत्रुप्त आत्मा

+१ :)

सुधीर मुतालीक's picture

1 Nov 2013 - 5:14 pm | सुधीर मुतालीक

छान लिहीलंस मित्रा ! एकदम विस्तृत आणि अभ्यास्पूर्ण.

शिवोऽहम्'s picture

1 Nov 2013 - 8:54 pm | शिवोऽहम्

छानच हो! दिवाळी दिवाळी आली!

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 10:05 pm | मुक्त विहारि

कं लिवलय....

सोत्रि's picture

1 Nov 2013 - 11:31 pm | सोत्रि

छान! अगदी दिवाळी अंकाला साजेसा लेख!!

-(अंधाराकडून प्रकाशाकडे असा निरंतर प्रवास करणारा) सोकाजी

पैसा's picture

2 Nov 2013 - 11:38 pm | पैसा

दिवाळीची थोडक्यात माहिती अन, त्यासोबत विवेचन आवडले!

अनन्न्या's picture

6 Nov 2013 - 6:16 pm | अनन्न्या

छान लिहीलय!

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 4:41 am | स्पंदना